Tuesday, August 31, 2021

कशाला लिहून गेलात ओ.. - (जयंत विद्वांस)

पु.ल. पुलंचं लिखाण पडद्यावर आणणं हे काम सोप्पं नाही. एकतर लोकांनी ते त्यांच्या तोंडून ऐकलंय त्यामुळे त्याचा अमिट ठसा लोकांवर आहे. प्रत्येकाने ते दृश्यं स्वरूपात स्वतःच्या कल्पनेत बघितलं आहे त्यामुळे त्यात काही कमतरता जाणवली की लोकांना ते भिडत नाही किंवा उपरं वाटतं. त्यांच्यावर लिहावं म्हटलं तर ते अजून अवघड काम आहे. त्यावर टीका करणं त्यातल्या त्यात सोप्पं आहे. मागे त्या वाचन परिक्रमेत 'हरितात्या' मधला काही भाग टाकला होता तेंव्हा वाटलं, आपणही लिहावं त्यांच्या वल्लींवर. पण एवढं सोपं नाहीये ते. डोळ्यातून जो पाणी काढू शकतो त्यालाच उत्तम विनोद करता येतो. कारुण्यं आणि विनोद ही विजोड पण एकत्रं नांदणारी जोडी आहे. कुठेतरी कारुण्याची डूब असल्याशिवाय विनोद अजरामर होत नाही. अर्थात प्रत्येकाची विनोदाची व्याख्या वेगळी आहे. अजिबात हसू न येणा-या, ज्यात विनोद कणमात्रही नाही अशा वाक्यावर लोक खदाखदा हसू शकतात तेंव्हा मला लाजल्यासारखं होतं.

पुलंच्या विनोदावर हसू फुटतंच. ते फुटावं म्हणून ना त्यांनी प्रयत्नं केलेत ना आपल्याला करावे लागत. खुदकन हसू फुटतं तो विनोद मला कायम आवडतो. पुलं काय पहिल्यांदा ऐकतोय का? पण मग का तरीही हसू येतं. सगळं माहित असतं. पुढचं वाक्यं काय आहे, विनोद आहे का कारुण्यं आहे तरीही होतंच ते. याचं कारण नुसत्या विनोद निर्मितीसाठी ते लिखाण नाही. माणूस आधी उभा राहतो मग बाकी सगळं येतं. सगळ्या वल्ली एकाच आयुष्यात प्रत्येकाला भेटणार नाहीत मग त्या अशा लिखाणातून सापडतात. माणसाला हेवा वाटला पाहिजे की अशी माणसं आपल्या आयुष्यात का आली नाहीत अशी माणसं त्यांनी उभी केली. सगळ्याच वल्ली विनोदी होत्या का? नव्हत्या. पण त्यांचे गुणदोष सांगताना पुलं विनोदाचं अस्तर लावतात. विनोद का आवडतो लोकांना? असंख्य अडचणी, त्रास यावर मात करत आपण जगत असतो. अशावेळी विनोद खूप कामाला येतो, क्षणभर सगळं विसरायला लावतो. आता गुगलवर विषयानुसार विनोद मिळतात पण म्हणून ते कुणी सलग वाचत बसत नाही हसण्यासाठी.

पु.ल. माणसातली वल्ली शोधतात आणि वल्लींमधला आतला 'माणूस' उभा करतात. जगात कोणीच शंभर टक्के गुणी नाही. पण आपण गुण बघावेत हा एकूणच पुलंचा गुण त्यामुळे त्यांनी न्यूनसुद्धा उल्लेखापुरतं घेतलंय. मगाशी रावसाहेब ऐकत होतो. हरितात्या, चितळे मास्तर, अंतू बर्वा, रावसाहेब, म्हैस या अवीट गोष्टी आहेत. कधीही ऐका. अनंतवेळा ऐकूनसुद्धा हसू येतं, रडू येतं. कधी वाटतं आपला मूड असेल त्याप्रमाणे ते होत असावं. पण तसं नाहीये. आनंद मिळावा, ताण कमी व्हावा म्हणून आपण पुलं ऐकतो. मग हा माणूस टचकन डोळ्यात पाणी काढतो तरी का ऐकतो आपण? ताण निचरा करण्याचे अनेक मार्ग आहेत. कुणी व्यसन करतं, कुणी मौनात जातं, कुणी राग राग करतं, कुणी शिव्या देतं. रडू येणं हा ताण निचरा करण्याचा चांगला मार्ग आहे खरंतर. लहान मूल पटकन रडतं त्याला तेच कारण असावं. आपण मोठेपण लादून घेतलं की खूप बंधनात वागतो. खदखदून हसत नाही, चारचौघात रडत नाही. पुलंचे मानसोपचार आहेत हे. मोकळं करतात ते आपल्याला. पुलंना रिपीट व्हॅल्यू आहे. नवीन पिढी त्यांना वाचते का नाही माहित नाही. कदाचित नसेलही कारण तो काळ त्यांच्या ओळखीचा नाही. पण त्याच्याशी मला काहीही देणंघेणं नाही. तर मूळ मुद्दा 'रावसाहेब'.

माणसांच्यात राहणं सवयीचं नसावं त्यासाठी. कोण कुठल्या वाटेने अर्ध्यात कधी हात सोडून निघून जाईल सांगता येत नाही. जागा भरल्या जातात त्या रिकाम्या झाल्या म्हणून, पण तीच माणसं त्या जागी असतात असं नाही. पुलंनी तरी वेगळं काय केलं. असेच निघून गेले पण रग्गड ठेऊन गेलेत म्हणा. 'शोले'चे डायलॉग जसे लोकांना पाठ आहेत तसे पुलं लोकांना पाठ आहेत. त्यांची व्यक्तिचित्रं अजरामर झाली. प्रत्येक व्यक्तीचं किंवा वल्लीचं काहीतरी लोकांच्या लक्षात आहे. अंतू बर्व्याच्या तोंडचं 'दारचा हापूस परत मोहरला नाही' असो नाहीतर मग रावसाहेब असोत. 'ते एक गच्ची बसतंय का बघा की'. 'ते अरुंधतीला थोडं लेडी सितारीस्ट करा', 'बाप बदला की ओ', 'आमचं वैनी काम करणार, सबनीसची पोरगी काम करणार'. संपताना काही तरी हलतं आतवर. मग उगाचच कधीही न पाहिलेले, दिसण्याची शक्यता नसलेले, नोकरावर ओरडणारे, विलायतखानसाहेबांचे पाय चेपणारे, स्टेज झाडणारे, चाल बदलली म्हणून नटावर चिडणारे, ट्रेनच्या डब्याजवळ 'कशाला आला होता रे बेळगावात' म्हणणारे 'रावसाहेब', आयुष्याच्या आणि दिवसाच्या संध्याकाळी कुत्र्याला कडेला घेऊन एकटे खुर्चीत बसलेले दिसतात आणि वाईट वाटतं. अस्पष्ट हुंदका फुटतोच, डोळे पाणावतात.

आणि मग रावसाहेबांसारखं ओरडावंसं वाटतं, 'कशाला लिहून गेलात ओ असं'...

-- जयंत विद्वांस

0 प्रतिक्रिया: