ही सारी सजावट पाहून 'ती' प्रसन झालेली दिसली की तिने मनात दिलेले धन्यवाद अत्यंत नम्रतेने स्वीकारून ती बशी तो तिच्या पुढ्यातून उचलून शेजारच्या टेबलावर ठेवील. मग काटा आणि सुरी यांचा त्या बशीत चाललेला नाच आपण पाहतो न पाहतो तोच क्षणार्धात त्या माशाच्या पोटातील काटा त्याने बाहेर काढलेला दिसेल. धुतल्यासारखा स्वच्छ आणि पुन्हा कुठेही न मोडता. इथे तुमचे आश्चर्य शिगेला पोचलेले असेल; आणि 'हि'च्यापुढे पूर्ववत माशाची बशी ठेवून दुसऱ्या एखाद्या रिकाम्या बशीतून तो काटा घेऊन तो वेटर तसाच लपकत निघून जाईल. तिच्यापुढे ठेवलेला आता तो बिनकाट्याचा मासा आणि तुमच्या पुढ्यातला तो काट्यासकटचा मासा यांत सकृद्दर्शनी तरी काहीच फरक नाही, हे लक्षात येताच आपण पूर्ण थिजून जातो. काटा काढावा तर हा असा!
दिडमूढ होऊन पुढ्यातल्या बश्यांकडे आपण काही वेळ नुसतेच पाहत बसतो. विशेषतः केवळ कर्तव्यबुद्धीने स्वागतापुरते तोळाभर स्मित करणाऱ्या, प्रत्यक्ष खाद्यपदार्थापेक्षा त्यांच्या उपकरणांनाच अधिक महत्त्व देणाऱ्या, टेबल मॅनर्समधे तुमची जराशी चूक झाली तरी ती कटाक्षाने तुमच्या नजरेला आणून देणाऱ्या आणि जेवण संपताच तुम्ही कधी उठता याची वाट पाहणाऱ्या इंग्लिश वेटर्सच्या देशातून तुम्ही फ्रेंच वेटर्सच्या देशात आला असाल, तर त्यांच्या तत्परतेने, वाकवाकून केलेल्या स्वागताने, अधिक स्वादिष्ट आणि सुंदर फ्रेंच जेवणाच्या दर्शनाने आणि त्याहून म्हणजे त्या वेटर्सच्या साऱ्या नृत्यमय हालचालींनी तुम्ही असे काही विरघळून जाता की, मग जेवताना भूक नाहीशी होते आणि उरतो फक्त आस्वाद !
- पु.ल. देशपांडे
(अपूर्वाई)
पूर्ण मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
0 प्रतिक्रिया:
Post a Comment