Friday, August 12, 2022

स्वच्छ आरशासारखं आत्मचरित्र

वाचनाचं आणि माझं तसं फारसं बरं नाही. रोजचं वर्तमानपत्र मी घेतो. परंतु घरी, शेजारी, ट्राममध्ये सहप्रवासी आणि कचेरीत सहकारी यांना बातमी-दान करण्याच्या पुण्याखेरीज माझ्या पदरात फारसं काही पडत नाही. फक्त संध्याकाळी परत येताना मला ते जपून आणावं लागतं. त्यासाठी कचेरीभर शोधही करावा लागतो. संध्याकाळी परतल्यावर कुटुंबाचा “ पेपर कुठे?” हा प्रश्न चुकत नाही. ह्यात कुटुंबाच्या वाचनाविषयी गैरसमज होऊ नये. रद्दीत पैसे अधिक मिळतात असा तिचा भाव आहे. इतर पुस्तकंही अधूनमधून वाचतो. त्यातून नानू सरंजामे हा साहित्यिक बेनसन जॉनसन कंपनीत असल्यामुळं, इच्छा असो वा नसो, साहित्यात सध्या काय चाललं आहे ते रोज ऐकावं लागतं. कथाकादंबर्‍या मला रुचतात. कवितांचंही मला वावडं नाही. पण आत्मचरित्रांची मात्र मला थोडी धास्ती आहे. चरित्रनायकाचं बालपण बहुधा सारखंच असतं. बहुतेक चरित्रनायकांना मुन्सिपालटीच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागला आहे. बालपण गरिबीत घालवावं लागलं आहे. माफक चार आठ आण्यांची चोरीही करावी लागली आहे. प्लेगात तर त्याच्या घरची बहुतेक सगळी माणसं दगावतात. एका आत्मचरित्रात स्वतः आपणही दगावल्याचं कुणीसं लिहून ठेवल्याचं अंधुक स्मरतं. कादंबरीपेक्षा आत्मकथा लिहायला. अधिक कल्पनाशक्ती लागत असली पाहिजे. कारण सकाळी आपण कसली भाजी खाल्ली याची आठवण संध्याकाळी बहुधा नसते; आणि ह्या मंडळींना वयाच्या तिसऱ्या वर्षी घडलेल्या गोष्टी इतक्या संगतवारीनं सुचतात कश्या? की वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षीच पुढे आपण आत्मचरित्र लिहिणार याची जुळणी मनाशी झालेळी असते कोण जाणे. मला मात्र अशी नागमोडी वळणाची, चढउतारांची चरित्रं वाचण्यापेक्षा अगदी सरळ, सडेसोट चरित्र वाचायची फार इच्छा आहे.

उदाहरणार्थ, चरित्रनायकाचं बालपण : माझा जन्म एक जानेवारी एकोणिसशे सोळा साली झाला. माझ्या बालपणात तसं काही घडलं नाही. जन्मल्यापासून बाराव्या दिवशी माझं पुंडलीक असं नाव ठेवण्यात आलं. आईची प्रकृती ठणठणीत होती. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मला, आईला अगर माझ्या वडलांना कसलाही त्रास झाला नाही. मी पाचव्या बर्षी इन्फंटीत गेलो, दिलेले धडे निमूटपणं पाठ केले. हिशेब काही बरोबर व काही चूक येत. बरोबर हिशेबांना मास्तर “हो वर” म्हणत. चुकला की खालच्या मुलाला माझ्या कानफटीत मारायला लावून वर व्हायला सांगत. मी मॅट्रिक पास होईपर्यंत माझ्या वडलांवर कसलंही किटाळ आलं नाही. त्यांचा पगार दरवर्षी वाढायचा तेवढा वाढत गेला. मीही पास होत गेलो. मॅट्रिक झालो. पुढं बी०ए० झालो. काही प्रोफेसर नीट शिकवीत; काही नीट शिकवीत नसत. पुढं नोकरी लागली. त्यातही वर्षाला पाच रुपये प्रमोशन व दोनशेचाळीसवर रिटायर हे निश्चित होतं. लग्न वेळच्या वेळी झालं. दाखवायला आणलेली पहिलीच मुलगी पसंत केली. लग्नानंतर चार मुली आणि दोन मुलगे झाले, वडील ऐंशी वर्षे जगले. मीही रिटायर होऊन दहा वर्षे झाली. आजार नाही. आयुष्यात एकदा मलेरिया, एकदा गालगुंड, एकदा टायफाइड, काही वेळा सर्दी, काही वेळा अपचन यापेक्षा रोग नाही.

असं स्वच्छ आरशासारखं आत्मचरित्र वाचायची फार फार इच्छा आहे.

- पु.ल. देशपांडे 
पुस्तक - असा मी असामी 
हे पुस्तक मिळवण्यासाठी खालील चित्रावर टिचकी मारा.

0 प्रतिक्रिया: