Friday, September 26, 2008

देणाऱ्या हातांचे पुल!

'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' अशा यथार्थ शब्दात गौरविलेल्या पु. ल. देशपांडे यांची १२ जून ला पुण्यतिथी असते. आता पुल आपल्यात नाहीत , ही जाणीव मन विषण्ण करणारी असली तरी पुलंचे स्मरण झाल्याबरोबर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात त्यांची एखादी तरी विशिष्ट आठवण चटकन जागी होते. कधी पुलंनी केलेली एखादी कोटी आठवते , कधी त्यांच्या नाटकातील वा चित्रपटातील एखादा खुसखुशीत संवाद आठवतो , तर कधी त्यांच्या एखाद्या लेखातील गमतीदार वाक्य आठवते. पुलंनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा मराठी साहित्यात अजरामर आहेत. त्यांचा ' काकाजी ', त्यांचे ' चितळे मास्तर ', त्यांचा ' नारायण ' हे सगळे थोड्याफार प्रमाणात आपल्याला आजूबाजूच्या जगात वावरताना दिसतात. पुलंनी निर्माण केलेले वाक्प्रचार मराठी भाषेत रुढ झालेले आहेत. '' तुला शिकवीन चांगलाच धडा '' हे ' ती फुलराणी ' मधील स्वगतातील उद्गार कधी गमतीत तर कधी रागात अनेकदा उच्चारले जातात. आतातर ते चित्रपटाच्या नावानेही विभुषित झाले आहे. मराठी भाषेची विविध रूपे आणि ती भाषा बोलताना प्रांतपरत्वे होणारे बदल पुल जेवढ्या बारकाव्याने दाखवत तेवढे बदल कोणी क्वचितच दाखविले असतील. 

पु.ल. हे साहित्यसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट होते , याबद्दल वादच नाही. इतके अष्टपैलू व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात आजवर झाले नाही. पुल लेखक होते , कवी होते , संगीत दिग्दर्शक होते , नट होते , वक्ते होते. ही सगळी यादी सांगण्यापेक्षा काय नव्हते ? असे विचारणे अधिक सोपे आहे. पण यापलीकडेही पुलंच व्यक्तिमत्त्व विशिष्ट ठळकपणे नजरेत भरण्यासारखा त्यांच्याकडे एक गुण होता. तो म्हणजे समाजसेवेची त्यांना असलेली जाणीव आणि दीनदुबळ्यांसाठी , गरजवंतांसाठी प्रसंगी स्वत: तोशीस सोसूनही त्यांनी उभारलेले समाजकार्य आणि त्या विषयातील त्यांची तळमळ. पुलंचा आशीर्वाद मिळणे , पुलंनी '' भले शाब्बास '' म्हणणे याला महाराष्ट्राच्या कालपरवापर्यंतच्या जडणघडणीत मोलाचा वाटा होता. पुलंची शाबासकी मिळाली की कोणालाही आकाश ठेंगणे वाटे. पु.ल. जेथे जात तेथे माणसांची गर्दी त्यांच्या अवतीभोवती आपोआप जमा होई. त्यासाठी भाड्याने माणसे बोलवावी लागत नसत. पुलंच्या ठायी असलेली विविध स्वरूपाची गुणसंपदा हे देवाचे देणे आहे , ते प्रयत्न करून अंगी बाणविता येण्यासारखे नाही. 

समर्थांनी म्हटले आहे , '' रूप लावण्य अभ्यासिता न ये । सहज गुणासि न चले उपाये । काहीतरी धरावी सोये । आगंतुक गुणांची ।। '' समर्थांच्या काळात ब्युटीपार्लर नव्हते. त्यामुळे त्यांनी '' रूप लावण्य अभ्यासिता न ये । '' असे म्हटले असावे. आता रूप-लावण्यात ' नव्हत्याचे होते ' करणा - या कला अस्तित्वात आल्या आहेत. पण '' सहज गुणासि न चले उपाये '' हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून पुलंच्या लेखातील वा साहित्यातील गुण किंवा त्यांचा अभिनय अनुकरण करून साधणार नाही ; पण समाजहिताची कळकळ आणि तळमळ मात्र आपल्या अंगी बाणविता येऊ शकते. लेखनाच्या उत्पन्नातून भलेमोठे समाजकार्य निर्माण करण्याचा पुलंनी जो वस्तुपाठ आपल्यासमोर उभा केला , त्याचे अनुकरण यथानुशक्ती प्रत्येकाने केले तर ते पुलंची स्मृती चिरकाल ठेवण्यास साह्यभूत होईल , यात शंका नाही. 

महाराष्ट्र टाईम्स 
(१२ जून २००८)

Saturday, September 20, 2008

नटराजाचा लाडोबा - पंडीत दामले

चित्रपट व्यवसायाबद्दल सगळ्यांनाच कुतुहल असते. मी आणि माझा धाकटा भाऊ यशवंत, आणी ही गल्लीच्या न्यु एंजिनीयरींग कॉलेजात १९४८ मध्ये दाखल झालो. तेव्हा तर आम्हाला ’प्रभात’च्या वलयाची पार्श्र्वभूमी होती. सहाजीकच कॉलेजच्या वस्तीगृहात आमच्याविषयीचे औत्सुक्य होते. प्रत्यक्षात आम्ही लेंगा, शर्ट, कोट अशा वेशात गेलो आणि सर्वांमध्ये मिसळून गेलो. 

त्यावर्षी प्रसिध्द लेखक पु.ल. देशपांडे एम. ए. शिकण्यासाठी विलिग्टंन कॉलेजात येणार असल्याची बातमी समजली. त्यांच्या विषयी आमच्या मनात वेगळीच प्रतीमा होती. पण तिला छेद देत ढगळ सदरा-पायजमा, पायात चप्पल अशा थाटात पु.ल. दाखल झाले. तेव्हा ’पु.ल.’ पेक्षा दामले बरे असे म्हणायची पाळी त्यांच्यावर आली. आमच्या अंगावर कोट तरी होते. प्रभात कंपीनीमुळे पु.ल. ची आणि आमची चांगली ओळख होती.आता तिचे मैत्रीत रुपांतर झाले. 

पु.ल ना विश्रामबागेत खरं तर शांतता मिळत होती. चाहत्यांच्या गराड्यात जखडले जात नव्हते. कोल्हापुरात १९३३ साली साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनात आचार्य अत्रे, गिरीश, यशवंत, सोपान देव चौधरी, संजीवनी मराठे, मायदेव या कवींनी भाग घेतला होता. स्टुडीओत निम्मीत करुन त्याच्या काव्यरचनांचे त्यांच्या आवाजात चिकीरण करण्यात आले होते. त्यावेळी कवी गिरीश यांनी आपली सुप्रसीध्द कवीता "न्यारीचा टाकु त होईल...मैतरणी बिगी बिगी चल" सादर केली होती. कवि गिरीश यांच्या बंगला विश्रामबागेत होता. पु.ल. च्या बरोबर आम्ही सुध्दा गिरीशांकडे गप्पा मारायला जायचो. कवींचा पु.ल. वर फार जीव होता. पु.ल. मुळेच या थोर कवींचा सहवास आम्हाला लाभला. आम्ही अनेकदा संध्याकाळी सांगली-मिरजला फिरायाला जात असू. परतण्यास उशीर होऊन विश्रामबागला जाणारी शेवटची गाडी कधीकधी चुकायची. त्या उतररी पु.लं. ची मैफल असायची. पु.लं. च्या सहवासात आम्ही विश्रामबाग स्टेशनच्या प्लेटफॉर्म वर रात्र जागवत असू. त्यावेळी नकला, गाणी, विनोदी कथा, प्रसंग यांची रेलचेल होत असे. यातुन पु.ल. च्या विवीध कलापैलुंच बहुरुपी दर्शन आम्हाला घडे. किती भाग्यवान आम्ही! त्यावेळी यासर्व गोष्टीचा आनंद घेत वर्ष संपले. आम्ही पुण्याला परतलो. 

पुण्यात आल्यावर प्रभात स्टुडीओत पु.ल. च्या गाठीभेटी होत राहिल्या. खुप वर्षानंतर नुकताच सांगलीला गेलो होतो. विश्रामबागेत स्टेशनची भग्न अवस्था पाहून डोळ्यात पाणी उभे राहिले. लेखन, अभिनय, संगीत, वक्तृत्व वगैरे कितीतरी कला पु.ल. ना अवगत होत्या. भरुनभरुन मिळाल्या. नुर्त्यकला द्यावी अशी नटराजाची इच्छा असेल. पण एवढं ओझ त्यांच्यावर लादु नका, असा सला पर्वती देवींनी दिला असणार. तरी पु.ल. नी स्वतंत्र न नाचता, आपल्या चित्रपट गिताच्या तालावर अनेक चित्रपट तारे-तारकांना नाचवले. एवढ भरभरुन देऊन सुद्धा देव समाधानी नव्हता. सुनीतावहीनी ही शक्ती त्यांच्यामागे उभी केली. अर्धनारी नटेश्वराचे मनोहरी रुप साकार झाले. नटराजाचा लाडोबा त्यांच्याच आज्ञेवरुन कैलासाकडे रवाना झाला आहे. 

- पंडीत दामले