महाराष्ट्र टाईम्स १२ जुन २००८
पुलं गेल्यानंतर आलेल्या त्यांच्या वाढदिवशी सुनीताबाईंनी जागवलेल्या या पुलंच्या आठवणी... ' महाराष्ट्र टाइम्स ' च्या १२ नोव्हेंबर २००च्या अंकातून पुनर्प्रकाशित
...................................
..तुला सार्वजनिक ' आपण ' प्रिय , तर वैयक्तिक ' मी ' ची ताकद ज्याने त्याने आजमावायला हवी हा माझा अट्टाहास. ही ताकद तुझ्यात प्रचंड प्रमाणात आहे , याचा प्रत्यय मला सतत येत राही , तर नेमकं त्याच गोष्टीचं विस्मरण तुला सतत होत राही. अशा अनेक बाबतीत तू आणि मी एकमेकांपासून ख़ुप दूर होतो. जणू ' दोन धृवांवर दोघे आपण '. सदैव माणसात रमणारा तू , तर माणसांपेक्षा मानवतेवर जीवसृष्टी वनस्पतीसृष्टी मला अधिक प्रिय.
तूही जर इतर चारचौघांसारख़ाच ' एख़ादा कुणी ' असतास ना , तर मग निर्मितीची , साहित्य-संगीतादी कलागुणांची कितीही श्रीमंती तुझ्यापाशी असती , तरी मी त्या कशानेही आकर्षिले गेले नसते , हीच शक्यता अधिक आहे. मला भावली ती तुझ्यातली निरागसता. तुझा ' मुल ' पणा. तुझी लबाडीही पटकन उघड व्हायची. कोणत्याही गोष्टीचा विचार करावा , त्यात तरबेज व्हावं , त्यासाठी मेहनत करावी , हे तुझ्या स्वभावातच नव्हतं. व्याख़्यानांत , लिख़ाणात , तू असल्या गुणांची प्रशंसा करायचास. पण प्रत्यक्षात त्यापेक्षा गप्पा माराव्या , लोळत पडावं , गाणं ऐकावं , फार तर पुस्तकं वाचावी , चाळावी हे तुला अधिक प्रिय. निर्मितीक्षम कलाकाराची साधना सतत डोक्यातच कुठेतरी मूकपणे चालूच असते का ?
कवी ग्रेसच्या ओळी आहेत , ' क्षितीज जसे दिसते , तशी म्हणावी गाणी। देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी ॥ गाय जशी हंबरते , तसेच व्याकुळ व्हावे । बुडता बुडता सांजप्रवाही , अलगद भरुनी यावे ' . तुझं व्यक्तिमत्व असं विचारपूर्वक संस्कारीत होत गेलेलं नव्हतं. तू पिंडाचाच सुसंस्कृत होतास. जन्मजात कलावंत होतास , तसाच विचारवंही जन्मजातच होतास. ती तुझी श्रीमंतीही होती आणि मर्यादाही होती. आपली संस्कृतीच पुरुषप्रधान आहे , त्याच पाळामुळातून तुझं पोषण होत गेलं आणि अंगभूत कृतज्ञताबुध्दीने आपल्या परीने तीच संस्कृती तू जपलीस.
ती तुझी सहज प्रवृत्तीच होती , प्रकृती होती. मराठी ' विश्वकोषा ' त किंवा ' हूज हू ' मध्ये तुझ्या नावाची नोंद कलावंत म्हणून होईल. तशीच ' विचारवंत ' हे ही विशेषण तुझ्यामागे लावलं जाईल. पण आपण उभयतांच्या जीवनकोशात माझ्यासमोर ठाकलास तो त्या पुरुषप्रधान संस्कृतीचा आधारस्तंभच जसा! प्रज्ञेअभावी नवे , तर निव्वळ आळसापोटी तू विचार करण्याचं टाळत आलास. जे सहज आयते मिळतात , त्यासाठी बुद्धी कशाला शिणवावी ? मनात विचार घोळवण्यापेक्षा सूर घोळवणं हे केव्हाही अधिक आनंददायी , स्वत:लाही आणि भोवतालच्यांनाही. ही लबाडी म्हण किंवा पळवाट म्हण , मला कळायची पण त्याची तुला चिंता नव्हती. मी का कोणी परकी होते ? हक्काची बायकोच ना तुझी !
तुझ्यासाठी मी काय केलं ? तुझ्या तहानभूकेचं वेळापत्रक सांभाळलं , माझ्या परिने नवी-जुनी खेळणी पुरवली , अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले त्यात फ़ारतर क्वचित कधी एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती ? कलावंत ' तू ' होतास. शब्द कळेची गर्भश्रीमंतीही , ' तुला ' लाभली होती. येतांना कंठात आणि बोटात सूर घेऊनच तू जणू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास. तू गेलास तरी तुझा तो दिर्घायुषी सोबती अजून बराच काळ मागे रहाणार आहे.
तू गेलास उद्या मीही नाहीशी होणार पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वत:च्या तेजाने चमकतच राहील ना ?
थोडीथोडकी नव्हे अखंड ५४ वर्षांची ही वाटचाल. प्रवास म्हटला की , सहाजिकच चढ उतार आले. पण आज या घटकेला कशाचाही शीण जाणवत नाही. थकवा येतो तो सतत येत रहाणाऱ्या या आठवणींचा. थकल्याभागल्या मनावर असं अधिपत्य गाजवू नये , एवढाही पोच त्यांना नसतो. तू या सगळ्यातून सुटलास. माझ्या मनाच्या एका बंदिस्त कोपऱ्यात कायम वास्तव्याला आलास. शांतपणे इतर सर्वांच्या नकळत माझ्या सोबतीला येऊन राहिलास. जसा खळखळ पण निर्धास्त जगलास , तसाच निर्धास्तपणे चिरकाल विसाव्याला येऊन राहिलास.
मला तरी आता करण्यासारखं राहिलंच आहे काय ? तसा व्याप खूप आहे पसारा बराच आवरायचा आहे. तुझ्या दोन-तीन नव्या पुस्तकांचं कामही व्हायचं आहे. म्हटलं तर काम भरपूर आहे , पण ते ओझं मीच डोक्यावर घेतलं पाहिजे , असं थोडंच आहे ? मदतीला धावून येणारे खूप स्नेही सोबती आहेत. सगळं निभावून न्यायला ते समर्थ आहेत. मी स्वत: काय त्यांच्या मदतीने काय आणि उरलेलं सारं काही त्यांच्यावरच सोपवून काय हळूहळू सगळं काम पुरं होईल आणि त्यातलं काहीही झालं नाही तरी कितीसा फरक पडणार आहे ? या संदर्भात सत्य एकच आहे , ते म्हणजे या घरांत खेळण्याऱ्या हवेतून श्वास घ्यायला माझ्या जोडीला आता तू नसणार.
अशा वेळी काय करावं ?
(मंगेश पाडगांवकरांचं नाव घेऊन)
सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालवं इतकंच.
-सुनीता देशपांडे
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 प्रतिक्रिया:
Khupach sundar lekh ahe....manala sparsha karun gela....
Sunder,Hrudaysparshi ya peksha kahi shabda nahi.Pu lana khup ani sampurna pahanyacha prayatna karayacha asel tar Sunitabai Deshpande Yanche Pustak wachlech pahije. Mothi mansa kashi mothi asatat he tyancha pustakawarun kalate.
Khupach Chhan Hrudaysprshi Lekh kitihi bolale tari kamich padnar............................
....ya gharat khelnaryaa havetun shwas ghayla mazya jodila ata tu nasnar....
baaaaap re......vachla ani angavar kataa aala....
deepak..khup khup dhanyavaad..itka apartim lekh sangrahit kelaybaddal...
shruti, blore
....ya gharat khelnaryaa havetun shwas ghayla mazya jodila ata tu nasnar....
baaaaap re......vachla ani angavar kataa aala....
deepak..khup khup dhanyavaad..itka apartim lekh sangrahit kelaybaddal...
shruti, blore
Post a Comment