गांधीजींनी जीवनातल्या अनेक गोष्टींतून आम्हाला मुक्त होण्याची शिकवण दिली. पण एका वस्तूशी मात्र कायमचं जखडून ठेवलं. ती ही वस्तू. त्या घड्याळाकडे मोठ्या कौतुकाने एखाद्या अवखळ पोराकडे पाहावे तसे पाहत बाळकोबा बोलत होते. दिवसाच्या प्रत्येक क्षणाचे मोल जाणत जगणे ही एक साधनाच आहे. गांधीजींच्याविषयी विचार करताना अनेक तऱ्हेची कोडी पडतात. गांधीजी आणि भगवद्गीता. माणसाला नव्या नव्या कोड्यातच टाकणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. गांधीजींचा जीवनग्रंथ आणि व्यासांनी दिलेला गीताग्रंथ; अवघड गणितांसारखा सोडवत बसावा. उत्तर सापडले असे वाटावे आणि सापडले त्याहूनही निराळे असावे अशी लगेच शंका यावी. गीतेप्रमाणेच गांधीजींनीही जीवनाच्या किती विविध अंगांना स्पर्श केला. गीता जशी भक्तियोग, कर्मयोग असे अनेक योग सांगते तसाच गांधींचा जीवनग्रंथ असंख्य योगांचे दर्शन घडवतो. पण त्यांचे घड्याळाशी जुळलेले नाते पाहिले म्हणजे वाटते की गांधींना प्रिय असलेला योग एकच होता : तो म्हणजे उद्योग.
ह्या माणसाने एका आयुष्यात किती उद्योग केले ! लहानसहान वाटणाऱ्या गोष्टींचा किती खोलात जाऊन विचार केला. ते राजकारणी होते, धर्मजिज्ञासू होते, शिक्षक होते, डॉक्टर होते, वकील होते, विणकर होते, चांभार होते, भंगी होते, पत्रकार होते, संघटक होते, प्रयोगशील ऋषी होते, कृषिक होते, स्वतःचे अर्थशास्त्र निर्माण करणारे अर्थशास्त्रज्ञ होते, अहिंसात्मक युद्धतंत्र निर्माण करणारे सेनापती होते....ही यादी सरता सरणार नाही. इतक्या निरनिराळ्या उद्योगांत स्वतःला गुंतवून घेणाऱ्या ह्या माणसाच्या दिवसाला तास तरी किती होते ? वैज्ञानिकांनी चंद्रावर स्वारी करताना वेळेची जी आखणी केली त्यात तासांची आणि मिनिटांची नव्हे तर सेकंदांचीही विभागणी केली होती. कुठली क्रिया कुठल्या सेकंदाला व्हावी ह्याचे वेळापत्रक त्यांनी आखले होते. गांधीजींनी आपल्या आयुष्यात त्या कालमापक यंत्राकडे वैज्ञानिकाच्या निष्ठेने पाहिले, क्षणाक्षणाचे वेळापत्रक आखले आणि पाळले. अमूक वाजून अमूक मिनिटांनी अमूक एक कार्य करायचे म्हणजे ते करायचेच असे ठरवून त्याप्रमाणे वागायला माणूस कमालीचा निश्चयी लागतो. काळाच्या गणितात स्वतःला इतके बांधून घ्यायला माणूस मनाने फार स्वतंत्र असावा लागतो. आयुष्याचा प्रत्येक क्षण ही आपल्याला लाभलेली दैवी देणगी आहे असे मानून तो क्षण सोन्याचा कसा होईल याची चिंता करणारा माणूसच कर्माचे प्रचंड पहाड उचलू शकतो. गांधीजींची सारी शक्ती त्यांनी जीवनात क्षणाक्षणाशी जोडलेल्या नात्यातून निर्माण झाली. हीच व्रतबद्धता.
खरे व्रत अपवाद मानीत नाही. निर्जली एकादशी म्हणजे निर्जली एकादशी. आमच्या सारखे निश्चयहीन लोक धर्मापेक्षा आपद्धर्माच्या पळवाटा शोधीत असतात. व्रती माणसाला पळवाटा मान्यच नसतात. व्रतात तडजोडीला जागा नाही. आपला आहार, पोशाख, वाणी हे सारे त्यांनी व्रतनिश्चयाने बांधून घेतले होते. विज्ञानात जशी तडजोडीला जागा नाही तशीच व्रतनिश्चयात नाही. गांधींचे दर सोमवारी मौन असे. साधे कौटुंबिक जीवन जगणाराला असल्या व्रतात कितीतरी वेळा तडजोडी कराव्या लागल्या असत्या. गांधीजींना तर साऱ्या राष्ट्रकुटुंबाचे नेतृत्व करायचे होते. रोज किती तऱ्हेच्या प्रश्नांना आणि ते प्रश्न विचारणारांना तोंड द्यावे लागत होते. पण त्यांनी सोमवारचे मौन चालू ठेवले, वाणीचे कार्य लेखणीने केले. पण जिभेचा पट्टा म्यान करून ठेवला. दिसायला किती साध्या गोष्टी. पण करायला अती बिकट. अचपळ मन माझे नावरे आवरीता असे समर्थांना म्हणावे लागले. बुद्धाच्या जीवनातला मार किंवा येशूचा सैतान म्हणजे आपल्या दुबळ्या मनाचेच अवखळ अपत्य. पण गांधीजींनी आपली व्रते विलक्षण दृढनिश्चयाने पाळली. इंग्लंडच्या बादशहाला साधा गुडघाभर पंचा नेसून भेटायला जाणे ही वरपांगी साधी गोष्ट. पण गोऱ्या कलेक्टराच्या भेटीला जाताना चाललेली सुटाबुटाची आटापीट ज्यांना आठवत असेल त्यांना ह्या साध्या वाटणाऱ्या आचरणामागला निश्चयाचा पहाड दिसेल. आजही साधा सिनेमा पाह्यला जाताना आपल्याला पंचा नेसून जाण्याचे धैर्य होणार नाही. त्यातून इंग्लंडमधल्या तसल्या त्या थंडीत नुसता गुडघाभर पंचा आणि उघड्या अंगावर खादीचे जाडेभरडे धोतर पांघरून जाण्यात शारीरिक क्लेश काय कमी होते ? पण गांधीजींनी हे सारे सहजतेने केले. चर्चिलसारख्या कट्टर साम्राज्यवाद्याला तर गांधीजींची ही अर्धनग्नता त्यांच्या राजकीय आंदोलनापेक्षाही भयंकर चीड आणत होती. गांधींचा उल्लेख त्यांनी सतत अर्धा नागवा फकीर; असाच केला होता. हा अर्धा नागवा फकीर ब्रिटिश साम्राज्यशाहीला नागवून जाईल अशी त्यांनाही कुठेतरी भीती असावी. कारण गांधीजींच्या असल्या वरपांगी विक्षिप्त वागण्यामागले तत्त्वज्ञान न कळण्याइतका चर्चिल हा महापुरुष काही दूधखुळा नव्हता. एका अमेरिकन गृहस्थाने गांधींना त्या वेळी विचारले होते, मिस्टर गांधी, तुम्ही असल्या ह्या तुटपुंज्या कपड्यांत साक्षात सम्राटांना भेटलात? थंडी नाही वाजली ?
गांधीजी हसत हसत म्हणाले,
थंडी ? छे! आम्हा दोघांच्या थंडीचे निवारण होईल एवढे कपडे एकट्या बादशहांच्या अंगावर होते !
पोशाखाप्रमाणे आहारातल्याही व्रतनिश्चयाचा आणखी एक मजेदार प्रसंग आहे. गांधीजींची आणि त्या वेळचे व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन ह्यांची बोलणी चालू होती. व्हाइसरॉयने गांधींना आपल्या त्या राजप्रासादात बोलणी करायला पाचारण केल्याचे ऐकून चर्चिलचा तर भडका उडाला होता. ब्रिटिश सम्राटांच्या प्रतिनिधीने ह्या एके काळच्या बॅरिस्टर पण हल्ली उघड्यानागड्या हिंडणाऱ्या देशद्रोही फकिराला राजप्रासादाच्या पायऱ्यांना स्पर्श करायला लावणे आणि त्याच्याशी बोलणी करणे ह्यासारखी किळसवाणी आणि अपमानास्पद घटना नाही; अशा शब्दांत चर्चिलने संताप व्यक्त केला होता. पण एवढ्याने काय होणार होते ? गांधीजींचे लक्ष चर्चेच्या ओघातही घड्याळाकडे होतेच. चर्चा लांबली होती. संध्याकाळच्या भोजनाची वेळ झाली. गांधीजींचा निरोप गेला. जेवण व्हाइसरीगल लॉजवरच आणावे. त्या काळी गांधीजी संध्याकाळी खजूर आणि दूध असा आहार घेत. मीराबेन ते घेऊन तिथे गेल्या. येरवडा तुरुंगातून सुटताना आठवण म्हणून, कैद्यांना ज्यांतून जेवण देण्यात येते ती भांडी गांधींनी जवळ ठेवली होती. पुढल्या आयुष्यात त्याच वाडग्यातून आणि ताटलीतून ते अन्न घेत.
व्हाइसरॉयना गांधीजींचा आहार पाहण्याची इच्छा अनावर झाली. त्यांनी गांधींना विचारले, आपण कसला आहार घेता ?
खजूर खाता खाता गांधीजी म्हणाले, महमद पैगंबराचा ! आणि चमच्याने वाडग्या- वर टकटक करीत सांगितले, ही येरवडा तुरुंगातली भेट आहे. जिथे प्रतिबादशहा राहतात त्या दिल्लीच्या राजप्रासादात भोजनाची सारी इंग्रजी आणि शाही शिस्त मोडून हा अर्धनंगा फकीर जेलातल्या कथली कटोरीतून बकरीचे दूध पीत बसला होता हे त्या चर्चिलला कळले असते तर त्याने त्याच वेळी गांधींचा तरी जीव घेतला असता किंवा लॉर्ड आयर्विनचा तरी! आज ह्या गोष्टी किती साध्या वाटतात. पण नावाच्या गोष्टीबद्दल त्या काळी बसलेल्या भयंकर भीतीचा ज्यांना अनुभव आहे त्यांना गांधीजींच्या ह्या आपल्या व्रताशी तडजोड न करता निर्भयपणाने जगण्याचे विलक्षण कौतुक वाटे. हे धैर्य अल्पांशाने का होईना आपल्याला लाभावे अशी तळमळ वाटे.
असले निश्चय पाळायला लोकविलक्षण सामर्थ्य लागते. विलक्षण ढोंग, शिष्टपणा, आचरटपणा अशा अनेक दूषणांचा स्वीकार करावा लागतो. गांधीजींनी ही सारी चिखलफेक मोठ्या मजेत अंगावर घेतली. व्रती माणसात पुष्कळदा कर्कशपणा येतो. गांधीजींना इथे त्यांच्या विनोदबुद्धीने तारले. विनोदाचे मानवाच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमाशी नाते तुटले की विनोदाला नासलेल्या पदार्थाची घाण येते. गांधी तर जग जालिया वन्ही संतमुखे व्हावे पाणी; ह्या स्वभावाचे. त्यातून त्या पाण्यात विनोदाचे गुलाबपाणी मिसळलेले. वैयक्तिक सत्याग्रहात विनोबांना पहिले सत्याग्रही म्हणून अग्रमान मिळालेला पाहून नेहरू तडकले. त्यांनी गांधींना चिडून विचारले, हा विनोबा कोण ? गांधी शांतपणाने म्हणाले, आमचे तीर्थरूप. स्वतःवरच्या कठोरांतल्या कठोर किंवा असभ्यांतल्या असभ्य टीकेला उत्तर देताना त्यांनी संयम सोडला नाही. हिंसा-अहिंसाविचारात कठोर भाषण हीदेखील हिंसा आहे असा त्यांचा पक्का सिद्धांत होता. प्रतिपक्षाच्या मुद्द्यांची उत्तरे द्यायची, गुद्दयांची दखल घ्यायची नाही हे त्यांचे व्रत होते. गांधींना विरोध करणारांनी कित्येक वेळा सभ्यतेच्या सर्व मर्यादा सोडून टीका केली आहे. मला वाटते, मिस मेयोच्या मदर इंडिया ह्या पुस्तकाला त्यांनी गटार- तपासनिसाचा अहवाल; म्हटले हाच कदाचित सर्वांत अधिक कठोर शब्दप्रयोग त्यांच्या हातून झाला असेल. वर्तमानपत्रांच्या जगात शिव्याशाप हा जिथे नियम असल्यासारखी परिस्थिती असते अशा ठिकाणी पत्रकार गांधी मात्र आपल्या सभ्य भाषेच्या निश्चयापासून चळले नाहीत. किंवा त्यापूर्वीचा यंग इंडिया वाचणे हा वाचकांना एक सुंदर आध्यात्मिक अनुभव वाटायचा तो त्यांच्या लिखाणातल्या ह्या सात्त्विकतेमुळे. वायफळ शब्द लिहिणे हाही शेवटी काळाचाच अपव्यय. नेमक्या मुद्द्यांचा परामर्श नेमक्या शब्दांत घ्यायला नेमका वेळ लावावा हा विचार ह्या साऱ्या कृतीच्या मागे असावा. गीतेने युक्ताहार- विहाराचे मोल सांगितले आहे. गांधीजींच्या आहाराप्रमाणे त्यांच्या वाणीनेदेखील शब्दांचे मोल प्राणापलिकडे जतन केले.
असल्या जगण्याला काय विलक्षण संयम लागत असेल! महान निश्चयाशिवाय संयम संभवत नाही. कारण संयम म्हणजे मुख्यतः नकार. नकाराला भलतेच सामर्थ्य लागते. साऱ्या धर्मांनीही नकारातूनच आत्मबल वाढवण्याची शिकवण दिली आहे. सामान्य जीवनात नकारांची चेष्टाच होत असते. आपला दुबळेपणा आपण थट्टेवारी गोष्टी घालून लपवीत असतो. साधेसाधे मोह आपला कबजा घेतात. कर्मयोगी माणसाचा जीवनातल्या श्रेयस आणि प्रेयसशी सतत झगडा चालूच असतो. दुर्दैवाने कर्मयोगाचे कच्या, अनिश्चयी आणि अविवेकी माणसाच्या हाती पोकळ कर्मकांडच होते. ही माणसे कर्मरत नसतात. तद्रुपतेचा त्यांना अनुभवच येत नाही. गांधीजी वहाणा करण्यापासून ते अग्रलेख लिहिण्यापर्यंत कसल्याही कामात तद्रुप होत असत. तद्रुप न होता कर्म सुरू झाले की चिडचिडेपणा सुरू होतो. असली माणसे धर्माला मंत्रचळेपणाचे स्वरूप आणतात आणि कर्मयोगाचेही हास्यास्पद विडंबन करतात. पण दुबळ्या हाती व्रतबद्ध जीवनाची शोकांतिका होते म्हणून संयमी, व्रतबद्ध जीवनाचे मोल कमी होत नाही. माणसाला असले जीवन पहाडाएवढे उंच करते आणि टणक करते. अशा त-हेने जगणारा माणूस मिळालेला आयुर्दाय हीच सगळ्यात मोलाची देणगी मानतो आणि क्षणाक्षणावर पाहारा ठेवून जगतो. त्या मोलाच्या क्षणाना हातातून निसटू देत नाही. ते क्षण सोन्याच्या नाण्यासारखे वापरतो. घड्याळाकडे पाहणे म्हणजे आल्यागेल्या क्षणाचा हिशेब ठेवून त्या क्षणाच्या मोबदल्यात आपण काय कमावले ह्याचा विचार करणे. गांधीजींच्या अपरिग्रही जीवनात कनवटीचे घड्याळ ही एकच महाग वस्तू होती. प्रार्थनेच्या वेळीदेखील त्यांनी ब्रह्मानंदी टाळी लागू दिली नाही. प्रार्थनेसाठी दिलेली ठराविक मिनिटे ते तन्मय होऊन ईशचिंतनात घालवीत, पण ती मिनिटे संपली की (परमेश्वरालाही बरं आहे, उद्या भेटू-ह्याच वेळी म्हणून) उठत. वेळेचे भान ठेवणे म्हणजे भान हरपून काम न करणे अशी सामान्यांची समजूत असते; पण गांधीजींनी उचललेले कामाचे डोंगर पाहिले म्हणजे ठरवलेल्या कालावधीत माणूस एकाग्र होऊ शकला तर काळाची आणि कर्माची सांगड घालून किती काम करू शकतो याची कल्पना येते. मला तरी गांधींचे सारे मोठेपण काळ आणि कर्म ह्यांची सांगड घालण्याच्या त्यांच्या निश्चयात दिसते. कर्म त्यांना काळाबरोबर ओढीत नेऊ शकत नसे की काळ त्यांना बेसावध अवस्थेत पकडू शकत नसे. गांधीजी कालप्रवाहात सारी धारणाशक्ती जागृत ठेवून पोहत होते. स्वतःला त्यांनी त्या प्रवाहातून वाहू दिले नाही. आज आमचे तथाकथित नेते बेभान वाहणाऱ्या सार्वजनिक जीवनाच्या प्रवाहातून दिशाहीन असे वाहताना दिसताहेत. कसलीही ऋतबद्धताच नाही. कसलाही अटीतटीने केलेला निश्चय नाही. गटंगळ्या खात, हाती लागेल त्या तडजोडीच्या लाकूडफाट्याचा आधार घेत डोके वर ठेवण्याचा प्रयत्न करणारे नेतृत्व हे नेतृत्वच नव्हे. ते स्वतःलाच जिथे सांभाळू शकत नाही तिथे इतरांना काय सांभाळणार? गांधीजी वाहणाऱ्या वादळी वाऱ्याशी आणि उसळणाऱ्या लाटांशी समर्थ निश्चयाच्या बळाने झुंज घेत पोहत होते. इतरांना हा निश्चयी जीवनाचा तारक धर्म सांगत होते. काळाच्या प्रत्येक वाहत्या बिंदूची जाणीव ठेवून हा माणूस सदैव जागृतपणाने जगत होता. ज्या झोपेचा धर्मच कालप्रवाहाला विसरणे हा असतो त्या झोपेतसुद्धा गांधींनी घड्याळाची सोबत सोडली नाही. त्यांना गजराची गरज नव्हती. जागेपणीचा निश्चय त्यांना गाढ झोपेतूनही आखलेली कालमर्यादा संपली की उठवायचा.
घड्याळयाशी गांधींनी जुळवलेले हे अजब नाते होते. हल्ली आपण प्लॅनिंगविषयी खूप बोलतो, लिहितो. आपल्या सगळ्या राष्ट्रीय योजना पैशाच्या हिशेबात बोलल्या जातात. अमुक एका कामासाठी इतके लाख रुपये मंजूर झाले आहेत ही आपली भाषा आहे. पण इतकेच तास मंजूर झाले आहेत आणि तितक्या तासांतच ते काम झाले पाहिजे हा निर्धार मात्र नाही. तासांचा निर्धार हा फार महत्त्वाचा. चंद्राच्या प्रवासाला निघालेल्या अवकाश यानाच्या सारथ्यांना वेळेचे बंधन सर्वांत महत्त्वाचे होते. दांडीयात्रा निघाली. तिथी ठरलेली. हा महान यात्रेकरू ठरल्या वेळी आपल्या जोडीला कुणी आहे की नाही याची चिंता न करता निघाला. ठरल्याक्षणी ठरलेली प्रतिज्ञा पुरी करायला हा महात्मा निघणारच ह्याची जनतेलाही इतकी खात्री की ह्या तेजस्वी बिंदूमागून जनसिंधूही निघाला. सत्याग्रहाचा मुहूर्त साधायला माणसे घरादारावर तुळशीपत्र ठेवून निघायची. ही वेळेची गुलामी माणसाला स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देते. घरी आलेल्या पाहुण्याला आता माझे दुसरे काम सुरू होते आहे. उठा. म्हणण्याचे धैर्य आपल्यात नसते. लोक आपल्या घरी आणि आपण लोकांच्या घरी खुशाल तळ ठेवून बसतो. गांधीजींच्या भेटीला हजारांनी माणसे आली आणि गेली. पण ह्या भाऊगर्दीत त्या घड्याळासारखी गांधीजींची दिनचर्या शिस्तीत चाल. ते त्या घड्याळाचे स्वामी होते आणि सेवकही होते. इंग्रजीत घड्याळाच्या काट्यांना हात; म्हणतात. आपल्याला घड्याळाचे काटे बोचतात. गांधींना घड्याळ हात देत असे. हा साक्षात काळाशीच झालेला वाङ्निश्चय. धर्मे, अर्थे, कामे ते त्या काळाशी निगडित झाले. इथे माणसाच्या आळस नामक सर्वांत मोठ्या शत्रूशी झुंज असते. गांधीजींच्या जीवनात विसाव्याचेही यथायोग्य क्षण होते. पण त्या विसाव्याच्या क्षणांनाही त्यांनी घड्याळात गुंतवले होते. विसाव्याचे रूपांतर जसे आळसात केव्हा होईल ते सांगता येत नाही, तसे कामाचे रूपांतरही भ्रमिष्टासारखे विचारहीन राबण्यात केव्हा होईल हेही सांगता येत नाही. शरीराच्या यंत्रालाही शक्तीबाहेर ताबडण्यात येते. साऱ्या ज्ञानेंद्रियांची आणि कमेद्रियांची नीट साफसुफी करावी लागते. तेलपाणी द्यावे लागते. विश्रांती लागते. नाहीतर यंत्र बिघडते आणि बिघडलेल्या यंत्राची कामे वेडीविद्री होतात. गांधीजींच्या देहाचा ताबा आळसानेही घेतला नाही आणि कामानेही घेतला नाही. गांधीजी सर्वांचे होते. पण ते प्रथम त्यांचे स्वतःचे होते. म्हणून गांधी नावाचे लेबल लावलेले ते देहाचे आणि मनाचे यंत्र त्यांनी सदैव लख्ख ठेवले. सव्वाशे वर्षे जगण्याचा करार जणू काय त्यांनी त्या घङ्याळाशीच केला होता. त्यांच्या पोटाशी बिलगलेल्या त्या चिमुकल्या मित्राचा आणि त्यांचा ऋणानुबंध अलौकिक होता. त्या स्नेहात त्यांनी बिघाड येऊ दिला नाही. जीवन ही कालपुरुषाची देणगी मानली आणि त्याने दिलेल्या क्षणांचा अलौकिक व्यापार करून दाखवला. त्या चिमुकल्या घड्याळाशी प्रतारणा न करण्यासाठी, ती जगावेगळी मैत्री अभंग टिकवण्यासाठी त्यांना किती कठोर निश्चयाचे पालन करावे लागले असेल, किती लोकांचे अहंकार दुखवावे लागले असतील ? किती गैरसमज ओढवून घ्यावे लागले असतील ? किती आरोपांना शांतपणाने तोंड द्यावे लागले असेल ? अमूक एक वाजता मला संडास साफ करायचा असल्यामुळे त्या वेळी मला आपल्याला भेटता येणार नाही, असे ज्या कोणाला ऐकावे लागले असेल तो किती संतापला असेल! पण आपल्या सगळ्या कर्मांना सारखेच लेखणाऱ्या गांधींना हे सांगताना कसलेही कष्ट झाले नाहीत. सूत काढणे असो, मैला साफ करणे असो की हरिजन मधला अग्रलेख लिहिणे असो, सारी कर्मे जेव्हा कृष्णार्पणमस्तु;च्या भावनेने होतात त्या वेळी प्रत्येक कर्माला भगवंताच्या पूजाविधीचेच पावित्र्य येते. मग त्या कर्मात लहानमोठेपण राहतच नाही. आई ही आपल्या पोराची सैपाकीण असते, शिंपीण असते, दाई असते आणि भंगीणही असते. त्यातल्या कुठल्याही भूमिकेतले काम करताना तिच्या मातृपदाला कमीपणा येत नसतो. सूत काढणारे कोष्टी गांधी आणि संडास साफ करणारे भंगी गांधी हे त्यांच्या कामाशी इतके समरस होत की त्या कामांना चिकटलेली उच्चनीचता नष्ट होऊन जाई. गांधीजींनी सर्व माणसांना समानतेच्या भूमिकेवर आणण्याचा प्रयत्न केला तो सर्व श्रमांना समानतेवर आणून. एकदा काही वकील गांधीजींच्याकडे राष्ट्सेवेची इच्छा व्यक्त करण्यासाठी आले. गांधी भाजी चिरत होते. गांधींनी त्यांना आपल्या जोडीने भाजी चिरायला सांगितले. वकीलमंडळी रागावून निघून गेली. त्यांच्या दृष्टीने वकिलांनी भाजी चिरणे हे हलके काम होते. गांधींच्या दृष्टीने भोजनाच्या वेळी भोजनाची पूर्वतयारी आणि खटल्याच्या वेळी खटल्याची पूर्वतयारी ह्यांची किंमत सारखीच होती. जे क्षण ज्या कामा साठी त्यांनी नेमस्त केले होते त्या क्षणांना त्या त्या कामाचे देणे देऊन टाकणे हा त्यांचा कर्मयोग होता. इथे उच्चनीचतेच्या विचारांना वावच नव्हता. वास्तविक, हा आदर्श प्राचीन आहे. गीता सांगणारा भगवान श्रीकृष्ण रथाच्या घोड्यांना खरारा करीत असे, आणि राजसूय यज्ञात विद्वान ब्राह्मणांशी चर्चा करण्यापेक्षा पंक्तीतली खरकटी काढण्यात त्याला अधिक आनंद वाटला होता.
कामाची कमीजास्ती अशी प्रतवारी ठरवणारी माणसे गाफील राहतात. काळाचा गुलाम राहणारा माणूसच शेवटी अशी काही कर्तबगारी करतो की तो कार्याने अमर होतो. कालातीत होतो. म्हणून त्या क्षणांवर पहारा हवा. समर्थांनी अखंड सावधपणाविषयी जो इतका आग्रह धरला आहे याचे कारण दुष्ट प्रवृत्ती गाफील क्षणी माणसाचा कबजा घेतात. गांधीजी जीवनातल्या कुठल्याही क्षणी गाफील राहिले नाहीत. ह्याचा अर्थ स्वतःचा जीव सांभाळीत राहिले असा नव्हे. प्रत्येक क्षणाला राबवीत जगले. जेव्हा आपण एखाद्या वैतागाच्या क्षणी गांधींच्या तत्त्वज्ञानाचा पराजय झाला म्हणतो तो पराजय वास्तविक आपला असतो. आपल्याला सारी सुखे आयती हवी असतात. इतका सावधपणा, इतकी सत्कर्मरती आपल्याला झेपत नाही. पण गांधींसारख्या लाखातल्या एखाद्याला जरी ती झेपली तरी त्यातून केवढा मोठा सामर्थ्याचा प्रवाह सुरू होतो ह्याचा अनुभव गांधीजी जिवंत होते त्या काळात आपल्या देशाने घेतला आहे. गांधींच्या निश्चयी जीवनातून मिळालेल्या स्फूर्तीच्या काही थेंबांनी ह्या मरगळलेल्या देशात नवे चैतन्य निर्माण झाले होते. गांधीजींचा वध झाला. नकाराचे, लोकांना सत्यासाठी नाखूष करण्याचे सामर्थ्य असलेले निश्चयी नेतृत्व संपले. गांधीजींना लोकांमध्ये अप्रिय होण्याची भीती नव्हती. लोकप्रियता न मागे तयाची रमा होय दासी ह्या न्यायाने त्यांच्या मागून येत होती. गांधीजींच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेत केवळ सत्ताधीशांचा खांदेपालट नव्हता. एका व्रतबद्ध, स्वतःच्या मनाने आणि आनंदाने लादून घेतलेल्या शिस्तीत वाढणाऱ्या, माणसा-माणसातल्या आणि निरनिराळ्या कामांच्या भेदाने उभ्या राहिलेल्या भिंती नष्ट झालेल्या अशा समाजाची नवी घडण होण्याची शक्यता डोळ्यापुढे दिसत होती. पण दुर्दैव असे की ह्या महात्म्याचा सहवास ज्यांना आयुष्यभर लाभला अशांच्यातही अनिश्चयी, दोलायमान, तडजोडवादी, सत्ताकांक्षी आणि म्हणून भीरू प्रवृत्ती शिरल्या. सारा डावच उधळला. पुढला सगळा इतिहास हा केवळ गाफीलपणाचा इतिहास आहे. प्रत्येक निर्णय कधीही वेळेवर घ्यायचा नाही; दिरंगाई, टाळाटाळी- थोडक्यात म्हणजे साक्षात काळाशीच बेइमानी करण्याचा आहे. काळ धावला. आम्ही मागे राहिलो. आमची योग्यताच तितकी. नव्हे, युगानुयुगे तितकीच असते. जीवनातला क्षणन क्षण नीट वापरणारा एखादा गांधी येतो. परावर्तित प्रकाशात आमची जीवने उजळतात. मूळ प्रकाश नाहीसा झाला की पुन्हा अंधारून येते. मला वाटते, ही अशी महान माणसे अधूनमधून उभी करायची इतिहासाला खोडच आहे. एकच शंका येते की पुन्हापुन्हा लढायांच्या आणि रक्तपाताच्या खड्डयात जाऊन पडणाऱ्या ह्या मानवी समाजाला ही असली अलौकिक देणी देण्यात इतिहासाचा, निसर्गाचा किंवा असलाच तर त्या देवाचा हेतू तरी काय असेल? कृष्ण येतो आणि जातो. राम येतो आणि जातो. ख्रिस्त, बुद्ध, गांधी येतात आणि जातात. काळावर मात करून जगतात. त्यांचे नित्य, नैमित्तिक नामस्मरण होते. पुन्हा युद्धे चालू, वैर चालू. द्वेष चालू. आणि भाबडेपणाने नव्या अवताराची वाट पाहाणेही चालू!
गांधीजींसंबंधी विचार करायला लागताना माझी मलाच लाज वाटायला लागते. माझ्या टेबलावरच्या टिकटिकणाऱ्या घड्याळाकडे पाहताना भीती वाटते. माझ्या आयुष्यातल्या वांझोट्या क्षणांची बेरीज करण्याचेच मुख्य काम घेऊन आलेले हे घड्याळ, आणि क्षणन्क्षण सत्कर्माने धन्य करणाऱ्या गांधींच्या कमरेचे ते घड्याळ. माणसाप्रमाणे घड्याळांनाही पूर्वजन्म, नशीब वगैरे गोष्टी असाव्या !
- पु. ल. देशपांडे
(एक शुन्य मी)
1 प्रतिक्रिया:
अप्रतीम लेख. माणसाला जाग करणारा. जाणीव निर्माण करणारा. घड्याळाशी नाते जोडायला शिकवणारा आणी गांधीजी समजायला किती सोपे आणी किती अवघड होते ह्याची जाणीव करून देणारा लेख
Post a Comment