Saturday, October 2, 2021

गांधीजी - पु. ल. देशपांडे

महात्मा गांधी जन्मशताब्दी महोत्सवाच्या प्रसंगी केवळ भारतातच नव्हे, तर सार्‍या जगभर त्यांचे पुण्यस्मरण होत आहे. केवळ राजकारणी पुढारीच नव्हेत; तर गायक, नर्तक, चित्रकार, शिल्पकार सारेच जण शब्द, स्वर, रंग, रेखा, अभिनय ह्यांतून आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चालू शकलो नाही, हा त्यांचा दोष नव्हे. गांधीजींच्या चरित्राचे हे लेखन ही त्यांच्या चरणी वाहिलेली माझी लहानशी फुलाची पाकळी आहे. ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही, अशा मराठी वाचकांसाठी मी हे चिमुकले पुस्तक लिहिले आहे. भारतातले सुप्रसिद्ध चित्रकार मुरलीधरपंत आचरेकर यांच्या कुंचल्याचा जादूचा स्पर्श ह्या पुस्तकाला झाला. आता हे पुस्तक पाहताना मला असे वाटते की, आचरेकरांची चित्रेच इतकी बोलकी आहेत की, माझा मजकूर त्या चित्रांच्या बोलण्याच्या उगीचच मध्येमध्ये येऊ लागला आहे. त्यांनी श्रद्धायुक्त अंत:करणातून केलेले हे कार्य असल्यामुळे त्यांच्याबद्दल आभाराची भाषा वापरणे औचित्याला सोडून होईल. हे पुस्तक वाचल्यावर गांधीजींच्याविषयी अधिकारी लेखकांनी लिहिलेली चरित्रे वाचण्याची आणि त्यांचे तत्त्वज्ञान अधिक बारकाईने समजून घेण्याची इच्छा झाली, तर माझ्या ह्या लेखनकामाचे चीज झाले, असे मला वाटेल. हे चरित्र लिहिताना श्री. फ्रान्सिस फ्रेटस्‌ ह्यांनी मला केलेल्या साहाय्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे. 
पु.ल. देशपांडे 
________________________________
... शेगावला गांधीजींनी खेड्यातल्या लोकांचे जीवन त्यांच्यात राहून पाहिले. अनेक अनुभव आणि प्रयोग ह्यातून त्यांची खात्री पटली की, आपल्या देशातल्या मुलांचे प्राथमिक शिक्षण एखाद्या हस्तोद्योगातूनच झाले पाहिजे. एखादा हुशार सुतार नेमावा. पट्टीने मोजमापे घेण्याच्या निमित्ताने त्याने गणित शिकवावे. लाकूड कुठले आहे, कसले आहे हे सांगतांना भूगोल सांगावा. त्यातून थोडीशी झाडांच्या लागवडीची माहिती द्यावी आणि मग लाकडाची जी वस्तू बनवायची तिचा आराखडा, सुतारकीची हत्यारे वापरावयाची माहिती, हे सांगावे. म्हणजे सारे विषय हाताने विणलेले कापड, शेती किंवा सुतारकाम ह्यांच्यासारख्या हस्तोद्योगांच्याच आधाराने शिकवावेत. ह्या शिक्षण पद्धतीला 'बेसिक शिक्षण' किंवा 'जीवन शिक्षण' म्हणतात. आजवरचे शिक्षण हे पोपटपंचीचे शिक्षण झाले. आता शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही श्रमांची सांगड घालून शिक्षण द्यावे, हा शिक्षणाच्या क्षेत्रातला संपूर्णपणे नवा विचार गांधीजींनी मांडला. वर्ध्याला अखिल भारतीय शिक्षण परिषद भरली. त्यात हे प्राथमिक शिक्षण सरकारने फुकट दिले पाहिजे, असा विचार गांधीजींनी मांडून सरकारला धक्काच दिला. गांधीजींची प्राथमिक शिक्षणात नवा बदल घडवून आणण्याची सूचना मान्य झाली.

वर्ध्याची शिक्षण परिषद संपल्यावर लगेच त्यांना कलकत्याला जावे लागले. काही राजकीय कैद्यांवर हिंसाचाराचा आरोप करुन त्यांना तुरूंगात डांबून ठेवले होते. रात्रंदिवस खटपट करुन गांधींनी त्यांची सुटका करुन घेतली. पण ह्या परिश्रमांनी त्यांची प्रकृती फारच बिघडली. नोव्हेंबरच्या सुमारास ते कलकत्याहून परतले, त्यावेळी तर ते फारच क्षीण झाले होते. डॉक्टरांचा सल्ला न मानता ते त्या राजबंद्यांच्या सुटकेसाठी धावले होते. शेवटी जेव्हा प्रकृती फार खराब झाली, तेव्हा विश्रांतीसाठी मुंबईतल्या जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर आपल्या एका मित्राच्या टुमदार बंगलीत ते गेले. ह्या किनाऱ्याची शोभा, १९२५ साली ते तिथे राहिले, त्यानंतर फार बदलली होती. किनाऱ्यावर पूर्वी अजिबात वस्ती नव्हती. तिथे आता श्रीमंतांनी मोठमोठे बंगले उभारले होते. पूर्वीच्या काळातली होती ती अफाट पसरलेली वाळू आणि तो विशाल पश्चिम समुद्र. मनाला शांती देणाऱ्या ह्या दोनच गोष्टी होत्या. तिथे त्यांच्या प्रकृतीत खूप सुधारणा झाली. थोडेसे ताजेतवाने होऊन ते शेगावला परतले. पण आता साऱ्या जगापुढेच एक भीषण संकट येऊन
उभे राहिले होते. हिटलरने आपल्या पाशवी अत्याचारांनी युरोपला त्राहि भगवान करायला सुरुवात केली होती. गांधीजी ह्या नव्या संकटाकडे निर्भय नजरेने पाहू लागले. हिटलरच्या टाचेखाली तुडवल्या जाणाऱ्या झेकोस्लोव्हाकियातील जनतेला त्यांनी दोन जाहिर पत्रे पाठवली. त्यात 'हिटलरचा अहिंसात्मक मार्गांनी प्रतिकार करा,' असा संदेश पाठवला होता. नाझी अत्याचाराला बळी पडणाऱ्या पददलित ज्यू लोकांचा उल्लेख 'ख्रिस्ती समाजातले अस्पृश्य' असा केला होता. म्यूनिख कराराला गांधीजींनी 'स्वाभिमान शून्य तह' असे म्हटले होते. 'लोकशाही आणि हिंसा एकत्र नांदूच शकणार नाहीत. जगाला केवळ अहिंसाच विनाशापसून वाचवू शकेल,' हे त्यांचे ठाम मत होते.

गफारखान्यांच्याबरोबर त्यांनी सरहद्द प्रांताचा दौरा केला. सरहद्द गांधींचे कार्य पाहून महात्माजींना अतिशय समाधान वाटले. तिथल्या पठाणांची 'खुदाई खिदमतगार' (देवदास) ही अहिंसेच्या आधारावर उभी केलेली संघटना पाहिल्यावर त्यांना वाटले की, जे इथे प्रत्यक्षात घडत आहे, तसेच इतरत्र देशातही घडावे. हाच वारसा सर्वत्र चालू राहिला पाहिजे. रक्तपिपासू युद्धखोरांपुढे निर्भयतेने उभी राहणारी शांतिसेनाच जगाला तारील, अशी गांधीजींची नितांत श्रद्धा होती. ह्याच सुमाराला त्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भेटायला आले होते. ऑक्सफर्ड
विद्यापीठात पौर्वात्य तत्वज्ञान शिकवण्यासाठी मोठ्या सन्मानाने त्यांना बोलावले होते. परदेशी जाण्यापूर्वी ते गांधीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. गांधीजींना ते म्हणाले की, "पौर्वात्य तत्वज्ञान शिकवायला, गांधीजी
तुम्ही मला जिवंत आधार आहात. एकेकाळी तिकडले मिशनरी इकडे येत. आता मनू पालटला. आता शांतीचे आणि अहिंसेचे तत्वज्ञान शिकवायला इथून आपले तत्वज्ञ जातील. जागतिक युद्धात तत्वासाठी भस्मसात होणे हे हिंसाचाराने जगण्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. तत्वभ्रष्ट होऊन जगण्यापेक्षा तत्वनिष्ठ राहून मरणे अधिक मानाचे आहे."

गांधीजींच्या परिवारात राधाकृष्णनांसारख्या महापंडितांना जितका मान होता, तितकाच उत्तम वहाणा करणाऱ्या चांभारालाही होता. हिंदी स्वातंत्र्याची चळवळ म्हणजे केवळ इंग्रजी राज्याचे जोखड फेकून देण्यासाठी नव्हती. हिंदी
संस्थानिकांची राजवट नाहीशी करणे आवश्यक होते. हे हिंदी राजेमहाराजे म्हणजे भारतीय वेषातले ब्रिटीश अधिकारीच आहेत, असे गांधीजींचे मत होते. नेहरूंनी तर ह्या आपमतलबी संस्थानिकांच्या हकालपट्टीची केव्हाच मागणी केली होती. आता सत्याग्रहाच्या चळवळीचे लोण संस्थानांतही जाऊन पोहोचले आणि ब्रिटीश
हिंदुस्थानातली जनता आणि संस्थानी जनता हा भेद नाहीसा होऊ लागला. हे राजेमहाराजे म्हणजे घरच्या म्हातारीला काळ होणारी ब्रिटीशांच्या ताटाखालची मांजरे आहेत, हे संस्थानी जनतेने ओळखले. संस्थानिकांची रिकामी मोटारगाडी गेली, तरी घाबरून वाकून वाकून मुजरे करणारी जनता 'महात्मा गांधी की जय' आणि 'इन्किलाब झिंदाबाद'च्या घोषणा निर्भयपणे देऊ लागली. ऐषआरामी, व्यसनी आणि प्रजेकडून जुलूम-जबरदस्तीने पैसे उपटणाऱ्या संस्थानिकांनी इंग्रजांनासुद्धा लाज वाटावी, असे अत्याचार केले. परंतु सुशिक्षित संस्थानिकांनी मात्र काळाची पावले ओळखून प्रजेला अधिकाधिक अधिकार द्यायला सुरुवात केली. आपल्या महाराष्ट्रातल्या चिमुकल्या औंध संस्थानाने ह्या कार्यात अग्रमान मिळवला.

(... अपूर्ण)
पुस्तक - गांधीजी
लेखक - पु.ल. देशपांडे 

1 प्रतिक्रिया:

Mayur said...

खूप छान,धन्यवाद ह्या पोस्ट साठी