Monday, December 9, 2019

माझी आ‘पुल’की - मधुरा दातार

अष्टपैलू कलाकार आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या बहुरूपी पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल काही लिहिण्याइतकी मी फोठी नाही. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची अनेक रसिकांप्रमाणेच मीही एक चाहती आहे. एकदा संध्याकाळी कमला नेहरू उद्यानाजवळ मला पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई दिसले. त्यावेळी मी फक्त सात वर्षांची होते. आई-बाबांकडे हट्ट करत मी त्यांच्या पाठोपाठ गेले आणि त्यांना विचारलं, ‘तुम्ही पु. ल. देशपांडे ना? तुमचा निवडक पु.ल. हा कार्यक्रम मला फार आवडतो.’ तेव्हा काहीही ओळख नसताना त्यांनी आणि सुनीताबाईंनी मला आणि आई-बाबांना अगदी प्रेमानं त्यांच्या रूपालीमधल्या घरी नेलं.
       
मी दुसरीत होते. मला काहीच कळत नव्हतं. त्यांनी मात्र त्यांच्या स्वभावाप्रमाणे इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, की आपण आपल्या आजी-आजोबांशीच बोलतो आहोत, असं मला वाटलं. अगदी साध्या, सरळ, घरगुती गप्पा झाल्या. मी मराठी माध्यमात शिकते हे कळल्यावर, ‘बरं झालं. नाहीतर इंग्लिश मीडियममध्ये शिकणारी आजची मुलं आज गोकुळाष्टमी आहे, हे सांगताना आज लॉर्ड क्रिश्नाचा बर्थ डे आहे, असं सांगतात,’ अशी खास पु.ल. शैलीतली प्रतिक्रियाही दिली.

माझ्या प्रगतीपुस्तकावर ‘शाब्बास मधुरा!’ ही त्यांनी दिलेली कौतुकाची थाप आणि माझ्या वाढदिवसाला खूप मोठ्ठी हो, असा माझ्या वयाएवढा ‘ठ’ काढून पत्रातून दिलेला आशीर्वाद, या फक्त आठवणीच राहिल्या आहेत.
 त्यांच्या एका भेटीत माझ्या विनंती आणि आग्रहामुळे पु. ल. आजोबा आणि सुनीता आजींनी फोटो काढून घेण्यासाठीही संमती दिली. खरं म्हणजे सुनीता आजी कधी फोटो काढून घेत नसत. ‘आज तू मला माझे सगळे नियम तोडायला लाव,’ असं कौतुकानं म्हणत त्या फोटोसाठी तयार झाल्या.

मी दर वर्षी ८ नोव्हेंबरला त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या घरी जायचे. तेव्हा त्यांच्या घरात अनेक मोठ्या कलाकारांपासून सामान्यांपर्यंत साऱ्यांचीच गर्दी असायची. ते सर्वांशी आपुलकीनं बोलायचे. खरंतर आपुलकी या शब्दातच पु.ल. दडलेले आहेत. पुलंनी आपल्याला काय दिलं नाही? त्यांच्या प्रत्येक पैलूनं आपल्याला भरभरून आनंद दिला. आपल्या लिखाणातून त्यांनी मराठी मनाची अस्मिता जपली. अपूर्वाई, पूर्वरंग, बटाट्याची चाळ यांसारख्या अनेक पुस्तकांतून आणि ती फुलराणी, सुंदर मी होणार यांसारख्या नाटकांतून त्यांनी आपल्याला खूप काही दिलं आहे. ‘विधात्यानं तुमच्या प्रतिभेचा एक अवयव तुमच्या कानात बसवला आहे की काय,’ असं समीक्षक अरुण आठल्यांनी म्हटलं आहे. ती फुलराणी सारखं नाटक बघताना त्याची प्रचीती येते.

आजूबाजूच्या परिस्थितीचं, माणसाचं सूक्ष्म निरीक्षण करून, त्यातली विसंगती हेरून, त्यांनी ती अशा काही खास शैलीत सांगितली, की सारा महाराष्ट्र खळखळून हसला. त्या शैलीला विनोदाची झालर आणि त्या जातिवंत विनोदाला कारुण्याची किनार.

म्हणूनच त्यांनी ५० वर्षांपूर्वी लिहिलेल्या साहित्याची अपूर्वाई कणभरही कमी झालेली नाही. आज मी जेव्हा जेव्हा ‘हसले मनी चांदणे’, ‘कौसल्येचा राम बाई’, ही गाणी गाऊन

रसिकांची दाद मिळवते, तेव्हा पुलंची प्रकर्षानं आठवण होते. ‘गुण गाईन आवडी’ असं म्हणत मला प्रोत्साहन द्यायला आज ते नाहीत. आज १२ जून. पुलंना आपल्यातून जाऊन १७ वर्षं झाली; पण त्यांच्या नावामागे कैलासवासी हा शब्द लिहायला मन तयारच होत नाही. आजच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात नसती उठाठेव करणारी मंडळी पाहिली, की त्यांची खिल्ली उडवून हसत हसत डोळ्यांत अंजन घालायला पुलं हवे होते, असंच वाटतं.

मधुरा दातार
१२ जून २०१७
महाराष्ट्र टाईम्स

0 प्रतिक्रिया: