Wednesday, December 29, 2021

लोकशाही : एक सखोल चिंतन

..... ’लोकशाही म्हणजे लोकांनी चालवलेले लोकांचे आणि लोकांच्यासाठी असलेले - म्हणजे थोडक्यात आपल्यासाठी नसून लोकांसाठी असलेले सरकार - लिंकन (थोडा फेरफार करून. अधिक माहितीसाठी काही वाचण्याची गरज नाही)

इसापनीतीत एक गोष्ट आहे. बेडकांना एकदा वाटते, आपल्याला राजा हवा. वास्तविक त्यांना राजाची आवश्यकता का भासवी, कोण जाणे. भासली खरी. शेवटी देवाने ओंडका फेकला. बेडकांनी आठ दिवसात त्याच्यावर नाचायला सूरुवात केली - तेंव्हा देवाने अधिक कडक राजा हवा म्हणून बगळा पाठवला. पूर्वीचे चैनी राजे प्रजेच्या खर्चात विहार करीत, ते सोडून ह्या बाहेरुन शूभ्र दिसण्या-या राजाने, प्रजेचा चक्क आहारच करायला सूरुवात केली. बेडकांनी हाही राजा परतवला आणि आपल्यातून राजा निवडायचे ठरविले. तो अजूनपर्यंत निवडला गेला की नाही ते कळत नाही. आरडाओरडा मात्र चालोतो. दर पावसाळ्यात त्यांच्या सभा होतात. गळ्याचे गोळे फूगवून वृद्धदुर्दर भाषणे करतात. वर्षभर पून्हा काही ऎकू येत नाही. बहूधा मंडूकशाही सुरू झाली असावी वर्षातून एकदा निवडणूका देखील होत असाव्यात.
-----------------------------------------------------------

समजा अगदी एखादा नवा वझीर नेमायचा आहे. प्रोसिजर सरळ! गावात दवंडी पिटवायची. बरे, ही दवंडी पिटवताना देखील नुसते, ' नवा वझीर नेमायचा आहे हो ss.. गरजुंनी उदईक माध्यान्ही दिवाणेखासमध्ये हाजीर व्हावे होss..' अशी साधी दोन वाक्ये. दाखले, शिफारसी, वयाची अट, शिक्षण, पदवी वगैरे काही काही नको. उमेदवार-वझीर दरबारात येतात. मग सर्वांना मिळून सुलतान एखादे कोडे घाली. ' चाॅंद आसमानातच का राहतो? ' अशासारखा एखादा प्रश्न विचारला जाई. सारा दरबार आणि उमेदवार-वझीर बुचकळ्यात पडत. सगळीकडे सन्नाटा! मी मी म्हणणारे बुजुर्ग दाढीचे केस मोजू लागत. अशा वेळी एखाद्या उमेदवार-वझीराच्या घोड्याला खरारा करणारा मोतद्दार पुढे सरसावून तीन वेळा कुर्निसात करून विचारी,
' जहाँपन्हाॅं, आपल्या सवालाचा जवाब देण्याची गुस्ताखी मी करू का? '

' जवाब गलत निघाला तर जबान छाटली जाईल. '

' बेशक जहाँपन्हाॅं '

' दे जवाब, चाॅंद आसमानातच का राहतो? '

' हुजुर सलतनत बडी असो वा छोटी, जातीचा सुलतान नेहमी तख्तावरच बसणार. '

' बेशक.. पण मतलब? '

' मतलब हाच हूजुर, चाॅंद आसमान सोडून धरतीवर आला तर त्याला बसायला एकच तख्त आहे पण त्याच्यावर तर हुजुर तश्रीफ ठेवून राहिले आहेत. '

' मतलब? ' सुलतान प्रश्न विचारण्यात हुशार असला तरी उत्तर समजण्यात असेलच असे नाही.

' मालिक, आपण धरतीवर असताना चाॅंदच काय पण सूरज जरी आला तरी त्याला बसायला जागा कुठे आहे? म्हणून तो बिचारा आसमानातच राहतो. '

' शाबास! तुला दहा हजार अश्रफिया इनाम! काय नाव तुझे? '

' माझं नाव म्हमद्या! '

' तू रोजगार कोणता करतोस? '

' मी नवाब हारजंग तलवारजंग बहाद्दरांचा मोतद्दार आहे सरकार. '

' तुझा मालिक कुठे आहे? '

' बंदा हाजीर आहे खुदावंत ' नवाबसाहेब पुढे येऊन म्हणत.

' तू इथे कशासाठी हाजिर आहेस? '

' वझीर होण्यासाठी, हाजिर सो वजीर सरकार '

' खामोष! असला अफलातून दिमाग असलेल्या फनकार जवानाला घोड्याला खरारा करायला ठेवणारा बुद्धु कहीं का. बोल तुझा गुनाह कबुल? '

' कबुल खुदावंत '

' जलदी कबुल झालास म्हणून वाचलास. नवाब हारजंग आजपासून तुझं नाव
म्हमद्या ठेवलं आहे आणि म्हमद्या तुला नवाब हारजंग तलवारजंग बहाद्दरांचा किताब आणि जहागिरी देण्यात येऊन सलतनितीची वझीरी देण्यात आली आहे. दरबार बरखास्त! '

- पु.ल. देशपांडे
लोकशाही : एक सखोल चिंतन
खिल्ली

Friday, December 24, 2021

परम संतोष जाहला

इतिहासाची पानें चाळतांना पुलंचे एक भन्नाट पत्र हाती लागले. ५ ॲागस्ट १९७८ रोजी 'भारतीय आयुर्विमा महामंडळ' या संस्थेने सोलापूर शहरात आपली दुसरी शाखा सुरू केली. महामंडळाचे एक अधिकारी श्री. विश्वास दांडेकर यांनी एक नाविन्यपूर्ण जाहिरात तयार केली. महामंडळाची अशा स्वरूपाची ही पहिलीच जाहिरात होती. त्या वेळचे आयुर्विमा महामंडळाचे प्रचार आणि प्रसार प्रमुख श्री. शरच्चंद्र मेघश्याम शिरोडकर हे होते. त्यांना ही जाहिरातीची कल्पना आवडली. श्री. शिरोडकर यांनी जाहिरातीतील मजकूर सेतूमाधवराव पगडी यांच्याकडे पाठवून तो दुरूस्त करून आणला होता.

प्रसिद्ध होणारी जाहिरात श्री. श मे शिरोडकरांनी महाराष्ट्रातील चाळीस नामवंत लेखकांना पाठवून त्यांच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या. एकोणचाळीस लेखकांनी पत्राची साधी पोच पाठवण्याचेसुद्धा सौजन्य दाखवले नाही. फक्त पु. ल. देशपांडे यांनी जाहिरातीच्या भाषेतच श्री, शिरोडकरांना उत्तर पाठविले होते. जाहिरातीचा मजकूर आणि पु. ल. देशपांडे यांचे उत्तर मूळ स्वरूप असे :

जाहिरातीचा मजकूर

सकल गुणालंकारमंडित राजमान्य राजेश्री श्रीयुत विमेदार स्वामी यांचे हुजूरास विनंती अर्ज ऐसाजे. स्वामींचे उदार आश्रयेंकरून सोलापूर शहरीं आमचा भला उत्कर्ष जाहला असोन सांप्रत काळीं सुभे साताऱ्यामधील बिनीचा सन्मान शहर सोलापूर शाखेस लाभला हें स्वामीस विदित आहेच. इकडील काम फते होतें तें स्वामींचे आशीर्वादेंकरून. आमची हिंमत व नेट वाढावयास कारण तरी स्वामींचे पाठबळच. यास प्रमाण म्हणाल तर आपले शहरीं दुसरी शाखा मल्लिकार्जून बिल्डिंग, ४४२, पश्चिम मंगळवार पेठ ये स्थळी स्थापन होणार हा मनसुबा पक्का जाहला आहे. मुहूर्त १५ आगस्त १९७८ इसवी रोजी दुपारचा ३|| वाजतांचा धरलेला असोन समारंभासाठीं शिवछत्रपती रंगभवनाजवळील, फ्री मॕसन हॉल हा ठिकाणा मुक्रर केला आहे. आजवर सेवकाचें कवतिक जाहलें तें स्वामींचा वरदहस्त मस्तकीं असलेमुळेंच. याउप्परही स्वामींनीं कृपालोभ पुढे चालविला तरच सेवकाची कार्यवृद्धि होत जाईल ये विषयीं तिळमात्र शंका नसे.आमचें अगत्य असों द्यावें. इति लेखन सीमा।

लाइफ इन्शुअरन्स कॉर्पोरेशन ॲाफ इंडिया

भाईंची प्रतिक्रिया

१ रुपाली, ७७७,
शिवाजीनगर पुणे ४ 
गोकुळाष्टमी. ख्रिस्तमास अगस्त, 
सव्वीस एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर इसवी.

।।श्री मृत्यूंजयाविमाभवानी प्रसन्न।।

सकलगुणांलकारमंडित मानवयोगक्षेमचिंतानिवारणकार्यरत विमाप्रवर्तक राजमान्य राजेश्री श. मे. शिरोडकर यांचे चरणी माजी विमाधारक आणि सांप्रत विमाधारण कालातीत सेवक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे याचे विनम्र प्रणिपात. निमंत्रण पावोन समाधान जाहले. धन्यवादाप्रित्यर्थ चार उत्तरे लिहिण्याचा प्रेत्न करीत आहे. मर्यादातिक्रमाची प्रारंभी क्षमा मागतो. विमेदारांच्या उदार आश्रये करोन आपणांस लाभलेल्या सन्मानाचे वृत्त वाचोन परम संतोष जाहला.
भारतदेशाचे भूतपूर्व केंद्रीय अर्थमंत्री विद्वद्वर आणि परमश्रद्धेय माननीय सकलगुणांलकारमंडित राजमान्य राजेश्री चिन्तामण द्वारकानाथ देशमुख महोदयांच्या कर्तृत्वेकरोन इये देशी भारतीय विमा निगमाची प्रतिस्थापना जाहली. त्या उपरान्त प्रस्तुत निगमाने प्राणपणाने चालविलेल्या विमाधारकाच्या प्राणोत्क्रमणोत्तर योगक्षेमाची धुरा वाहण्याचे कार्य नाना प्रकारचे मनसुबे रचोन विस्तारिले आहे हे लोकविश्रुत त्याची थोरवी केवळ वर्णनातीत. त्या कार्यसिद्धीचे कवतिक करण्याचा अधिकार प्रस्तुत पत्रलेखकाचा नसोन संबंधित क्षेत्रस्थ मातबरांचा आहे. सेवकाची मर्यादा सेवक जाणतो.

मात्र,

विमाधारके नित्य हप्ते भरावे
देहे त्यागिता द्रव्यरुपे उरावे

हे विमासूत्र जनसामान्याने उत्तरोत्तर अधिकाधिक मात्रेत मनीमानसी बाळगोन स्वकुटुंबियांचे आणि स्वार्थ साधो जाता परमार्थी भावनेने विमानिगम कर्मचाऱ्यांचे वर्तमान व भविष्य विषयक भयाचे निवारण करण्याविषयी सदैव तत्पर राहावे ही शुभकामना व्यक्त करण्याची सेवक इजाजत मागत आहे. उण्याअधिकाची क्षमा असावी. आमचे अगत्य असो द्यावे ही प्रार्थना लेखनसीमा।।

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

--
श्री. निलेश साठे

Wednesday, December 22, 2021

पुलंची मजेशीर पत्रे - ५

मं. वि. राजाध्यक्षांची कन्या मुक्ता एम.ए.ला. इंग्रजी हा विषय घेऊन पहिल्या वर्गात पास झाली. तिचं अभिनंदन करताना पुलंनी आपलं इंग्रजी फार गचाळ आहे असं सुचवीत अशा इंग्रजीची सुंदर नक्कल केली आहे.

My Dear Mukta

I was foning you for the last half hour to congratulate you on my behalf and on be/2 of my better/2 also, but no connexion yaar. So I said maro goli to this telephone and write letter. Fuss class in M. A. is no joke yaar. I never got it. To tell you privately, all bundle professors yaar, except your Bhai who is responsible for my great English... Offcourse I cannot write high English like you... High English has been a big stone in my way. Big stone means 'dhond'. Not capital 'D'. Capital 'D'-wallah Dhond* is your neighbour. Give my regards to him. For further details about dhond- not capital- kindly refer to your Bhai...

* राजाध्यक्ष यांच्या 'साहित्य सहवासा'त राहणारे प्राध्यापक म. वा. धोंड.


सोनल पवार 
संदर्भ: अमृतसिद्धी

पुलंची मजेशीर पत्रे - ४

श्री गणेशशास्त्री जोशी यांनी अमेरिकेचं वर्णन करणारं एक पत्र पुलंना संस्कृतमध्ये लिहून पाठवलं होतं. त्याला पुलंचं उत्तर घ्या संस्कृत तर संस्कृत. 'इरेस पडलो जर बच्चमजी !' पण ह्या पत्रातलं संस्कृत तसं ठाकठीक आहे हे लक्षात ठेवायला हवं. (शास्त्रीबुवांनीच पुढं याची प्रशस्ती केली.) त्यातला काही भाग.

पुण्यपत्तनम् ४
एप्रिल ६, १९७४

स्वस्ति श्रीगणेशशर्मा जोशीमहोदयेषु गीर्वाणभाषापण्डितवरेषु, अतिविनम्रतया पादाभिवन्दनं कृत्वा संस्कृतभाषायामेव पत्रोत्तरलेखनचेष्टां करिष्यामि । जानाम्येतन्महाधाष्टम् । आङ्ग्लभाषाधारेणाभवन्मम संस्कृतभाषाध्ययनम् । यत्र 'रम्भोरु'- 'द बनाना ट्री-थाइड् वन्' भूता लुट् टु वॅलो वा । गीर्वाणभाषादेवता ममेदृक्शारूकं चेष्टितं दृष्ट्वा मां ममैवं पुरातनेन पादत्राणेन ताडयिष्यति ।...

'आपले सुंदर पत्र मी पुनःपुन्हा वाचले, मित्रांनाही वाचून दाखवलें' असं गणेशशास्त्रींना सांगून विनयानं पुल पुढं लिहितात :

किन्तु मम पत्रोत्तरपठनमीदृशं भवता कथमपि न करणीयं, देवभाषाभिमानधारकाः पण्डिताः शम्बूकं स्मृत्वा मम शिरश्छेदं कर्तुमुद्युक्ता भविष्यन्ति ।...

आशीर्वचनाकांक्षी,
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपाण्डे


सोनल पवार 
संदर्भ :अमृतसिद्धी

Friday, December 17, 2021

वस्त्रहरण नाटकाच्या १७५ व्या प्रयोगाला केलेले अध्यक्षीय भाषण

मछिंद्र कांबळी आणि गंगाराम गवाणकर यांचं लोकनाट्याचा बाज असलेलं धमाल विनोदी मालवणी नाटक म्हणजेच 'वस्त्रहरण'. पुण्यात रात्री प्रयोग होता. प्रयोग सुरू व्हायला फार थोडा वेळ बाकी असल्यावर कळालं की पहिल्या रांगेत पु.ल. देशपांडे, सुनिताताई, वसंतराव देशपांडे अशी दिग्गज मंडळी बसली होती. सर्वांना दडपण आलं होतं. प्रयोग उत्तरोत्तर रंगत होता. नाटक संपल्यावर पु.ल. देशपांडेंनी विंगेत येऊन गवाणकरांचं खूप कौतुक केलं. आणि चार दिवसांनी १९ ऑगस्ट रोजी पु.ल. देशपांडे यांनी गवाणकरांना पत्र पाठवलं. हे पत्र वस्त्रहरण च्या संपूर्ण टीमसाठी एक कलाटणी देणारं पत्र होतं. या पत्रातील दोन ओळी नाटकाच्या जाहिरातीत छापून आल्या. पु. ल. देशपांडे यांची मछिंद्र कांबळी ह्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली आणि त्यांच्या कौतुकाचे बोल नाटकास लाभले. नाटक धो धो धावले. 



ह्या नाटकाच्या १७५ व्या प्रयोगाला श्री. पु.ल. देशपांडे ह्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. त्यावेळी त्यांनी केलेले हे उत्स्फूर्त भाषण खाली ऐकू शकता.

Thursday, December 16, 2021

पुलंची मजेशीर पत्रे - ३

५ ऑगस्ट १९७८ रोजी 'भारतीय जीवन विमा निगम'च्या सोलापूरच्या नव्या शाखेचं उद्घाटन झालं. त्या उद्घाटन समारंभाची जाहिरात ऐतिहासिक मराठी भाषेत आणि खलित्याच्या रूपात केलेली होती.

सकल गुणालंकारमंडित राजमान्य राजेश्री श्रीयुत विमेदार स्वामी यांचे हुजुरास विनंती अर्ज ऐसाजे.

स्वामींचे उदार आश्रयेंकरून सोलापूर शहरी आमचा भला उत्कर्ष जाहला असोन सांप्रत काळी सुभे साताऱ्यामधील बिनीचा सन्मान शहर सोलापूर शाखेस लाभला हे स्वामीस विदीत आहेच...

अशा सुरवातीची आणि वळणाची ही जाहिरात संस्थेचे जनसंपर्काधिकारी श्री. रा. म. शिरोडकर यांनी पुलंना पाठवली. ह्या जाहिरातीची नोंद घेणारं आणि कोपरखळ्या देणारं पत्र 'अगस्त सव्वीस एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ख्रिस्तमास' या दिवशी पुलंनी पाठवलं. त्यातला काही भाग असा :

श्री मृत्युंजया विमाभवानी प्रसन्न

सकलगुणालंकारमंडित मानवयोगक्षेमचिंतानिवारक विमाप्रवर्तक राजमान्य राजेश्री रा.म. शिरोडकर यांचे चरणी माजी विमाधारक आणि सांप्रत विमाधारणकालातीत सेवक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचे विनम्र प्रणिपात... भारतदेशाचे भूतपूर्व अर्थमंत्री विद्वद्वर आणि परमश्रद्धेय माननीय सकलगुणालंकारमंडित श्रीयुत चिन्तामण द्वारकानाथ देशमुख महोदयांच्या कर्तृत्वेकरोन स्वदेशी भारतीय विमा निगमाची प्राणप्रतिष्ठा जाहली त्या उपरान्त प्रस्तुत निगमाने अकल्पित रीतीने कुटुंबप्रमुखाचे प्राणोत्क्रमण जाहल्यावर ओढवणाऱ्या संकटातून अवलंबितांना आधार देण्याचे आणि विशेषेकरोन निगमाच्या कारभाराची धुरा वाहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगक्षेमाचा भार वाहण्याचे जे कार्य चालवले आहे ते लोकविश्रुतच आहे. त्या जनसेवेचे कवतिक करण्याचा अधिकार प्रस्तुत पत्रलेखकाचा नसोन संबंधित क्षेत्रस्थ मातबरांचा आहे. सेवकाची मर्यादा सेवक जाणतो.

याच पत्रात 'मरोनी विमा पालिसीने तरावे' किंवा, 'विमाधारकें नित्य हप्ते भरावे,' 'देहे त्यागिता द्रव्यरूपे उरावे' - अशी 'आधुनिक संतवचनं 'ही दिलेली आहेत.

सोनल पवार 
संदर्भ : अमृतसिद्धी

Tuesday, December 14, 2021

सर्दी - पु. ल. देशपांडे

सर्दी हा एक मोठा चमत्कारिक रोग आहे. वास्तविक रोग म्हणवून घेण्याच्या लायकीचाही हा रोग नाही. ‘रोग’ ह्या शब्दालाही काही दर्जा आहे. दमा, क्षय वगैरे भारदस्त मंडळींनाच ही उपाधी लागू पडते. रक्तदाब हा मला वाटते एक नुसता विकार आहे. मधुमेह हा विकार आणि रोग ह्यांच्या सीमारेषेवर घुटमळणारा चाळीशी उलटलेला गृहस्थ आहे. पण सर्दी ही नुसतीच एक पीडा आहे. पूर्वी नथ-पाटली वगैरे ‘दागिन्यां’च्या सदरांत मोजत नसत, बाई म्हटली की नथ-पाटली आपोआप यायची, ठुशी, लमाणी हे दागिने! त्या दागिन्यांचे कौतुक व्हायचे-चौकशी व्हायची. एखाद्या बाईच्या हातांत पाटली आली तर मुद्दाम होऊन तिने आपला हात पुढे नाचविल्याशिवाय तिथे कुणाचे लक्षच जात नसे.

सर्दीचे असेच आहे. हा रोग, रोग ह्या सदरांत येत नसल्यामुळे त्याचे कौतुक अगर चौकशी होत नाही. आपल्याला सर्दी झाल्याबद्दल सहानुभू
ती मिळत नाही. वास्तविक खऱ्या सहानुभूतीची आवश्यकता असते ती असल्या चिल्लर वाटणाऱ्या पीडांच्या बाबतीत! मान धरलेला इसम (आपोआप! दुसऱ्या कुणी नव्हे) हे इंद्रिय-गोचर सृष्टींतले माझ्या मते सर्वात करुण दृश्य! जेव्हा मान आखडते किंवा धरते तेव्हा माणसाच्या खऱ्या नाड्या आखडतात. तो खुळ्यासारखाच दिसायला लागतो. त्याचे एकूण व्यक्तिमत्वच कांहीच्या कांही होऊन जाते. परंतु ह्या प्रकरणांत सगळ्यांत दुःख असते ते सहानुभूतीच्या अभावाचे! कुणाला आस्थेने आपली मान धरल्याचे सांगावे आणि परिणामी त्याच्याकडून एखादी क्षूद्र कोटी किंवा ‘कोयता ओढा’, ‘पायाळू माणसाची लाथ खा’ असला कांही तरी आचरट इलाज ऐकायला मिळतो.

सर्दीचं असंच आहे. सर्दी का होते हेही कळत नाही आणि कां बरी होते हेही कळत नाही. औषधांनी ती बरी होत नाही हे मात्र निश्चित!

मान धरलेला माणूस आणि सर्दी झालेला माणूस ह्यांच्या दर्शनात मात्र खूप अंतर आहे! मान धरली की चेहऱ्यावर एकाएकी दैन्य येते. चेहरा कितीही उग्र असो, मिशांचे चढलेले आंकडे असोत, एकदां मान धरली की सारी जरब, सारा रुबाब, कडवेपणा कुठल्या कुठे पळून जातात आणि खर्चाशिवाय खटला काढून टाकल्यावर दिसणाऱ्या वादीसारखा माणूस गरीब दिसायला लागतो. सर्दीचे तसे नाही. सर्दीमुळे माणसाच्या चेहऱ्यावर एक व्यक्तिमत्व येते! गोरी माणसे सर्दी झाल्यावर अधिकच रुबाबदार दिसतात आणि गोऱ्यापान तरुणींना तर सर्दीमुळे निराळीच कांती येते! गर्भकांतीचे कौतुक सर्वांनीच केले आहे. परंतु शिंकेने हैराण झालेल्या युवतीच्या सौंदर्याची सर फक्त रुसव्यापोटी निघालेल्या रडण्यांतल्या सौंदर्यालाच आली तर येईल.

माणसाप्रमाणेच सर्दीला बाल्य-यौवन-वार्धक्य वगैरे असते. म्हणजे पहिल्या दिवशींची सर्दी अवखळ असते. फटाफट शिंकाच काय येतात, घसाच काय खवखवायला लागतो. ही बाळसर्दी आपल्याला एका जागी बसूं देत नाही. एकाएकी तहान लागते, तपकीर ओढावीशी वाटूं लागते, कडकडीत दुधांत हळद घालून प्यावेसे वाटूं लागते. परंतु हळूहळू तिच्यांतही एक प्रौढत्व येते आणि मग ती गंभीर होते आणि आपल्यालाही गंभीर करते. आपली छाती वाजूं लागते. छातीत नुसत्याच खर्जाचे तंबोरे ठेवल्यासारखे वाटायला लागते. डोके काठोकाठ भरलेल्या माठासारखे जड होते. किंवा खांद्यावर एरवी डोक्याचे वजन कधी भासत नाही ते भासूं लागते आणि नकळत आपल्या चेहऱ्यावर एखाद्या तत्त्वज्ञाची गंभीर कळा येते. एखाद्या विद्वान अध्यक्षाला व्यासपीठाकडे नेताना तालुक्याच्या गावांतल्या बालोत्तेजक किंवा तरुणोद्धार मंडळाच्या चिटणीसाचा चेहरा जसा एकदम गंभीर होतो किंवा सुपरवायझर वर्गात शिरले की शाळामास्तराच्या चेहऱ्यावर जसे अगतिकता आणि गांभीर्य यांचे चमत्कारिक मिश्रण लागते तसे कांहींसे आपण दिसायला लागतो. हे गांभीर्य सत्वगुणी नसते, त्याची मुळे तमोगुणांत शिरलेली असतात. हे गांभीर्य आपल्या चेहऱ्यावर लादलेले असते. अवघडलेल्या मानेच्या माणसाची मान ताठ असून जशी ताठ नसते तद्वत् सर्दी भरल्यामुळे चेहऱ्यावर आलेले गांभीर्य ‘इमिटेशन’ गांभीर्य असते. असल्या माणसाकडे पाहिले की आपली दर्शनी फसवणूक होते. परंतु तो बोलायला लागला की त्याच्या आवाजावरुन त्या गांभीर्याच्या झिरमिळ्यांचा जर खोटा आहे हे आपल्याला लगेच उमगते. बाकी ही देखील एक मौजच आहे. दातांची नवी कवळी बसवलेला म्हातारा काय विलक्षण तुकतुकीत दिसतो! विशेषतः दंतवैद्याच्या नजरचुकीने चेहऱ्याचा ठसाच बदलून टाकणारी कवळी बसवली जावी म्हणजे तर चेहऱ्याच्या मुळच्या सुरकुतलेल्या रेषांना पार इस्त्री होऊन गाल चांगले ताणून गेलेले असतात. पण हे सारे तोंड उघडेपर्यंत! एकदां असल्या इसमाने तोंड उघडले की ह्या साऱ्या तुकतुकीचे कारण चटकन उघडे पडते. सर्दीचे गांभीर्य असल्याचे जातीचे!

पण सर्दीची तिसरी अवस्था मात्र आस्वादाचे व्रत शिकवण्यासाठी जन्माला येते. ह्या अवस्थेत घ्राणेंद्रियांचा संप सुरू होतो. पोळी खाल्ली काय किंवा तीन पैशाचे कार्ड खाल्ले काय कांही फरक कळत नाही. वासांच्या दुनियेतले हर्ष खेद मावळतात. पोपईची आणि आंब्याची फोड ह्यांतला फरक नष्ट होतो. अशा एका अवस्थेंत मी वसईच्या कोळीवाड्यावरुन सकाळी फिरुन आलो. किनाऱ्याला भराभर वजन बसवलेले मचवे लागत होते. त्यातून टोपल्या भरभरून तऱ्हेतऱ्हेची मासळी किनाऱ्यावर येऊन पडत होती. सुकायला टाकलेल्या बोंबलांचे आणि ‘सुकटा’च्या रांगांनी बांबूंचे ते मांडव बहरले होते. परंतु माझ्या डोळ्यापर्यंतच ते पोहोचत होते. नाकाल वर्दी नव्हती. चांगला तासभर मी तिथून हिंडत होतो पण एकदांही हातरुमाल नाकाशी गेला नाही. किनाऱ्यावर पसरलेल्या असंख्य जातींच्या माशांच्या रंगांशी, आकारांशी आणि ताजेपणाशी स्पर्धा करणाऱ्या मत्स्यगंधा तेथे होत्या. पण माझ्या हिशेबी त्या मत्स्यगंधा नव्हत्या, नुसत्याच कोळणी होत्या.

गंधसृष्टीने माझ्यापुढे लोखंडी पडदा टाकला होता. रामनवमीला रामाच्या देवळांत जाऊन नुसतेच कीर्तन ऐकू यावे आणि सुंठवडा मिळू नये अशी माझी अवस्था होती. माशांचे मासेपण माझ्या लेखी (नाकी?) तरी हरपले होते. मांदेली खाल्ली काय-पापलेट खाल्ले काय किंवा सुरणाच्या फोडी तळून खाल्ल्या काय, मला सर्व सारखेच होते. मला एकदम एक निराळाच साक्षात्कार झाला. सर्वत्र समभावाने पहाणाऱ्या संतांची परिस्थिती काय करुण होत असेल याची जाणीव मला त्यावेळी प्रथम झाली. तळलेले पापलेट आणि तळलेला सुरण दोन्ही मला सारखे? मला माझी कीव आली. जीवनांतला सारा आनंद विषमभावांत आहे हे त्यावेळी मला कळलं! ओढ्याचे जिवंत खळाळणें आणि सोडावॉटरच्या बाटलीचे फसफसणे ह्या मूलतः किती निराळ्या गोष्टी आहेत हे मला तिथे उमजले.

नाद, रंग, रस आणि गंध ह्यांनी आपल्यावर काय अपार उपकार केले आहेत याची पहिली जाणिव माझ्या संपावर गेलेल्या नाकाने दिली. चौपाटीवरची भेळ चौपाटीवरच कां चांगली लागते ह्या मागले गूढ मला उकलले. तिथे लाटांचा नाजुक आवाज असतो, मावळत्या सूर्याचे रंग असतात, ओलसर वाळूचा स्पर्श असतो, अंगावरुन जाणाऱ्या अनोळखी रेशमी साडीची सळसळ असते आणि त्याशिवाय मग भेळ असते! म्हणून ती भेळ चांगली! युरेका! हे सारं निरनिराळेपण आपल्याला दिसतं, आपल्या कानावरुन जातं, आपल्या नाकाशी ओठाशी घोटाळतं म्हणून ह्या साऱ्या धडपडीला अर्थ येतो, छे छे! मखमालीची लव वठतां कामा नये—डोळ्यांत आंसू हवेत ओठावर हांसूं हवे—आणि ह्या साऱ्यांच्या वृंदवादनांत झपूर्झाही हवा!

मला एकाएकी वासाची ओढ लागली. खरपूस बाजरीच्या भाकरीचा वास, दुपारच्या झोपेतून उठलेल्या बालकाच्या अंगाचा वास, नव्या पुस्तकाचा वास, हळदीचे पान टाकून कढवल्या जाणाऱ्या लोण्याचा वास, घरांतले हळदीकुंकू आटोपल्यावर दिवाणखान्यांत रेंगाळणारा वास, गुऱ्हाळांतला वास, गोठ्यांतला वास, गाभाऱ्यांतला वास,.... माझ्या प्रत्येक श्वासाने नवा वास घेतला आहे. वास नष्ट होणे सारखेंच!

साधे साधे वास आपल्याला कुठल्याकुठे घेऊन जातात. अजूनही नव्या पुस्तकाचा वास मला माझ्या मराठी शाळेत घेऊन जातो. पुष्कळदां पूर्वी येत होता तसला वास येत नाही नव्या पुस्तकाला आणि आपल्याला फसल्यासारखे वाटते! बदलत्या साहित्याने पुस्तकांचे वासही बदललेले दिसताहेत! बाकी शब्दांनाच जर वास असता किंवा घाण असती तर साहित्याचे मूल्यमापन फार सोपे झाले असते. पण जिव्हाळ्याच्या शब्दांना वास असतो. नाही असे नाही. स्पर्श देखील असतो. अजूनही कोणी उभ्याउभ्या जरी मला “चिरंजीव हो” असा आशीर्वाद दिला तरी मला पाठीवरून हात फिरवल्यासारखा वाटतो. पण खराखुराच जर का वास असता शब्दांना तर भलतीच आफत झाली असती. कागदी शब्दांना कागदी फुलांसारखा वासच आला नसता आणि फुलराणीसारखी कविता उघडल्याबरोबर घमघमाट सुटला असतां. बाकी डोक्यांत भलतीच सर्दी शिरलेली नसली तर अजूनही तो वास येतो. ज्ञानेशाची ओवी कानावर पडली किंवा पंतांची आर्या खणखणली की उदबत्तीचा सुगंध ठेवून गेल्याशिवाय रहात नाही. अशा वेळी विचार येतो की ह्या नव-कविता कसला सुगंध ठेवून जातात? पण सुगंधाचा ठेवा हा कांही विचार करुन सांपडत नसतो. सुगंधाची खरी गंमत-खरा लुत्फ तो नकळत भेटतो तेंव्हा! कल्पनाही नसते आणि आपल्याला वास येतो. वास घेण्यापेक्षा वास येण्यांत आनंद आहे. पूर्वीच्या काळी बायका ठेवणीच्या लुगड्यांत वाळा घालून ठेवीत आणि मग सणासुदीला त्यांनी ट्रंक उघडली की अनपेक्षितपणे तो वाळ्याचा वास दरवळायचा. काव्याचा वास देखील असाच दरवळला पाहिजे! अलीकडे कित्येक वर्षांत असा वास ठेवून जाणारी कविताच वाचली नाही. ह्या नवकवितांनाच वास नाही की माझ्या नाकांत सर्दी भरली आहे देव जाणे! कदाचित् नव्या सुगंधाचा मला साक्षात्कार नसेल. मला देवळांतल्या गाभाऱ्यांतल्या मशालीच्या जळक्या कपड्याचा वास आवडतो पण मशीन पुसायच्या कापडाच्या चोथ्याचा वास माझ्यावर कांही संस्कार उठवून जात नाही. नवी गंधसृष्टी समजायला मला वाटते ह्या वासांची नाकाला सवय हवी! माझे नाक आतां जुने होत चालले, त्याला ओढ आहे ताज्या शेणाने सारवून हिरव्या झालेल्या जमीनीच्या वासाची! सिमेंटच्या वासांतून ते बिचारे फुलत नाही. आम्ही शहरची वस्ती सोडून एका बाळबोध गावांत राह्यला गेलो होतो. टुमदार गांव होते. सुसंस्कृत होते, कलाप्रिय होते, पण आम्हाला घर मिळाले ते शेणाच्या जमिनीचे! माझ्या पत्नीने पहिल्या दिवशी घर सारवले आणि शेणाने भरलेल्या हातांनी ती भिंतीला टेकून आपली कर्तबगारी पहात उभी राहिली होती. त्या ताज्या गोमयाच्या गंधाची त्या दर्शनाला साथ मिळाली होती. आणि म्हणून माझ्या नाकांत सारवलेल्या जमिनीच्या वासाला एक मनोहर आकार आहे! तो गंध नाही. गंधाची कन्या आहे. अजूनही मला तो वास आला की त्या वासाची सौभाग्यवती मूर्ती माझ्यापुढे रहाते! पुराणांत कुणी योजनगंधा होती म्हणतात. कित्येक योजने दूर असली तरी म्हणे तिचा वास येत असे. रेल्वेने जातांना देहूरोड गेले की पुणे दरवळायला लागते. ह्या नुसत्या वासांच्या आठवणींनी मी हिंदुस्थानांतल्या हिंदुस्थानांत तरी खूप भटकून येतो!

आज मात्र माझी पंचाईत झाली आहे. मी तऱ्हा तऱ्हा करुन पाहिल्या, पण माझे नाक ऐकायलाच तयार नाही. मी सकाळी उठलो आणि ब्रशवर पेस्ट ओतली. दांत घांसले, वास नाही. चहा प्यालो, पत्ता नाही. सिगरेट ओढली, जळकी काटकी ओढल्याचा भास झाला. जेवलो, भाजी, आमटी, भात आणि ताज्या माशाचे तळलेले तुकडे. कांही फरक नाही. पान खाल्ले. ते आंब्याचे किंवा केळीचे असते तरी चालले असते. सुपारी आणि कातरलेले लाकूड मला आज सारखेच! सर्वत्र समभाव, संतांची दृष्टी नसली तरी संतांची जीभ मला लाभली होती. आस्वादाने अन्न भक्षण करणाऱ्या, जाणिजे यज्ञकर्म म्हणून पोटातल्या वैश्वानराला आहुती टाकणाऱ्या संतांची रसहीन रसना! मला ती रसना नको आहे. सर्दीचा आणि संतांचा संसर्ग एकूण माणसांना उपयोगाचाच नाही. सर्दीचे गांभीर्यही नको, स्वादहीनता नको आणि संतांची तर समदृष्टी नकोच नको, त्यांना साऱ्याची चवच सारखी लागते एवढेच नव्हे तर सारे सारखेच दिसतात आणि सारे स्वर देखील सारखेच वाटतात म्हणे! अरे अरे अरे! माझ्या नाकांत जरी या क्षणी वास नसला, डोक्यांत जरी कांठोकांठ भरलेली सर्दी असली तरी अंतःकरणांत मात्र एकाएकी ह्या संतांविषयी विलक्षण कळवळा दाटला आहे! मात्र एक बारीक प्रश्न डोके वर काढतो आहे! संतांना आपल्याबद्दल कळवळा वाटतो म्हणतात तो कशासाठी मग?

लेखक - पु. ल. देशपांडे
नवाकाळ दिवाळी अंक 
१९५८

Monday, December 13, 2021

मोरोपंत - मराठी वाड़्गमयाचा गाळीव इतिहास

पंतांची दिनचर्या काय होती याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.परंतू पहाटे साडेचार वाजता उठून प्रातःकर्मे झाल्यावर ते उद्योगाला लागत असावेत.दुपारच्या भोजना पर्यंत शब्द नीट धरून अक्षरे सोडवून घ्यावयाचे अणि मग 'वदविला साच्या' जोडीला 'पदविलासाचा', 'वायसाराती' च्या जोडीला 'काय सारा ती', 'पद रमला' आणि 'पदर मला', ' न नाथ सा मान्य' आणि 'अनाथ सामान्य' अशा जुड्या बांधून ठेऊन द्यायचे.अशा चारपांचशे जुड्या झाल्या की त्यांचे साॅर्टिंग करून एकशेआठ रामायणापैकी कुठल्या रामायणात कुठली बसते हे पाहावयाचे.('वाहतो ही आर्यांची जुडी' असे एक नाटकही ते लिहिणार होते."वस्तूंत जसें हाटक काव्यीं नाटक..." अशी जुडी जमली होती.पुढे इतरां छंदी जाण्यापेक्षा त्यांना आर्याच बरी असे वाटले असावे.)दुपारच्या भोजनानंतर तासभर विश्रांती घेत. 

विश्रांतीच्या वेळी करमणुकीसाठी ओव्या,भुजंगप्रयात,वसंततिलका वैगेरे छंदात आख्याने वैगेरे पडल्या पडल्या लिहून काढीत. विश्रांती झाली की पुन्हा सकाळच्या यमकांच्या जुड्या उलगडून आर्या पु-या करीत. संध्याकाळी पुराण सांगून झाले की जरा फिरून येत. तिथेही करमणूक म्हणून श्लोक वैगेरे रचित. पुढेपुढे दुकानदारांशी वैगेरेसुद्धा ते आर्येतच बोलत. क्वचित प्रसंगी दुस-याने उच्चारलेल्या शब्दांचा अर्थ समजण्यात घोटाळा होई. भाजीवालीला टोपलीत काय आहे हे विचारल्यावर ती "भोपळा" म्हणाली आणि पंतांना वाटले, "भो पळा" असे ती फणका-याने म्हणाली,म्हणून पळू लागले.शेवटी घरी आल्यावर भोपळ्याची फोड चुकली हे त्यांच्या ध्यानी आले.एकशेआठ रामायणे,अनेक महाभारते,भागवताचा दशमस्कंध शिवाय शंभरसव्वाशे फुटकळ आख्याने,इतके रचावयाला गेला बाजार शब्दांच्या सहस्त्र कोटी जुड्या बांधाव्या लागल्यामुळे त्यांच्या कानी शब्द आला की त्याचे यमक उभे राही. "कसे काय पंत "? म्हटले की "बरे आहे" म्हणण्याऐवेजी संत,खंत,दंत,हंत असे काहीतरी सुरू व्हावयाचे.मग पोरीबाळी "पंतकाका, आम्हाला गाणे, आम्हाला गाणे" करून मागे लागत. त्यांच्यासाठी येताजाता,झोपाळ्यावर वगैरे म्हणावयाला गाणी करून देत. झोपण्यापूर्वी एक हजारबाराशे आर्या करून झोपत. 

आजही बारामतीस, त्यांच्या लक्षावधी आर्यांपैकी एकीचाही कोणाला फारसा पत्ता नसला तरी त्यांचे राहते घर दाखवितात.मात्र "बारामती कशाबद्दल प्रसिद्ध आहे ?" ह्या प्रश्नाचे उत्तर "सहकारी साखर कारखान्यांबद्दल" असे लिहिले तरच मार्क मिळतात, हे लक्षात ठेवावे.

Wednesday, December 8, 2021

ज्ञानोबा तुकोबांनी उजळविलेले हे मनाचे कोपरे - पु.ल.

पुलंचा एक किस्सा आहे. ते एकदा म्हणाले होते की "ज्ञानेश्वर, तुकारामांचा मला खूप राग येतो. त्यांनी ओव्या, अभंगातून आमच्यावर खूप संस्कार केले, अंधारलेले मनाचे कोपरे उजळून टाकले. त्यामुळे गरीब असहाय्य कुणी दिसले की मन अस्वस्थ होते." 

त्यांनी एक प्रसंग सांगितला "सत्तर, ऐंशीच्या दशकात ताजसारख्या फाईव्ह स्टार हॉटेलात फक्त श्रीमंताचीच मिरासदारी होती. तेथून जाताना लांबूनच हेच ते ताज हॉटेल असं आपण सोबतच्या माणसाला सांगायचो. मात्र एकदा एक श्रीमंत मित्रामुळे ताजमध्ये जायचा योग्य आला. वेगवेगळ्या डिशमधील पाच पन्नास पदार्थ पाहून अचंबा वाटला.

मोठमोठ्या भांड्यात चिकन रस्सा, मटण मसाला, तळेलेले फिश, तंदुरी चिकन, रायते, वेगवेगळे बेकरी आयटम, चारपाच प्रकारचे आइस्क्रीम तेसुद्धा अनलिमिटेड, आपल्या हातांनीच हवे ते घ्यायचे ते ही हवे तितके सोबतीला हॉट ड्रिंक्स. त्या दिवशी कळलं स्वर्गसुख म्हणजे काय. चांगला चापून जेवलो. शॅम्पेनही डोक्यात उतरली होती. सुगंधी बडीशेप तोंडात टाकत टुथपिकने दात कोरत श्रीमंत दोस्ताबरोबर खाली उतरून रस्त्यावर आलो न आलो तोच भिकाऱ्यांची चार पाच पोरं "सायेब शेट पैसे द्या ना.." म्हणत वाडगी घेऊन आमच्यापुढे येऊन उभी राहिली. "ऐ चल भागे कुत्ते कहीं के!" मित्राने त्यांना फटकारले. ती गयावया करणारी पोर पाहून माझी झिंग मात्र जागीच जिरली. पापलेट पोटात कलमलू लागला. श्रीमंतांवर असल्या केविलवाण्या दृश्याचा परिणाम होत नाही, आपल्याला होतो. कारण ज्ञानोबा तुकोबांनी उजळविलेले हे मनाचे कोपरे."

- ज्ञानेश्वर सोनार
(मार्मिक साप्ताहिक)

Tuesday, December 7, 2021

पुलंची मजेशीर पत्रे - २

घटप्रभेचे कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूटचे डॉक्टर विजय कुलकर्णी यांच्याकडून पुण्याला परत आल्यावर पुलंनी त्यांना ऐतिहासिक बखरीच्या भाषेत पत्र लिहिलं त्याची नुसती भाषाच नव्हे, तर लेखनाची धाटणीही हुबेहूब ऐतिहासिक वळणाची आहे.

भीषग्वर्य राजमान्य राजेश्री विजयराव कुळकरणी यासी मुक्काम पुणे येथोन पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे याचा शिरसाष्टांग नमस्कार विनंती ऐसाजे लग्न जुळवणेची मोहीम फत्ते करोन स्वाऱ्या पुनश्च कर्णाटक देशी मजल दरमजल करीत कूच करत्या जाहल्या हे स्वदस्तुरच्या आज तारीख अठ्ठावीस मे ख्रिस्ती शक १९७९ रोजी हाती आलेल्या खलित्यावरोन कळले. परमसंतोष जाहला. आपण काज हाती घ्यावे व ते फत्ते होवो नये ऐसे होणे नाही. हातास सदैव येशच येश मग ते विवाह जुळविणेचे असो अथवा कुक्कुटाधिष्ठित पाककौशल्याचे असो. विवाह जुळवणेचे काज अति साहसाचे येविषयी संदेह नाही. हे तो साक्षात कुळजुळवणी तेथे कुळकरणी चातुर्यच हवे.... बहुत काय लिहिणे. आमचे अगत्य असो द्यावे. लेखनसीमा

- सोनल पवार 
संदर्भ: अमृतसिद्धी

Friday, December 3, 2021

पुलंची मजेशीर पत्रे - १

मुंबईचे ना कुलकर्णी यांनी मराठीच्या सांप्रतच्या रहासाबद्दल १२ डिसेंबर १९९० ला पुलंना लिहितात.

"आपल्यासारख्या ग्रेट पर्सनला असे फ्लिपंट पत्र लिहिल्याबद्दल सॉरी. पण इंग्लिश व हिंदी लँग्वेजेसच्या जॉईंट अँटँकमुळे मराठी लँग्वेजची जी बँड कंडिशन झाली आहे त्याबद्दलची माझी स्ट्रॉग फीलिंग्ज एक्सप्रेस करण्यासाठी मला बेटर मेथड स्ट्राइक झाली नाही क्षमस्व.

ही स्ट्रॉग फिलींग्ज कशाबद्दल ? तर,या दिवसा दूरदर्शनीय मराठीय कार्यक्रमांमध्ये तथा मराठीय समाचार पत्रांमध्ये तिलक, सावरकर, आदी फडतूस इसमांनी दिल्या असलेल्या मराठीय संग्यांचा प्रयोग कमी होत जाऊन राहिला आहे. तथा त्यांच्या बदल्यामध्ये हिंदी संग्यांचा प्रयोग बड्या पैमान्यावर सुरू होऊन राहिला आहे. "

या पत्राला लगेचच १८-१२-९० रोजी उत्तर लिहिताना पुलंनी एकच धमाल केली आहे :

"एकवीसमी सदीत मराठीचा माहौल अजिबच राहून राहणार आहे. भाषा ही सोसायटीच्या बिहेवियरवर डिपेंड करते. रहनसहनमध्ये फर्क पडला की, भाषेतही फर्क पडतो. मुंबईसारख्या भेलपुडी संस्कृतीत, तर राष्ट्रभाषा हिंदी (सियावर रामचंद्रकी जय) गुजराती, बिगर मर्हेटी श्रीमंतीपुढे संकोचून कोन्यात उभी राहिलेली मराठी तर सगळ्या भाषा घुलमिलाकर एक नवीच मर्हेटी तयार होणार आहे... पहिले माणूस टू माणूस भाषा कानावर यायची आता पेपरवाल्याचे मराठी, रेडिओवाल्यांचे मराठी, दुर्दर्शनवाल्यांचं मराठी अशी भाषिक घुसखोरी सुरू झाली आहे . त्याला एकच उपाय म्हणजे इतर भाषांचं बिनधास्त मराठीकरण करणं. हमारी आयडिया समझा क्या ? सुज्ञको अधिक सांगणेची गरजच नही."

ह्या पत्राच्या खाली 'भवदीय पु.ल. देशपांडे' अशी सही केलेली आहे आणि सहीखाली कंसात लिहिलं आहे, “आमच्या नावातच मराठी देश आणि हिंदी पांडे आहे हेही ध्यानी यावे.”

- सोनल पवार
संदर्भ- अमृतसिद्धी

Thursday, December 2, 2021

‘पुल’कित संध्याकाळ - योगेश कोर्डे

पुलंच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्रात आणि परदेशातल्या महाराष्ट्र मंडळात विविध कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. पुण्यात लहानपणी ते जिथे राहायचे त्या जुन्या वाड्यात एका छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्याचे ठरले.पु.लं चा हा सत्कार समारंभ ‘व्यक्ती आणि वल्ली प्रतिष्ठान’ तर्फे आयोजित केला गेला होता. यातले सदस्य दुसरे तिसरे कुणी नसून पु.लं च्याच ‘व्यक्ती आणि वल्ली’.

 या वाड्यात हा समारंभ आयोजित करण्याचे दुसरे कारण म्हणजे हरितात्यांना ते सोयीस्कर होणार होते. जुन्या आठवणी पुराव्यानी शाबीत करायला ते उत्सुक होतेच. या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवताना सेक्रेटरी म्हणून बापू काणेची निवड बिनविरोध करण्यात आली कारण तो सेक्रेटरी म्हणूनच जन्माला आला होता. मदतीला होता तो नारायण. पु. लं चा सत्कार म्हणजे घरचं कार्यं आणि स्वयंसेवकगिरी तर त्याच्या रक्तात भिनलेली. समारंभासाठी काय काय लागणार हे नारायणास ठाऊक असल्याने बापू त्यास पुण्यातल्या गल्ली बोळांत पिटाळणार होता. चितळे मास्तर आणि अण्णा वडगावकर यांना खास निमंत्रण होते. सखाराम गटणे मध्ये पुरेसा आत्मविश्वास कोंबून त्याला भाषणाला उभे करायचे ठरले. तांदळातून खडे निवडावे तसे त्याने थोर साहित्यिकांच्या पुस्तकांतली वाक्ये टिपून घेण्यास सुरुवात केली. बुद्धीजीवी लखू रिसबूड ला बापू नी पेपरात कार्यक्रमाची जाहिरात छापण्यास सांगितले. ती कुठल्या मथळ्याखाली आणि कशी छापायची या विचारात लखू गर्क झाला. या वेळी मात्र त्याने कुरबुर केली नाही. पु.लं च्या सत्काराची जाहिरात छापायची म्हटल्यावर लखूला प्रथमच MA झाल्याचं सार्थक वाटलं. कार्यक्रमानंतरचं परीक्षण तोच लिहिणार होता आणि तेही कुठल्याही पगाराची अपेक्षा न ठेवता. ‘तो’ ला कार्यक्रमाची माहिती कळविण्याची गरज भासली नाही कारण ‘तो’ हा सर्वत्र असतोच. ‘तो’ जसा कुठेही उगवतो तसा इथेही उगवलाच. खरं सांगायचे झाल्यास ‘तो’ काहीच काम करणार नव्ह्ता फक्त चारचौघात बडबड करणार होता.

भय्या नागपूरकर मात्र कार्यक्रमाला कुठली शेरवानी घालायची आणि कुठले सुरवार नी चढाव वगैरे चढवायचे या विचारात गुंग झाला. पु.लं समोर फिल्मी गीत गावे की गझल हे त्याचे अजून निश्चित नव्हते. निमंत्रण पत्रिकांवर डिझाईन कोणते असावे हे ठरवण्याची जबाबदारी चौकोनी कुटुंबाची. पत्रिका सुबक, सुरेख, आकर्षक, सुव्यवस्थित आणि गुळगुळीत कशा करता येतील यावर माधवराव आणि मालतीबाई यांच्यात न भांडता विचारविनिमय झाला. बटाट्याच्या चाळीतल्या मंडळीना निमंत्रण द्यायला परोपकारी गंपू ला पाठविण्यात आले. सगळ्यांची विचारपूस करण्याची त्याला भारी हौस असल्याकारणाने गंपू ला तिकडे धाडण्यात आले होते. शेवटी एकदाचा कार्यक्रमाचा दिवस उजाडला…

पहाटेच्या यष्टीने अंतू बर्वा पुण्यात अवतरला. येताना ‘म्हस’ आडवी आल्याने त्याला यायला थोडा उशीर झाला होता.वाड्यात येताच अंतू ने बापूस हटकले... ”काणेंचा बापू ना तू?” “हो” ”झटक्यात ओळखले मी ! अरे तुझ्याशिवाय कां कुणी सेक्रेटरी होणारेय” बोलण्यात शक्य तितके अनुस्वार जाणून बुजून न वापरता अंतू बर्वा म्हणाला, “कशी काय कामं?”

“होत आहेत”, हातातला कार्यक्रमाच्या बजेटचा कागद डोळ्याखालून नाचवत बापू उत्तरला. इतक्यात लखू ला उद्देशून अंतूशेट ओरडले “पेपरातून जाहिरातीच्या अक्षता वाटल्याचे समजले हो SSSS ,पगार वाढवून क्षुद्र शब्दकोडी रचण्यापेक्षा हे उत्तम.”

”अंतूशेट, सखोल व्यासंग आणि परिश्रमाला अर्थ नसल्याने शब्दकोड्या सारख्या शुल्लक प्रकारांना साहित्यिक दर्जा देण्याचे काम करावे लागते.” नेहमीप्रमाणे लखू म्हणाला. एवढ्यात तिसर्याला बघून अंतू आत कुठेतरी अंतर्धान पावला. कार्यक्रमाची वेळ होत आली होती. नारायणावर चौफेर हल्ले होत होते. ज्याप्रमाणे त्याच्या अंगात आतापर्यंत लग्न चढायचे तसे आता सत्कार समारंभ चढला होता. खुर्च्या व्यवस्थित मांडल्या आहेत का; गालिचे नीट अंथरले आहेत का; हार फुले मागवली ती आली आहेत का; ही सगळी कामं तो निस्वार्थ पणे करीत होता.

हरितात्या कोपर्यात कुठेतरी गजा खोत आणि चार दोन मंडळींना घेऊन इतिहास जमा आले होते. ”अरे पुराव्यानी शाबीत करीन… असे महाराज सिंहासनावर बसलेले… गागाभट म्हणतायेत मंत्र...आणि हा असा राज्याभिषेक होतोय…मंगल वाद्ये वाजविली जातायेत..तोफांच्या आवाजांनी सह्याद्रीचे कडे निनादून सोडले जातायेत..आणि तुला सांगतो गजा, जिजाऊ माउलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहात होते… अरे पुरावा आहे.” काही वेळात आपल्या भल्या मोठ्या प्याकार्ड गाडीतून बबडू आला.एकंदरीत कार्यक्रमाची लगबग बघून म्हणाला – ”ह्या स्साला…कारेक्रमाचा मस्त जामानिमा केलाय हां…अरे आमच्या स्कालर चा वाढदिवस आज…आख्खा पुण्यात रोषणाई झाली पाहिजे..बेसनलाडू चा बेत आहे कां ? …साला घोसाळकर मास्तर जगला असता तर जख्खड म्हातारा झाला असता आज …डाइड झाला साला…” उगाच घोसाळकर मास्तर आठवून बबडू इकडे तिकडे वाड्यात फिरू लागला .

सखाराम गटणे ने भाषण मुखोद्गत केले होते. Drawing आणि ड्रील सोडून चितळे मास्तरांना सगळे विषय येत असल्यामुळे त्यांनी सखाराम ची उजळणी घेतली. अण्णा वडगावकर यांनी सुद्धा ‘माय गुड फेलो’ असे म्हणून गटण्याचे कौतुक केले. अपेक्षेला छेद न देता स्वच्छ धोतर नेसलेले माधवराव आणि नऊवारीतल्या मालतीबाई मुलांसमवेत आल्या. लोकांची गर्दी व्हायला सुरुवात होत होती. संध्याकाळ होत आली होती. तेवढ्यात पावणे सहा फुट उंच,निळ्या डोळ्यांचा,कुरळ्या केसांचा रुबाबदार नंदा प्रधान आला.तो येताच उपस्थित असलेल्या समस्त तरुणींच्या नजरा त्यावर खिळल्या. नाथा कामात त्या अगोदरच आला होता आणि एकशे ऐंशी कोनात मान फिरवून त्या तरुणींवर याने आपल्या नजरा स्थिर केल्या. एकीला बघून ‘सुषमा नेने’ असे काहीसे तो पुटपुटल्याचा नंदा प्रधानला भास झाला. पेस्तन काका खास taxi करून मुंबईहून पुण्याला आले होते आणि सगळ्या व्यक्ती वल्लींना भेटून ते म्हणाले,”भावसाहेब, कार्यक्रम हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होणार हाय.”

दोन वस्तादांपैकी तबलजी टिल्या वस्तादशी भय्या नागपूरकराने गट्टी जमवली व शेवटी गझल गायचे असे ठरवून आतल्या एका खोलीत रियाझ सुरु केला. गजा खोतानी त्याला स्वतःची कधीही न वाजवलेली नवी पेटी दिली. गज्याच्या आयुष्यात खूप दिवसांनी मजेचा दिवस येणार होता. ‘तो’ कसा आहे हे सर्व व्यक्ती वल्ल्लींना माहित होते त्यामुळे ‘तो’ ने त्यांना टाळून मुंबईहून आलेल्या बटाट्याच्या चाळीतल्या मंडळींशी हितगुज करायला प्रारंभ केला. एच्च. मंगेशराव यांना गाठून त्याने ‘हंसध्वनी’ या रागाबद्दल चर्चा सुरु केली. थोड्या अवधीतच ‘तो’ ने आपण एक नंबरचे बोगस माणूस आहोत हे पटवून देण्यात यश मिळवले. पु.लं न घ्यायला बबडू आपल्या लांबलचक मोटारीतून गेला.

पु.ल आणि सुनीताबाई आले. त्यांच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.वाडा पुरता सजला होता. कार्यक्रमाची एवढी सुंदर तयारी बघून दोघेही भारावून गेले. औपचारीकता कधीच नाहीशी झाली होती. सगळ्या मंडळींची पु.ल व सुनिताबाईंनी आस्थेने चौकशी केली. पहिल्यांदा गटणे ने इतक्या लोकांसमोर दणदणीत भाषण ठोकले. त्याने सुरुवातच मुळी जोरदार केली ”मराठी सारस्वतात आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने सोनेरी झळाळी प्राप्त करून देणारे, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आज इथे उपस्थित आहे …..” त्याच्या जीवनातला साहित्याचा बोळा केव्हाच दूर झाला होता पण त्याचे भाषण मात्र साहित्याप्रचुर आणि व्यासंगपूर्ण झाले. भय्या नागपूरकरने बेगम अख्तर यांची ”ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया…जाने क्यू आज तेरे नाम पे रोना आया...” ही गझल गायली. पुलं ना ती गझल फार आवडली.

सत्काराला उत्तर देताना पु.ल एवढेच म्हणले — ”अरे तुमच्या सारखी मंडळी माझ्या आयुष्यात आली आणि हे आयुष्य सर्वार्थाने मखमली झालं. जगात जिवंत माणसांपलीकडे बघण्यासारखं काही नाही.तुम्ही मला दिलेली ही प्रेमाची खुर्ची तुम्हीच घट्ट धरून ठेवलीये. ह्या प्रेमाच्या ऋणातून मला मुक्तता नकोय…अजिबात नकोय”. अंतू बर्वा आपले ओले मिचमिचे डोळे सद्र्याने पुसत होता. त्याचे ते खपाटीला गेलेले पोट पु.लं च्या नजरेतून पुन्हा एकदा सुटले नाही.

नंदा प्रधान म्हणाला –” भाई, तुम्ही आमच्या साठी एक कधीही न संपणारा अमृतकुंभ आहात. अहो तुम्ही नसता तर आम्हाला कुणी विचारले तरी असते का? चांगल्या वाईट गुणांचं संचित घेऊन, कपाळावर आठ्या मिरवत उद्याची चिंता वहात सदैव रस्त्याने खाली मान घालून चालणारी सामान्य माणसं आम्ही !! तुम्ही ती घराघरात पोहचवली…अजरामर केली. लोकं आमच्यामध्ये स्वतःचा शोध घेऊ लागली..’वैभव...वैभव’ म्हणतात ते याहून का वेगळं असतं !!” बोलट असो वा नामू परीट...सगळ्यांचे डोळे पाणावले होते. आपुलकीची व अव्याहत प्रेमाची ही शिदोरी घेऊन पु.ल आणि सुनिताबाई निघाले. काही वेळातच सगळी मंडळी एकमेकांचा निरोप घेऊन पांगू लागली ती पुन्हा भेटू या शपथेवरच !! संध्याकाळ ओसरून रात्र झाली होती. वाड्यात एका कोचावर नारायण निपचित पडला होता आणि एका खोलीत बापू काणे खर्चाचा हिशोब तपासात होता. बाकी सर्वत्र सामसूम होती.

योगेश कोर्डे
मूळ स्त्रोत --> http://yogesh-korde.blogspot.in/2013/02/blog-post_9527.html