Wednesday, September 22, 2021

पु. ल. देशपांडे - बस नाम ही काफी है! - राहुल गोगटे

पु. ल. देशपांडे - बस नाम ही काफी है! आपणा मराठीजनांसाठी हे असे एकच व्यक्तिमत्त्व असेल, ज्यांचा परिचय देण्याची गरजच नाही! अष्टपैलू किंवा हरहुन्नरी हे शब्द खुजे वाटावेत इतके बहुरंगी आणि बहुढंगी व्यक्तिमत्त्व - लेखक, अभिनेता, नाटककार, संगीतकार, पेटीवादक, समीक्षक, संगीतज्ञ, दिग्दर्शक, वक्ता...लिहावे तेवढे पैलू कमीच! संगीत, साहित्य, चित्रपट व नाटक - मराठी संस्कृती ज्या चार खांबांवर उभी आहे, तिचा कळस हेच वर्णन कदाचित त्यांना लागू पडेल! जरा अलंकारिक शब्दात सांगायचे तर मराठी सांस्कृतिक विश्व हे जर आकाश असेल, तर पुलं हे त्या आकाशातला अढळ स्थान असलेला ध्रुवतारा आहेत!

मला सगळ्यात जास्त भावतात ते लेखक पु. ल. देशपांडे. मला वाटतं पुलं हे असे एकमेव लेखक असावेत, ज्यांचे साहित्य लहानांपासून थोरांपर्यंत अगदी कोणीही बिनदिक्कतपणे वाचू शकेल! समजेल की नाही, वाचनीय असेल की नाही, हा प्रश्न ज्यांच्या लेखनाबाबतीत संभवतच नाही, असे केवळ पुलंच असतील! त्यांचे लेखन अतिशय विनोदी व खुसखुशीत असते ह्यात शंकाच नाही, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, त्यांचा विनोद हा अतिशय निर्विष व प्रामाणिक असतो! त्यात कुणाचीही बदनामी, नालस्ती करण्याचा हेतू नसतो, असलीच तर असते निर्मळ थट्टा किंवा असतो कोपरखळी मारणारा उपहास!

मला मराठी वाचनाची गोडी लागली ती फक्त पुलंमुळे! व्यक्ती आणि वल्ली हे मी वाचलेले पहिले मराठी पुस्तक. माझ्या दहाव्या वाढदिवसाला आईबाबांनी दिलेली भेट म्हणून मिळालेले पुस्तक मला वाचनाची कायमस्वरूपी गोडी लावणारे ठरले! त्यातल्या प्रत्येक वल्लीचे वर्णन इतक्या समर्पक शब्दात असते, एकाच वेळी खुदकन हसवण्याचे आणि चटकन डोळ्यात पाणी आणण्याचे सामर्थ्य त्यांच्या शब्दात आहे! अतिशय परफेक्ट शब्दयोजना पाहावी तर पुलंचीच! उदाहरणच द्यायचे तर एखाद्या माणसाबद्दल लिहिताना, त्याचे अभिप्रेत असलेले व्यक्तिमत्त्व उभे करण्यासाठी, त्याला व्यक्ती केव्हा म्हणावे, इसम केव्हा म्हणावे, असामी केव्हा म्हणावे ह्याचे परफेक्ट भान आपल्याला पुलंच्याच लेखनात दिसेल!

लहानपणापासून आत्तापर्यंत, म्हणजे पंचविशीत, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मी पुलं वाचले, इतरही अनेक पुस्तके वाचली. पण त्या प्रत्येक टप्प्यावर तितकेच भावले ते फक्त पुलं! हो, पण प्रत्येक टप्प्यावर भावले ते वेगवेगळ्या प्रकारे! लहानपणी केवळ हसू आले, त्यांच्या खुसखुशीत आणि विनोदी लेखनावर, टीनएज मध्ये कधी कधी चावट टिचकी मारणारे त्यांचे विनोद कळू लागले, त्याचबरोबर त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती, एखाद्या माणसाचे किंवा प्रसंगाचे मार्मिक वर्णन करण्याची त्यांची शैली जाणवू लागली की जणू त्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष पाहिलंय, किंवा तो प्रसंग आपणही जगलोय असे वाटते! आता म्हणजे पंचविशीत थोडी जास्त मॅच्युरीटी आल्यावर त्या विनोदामागे दडलेली एक प्रचंड अभ्यासू वृत्ती, एखाद्या माणसाला वाचण्याची कला, त्या व्यक्तीकडे तटस्थपणे पाहण्याची दृष्टी, त्यांच्या विविध व्यक्तिचित्रांचा thought process, human tendency दाखवणारे अनेक प्रसंग, अनेक घटना जाणवतात, त्या विशिष्ट प्रसंगी ती अशीच का वागली किंवा react झाली, ते योग्य होतं का अयोग्य, आपणही कधी कधी असेच वागतो का, आपला thought process कसा असला पाहिजे, अश्या विविध विचारांना subconsciously चालना देऊ लागले पुलंचे लेखन! आता मला नक्कीच माहित्येय की जसजसे आणखी वय वाढेल, तसतसे आणखी वेगळ्या प्रकारे पुलं भावतच राहतील! व्यक्ती आणि वल्ली हे एकच पुस्तक त्यातल्या विविध सामजिक, आर्थिक, शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तिमत्त्वांमुळे एक माणूस म्हणून आपल्याला समृद्ध बनवू शकते, हे निश्चित!

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारे भावलेल्या व्यक्तिचित्राचे उत्तम उदाहरण म्हणजे अंतू बर्वा. लहानपणी अंतू बर्वा वाचताना जाणवायचा केवळ त्यातला विनोद आणि अंतुशेटचे उपरोधिक उद्गार - काहीही पडणे म्हणजे त्याचा "अण्णू गोगट्या झाला का रे", "सिंधू कसली? सिंधुदुर्ग आहे मालवणचा नुसता!" ह्या वाक्यांवर हमखास हसू यायचे. टीन एज मध्ये गेल्यावर "छे हो, काळोख आहे तो बरा आहे. उद्या (विजेचा) झकपक प्रकाश पडला तर बघायचं काय? दळीद्रच ना? अहो, पोपडे उडालेल्या भिंती नि गळकी कौले बघायला वीज ही कशाला? आमचं दळीद्र काळोखात दडलेले बरे!" वरकरणी वाटणाऱ्या विनोदामागे आपले दारिद्र्य इतरांना न कळू देण्याची स्वाभिमानी वृत्ती दिसते. पंचविशीत जाणवलं ते "रत्नांग्रीत दोन पालख्या निघाल्या आषाढीला - एक विठोबाची नि दुसरी दामू नेन्याची. आषाढात तो गेला नि विजयादशमीला आपल्या दत्तू परांजप्याने सीमोल्लंघन केलेनीत. अवघ्या देहाचे सोने झाले. इजा झाला, बिजा झाला, आता तिजाची वाट पाहतोय" ह्या वाक्यांमध्ये दडलेला मृत्यूसारख्या आयुष्यातील कटू वास्तवाचा उतारवयात केलेला स्वीकार आणि खवट बोलण्यामागे दडलेले आपले मित्र गमावण्याचे दुःख! तत्वज्ञान दुर्बोध करून अनेकांनी सांगितले, पण ते विनोदातून सुलभ केले पुलंनी!

त्यांच्या लेखनाची समीक्षा करण्याइतपत मोठा किंवा लायक मी नक्कीच नाही! एके ठिकाणी पुलंनीच म्हटले आहे की, "उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या, पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचे, हे सांगून जाईल." त्याच्यापुढे जाऊन मी म्हणेन, की पुलंचे साहित्य वाचून का जगावे हेच नाही, तर कसे जगावे हेसुद्धा मी शिकतोय, हे निश्चित!

- राहुल गोगटे

0 प्रतिक्रिया: