Friday, June 11, 2021

पुलंच्या सानिध्यात कोरोना काळात - आरती नाफडे

12 जून 2000 रोजी पु.लं. च्या आनंदयात्रेची सांगता झाली. पु.लं. चे शताब्दी वर्ष उत्साहात पार पडले. त्यालाही दोन वर्षाच्या वरचा काळ लोटला. पण मनाच्या खोल डोहात 'आनंदयात्री' स्थिर आहे.

परचुरे प्रकाशन मंदिर यांनी 'आनंदयात्री' हे पुस्तक 12 जुलै 2000 रोजी प्रकाशित केले. अप्पा परचुरे यांनी या पुस्तकातील लेखांचे संकलन केले. समग्र पु. ल. दर्शन वाचकाला लेखांच्या माध्यमातून झाले. कारण प्रत्येक लेख म्हणजे पु. लं. यांच्या बहुगुणाचा, व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या जीवनाचा आरसा आहे. आरशातलं प्रतिबिंब हे सजीव, तरतरीत, खर बोलणार व मनावर ठसणार आहे.

पु. लं. वरील लेख, भाषण, साहित्य वाचतांना त्यांच्या विनोदा मागील विचारवंत प्रकर्षाने आपल्याला जाणवतो. विनोदी लेखनाबद्दल आचार्य अत्र्यांनी फार मार्मिक वाक्य लिहून ठेवलं आहे. "आपल्याला हसविणारा विनोदी लेखक हा वेडा वाकड्या आणि वात्रट शब्दांच्या कोलांट्या उड्या मारणारा कोणीतरी उथळ आणि मूर्ख विदूषक नसून तो मानवजातीचा सर्वात मोठा उपकारकर्ता आहे.

मानवजातीला अशा उपकारकर्ता ची सध्याच्या परिस्थितीत नितांत आवश्यकता आहे. कोविड-19 च भूत आपल्याला कोलांट्या उड्या मारायला लावतं आहे. क्षणात हसू तर क्षणात रडू अशी तारेवरची कसरत सुरू आहे. आपलं स्वास्थ्य व हास्य हिरावून घेणाऱ्या या भुताला वठणीवर आणण्यासाठी भल्याभल्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना त्यात यश मिळो. पण आपल्या स्वतःला सांभाळण्याची आपली पण जबाबदारी आहे ना? कोरोनाच्या दडपणाखाली वावरतांना माणसाची मन:शक्ती अपुरी पडू लागली आहे. रोजच्या जगण्यातला आनंद, संवादातील हास्य, मोकळेपणा माणसातील सहवास या सगळ्याला तो पारखा होत चालला आहे. साधा हसला तरी कळत नाही समोर राक्षसी मास्क उभा आहे ना आपले कान पकडून. मग ते सात मजली हास्य तर दूरच राहिलं. मग गालातल्या गालात हसायचा आहे का? मनात हास्याची कारंजी उडवायची आहेत का? तर काढा बटाट्याची चाळ आणि घ्या वाचायला. मनाची मरगळ जाईल. आजूबाजूचे गंभीर वातावरण दिलखुलास करण्यासाठी पु. लं. सारखा उपकारकर्ता आपणास लाभला आहे. बटाट्याची चाळ हे हास्य नाट्य आपल्या जवळ असताना काय भीती आहे आपल्या जीवाला.

'गणगोत', 'व्यक्ती आणि वल्ली' पुस्तकाची पानं उघडल्यावर भाई आपल्यासमवेत आहेत हा दिलासा मिळतो. ते आता नाहीत असं म्हणण्याची कोणी हिंमत करणार नाही. ह्या कोरोनाच्या एकाकी काळात आपल्या सोबत कोणी आहे हा विचार फार बोलका वाटतो.

आपल्या जीवनातली समृद्धी फार अनमोल आहे. तुम्हाला मन रमवण्यासाठी संगीत फार मोलाचं कार्य करतं. तुमचा मूड बदलवतो. वाचन करून कंटाळा आला का मग आता श्रवणाच काम करा. आपले भाई इथे पण आपल्या मदतीला हजर आहेत. साहित्यिक असून संगीतात मनमुराद डुबलेले त्यांचे व्यक्तिमत्व अनाकलनीय आहे. पु.लं. चे हार्मोनियम वादन ऐकणे हा फार आगळा वेगळा आनंद आहे.

माणसाला मन रमवण्यासाठी सतत वेगवेगळे विषय लागतात. संगीताचा आनंद घेऊन झाला पुढे काय? एवढा मोठा हा काळ घरातच कसा काढायचा? कोरोना तर घरातच थांबायला लावतो आहे. चला तर मग आता पु.लं. ची नाटकं बघूया. पु.लं. नी जवळपास सोळा नाटकं लिहिली पण त्यांच्या एका नाटकाने अगदी अल्पावधीतच जिंकले. त्या नाटकाला उदंड यश मिळाले. मराठी रंगभूमीच्या इतिहासातील ते नाटक म्हणजे "तुझं आहे तुजपाशी" विनोदाने खच्चून भरलेलं नाटक पण प्रेक्षक अंतर्मुख होत असे. "ती फुलराणी" मनाचा वेध घेते. अशी नाटकं बघताना आपले तीन चार तास जातात पण जे साहित्य नंतर ही मनाला धक्के देतच रहात त्यांचं आयुष्य उदंड असत. म्हणूनच पु. लं. च्या विनोदी साहित्यावरील ध्वनिफीत ऐकण्याचा मनमुराद आनंद आपण घेऊ शकतो. व हास्य विनोदाचे तुषार आपल्याला सुखवीत असतात. नियमित प्रवास करणारे सहलींना जाणारे देश-विदेश चा फेरफटका मारणारे आता कोरोना काळात घरात बसून उबगले आहेत. जरा भटकंती करून येऊ म्हटलं तर बाहेर दांडा घेऊन आपले मामा उभे असतात व त्यांची अवज्ञा म्हणजे दांड्याला आमंत्रण. आता घरी स्वप्नरंजनात रंगून जगाचा फेरफटका मारायचा आहे तर बघा पु.लं. ची पुस्तक साद घालतात. अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा अशा प्रवासवर्णनातून ते आपल्याशी संवाद साधतात. निसर्ग व माणूस वाचायला लागतो आपण त्यांच्या वाचनातून. अरुणा ढेरे म्हणतात पु.लं.चं लेखन वाचताना माणसाला आपल्या रक्ताचा लाल रंग वाढल्या सारखा वाटतो. चार-दोन रक्तपेशी नव्याने निर्माण झाल्या आहेत असे वाटते. आता कोरोना काळात हेच तर आपल्याला अपेक्षित आहे. प्राणवायू विनोदी वाचनातून मिळतो का? याचा अनुभव खरच घेऊन बघायलाच हवा अगदी प्रत्येकाने.

आपल्या जीवनाचा असा एकही पैलू नाही जिथे पु.लं. स्पर्श नाही. आता बघा कोरोना काळात 'घर हे ची माझं विश्व म्हणत' आपला सगळ्यात आवडता विषय व पैलू म्हणजे खाद्यपदार्थ. या काळात खाद्यपदार्थांची नुसती रेलचेल. खाद्यपदार्थांची एक साखळीच रोज नव्याने घरोघरी पोहोचत होती. त्यात नवीन पदार्थांबरोबर जुन्यांना पण उजाळा मिळत होता. गृहिणींचे कौशल्य अगदी पणाला लागत होते. आधी पोटोबा. . . रिकामा वेळ सत्कारणी लागायला पाहिजेच ना. मग आमचे भाई 'माझे खाद्यजीवन' मधुन डोकावतात. भाई सांगतात अहो चिवडा सोलापूर पेक्षा कोल्हापूरचाच व तो पण छत्रे यांचा. भाई सांगतात "चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या 'रम' ला जी साथ दिली, ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली". भाईंनी लिहिलेलं हे वाचल्यावर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरले. त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हाताने चिवडा केला व त्याचा डब्बा पु.लं. ना पाठवताना एक आठवण सांगितली. यापूर्वी फक्त एकदाच असा चिवड्याचा डबा पाठवला होता लोकमान्य टिळकांना. लोकमान्य विलायतेला निघाले होते तेव्हा. भारताच्या सीमेवर भयानक थंडीत जीवाला वैतागलेला सैनिक कागद जाळताना अचानक 'माझे खाद्यजीवन' हा लेख हाती पडला व हे सारे खाण्यासाठी तरी मला जगलेच पाहिजे असा निर्धार करून उठला. तुमच्या लेखामुळे मला जगावेसे वाटले असे त्याने पत्र लिहून कळवले. जगण्याची उमेद वाढविणारे साहित्य या कठीण काळात परिस्थिती माणसाला नवजीवन देऊन जाईल हे मात्र खरंच. पु.लं. चे विनोद एकमेकात सांगणं व त्यावर हशा पिकवणं हे कुटुंबातील सदस्य खेळाचे स्वरूपात घेऊ शकतात. पु.लं. चे विनोद सांगायला सोपे असतात. त्यांचा प्रसार फार होतो. त्यांच्या अफाट लोकप्रियतेचा हा एक पैलू आहे.

कोरोना काळातील आपला उपकारकर्ता त्याच्या गुणसंपदेसह आपल्यासमवेत आहे. त्यांच्यातील आणखी एक दैदिप्यमान गुण बघू व आत्ताच्या घटकेला त्याचं महत्त्व जाणून घेऊ. सामाजिक कार्यात मोठमोठ्या देणग्या देऊन समाजाचे ऋण मान्य करणारा त्यांच्यासारखा लेखक आपल्यातीलच आहे. पु.लं.नी लिखाणातून व एक पात्री कार्यक्रमातून मिळालेल्या उत्पन्नातून अक्षरशा लाखो रुपये सामाजिक कार्याला वाटले.

कोरोनाच्या महामारी ने वैयक्तिक, सामाजिक व राष्ट्रीय जीवन फारच विस्कळीत झाले आहे. बाल, तरुण व वृद्ध सर्वांची आयुष्य पणाला लागली आहेत. त्यामुळे नव्या सामाजिक प्रश्नांना व आव्हानांना समोर जाऊन त्यांचे निराकरण करावे लागणार आहे. अशा वेळेस पु.लं. च्या दानशूरतेचा आदर्श एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. .आपल्या जवळ जो पैसा आहे त्यातूनच आपल्या कुवतीप्रमाणे दान करून सामाजिक बांधिलकी जोपासणे ही खरी निष्ठा व समर्पण आहे.

'आधी केले मग सांगितले' या उक्तीचा मतितार्थ लक्षात घेतला तर आता पुढील पिढ्यांसाठी आपले भाई फार मोठा व बोलका आदर्श आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.


आरती नाफडे
नागपूर  
भ्रमणध्वनी - ९०९६७२६७४९

0 प्रतिक्रिया: