प्रिय भाई,
परवाच्या १२ जूनला तू गेलास. गेलास म्हणजे कुठे गेलास? दृष्टीआड गेलास म्हणावं, तर तसा तू अनेकदा दृष्टीआड होतच होतास. कधी पलीकडल्या खोलीत, तर कधी पलीकडल्या गावात किंवा पलीकडल्या देशातही. परवा गेलास तो पलीकडल्या जगात, एवढाच छोटासा फरक. एरवी तू तर या क्षणीही माझ्या डोळ्यांसमोरच आहेस. ऐकतो आहेस ना, मी काय सांगतेय ते?
आपण एकमेकांना पाहिलं, एकमेकांत गुंतत गेलो आणि दीड-दोन वर्षांनंतर, तुझ्या हट्टाखातर मी कायदेशीर लग्नबंधन स्वीकारलं. योगायोग म्हणावा अशी एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? आपण लग्न रजिस्टर केलं, तो दिवसही नेमका १२ जूनच होता. परवा कुणी तरी म्हणालं, 'भाईंचा जीव त्या १२ जून या तारखेसाठी घुटमळत होता.' लोक काहीही बोलतात. त्या दिवशी दुपारी एक वाजून बावीस मिनिटांनी तुझी प्राणज्योत अखेर मालवली, कुडीचा श्वासोच्छवास थांबला, हे झालं वेळापत्रक. पण खग्रास ग्रहणाचे वेध काही काळ आधीच लागले होते. तू अगदी केविलवाणा झाला होतास. डॉक्टरांनीही आशा सोडली होती. प्रयत्न फक्त चालू ठेवले होते. आजूबाजूची हवा खूप काही सुचवत होती; पण काहीच स्पष्ट सांगत नव्हती.
तुला ठाऊक आहे, आपल्या डॉक्टर दिवट्यांसारखाच हा आपला डॉक्टर प्रयागही एक देवमाणूस आहे. विज्ञाननिष्ठ, पण विज्ञानाच्याही चालू घडीच्या मर्यादा जाणणारा आणि म्हणूनच असेल, चमत्कारांवरही अविश्वास न दाखवणारं. त्यांचं सगळं हॉस्पिटलच तुझ्या एका प्राणासाठी धडपडताना पाहून मी म्हटलं, “डॉक्टर, पुरे आता.'' त्यांनी घाईघाईने उत्तर दिलं, “तुम्ही लक्ष घालू नका. Miracles can happen. आपण प्रयत्न करू."
Miracles! चमत्कार! होय, आजचे चमत्कार हे उद्याचं वास्तव ठरू शकतात.
आठवणी...आठवणी...आठवणी! भोगलेल्या रंगीबेरंगी सुखदुःखांच्या-हळुवार, फक्त आपल्या कानातच गुंजन घालणार्या, घरगुतीही आणि काही काळ वाजतगाजत राहणाऱ्या-रंगणाऱ्या, सार्वजनिकही, काही काSळ? छे छे! अनादी अनंत काळाच्या संदर्भात क्षणार्धाच्याही नव्हेत. कालप्रवाहात पाSर वाहून जाणाऱ्या. पण या क्षणी त्या जिवंत आहेत. याच घरात माझ्या सोबतीने वावरताहेत. घरातल्या माणसांप्रमाणेच त्या त्या घराच्या भितींनाही तिथे वास्तव्य करणारे रंग, गंध, स्पर्श आपले वाटत असणार. त्यांनाही ह्या साऱ्यांच्या आठवणी येतच असतील, तिथे रेंगाळणाऱ्या.
तुला आठवतंय? एके काळी मी संपूर्ण महाभारत वाचून काढलं होतं. 'व्यासोचिष्ट जगत् सर्वम्' म्हणजे नेमकं काय, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या अल्पमतीच्या प्रमाणात त्या काळाशी क्षणभर एकजीव झालेही. हो, क्षणभरच म्हणायचं आज त्यातलं त्या आठवणींत कितीसं उरलंय? तपशील वाहून जातो, तत्त्वाचा अशा आपल्या अस्तित्वातच मुरतो. तो कितपत मुरलाय याचा अंदाज घ्यायचं म्हटलं, तरी त्यासाठीच्या वादविवादाला, सहमतीला किंवा विचारांच्या तफावती दाखवायलाही दुसरं कुणी तरी लागतंच ना?
समोर तू, प्रत्यक्षात अबोल असतास तरी तो अंदाज माझा मला घेता आलाही असता कारण तुला मुळी वादविवादात कधी रसच नसायचा. रस होता तो संगीतात, अभिनयात, मुख्यत: संभाषणात. या तिन्ही शेतमळ्यांतला सुगंध, ओलावा, तुझ्यात सहज मुरायचा. शेत पिकायला उपजत बी-बियाणं लागतं हे खरंच; पण असलं खतपाणीही लागतं. या दोन्ही गोष्टी तुझ्यात जन्मजातच होत्या. म्हणून तर तू आनंदाच्या बागा फुलवू शकलास, पण शेताला मशागतही लागते, पीक जोमदार यायला शेतमजुरांचा घामही तिथे गाळावा लागतो. हे तुला कळत का नव्हतं? पण श्रेय द्यायला तू कधीच राजी नसायचास.
अधूनमधून मी वादही घालत असे; पण उपयोग नसायचा. मी दु:खी व्हायचे, अनेकदा तुझा रागही यायचा. मीही अपरिपक्वच होते ना?
मग लक्षात यायला लागल, याची सगळी निर्मिती ही, उत्तुंग इमारती, मनोरे, कळस दोन्ही तीर साधणारे पूल यांचीच आहे. हसतखेळत केलेली. डोंगरकपारीत सुंदर लेणीही याला सहज कोरता येतात. त्यासाठी मातीच्या, दगड-धोंड्यांच्या स्पर्शाचा ध्यास असावा लागत नाही. त्यांचं अस्तित्व गृहीतच धरलं जातं.
पण मला ही अक्कल यायला तुझा जीवच पणाला लागायला हवा होता? शहाणपणा येण्यासाठी ही किंमत द्यावी लागणार, याची कल्पना असती तर आजन्म वेडीच राहायला तयार होते रे मी! गेल्या चोपन्न वर्षांत मी किती वाद घातले! आपण एकमेकांच्या सहनशीलतेचा अंतच पाहिला जणू! मी ऐकवत राहून; तू न बोलता. क्वचित एखादा शब्द बोलायचास, तोही अगदी चपखल बसणारा. तुझ्या अफाट शब्दसंपदेने मला प्रथमपासूनच मोहून टाकलंय, ती मोहिनी अखेरपर्यंत माझा ताबा सोडणार नाही, एवढी जबरदस्त आहे साधी 'उपदेशपांडे'सारखी मला दिलेली पदवीदेखील (खरं तर टोमणाच) मी डोक्यावर घेऊन मिरवलीच ना!
लहान मुलांशी खेळांवं, तसा शब्दांशी तू मजेत खेळायचास. ३०-३५ वर्षांपूर्वी “हसवणूक' हा संग्रह प्रकाशित झाला, त्या वेळी या नव्या संग्रहाचं नाव काय ठेवायचं? 'हसवणूक' की 'फसवणूक'?-हा प्रश्न पडला. दोन्ही नावं तूच सुचवलेली; पण मला निर्णय घेता येईना. तू पटकन '
"फ आणि ह. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मधे पकडून नियतीने चालवलेली आपल्या साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली को, त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची 'हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं?' हे तूच लिहून ठेवलंयस. तुला ते जमलं, सर्वांनाच कसं जमणार?
फुलाच्या आसपास सुगंध दरवळतो, तसा तुझ्या आसपास आनंद दरवळत असायचा. "आनंदाचे डोही आनंद तरंग." म्हणून तर तू सर्वांना आवडायचास. तुलादेखील गर्दी खूप आवडायची आणि तीही सदैव तुझ्याभोवती गोळा व्हायची. ही देवघेव अगदी नैसर्गिक होती. झऱ्याचं पांथस्थाशी नातं असावं तशी. पण तुझ्या जीवनात मी आले ती अधूनमधून तरी एकान्ताची मागणी करत.
एकान्त म्हणजे पोकळी नव्हे. एकाकीपणाही नव्हे. आपण हतबल झालो की, पोकळी निर्माण होते,पण खंबीर असलो, तर आव्हानं तेवढी सामोरी येतात. त्यांना तोंड देणं सोपं नसतं हे खरं, पण शक्य असतं हेही खरं. स्वतःचं बळ आपण एकवटू लागलो की, हळूहळू त्याचा अंदाज यायला लागतो आणि त्या उत्खननात एखादी रत्नांची खाणही अचानक नजरेला पडू शकते.
तुला सार्वजनिक आपण प्रिय, तर वैयक्तिक 'मी'ची ताकद ज्याने त्याने अजमावायला हवी हा माझा अट्टाहास. ही ताकद तुझ्यात प्रचंड प्रमाणात आहे, याचा प्रत्यय मला सतत येत राही, तर नेमकं त्याच गोष्टीचं विस्मरण तुला सतत होत राही.
अशा अनेक बाबतींत तू आणि मी एकमेकांपासून खूप दूर होतो. जणू ' दोन धृवांवर दोघे आपण'. सदैव माणसांत रमणारा तू, तर माणसांपेक्षा मानवेतर जीवसृष्टी-वनस्पतीसृष्टी मला अधिक प्रिय.
तूही जर इतर चारचौघांसारखाच 'एखादा कुणी' असतास ना, तर मग निर्मितीची, साहित्य-संगीतादी कलागुणांची कितीही श्रीमंती तुझ्यापाशी असती, तरी मी त्या कशानेही आकर्षिले गेले नसते, हीच शक्यता अधिक आहे. मला भावली ती तुझ्यातली निरागसता. तुझा 'मूल'पणा. तुझी लबाडीही पटकन उघड व्हायची. कोणत्याही गोष्टीचा विचार करावा, त्यात तरबेज व्हावं, त्यासाठी मेहनत करावी, हे तुझ्या स्वभावातच नव्हतं. व्याख्यानांत, लिखाणात, तू असल्या गुणांची प्रशंसा करायचास. पण प्रत्यक्षात, त्यापेक्षा गप्पा माराव्या , लोळत पडावं , गाणं ऐकावं , फार तर पुस्तकं वाचावी , चाळावी हे तुला अधिक प्रिय. निर्मितीक्षम कलाकाराची साधना सतत डोक्यातच कुठेतरी मूकपणे चालूच असते का ?
तू लिहीत वगैरे नसायचास तेव्हाचा तुझा वेळ तू फुकट घालवतो आहेस, असं मला चुकूनही कधी वाटत नसे. Gained=Lost म्हणजेच Lost=Gained हे फिजिक्समधलं गणित मलाही माहीत आहे. पण तरीही काहीही फुकट जाऊ नये यासाठी मी सदैव जागरूक मात्र असते. नातवंडं दूध पितानादेखील थोडं इकडे तिकडे सांडतात, आणि मी “अरे असं सांडू नवे रे, नीट प्यावं, '” असं म्हटलं की, “जाऊ दे ग" म्हणून हसून सोडून देतात. हा संवाद वरचेवर घडतो, पण त्यातून दोऱ्ही पक्ष धडा घेत नाहीत. विचार येतो, हेच ठीक आहे. सगळेच काटेकोर वागले, तर जगणं किती एकसुरी बेचव होईल!
बोरकरांची ओळ आहे, 'चंदन होओनि अग्नी भोगावा” जिवंत असताना, मृतावस्थेतही, कितीही उगाळलं तरी आणि डोवटी जळून जातानादेखील, त्या चंदनासारखंच आपल्या प्रकृतिधर्माप्रमाणे मंद दरवळत राहणं सोपं नाही. ज्या महाभागाला हे जमेल, त्याला अग्नीदेखीळ भोगता येईल. ही खरी आत्मा आणि कुडीची एकरूपता. तो चिरंजीवच. नायं हन्ति न हन्यते.
तू गेलास आणि लोक हेलावून मला म्हणाले, "वहिनी, भाई गेले, तरी तुम्ही एकट्या आहात, पोरक्या झालात असं मानू नका. काहीही लागलं, तरी संकोच न करता सांगा, कुठल्याही क्षणी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत." हा खरचं त्या साऱ्यांच्या मनाचा मोठेपणा. तो त्यांनी आपापल्या परीने व्यक्त केला. कारण त्यांना कसं कळावं की, मी या क्षणीही एकटी नाही आणि पुढेही कधी एकटी नसणार. किंवा आयुष्यभर एकटीच होते आणि एकटेपणाच माझ्यासारखीचा प्राण असतो.
तुझ्याशी लग्न करायचा निर्णय घेतला, त्या क्षणीच मी एक प्राण सोडला आणि दुसऱ्या स्वतत्रं जीवनात प्रवेश केला. Robert Graves ची एक कविता आहे, मूळ शब्द आज निटसे आठवत नाहीत. पण मनाच्या गाभ्यात अर्थ मात्र या क्षणी जागा झालाय तो काहीसा असा -मृत्यूतून पुनर्जन्म होणे ही मोठीशी जादू किंवा अशक्यप्राय़ गोष्ट नव्हे. जीवन बहुधा पूर्णांशाने विझलेलं नसतंच. एखाद्या समर्थ फुंकरीने वरची राख उडून जाते. आणि आतला तेजस्वी जिंवत अंगार धगधगायला लागतो... आणि हेही तितकंच खरं की ते निखारे पुन्हा फुलायला लागतात, त्या वेळी त्यांच्यावरची आपण उडवून लावलेली राख आपल्याभोवती जमून दुसऱ्या कुणाच्या तरी फुंकरीची वाट पाहत आपल्याला लपेटून गुपचुप पडून असते. अहिल्येच्या शिळेसारखी.
एकटेपणा हा एकटा कधीच येत नसतो. सोबत भला मोठा आठवणींचा घोळका घेऊनच येतो. कवी खानोलकरांसारखा ‘तो येतो आणिक जातो.’ येताना कधी कळ्या घेऊन आला, तरी जाताना त्यांची फुलं झालेली हाती पडतील की निर्माल्य, हे त्याला तरी कुठे माहीत असतं? त्या क्षणी जे भाळी असेल, ते स्विकारायचं की नाकारायचं याचा निर्णय घेण्याचं तेवढं स्वातंत्र्य ज्याच्या त्याच्या हाती असतं. स्वातंत्र्य! ऍब्स्ट्रॅक्ट, कॉंक्रिट काहीही नाही-"
अस्तित्वाला जाग येते, त्या क्षणीच श्वास सुरू होतो. आईच्या गर्भात फार तर तिच्या श्वासावर जगता येईल. पण पुढे प्रत्येक श्वास आपला आपल्यालाच घ्यावा लागतो. तेवढाच आपला अधिकार. तो टिकवण्यासाठी किती धडपडायचं ते मात्र आपल्या हाती असतं.
पण मुळात कसलीही धडपड तुझ्या स्वभावातच नव्हती. देवळातल्या देवासारखा तू पुढ्यात येईल त्याचा स्वीकार करत गेलास. मग ते पंचामृत असो, नाहीतर साधं तुळशीपत्र. त्याबद्दल तक्रारीचा चुकून एखादा शब्ददेखील कधी तुझ्या तोंडून बाहेर पडत नसे. याचा अर्थ, तुला निवड करता येत नव्हती, किंवा “सुखदु:खे समे कृत्वा' असा काही तुझा स्वभावविशेष होता, असं नव्हे. कुठे सभा-समारंभाला जाताना मी कपाटातून काढून देईन तो पोशाख तू सहजगत्या चढवत असस. पण कधी गडबडीत मी ते काम तुझ्यावरच सोपवलं, तर तुझ्या कपाटात घडी घालून रचून ठेवलेल्या ८-० बुदाशर्टांतला हवा तो मधलाच कुठला तरी छानसा-बहुधा तुला अधिक आवडणारा बुदाशर्ट तू ओढून काढून अंगावर चढवत असस आणि विस्कटलेला बाकोचा ढिगारा पुन्हा रचून ठेवण्याचं काम खुदाल माझ्यावर टाकण्यात तुला काहीही चूक वाटत नसे. अज्ञा प्रकारची तुझी कोणतीही कृती जाणीवपूर्वक नसायची. केवळ अंगवळणी पडलेली, पुरुषप्रधान संस्कृतीतून परंपरागत चालत आल्याने सहज स्वीकारलेली अश्ली ती तुझी सवय होती. परावलंबनाच्या तुझ्या आवडीचाही तो भाग असू हकेल. बहुधा दोन्ही.
असा तू देवमाणूसही; आणि माझ्या वाट्याला आलेला आळशी नवराही. हाती येईल ते स्वीकारायचं आणि त्याच्याशी खेळत बसायचं. पुढे तू अभिमानाने ते नावही स्वीकारलंस, पण खरं तर तू जन्मजातच 'खेळिया' होतास. अशा माणसासाठी इतर कुणाला काही करावं लागतच नाही.
तुझ्यासाठी मी काय केलं? तुझ्या तहान- भुकेचं वेळापत्रक सांभाळलं, माझ्या परीने नवी-जुनी खेळणी पुरवली, अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले. त्यात फार तर क्वचित कधी एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती? कलावंत 'तू' होतास. शब्दकळेची गर्भश्रीमंतीही 'तुला' लाभली होती. येताना कंठात आणि बोटांत सूर घेऊनच तू जणू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास. तू गेलास, तरी तुझा तो दीर्घायुषी सोबती अजून बराच काळ मागे राहणार आहे.
तू गेलास उद्या मीही नाहीशी होणार पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वत:च्या तेजाने चमकतच राहील ना ?
असा तू वेगळा आणि मीही वेगळी. मग हा इतका प्रदीर्घ प्रवास आपण एकत्र केलाच कसा. हा प्रश्न इतर कुणाला पडला, तरी आपणां दोघांना पडायचं कारणच नव्हतं. कसा विरोधाभास आहे पहा! एकत्र प्रवास, पण आपापल्या मार्गाने. वास्तव्य एकाच घरात, पण जगणं स्वतंत्र. असा वावर चालतो, तेव्हा स्वाभाविकच अधूनमधून एकमेकांचे एकमेकांना धक्के बसतात; पण सहजपणे सॉरी' म्हणून क्षणात आपण आपल्या दिडोने पुढे जातो, आपापल्या कामांत मग्न राहतो.
तसं खरं सांगायचं तर माझ्यातही कर्तृत्वशाक्ती अगदीच काही कमी नव्हती. मी अथक परिश्रम करू शकते-खूप सोसू शकते-सतत धावपळ करू शकते-अनेक गोष्टी निभावून नेऊ शकते, हा आत्मविश्वास माझ्यात खूप होता आणि काही चुकलंच तर स्वतःहून ते मान्य करण्याचा प्रामाणिकपणाही होता. माणसाला आणखी काव हवं असतं? या साऱ्यासकट आपलं उद्दिष्ट ठरवणं इतकंच ना? क्षीण म्हणा किंवा प्रभावी म्हणा. स्रोत तोच. फक्त त्याची दिशा ठरवायचा क्षण येतो, तेव्हा कोणतं वळण घ्यायचं, याचा निर्णय घेण्याचा प्रश्न निर्माण होतो. तो प्रश्न मी पटकन सोडवून टाकला आणि हातमिळवणी केली. म्हणजे माझा हात तुझ्या हातात दिला की, तुझा हात माझ्या हातांत पकडला? असले प्रश्न सोडवत बसायला कधी वेळच मिळाला नाही म्हणा किंवा ते महत्त्वाचे वाटावे, असे प्रसंगच आले नाहीत म्हणा; कारण कोणतंही असेल, पण त्यावाचून काही अडलं नाही हे मात्र खरं.
वय वाढत जातं, त्याच्या जोडीने उरला दिवस अल्प, घोडे थकुनी चूर' ही जाणीवही वाढत जाते. उन्हं उतरत जातात, तशी आपली शक्ती कमी होत जाते; पण त्याचबरोबर अनुभवांचं माप भरून ओसंडायला लागतं. व्यक्तिमत्त्व प्रगल्भ-एका अर्थी ऐश्वर्यसंपन्न होत चालल्याचा साक्षात्कार होण्याचाही संभव असतो.
आशा-निराशेच्या पालखीतून असा डोलत डोलत प्रवास चालू राहतो. या वाटेवर, “कुणासाठी? कश्यासाठी? कुठे? आणि कुठवर?' असले प्रश्नही अधूनमधून भेटत असतात आणि त्यांच्या सोबतीनेच शेवटी दिगंबरात विलीन व्हायचं असतं. या क्षणी खानोलकर मदतीला आला, तशीच अगदी व्यासांपासून ते अद्ययावत कवींपर्यंत कुणालाही-आठवातल्या अगदी कुणालाही-साद घालावी, तो आनंदाने हजर होतो. त्यालाही भविष्यात वाचकाच्या मनात जगण्याची ओढ असतेच ना?
कवी ग्रेसच्या ओळी आहेत ,
' क्षितीज जसे दिसते ,
तशी म्हणावी गाणी।
देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी ॥
गाय जशी हंबरते ,
तसेच व्याकुळ व्हावे ।
बुडता बुडता सांजप्रवाही ,
अलगद भरुनी यावे ' .
तुझं व्यक्तिमत्व असं विचारपूर्वक संस्कारीत होत गेलेलं नव्हतं. तू पिंडाचाच सुसंस्कृत होतास. जन्मजात कलावंत होतास , तसाच विचारवंही जन्मजातच होतास. ती तुझी श्रीमंतीही होती आणि मर्यादाही होती. आपली संस्कृतीच पुरुषप्रधान आहे , त्याच पाळामुळातून तुझं पोषण होत गेलं आणि अंगभूत कृतज्ञताबुध्दीने आपल्या परीने तीच संस्कृती तू जपलीस. ती तुझी सहज प्रवृत्तीच होती , प्रकृती होती. मराठी ' विश्वकोषा ' त किंवा ' हूज हू ' मध्ये तुझ्या नावाची नोंद कलावंत म्हणून होईल. तशीच ' विचारवंत ' हे ही विशेषण तुझ्यामागे लावलं जाईल. पण आपण उभयतांच्या जीवनकोशात माझ्यासमोर ठाकलास तो त्या पुरुषप्रधान संस्कृतीचा आधारस्तंभच जसा! प्रज्ञेअभावी नवे , तर निव्वळ आळसापोटी तू विचार करण्याचं टाळत आलास. जे सहज आयते मिळतात , त्यासाठी बुद्धी कशाला शिणवावी ? मनात विचार घोळवण्यापेक्षा सूर घोळवणं हे केव्हाही अधिक आनंददायी , स्वत:लाही आणि भोवतालच्यांनाही. ही लबाडी म्हण किंवा पळवाट म्हण , मला कळायची पण त्याची तुला चिंता नव्हती. मी का कोणी परकी होते ? हक्काची बायकोच ना तुझी !
लग्नाच्या नोंदणी-अर्जावर सही करताना मीच नव्हता का सामाजिक बांधिलकी वगैरेला राजीनामा दिला? लग्नाची काय आणि समाजाची काय, बांधिलकी एकदा मानली की, पर्याय दोनच. एक तर फारकत घेऊन मोकळं व्हायचं, किंवा स्वतःला विसरून जबाबदारी स्वीकारायची. मी हा दुसरा पर्याय निवडला. स्वखुषीने, आनंदाने स्वीकारला.
मला एका योगायोगाचं नवल वाटतं : तुला शारीरिक दु:ख अजिबात सहन होत नसायचं आणि परावलंबन खूप आवडायचं; आणि तुला हा जो होवटला आजार आला, तोही शारीरिक दु:ख, वेदना, असलं काहीही न आणता फकत परावलंबन घेऊनच आला. ते परावलंबनही सतत वाढत जाणारं. त्याने माझी जबाबदारीही वाढवत नेली. मनावरचा ताण वाढत गेला आणि आतून खूप थकत गेले रे मी! याची जाणीव तुलाही होत असावी, अज्ञी अधूनमधून मला शंका येत राही. तू असा केविलवाणा व्हायचास तेव्हा न चुकता ते जुनं गाणं मनात जागं व्हायचं: बघु नको5 मजकडे केविलवाणा, राजसबाळा.' तुझा तो राजसबाळपणा अखेरपर्यंत तुझ्यात येऊन वस्तीला राहिला होता. त्याचं ओझं माझ्या मनावर येऊन पडत राहिलं तेही तुझ्या अखेरपर्यं, आणि आता अजया आठवणींतून माझ्याही अखेरपर्यंतच.
तुझा आजार संथ गतीने पण वाढतच चालला होता, पण शेवटी शेवटी तू अगदीच दीनवाणा झालास, तेव्हा मात्र माझा धीरच सुटला. नाही नाही ते विचार मनात यायला लागले. तुझी आई ९५ वर्षांची होऊन गेली. वाटलं, यालाही असंच दीर्घायुष्य लाभणार् असेल, तर या अवस्थेत माझ्यानंतर याचं कसं होणार? आजवरचं तुझं आयुष्य हेवा करण्याजोगं होतं, म्हणूनच कसं भर्रकन गेल्यासारखं वाटलं. थोडंथोडकं नव्हे, ऐंशी वर्ष असं सुंदर, संपन्न जगल्यानंतर मृत्यूही वैभवशालीच असावा. रेंगाळू नये, तुला त्याने आणखी केविलवाणा करू नये, असं तीव्रतेने वाटत होतं आणि योगायोगाने म्हणा किंवा तुझ्यावर खऱ्या अर्थाने जीव टाकणाऱ्यांच्या इच्छाशक्तीच्या बळावर म्हणा, घडलंही तसंच.
तू गेलास आणि सगळेच किती हळहळले! लहानांपासून थोरापर्यंत, सगळेच. जणू आपल्या घरातलंच कुणी वडीलधारं माणूस आपल्याला सोडून गेलं, असं आतड्याचं दु:ख सर्वत्र व्यक्त झालं. सुन्नाट, धीरगंभीर, घरंदाज. वाटलं, स्वत:चं हे वैभव पाहायला क्षणभर तरी तू जवळपास हवा होतास. मिरवणूक, भाषणं, अंत्यविधी असलं काही काही नको म्हटलं आणि ते मानलं गेलं.
लोकप्रिय माणूस हा सार्वजनिक होतो. त्याच्या मृत्यूलाही लोक शांतता लाभू देत नाहीत. पण तू सर्वार्थाने भाग्यवान ठरलास. प्रत्येकाने वैयक्तिक रीत्या मूक अश्रूंनी तुला निरोप दिला. सर्वांच्या वतीने मिनिट-दीड मिनिटाची सरकारी मानवंदना. बस्स!
बारा जूनला तू गेलास, त्याला आता बराच काळ लोटला. तुझ्या अखेरच्या आजारपणापासून आजच्या या घडीपर्यंत तुझ्या संदर्भात जे जे काही घडलं, ते कुणीही हेवा करावा असंच. आणि प्रत्येक वेळी मलाही तेच तेच वाटत राहिलं, हे पाहायला इथे तू हवा होतास-तू हवा होतास.
या आठवणीदेखील किती लहरी असतात! कधी मैत्रिणी होऊन येतात, तर कधी वैरिणी! कधी यावं, किती काळ थांबावं, कधी नाहीसं व्हावं, सगळे निर्णय त्याच घेतात, आपल्या संमतीची त्यांना पर्वाच नसते. पुन्हा पुन्हा भेटीला येतात, जा जा म्हटलं तरी रेंगाळत राहतात, कधी कधी प्रदीर्घ मुक्कामच ठोकतात. आपण कशालाही डरत नाही, या अहंकाराचा धुव्वा उडवण्यासाठीच जणू यांचा जन्म!
आठवणी अनावर होतात, डोकं जड होतं, ही गर्दी, हा भार सहन तरी कसा करायचा? आज माझ्या उघड्या डोळ्यांना तू समोर दिसत नाहीस. मिटले की लगेच समोर येऊन ठाकतोस. चक्र सुरू होतं. अज्ञा या आठवणी, सुख-दु:खांच्या. माझ्या बाबतीत आज दुःखांच्याच अधिक. कुणी दुसऱ्याने दिलेल्या दु:खाच्या नव्हे, माझ्या स्वत:च्याच स्वभावदोषातून माझ्या हातून वेळोवेळी घडलेल्या अगणित चुकांच्या आणि त्याबद्दल आता होत राहिलेल्या पश्चात्तापाच्या.
थोडीथोडकी नव्हे अखंड ५४ वर्षांची ही वाटचाल. प्रवास म्हटला की , सहाजिकच चढ उतार आले. पण आज या घटकेला कशाचाही शीण जाणवत नाही. थकवा येतो तो सतत येत रहाणाऱ्या या आठवणींचा. थकल्याभागल्या मनावर असं अधिपत्य गाजवू नये , एवढाही पोच त्यांना नसतो. तू या सगळ्यातून सुटलास. माझ्या मनाच्या एका बंदिस्त कोपऱ्यात कायम वास्तव्याला आलास. शांतपणे इतर सर्वांच्या नकळत माझ्या सोबतीला येऊन राहिलास. जसा खळखळ पण निर्धास्त जगलास , तसाच निर्धास्तपणे चिरकाल विसाव्याला येऊन राहिलास.
मला तरी आता करण्यासारखं राहिलंच आहे काय ? तसा व्याप खूप आहे पसारा बराच आवरायचा आहे. तुझ्या दोन-तीन नव्या पुस्तकांचं कामही व्हायचं आहे. म्हटलं तर काम भरपूर आहे , पण ते ओझं मीच डोक्यावर घेतलं पाहिजे , असं थोडंच आहे ? मदतीला धावून येणारे खूप स्नेही सोबती आहेत. सगळं निभावून न्यायला ते समर्थ आहेत. मी स्वत: काय त्यांच्या मदतीने काय आणि उरलेलं सारं काही त्यांच्यावरच सोपवून काय हळूहळू सगळं काम पुरं होईल आणि त्यातलं काहीही झालं नाही तरी कितीसा फरक पडणार आहे ? या संदर्भात सत्य एकच आहे , ते म्हणजे या घरांत खेळण्याऱ्या हवेतून श्वास घ्यायला माझ्या जोडीला आता तू नसणार.
अशा वेळी काय करावं ?
(मंगेश पाडगांवकरांचं नाव घेऊन)
सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालावं इतकंच.
सुनीता देशपांडे
महाराष्ट टाईम्स
१२ नोव्हेंबर २०००
सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालावं इतकंच.
सुनीता देशपांडे
महाराष्ट टाईम्स
१२ नोव्हेंबर २०००
8 प्रतिक्रिया:
Khupach sundar lekh ahe....manala sparsha karun gela....
Sunder,Hrudaysparshi ya peksha kahi shabda nahi.Pu lana khup ani sampurna pahanyacha prayatna karayacha asel tar Sunitabai Deshpande Yanche Pustak wachlech pahije. Mothi mansa kashi mothi asatat he tyancha pustakawarun kalate.
Khupach Chhan Hrudaysprshi Lekh kitihi bolale tari kamich padnar............................
....ya gharat khelnaryaa havetun shwas ghayla mazya jodila ata tu nasnar....
baaaaap re......vachla ani angavar kataa aala....
deepak..khup khup dhanyavaad..itka apartim lekh sangrahit kelaybaddal...
shruti, blore
....ya gharat khelnaryaa havetun shwas ghayla mazya jodila ata tu nasnar....
baaaaap re......vachla ani angavar kataa aala....
deepak..khup khup dhanyavaad..itka apartim lekh sangrahit kelaybaddal...
shruti, blore
पु.ल.देशपांडे बद्दल जितके लिहायचा प्रयत्न करू तितके कमीच आहे....त्यांच्या मराठी साहित्य तील लेखणी तर अजरामर आहेच पण एक व्यक्ती म्हणून किंवा आयुष्याचा जोडीदार म्हणून त्यांचे स्वभाव गुणधर्म सुनीता जी नी वर्णीले आहेत,संपूर्ण लेख वाचत असताना भाई समोर असल्याचा भास होत होता इतके सहज आणि साधी लेखणी...एक उत्तम लेखिका सुनीता देशपांडे
खूपच हृदयस्पर्शी😞😞😔
शब्द नाही सुचत
Post a Comment