Leave a message

Saturday, February 16, 2019

भाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा

मंगळवार दि. १३ जून २००० रोजी समस्त वर्तमानपत्रात एकच बातमी झळकत होती, "पु. ल. देशपांडे यांचे पुण्यात निधन... "भाई" अनंतात विलीन... महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व हरपलं... पु. ल. पुलकीत झाले..."

या आणि अशा अनेक बातम्या कित्येक दिवस वर्तमानपत्रात झळकत होत्या.. वर्तमानपत्राचा कागद सुद्धा स्वतःच्या अश्रूंनी ओला व्हावा अशी ती बातमी होती. २००० च्या दशकात मी कळता जरी असलो तरीही त्या वेळी पू. ल. समजण्याइतपत मोठा नव्हतो असं वाटतं. शाळेत सातवी-आठवीच्या मराठीच्या पुस्तकात एक-दोन धड्याखाली लेखक म्हणून पु. ल. देशपांडे यांचं नाव पाहिलं इतकाच काय तो पुलंशी परिचय होता..

भाई हे व्यक्तिमत्त्व पु. ल. हयात असेपर्यंत मला कधी उमगले नव्हते, पण पु. ल. गेल्यानंतर काही वर्षांनी पुलंचं एकंदर मराठी साहित्य सृष्टीतील ध्रुवताऱ्या प्रमाणे असणारं अढळ स्थान त्यांच्या साहित्यातून त्यांच्या कथेतून त्यांच्या लेखणीतून प्रकर्षाने मला कळू लागलं..


यापलीकडे व्यक्ती आणि वल्ली मधून पुल वाचायला मिळाले.. सखाराम गटणे, रावसाहेब, अंतू बरवा, नारायण, चितळे मास्तर, हरी तात्या, नाथा कामत, असामी असा मी, पेस्टन काका, म्हैस वाचताना त्या प्रत्येक व्यक्ती आणि वल्ली यांच्यामधील चांगुलपणा आणि सकारात्मकता घेऊन जगण्याचा दृष्टीकोन पुलंनी दिला.

त्यात भर पडली ती महेश मांजरेकर दिग्दर्शित भाई - व्यक्ती की वल्ली या चित्रपटामुळे, सागर देशमुख आणि इरावती हर्षे यांनी साकारलेली पु. ल. आणि सुनीताबाई यांची भूमिका पाहताना साक्षात पु. ल. आपण जगत आहोत अशी जाणीव होते.

भाई चित्रपटामध्ये सुनील बर्वे यांनी साकारलेले डॉक्टर जब्बार पटेल.. स्वानंद किरकिरे यांनी साकारलेले पं. कुमार गंधर्व.. अजय पूरकर यांनी साकारलेले पंडित भीमसेन जोशी.. उमेश जगताप यांनी साकारलेले राम गबाले.. अभिजित चव्हाण यांनी साकारलेले आचार्य अत्रे.. ऋषिकेश जोशी यांनी साकारलेले रावसाहेब.. गणेश यादव यांनी साकारलेले चिंतामणराव कोल्हटकर.. 


या आणि अशा अनेक दिग्गजांच्या भूमिका पाहताना आणि त्यांचा पुलंना लाभलेला सहवास पाहताना पु. ल. आपल्या पिढीत होऊन गेले ही जाणीवच आपण भाग्यवान आहोत असं वाटायला भाग पाडते. खरंतर पुलंबद्दल बोलणं आणि पुलंबद्दल लिहिणं म्हणजे एखाद्या तेजस्वी चमकणाऱ्या ताऱ्यासमोर आपण मेणबत्ती घेऊन उभं राहावं.. गोविंराव टेंब्यांसमोर पेटीवरती सारेगम वाजवून दाखवण्यासारखं किंवा पं. कुमार गंधर्वांसमोर मनाचे श्लोक म्हणून दाखविल्यासारखं होईल.. 


पुलंच्या अनेक पडद्यामागील कथा भाई या चित्रपटामधून महेश मांजरेकरांनी उघड केल्या... पुलंना जाऊन आज जवळपास एकोणिस वर्षे होतायेत, एकेकाळी आकाशवाणी मध्ये नोकरीला असणाऱ्या पुलंची आठवण होताच कधीतरी जुन्या रेडिओवरच्या सतारीवर काहीतरी झंकारतं, पर्युत्सुक करणारा एक जुना स्नेहगंध दरवळायला लागतो, त्यांच्या त्या सर्व व्यक्तीआणि वल्लींची आठवण होते, हसूही येतं रडूही येतं..


देवाने आमचे लहानसे जीवन समृद्ध करण्यासाठी पुल नावाची जी मोलाची देणगी न मागता दिली होती, ती न सांगता हिरावून नेली..

ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तृष्टता मोठी..

असा पुल होणे नाही..!!


लेखक - सतिश रावण
मुळ स्रोत - http://shabdmaajhe.blogspot.com/2019/02/blog-post.html

1 प्रतिक्रिया:

Sãtish Rãván said...

धन्यवाद 🙏🙏

a