Saturday, January 18, 2020

II पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II

पु. ल . देशपांडे नावाची व्यक्ती मला पहिल्या वेळेस कधी भेटली हे नक्की आठवत नाही, पण एवढं आठवतंय की मी त्यावेळी साधारणतः सातवीत शिकत होतो .

दूरदर्शनवर एक कार्यक्रम असायचा. घरातली सर्व लोक त्या कार्यक्रमासाठी टीव्हीसमोर मांडी ठोकून बसायची. त्या प्रेक्षकांमध्ये आज्जी आजोबा असायचे. शेजारपाजारचे सुद्धा यायचे . ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा तो जमाना होता. रात्रीचे आठ वाजले की एका कर्णमधुर संगीताच्या पार्श्वभूमीवर टीव्हीवर एका स्टेजवरील पडदा बाजूला जायचा आणि टाळ्यांच्या गजरात सर्वजण एका व्यक्तीचे स्वागत करायचे. स्टेजवर फक्त तो एकटा माणूस अर्धा तास काहीतरी गम्मतीदार सांगायचा आणि घरातील सगळेजण त्याच्या प्रत्येक वाक्याला हसत असायचे . मला त्या कार्यक्रमातील फारसं काही कळायचं नाही . पण घरातील सगळे तो कार्यक्रम पाहताना आनंदात असायचे हे पाहून आम्हा लहान मुलांना देखील बरं वाटायचं .

स्वयंपाकघरातली सगळी कामे टाकून साडीला हात पुसत आई या कार्क्रमाला लगबगीने यायची , वडील पेपर वाचायचे थांबवून टीव्हीपुढे बसायचे. एरवी अतिशय गंभीर असलेले आजोबा आणि कायम देवाचे नाव पुटपुटत असणारी आज्जी सुद्धा कार्यक्रम पाहताना मिश्किल हसायचे .

घरातील सगळ्या माणसांना हसवणारा हा माणूस नक्की कोण या माझ्या प्रश्नाचे उत्तर घरातील सर्व एकसुरात दिले , " अरे , ते तर आपले पुलं ! "

ही होती माझी पुलंबरोबर पहिली भेट !

त्यानंतर पुलं आयुष्यात नेहमी भेटत राहिले . सुखाच्या प्रसंगात भेटलेच पण दुःखाच्या प्रसंगात जास्त वेळा भेटले . गमतीची गोष्ट म्हणजे पुलं भेटायला येताना एकटे यायचे नाहीत तर सोबत गोतावळा घेऊन यायचे .............. प्रत्येक वेळी त्या गोतावळ्यात नवनवीन माणसांची भर पडत जायची . त्यात अगदी सुरुवातीला आला तो गटणेंचा सखाराम ! " प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे " असलं काहीतरी पुस्तकी बोलणारा हा मुलगा मनात घर करून गेला. त्यानंतर आला नारायण . आकाशवाणीवरून पुलंच्या आवाजात नाट्यरूपांतर केलेला हा नारायण त्यानंतर प्रत्येक लग्नकार्यात भेटत राहिला . नंतर आले हरितात्या ! मनाने अत्यंत चांगले पण बेशिस्त. पुलं गमतीने म्हणायचे " दासबोधाची इतकी पारायणं करूनही एवढा अव्यवहारी राहिलेला दुसरा माणूस मी पाहिलेला नाही ."

या हरितात्यांचे समर्थ रामदासांवर खूप प्रेम होतं . अगदी घरी आल्याआल्या मुलांसोबत " जय जय रघुवीर समर्थ " असा अंगणातच जयघोष करायचे .

पुलंसोबत येणारं हे गणगोत दिवसोंदिवस वाढतच होतं . त्यात भर पडली बटाट्याच्या चाळीतल्या आणि असामी असा मी या ऑफिसमधील लोकांची ! मला आठवतंय त्यावेळी पुलंचं वजन वाढलं होतं . चाळीतले सोकाजी त्रिलोकेकर त्यांना म्हणाले " ए पंत , साला बटाटा सोड ! बटाट्याचं नाव सुद्धा काढू नकोस . अगदी कुणी विचारलं " कुठे राहता " तर नुसतं " चाळीत " म्हण " बटाट्याच्या चाळीत " नकोस म्हणू , नायतर वजन वाढल . " आम्ही पोरं या वाक्यावर फू….SSS करून हसलो होतो .

आम्हाला वाटायचं पुलं फक्त विनोदी लिहतात आणि बोलतात. पण असच एकदा त्यांचं पेटीवादन ऐकलं आणि आम्ही गारच पडलो. खास आमच्यासाठी पुलंनी त्यादिवशी " नाथ हा माझा " वाजवलं होतं . त्यानंतर बोरकरांच्या कविता पुलं आणि सुनीताबाईंच्या आवाजात ऐकल्या आणि हे पुलं आणि आपले नेहमीचं विनोदी लिहणारे पुलं वेगळे आहेत अशा निष्कर्षांला आम्ही मुलं आलो . कारण, एकच मनुष्य लेखन , संगीत , कविता या सगळ्या गोष्टी कशा करू शकेल ? बोरकरांच्या कवितावाचनावेळचा प्रसंग . पुलंनी ' जीवन त्यांना कळले हो ' ही कविता वाचली आणि आमच्यापैकी एकजण सहजपणे म्हणाला , " ही कविता पुलंवरच लिहली आहे असं वाटतंय ना " ... आमच्या सर्वांच्या डोळ्याच्या कडा त्यावेळी नकळत ओलावल्या होत्या..!

याशिवाय गायक पुलं , संगीतकार पुलं , प्रवासवर्णन करणारे पुलं अशा वेगवेगळ्या रूपात पुलं आम्हाला भेटत राहिले . आपल्या देशावर लादल्या गेलेल्या आणिबाणीमध्ये पुलंनी सरकारविरोधी घेतलेली कणखर भूमिका आणि आणीबाणीनंतर मात्र अगदी शांतपणे लेखनाच्या प्रांतातील त्यांचा पुनःप्रवेश हे पाहून त्यांच्याविषयीचा आदर दसपटीने वाढला .

मनात विचार येतो , पुलंचे वर्णन नक्की कोणत्या शब्दात करता येईल . पुलं फक्त लेखक होते ? फक्त गायक अभिनेते होते ? फक्त संगीतकार होते ? नक्कीच नाही. पु.ल. म्हणजे आयुष्याकडे पहाण्याची एक वृत्ती आहे. स्वतःच्या आयुष्यातील सुखदुःखे विसरून जगाला आनंद देणे आणि जगाला हसवत ठेवण्याची ही वृत्ती आहे. स्वतःच्या वैयक्तिक सुखदुःखामध्ये न अडकता त्यांनी केलेल्या समाजोपयोगी कार्यांचा गौरव देखील झाला मात्र कोणताही बडेजावपणा न करता ते आयुष्यभर साधेपणाने जगले . पुलंचे जीवन पहिले तर समर्थ रामदास स्वामींच्या - ऐसी कीर्ती करून जावे I तरीच संसारास यावे I दास म्हणावे I हे स्वभावे संकेतें बोलिले II या श्लोकांची आठवण होते .

पुलं आणि सुनीताबाईंनी पुलं फाऊंडेशनच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या देणग्या विविध सामाजिक कार्यांसाठी दिल्या. अनेक सामाजिक संस्था, चळवळी, अपंग-मूक-बधिरांसाठीच्या संस्था अशा विविध कार्यांना त्यांनी भरभरून देणग्या दिल्या. आपल्या पुस्तकांचे हक्क प्रकाशकांना विकून तो पैसाही त्यांनी सामाजिक संस्थांना दान केला. यापैकी कित्येक गोष्टींची माहिती पुलं गेल्यानंतर लोकांना कळल्या. समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे मात्र जवरी चंदन झिजेना I तंव तो सुगंध कळेना I या वचनाप्रमाणे चंदन आणि इतर लाकडे वरवर एकसारखी वाटत असतील तरी उगाळल्यावर त्यातील फरक कळून येतो .

दासबोधातील निस्पृह लक्षण , उत्तम पुरुष लक्षण , विरक्ती लक्षण यातील वर्णन पुलंना तंतोतंत लागू पडते . अशा या पुरुषोत्तमास साष्टांग नमस्कार !

डॉ .वीरेंद्र वसंत ताटके
Mobile 9225511674
(श्री क्षेत्र सज्जनगड येथील समर्थ सेवा मंडळाच्या मासिकात आलेला लेख )

0 प्रतिक्रिया: