शाळेतली मुलं जेव्हा 'आम्ही कुठली पुस्तकं वाचावी?' असं मला विचारतात, तेव्हा मी त्यांना सांगतो, 'तुम्हांला जी वाचावीशी वाटतील, ती वाचा. 'काही मुलं थोडासा अपराध्यासारखा चेहरा करुन सांगतात , 'आम्हांला रहस्यकथा आवडतात' मग मी म्हणतो, 'मग रहस्यकथा वाचा. 'माझ्या शाळकरी वयात मी डिटेक्टिव्ह रामाराव, भालेराव यांच्या गुप्त-पोलिशी चातुर्याच्या कादंबऱ्यांचा फडशा पाडत असे.
माझ्या आयुष्यात 'पुस्तक' ही गरज व्हायला ह्मा करमणूक करणाऱ्या पुस्तकांनी खूप मदत केली. हळूहळू त्याहूनही अधिक चांगलं वाचायची ओढ लागते. ज्या घरात आणि समाजात आपण वाढत असतो, त्याचे आपल्या मनावर संस्कार होत असतात. त्यांतून आवडीनिवडी ठरायला लागतात. शाळेत शिकताना एखादा विषय आपल्याला विशेष आवडायला लागतो. एखादा खेळ अधिक आवडतो. आपल्या आवडीचा जो विषय असेल, त्यावरचं पुस्तक आपल्याला वाचावंसं वाटतं. त्या विषयावर वाचलेलं अधिक लक्षातही राहतं. क्रिकेट आवडत असलं, तर दहा वर्षांपूर्वीचा एखादा टेस्ट- मॅचचा स्कोअर तपशीलवार आठवत असतो. कुठल्या खेळाडूचा त्रिफळा उडाला, कोणी कोणाच्या गोलंदाजीला कुठं झेल घेतला, कोण धावचीत झाला- कोण पायचीत झाला, सगळं काही आठवत असतं. पण न आवडणाऱ्या भूमितीतलं प्रमेय पन्नास वेळा वाचूनही आठवत नाही. शेवटी हा आवडीनिवडीचा प्रश्न आहे पण केवळ वैयिक्तक आवडिनिवडीचा प्रश्न आहे , म्हणून सोडून देता येत नाही. वाचनाची आवड जोपासावी कशी, याचाही विचार करायला हवा. पुस्तकाचं वाचन करायची कारणं अनेक असू शकतात.
शाळा-कॉलेजात परीक्षेला नेमलेली पुस्तकं वाचायची सक्ती असते. म्हणून ती वाचावी लागतात. आणि सक्ती आली की तिटकारा आलाच. रोज आइसक्रिम किंवा भेळ खायची जर सक्ती झाली , तर आपल्याला अत्यंत आवडणाऱ्या ह्मा पदार्थांचासुद्धा तिटकारा येईल. त्यामुळं पुष्कळ विद्यार्थांच्या मनात पुस्तका- संबंधी खरा प्रश्न उभा राहतो, तो त्यांना सक्तीनं वाचायला लागणाऱ्या पाठ्यपुस्तकांसंबंधी. कारण इथं पुस्तक आनंदासाठी वाचलं जात नाही ; नाही वाचलं तर नापास होऊ, ह्मा भीतीनं वाचलं जातं. त्याला माझ्या मतानं एकच उपाय आहे; तो म्हणजे ते पुस्तक' पाठ्यपुस्तक आहे' अशा दृष्टीनं कधी वाचू नये. पाठ्यपुस्तक ही त्या पुस्तकावर सोपवलेली एक निराळी कामगिरी आहे. चांगल्या ग्रंथकारांनी जे ग्रंथ लिहिले, ते मुलांना परिक्षेत मार्क मिळवून द्यायची सोय करावी म्हणून लिहिले नाहीत. समजा, तुमचं इतिहासाचं पुस्तक असलं, तर ते आपले वीरपुरुष कोण होते, परकीयांची आक्रमणं कां झाली? ती आपण कशी परतवली कमी पडलो तर कां कमी पडलो? हे सारं सांगत आलेलं असतं. ते वाचत असताना तुमच्या मनात प्रश्न उभे राहतील. त्याची उत्तरं शोधायला ते पुस्तक पुरेसं उपयोगी पडलं नाही तर तुम्ही दुसरं इतिहासाचं पुस्तक पहाल , गुरुजींना विचाराल. तुम्हांला इतिहासाचं ते पुस्तक परीक्षेसाठी लावलेलं पाठ्यपुस्तक न वाटता इतिहासाबद्दल तुमच्याशी बोलणाऱ्या मित्रासारखं वाटेल.
पुष्कळ वेळा मला मुलं असंही विचारतात, की आम्ही काही योजनापूर्वक वाचन करावं का? ही योजना करणंदेखील पुष्कळसं तुमच्या आवडिनिवडीवर राहील. पण साधारणपणानं आपल्या आहारात ज्याप्रमाणं चांगल्या आरोग्यासाठी समतोल आहार घ्यावा असं सांगतात , तसाच पुस्तकांतून मनाला मिळणारा हा आहार समतोल असावा. नुसतीच करमणुकीची पुस्तकं वाचणं हे नुसत्याच शेवचिवड्यावर राहण्यासारखं आहे. पुस्तकांनासुद्धा खाद्यपदार्थासारखेच गुणधर्म असतात. म्हणूनच म्हटलंय , की काही पुस्तकं चघळायची असतात, काही खूप चावून चावून पचवावी लागतात, काही एकदम गिळता येतात. पण अन्नासारखंच पुस्तकही पचवायचं असतं. पण पचायचं नाही असं समजून वाचायचंच नाही, हे मात्र चूक आहे. प्रत्येक पुस्तक वाचायला सुरुवात करणं, हे नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासारखं आहे. कधी कल्पनेच्या प्रदेशात, कधी विचारांच्या जगात, कधी विज्ञानाच्या राज्यात, कधी वनस्पतींच्या दुनियेत- कुठल्या पानावर मनाला किल्हाद देणारं, आधार देणारं किंवा अंतर्मुख व्हायला लावणारं काय मिळेल ते सांगता येणं कठीण आहे. एखादाच विचार मिळतो आणि आपलं जीवन उजळून जातो. गांधीजींच्या हातात रिस्कनचं अन्टु द लास्ट- अंत्योदय हे पुस्तक आलं आणि त्यांना त्यांच्या जिवितकार्याला विचारांची बैठक मिळाली. पुस्तकच कशाला, एखादी कवितेची ओळखसुद्धा आयुष्यभर सोबत करत राहील! पुस्तकांचा संग जडलेल्या माणसाला कधी एकटं राहावं लागत नाही. खूप थोर माणसं त्याच्याशी संवाद साधायला त्याच्या पुस्तकांच्या कपाटात पाठीला पाठ लावून उभी असतात.
पु.ल. देशपांडे
महाराष्ट्र टाईम्स
१२ जुन २००८
पुलंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे
Friday, June 13, 2008
पुलं तुमच्या मुलांसाठी
Labels:
PL Deshpande,
Pula,
Pula Deshpande,
pulaprem,
पु.ल.,
पु.लं.,
पुलं,
पुलकित लेख
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 प्रतिक्रिया:
lekh khupch chaan aahe.. kharach pathyapustakapeksha awaantar waachan karayala jaast maja yete... pan aajpasun mi kramik pustakesuddha tewdhyach aawadine waachen...
Ekdam chan aahe article
Post a Comment