Tuesday, January 31, 2023

ती फुलराणी (प्रथम प्रयोग २९ जानेवारी १९७५) - प्रसाद जोग

अजरामर मराठी नाटक..
ती फुलराणी
प्रथम प्रयोग :
२९ जानेवारी १९७५

इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती "फुलराणी" या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.

जॉर्ज बर्नार्ड शॉचे ‘पिग्मॅलिअन’ वाचत असताना त्यातल्या पात्रांच्या संवादाची मराठी रूपे पुलंना दिसायला लागली आणि हे नाटक मराठीत आणावे असे त्यांना वाटत होते. पुलंनी स्वतः जरी ‘ती फुलराणी’ला ‘पिग्मॅलिअन’चे रूपांतर म्हंटले असले तरी ते अस्सल देशी वाटत.

सतीश दुभाषी पु.लं. कडे नवीन नाटकाची मागणी करायला गेले असता , त्यांच्या मनात हा पिग्मॅलियन पुन्हा जागा झाला. सतीशसारखा गुणी नट त्यांना प्रो. हिगिन्सच्या भूमिकेत दिसायला लागला आणि मग त्यांनी ‘ती फुलराणी’ हे नाटक लिहून काढले ते मुख्यत: सतीशसाठी. मंजुळेच्या भूमिकेसाठी भक्ती बर्वे यांना आणि विसूभाऊसाठी अरविंद देशपांडेंना घेण्याचा आग्रह धरला तो पु.लं च्या पत्नी सुनीताबाईंनी. इंडियन नॅशनल थिएटरने हे नाटक रंगमंचावर आणले. सतीश दुभाषी, भक्ती बर्वे, अरविंद देशपांडे, राजा नाईक, मंगला पर्वते ह्या गुणी कलावंतांना बरोबर घेऊन ह्या नाटकाचे दिग्दर्शन करणे हा एक अतिशय आनंददायक अनुभव पु.लं.ना मिळाला . ह्या नाटकाच्या स्वभावाला धरून त्यातल्या शब्दाशब्दात,वाक्यावाक्यात प्रयोगातल्या कलावंतांनी नाटकात रंग भरला.

पु.लं. देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी’ नाटकाने भक्ती बर्वे यांना ओळख प्राप्त झाली. या नाटकातील ‘मंजुळा’ हे पात्र रंगभूमीवरील अजरामर भूमिकांपैकी एक. या नाटकाच्या तालमींच्या आठवणीही तितक्याच खास आहेत.’ती फुलराणी’ मधील स्वगत ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ पुलंनी स्वत: भक्ती यांच्याकडून बसवून घेतले होते. या स्वगताला वन्स मोअर येणार हे भाकीत पुलंनी तालमीतच केले. गाण्याला वा वादनाला वन्स मोअर येण स्वाभाविक होत पण स्वगताला वन्स मोअर म्हणजे भक्ती यांच्यासाठी ती कल्पनाच अविश्वसनीय होती. ती फुलराणी च्या पहिल्या प्रयोगात भक्ती‌ यांनी हे स्वगत सादर केलं आणि प्रेक्षकातून एकदा नाही अनेकदा वन्स मोअर आला…पुलंचं भाकीत खरच ठरल.


मंजुळा : ………” असं काय मास्तरसाहेब ? गधडी काय? नालायक, हरामजादी ? थांब…..

थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुज्या पापाचा भरलाय घडा
मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर
तुजं मसणात गेलंय ग्यान, तुज्या त्वांडात घालीन शान
तुजा क, तुजा ख, तुजा ग, तुजा घ, मारे पैजंचा घेतोय इडा
तुला शिकवीन चांगलाच धडा

तुजा उतरीन समदा माज, तवा येशील गुंडाळून लाज
माजी चाटत येशील बुटां, मी म्हनन, काय आज इकडं कुठ ?
हात पसरून मागशील भीक, मी म्हनन, जरा शुद्ध बोलायला शीक
मग उडवून हात, सांगीन धरायला वाट, चाल भाईर मुकाट
उगं वळवळ करतोय किडा ! तुला शिकवीन चांगलाच धडा !

तुला दाखवतेच बघ चोरा, तू बघशील माझा तोरा,
ओ हो हो, आहाहा, ओ हो हो, आहाहा, हाऊ स्वीट, हाऊ स्वीट
लव्हली, चार्मिंग, ब्युटी, हाय, समदे धरतील मंजूचे पाय
कुत्र्यावानी घोळवीत गोंडा, तरन्या पोरांचा दारात लोंढा
हाय मंजू, हाय दिलीप….हाय मंजू, हाय फिलीप
मंजू बेन केम छो, हाऊ डु यू डु,
कम, कम, गो हेन्गिंग गार्डन, आय बेग युवर पारडन ?
कुनी आनतील सिलीकची साडी, कुनी देतील मोत्यांची कुडी
कुनी घालतील फुलांचा सडा ! तुला शिकवीन चांगलाच धडा !

मग? कुठूनसा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होउन स्वार
नदरेला जेव्हा नदर भिडल, झटक्यात माझ्या पायाचं पडल
म्हनल,रानी तुज्यावर झालो फिदा, क्या खुबसुरती, कैसी अदा
माग, माग, काय हवं ते माग, प्यारी माज्यावर धरू नकोस राग
मी मातर गावठीच बोलीन, मनाची गाठ हळूच खोलीन
गालावर चढल लाजेची लाली, नदर जाईल अलगद खाली
म्हनेन त्याला, ह्ये काय असं ? लोकांत उगंच होईल हसं
कुंपणापातर सरड्याची धाव, टिटवीन धरावी का दर्याची हाव
हिऱ्याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा? गटारीच्या पान्याला सोन्याचा घडा ?
मग राजाच येईल रथात बसून, म्हनंल, कसं बी कर, पन हो माझी सून
दरबारी धरतील मुठीत नाक, म्हनत्याल राजाचा मान तरी राख
तोरणं बांधा नि रांगोळ्या काढा, त्या अशोक्याला शिकवीन चांगला धडा !

मंग मंजू म्हनल, महाराज ऐका, त्या अशोक मास्तराला बेड्याच ठोका
शिशाचा रस त्याच्या कानांत वता, आन लखलख सुरीन गर्दन छाटा
मास्तरला घोड्याच्या शेपटाला जोडा, आन पालटून काढून चाबकानं फोडा
महाराज म्हनत्याल, भले हुशार, धाडून द्या रं घोडस्वार
हां हां हां हां
जवा राजाचं शिपाई धरत्याल तुला, म्हनशील मंजे सोडीव मला
धरशील पाय आन लोळशील कसा, रडत ऱ्हाशील ढसाढसा
तुझा ए, तुझा ओ, तुझा न, तुझा ण, तुज्या श्या, तुजं वसकन आंगाव येणं
भोग आता गप तुज्या कर्माची फळं, तुज्या चुरूचुरू जिभेला कायमचं टाळं
महाराज म्हनत्याल, ह्याची गर्दन तोडा, मी म्हनन, जाऊ द्या, गरिबाला सोडा
तू म्हनशील, मंजुदेवी आलो तुला शरन
मी म्हनन, शरन आल्यावं देऊ नये मरन. “

पुलंनी हे इतकं अफलातून लिहिलंय ना, की अगदी मंजुळेसारखं ते त्याच ठसक्यात बोलावसं वाटतं. पूर्ण फुलराणीचं नाटक तर अनेक महाविद्यालयांमध्ये अजूनही बसवलं जातंच पण फक्त या स्वागताचे कितीतरी प्रयोग शाळा, महाविद्यालयांमध्ये झाले असतील.

प्रसाद जोग
सांगली
९४२२०४११५०

'ती फुलराणी' पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


Friday, January 27, 2023

पंडित गजाननराव

श्री. गजाननबुवांच्या वयाला ६१ वे वर्ष लागत असल्याच्या प्रसंगी त्यांचा गौरव करण्याची योजना केल्याबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन.
         
मी पुण्याला कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हापासूनचा म्हणजे सुमारे तीस वर्षांपूर्वीपासूनचा त्यांचा आणि माझा परिचय आहे. टिळक रोडवरील गोखल बिल्डिंगमध्ये बुवांचे बिन्हाड असे, तळमजल्यावर. समोर बहावा टिळक रोड. हल्लीच्या इतका धोधो वाहणारा नसला तरी वर्दळीचाच रस्ता. बुवांची तिथे सतत मेहनत चाले. व्हायोलिन वादक म्हणून त्यांचा खूप लौकिक झालाच होता. परंतु त्यांनी आता गायनाकडे अधिक लक्ष द्यायला सुरवात केली होती. आवाजाची तयारी एखाद्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे चाले. वास्तविक गाण्याच्या मेहनतीला ती जागा अत्यंत गैरसोयीची. म्हणजे बिऱ्हाडाचे प्रवेशद्वार फुटपाथवरच उघडते. पण तिथे भान हरपून बुवांची मेहनत चाले. तशी ती खोली नशीबवान आहे. तिथे बुबांच्या वेळेपासून जी सुरांची साधना सुरू झाली ती आजतागायत श्री. मारुलकर युवा वगैरे मंडळीनी चालू ठेवली आहे.

गेल्या महायुद्धाचे दिवस. वातावरण संगीताला प्रतिकूल, विलक्षण आर्थिक कुचंबणा, अशा परिस्थितीत बुवांनी जे मेहनतीचे पहाड फोडले त्याला तोड नाही. त्यांचे तीर्थरूप कै. अंतुबुवा ह्यांच्याकडून मिळालेला वारसा त्यांनी नुसताच सांभाळला नाही तर त्यात आणखी भर घातली. स्वतः गायक-वादक म्हणून कीर्ती मिळविली. याहूनही मला त्यांचा गौरव, स्वतःला लाभलेली आणि मेहनतीने मिळविलेली विद्या कंजूषपणाने लपवून न ठेवता योग्य शिष्याना त्यानी मोकळ्या मनाने दिली, ह्यासाठी करावा असे वाटते.

मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ति झाली होती. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांना लवकर निवृत्त व्हावे लागले. परंतु त्या अवधीत त्यानी आपल्या तालीम देण्याच्या पद्धतीने नव्या पिढीतल्या विद्यार्थ्यांतही अभिजात गायकी विषयी फार मोठी आवड उत्पन्न केली. वरपांगी परंपराभिमानी वाटणारे 'बुवा' कमालीचे चौकस आहेत. नवे प्रयोग काय चालले आहेत हे समजून घेण्याविषयी उत्सुक आहेत.

आयुष्यभर 'सूर आणि लय' ह्याखेरीज दुसरा कसलाही विचार न करता जगणारी ही बुवांसारखी माणसेच संगीतकलेची खऱ्या अर्थाने उपसना करतात. त्यांची ही 'पार्ट-टाइम' उपासना नसते, किंबहुना जीवन ह्याचा अशा माणसांच्या कोशातला अर्थ 'सुरलयीची उपासना करायला नियतीने दिलेली संधी हाच असतो. बुवा साठी ओलांडीत आहेत. आणखी अनेक वर्षे त्यांना प्रिय असलेले स्वरमय जीवन जगण्यासारखे सर्व प्रकारचे स्वास्थ्य त्यांना लाभो ही ह्याप्रसंगी शुभकामना व्यक्त करतो.

- पु. ल. देशपांडे

Tuesday, January 24, 2023

मराठवाड्याच्या धुळीत अत्रे साहेबांनी दिलेला वसा पुलंनी आयुष्यभर टाकला नाही - प्रा. मिलिंद जोशी

पु.ल.देशपांडेंचे नुसते नाव जरी उच्चारले तरी मराठी माणसांच्या मनात आनंदाचं कारंजं सुरू होते. वक्तृत्व, साहित्य, नाट्य, संगीत, विनोद अशा सर्व कलांमध्ये रममाण होणार्‍या पुलंनी स्वत: आनंद घेतला आणि रसिकांनाही तो दिला. म्हणून तर आपण पुलंना ‘आनंदयात्री’ म्हणतो. श्री. म. माटे मास्तर म्हणत, ‘माणूस गेल्यानंतर जितका काळ त्याची आठवण काढली जाते, तितका काळ तो माणूस जिवंत असतो.’ महाराष्ट्रात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी पुलंची आठवण निघत नाही. इतकं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं गारूड आजही कायम आहे.

नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे पु.ल. अध्यक्ष होते. या संमेलनात आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडे एका व्यासपीठावर आले होते. त्या वेळेस मराठवाड्यातल्या रस्त्यांची अवस्था फारच बिकट होती. रस्त्यावर असणारे खड्डे, प्रचंड धूळ यामुळे अत्रे त्रासलेले होते. आपल्या भाषणात त्यांनी राज्यकर्त्यांवर यथेच्छ तोंडसुख घेतले. अत्रे म्हणाले, ‘काय हे मराठवाड्यातले रस्ते आणि काय ही धूळ! या धुळीनेच मी हैराण झालो आहे.’

नंतर पु.ल. भाषणासाठी उभे राहिले. अत्रेंच्या या भाषणाचा संदर्भ घेत म्हणाले, ‘ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली त्यांना या धुळीची इतकी भीती का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज अशी मोठी माणसं गेली आहेत. ही धूळ अंगावर घेत असताना त्या माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे असे वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही. अशा मराठवाड्यात अत्रे साहेब आपण आहात.’ लोकांनी टाळ्यांचा अक्षरश: कडकडाट केला.

सभाशास्त्राचा नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, ‘‘मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो आहे’’. आचार्य अत्रेंचे शब्द खरे ठरले. अत्रेंच्या नंतर महाराष्ट्राला हसवण्याचे काम पुलंनी केले.

पुलंचा जन्म ८ नोव्हेंबर, १९१९ रोजी गावदेवी इथल्या कृपाळ हेमराज चाळीमध्ये झाला. त्यांचे वडील बेळगाव जवळच्या चंदगड गावचे. त्यांचं घराणं बेळगावजवळच्या जंगमहट्टीचं. घरासमोर गंधर्वगड आणि कलानिधीगड हे दोन गड होते. या दोन गडांचे दर्शन पुलंना रोज घडत होते. त्यांना ललित कलांविषयी आणि बालगंधर्वांविषयी जे आकर्षण वाटत होते ते कदाचित यामुळेच असेल.

पुलंचे आजोबा म्हणजे कारवारचे वामन मंगेश दुभाषी. त्यांनी ‘ऋग्वेदी’ या टोपण नावाने ग्रंथ लिहिले. त्यांनी ‘आर्यांच्या सणाचा इतिहास’ हा ग्रंथ लिहिला. टागोरांच्या गीतांजलीचे त्यांनी भाषांतर केले. नातवाने लेखक व्हावे असे आजोबांना वाटत होते आणि मुलाने गायक व्हावे असे वडिलांना वाटत होते. पुलंनी दोघांनाही नाराज केले नाही. पुलंच्या मातोश्री लक्ष्मीबाई यांचा गळा गोड होता. त्यांना पेटीवादनाची आवड होती. हे सारे वंशपरंपरेने पुलंमध्ये आले.

शाळकरी वयातच त्यांनी मास्तरांवर विडंबन लिहिलं होतं. ‘आजोबा हरले’ नावाचं प्रहसन लिहिलं होतं. नकला करणे, गाणे म्हणणे, पेटी वाजवणे, नाटकं लिहिणे, ती बसवणे, त्यात भूमिका करणे अशा अनेक गोष्टीतून पुलंचं व्यक्तिमत्त्व विकसित होत गेलं. १९४१ साली वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे पुलंना त्यांचे मुंबईचे बिर्‍हाड आवरून पुण्याला स्थलांतरीत व्हावे लागले.

१९४२ साली त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात बी.ए.साठी प्रवेश घेतला. त्याकाळात त्यांना चरितार्थासाठी भावगीताचे कार्यक्रमही करावे लागले. १९५० साली सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून ते एम.ए. झाले. त्यानंतर बेळगावच्या राणी पर्वतीदेवी महाविद्यालयात, मुंबईच्या कीर्ती विद्यालयात आणि मालेगाव शिक्षण संस्थेत त्यांनी काही काळ अध्यापनाचे काम केले. १९४३ साली बडोद्याच्या अभिरूची मासिकामध्ये पुलंनी लिहिलेले अण्णा वडगावकर हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले. तिथून त्यांची अर्धशतकी लेखकीय कारकीर्द सुरू झाली.

चिंतामणराव कोल्हटकरांच्या ललित कलादर्शनाच्या नाटकानंतर मो. ग. रांगणेकर यांच्या नाट्यनिकेतन कंपनीच्या नाटकांमध्ये पु.ल. काम करीत असत. रांगणेकरांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘कुबेर’ या चित्रपटात पुलंनी भूमिका केली. ‘जा जा गं सखी, जाऊन सांग मुकुंदा’ हे गीत पुलंनी गायले. इथून त्यांची मराठी चित्रपटसुष्टीतली कारकीर्द सुरू झाली. चोवीस मराठी चित्रपटात कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात पुलंची कामगिरी घडली.

‘तुका म्हणे आता’ हे मंचावर आलेले पुलंचे पहिले नाटक. त्याचा पहिला प्रयोग १९४८ साली पुण्यात झाला पण या नाटकाला यश मिळाले नाही. या नाटकात वसंतराव देशपांडे, वसंत शिंदे आणि वसंत सबनीस असे तीन ‘वसंत’ होते. एक संत आणि तीन वसंत असूनही नाटक चालले नाही असं पु.ल. म्हणत. त्यानंतर अंमलदार हे नाटक आलं, ‘तुका म्हणे आता’ हे गंभीर नाटक होते, ते लोकांनी विनोदाच्या अंगाने घेतले. अंमलदार हे विनोदी नाटक आहे, ते लोकांनी गंभीरपणे घेऊ नये असं पु.ल. म्हणाले.

२६ जानेवारी, १९५७ रोजी ‘तुझे आहे तुजपाशी’ हे त्यांचे नाटक रंगभूमीवर आले. ते मराठी नाट्यसृष्टीतील मैलाचा दगड मानले जाते. सौंदर्यासक्त काकाजी आणि जीवनविरक्त आचार्य या दोन जीवन प्रवृत्तीमधला संघर्ष पुलंनी या नाटकात मांडला. पुढे आलेल्या भाग्यवान, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, एक झुंज वार्‍याशी, ती फुलराणी, राजा ओयरीपौस या सारख्या नाटकांनी मराठी रंगभूमीला समृद्धी देताना प्रयोगशीलतेचे आणि नावीन्याचे भानही दिले. विशिष्ट विषयाचा आणि मांडणीचा आग्रह नाही. आपल्याला जे आवडते तेच लोकापर्यंत पोचवायचे हा पुलंचा सरळ हेतू होता.

पुलं स्वत: उत्तम अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार, निर्माते असल्यामुळे रंगमंचावर प्रायोगिक कसे व्हावे याचे प्रगल्भ भान त्यांना होते. म्हणूनच रंगभूमीच्या इतिहासात पुलंनी आपल्या विविधांगी कर्तृत्वाने मानाचे स्थान मिळवले. १९५५ मध्ये पुलं आकाशवाणीच्या सेवेत पुणे केंद्रावर रूजू झाले. १९५१ ते १९६१ या काळात भारतातल्या दूरदर्शनचे पहिले निर्माते म्हणून त्यांची दिल्लीतली कारकीर्द संस्मरणीय ठरली. याच काळात जनवाणी, साधना, दीपावली, शिरीष, विविध वृत्त वगैरे नियतकालिकांमधून बटाट्याच्या चाळीतल्या गमतीजमती विनोदी शैलीत मांडणारे त्यांचे लेख प्रसिद्ध होत होते. ते खूप गाजत होते. १९५८ साली मौज प्रकाशनगृहाने ‘बटाट्याची चाळ’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध केले.

पुढे युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास एज्युकेशनचा अभ्यास करण्यासाठी ते लंडनला गेले. लंडनमधल्या मुक्कामात बटाट्याची चाळमधील निवडक निवडक भागांचे अभिवाचन त्यांनी केले. त्यातूनच ‘बटाट्याची चाळ’ प्रत्यक्ष अवतरली. पुढे वार्‍यावरची वरात, असा मी असामी, वटवट, हसवणूकच्या माध्यामातून पुलंनी मांडलेल्या खेळाने मराठी माणसांना भरभरून आनंद दिला. बटाट्याची चाळ मधून पन्नास-साठ बिर्‍हाडांचा एक मानस समूह त्यांनी निर्माण केला आणि मध्यमवर्गीयांच्या जगण्याची त्यांनी मार्मिक उलटतपासणी केली. ती लोकांना भावली. पुलंच्या या सर्व प्रयोगांना रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

एका व्यक्तिला चारच तिकीटे मिळतील असा तो सुवर्णकाळ होता. प्रयोगाची वेळ आणि संहिता याबाबत पुलं आणि सुनीताबाई दोघेही खूप दक्ष होते. संहितेतला एक शब्दही बदलला जाता कामा नये. याबाबत ते आग्रही होते. कितीही मोठा अधिकारी किंवा पुढारी प्रयोगाला येणार असला तरी पुलंनी प्रयोगाची वेळ कधी बदलली नाही. ‘रसिकांनी पाच वर्षाखालील मुलांना प्रयोगासाठी आणू नये’ अशा त्यांना सूचनाच होत्या. नटांचे पाठांतर असलेच पाहिजे. ‘पाठांतर नसणे म्हणजे हातात लगाम न घेता घोड्यावर बसण्यासारखे आहे’ असं पुलं म्हणत.

त्या काळात या प्रयोगाचे पंधरा रूपये तिकिट ठेवले असते तरी लोक आले असते पण पुलंनी पाच रूपयेच तिकिट ठेवले. ‘बटाट्याची चाळ’ फॉर्मात असतानाच पुलंनी ‘वार्‍यावरची वरात’चे प्रयोग सुरू केले. नवे-नवे प्रयोग ते सतत करीत राहिले. पुलं थकताहेत, दम लागतोय हे लक्षात येताच त्यांनी प्रयोग बंद केले. सदाभिरूची न सोडता प्रेक्षकांपुढे आसू व हसूचे खेळ करून त्यांची करमणूक केली.

‘गर्दी खेचण्यासाठी सदाभिरूचीच्या मर्यादा ओलांडण्याची गरज नसते’ हे पुलंचे सांगणे आजच्या रसिकांच्या अभिरूचीवर स्वार होणार्‍या कलावंताना खूप काही सांगणारे आहे.

इंग्लंडमधल्या वास्तव्यावर, एकूण प्रवासावर आधारलेले ‘अपूर्वाई’ हे पुलंचे प्रवासवर्णन किर्लोस्कर मासिकात क्रमश: प्रसिद्ध झाले. १९६० मध्ये ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर आलेल्या ‘पूर्वरंग’, ‘जावे त्यांच्या देशा’, ‘व्यंगचित्रे’ या प्रवास वर्णनातून पुलंनी मराठी माणसाला जगाचे दर्शन घडवले आणि त्यांच्या जाणिवांचा परिघ विस्तारला. पुलं गुणग्राहक होते. चांगलं काम करणार्‍या सर्व क्षेत्रातील माणसांविषयी त्यांना कमालीची आस्था होती. त्यांचा गुणगौरव करण्यासाठी पुलंनी व्यक्तिचित्रं लिहिली ती व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, गुण गाईन आवडी आणि मैत्री या पुस्तकात संग्रहित झाली आहेत. पुलंची ही व्यक्तिचित्रं शब्दशिल्पच आहेत.

‘माझं पहिलं प्रेम संगीतावर आहे’ हे पुलंनी अनेकदा सांगितलं. संगीतात जो कैवल्यात्मक आनंद मिळतो त्याची सर दुसर्‍या कशालाही नाही असं पुलं म्हणत. दूरदर्शनवरच्या एका मुलाखतीत पुलं म्हणाले, ‘‘माझ्या लेखी शंभरपैकी साठ गुण संगीताला आहेत. संगीताकडं पुरेसं लक्ष देता आलं नाही याची खंत या जन्मात आहे. पुढच्या जन्मी ही चूक नक्की सुधारेन. माझ्या समाधीवर ‘याने कुमारगंधर्वांचे गाणे ऐकले आहे’ एवढेच लिहा.’’

पुलंच्या वाढदिवसाला किशोरी आमोणकरांनी शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. किशोरीताई म्हणाल्या, ‘पुलं तुमच्यासाठी काय करू?’ पुलं म्हणाले, ‘‘गा’’. किशोरीताई फोनवर खंबावती गुणगुणल्या. पुलं म्हणत, ‘‘कालचक्राबरोबर फिरणारं ध्वनीचक्र माझ्या मनात नेमकं राहतं. माझ्या आवाजाच्या दुनियेत जास्त रंग भरला असेल तर तो संगीताने! ज्या वयात लहान मुलांचं प्रसादाच्या खिरापतीकडे लक्ष असायचं, त्या काळात माझं लक्ष कीर्तनकाराच्या कथेमध्ये, ते गात असलेल्या अभंग, श्‍लोक, आर्या यांच्या गायनामध्ये असायचे.’’

पुलं समर्थ पेटीवादक होते. लहान वयातच बालगंधर्वांच्या समोर त्यांचीच गाणी वाजवून पुलंनी त्यांची शाबासकी मिळवली होती. पुलं म्हणत, ‘माझ्या हातात प्रथम पेटी पडली त्याऐवजी सतार पडली असती तर माझी संगीतातली वाटचाल वेगळी झाली असती. रागवादन, आलापी, घरंदाज ख्याल, गायकी या दिशांनी झाली असती. पेटीवाले गोविंदराव पटवर्धन यांच्या सत्काराला पुलं प्रमुख पाहुणे होते. भाषणात पुलं म्हणाले, ‘‘मी इथं अध्यक्ष म्हणून आलो नाही. पेटीवाला म्हणून आलोय.’’

गीतरामायणात व्हायोलिन वाजविणार्‍या प्रभाकर जोग यांचा पुलंच्या हस्ते सन्मान झाला तेव्हा पुलं म्हणाले, ‘‘माणसं पराधीन असतात हे गदिमांच्या गीतरामायणात ऐकलं होतं पण इतकी स्वराधीन असतात हे जोगांचं व्हायोलिन ऐकल्यानंतर समजलं.’’

संगीत क्षेत्रातील कलावंतांविषयी पुलंना किती आस्था आणि आपुलकी होती, हे यातून दिसून येतं. पुलंची संगीत दिग्दर्शनाची कामगिरी दोन स्तरावरील आहे. एक भावगीतासाठी संगीत दिग्दर्शन आणि दुसरं चित्रपटगीतासाठीचं. पुलंनी बोलपटातील 88 गाण्यांना चाली दिल्याची नोंद आहे. संगीतकार जेव्हा साहित्यातून संगीताकडे येतो तेव्हा सूर, त्यांना वाहणारे शब्द व त्यामागील अर्थ यांचे परस्सर संबंध घट्ट होतात. अर्थ, भावना, सुरांवर तरंगतात. त्यात बुडून जात नाहीत म्हणूनच ते संगीत हृदयाला अधिक भिडतं, हे पुलंच्या संगीताचं वैशिष्ट्य आहे.

पुलंच्या सर्व आविष्कारामध्ये विनोदाची सुखद पखरण आहे. त्यांच्या विनोदाचं आणि विनोदबुद्धीचं मर्म प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी नेमकेपणानं उलगडलं आहे. त्या सांगतात, ‘‘पुलंची कल्पनाशक्ती अव्वल दर्जाची होती. पुलं स्वत:च्या संवेदना स्वत:वर उधळणारे साहित्यिक होते. म्हणून ते कलेच्या विविध प्रांतात सहजपणे वावरले आणि रमले.’’ पुलंची दृकसंवेदना, नाट्यसंवेदना, अर्थसंवेदना, रससंवेदना, श्रोतृसंवेदना अतिशय तल्लख आणि सजग होती. ती संवेदना एकांगी आणि सामान्य पातळीवरची नव्हती तर ती अनेकांगी आणि असामान्य पातळीवरची होती, म्हणूनच त्यांचं साहित्य अनुभवसमृद्ध आहे.

सूक्ष्म निरीक्षणशक्ती, भाषेवर विलक्षण प्रभुत्व, उपहास, उपरोध, विडंबन यांचा सहज वापर, विविध क्षेत्रातील संदर्भांची समृद्धी, सहजता आणि तारतम्याचे भान यामुळं पुलंचा विनोद सहजसुंदर आणि निर्विष झाला. जगातल्या दोन महायुद्धांनी हादरलेली, देशाच्या पारतंत्र्याने पिचलेली, महागाई, टंचाई, कुचंबणा, कोतेपणा यांनी गांजलेली, वेळोवेळी येणार्‍या साम्यवाद, समाजवाद, स्त्रीवाद या नवविचारांचा अर्थ लावताना गांगरलेली, जीवनाचा उपभोग घेताना अपराधगंडाने पछाडलेली माणसं पुलंचं लक्ष्य होती. त्यांना पुलंनी मोकळं ढाकळं केलं. जीवनोन्मुख केलं.

खोगीरभरती, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक, खिल्ली, मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास ह्या त्यांच्या विनोदी लेखसंग्रहांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. पुलंनी विनोद लिहिला. अभिनित केला. उत्तम वक्तृत्वाने तो लोकापर्यत पोचवला. सिनेमा-नाटकातून तो दाखवला. इतका दीर्घकाळ मुक्तहस्ताने विनोदाची चौफेर उधळण करणारा दुसरा विनोदकार मराठी समाजाला मिळाला नाही. अपार करुणा आणि आयुष्याविषयीची खोल समज यामुळे पुलंनी जे काही निर्माण केलं ते रसिक मनांचा ठाव घेणारं ठरलं. जीवनातील विसंगती आणि विकृतीकडं त्या बुद्धीनं पाहणार्‍या पुलंच्या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या विनोदानं कोणालाही जखमा केल्या नाहीत, बोचकारलं नाही आणि रक्तही काढलं नाही.

पुलंच्या विनोदानं मराठी माणसाला खळखळून हसवताना रसरशीत जीवनदृष्टी दिली. एखाद्या घरंदाज सुनेनं चार-चौघांसमोरून जाताना स्वत:चा पदर सावरत ज्या अदबीनं जावं तितक्या सभ्यपणे पुलंचा विनोद मराठी समाजात वावरला. शाब्दिक, प्रसंगनिष्ठ, कोटीबाज अशा सर्व प्रकारच्या विनोदाची उधळण पुलंनी केली. उत्तम लेखक उत्तम वक्ते असू शकत नाहीत याची अनेक उत्तम उदाहरणं आपल्याकडं आहेत. लेखणी आणि वाणी ही शब्दशक्तीची दोन्ही रूपं पुलंवर प्रसन्न होती. बोलताना पुलंचा विनोद एखाद्या कारंज्यातल्या पाण्याच्या धारेप्रमाणं सहज उसळून येत असे. याचा प्रत्यय त्यांच्या लहानपणापासूनच येत होता.

पुलं दहा-अकरा वर्षाचे होते तेव्हाची गोष्ट. पार्ल्याला टिळकमंदिरात साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांचे ‘गर्व्हमेंट ऑफ इंडिया ऍक्ट’ या विषयावर व्याख्यान होते. व्याख्यानानंतर शंका निरसनासाठी प्रश्न-उत्तरं सुरू झाली. पुलं म्हणाले, ‘‘फेडरेशन राबविण्याचा मुद्दा पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगाल का?’’ पुलंकडे पाहत केळकर म्हणाले, ‘‘बाळ, तुझ्या वयाला साजेसा प्रश्न विचार.’’ त्यावर पुलं म्हणाले, ‘‘सध्या पुण्यात अंजिराचा भाव काय आहे?’’ त्यावर न. चिं. केळकर यांनाही हसू आवरलं नाही.

पुलंनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. एका मुलाखतीत त्याचा संदर्भ देत संवादक म्हणाला, ‘‘यांचं मन वकिलीत रमलं नाही.’’ त्यावर पुलं म्हणाले, ‘‘माझं मन वकिलीत रमलं नाही असं म्हणण्यापेक्षा अशिलाचं मन माझ्यात रमलं नाही असं म्हटलं तर जास्त योग्य ठरेल. ज्याप्रमाणे निष्पक्षपाती न्यायाधीश असतात त्याप्रमाणे मी निष्पक्षकार झालो असतो. ’’

पुलं आणि सुनीताबाईंनी बा. भ. बोरकर, आरती प्रभू यांच्याप्रमाणेच बा. सी. मर्ढेकर या कवींच्या काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. मुंबईला मर्ढेकरांच्या कवितांचं वाचन पुलं आणि सुनीताबाई करणार होते. मध्यंतरात पुलंना थोडंस काहीतरी खायला लागायचं. तशा सूचना त्यांनी संयोजकांना दिल्या होत्या. संयोजकांनी ढोकळे, सामोसे, बर्फी इतके पदार्थ आणले होते की ते पाहून पुलं म्हणाले, ‘‘लोक ‘मर्ढेकर’ ऐकायला आले आहेत. ‘ढेकर’ ऐकायला नाही.’’

विजापूरला शाळेत पुलंचं भाषण होतं. टेबलावर पाणी नव्हतं. पुलंना ते हवं होतं. संयोजक कळशी व तांब्या घेऊन आले. पुलं म्हणाले, ‘‘पाणी प्यायला हवंय. आंघोळीला नकोय.’’ जालन्याला पुलंच्या सभेत शेळी शिरली. पुलं म्हणाले, ‘‘येऊ द्या तिला, महात्माजींच्या नंतर प्रथमच तिला सत्य ऐकायला मिळणार आहे.’’ पुलंच्या लेखनाकडं आणि भाषणाकडं गांभीर्यानं पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवते, मराठी भाषेवर पुलंचे प्रेम आहे. म्हणूनच पुलंच्या शैलीविषयी महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत लिहिलेल्या लेखात स. ह. देशपांडे म्हणतात, ‘‘पुलंचे भाषेवर प्रेम आहे तसा त्यांना भाषेचा अभिमानही आहे.’’

पुलं इंग्लंडला गेले. वर्डस्वर्थच्या स्मारकाजवळ जगातल्या इतर अनेक भाषातले त्या स्मारकाजवळ माहिती देणारे फलक होते, पण मराठीतला एकही फलक नव्हता. पुलंना ही गोष्ट खटकली. त्यांनी व्यवस्थापकाला विनंती करून परवानगी मिळवली. मराठीतला फलक स्वत: लिहिला.

पुलंनी भाषा वापरली, वाकवली आणि वाढवली. मानवेतर गोष्टींचं मानवीकरण हे पुलंच्या शैलीचं वैशिष्ट्य होतं. समाजात ज्यावेळी कसोटीचे प्रसंग येतात तेव्हा समाज विचारवंताच्या भूमिकेकडं मोठ्या आशेनं पाहत असतो. अशा काळात विचारवंतांचं सत्त्व पणाला लागलेलं असतं. आज कोणतीही भूमिका न घेणं, एवढीच एक भूमिका समाजातील विचारवंत घेत असतात. पुलंच्या बाबतीत मात्र असं घडलं नाही. त्यांनी गरज असेल तेव्हा नेहमीच ठाम भूमिका घेतली. आणीबाणीच्या काळात दुर्गाबाई भागवत वगळता अन्य साहित्यिकांनी भूमिका घेतली नाही असा अपप्रचार जाणीवपूर्वक काही मंडळींनी केला पण त्यात तथ्य नव्हतं.

जयप्रकाश नारायण यांच्या प्रिझन डायरीचा अनुवाद पुलं करत होते. त्याचा पक्का मसुदा सुनीताबाई करत. या कामासाठी पूर्ण वेळ देता यावा म्हणून ते सभा, सत्याग्रह यात सहभागी झाले नाहीत. या गोष्टीची पुलं आणि सुनीताबाईंनी कधीही जाहिरात केली नाही. आणीबाणीनंतरच्या निवडणुकात इंदिरा गांधींनी वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले, ‘ही वीस अध्यायाची गीता आहे.’ त्याचा समाचार घेताना पुलं भाषणात म्हणाले, ‘ही गीता आहे हे बरोबरच आहे, कारण सुरुवातीला संजयउवाच आहे.’ त्यावर एक राजकीय नेता म्हणाला, ‘यांना आता कंठ फुटला आहे.’ पुलं म्हणाले, ‘गळा यांनीच दाबला होता, मग कंठ कसा फुटणार?’ आपली ठाम भूमिका पुलंनी नेहमीच स्पष्टपणे मांडली.

आणीबाणीनंतरच्या निवडणुकात जनता पक्षाचा विजय झाला. एस. पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होती. पुलंना न विचारताच त्यांचं नाव वक्ता म्हणून बोलणार्‍यांच्या यादी टाकण्यात आलं होतं. लोकाग्रहाला पुलंनी बळी पडू नये असे सुनीताबाईंना वाटत होते. पुलंनाही ते पटले. स्वत: न जाता पुलंनी त्यांच्या भाषणाची कॅसेट या सभेसाठी पाठवली. पुलं लोकप्रियता आणि लोकमान्यतेच्या शिखरावर होते. जनमानसात त्यांची एक प्रतिमा होती. पती म्हणून पुलंचे सुनीताबाईंना आलेले अनुभव वेगळे होते. ते आपण मांडले तर चाहत्यांच्या मनातील पुलंच्या प्रतिमेला धक्का बसेल का? असा विचार दुसर्‍या कोणीतरी निश्चितच केला असता. जे घडून जायचं ते घडून गेलं आहे. त्याचं चर्वितचर्वण कशाला? असा विचारही मनात आला असता पण तो सुनीताबाईंच्या मनात आला नाही.

पुलंच्या अलौकिक प्रतिभेविषयी, त्यांच्या माणसं जोडण्याच्या कलेविषयी, त्यांच्या हजरजबाबीपणाविषयी सुनीताबाईंना नितांत आदर होता. प्रतिभावंत म्हणून घडणारं पुलंचं दर्शन आणि पती म्हणून घडणारं पुलंचे दर्शन या दोन्हीची अतिशय सुरेख मांडणी ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकात सुनीताबाईंनी केली. अनेकदा पतीच्या प्रतिभेच्या, प्रसिद्धीच्या, मोठेपणाच्या तेजात त्याच्या पत्नीचं तेज लुप्त होऊन जातं. मग त्या तेजाचं लुप्त होणं हा कौतुकाचा विषय होतो. ‘पुलंचे मोठेपण निर्विवाद आहे, पण माझी म्हणून स्वतंत्र ओळख आहे, ती जपली गेली पाहिजे. इतर कुणी ती जपावी अशी अपेक्षा नाही, मात्र मी ती प्राणपणाने जपेन’ या भूमिकेतून सुनीताबाई स्वत्वाची आणि सत्त्वाची जपणूक कशा करीत राहिल्या, ते या पुस्तकात वाचायला मिळतं.

पुलंच्याकडं अलौकिक प्रतिभा होती. सुनीताबाईंकडं व्यवहारदृष्टी होती. प्रतिभेचं लेणं त्यांच्याकडेही होतं. पुलंचं यश घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता हे मात्र निर्विवाद. पुण्यात २००२ साली जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्यात ज्येष्ठ लेखिकांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सुनीताबाईंनी हा सत्कार स्वीकारावा यासाठी संयोजकांनी प्रयत्न केला होता. सुनीताबाईंनी हे निमंत्रण नाकारलं. सर्वाधिक लोकप्रिय लेखकाची पत्नी तसेच स्वतंत्रपणे लक्षणीय लेखिका, वत्सल कुटुंबिनी तसेच कर्तव्यकठोर विश्‍वस्त, काव्यप्रेमी रसिक तसेच परखड समाज हितचिंतक असे सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते.

आधुनिक महाराष्ट्रातल्या स्पष्ट, निर्भय, तेजस्वी आणि बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांमध्ये सुनीताबाईंचं स्थान अगदी वरचं आहे. पुलंच्या उत्साहाला आणि अफाट सर्जन ऊर्जेला विधायक वळण देत सुनीताबाईंनी जे पुलंसाठी केलं त्याबद्दल मराठी माणसं नक्कीच त्यांच्या ऋणात राहतील, कारण त्यांच्यामुळंच पुलंच्या निर्मितीचा आनंद रसिकांना भरभरून घेता आला. पुलं आणि सुनीताबाईंनी केवळ भांड्याकुंड्यांचा संसार केला नाही. त्यांनी संसार केला तो सर्जनाचा. त्यामुळंच मराठी माणसांची सांस्कृतिक श्रीमंती वाढली.

पुलंची जन्मशताब्दी साजरी होत असताना सुनीताबाईंचं स्मरण केलं नाही तर ती कृतघ्नता ठरेल. पुलंनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं आणि भरभरून आनंद दिला. त्याचबरोबर निखळ जीवनदृष्टी दिली. विनोदकाराबरोबरच विचारवंत आणि कलावंत म्हणूनही पुलंचं स्थान महत्त्वाचं आहे. ‘विनोदबुद्धीची ढाल हातात असली आणि अंगात रसिकतेचं चिलखत घातलं की जीवनातल्या सगळ्या संकटांना नामोहरम करता येतं’ हे जीवनतत्त्व त्यांनी मराठीजनांना हसतखेळत सांगितलं.

भाई, पुलं, पीएल, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व अशा विविध रूपात वावरणारे पु. लं. देशपांडे ही केवळ एक व्यक्ती नाही, ती वृत्ती आहे. या जगातलं दु:खं नाहीसं करता येत नाही पण ते हलकं करण्याची आस या वृत्तीत होती. या वृत्तीला रसिकतेची आणि शुभंकराची ओढ होती. ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते’ अशा सगळ्या गोष्टींचा ध्यास होता. स्वत: पुलंना इतरांना फुलवायचं आणि स्वत: आनंद घेताना तो इतरांनाही मिळावा यासाठी प्रयत्न करायचा हेच त्यांच्या जीवनाचं सूत्र होतं. त्यांनी स्वत:साठी काहीच साठवलं नाही. उलट समाजाकडून घेतलेलं समाजालाच वाटून टाकलं. पुलंची जन्मशताब्दी साजरी करत असताना ही ‘पुलकितवृत्ती’ अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर ते पुलंचं कृतज्ञ भावनेनं केलेलं खरं स्मरण ठरेल.

प्रा. मिलिंद जोशी
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे.
९८५०२७०८२३

सदर लेख साप्ताहिक चपराक मध्ये पूर्वप्रकाशित आहे

मूळ स्रोत - > https://thepostman.co.in/pu-la-deshpande/

Wednesday, January 18, 2023

आनंदयात्री - वंदना गुप्ते

प्रत्येक नाटकानं मला काही ना काही दिलं आहे. अभिनेत्री म्हणून, माणूस म्हणून आणि नाट्यप्रवाहातील एक प्रवासी म्हणून मला ते आयुष्यभर पुरतंय आणि तरीही ओंजळ अजून भरलेली नाही. मागच्या लेखात मी ‘प्रेमाच्या गावा जावे’ विषयी लिहिलं होतं, त्याची आणखी एक आठवण सांगण्यासारखी आहे. त्या नाटकाचा दौरा कोकणात नेहमीप्रमाणं मे महिन्याच्या सुट्टीत होता. ‘देवरुख’ गावी प्रयोग, ‘ओपन एअर’ला शाळेचं भक्कम स्टेज होतं. पहिला अंक संपण्यापूर्वी दोन मिनिटं आधी माझ्यासमोर, स्टेजवर मागच्या आंब्याच्या झाडाची वर आलेली फांदी होती, त्यावरून एक आंबा पडला. मी, अरविंद देशपांडे आणि निवेदिता जोशी (सराफ) आम्ही तिघंच स्टेजवर होतो. माझी लगेच एक्झिट होती. माझ्या मनात आलं, ‘हा आंबा मी इथेच ठेवला, तर पडदा पडल्या पडल्या निवेदिता तो उचलणार.’ म्हणून, मी आंबा उचलला आणि एक्झिट घेतली. कोकणच ते. तिथला एक प्रेक्षक ओरडला, ‘आरं नटीनं आंबो चोरलोऽऽ.’ तो प्रवेश संपला आणि पहिला अंकाचा पडदा पडला.

अरविंद देशपांडे आत आले आणि त्यांनी अशी काही कानउघाडणी केली माझी. ‘नाटकाच्या कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन तू असं कसं करू शकलीस? आणि हे कसं चुकीचं आहे? किती अव्यावसायिक वागलीस तू आज? आपण प्रत्येक प्रयोग प्रेक्षकांसाठी करीत असतो. तुझी भूमिका लेक्चररची आणि तू भूमिकेचा आब सोडून हे असं कसं केलंस? हे कसं चुकीचं आहे...’ वगैरे खूप बोलले, रागावले. त्यांचं म्हणणं आणि शिकवण आजतागायत विसरलेले नाही. रंगभूमीवरचे तीन तास तुम्ही बाकी कुणाचे नसता, तर ते घर, ते कुटुंब, त्यांचं राहणीमान, ती नाती, ते बोल हे सगळं बिनचूक झालंच पाहिजे. त्या तीन तासांत नाटकाबाहेरचा विचार तुमच्या डोक्यात येता कामा नये, हे मला तेव्हा मनोमन पटलं. ते करण्याचा १०० टक्के प्रयत्न मी करीत आले आणि करीत राहीन.

‘शो मस्ट गो ऑन’ हे शेक्सपिअरनं म्हणून ठेवलंय, ते १०० टक्के निभवावंच लागतं. नाटक करताना अनेक अडचणी आल्या, दुःखद घटना घडल्या, अनेक आनंदाच्या क्षणांना मुकले. आज ५० वर्षं नाटक करते; पण अरविंद देशपांड्यांची शिकवण कधीच विसरले नाही. एकाच नाटकाचे ५००/१००० प्रयोग झाले, तरी तीच इंटेन्सिटी, तीच उत्स्फूर्तता, तेच भाव तेवढ्याच ताकदीनं जगावे लागतात. आपण तेच असतो; पण प्रत्येक वेळी प्रेक्षक वेगळे असतात. पटलं नाही, तरी स्वीकारलंय. ते तितक्याच ताकदीनं केलं, तर लोकही तुमच्याबरोबर तोच आनंद घेतील, समरसून आस्वाद घेतील. हे लक्षात ठेवून प्रयोग करत राहणं, हीच व्यावसायिकता असते, तरच तुम्ही टिकाल. यश मिळणं सोपं असतं; पण सातत्यानं टिकवणं फार कठीण असतं, हे पदोपदी जाणवत राहतं. प्रत्येक प्रयोग म्हणजे बारावीचा पेपर. या घटनेचा शेवटही सांगितला पाहिजे.

अरविंद देशपांडेंचा राग, शिकवण ऐकता ऐकता मी तो अर्धवट पिकलेला आंबा सुरीनं कापत होते. कापता कापता एक फोड त्यांच्या हातात दिली. त्यांनीही तिचा आस्वाद घेतला आणि मग लक्षात आल्यावर मेकअप रूममधला तणाव नाहीसा झाला.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १९९३मध्ये वर्षभरात त्यांनी लिहिलेली तीन-चार नाटकं रंगभूमीवर आणून, त्यांचा सत्कार करायचा, असं समितीतर्फे ठरवण्यात आलं. ही नाटकं वेगवेगळे निर्माते सादर करणार होते. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘बटाट्याची चाळ’ वगैरे नाटकांचे प्रयोग अधूनमधून रंगभूमीवर होत असत; त्यामुळं ती सोडून इतर काही नाटकं सादर करायचं ठरलं. त्यात ‘सुंदर मी होणार’, ‘अंमलदार’ आणि ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकांच्या तालमी सुरू झाल्या. त्या वेळी रंगभूमीवर माझी ‘चारचौघी’, ‘संध्याछाया’ वगैरे नाटकं तुफान चालू होती; तरीदेखील पुलंचं नाटक त्यांच्या ७५व्या वर्षी, त्यांच्या उपस्थितीत करायला मिळणार, तर ती संधी सोडायची नाही, असं मी ठरवलं. या निमित्तानं अशा असामान्य कलावंताला मानाचा मुजरा करायला मिळणार होता. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातली दीदीराजेची भूमिका मी स्वीकारली.

हे नाटक ३०-३५ वर्षांपूर्वी पहिल्यांदा सादर झालं होतं. त्यात स्वतः पु. ल. आणि सुनीताबाई काम करीत होते. ते नाटक म्हणजे जणू एक काव्यच होतं. या नाटकातले संवाद, व्यक्तिचित्र, नाट्य आणि नाटकाची गुंफण सगळंच इतकं सुंदर होतं, की प्रेक्षकांचे कान तृप्त होत असत. सबंध नाटकभर पायानं पांगळी झालेली दीदीराजे व्हीलचेअरवर बसून खिडकीतून जग बघायची आणि त्यातून न दिसणाऱ्या जगाचं काव्यातून वर्णन करायची. अतिशय हळवी, मृदू, कवी मनाची, भावंडांवर प्रेम करणारी, त्यांचं मन समजून घेणारी अशी ही दीदीराजेची तरल भूमिका आणि मी अशी कणखर आवाजाची वंदना गुप्ते. माझ्या आवाजात या भूमिकेशी साधर्म्य साधणारे कुठलेच सूरही नव्हते आणि गुणही नव्हते. म्हणूनच ते आव्हान मी स्वीकारलं आणि तालमी सुरू केल्या.
                 
विजय केंकरे याच्या ‘स्फूर्ती’ संस्थेतर्फे ‘सुंदर मी होणार’ नाटक सादर झालं. लोकांना अतिशय आवडलं. विजयच्या दिग्दर्शनाखाली आधी एक-दोन नाटकं केली होती; पण यात डॉ. श्रीराम लागूंबरोबर काम करायची संधी मिळाली. निरीक्षणातून खूप काही शिकता आलं. पुढं काम करताना मला ते उपयोगी पडलं. या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीला एक चुणचुणीत मुलगी मिळाली, ती म्हणजे कविता लाड. बेबीराजेची भूमिका तिनं लीलया निभावली. अतिशय मन लावून मिळेल ते काम तेवढ्याच तन्मयतेनं करीत आली ती. डॉ. श्रीराम लागू, रवी पटवर्धन, गिरीश ओक, ज्ञानेश पेंढारकर, प्रशांत दामले असा नटसंच होता. प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य आणि प्रकाशयोजना, विजयचं दिग्दर्शन आणि पु. ल. देशपांड्यांचे संवाद सगळंच खूप छान जुळून आलं होतं; त्यामुळं प्रयोग फार सुरेख व्हायचा. ११० प्रयोगांनंतर सुधीर भटच्या ‘सुय़ोग’नं या नाटकाचे पुढं भरपूर प्रयोग केले.

मला आजही आठवतंय, पुण्याच्या ‘बालगंधर्व’च्या प्रयोगाला पु. ल. आणि सुनीताबाई समोर बसून नाटकाचा आनंद घेत होते. नाटक संपल्यावर व्हीआयपी रूममध्ये भाई आले आणि मला मांडीवर घेऊन खूप कौतुक केलं त्यांनी माझ्या कामाचं. मला म्हणाले, ‘या नाटकात वडिलांना आपल्या मुलीविषयी वाटणाऱ्या आकर्षणाबद्दल स्पष्टपणे लिहायला मी कचरलो; पण तू ते स्वरातून आणि अभिनयातून बरोब्बर दाखवलंस, शाब्बाश वंदना!’ बस्स एवढे शब्द ऐकले आणि आजवरच्या नाट्यप्रवासाच्या तपश्चर्येचं फळ मिळालं.

भाईंना माणिकबाईंचं गाणं खूप आवडायचं. त्यांनी संगीत दिलेल्या प्रत्येक सिनेमात आईचं गाणं असायचंच. आमच्या दादरच्या आणि पुण्याच्या घरी किती तरी नवीन, तरुण कलाकारांच्या मैफली जमवून आणल्या भाईंनी. ते म्हणायचे, ‘माणिक तुझ्या घरामध्ये कला आहे. इथं ज्या ज्या नव्या कलाकारांनी आपली कला सादर केली, ते खूप नावारूपाला आले.’

खरंच, आई-वडिलांमुळं किती मोठ्या मोठ्या लोकांचा सहवास मिळाला आम्हाला! नेपियन्सी रोडवरचं घर खूपच मोठं होतं; त्यामुळं तिथं सगळे दिग्गज कलाकार राहायलाही येत किंवा मैफलीसाठी जमत. पु. ल., वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, सी. आर. व्यास, राम मराठे, मल्लिकार्जुन मन्सूर, मालविका कानन अशी किती नावं घेऊ? अल्लारखाँ तर शेजारच्याच सोसायटीत राहत; त्यामुळं त्यांचं आणि छोट्या झाकीरचंही येणं-जाणं होत असे. सुधीर फडकेही येत असत दादरच्या घरी छोट्या श्रीधरला घेऊन. अशा सुरेल घरामध्ये वास्तव्य करून, आमचं कुटुंबही कलासक्त होऊन गेलं, हे केवढं भाग्य आमचं!


असेच एकदा पु. ल. मुंबई आकाशवाणीवर कामासाठी आले होते, तिथं माणिकबाईंची भेट झाली. तिनं आग्रह केला म्हणून आमच्या घरीच मुक्कामाला आले. रात्री जेवणानंतर आमच्या पप्पांबरोबर खूप गप्पा रंगल्या सिनेमाच्या, प्रभात फिल्म कंपनीच्या. फक्त साहित्य, संगीतच नाही, तर सिनेमाविषयी अफाट ज्ञान आणि प्रेम होतं त्यांना. सकाळी उठून ‘दूरदर्शन’वर जाता जाता मला कॉलेजला सोडायला आले, तेव्हा गाडीत आमच्या खूप गप्पा रंगल्या. दुसऱ्या दिवशी घरी आईला फोन केला आणि म्हणाले, ‘माणिक मी माझ्या विनोदी लेखांमधून, नाटकातून बायकांवर खूप विनोद करतो; पण बायकांना विनोदबुद्धी असते, हे वंदनाबरोबर गप्पा मारताना जाणवलं. चतुर आहे तुझी मुलगी, हे खास सांगण्यासाठी फोन केला तुला.’

खरंच किती मोठा माणूस, आनंदमूर्ती जणू! त्यांच्या लिखाणातून, बोलण्यातून, उमटलेल्या प्रत्येक शब्दातून त्यांची सांस्कृतिक वतनदारी भारतातच नाही, तर सातासमुद्रापारही पोचली. आजच्या तंत्रज्ञानाच्या जीवनातही तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड टिकवून ठेवण्याची क्षमता त्यांच्या लिखाणात आहे. आजही त्यांनी लिहिलेल्या कुठल्याही पुस्तकातलं, कुठलंही पान वाचून काढलं, तरी सगळी दुःख, कष्ट विसरून एकदम ताजेतवाने आणि आनंदी होऊन जातो आपण. असं विनोदाचं पांघरुण अंगावर लेवून झोपलं, की स्वप्नही छान पडतात माणसाला. हे असं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व, देवांचं मनोरंजन करायला पृथ्वी सोडून गेलं आणि आपण सगळेच सुन्न झालो, जगण्यातला आनंदच नाहीसा झाला जणू.

त्यांच्या जाण्याचं दुःख विसरायला लावणारं शब्दभंडार त्यांनीच तर निर्माण करून ठेवलंय आपल्यासाठी. एकाच माणसाला साहित्यिक, सांस्कृतिक, सांगीतिक, सामाजिक, वैचारिक विषयांवर गुदगुल्या करत निखळ सत्य मांडता येतं कसं? त्यासाठी लागणारे नेमके शब्द सुचतातच कसे? श्रीमंत-गरीब, सुशिक्षित-अशिक्षित, शहाणी-अडाणी या सगळ्यांना जोडणारं लिखाण कसं करू शकतात? वेगवेगळ्या स्वभावाच्या काल्पनिक ‘व्यक्ती आणि वल्ली’ त्यांनी निर्माण केल्या आणि नुसत्याच लिहिल्या नाहीत, तर अमरही केल्या. इतका बहुआयामी कलंदर माणूस माझ्या मते चार्ली चॅप्लिननंतर पु. ल. देशपांडेच!

वंदना गुप्ते
महाराष्ट्र टाईम्स
१५ जानेवारी २०२३


Monday, January 9, 2023

अडला हरी

....हरीचा डोळा त्या गॉगलवर गेला.

"अपूर्व" हरी.

"काय अपूर्व?" मी.

"हे ऊनप्रतिबंधक उपनेत्र!" आमचे गॉगल हऱ्याच्या नेत्रावर चढले देखील. "पण वत्सा, हे नयनत्राण तुला काय कामाचे.? दिवसभर टेबलाशी बसून कल्पनासृष्टीतला विहार कागदावर उतरवणाऱ्या तुझ्यासारख्या गृहकुक्कुटाला हे कृष्णोपनेत्र कशाला हवेत?"

खरोखर ह्या हऱ्याला कुणीतरी सरकारी शब्दांच्या टांकसाळीत चिकटवून का घेत नाहीत, कोण जाणे. साध्या गॉगलला एका घटकेत तीन प्रतिशब्दांनी हाक मारून गेला. कृष्णोपनेत्र काय, ऊनप्रतिबंधक उपनेत्र काय, नयनत्राण काय !

"…हे सौम्य, ही वस्तू आमच्यासारख्या जित्याजागत्या दुनियेत - "

पुढले वाक्य पुरे करण्यात शाई आणि कागद वाया घालवण्याची गरज नाही. तो चष्मा आपल्या डोळ्यावर चढवून हरी खिडकीतून समोरच्या गॅलरीत केस वाळवीत असलेली जितीजागती दुनिया बघण्यात गुंग झाला होता. त्या दुनियेचे चुलीवर ठेवलेले दूध उतू गेले असावे. कारण चटका बसल्यासारखी ती आत पळाली. हरीने माझ्याकडे अबाउट टर्न केले आणि एखाद्या मुरलेल्या वकिलासारखी आपली तर्जनी माझ्याकडे रोखीत म्हणाला,

"शिवाय, हे वापरायला चेहऱ्याची एक विशिष्ट उभारी लागते. तुझ्या निर्गुण मुखावर हे कृष्णोपनेत्र म्हणजे - "

पुढली उपमा मी ऐकली नाही. माझ्या चेहऱ्याला उभारी नाही एवढे भाष्य मला बस होते.

अडला हरी
उरलंसुरलं
(आवाज, दिवाळी १९७३) संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.