Thursday, April 8, 2010

देवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण

नोंद- (भाऊ मराठे यांनी प्रचंड मेहेनत घेऊन पुलंची काही भाषणे आणि पुलंच्या घेतल्या गेलेल्या काही मुलाखती ज्या ऑडिओ / व्हिडिओ स्वरुपात उपलब्ध होत्या त्यांचं संकलन करुन स्वत:च्या मोत्यासारख्या अक्षरात लिहून काढल्या. त्यांनी अशी अनेक संकलनं केली आहेत आणि हा असा ठेवा लिखित स्वरुपात त्याच्या स्वत:पुरता उपलब्ध असला तरी तो कायम स्वरुपी जतन व्हावा या उद्देशाने विवेक काजरेकर यांनी त्याला विचारणा केली की 'हे हस्तलिखित स्वरुपातलं संकलन टंकलिखित करुन संकेतस्थळावर उपलब्ध करुन देऊ शकतो का ?' तेंव्हा भाऊंनी एका क्षणाचाही विचार न करता त्यांची पोतडी काजरेकरांच्या स्वाधीन केली. टंकलेखनाचं काम विवेक काजरेकरांनी केले आहे.)
विवेक काजरेकर आणि भाऊ मराठे यांचे शतश: आभार.

मुळ स्त्रोत- http://www.kajarekar.com/node/559


२ फेब्रुवारी, १९७५

गुरुवर्य देवधर, रसिक बंधू आणि भगिनींनो,

माझ्या आधीच्या वक्त्यांनी देवधरांच्या विषयी मी जे काही सांगायचं ठरवलेलं होतं, त्यातले जवळ जवळ तीन पानांतले मुद्दे संपवलेले आहेत. त्यामुळे मला अशी एक भीती वाटते की बोलायला मुद्दे नसलेला मनुष्य फार वेळ बोलत बसतो. असं काहीतरी होईल की काय माझ्या हातून असं वाटायला लागलंय. असं काही होणार नाही, याचं कारण असं आहे की देवधरांच्याविषयी त्यांच्या शिष्यांनी - मित्रांनी जे काही सांगितलं ते एकदा नाही - दोनदा नाही तर दहा दहा वेळा समाजाला सांगायला पाहिजे असं मला वाटतं. मी देवधरांचा विद्यार्थी नाही हे त्यांचं भाग्य आहे. गुरु जसा भाग्याने मिळावा लागतो तसा शिष्यसुध्दा दुर्भाग्याने कुणाला मिळू नये. ती संधी मी काही देवधरांना दिली नाही.

पन्नास वर्ष एखादी संस्था चालवणं हीच एक अत्यंत महत्वाच्या प्रकारची गोष्ट आहे. तेंव्हा सुरुवातीला ही संस्था चालविण्याचं कार्य केल्याबद्दल मी प्रा. देवधरांच्या आधी सौ. देवधरांचं अभिनंदन करतो. एका नादिष्ट माणसाचा संसार साजरा करायचा - गाण्यातली वाटेल ती माणसं आणून त्यांना गायला बसवणार्‍या नवर्‍याच्या एकूण सगळ्याच गोष्टींवरती त्यांच्या लक्षात न येईल अशी देखरेख ठेवायची - ही काही साधी गोष्ट नाही. इथे मी फार मोठा स्वानुभव सांगतो आहे असं कुणी समजू नये. पण ही कठीण गोष्ट आहे.

पण पन्नास वर्षांपूर्वी कलेच्या अशा एका क्षेत्रामधे एवढं मोठं कार्य विष्णू दिगंबरांनी करुन सुध्दा "ह्या क्षेत्रात आपण आहोत" हे मोठ्याने म्हणण्याची सुध्दा चोरी होती. संगीत काय, साहित्य काय, नाटक काय - ह्या सगळ्या क्षेत्रात आपण आहोत - पुस्तकं वगैरे लिहितो - असं सांगितल्यावर "ते ठीक आहे, पण करता काय?" हा प्रश्न ठरलेला. किंवा गातो - चांगलं मोठ्याने गातो म्हटल्यावर "असं होय, पण बाकी काय करता?" - असं चमत्कारिक वातावरण असलेल्या काळामध्ये या देशात कॉलेजमध्ये शिकून बी. ए. झालेल्या माणसाने कुठे तरी त्या काळामध्ये उत्तम अशी सरकारी नोकरी न स्वीकारता किंवा एखाद्या कॉलेजात प्राध्यापक वगैरे न होता आपल्या आयुष्यात एक ध्येय ठरवावं, आणि त्या ध्येयासाठी सारं आयुष्य काढावं ही गोष्ट मला अत्यंत महत्वाची वाटते. देवधरांनी संगीताच्या शिक्षणासाठी आपलं आयुष्य जे झोकून दिलं, ते त्यांचं आयुष्य झोकणं आणि सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये एखाद्या क्रांतीकारकाने आपलं आयुष्य झोकून देणं या गोष्टींमध्ये मी फरक करत नाही. तुम्ही कशासाठी आयुष्य झोकून दिलेलं आहे हे महत्वाचं आहे असं मला वाटत नाही तर ते एका गोष्टीसाठी झोकलेलंच आहे, त्यालाच महत्व आहे. कर्व्यांनी स्त्री शिक्षणासाठी आपलं आयुष्य दिलं, आगरकरांनी समाजसुधारणेसाठी आपलं आयुष्य दिलं, त्याचप्रमाणे देवधरांनी संगीतासाठी आपलं आयुष्य झोकून दिलं, ही तितक्याच तोलाची कामगिरी आहे. आणि हे मी केवळ आज विद्यालयाचं पन्नासावं वर्ष आहे किंवा देवधरांचा पंचाहत्तरावा वाढदिवस आहे (असं मघाशी कोणीतरी म्हणालं) म्हणून बोलतो आहे असं नाही. जाता जाता मला हेही सांगायला पाहिजे की देवधरांचं अजून चौर्‍याहत्तरावं वर्ष चालू आहे. वकीलाच्या व्यवसायातली माणसं पुष्कळवेळा काही वादाचा प्रसंग करुन ठेवतात तसं वाडेगांवकरांनी केलेलं आहे. तेंव्हा देवधरांचा पंचाहत्तरावा वाढदिवस अतिशय चांगल्या रीतीने साजरा करायचा आहे. पण त्यांच्या संगीतालयाचा - आमच्या सगळ्यांच्या बोलण्याप्रमाणे देवधरांच्या शाळेचा - हा पन्नासावा वाढदिवस. हे एका माणसाने सारं आयुष्य एका कलेच्या मागे - आपल्या जीवनामध्ये जे काही ध्येय स्वीकारलेलं होतं - त्याच्या मागे जे काही झोकून दिलं होतं - त्या कार्याचा इतिहास आहे असं मला वाटतं.

संगीताच्या क्षेत्रामध्ये देवधरांनी काय कार्य केलं - त्यांनी काय करायला पाहिजे होतं - हे सांगण्याचा माझा अधिकार नाही. मी त्यांना एकदा सांगितलं होतं की माझी गाण्याची आवड वाढीला लागण्यामध्ये ज्या काही गोष्टी माझ्या मदतीला आल्या, त्यामध्ये देवधरांच्या शाळेतले शनिवारचे जलसे ही एक अतिशय महत्वाची गोष्ट होती. आम्ही अशी काही मुलं होतो की, आम्हाला अशी स्वरांची अन्नछत्रं घातलेली होती, तिथेच जाऊन गाणं ऐकण्याची सोय असायला पाहिजे होती. कारण दोन आण्यांचं तिकिटसुध्दा फार अवघड असलेल्या काळामध्ये आम्हाला नियतीने गाणं ऐकण्याची आवड निर्माण केली. आणि निसर्गाचा असा खेळच असतो की एखाद्या गोष्टीची माणसाला आवड निर्माण करायची आणि त्याचं आर्थिक सहाय्य त्याला करायचं नाही. ही सुध्दा एक गंमत आहे. त्यामुळे देवधरांनाही कदाचित माहिती नसेल की, त्यांच्या गायनशाळेमध्ये जेंव्हा मोठे मोठे गवई यायचे त्यावेळेला त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जोडीने "चला - या या !" असं म्हणणारा त्यांच्या विद्यार्थ्यासारखा दिसणारा जो मुलगा होता तोच मी आज इथे अध्यक्ष म्हणून उभा आहे. पण तिथे जायला लागल्यानंतर लक्षात यायला लागलं की इथे एक असं वातावरण आहे - इथे एक कोणीतरी असा गुरु आहे की जो केवळ फी दिलेल्या विद्यार्थ्यांनाच शिकवणारा नसून ज्यांना गाण्याची आवड आहे अशा सगळ्या माणसांसाठी मोकळं अन्नछत्र उघडून बसलेला आहे. विष्णु दिगंबरांच्या कार्यामध्ये अतिशय महत्वाचं कार्य तानसेन निर्माण करण्याबरोबरच कानसेन निर्माण करणं हेही होतं. शिष्याने गुरुला वाटेल ती गुरुदक्षिणा दिली असेल, पण विष्णु दिगंबरांच्या या शिष्याने विष्णु दिगंबरांना ह्या बाबतीतली एवढी मोठी गुरुदक्षिणा इतर कुठल्याही शिष्याने दिलेली आहे असं मला वाटत नाही.

विष्णु दिगंबरांच्याबद्दल आपणासमोर काही बोलण्याची आवश्यकताच नाही. आपण इथे जी सगळी माणसं आहात ती संगीताचे प्रेमी म्हणूनच जमलेली आहात. माझ्यापेक्षा त्याबाबतीत आपण जास्त सांगू शकाल. पण मी एक आपल्याला सांगतो की, विष्णु दिगंबरांनी जे कार्य उभं केलं होतं त्या कार्याचे अनेक पैलू होते. ते ज्या वेळेला म्हणत असत की "बाबारे, मला तानसेन निर्माण करायचा नाहीये !" त्यावेळी त्यांनी स्वत: गाण्यातली फार मोठी जाणकारी दाखवली होती ती ही की तानसेन निर्माण करता येत नाही. पुष्कळांना असं वाटतं की "मला तानसेन निर्माण करता येत नाही" अशा एका असहाय्य अवस्थेत त्यांनी हे उदगार काढले आहेत - हे असं नाहिये - त्यांना गाणं कळत होतं म्हणून त्यांनी तसं म्हटलं आहे.

तानसेन निर्माण होत नसतो तर तानसेन निर्माण व्हावा यासाठी परिस्थिती निर्माण करता आली पाहिजे. देवधरांनी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली. ही परिस्थिती निर्माण करणं अत्यंत महत्वाचं. ह्याचं कारण असं की त्यांनी ती शाळा अशा एका काळामध्ये चालवली की ज्या वेळेला शिक्षण पध्दतीमध्ये इतके प्रचंड दोष शिरलेले होते - ज्या दोषांतून आम्ही पुढे पुढे गेलो - ते दोष शिक्षणातले पंडित नसूनसुध्दा त्यांनी घालवले. आज मी संगीत शिक्षकांनाच नव्हे तर जे शिक्षक म्हणून इतरत्र काम करतात त्यांना सांगेन की देवधर मास्तरांची शिकवण्याची जी पध्दती आहे, ती केवळ संगीतच शिकवण्याची पध्दत आहे असं समजू नका. ती शिकवण्याच्याच पध्दतीची एक उत्कृष्ट पध्दत आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. आत्ताच मला त्यांचे शिष्य सांगत होते की मास्तर "तू असं कर" असं मला कधीही म्हणाले नाहीत. मला असं वाटतं की शिक्षणाचा जर पहिला मुद्दा कुठला असेल - उत्कृष्ट शिक्षक ज्याला व्हायचं असेल त्याने "मास्तर सांगतात म्हणून मी करतो, नाहीतर मी काही तरी निराळं केलं असतं!" असं शिष्याला भासवताच कामा नये. आम्ही ज्या वेळेला शिकलो (आम्ही मुळात चांगले होतो म्हणून चांगले झालो - पण दुर्दैवाने असे शिकलो) त्यावेळेला शिक्षणाचं पहिलं सूत्र होतं "गप्प बसा!" म्हणजे गाण्याच्या वर्गातसुध्दा गप्प बसा. असं सूत्र असणं म्हणजे फार भयंकर गोष्ट आहे. "गप्प बसा" संस्कृती म्हणते की प्रश्न विचारायचा नाही. हात वर केला तर "हात खाली घे" हेच पहिल्यांदा असायचं. मास्तरांचा हात खाली आला तर आपल्या हातावर छडी मारण्यासाठीच खाली यायचा. अशा काळामध्ये संगीताच्या बाबतीत तर काय असेल याची कल्पनाच मला करवत नाही. मी काही कुठल्याही घराण्याची तालीम वगैरे घेतली नाही. किंबहुना मला गाणं एवढं कळायला लागलं की मला गाणं येणार नाही हे मी फार लवकर ओळखलं. पुष्कळांना हे जर कळलं तर संगीतावर फार उपकार होतील असं माझं मत आहे. "कळत नाही हेच कळत नाही" हीच तर मोठी शोकांतिका असते. पण मला हे नक्की कळलं की जो गुरु त्या शिष्यामध्ये कुतुहल निर्माण करतो तो खरा गुरु ! आता काही गुण सोन्याचा - काही गुण सोनाराचा हे तर आहेच. अहो असं आहे, कृष्णाला भगवद्‌गीता सांगायला बाकीचे कुणी भेटले नसते का ? किती तरी होते की ! पाच पांडव होते - कौरवांकडची मंडळी होती. एवढी जर त्याला गीता येत होती, तर "असं असं माझं म्हणणं आहे!" असं त्याला कोणालाही सांगता आलं असतं. परंतु जसा कृष्ण असावा लागतो तसा अर्जुनही असावा लागतो. ही ज्यावेळेला जोडी जमते त्यावेळेलाच ज्ञानाचा उत्तम विकास तिथे आपल्याला दिसायला लागतो. आणि हे सगळं कसं शिकवणं असावं लागतं तर ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे : "हे हृदयीचे ते हृदयी घातले!" ह्या वहीतलं त्या वहीत उतरवून घेतलं असं नव्हे. तुम्हाला सांगतो अलिकडे वर्गामध्ये प्रोफेसर जे बोलत असतात तेंव्हा मेंढरं जशी मान खाली घालून चरत असतात तसं लिहिणं चालू असतं. त्यांच्या तोंडातून ह्यांच्या पेनातून वहीत आणि पुन्हा कपाटात. आपण काय ऐकतो ते काही नाहीच ! असा वर्ग पाहिला की मला भडभडून येतो. त्याच्या ऐवजी "हे हृदयीचे ते हृदयी घातले!" याचा अर्थच असा की शिकवणारा आणि शिकणारा यांची नुसती बुध्दीच जुळून चालत नाही तर त्यांची मनंही जुळावी लागतात.

आपल्याकडे "गुरु" ह्या शब्दाबद्दलचे भयंकर गोंधळ आहेत. "गुरुबिन कौन बतावे वाट" वगैरे गहिवरुन म्हणतात. त्यामुळे प्रत्येक गुरुला वाटतं की आपण वाट दाखवणारे अधिकारी आहोत म्हणून. अहो गुरुशिवाय कोणी वाट दाखवत नाही हे खरं आहे. पण वाट दाखवणारा प्रत्येक जण ’गुरु’ असतो असं नव्हे. आपण पुण्याला या एकदा आणि कोणाला घराचा पत्ता विचारा, म्हणजे किती वाट दाखवणारे भेटतात सांगतो तुम्हाला. सगळे गुरुच ! त्याच्यातून काय झालं तर आपल्याकडे गुरुबाजी झाली. गुरुच्या पायावर डोकं ठेव - नमस्कार कर - गुरुला गुरुदक्षिणा दे - तेंव्हा गुरुला वाटायला लागलं की आपण दक्षिणा घेण्याच्या योग्यतेचे आहोत. भारतीय संगीताच्या बाबतीमध्ये सगळ्यात जर गोंधळ कुठे झाला असेल तर ’नाही नाही ती माणसं स्वत:ला गुरु समजायला लागली’ याच्यातूनच झाला आहे असं माझं मत आहे. आणि त्याच्यातून मग स्वत:चं गुरुपण सिध्द करण्यासाठी संगीताच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यात शिरल्या. ज्यांचा कलेच्या बाबतीत काही संबंध नाही अशा गोष्टी शिरल्या. त्या गोष्टी अशा की संगीताला विघातक गोष्टी होत्या. शिष्याला "तू ऐकू नकोस" हे वाक्य गुरु म्हणायला लागला. मी तर म्हणतो की गाणं शिकायला आलेल्या शिष्याला "हे ऐकू नकोस - ते ऐकू नकोस - किंबहुना ऐकूच नकोस" हा शब्दप्रयोग वापरणंच चूक आहे. गाणं शिकायला वादन शिकायला आलेल्या माणसाला गुरुने पहिलं सांगितलं पाहिजे की "तू ऐक - वाटेल ते ऐक!" माझ्याकडे काही मुलं येतात. होतकरु साहित्यिक येतात तेंव्हा "अहो, आम्ही काय वाचावं?" असं विचारतात. मी त्यांना सांगतो की इलेक्ट्रिकच्या खांबावर लावलेल्या जाहिरातीपासून सगळं वाचत जा. त्यातलं कुठलं तुमच्या मदतीला कधी येईल ते सांगता येत नाही. फार मजा असते हो! मी निविदा सूचनासुध्दा वाचत असतो. माझा कॉंट्रॅक्टरच्या धंद्याशी काहीही संबंध नाही. तिथे मराठी भाषेवरती काय कुरघोडी चाललेली असते, काय सांगू तुम्हाला ! फारच सुंदर. "टेंडर मागवण्याच्या निविदा मागवण्यात येत आहेत" असंही वाक्य मी वाचलेलं आहे. कारण ते लिहिणार्‍या माणसाला माहितीच नव्हतं. तेही वाचावं. विनोदासाठी पु. ल. देशपांड्यांचं साहित्य वाचायला पाहिजे असं मुळीच नाही. दुसरं कितीतरी वाचनीय आहे. निर्माण करणार्‍यांना माहितही नसतं की आपण किती सुंदर विनोदी वा‌ड्‌:मय निर्माण करतोय ते ! ज्याला लिहायचं असेल त्याने हे वाईट का ते चांगलं असा विचार न करता काहीही वाचावं.

म्हणून गाणं शिकायची इच्छा असेल त्याला गुरुने सांगायला पाहिजे की जिथे जिथे नाद निर्माण होतो ते प्रत्येक तू ऐक. मला असं वाटतं की ज्याचा नादाशी संबंध आलेला नाहिये - ध्वनीशी संबंध आलेला नाहिये अशा माणसाने या भानगडीत पडूच नये. कुठला ध्वनी कुठल्या वेळेला काय देऊन जाईल ते सांगता येत नाही. आपण जर रात्रीच्या वेळेला आगगाडीत पहुडलेले असाल आणि बाकीची माणसं फार गडबड करत नसतील तर तो जो पंखा चालू असतो ना त्याच्यातूनसुध्दा तंबोरा लागल्यासारखा षड्‌ज गंधार लागलेले तुम्हाला ऐकायला मिळतात. पुष्कळांनी ऐकलेले असतील - जर त्यांना कान असतील तर ! तर हे असं असंख्य नादांचं जग आहे. किती तर्‍हेतर्‍हेचे सुंदर नाद आहेत. ज्याप्रमाणे नाद ऐकायला पाहिजे त्याप्रमाणे कधी तरी शुध्द शांतता म्हणजे काय ती सुध्दा ऐकता यावी लागते. हे फार कठीण आहे. हा ’सायलेन्स’ हा सुध्दा कधी कधी पॉझिटिव्ह असतो. तुम्ही तेही ऐकायला पाहिजे. लय म्हणजे काय ती तुमच्या अंगात गेली पाहिजे. ती किती तरी तर्‍हेने जाईल. माणसं नुसती रस्त्यातून चालत असलेली पाहिली तर त्यांच्या चालण्याच्या लयीवरुन आपल्या लक्षात येत असतं की हा कामाला निघालेला आहे की सहज निघाला आहे की रस्त्यात आणखी काही कार्यक्रम असतात त्यापैकी कशाला तरी निघालेला आहे - कोणाच्या शोधात आहे की कोणी तरी आपल्या शोधात आहे म्हनून चाललेला आहे - हे सगळं त्या माणसाच्या चालण्याच्या लयीवरुन लक्षात येत असतं. अशी लय तुम्हाला बघायला यायला पाहिजे. लय ही काय तबलजी शिकवत असतात असं वाटतं का तुम्हाला ? छे छे, मुळीच नाही. ती लय अशी दिसावी लागते. जो गाण्याचा विद्यार्थी आगगाडीच्या रुळावर चाललेल्या ठेक्याबरोबर गायला नाही ना त्याने गाण्याचा क्लास सोडून टायपिंगचा क्लास जॉइन करावा असं माझं स्पष्ट मत आहे. इतकी ही नादाची-लयीची सुंदर दुनिया आहे. ही दुनिया गाणं शिकणार्‍या विद्यार्थ्याला बंद करणारे गुरु निर्माण झाले. पन्नास घराण्यांचं गाणं ऐक - मोकळं मैदान पाहिजे असं सांगणारा गुरु लागतो.

सुदैवाने असं झालं की अशा रीतीने ते गाणं बंदिस्त करायचा प्रयत्न केला, पण विज्ञानाने त्याच्यावरती मात केली. विज्ञानाने मात केल्यामुळे आजच्या शिकवणार्‍यांच्या पुढे नवीन आव्हानं तयार झाली. घरोघरी रेडिओ आला. रेडिओ आल्याबरोबर आग्रेवाले घराण्याचा मुलगा जयपूर घराण्याचं गाणं ऐकणार नाही असं म्हणून जरी घरचा रेडिओ बंद केला तरी शेजार्‍यांचा रेडिओ चालू असतो त्याला तो काय करणार ? परमेश्वराने ही सगळी इंद्रियं देताना माणसाला डोळे बंद करण्याची सोय दिलेली आहे पण कान बंद करण्याची सोय दिलेली नाही. तो ध्वनी येऊन पडतोच कानामध्ये. देवधर मास्तरांनी ज्या वेळेला शाळा काढली त्यावेळेला आपल्याला संगीताच्या मागे जावं लागत होतं - आता संगीत आपल्या मागे धावतंय. मी ऐकायचं नाही म्हटलं तरी "झूट बोले कव्वा काटे" मला ऐकावंच लागतं. माझा राग कावळ्यावरही नाही किंवा झूट बोलण्यावरही नाही. परंतु ते आपल्याला ऐकावंच लागतं. आता ते ऐकताना जर तुम्ही संगीतातले असाल आणि विचार करायला लागलं की अरे, ह्याच्यात असं काय आहे की ज्याच्यामुळे लाखो लोकांची मनं ह्या गाण्यात गुंतली ? चित्रपटसंगीतात असं काय आहे की लाखो लोकांची आवड बदलली ? त्या संगीतामधून आणखी चांगल्या, वरच्या संगीताकडे आपल्या शिष्याला नेता येईल का असा विचार करणारा गुरु नसला आणि "तू ऐकू नकोस" असंच म्हणणारा असला तर तो विद्यार्थी "झूट बोले"च ऐकणार आहे हे लक्षात ठेवा. माझ्या लहानपणी जी पुस्तकं वाचू नकोस असं बजावण्यात आलं होतं ती पुस्तकं आधी वाचली. जणू काही फक्त मीच वाचली अशा तर्‍हेने आपण हसत असाल तरी आपणही तेच केलेलं आहे. तेंव्हा असं ऐकता ऐकता एके दिवशी आपल्याला रस्ता सापडतो. हा रस्ता सापडण्याच्या टोकाला असताना जर उत्तम गुरु असेल तर तो हळूच एक धक्का देतो - ते त्याचं वाट दाखवणं असतं. हे फार महत्वाचं असतं. अशा प्रकारची वाट दाखवणारे गुरु म्हणून आज देवधर मास्तरांचा सत्कार आहे.

देवधर मास्तरांनी प्रत्येकाच्या पायाची ताकद काय - किती चालेल - कसा चालेल - याचा विचार करुन शिष्यांना वाट दाखवली. पाश्चात्य संगीतामध्ये हा मुलगा उत्तम वादक होईल का - उत्तम गायक होईल का हे जाणून घेण्याच्यादेखील परीक्षा आहेत. दुर्दैवाने आपल्याकडे त्या परीक्षा नाहीत. आमच्याकडे गाणं शिकण्यामागची एकमेव प्रेरणा म्हणजे मुलगी असेल तर आईची हौस! याशिवाय प्रेरणाच नाही. आणि गाणं गाणारा चांगला मुलगा असेल तर त्याला त्याच्यापासून परावृत्त करुन त्याला गणिताच्या मागे कसा लावता येईल ही बापाची प्रेरणा ! संगीताची प्रेरणा जर ह्या मुलाला असेल तर ह्या मुलाला त्याच्यातला तबला चांगला येईल का - ह्याला गाणं चांगल येईल का - हा सुगम संगीतात जास्त लक्ष देतो का - ह्याचा गळा हलका किंवा रठ्ठ आहे का - ह्याच्या ज्या काही चाचण्या आहेत त्याच आपल्याकडे नाहियेत. त्यामुळे आमचं कसं आहे की "गातोय!" असंच. त्यामुळे हे जे चांगले शिक्षक होते त्यांच्याकडून आधी परीक्षा घेऊन त्यांचा सल्ला घ्यायचा आणि नंतर त्याला क्लासमधे पाठवायचं हे राहून आईला किंवा वडिलांना वाटतं की गाणी म्हणता आली पाहिजेत म्हणून गाणं शिकायला पाठवण्याची पध्दत होती. देवधरमास्तरांच्या सारख्यांचे पन्नास वर्षांचे परिश्रम आता आताशी आपल्याला दिसायला लागले आहेत. आता मात्र गाणं शिकणारा मनुष्य एका नव्या आत्मविश्वासाने संगीत शिकायला लागलेला आहे. ही परिस्थिती आपोआप निर्माण झालेली नाही. ह्या परिस्थितीच्या मागे अतिशय परिश्रम आहेत. दुसरा मुद्दा असा की हे संगीत जेंव्हा वर्गात तीस-चाळीस विद्यार्थ्यांना घाऊक प्रमाणात शिकावं लागतं त्यावेळी शिकणार्‍यांनी सुध्दा आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवायला पाहिजेत.

आपल्यापैकी जर कोणाला असं वाटत असेल की चाळीस पन्नास वर्षांपासून देवधर मास्तरांचा एवढा मोठा क्लास आहे - पण असे किती गवई तयार झाले? हा गणिताचा हिशेब इथे चालत नाही. हा जर प्रश्न विचारला तर मी आपल्याला उलट प्रश्न विचारेन की ह्या भारतामध्ये जवळ जवळ नव्वद युनिव्हर्सिट्या असतील - मी तिकडे कधी फिरकत नाही - तर त्यापैकी पंचाऐंशी युनिव्हर्सिट्या स्वातंत्र्यानंतर सुरु झालेल्या असतील - उरलेल्या पाच युनिव्हर्सिट्यांमधून दोनशे वर्ष तुम्ही इंग्रजी शिकवत आहात तर तुम्ही किती शेक्सपिअर तयार केलेत? आमचे एक शिक्षण मंत्री होते. आता ते बिचारे नाहियेत. ते एकदा भा. रा. तांब्यांच्या जन्मशताब्दीला म्हणाले होते की "ही जन्मशताब्दी करण्याचा उद्देश काय तर ह्यातून स्फूर्ती घेऊन तांबे तयार होतील. अरे! तेंव्हा माझी अशी समजूत झाली की तांबट आळीत कुठला तरी उद्‌घाटनाचा समारंभ होता, तिथलं भाषण त्यांनी इथे तयार केलं असावं म्हणून ते "तांबे तयार होतील" म्हणाले. तेंव्हा गायनाच्या क्लासमधून तुम्ही किती गवई तयार केले अशा प्रकारचा जर कोणी हिशेब विचारायला लागला तर तो हिशेबच चुकीचा आहे. पण चांगला हिशेब कुठला आहे की ह्या गाण्याच्या क्लासमधे जे गाण्याचे कार्यक्रम होतात ते गाणं शिकायला येणारी मंडळी ऐकतात की नाही - ही मंडळी पुढे किती ठिकाणी गाणं ऐकायला जातात - गाणं हा त्यांच्या जीवनात महत्वाचा भाग ठरतो की नाही - हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि हा जर मुद्दा विचारात घेतलात तर मला वाटतं, माझ्या पाहण्यातल्या जेवढ्या संगीताच्या शाळा आहेत त्यामधे देवधर मास्तरांच्या "इंडियन स्कूल ऑफ म्युझिक"ला मी अग्रगण्य स्थान देईन.

देवधर मास्तरांनी मघाशी सांगितलं की किती नानाविध व्यवसायातली माणसं इथे येतात. नाना जातींची - नाना धर्मांची - नाना भाषांची माणसं ही अशी एका सुराच्या - एका लयीच्या धाग्याने बांधून बसलेली मी असंख्य वेळा अनुभवलेली आहेत. चांगलं ऐकायला - चांगलं वाचायला शिकवणं हे कार्य फार महत्वाचं आहे. आणि हे कार्य नुसत्या एका विद्यार्थ्याला घेऊन तालीम देत असताना होत नसतं, तर त्या गुरुला चारही अंगाने स्वत:ची तयारी करावी लागते. देवधर मास्तरांच्या "इंडियन स्कूल ऑफ म्युझिक"मध्ये आत्तापर्यंत अत्यंत उत्कृष्ट विद्यार्थी जर कोण असेल तर ते स्वत: देवधरच आहेत. ते नुसते गुरु होऊन बसले नाहीत तर आजसुध्दा ते विद्यार्थ्यासारखेच आहेत. गुरु पौर्णिमा - अमावास्या वगैरे त्यांनी काही साजर्‍या केल्या नाहीत हे फार चांगलं केलं. अमक्या अमक्याच्या गुरु पौर्णिमेचा उत्सव आहे अशी मला आमंत्रणं येतात तेंव्हा मी म्हणतो "ह्या बिचार्‍या माणसाचा वाटोळेपणा केवळ त्याच्या विद्येतून सिध्द होतो तिथे कसली पौर्णिमा साजरी करायची?" ह्या अशा प्रकारची जी रिच्युअल्स आहेत त्याच्यातून काहीही सिध्द होत नाही. मी सांगतो, शिष्याकडून गुरुची एकच अपेक्षा असली पाहिजे, ती ही की त्याने शिष्याकडून पराजयाची अपेक्षा केली पाहिजे. गुरुला असं वाटलं पाहिजे की "माझा शिष्य काय गायला ? ह्याच्यानंतर गायची आपली ताकद नाही" असं ज्यावेळी त्या गुरुला वाटेल ती गुरुदक्षिणा खरी असते. बाकीचं सगळं ठीक आहे - व्यवहार आहे - त्यालाही जगायचं असतं - आपल्यालाही जगायचं असतं - त्याला पैसे लागतात.

मघाशी रानडे म्हणाले की देवधरांनी सगळं भांडार मोकळं केलं - चीजा लपवून ठेवल्या नाहित. लपवून काय करायचं ? अहो, चीजांची अक्षरं घेऊन जरा गाता आलं असतं तर मी अल्लादिया खाँसाहेब झालो नसतो का ? भातखंड्यांच्या पुस्तकात चीजा काय कमी आहेत का ? परंतु काही लोक गायला लागल्यानंतर असंही वाटतं की त्यांनी त्या चीजांना तोंड लावू नये. नुसत्या चीजांच्या अक्षरांनी का गाणं येणार आहे ? गाणं असं येत असतं ? ते इतकं का सोपं आहे ? त्याला असा कोणी तरी मनुष्य - अशा प्रकारचा गुरु - दरवाजा मोकळा करुन देणारा मनुष्य आयुष्यात लाभावा लागतो, तेंव्हा ते "अरे, हे असं आहे होय?" असं चटकन दर्शन होतं. आता काही साक्षात्कारी लोक असतील की त्यांना स्वत:ला साक्षात्कार वगैरे होत असेल ! माझा काही साक्षात्कारावर विश्वास नाही. परंतु ज्ञानेश्वरांसारखी माणसंसुध्दा आपण लिहिलेलं आहे याचा उद्‌गार काढताना "निवृत्तीचा ज्ञानदेव - त्यांनी मला दरवाजा उघडून दिला" असा कृतज्ञतेने उल्लेख करतात. ती काही तरी अशी घटना असते की एकदम ते दार उघडं होतं आणि मग आपल्याला सुंदर दृश्य दिसायला लागतं.

इथे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगतो की ह्या संगीताच्या जगामध्ये तुम्ही जो प्रवेश करताहात ते एक अद्‌भुत जग आहे. भारतीय संगीताची परंपरा श्रेष्ठ आहे आणि पाश्चात्य संगीताची नाही असा खोटा अभिमान बाळगू नका. पाश्चात्य संगीतसुध्दा अतिशय मोठ्या दर्जाचं आहे. मला सांगा, संगीत ही गोष्ट वाईट असेलच कशी? संगीत निर्माण होण्यासाठी ज्या काही मूळ अटी आहेत त्या सगळ्यांच्या सारख्याच अटी आहेत. मी एकदा घराण्याची मारामारी चालू असताना विचारलं "का हो, तुमचा षड्‌ज आणि त्या घराण्याचा षड्‌ज याची मुळातच फारकत झालेली आहे का ? तुमच्या त्रितालात सोळा मात्राच आहेत ना? का तुमच्या खास वशिल्याने साडे चौदा वगैरे आहेत ? मग मारामारी कशासाठी?" तुम्हाला ते दर्शन कसं घडतं ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. परंतु हा मोकळेपणा का आला नाही त्याच्यामागे पुष्कळशी कारणं होती ती म्हणजे समाज - परिस्थिती - त्या लोकांची वृत्ती वेगळी होती. एका समारंभात माझं शेवटी भाषण होतं. त्या समारंभात एक पुढारी बोलताना म्हणाले की "समाजाने कलावंताला जो आश्रय दिला ...." तेंव्हा मी संतापून म्हटलं "आधी हे शब्द मागे घ्या ! इथे कोणी कोणाला आश्रय देत नाही. आज सकाळी मल्लिकार्जुन मन्सूरांचं असामान्य गाणं आपण ऐकलं - तेंव्हा आपण काय आश्रय दिला त्यांना? काय भाषा आहे ही ? पण त्याकाळी ही भाषा होती. कारण ह्या राजे-रजवाड्यांकडे ही मंडळी आश्रित भावाने रहात होती ही पण खोटी समजूत आहे. जुन्या काळामध्ये - सरंजामशाहीमध्ये ह्या कलावंतांना फार अदबीने - मानाने वागवलं जायचं. काही लोक नुसतेच राजे नव्हते - ते गाण्यातले चांगले जाणकार असले पाहिजेत - त्यांना कलावंतांचा मोठेपणा कळत असेल. बाकी तुम्हाला सांगतो, हत्ती, घोडे, पालखीवाले, शिकारवाले - त्यातलेच गवई - असंच होतं. इतके शहाणे होते की तुम्हाला काय सांगू ? इथल्याच एका संस्थानातली गोष्ट मी आपल्याला सांगतो. एका गवयाचा वरचा षड्ज उत्तम लागल्याबरोबर महाराज म्हणाले "काय आवाज आहे - हाक्याला चांगला आहे - ह्याला शिकारीच्या खात्यात घाला" एवढाच शहाणपणा होता. ह्यातून एक अनिष्ट अशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण झाली की आश्रितभाव आणि आश्रयदाता - नाही ! इथे जर खरोखरच गाणारा कलावंत आणि समाज बसत असेल तर तो स्नेहभावनेनेच बसतो. आणि जर कुठे कृतज्ञता भाव असला पाहिजे तर तो ऐकणार्‍याच्या मधे असला पाहिजे. कारण तुमच्या जीवनातला क्षण न्‌ क्षण तो सोन्याचा करत असतो. मी तुम्हाला सांगतो, कालची कुमार गंधर्वांची मैफल किंवा आज सकाळची मल्लिकार्जुनांची मैफल ज्यांनी ऐकली असेल त्यांच्या मनामध्ये कृतज्ञतेशिवाय दुसरं काय आहे ? ह्या आजच्या जीवनामध्ये इथे आपण केवळ जगतो - कसे जगतो हा सुध्दा आपल्यापुढे प्रश्न आहे. अशा ह्या जीवनामध्ये तीन तास हे आपल्याला सुवर्णकणासारखे वाटले, तीन तास उजळून निघाल्यासारखे वाटले हा काय आश्रित आणि आश्रयदाता भाव आहे इथे ? इथे कृतज्ञता असायला पाहिजे - आपल्याला धन्यता वाटली पाहिजे. शेवटी कलावंत काय करतो ? हे सगळे मेहेनत करतात म्हणजे काय करतात ? हे जगण्याचं जे काळाचं ओझं आहे ना हे आपल्याला भासता नये ही आपली ओढ असते. हा काळाचा प्रवाह जो वाहत असतो त्याची जाणीव आपल्याला नको असते. ज्यावेळेला घड्याळाचं एक एक मिनिट रेंगाळायला लागतं त्यावेळेला आपल्याला कंटाळा आला आहे असं म्हणतो. म्हणजे आपण जगतोय त्या काळाची जाणीव होते. आणि सगळ्यात चांगलं वाटलं असं आपण केंव्हा म्हणतो की वेळ कसा गेला ते कळलं नाही तेंव्हा. म्हणजे काळाची जाणीव विसरायला लावणं ही किमया संगीताइतकं दुसरं कोणीही करु शकत नाही.

मानवाला सगळ्यात मोठं वरदान कुठलं मिळालेलं असेल तर हे संगीताचं - सुरांचं वरदान आहे. मी ’मानवाला’ म्हणतो आहे. भारतीय मानवाला मिळालं आणि आफ्रिकन माणसाला मिळालं नाही अशी कुत्सित समजूत करुन घेऊ नका. हे फार मोठं वरदान आहे. दुर्दैव असं की ते सगळ्यांनाच असतं असं नाही. कर्णेंद्रिय असूनही माणसं बहिरी असतात त्याला काय करणार ? सगळं ऐकत असूनसुध्दा ऐकता येत नाही असं होतं. पण आपला प्रयत्न असा पाहिजे की त्यांनासुध्दा कसं कळेल ? आपल्याला कळतं आणि त्यांना कळत नाही म्हणजे आपण कोणी देवाने स्पेशल तयार केलेले - खुदाने तबियतसे बनाई हुई चीज आहोत असं मानायचं काही कारण नाही. आपल्याला खंत वाटली पाहिजे. अरे, ह्याला कसं कळेल ? आईनस्टाईनची एक गोष्ट आहे. गणितज्ञ आईनस्टाईन हा उत्तम संगीतज्ञही होता. त्याच्या घरच्या पार्टीत मित्रमंडळी आलेली होती. त्या पार्टीत एक रेकॉर्ड वाजत असताना आईनस्टाईनच्या लक्षात आलं की एका तरुण मुलाच्या काही लक्षात येत नाहीये. तेंव्हा आईनस्टाईनने त्याला बाजूला बोलावून विचारलं "तुला गाणं आवडत नाही का?" तो तरुण म्हणाला "आवडतं ना ! पण खरं सांगू का - मला ह्यातलं काही कळत नाही!" आईनस्टाईन म्हणाला "कळत नाही ? असं होणार नाही. तू चल माझ्याबरोबर". आईनस्टाईनने त्याला वरच्या खोलीत नेलं. तिथेही त्याचा रेकॉर्डस्‌चा संग्रह होता. वर जाता जाता आईनस्टाईनने त्याला जिन्यात विचारलं की "तू बाथरुममध्ये कधी गुणगुणतोस की नाही?" तो म्हणाला "हो, गुणगुणतो की!" आईनस्टाईन म्हणाला "हां, हे छान आहे - देन यू आर सेव्हड्‌ - आता चल माझ्याबरोबर" आणि वर त्याला आईनस्टाईनने एक तासभर "हे कसं चाललंय बघ, हे गाणं कसं आहे बघ, हा सूर कसा लावलाय पहा" असं गाणं ऐकवलं. असं करत करत एक तासाने जेंव्हा तो तरुण खाली आला तेंव्हा तो चार लोकांबरोबर गाणं ऐकत होता. आता शिकवायला आईनस्टाइनएवढा बुध्दिवान मनुष्य होता हे खरंच आहे. परंतु आईनस्टाइनसारख्या माणसाला सुध्दा वाटलं की पार्टी बाजूला टाकावी आणि ह्या गाणं न कळणार्‍या माणसाला गाण्यात आणून ठेवावं. ही काही सहज घडलेली गोष्ट नाही.

आपल्याला संगीताची ओढ आहे - प्रेम आहे हे आपलं भाग्य आहे, परंतु हे सगळं आपोआप घडत नसतं. त्याच्यासाठी कोणाला जीव मारावा लागतो - कोणाला तरी जीवनात देवधरांसारखं झोकून द्यावं लागतं, म्हणून आपण आज सगळेजण त्यांचा सत्कार करण्यासाठी इथे उभे राहिलो. पुष्कळ अडचणी आल्या. कित्येक वेळा असं वाटतं की जराशा अडचणी टाकल्या की कार्य जास्त चांगलं होईल की काय अशी मला शंका यायला लागली आहे. मी मोठ्या युनिव्हर्सिट्या बघतो, पण प्रत्यक्ष कार्य मला तिथे दिसत नाही. देवधर म्हणाले की त्यांचे तंबोरे कुरतडत आणि पेट्या फोडत असत. पण पेटी वाजवून बघावी असं त्या विद्यार्थ्यांना वाटत होतं हेच मला महत्वाचं वाटतं आणि देवधरांनाही तसंच वाटत असलं पाहिजे. आमच्या मित्राच्या घरी एकदा चोरी झाली. काही वस्तू वगैरे गेल्या. म्हणून आम्ही तिथे गेलो. तिथे टेबलावर माझी काही पुस्तकं होती. पण त्या चोराने त्यातलं एकही पुस्तक चोरलं नाही याचं मला अतोनात दु:ख झालं. निदान एक पुस्तक जरी चोरुन नेलं असतं तरी त्याने बर्‍या वस्तू चोरल्या असं मला वाटलं असतं. तसं त्या पेट्या तबले फुटत होते, पण त्याच्याशी झगडत झगडतच वाट दिसायला लागते. तशा जिद्दीची कार्यकर्ती माणसं भेटतात. वाडेगावकरसुध्दा सांगतील की त्यांनी लहानपणी एखादा टिन आणलेला असणार आणि त्याच्यावर वाजवायला सुरु केलेलं असणार. त्यावेळी त्यांना काही दोनशे रुपयांचा तबला कोणी आणून दिलेला नसणार. तर तिथेच ते दिसायला लागतं - तिथेच ते सापडतं. असं सापडणारं मूल शोधत जावं - अशा लोकांना जवळ करावं - अशा लोकांना ज्ञान द्यावं - हे केवढं मोठं कार्य देवधरांनी केलं - त्या कृतज्ञतेपोटीच आज आपण इथे जमलो आहोत. आजचा हा समारंभ म्हणजे गौरव बिवरव काही नाही तर हा कृतज्ञतेचा समारंभ आहे. आपण कोण त्यांचा गौरव करणार ? त्यांच्या कार्यानेच त्यांचा गौरव केलेला आहे. त्यांच्या कार्यामुळे प्रत्येक दिवस हा गौरवाचाच दिवस आहे. कुठल्यातरी एखाद्या व्यसनी गवयाला आणून तिथे गायला बसवायचं आणि त्याची पहिली तान गेल्यानंतर मैफल एकदम प्रज्वलित होऊन जायची त्याचा हा गौरव झालेला आहे. देवधर ह्या वयातसुध्दा व्हॉईस कल्चर शिकवत असतात - आवाज कसा लावावा ते शिकवत असतात. त्यांनी गवयांची सुंदर चरित्र लिहिलेली आहेत. त्यांच्याकडे संगीतातल्या चीजांचा केवढा मोठा संग्रह आहे. ह्या चीजांचा संग्रह असलेल्या लोकांना पूर्वीच्या काळी कोठीवाले म्हणायचे. त्या चीजा कोठीतच रहायच्या आणि कोठीतच संपायच्या. त्या कोणाच्या कंठात जात नसत. त्या सगळ्या चीजा देवधरांनी लोकांसमोर आणल्या - त्यांना शिकवल्या.

आज काळ बदललेला आहे. संगीताच्या दृष्टीने अनेक संस्था आज कार्य करत आहेत. सरकारच्या वतीने सरकारचेही प्रयत्न चालू आहेत. सरकार काही करत नाही असं मानणार्‍यातला मी नाही. राजकारणातला नसल्यामुळे मला दोन्ही बाजू नीटपणे पहाता येतात. जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नसेल, पण मी आपल्याला खरं सांगू ? कार्य जर करायचं असेल तर आपल्यासारखी जी प्रेमी मंडळी असतात त्यांच्याकडूनच उभं राहतं. कलेच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की सरकारने काय करायला पाहिजे हे सांगण्यापेक्षा असं कार्य उभं करुन दाखवावं की सरकारला लाज वाटून तरी सरकार पुढे येतंच. जातं कुठे ? आज गवयांपुढे नवी नवी चॅलेंजेस आहेत. रेडिओ जेंव्हा पहिल्यांदा आला तेंव्हा गवई रेडिओवर गायला तयार नसत. त्या अंधार्‍या खोलीत कोणी दाद द्यायला नाही तर काय गायचं ? हे देवधरांना माहित आहे. नंतर रेडिओवर गवई गायला लागले - कसे गातात ते बोलत नाही. आता टेलिव्हिजनचा चॅलेंज आला आहे. हा चॅलेंज फार महत्वाचा आहे. टेलिव्हिजनवर शास्त्रीय संगीताची मैफल उत्तम रीतीने कशी करुन दाखवायची हा काही टेलिव्हिजनवाल्यांना आलेला चॅलेंज नाहिये तर हा गवयांना आलेला चॅलेंज आहे. आपण असं म्हणतो की त्यांनी असं करावं, तसं करावं. अरे तुम्ही चांगलं केलंत तर ते चांगलं करतील. तो तर कॅमेराच आहे. हा नवा चॅलेंज आहे.

रागांचं शुध्दत्व पूर्वीसारखं राहिलेलं नाही - गडबड करतात - ख्याल गाताना ठुमरी अंगाने ख्याल गातात असं मला पुष्कळ लोक म्हणतात. तो ख्याल तसा गावा की नाही हा भाग निराळा. ख्याल जर निराळा म्हणत असाल - ठुमरी ही जर निराळी म्हणत असाल तर दोन्हींचा विचार झाला पाहिजे. ह्याची चर्चा करण्यासाठी तज्ञ मंडळींनी एकत्र बसायला पाहिजे. अशा प्रकारचं कार्य झालं नाही असं आहे का ? मुंबई युनिव्हर्सिटीने, उशीरा का होईना, संगीताचा विभाग निर्माण केला. असं हे कार्य हळूहळू करत असताना आपल्याकडून हे आपलं कार्य आहे अशा तर्‍हेने आपण श्रोते म्हणून सहभागी व्हायला पाहिजे. म्हणून मी गवयांना - कलावंतांना विनंती करणार आहे की जे दुसर्‍याचं कार्य आहे असं समजतात तसं समजू नका - ते त्यांचं कार्य आहे. मला सांगताना अतिशय खेद होतो की ज्या ज्या वेळी अशा प्रकारचं कार्य असतं त्यावेळी आमचे कित्येक गवई (सगळेच म्हणत नाही) केवळ व्यावसायिक दृष्टीने त्याच्याकडे पाहतात हे मला अजिबात आवडत नाही. हे चूक आहे. तुम्ही समाजालासुध्दा काही देणं लागता की नाही हा भाग सोडून द्या, पण तुम्ही तुमच्या कलेचं देणं लागता ना ? सोसायटीशी कमिटमेंट असावी की नाही हा आमच्या साहित्यात फार चर्चेचा विषय आहे. पण मला असं वाटतं की तुमची तुमच्या आर्टशी कमिटमेंट पाहिजे. ती जर
नसेल तर तुमचं कसं होईल? मला असं म्हणायचं आहे की ह्या मुंबई शहरामध्ये जिथे ऍकोस्टिक्स चांगली नाहीत, जिथे एकमेकांमध्ये साहचर्य निर्माण होत नाही अशा हॉलमधे हा संगीताचा उत्सव करावा लागतो. आज उत्तम प्रकारचं गाणं ऐकण्यासाठी - हजार हजार लोक बैठकीत बसून तिथे गाणं ऐकतील - जिथे मायक्रोफोन नावाची भयंकर गोष्ट नसेल आणि वाद्य किंवा स्वर ह्याची जी मुळातली जात आहे ती ऐकायला येईल अशा प्रकारचा हॉल आमच्याकडे नाही. हा हॉल कोणी उभा करायचा ? संगीताच्या प्रेमी लोकांनी तो उभा करण्यासाठी धडपड करायला पाहिजे. सरकारने असं करावं - सरकारने तसं करावं - ते तर करावंच - त्या दृष्टीने तर प्रयत्न करायचेच. पण आम्ही हे एवढं करतोय असं मानण्याची जर कलेच्या प्रांतात सवय नसेल तर एक नवा धोका निर्माण होतो तो मी आपल्याला सांगतोय. उद्या जर सरकारनेच प्रत्येक गोष्ट करायचं ठरवलं, तर उद्या तुम्ही काय गायचं हे सुध्दा सरकारच सांगायला लागेल हा धोका भयंकर आहे. त्या धोक्यासाठी मी आपल्याला सांगतो आहे. तुम्ही आम्हाला काही सांगू नका - आम्ही तुमचं काही देणं लागत नाही - हे कार्य आमचं आम्ही उभं केलेलं आहे - आम्हाला पाहिजे तसं आम्ही गाणार. आणि मी एक सांगतो आपल्याला, ह्या भारतामध्ये उद्या धान्य कमी मिळालं, अन्न कमी मिळालं तर ते लढे आम्ही करुच - पण एक लक्षात ठेवा - तुमच्या गळ्यामधलं तुम्हाला गावं वाटणारं गाणं ज्यादिवशी सरकार खेचून नेईल, त्याच्या इतका अभागी दिवस दुसरा कुठला नसेल. म्हणून आपल्याला आपलं गाणं - आपली ताकद जास्त वाढवायला पाहिजे. संगीतकारांनी एकत्र येऊन ही ताकद वाढवली पाहिजे हे मला महत्वाचं वाटतं.

आता पूर्वीसारखे घराण्यांचे मतभेद राहिले आहेत असं मला वाटत नाही. नवी आलेली पिढी इतकी हुशार आहे. काही लोक गाण्याबद्दल चिंता व्यक्त करतात. ते चिंताच व्यक्त करण्यासाठी जन्माला आले असतात हे मी तुम्हाला सांगतो. ते गाण्याबद्दलच चिंता व्यक्त करतात असं समजू नला. मुंबईतली थंडी चार दिवस वाढली तरी त्यांना बरं वाटत नाही. "गेल्या वर्षी लवकर संपली होती" ही चिंता ! कधी आपल्याला चार दिवस जास्त थंडी मिळाली तर काय बिघडलं ? ते जाऊ द्या. नव्या पिढीतली मुलं उत्तम गातात. कोण म्हणतं चांगलं गात नाहीत ? मी खूप गाणं ऐकतो. नवीन मुलं अतिशय तयारीने, स्वतंत्र विचाराने, निराळ्या रीतीने गात आहेत. ती तशी गाणारच. त्यांचा कान निराळा आहे - पोशाख निराळा आहे. त्यांची वृत्ती निराळी आहे - ती वृत्ती संगीतात दिसणार नाही तर कशात दिसणार ? त्यांच्या विचाराने निरनिराळे संस्कार घेऊन गात आहेत. अशा वेळी संगीत ऐकणारा श्रोता नाही असं मला मुळीच वाटत नाही. माझ्या आठव्या नवव्या वर्षापासून गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षं मी संगीत ऐकण्याचा व्यवसाय केला आहे. तेंव्हा हल्ली संगीत जितकं जाणकारीने तरुण ऐकतात, तितकं चाळीस वर्षांपूर्वी ऐकत नव्हते हे मी तरुण पिढीला सांगतो. हल्ली उत्तम ऐकतात - उत्तम रीतीने दाद देतात. नुसता मोठा फेटा किंवा लांब दाढी बघून हा मोठा मनुष्य आहे असं मानत नाहीत कारण ह्या पोरांचीही दाढी चांगली लांब असते. ही तरुण मुलं डोळसपणे गाणं ऐकत असतात. आज पुण्याला सवाई गंधर्व उत्सव होतो तेंव्हा वीस वीस हजार माणसं उत्तम प्रकारे गाणं ऐकायला बसलेली असतात. मुंबईत निरनिराळ्या उत्सवात ऐकत असतात. तर अशा दृष्टीने पहायला गेलं तर हे दर्शन चांगलं आहे, पण हे चांगलं दर्शन तुम्हाला जे घडतंय त्या दर्शनाच्या मागे देवधरांसारख्या माणसाची पुण्याई आहे हे मात्र कधीही विसरु नका. शाळेत किंवा कॉलेजमध्ये सायकलवरुन मोठ्या आत्मविश्वासाने जाणार्‍या मुलीना (पुण्यात कधी ओळखीची असली तर) मी सांगतो "हे बघ, ह्या सायकलवरुन तू जोरात जात आहेस ना, तेंव्हा मनात एवढंच ठेव की हे जे तुला स्वातंत्र्य मिळालंय ह्याच्यामागे कुठे तरी ज्योतिबा फुल्यांच्या बायकोने दगड खाल्ले होते एवढं लक्षात ठेव. ह्याच्या मागे आगरकरांना कुठे तरी उपास घडला होता एवढं लक्षात ठेव !" उद्या मैफलीत तुम्ही उत्तम रीतीने गाल - हजारो लोकांना संतुष्ट कराल - सगळ्या दर्जाचे लोक तुमचं गाणं ऐकायला येतील - त्यावेळी मी तरुण कलावंतांना हेच सांगेन की हे सगळं आज तुम्ही मोकळेपणानं करता आहात, ह्याच्यामागे देवधरांसारख्याचं आयुष्य लागलेलं होतं ह्याची जाणीव आपण विसरु नका.

देवधरांना दीर्घायुष्य लाभो. कारण आमचे अजून पुष्कळ विद्यार्थी तुमच्या हाती सुपूर्द करायचे आहेत. ह्या स्वार्थापोटी दीर्घायुष्य मागतो. इथे उत्तम प्रकारचं शिक्षण चालो. ह्या विद्यालयाला जर स्वत:ची इमारत पाहिजे असेल तर त्यांच्या शिष्यांनी आणि इतर कलावंतांनी उभं राहून मुंबईमध्ये केवळ उत्तम संगीत ऐकण्यासाठी असं एक सभागृह उभं करावं अशी देवधरांचीच इच्छा मी आपल्यापुढे मोठ्याने व्यक्त करतो आहे.

गाणं ऐकायला जाताना माझा कान आणि मन मी घेऊन जातो. मी तिथे माझी बुध्दी कधीच नेत नाही. नेली तर ती मला चुकीच्या ठिकाणी नेईल असं मला वाटतं. माझ्यासारख्या गाण्याच्या व्यवसायामध्ये ऐकण्याचं काम करणार्‍या माणसाला एवढ्या मोठ्या उत्सवाचं अध्यक्षस्थान देऊन लाजवलेलं आहे असं मी आपल्याला सांगतो. हे स्थान माझं नाही याची मला पुरेपूर जाणीव आहे. परंतु गाणार्‍या लोकांच्यात कोणीतरी एक बोलणारा पाहिजे म्हणून मला इथे बोलावत असतात हेही मला माहीत आहे, तेंव्हा त्याच भावनेने मी आलो आहे. पण मुख्यत: मी अशा भावनेने आलेलो आहे की देवधरांच्या अन्नछत्रामध्ये मी जे काही सुरांचं सुग्रास भोजन केलेलं आहे त्याची कृतज्ञता मला कधीतरी जाहीर करायची होती. ती करायला आजच्या इतका सुंदर प्रसंग कुठला असेल असं मला वाटत नाही. हा प्रसंग आज आला. देवधरांचा पंचाहत्तरावा वाढदिवस अधिक थाटामाटाने - अधिक प्रेमाने आपण साजरा करु अशी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सौ. देवधरांनी जे कष्ट सोसले त्याची कृतज्ञ जाणीव संगीतातल्या जगातल्या सगळ्या लोकांना आहे हे त्यांना सांगतो आणि मी माझं भाषण संपवतो.


भाषणाची ध्वनीफित इथे ऎकू शकता.