१ जानेवारी : "जगात शुद्ध प्रीतीला स्तान नाही हे चाळींतले सुप्रसीद्द काद्रंबरीकार माळसाकात पोंबुरपेकर यांचे मत मला अगदी पटलें. - मधूजवळ मी आज दूपारीं जीन्याखाली बोलत असतांना त्यांच्या बाबांनी पायलें आणि त्याच्यावर ते रागावले. - खरं म्हणजे माजं त्याच्यावर व त्याचं माज्यावर शूद्द प्रेम आहे. -मधूचें मन हळूवार आहे. त्याची मत्वाकांक्षा एक अभिनयपटू सीनेमांतील हीरो व्हायची आहे. मलाहि चाळींत सर्वजण नरगीस म्हणतात. मधू डायरेक्टर होऊन मला हीराइनचीं कामें देणार आहे. फील्म लाइनमदी त्यांचे कीतीतरी दोस्त आहेत. मधू गाणं कीती छान बोलतो. तो मूजिक डायरेक्टरसुद्धा होईल. चाळीतल्या गणेशोत्सवांत आमच्या 'राणी चंपावती' नाटकांत त्याने किती छान मूजिक डायरेक्शन केलें होतें. पण जगाला कलावंताची पारक नाही. मधू म्हणतो की सर्वच कलावंताना हालपेष्टाच काढाव्या लागतात..."
८ जानेवारी : "काशीनाथ नाडकर्ण्याचा मूलगा दूष्ट आहे. त्यानेच बहुतेक बाबांना नीनावी पत्र लीहीलं असेल. मधूने मला जिन्यांत प्रेमपत्र दीलें. कीति छान आहे. मधू कवीता पण काय लीहतो! - तुझी माझी प्रीत - चंद्राची आणि चांदणीची... अय्या - मधू चंद्र आणि मी चांदणी ही कल्लपना कीती सुंदर आहे..."
२ मार्च : "मधू फार वाईट आहे. चौबळांच्या कुमुदला घेऊन तो सीनेमाला गेला होता असें काशीनाथ नाडकर्ण्याच्या मुलाने मला सांगितलें. - काशीनाथ नाडकर्ण्याच्या मुलाने मला 'जादुई नग्री' चा फुकट पास दिला. पण उद्यापासून परिक्षा आहे. - मला परिक्षेला बसायला आवडत नाही. देवाने परिक्षा नीर्माण का केल्या? वाळिंबेबाई दूष्ट आहेत. वर्गात 'आता बापाला सांगा उजवायला' असं मला म्हणायला लाज वाटत नाही? - तरी बरं, केस पीकले तरी लग्नाचा पत्ता नाही स्वतःच्या..."
१० नवेंबर : "पुढल्या महिन्यांत पिक्चरचं शूटिंग सुरु होणार. तोपर्यंत मधू एक नाटक कंपनी काढणार आहे. सुरुवातीला नाटकांत काम केलं की सीनेमात काम करणं अगदी सोप्पं. नाटकांत मात्र मला हीराईनचं काम आहे.."
२४ नवेंबर: "मी आणि मधू लालबागला गेली. तिथे नटवर्य माष्टर सावळाराम मिठबावकर ह्यांच्या सांतेरीप्रसादसुबोनाट्यमंडळाच्या नव्या नाटकाचा मुहूर्त झाला. नाटकाचं नांव 'हातांत हात' असं आहे. मधुने माझी ओळख आपली मीसेस अशी करून दिली. मला खूप लाज वाटली. मधू मिस्चिफ आहे. पण असं सांगावं लागतं असं मधू म्हणाला, म्हणून मी रागावली नाही. कलेसाठी प्राण दिले पाहिजेत असं मधू म्हणतो..."
;
१ डीसेंबर : "काशीनाथ नाडकर्ण्याच्या मुलग्याने बाबांना मला लालबागला पाह्यली हे सांगितलं. मी शाळेत गेली होती म्हणून सांगितलं. दुपारी बाबा शाळेत गेले. मी सबंध वर्षात शाळेंत गेलीच नाही, असं वाळींबेबाईंनी बाबांना सांगितलं. म्हणून रात्री बाबांनी आणि आईनी मला उपाशी टाकून स्वैपाकघरांत कोंडलं. मी सगळीजण झोपल्यावर दुध पिली. असल्या लोकाशी असच वागलं पायजे. बाबांच्या गजकर्ण फार्मशीच्या मलमाच्या बरण्या सैपाकघरात होत्या. त्यांत मिर्चीची पूड कालवून ठेवली आहे..."
काही वासऱ्या
बटाटयाची चाळ
पु. ल. देशपांडे
1 प्रतिक्रिया:
Punha ekda P.L. chya Chalitali Apurvai anubhavavi vatte...!!!
Post a Comment