काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. इअरप्लग लावून फोनवर गाणी ऐकत होतो. ब्राउझ
करताना एकदम पुलंचा 'पानवाला' दिसला. फोनमध्ये पुलंच्या काही फाईल्स आहेत.
म्हैस, असा मी असामी, व्यक्ती आणि वल्लीतील व्यक्तिचित्रे, मी आणि माझा
शत्रूपक्ष आणि इतरही काही. एके काळी हजारो वेळा ऐकलेल्या. अचानक वाटलं,
पानवाला ऐकू. फाईल प्ले केली. खूप दिवसांनी, खरं तर अनेक वर्षांनी पुलंना
पुन्हा ऐकलं. काही ओळींनंतर मी हसतो आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि मग आपण
हसतो आहोत याचं मला बरं वाटू लागलं.
साहित्य असं घनगंभीर नाव असलेल्या प्रकाराचं महत्त्व काय? त्याचं
श्रेष्ठत्व कसं ओळखायचं? चांगलं साहित्य हे आपल्याला जीवनदर्शन घडवणारं
असतं, तो त्याच्या श्रेष्ठतेचा एक निकष आहे असं म्हटलं जातं. उत्तम लेखन
आपली खोलवर चौकशी करतं. (शब्दप्रयोगाची प्रेरणा पु.ल.देशपांडे. मुगदळाच्या
आणि बुंदीच्या लाडवांनी दातांची खोलवर चौकशी केली पाहिजे.…'माझे
खाद्यजीवन', हसवणूक.) चांगलं लेखन प्रामाणिक असतं. अभिनिवेशरहित असतं.
अंतर्मुख करणारं असतं. मग आपण हसतो तेव्हा काय होत असतं? आपण कशामुळे हसतो?
तिथेही काही दर्शन घडत असतं का? की आपण अंतर्मुख होतो तेव्हाच फक्त दर्शन
घडत असतं?
पु.ल.देशपांडे हे माझ्यासाठी एक प्रकरण होतं. 'होतं' असं चटकन लिहिलं गेलं
कारण आज आता गाडीने ते स्टेशन सोडलं आहे. त्याचा मला त्रास वगैरे होत नाही.
कारण वेगवेगळ्या टप्प्यांवर तुमचं विचारविश्व वेगवेगळे आकार घेत असतं.
किंबहुना तसे आकार घेतले जाणं आणि त्यानुरूप तुमच्या वाचनात बदल होणं ही एक
आश्वासक गोष्ट आहे. वाचन आपल्या आवडत्या टूथपेस्टसारखं नसावंच. अनेक वर्षं
एकच ब्रँड! पण पुलंच्या बाबतीत मुक्काम लांबला हे मान्य करावं लागेल.
पुलप्रभाव अनेक वर्षं टिकून होता. पुलं ज्यांना पाठ असतात अशा काहींपैकी मी
एक. आणि पुलंनी दर्जेदार विनोदाचा आणि सभ्यतेचा जो संस्कार केला तो
माझ्यावरही झाला. पुलंच्या प्रतिभेचं आणि हेवा वाटावा अशा निरीक्षणशक्तीचं,
सकस विनोदाचं गारूड नंतर मग नेमाडे, रंगनाथ पठारे, श्याम मनोहर, भाऊ
पाध्ये, अरुण कोलटकर, नारायण सुर्वे, अरुण काळे अशा अनेक मंडळींचा परिचय
झाल्यावर विरत गेलं हे खरं आहे. पण पुलंनी जे चैतन्य दिलं ते विलक्षण होतं.
मी 'कोसला' प्रथम वाचली ती पुलंचा कोसलावरचा लेख वाचून! पुढे मग 'कोसला'
ने जे झपाटलं ते झपाटलंच. ते भूत अजूनही मानगुटीवरून उतरायला तयार नाही. पण
त्याचबरोबर उपमेला, दाखले देताना पुलंची पात्रं वा त्यांनी लिहिलेलं काही
हमखास धावून येतं आणि ती भुते अजून अदृश्य रूपात मानगुटीवर वावरत आहेत याची
खात्री पटते.
पुलंना जाऊन तेरा वर्षं झाली. मी तेव्हा तेवीस वर्षांचा होतो. पुलं सगळीकडे
हजेरी लावून होते. कट्ट्यावरच्या गप्पात, घरातल्या गप्पात, लिहिण्यावर
प्रभाव टाकण्यात - सगळीकडे. व्यक्ती आणि वल्ली, हसवणूक, बटाट्याची चाळ,
खिल्ली, एक शून्य मी हे माझ्या मते पुलंचे मास्टरपीसेस! पांडुरंग
सांगवीकरने आम्हांला हात धरून फर्ग्युसनमध्ये आणि पुण्यातल्या रस्त्यांवरून
फिरायला नेईपर्यंत आणि त्याची थोर बडबड ऐकवेपर्यंत आम्ही पुलं दाखवतील ते
वाचत होतो. त्यांनी 'हे वाचा' म्हटलं की वाचत होतो. त्यांचा अचाट आणि
निर्विष विनोद मेमरीमध्ये सतत स्टोअर होत होता. मला वाटतं की
ऐंशी-नव्वदच्या दशकातली माझ्यासारखी मुलं ही बहुधा 'भाबड्या मध्यमवर्गीय
पिढी'तील शेवटची मुलं. गूगल, फेसबुक आणि स्मार्टफोनच्या जगात आज मीही सहज
वावरत असलो तरी 'चितळे मास्तरांच्या चपला' म्हटलं की मी गहिवरतो. तसा गहिवर
आजच्या अठरा-वीस वर्षाच्या मुलाला येतो की नाही मला माहीत नाही. ते
तपासावं लागेल. पुलं हे आमच्या या भाबड्या पिढीचे प्रमुख. (विलास सारंग
म्हणतात, 'महात्मा फुले, वि.रा.शिंदे, डॉ. आंबेडकर यांच्या लेखनाने मराठी
लेखक-वाचकांना जाणीव करून दिली की मराठी सांस्कृतिक विश्व एकसंध नाही.
तरीही या घरगुती खेळकरपणाच्या शैलीला धुरीणवर्ग अगदी गळ्याशी येईपर्यंत
चिकटून राहिला. हे १९६०-७० सालापर्यंत दिसून येतं. पु.ल.देशपांडे हे
धुरीणवर्गाच्या या आवडत्या लेखनशैलीचे व विचारशैलीचे अखेरचे निरूपणकार.…
त्यांच्या लेखनात फार वाचनीयता आहे. हे काचेच्या घरातलं चित्र आहे असं
आपल्या मनाला सतत जाणवत राहिलं तरी वाचण्याच्या आनंदाला आपण स्वखुशीने
मान्यता देतो.' - वाङ्ग्मयीन संस्कृती व सामाजिक वास्तव, पृ. ४९) त्यांची
सृजनशक्ती अफाट होती. आणि तिला सामाजिक जाणिवेचं, मूल्यभावाचं दणकट अस्तर
होतं. कृतज्ञ असणे, भारावून जाणे, कौतुक करणे, 'चांगलं तेच' बघणे, कलेच्या
बाबतीत काही घट्ट निकष असणे, माणसं दुखावली की आपण वाईट वाटून घेत अस्वस्थ
राहणे या गुणांना आज वेगवेगळी परिमाणे येऊन चिकटली आहेत. जागतिकीकरणानंतर,
आर्थिक-सामाजिक आणि तंत्रज्ञानातील बदलांमुळे मानवी स्वभाव, नाती आणि
महत्त्वाचं म्हणजे मानवी मूल्ये हे सगळंच 'सततच्या संक्रमणा'त असल्यासारखं
दिसतं आहे. माणूस कधी नव्हे इतका 'बोलता' (आणि कमी 'ऐकता') झाला आहे.
भाबडेपणा हा दुर्गुण वाटावा अशीही परिस्थिती अधेमधे निर्माण होताना दिसते.
तेव्हा एकूण गलबल्यात आज पुलंची पात्रे आणि त्यांचं तत्वज्ञान कसं,किती
टिकतं ही उत्सुकता आहे. स्वतः पुलं मात्र त्याबाबतीत उदासीन होते. त्यांनी
म्हटलंय, 'माझं लिहिणं म्हणजे नदीच्या वाहत्या पाण्यात कागदी होड्या
सोडण्यासारखं आहे. त्यातल्या ज्या टिकतील त्या टिकतील, बुडतील त्या
बुडतील.' साहित्याबाबत सतत आदळआपट करणारे समीक्षक, लेखक आणि साहित्याकडे
तटस्थपणे बघण्याची क्षमता असलेले साहित्यिक पुलं हा फरक बघताना मौज वाटते.
एक मात्र अगदी प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. भाबड्या पिढीवरील
पुलप्रभावामुळे लघुनियतकालिकांची चळवळ, साहित्यातील इतर प्रवाह काहीसे
दुर्लक्षित राहिले. नेमाडेंनी तर 'आपल्याकडे हे महाराष्ट्राचं लाडकं
व्यक्तिमत्व वगैरे भयंकर प्रकरण आहे ना….'असा उल्लेख कुठेतरी केल्याचं
स्मरतं. त्याचा राग यायचं खरंच काही कारण नाही. पुलंची मोहिनी इतकी जबरदस्त
होती की अनेक चांगले लेखक मराठी वाचकांच्या नजरेतून सुटले किंवा उशीराने
लक्षात आले हे खरं आहे. पुलंची लोकप्रियता नक्की कशामुळे होती? मार्मिक,
सर्वसामान्य (म्हणजे शहरी, निमशहरी मराठी मध्यमवर्गीय) माणसाला जवळचं
वाटणारं, बुद्धिमान निरीक्षण आणि बेतोड विनोदाची डूब असलेलं, सात्विक विचार
असलेलं, विद्वत्तेचा आव अजिबात न आणणारं, जुन्यात रमणारं, मूल्यांची
पीछेहाट होताना बघून तळमळणारं - एका सामान्य स्थानावरून भोवतालचा गोंगाट
टिपणारं पुलंचं लेखन बहुतेकांना आवडत होतं. माझ्यासारखा अत्यंत टिपिकल
मध्यमवर्गीय घरातला मुलगाही त्याला अपवाद नव्हता. पुलंची दृष्टी अतिशय
स्वच्छ वाटायची. आणि अर्थातच त्यांचा विनोद आणि उत्तम भंकस करायची ताकद
त्यांच्या लिखाणाकडे आकर्षित करायची! विसंगतीवर, न आवडलेल्या गोष्टींवर ते
त्यांच्या खास शैलीत फटके मारायचे पण हा लेखक आतून नितळ आहे असं वाटायचं.
(मी मुद्दाम लेखक असं म्हणतोय कारण माणूस म्हणून पुलंबद्दल मला वाचून/ऐकूनच
माहिती होती. आणि आहे. शिवाय आवडत्या लेखकावर 'लेखक' म्हणूनच बोलावं, कारण
आपण त्यातल्या त्यात अचूकपणे तितकंच करू शकतो.)
पुलंकडे विनोदाचं जबरदस्त हत्यार असल्याने आणि त्याचा मोठा प्रभाव वाचकांवर
पडत असल्याने कदाचित त्यांच्या लिखाणावर प्रतिक्रिया देताना, त्याची
समीक्षा करताना साहित्यातले जाणकार, विशेषतः लघुनियतकालिकात सक्रिय असणारी
मंडळी अधिक तीक्ष्णपणाने बोलत असावीत असं वाटतं. नवकवी, नवचित्रकार यांची
पुलंनी बरेचदा चेष्टा केली आहे. पण त्यांचा रोख व्यक्तीकडे नसायचा.
'नवकविते'कडे किंवा 'नवचित्रा'कडे असायचा. ते 'ओल्ड स्कूल'चे होते. इंटेन्स
होते. सिनिक नव्हते. प्रतीकात्मकता, दुर्बोध मांडणी याचा धसका घेणारे
होते. पण म्हणून ते कलाकृतीचा समाचार घ्यायचे. कलाकाराचा नाही. 'थिएटर ऑफ द
अॅब्सर्ड' या प्रवाहातील एक प्रमुख नाटककार युजीन आयनेस्को याच्या 'द
चेअर्स' या नाटकाचं 'खुर्च्या : भाड्याने आणलेल्या' हे विडंबन किंवा
बेकेटच्या 'वेटिंग फॉर गोदो'चं 'गोदूची वाट' हे विडंबन अफाट आहे. मूळ नाटके
मी पाहिलेली किंवा वाचलेली नाहीत हे इथे आवर्जून नोंदवतो. कदाचित पाहिली
तर ती आवडतीलही, पण पुलंच्या टीकात्मक विडंबनाने जी मजा आली तिला तोड नाही.
आता 'मजा आली' म्हटल्याने कदाचित काही भुवया उंचावतील, पण मला इथे
सांगावसं वाटतं की विडंबन हा एक स्वतंत्र प्रकार म्हणूनही बघता येतोच की.
आपल्याला आपणच आखलेल्या रस्त्यावरील खाचखळगे दाखवणारा. त्यात 'मजा येते'
म्हणजे त्यातील रचनाकौशल्यामुळे, टिप्पणीमुळे आनंद मिळतो. ताण हलका होतो.
गंभीर नाटक, अस्तित्ववादी चिंता वाहणारे नाटक वा कादंबरी वाचतानाच एकीकडे
पुलंचं पात्र रोजच्या जगण्याशी झटापट करताना दिसतं तेव्हा ताण हलका होत
असतो. हसू फुटत असतं. शेवटी माणूस आणि त्याचं हे विश्व गुंतागुंतीचं आहेच.
त्यात वैविध्य आहेच. विचारांच्या, विचार प्रकटनाच्या विविध दिशा आहेत. आणि
म्हणूनच जसे नेमाडे आहेत, कमल देसाई आहेत, जीए आहेत तसेच पुलंही आहेत!
पुलं ज्या काळाचं प्रॉडक्ट होते त्या काळाच्या चौकटीत पाहिलं तर काही
गोष्टी उलगडू लागतात. पुलंची स्त्रीचळवळीबद्दलची धारणा आणि त्यांनी केलेलं
काही स्त्रियांचं 'अतिविशाल' चित्रण हा एक चर्चेचा विषय असतो. पुलं
पुरोगामी विचारांचे होते. विज्ञानाचा आग्रह धरणारे होते. जुन्यात रमणारे पण
पुढे पाहणारे होते. त्यांनी कर्तृत्ववान स्त्रीला सलामही केला आहे.
हिराबाई बडोदेकर, केसरबाई केरकर, बेगम अख्तर, ज्योत्स्ना भोळे, लता
मंगेशकर, इरावती कर्वे यांची त्यांनी रेखाटलेली व्यक्तिचित्रे बोलकी आहेत.
अर्थात या सहापैकी पाच गायिका होत्या आणि संगीत हे पुलंचं पहिलं प्रेम होतं
हे सर्वश्रुत आहे. शिवाय व्यक्ती आणि वल्लीसारख्या काल्पनिक
व्यक्तीचित्रांमध्ये एकही स्त्री व्यक्तिरेखा नाही हेही नोंदवायला हरकत
नाही. पण तरीही त्यांच्या स्वच्छ दृष्टीत स्त्रीकडे बघताना काही भेसळ
व्हायची असं मला अजिबात वाटत नाही. त्यांच्या प्रत्येक अभिव्यक्तीमध्ये (मग
ती तिरकस असली तरी) कमालीची सहजता होती, उत्स्फूर्तता होती. मात्र त्यांची
वक्र विनोदी नजर 'सोशल वर्कची घाई' असलेल्या काही स्त्रियांवर पडली हे खरं
आहे. (एक होती ठम्माबाई, तिला सोशल वर्कची घाई - पुलंची एक विनोदी कविता.
वीणा, दिवाळी १९९२ मध्ये प्रकाशित. 'उरलंसुरलं' या संग्रहात समाविष्ट. याच
संग्रहात त्यांचं 'पृथ्वी गोल आहे' हे 'स्त्रीमुक्तीवाल्या' स्त्रियांवर
टिप्पणी करणारं एक 'नेटक'ही वाचता येईल. हे 'अभिरुची'च्या जून १९४६ च्या
अंकात प्रकाशित झालं होतं.) सुस्थितीतील श्रीमंत स्त्रिया आणि त्यांची
समाजसेवा हा त्यांचा विशेष आवडता विषय होता असं दिसतं. हे एका बाजूला मान्य
केलं तरी दुसरीकडे स्त्री चळवळ आणि पुलंची प्रतिक्रिया याकडे पाहताना मला
असं वाटतं की त्यांच्या आधुनिक तरी लग्न, कुटुंब यांना भक्कम, निःसंशय
होकार देणाऱ्या मनाला काही गोष्टी पेलल्या नाहीत. त्यांना कदाचित स्त्री
चळवळीची दिशा कोणती हा प्रश्न पडला असावा. कदाचित थोडं असुरक्षितही वाटत
असेल का? कारण स्त्रीने टाकलेलं एखादं पाऊल आजही शंभरदा निरखून पाहिलं जातं
तर त्या काळाच्या चौकटीत विचार करताना पुलंची प्रतिक्रिया समजून घेता येऊ
शकेल. दुसरं म्हणजे त्यांनी विनोदाचं आवरण सतत जवळ बाळगल्याने त्यांचं लेखन
कधी 'जहरी' झालं नाही. त्यांनी स्त्री चळवळीचा अधिक खोलात जाऊन विचार
करायला हवा होता असं नक्कीच म्हणावसं वाटतं, पण (पुलंमुळेच बहुधा) विनोदाचं
अंगही विकसित झाल्याने जातिवंत विनोदी लेखकाच्या 'सुरसुरी'चा संबंध मी
तात्विक वादाशी जोडण्याचं टाळतोच जरा! राजकीय व्यंग्यचित्र जसं
व्यंग्यचित्र म्हणूनच आपण बघतो तसंच विनोदी लेखनाकडेही बघावं. अखेर
'अतिशयोक्ती' हे विनोदाचं वैशिष्ट्य असतंच.
'आहे मनोहर तरी' मधून सुनीताबाई भेटतात तसेच पुलंही भेटतातच. एक सातत्याने
व्यक्त होणारा प्रतिभावान आणि दुसरी क्वचित व्यक्त होणारी प्रतिभावान.
संवेदनशील लेखक, प्रतिभावंत असे पुलं एकीकडे नवरा म्हणून असंवेदनशील होते
याचं चित्र 'आहे मनोहर तरी'मध्ये दिसतं, पण ही असंवेदना 'दुष्ट जाणिवे'तली
नसून लहान मुलातली आहे असं सुनीताबाईदेखील सांगतात. मला वाटतं की
मराठीमध्ये लेखकांच्या बायकांनी लिहिलेली आत्मकथने हा एक महत्त्वाचा
सांस्कृतिक दस्तावेज आहे. पण त्याबाबतीत 'निर्वाळा' देणं ही अवघड गोष्ट आहे
कारण अखेरीस जे आहे ते 'त्या दोघां'मधलं आहे. (शिवाय असंतोषाचं मूळ
व्यवस्थेतही असतं. 'नवरा' हा प्रॉब्लेम आहे कारण मुळात 'लग्न' हा प्रॉब्लेम
आहे!). अर्थात लेखकाच्या लिहित्या बाजूसारखीच ही दुखरी बाजूही समोर येणं
आणि त्याबद्दल चर्चा होणं आवश्यक होतं आणि ते काम या आत्मकथनांनी केलं.
('आहे मनोहर तरी' मध्ये एक तक्रारीचा सूर आहे. त्यामुळे मला ते तितकंसं
आवडलं नाही असं मला एका मैत्रिणीने सांगितलं होतं. तिचं म्हणणं होतं की
प्रतिभावान माणसांना सांभाळून घ्यावं लागतंच. ते जे देतात ते अधिक मोलाचं
असतं. मला तिचं हे म्हणणं पटलं नव्हतं. कारण सुनीताबाई लिहितात त्याप्रमाणे
प्रतिभावंताला निर्मितीच्या क्षणी समजून घेणं, सांभाळणं हे योग्यच आहे. पण
इतर वेळी तो सामान्य माणसासारखाच नसतो का?)
आज पुलंचे उतारे फेसबुकवर फिरत असतात. त्यांची पुस्तके आजही पुस्तक
प्रदर्शनात/पुस्तकांच्या दुकानात दर्शनी शेल्फ पटकावून असतात. पुलं आवडणारा
एक मोठा वर्ग अस्तित्वात आहे आणि त्यांच्या लेखनाची कठोर समीक्षा करणारेही
आहेत. पुलंचा विनोद न आवडणारेही काहीजण दिसतात. त्यांचं लेखन रंजक आहे पण
सखोल नाही असेही मत दिसते. पुलंनी मध्यमवर्गीय भीरूतेचं उदात्तीकरण केलं
असा सूर दिसतो. पुलं टिकले का? टिकणार का? यावर मतप्रदर्शन होत असते.
('भालचंद्र नेमाडे' हा विषय जितका चर्चिला जातो तितकी चर्चा पुलंची होत
नाही हे मात्र खरं!). मला स्वतःला (अस्मादिक तिशीत आहेत. तरुण आहेत की
नाहीत हे ठरवायचं असेल तर फेसबुक प्रोफाईलला एकदा अवश्य भेट द्यावी!)
पुलंकडे, ज्या लेखकाने एका टप्प्यावर माझं मानस घडवलं, आज बघताना काय
वाटतं? मी खरं तर काहीसा ब्लँक होतो. खूप सवयीच्या माणसाविषयी कुणी
आपल्याला आपलं मत विचारलं की आपण जसे ब्लँक होतो तसा ब्लँक!
- उत्पल वी.बी.
मुळ स्त्रोत -- http://mindwithoutmeasure.blogspot.in/2013/06/blog-post.html
'मिळून साऱ्याजणी', जून २०१३
- उत्पल वी.बी.
मुळ स्त्रोत -- http://mindwithoutmeasure.blogspot.in/2013/06/blog-post.html
'मिळून साऱ्याजणी', जून २०१३
3 प्रतिक्रिया:
Simply gr8.it is heartening to know that young gene. Also likes Pu.La.We were born with him and nourished by him.let all future gene.remember and appreciate him.he is really immortal.he is like southern star ( druva tara) dr.gore
Very good article. I am a PuLa devotee; but with eyes wide open. PuLa was a giant among Marathi writers, and was perhaps not as critically evaluated when alive. With all the objective evaluation, inevitable after several years of his passing, I am sure the Golaberij will still show him to be a great, with possibly some human shortcomings.
Very good article. I am a PuLa devotee; but with eyes wide open. PuLa was a giant among Marathi writers, and was perhaps not as critically evaluated when alive. With all the objective evaluation, inevitable after several years of his passing, I am sure the Golaberij will still show him to be a great, with possibly some human shortcomings.
Post a Comment