Wednesday, October 16, 2013

ती पुल-कित भेट - अशोक पाटोळे

विनोद म्हटलं की मराठी माणसाला आठवणारं पहिलं नाव म्हणजे पु.ल. पुलंच्या अशाच काही पुलकित करणाऱ्या भेटींचे फ्लॅशबॅक
--अशोक पाटोळे

‘‘अशोक, लवकर बाथरूममधून बाहेर ये. पु.ल. तुला भेटायला येतायत.’’
खंडाळ्याच्या कामत रिसॉर्टच्या बाथरूमच्या दरवाजावर बिपीन वर्टी नावाचा आमचा दिग्दर्शक- निर्माता मित्र (‘चंगूमंगू’ फेम) धाडधाड थापा मारून सांगत होता.

‘‘अशोक, लवकर आटप. पु.ल. आणि सुनीताबाई तुला भेटायला येतायत.’’ ही घटना आहे १९८७-८८ सालची. मी चित्रपटसृष्टीत नुकतंच पदार्पण केलं होतं. म्हणजे तोपर्यंत मला कुठलंही पद अर्पण झालेलं नव्हतं. फक्त सचिन (पिळगावकर- तेंडुलकर नव्हे) यांचं ‘माझा पती करोडपती’चे संवाद एवढंच माझं चित्रपटसृष्टीला योगदान- तेही योगायोगाने झालेलं होतं. एकदा सचिन पिळगावकर माझं नाटक बघायला आले होते- ‘राम तुझी सीता माऊली’ या विचित्र नावाचं- मध्यवर्ती भूमिकेत मच्छिंद्र कांबळी होते. त्यांनी नाटकात जी काही पदरची वाक्यं घातली होती ती माझीच पदरमोड समजून सचिननी मला ‘माझा पती करोडपती’चे संवाद लिहिण्याचं आमंत्रण दिलं होतं. तो चित्रपट प्लाझामध्ये कधी आला आणि कधी गेला हे भारतमातालाही कळलं नव्हतं. तेव्हा इतका नवखा लेखक मी! या क्षणी आम्ही नवीन चित्रपटाचं स्टोरी सीटिंग करण्यासाठी खंडाळ्याला जमलो होतो. मी, बिपीन आणि विक्रम मेहरोत्रा नावाचा निर्माता. हा माझा जेमतेम तिसरा चित्रपट! तेव्हा इतका नवखा लेखक मी. तरीही पुलं मला भेटायला येतायत! बिपीन वर्टीला त्या वेळी कमालीचं आश्चर्य वाटलं असेल, पण त्या आधी एकदा-दोनदा माझी पुलंशी भेट झाली होती हे त्याला माहीत नव्हतं. खंडाळ्याच्या त्या बाथरूमध्ये तोंडाला साबण लावलेल्या स्थितीत मी चाचपडतच गरम पाण्याचा शॉवर चालू केला- तो थंड पाण्याचा निघाला. आधीच थंडीचे दिवस, त्यात खंडाळा. थंड पाण्याच्या शॉवरने मला हुडहुडी भरली. म्हणून परत घाईघाईने चाचपडत दुसरा नॉब फिरवला तर कढत कढत पाण्याचा वर्षांव! माझी अर्धी बाजू गारठून गेली होती तर दुसरी शेकून निघाली! शेवटी मी बादलीतल्या कोमट पाण्याने आंघोळ करण्याचा निर्णय घेतला. एकेक लोटा अंगावर घेत असताना- पुलंबरोबरच्या त्यापूर्वीच्या भेटींचे फ्लॅशबॅक मला दिसायला लागले.

फ्लॅशबॅक १
इंटेरियर रिझव्‍‌र्ह बँकेतलं माझं डिपार्टमेंट! रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्टाफ कँटीनमध्ये इतर सहकाऱ्यांबरोबर सहभोजन घेत असताना कुणी तरी मला सांगितलं की, ते समोर जे बसलेयत ना ते पुलंचे भाचे लागतात- भास्कर पंडित.

मी लगेच माझी प्लेट घेऊन भास्कर पंडितांच्या शेजारी जाऊन बसलो. माणूस मोठा गप्पिष्ट निघाला. पुलंचे किस्से सांगून लोकांना हसवत होता. चेहरा पुलंच्या कुटुंबात खपून जाईल असा. म्हणजे दाट कुरळे केस, गुबगुबीत गाल आणि हनुवटीला मध्ये खळी. दात थोडेसे जास्त पुढे असते तर पुलंची डमी म्हणून खपला असता.

‘‘भास्करराव, मी पुलंचा भक्त आहे,’’ अशी मी स्वत:ची जुजबी ओळख करून दिली आणि आमचे धागे जुळले ते पुढे अनेक वषर्ं जुळलेलेच राहिले. भास्कर पंडित स्वत: त्या वेळी आंतरबँक नाटय़स्पर्धेत गाजलेले दिग्दर्शक होते. अनेक नाटककारांना त्यांनी ब्रेक दिलेला होता आणि लावलेलाही होता, पण माझ्या दृष्टीनं भास्कररावांचं एकच मोठं क्वालिफिकेशन होतं- ते पुलंचे भाचे होते. सुरुवाती- सुरुवातीला वाटायचं की, आपण पुलंचे भाचे आहोत, असं सांगून पंडित आम्हाला मामा बनवतायत, पण इतरही काही सहकाऱ्यांनी जेव्हा सांगितलं की, भास्कर पंडित पुलंबरोबर ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये काम करायचे, तेव्हा मग मी त्यांना चिकटलो. पंडितांनी नंतर माझं ‘आंदोलन’ नावाचं नाटक बसवलं. त्यात त्यांना आणि नाटकाला बरीच पारितोषिकं वगैरे मिळाली. मलाही लेखनाचं वगैरे पारितोषिक मिळालं, पण मला हवं ते पारितोषिक अद्याप मिळायचं होतं, ते म्हणजे पुलंची प्रत्यक्ष भेट आणि तो योग १९७९ साली जमून आला.

बुडबुडबुड! मी दुसरा लोटा डोक्यावर घेतला आणि पुलंच्या अंधुक प्रकाशातल्या एका भेटीचा फ्लॅशबॅक सुरू झाला.
फ्लॅशबॅक २
इंटेरियर. रवींद्र नाटय़मंदिर. १९७९ साली दुपारी २ वाजता. ‘ती फुलराणी’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाआधीची वेळ.

रवींद्रचा तो पहिला प्रयोग बघायचाच असं ठरवून तिकीट काढायला मी रवींद्र नाटय़मंदिरात गेलो. तिथे कळलं की आत सेट लावला जातोय आणि पुलं जातीने लक्ष घालतायत. मी धडधडत्या अंत:करणाने आत जातो. पहिल्याच रांगेत अंधूक प्रकाशात भाई आणि सुनीतामामी (भास्कर पंडित ज्या नावाने त्यांचा उल्लेख करीत ती नावं) रंगमंचावरच्या त्यांच्या फेव्हरीट रंगमंच व्यवस्थापकाला- गफूरला सूचना देत होते.
मी पुलंच्या जवळ गेलो. ‘‘भाई!’’ पुलंनी त्या काळोखात पटकन वर बघितलं.

‘‘भाई, माझं नाव अशोक पाटोळे. माझे एक सहकारी भास्कर पंडित-’’

‘‘हो. आमचाच तो.!’’ माझं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच पुलंनी म्हटलं. मग माझा हात प्रेमाने धरून आपल्या शेजारच्या सीटवर बसवून घेतलं. त्यांच्या त्या गुबगुबीत हातांचा स्पर्श अजून मला आठवतोय (२०११ मध्ये). तो स्पर्श मित्रत्वाचा होता, तो स्पर्श सुहृदय माणसाचा होता, तो स्पर्श एका दात्याचा होता.

‘‘तुमचं कुठलं तरी नाटक भास्करने केलं ना! खूप तारीफ करत होता लिखाणाची.’’ पुल म्हणाले.

‘‘तुमचाच आदर्श ठेवून- ’’ मी उगाच काही तरी बोलायचं म्हणून बोललोय तेवढय़ात ‘‘गफूर, ठेवून दे त्यावर आणखी एक फ्लॉवर पॉट,’’ एक लक्ष माझ्याकडे दुसरं लक्ष गफूरकडे ठेवून पुल बोलत होते.

‘‘हे नाटक बरं का- शॉचं फिमॉलियन आहे ना त्यावरून बेतलंय मी! पण मूळ नाटकाला शेवट असा काही नाहीय, पण मी लिहिलंय.. आणि भक्ती काय काम करते हो!’’ जणू काही आमची वर्षांनुवर्षांची ओळख असल्यासारखे भाई बोलत होते. वास्तविक त्यांना माझा चेहराही नीट दिसत नव्हता, पण पहिल्याच भेटीत ते ज्या अगत्याने बोलले ते मी आजतागायत असंख्य वेळा अ‍ॅक्शन रिप्ले करून ऐकलेलं आहे.
बुडबुडबुड! 

फ्लॅशबॅक ३
एक्स्टेरीयर. गोरेगावचं एक पटांगण. रात्रीची वेळ.

जनता पक्षाचं आंदोलन- पुलंचं भाषण. ते ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली. मीही कुठल्या तरी कोपऱ्यात उत्सुकतेनं उभा, पुलंचं राजकीय भाषण ऐकण्यासाठी! त्या वेळी मृणाल गोरे वगैरेंना इंदिरा सरकारनं अटक केलेली होती.

‘‘गोरेगावला आल्यानंतर मी आधी स्टेशनच्या नावाची पाटी शोधली- अजून गोरेगावच आहे ना!’’ पुलंची फटकेबाजी सुरू झाली होती. हास्याची कारंजी उसळत होती. वातावरण प्रसन्न झालेलं होतं, कारण रंगमंचाबाहेर राजकीय व्यासपीठावर लोक पहिल्यांदाच पुलंना बघत होते. ‘‘या हुकूमशाहीच्या भीतीने घाबरून मन:शांतीसाठी गीता उघडली तर पहिल्याच पानावर ‘संजय उवाच’!’’ एक जोरदार हशा उसळला. ते राजकीय भाषण म्हणजे पुलंचा विनोदी एकपात्री प्रयोगच वाटायला लागला होता. त्या भाषणात इंदिराजींच्या हुकूमशाहीची भलामण करणाऱ्या लोकांची हजेरी घेताना पुलंनी एक छान गोष्ट सांगितली. ‘‘एकदा बरं का.. एका मरणाच्या पंथाला लागलेल्या गुरुदेवांनी आश्रमातल्या आपल्या सगळ्या शिष्यांना जवळ बोलावून घेतलं. हे बघा बाळांनो, मी आता थोडय़ाच वेळात मरणार आहे, पण मला माझा पुढचा जन्म दिसतोय! कोणता, कोणता गुरुदेव? आम्हाला सांगून ठेवा- म्हणजे पुढच्या जन्मी तुमची आम्ही इतकीच सेवा करू! शिष्य म्हणाले. मग गुरुदेव मोठय़ा कष्टाने म्हणाले- ती जी डुकरीण आश्रमाच्या बाहेरून चाललीय- मी तिच्यापोटी जन्म घेणार आहे. (हशा) शिष्यांनी त्या डुकरिणीवर पाळत ठेवली. (हशा) पुढे ती डुकरीण गाभण राहिली आणि तिने काही गुबगुबीत पिलांना जन्म दिला. त्यातलं एक बऱ्यापैकी दिसणारं पिल्लू बघून शिष्यगण म्हणाले, हेच आपले गुरुदेव! (हशा) झालं! त्या दिवसापासून त्या डुकराच्या पिल्लाची शिष्यांनी उत्तम बडदास्त ठेवायला सुरुवात केली. गुरुदेवांचं आवडतं खाणं त्या पिलाला दिलं. झोपायला छन गादीबिदी केली. (हशा) सगळं काही उत्तम चालू होतं, पण एक दिवस सकाळीच शिष्यांच्या लक्षात आलं की, गुरुदेव गायब झालेयत. शोधाशोध करता करता शिष्यगण एका उकिरडय़ावर पोहोचले- बघतात तर काय गुरुदेवांचा सध्याचा जन्म उकिरडय़ावर मस्त लोळत पडलेला होता. (हशा) शिष्य म्हणाले, गुरुदेव काय हे? तुम्ही आणि असे उकिरडय़ावर? तेव्हा डुक्कररूपी गुरुदेव म्हणाले, असू दे रे! हेही काही वाईट नाही. (हशाच हशा) सध्याची जुलमी राजवटही काही वाईट नाही, असं म्हणणाऱ्या लोकांना लोकशाहीची गादी आता नकोशी झालीय.’’ (काही क्षण हशाच हशा आणि टाळ्या.)

अनेक वर्षांपूर्वी ऐकलेल्या आचार्य अत्र्यांच्या भाषणांची आठवण करून देणारं भाषण होतं ते.
बुडबुडबुड! मी भराभर एकामागून एक लोटा अंगावर घेत होतो. बाथरूमच्या दरवाजावर बिपीन थापा मारत होता.

‘‘अरे आटप! पुल कुठल्याही क्षणी येतील. ते खास तुला भेटायला येतायत!’’ बिपीन बाहेरून ओरडत होता.
‘‘झालं झालं! मी कशीबशी आंघोळ आटोपती घेतली! टॉवेलने जमेल तितकं अंग पुसून कसाबसा टॉवेल गुंडाळला. तो गुंडाळत असताना आणखीन एका घटनेचा फ्लॅशबॅक आला.

त्या वेळी मी एक-दोन मराठी मालिकाही लिहिल्या होत्या. ‘अधांतरी’, ‘कथास्तु’ वगैरे. ‘कथास्तु’साठी भारती आचरेकर (निर्माती) यांनी पुलंची ‘म्हैस’ ही कथा निवडली होती. एका एसटीची धडक लागून एक म्हैस कोलमडते आणि मग बसमध्ये प्रवासी, त्या गावातले टपोरी लोकं ‘लायसस बघू!’ म्हणणारा ड्रायव्हर! एक सुबक ठेंगणी आणि तिच्यावर लट्टू एक शहरी तरुण अशा विविध रंगांनी रंगलेली म्हैस ही पुलंची एक अप्रतिम कथा! विनोदी कथा कशी असावी याचा उत्कृष्ट नमुनाच! त्या कथेवर एपिसोड लिहिण्याचं काम माझ्याकडे आलं होतं, पण मी ते घेतलं नाही. मी निर्मातीला सांगितलं, ‘‘या कथेवर मी लिहिणार नाही- कारण एपिसोड चांगला झाला तर श्रेय मूळ कथेला जाईल. एपिसोड फसला तर लोक म्हणतील कथेची वाट लावणारा कोण तो लेखकू?’’ तेव्हा मग निर्मातीने तो एपिसोड दुसऱ्या कुठल्या तरी लेखकाकडून लिहून घेतला होता.
धाडधाड धाड! परत एकदा बिपीनची दरवाजावर थाप!
‘‘अरे आटप! आले पुल दरवाजापर्यंत!’’

मी घाईघाईत कसाबसा टॉवेल गुंडाळून बाथरूममधून बाहेर आलो.
तेवढय़ात कामत रिसॉर्टच्या कामत बंधूंपैकी एका कामतबरोबर भाई आणि सुनीतामामी दरवाजातून आत आले. त्या दोघांच्या दर्शनाने तुकोबाला विठोबा-रखुमाईचं दर्शन घेतल्यावर झाला नसेल एवढा मला आनंद झाला. ज्या थोर लेखकाच्या लिखाणाने कित्येकदा मनाची मरगळ नाहीशी झालेली होती- जगण्याची उमेद वाढलेली होती, मेंदूला टॉनिक मिळालेलं होतं तो लेखक आणि त्याची ‘हिमालयाची सावली’ माझ्यासमोर साक्षात उभी होती. ‘पुंडलिकाचे भेटी परब्रह्म’ आल्याचा प्रत्यय मला येत होता. मी वाकून नमस्कार करणार एवढय़ात भाई म्हणाले,

‘‘सांभाळून! टॉवेलशी गाठ आहे.’’ मी हसून टॉवेल पोटाशी आवळून जमेल तितकं खाली वाकून त्यांना नमस्कार केला.

‘‘काय चाललंय? बिपीन म्हणाला कुठल्या तरी पिक्चरवर काम चालू आहे तुमचं!’’ भाई आमच्या त्या डुप्लेक्स पद्धतीच्या सूटचं निरीक्षण करीत म्हणाले.

‘‘हो. हॉलिवूडचं एक पिक्चर आहे. ‘ओह गॉड’ नावाचं- त्यावरून मराठी चित्रपटाची कथा बेततोय आम्ही!’’

‘‘ओह गॉड!’’ पुल दोन अर्थानी म्हणाले.

‘‘चांगलं आहे पिक्चर. आम्ही (म्हणजे सुनीतामामींनी आणि भाईंनी) अमेरिकेत असताना पाहिलं होतं.’’
आमची ती प्रशस्त डुप्लेक्स रूम खंडाळ्याच्या एका दरीवर डोकावत होती. काचेच्या तावदानातनं खोलवरची घळ दिसत होती- धबधब्यांना फारसं पाणी नसल्यामुळे घळीत काही ओघळ तेवढे पडत होते.

‘‘छान आहे! रूम छान आहे तुमची! स्टोरी सीटिंगचं तरी लोकेशन छान आहे. शूटिंगचं कसं असेल तो भाग वेगळा! कारण मराठी चित्रपटात एवढी सुंदर दरीबिरी म्हणजे निर्माता गर्तेत जाईल!’’

‘‘बिपीन वर्टीच्या ऐवजी बिपीन वरती होईल!’’ बिपीननं स्वत:च्याच नावावर कोटी केली.
तेवढय़ात काचेच्या त्या भल्यामोठय़ा खिडकीच्या बाहेर वेडीवाकडी वाढलेली झुडपं बघून भाई म्हणाले,

‘‘ती झुडपं कापू नका- अशीच क्रेझी (वेडीवाकडी वाढलेली) राहू द्या. टूरिस्टना क्रेझ असते असल्या निसर्गाची!’’

‘‘तरीही काही क्रेझी लोक सल्ला देतात की, जरा कटिंग करून घ्या!’’ कामत म्हणाले.

‘‘मग रिसॉर्ट बंद करून तुम्हाला इथे सलून काढावं लागेल!’’ भाई म्हणाले.
भाईंच्या उपस्थितीमुळे सगळ्यांनाच आपली विनोदबुद्धी पाजळायची ऊर्मी आलेली होती. तेवढय़ात वेटर चहाचा ट्रे घेऊन आला. चहाचे कप बघून भाई म्हणाले, ‘‘हा चहा कटिंगवाला का?’’
सगळे खदखदा हसले. तेवढय़ात मी वॉर्डरोबच्या आडोशाला जाऊन कपडे बदलून आलो.

‘‘भाई, ‘म्हैस’वरचा एपिसोड बघितलात का हो तुम्ही?’’ मी जरा दूर उभं राहून अदबीनेच विचारलं.

‘‘हो बघितला ना!’’

‘‘कसा वाटला?’’

‘‘माझी म्हैस दोनदा मेली. एकदा बसखाली सापडून, एकदा टी.व्ही.खाली सापडून!’’ आमची रूम हास्यकलोळात बुडून गेली.

पुढे कसा कुणास ठाऊक इंदिराजींचा विषय निघाला - हत्येनंतर.
‘‘इंदिरा गांधींना सफेद कपडय़ात गुंडाळून ठेवलेलं टी.व्ही.वर सतत दाखवलं जात होतं. सफेद कपडे घातलेले काँग्रेसचे पुढारी येऊन नमस्कार काय करत होते, फुलं काय वाहात होते. राजीव गांधी हसून हात जोडून सगळ्यांचं इतकं छान स्वागत करत होता की, जणू काही इंदिराजी ‘मी उठेपर्यंत सगळ्यांच्या चहापाण्याचं बघ रे!’ असं सांगून झोपल्यात की काय असं वाटावं. मला तर आणखी एक भीती वाटत होती.- मध्येच सर्फची जाहिरात लागते की काय’’ (हशा) आणि मग पुलंनी कपडे धुण्याचा अभिनय करत म्हटलं ‘‘सर्फ की धुलाई सबसे सफेद.’’ आमची हसून हसून मुरकुंडी वळली.

‘‘भाई, तुम्हाला एवढं कसं हसवता येतं?’’ मी सखाराम गटणेच्या आविभार्वात विचारलं. 

‘‘तुम्हा मंडळींना हसवण्यासाठी काही काही क्लृप्त्या योजाव्या सांगतात!’’ भाईंनी चहाचा घोट घेत म्हटलं.

‘‘भाई, आपल्याला एक विचारू?’’ माझ्यातला गटणे स्वस्थ बसायलाच तयार नव्हता.

‘‘बोल.’’

‘‘तुम्ही विनोद या विषयावर कधीच का लिहिलं नाहीत?’’

‘‘विनोदावर लिहायला घेतलं की ते गंभीर होतं म्हणून!’’ भाईंनी म्हटलं, पण पुढे त्यांनी जे म्हटलं ते अजून माझ्या डोक्यातून जात नाहीय.

‘‘पण तुला सांगतो, तुला विनोदी लिहायचं असेल तर संत वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. संत वाङ्मयाचा अभ्यास केल्याशिवाय तुला चांगलं विनोदी लिहिताच येणार नाही.’’

पुलंचे ते शब्द मी माझ्या काळजावर कोरून ठेवलेले आहेत. ती भेट काही वेळाने संपली. उन्हात अचानक आलेली थंड वाऱ्याची झुळूक निघून गेल्यासारखं वाटतं.
त्यानंतर फारच क्वचित पुलंशी इतका वेळ बोलायची संधी मिळाली. त्यांचा हजरजबाबीपणा, त्यांचं संभाषणचातुर्य, त्यांच्या ब्रिलियंट कोटय़ा या सगळ्या गोष्टींची एक कॅप्स्यूलच त्या दिवशी मला पाहायला मिळाली. पुढे कित्येक वर्षांनी एके रात्री मी उदास, बेचैन अवस्थेत तळमळत असताना उठलो आणि ‘साठवण’ काढून वाचायला सुरुवात केली. अध्र्या-पाऊण तासात माझं मन शांत झालं, प्रसन्न झालं. मी ताबडतोब एक कागद घेतला आणि भाईंना पत्र लिहिलं.

‘‘भाई, तुमचे किती आभार मानू? तुमचं लिखाण वाचल्यामुळे माझं सैरभैर झालेलं मन शांत झालं. तुम्ही खरंच थोर आहात. आमच्या भास्कर पंडितांकडून तुमचे आम्ही इतके किस्से ऐकलेत आणि तेच तेच पुन:पुन्हा ऐकलेत की, आमचे एक सुरेश रोकडे नावाचे मित्र गमतीने म्हणाले होते की, भास्कर पी.एल.वर इतकं बोललाय की त्याची एल.पी. झाली असती.’’ असं काहीबाही त्या पत्रात खरडून मी दुसऱ्या दिवशी पोस्टात टाकून दिलं.

एक आठवडय़ाभरात भाईंचं उत्तर आलं.

‘तुमच्या मित्राने माझ्या नावावर पी.एल.ची एल.पी. अशी कोटी केलीय, पण माझ्या मित्रमंडळींमध्ये मात्र पी.एल. हा ‘प्लीस लिसन’चा शॉर्टफॉर्म आहे असं म्हणतात.’’ पुलंचं ते पत्र मी अनेक वर्षं पुस्तकातल्या मोरपिसाप्रमाणे जपलं होतं. पण मध्ये एकदा पावसाच्या पुरात कुठे तरी ते हरवलं, पण माझ्या अंत:करणावर ते पत्र कायमचं कोरलं गेलंय. आजही खंडाळ्याच्या कामत रिसॉर्टच्या जवळून जाताना माझ्या कानांवर बाथरूमच्या दरवाजावरची बिपीनची थाप येते. ‘‘अरे अशोक, लवकर आटप. पुल तुला भेटायला येतायत!’’ आणि मन त्या भेटीच्या आठवणीने पुलकित होतं.

अशोक पाटोळे
avpatole@hotmail.com
लोकप्रभा
२५ मार्च २०११