Leave a message
Showing posts with label सुनीताबाई. Show all posts
Showing posts with label सुनीताबाई. Show all posts

Monday, April 22, 2024

मण्यांची माळ - एक विचारमंथन (तन्वी राऊत)

“आयुष्यात एका आवडत्या लेखिकेला भेटायची संधी तुला देवाने दिली तर तू कुणाला भेटशील?” असा प्रश्न जर मला कुणी विचारला तर सर्वप्रथम सुनीताबाई देशपांडेंचंच नाव माझ्या मनःपटलावर तरळून जाईल यात शंका नाही. त्यांची शिस्तप्रियता, वक्तशीरपणा, हाती घेतलेलं काम तडीस नेण्यासाठी त्यात झोकून देण्याची वृत्ती हे गुण तर सर्वश्रुत आहेतच. पण त्यांबरोबरच आजबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे बारकावे टिपण्याची सवय, स्वतःतील गुणदोषांची त्यांना असलेली जाणीव आणि स्वतःतले दोष स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा, स्वतःचं मत व्यक्त करण्याची सडेतोड पद्धत, त्याचबरोबर परिस्थितीकडे पाहण्याचा भावनिक दृष्टिकोन आणि संवेदनशीलता यांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मला भुरळ न पडती तर नवल. ‘आहे मनोहर तरी’ या त्यांच्या आत्मकथनाची पारायणं करुन झाल्यावर माझ्या वाचनात आलेलं मण्यांची माळ हे सुनीताबाईंचं दुसरं पुस्तक.

सुनीताबाईंच्या १३ पूर्वप्रकाशित ललितलेखांचा संग्रह या पुस्तकात आहे. हे लेख म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितींचं, आलेल्या अनुभवांचं सुनीताबाईंनी केलेलं विचारमंथनच म्हणावं लागेल. त्याचबरोबर आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर भेटलेल्या व्यक्तींसोबतचे अनुभवही या लेखांमध्ये त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. या लेखांतील त्यांचे विचार मांडण्याची पद्धत ओघवती असल्यामुळे, वाचकाशी लेखिकेने केलेला तो संवादच वाटू लागतो.

‘एक पत्र’ या पहिल्याच लेखात सुनीताबाईंनी पुलंसोबतचं त्यांचं सहजीवन, एकमेकांचे गुणदोष स्वीकारून केलेली आयुष्यभराची सोबत, पुलं गेल्यानंतरचं त्यांचं बदललेलं आयुष्य आणि त्या अनुषंगाने आठवणी, जीवन-मृत्यू, अस्तित्व यांबद्दलचे विचार मांडले आहेत. ‘निमित्त १२ मार्च’ या १९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांवरच्या लेखात राजकारणात वाढीस लागलेली स्वार्थी वृत्ती, व्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड, त्यांतून निर्माण झालेली धार्मिक तेढ, वैरभावना यांबद्दल वाचताना मन सुन्न होतं. किंबहुना त्या घटनेनंतर ३० वर्षांनंतरची आजची परिस्थिती आणखीच विदारक झाल्याचं जाणवतं. ‘डोडी’, ‘माणसाचा पूर्वज’, ‘आनंदमयी सृष्टीची जीवनासक्ती’ आणि ‘महात्मा थोरो’ या लेखांतून मानव आणि इतर पशूंमधील परस्पर संबंध, त्यांचा एकमेकांवरील विश्वास, निसर्गाला मानवाने आणि इतर पशूंनी दिलेली वागणूक याबद्दलच लिखाणही वाचनीय. या पुस्तकातील सर्वच लेख वाचकाला मानवी मूल्य, स्वभावातील गुणदोष, तसेच माणसाच्या अतिमहत्त्वाकांक्षी वृत्तीचे भविष्य काळात येणाऱ्या पिढीला भोगावे लागणारे परिणाम यांबद्दल विचार करायला भाग पाडतं, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य. वाचायलाच हवं असं पुस्तक.

- तन्वी राऊत 
https://www.instagram.com/herbookishworld

Tuesday, March 12, 2024

ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना !

चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांनी लिहिलेली ही कविता. याच कवितेचं नंतर अत्यंत प्रसिद्ध असं गाणंही झालं. ह्रदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेलं हे गीत, आशा भोसले यांनी खरोखरच असं गायलं आहे की ते
स्वरांचे घन येऊन आपल्या मनाला न्हाऊ घालतात प्रत्येक वेळी ऐकताना.

पण मुळात ही कविता आणि ती लिहिण्यामागची पार्श्वभूमी दोन्ही अतिशय उदात्त अशी आहे. एकूणच काव्य, कवी आणि कलाकार या सर्वांसाठीच या कवितेचं स्थान हे पसायदानासारखं आहे. सुनीताबाई देशपांडे यांनीच त्यांच्या 'कवितांजली' ह्या कविता वाचनाच्या कार्यक्रमात ही हकिकत सांगितली होती.

आरती प्रभू यांच्या कविता सुरुवातीला 'सत्यकथा' या मासिकातून प्रसिद्ध होऊ लागल्या आणि साहजिकच ते काव्य अत्यंत लोकप्रिय होऊ लागलं. त्यामुळे 'आरती प्रभू' या नावाला खूप प्रसिद्धी आणि वलय प्राप्त झालं. नेमक्या याच
कारणाने चिं. त्र्य खानोलकरांमधला अत्यंत संवेदनशील असा 'आरती प्रभू' हा कवी खूप अस्वस्थ झाला. त्याच मानसिक घालमेलीतून त्यांनी ही कविता लिहिली. प्रत्येक कवीने, कलाकाराने ज्या कवितेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेऊन मगच स्वतःला कलेच्या स्वाधीन करावं.

"ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना" ... प्रसिद्धी, लोकप्रियता यामुळे कदाचित माझ्या मनात अहंकार निर्माण होईल. आणि त्या अहंकाराने माझं मन मलीन होऊन जाईल, काळवंडून जाईल. अशी भीती, अशी अस्वस्थ करणारी शंका 'आरती प्रभूंच्या' मनात डोकावत होती. म्हणून त्यांनी थेट त्या दयाघनालाच साकडं घातलं की हे दयाघना; तू घनांच्या स्वरूपातून ये आणि माझ्या मनावर बरसून जा.

पण हे बरसणं फक्त भिजण्यासाठी नको... तर तू मला, माझ्या अहंकाराने मलीन झालेल्या मनाला 'न्हाऊ' घाल. आई आपल्या बाळाला न्हाऊमाखू घालते; अंगणात खेळताना, बागडताना, धडपडताना त्या बालकाचे मळलेले अंग धुवून पुसून स्वच्छ करते आणि त्याला त्याचं गोंडस, गोजिरं, निरागस रुप पुन्हा मिळवून देते. तसंच तू घनांमधून , जलधारांमधून थेट माझ्या मनात ये; आणि माझ्या मनावरची ही प्रसिद्धी, वलयामुळे साठलेली अहंकाराची पुटं धुवून टाक. मला पुन्हा एकदा शुद्ध, निर्मळ, निरागस रुप हवं आहे.... म्हणून... "ये रे घना, ये रे घना".

"फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू. नको नको म्हणताना, गंध गेला रानावना" ... 'माझ्या कविता', त्यातून व्यक्त होणाऱ्या माझ्या भावना; या अगदी तरल आहेत, नाजूक आहेत. खरंतर त्या भावना इतक्या हळूवार आहेत की
त्यांना फक्त 'अळुमाळू' याच शब्दात व्यक्त करता येईल. हा अळुमाळू शब्द; ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ओवीमध्ये वापरला आहे. कारण तो नाजूकपणा फक्त स्पर्शाचा भाव नाही; तर ते शुद्धतेचं, पावित्र्याचंही विशेषण आहे.

म्हणून 'आरती प्रभू' म्हणतात की; माझ्या ह्रदयस्थ भावनांमधून उमललेली ही काव्यपुष्पं; ह्या लोकप्रियता, प्रसिद्धी आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अहंकार आदी ऐहिक वाऱ्याने चुरगळून जातील, विस्कटून जातील. आणि मी त्या
काव्यसुमनांना 'नको नको' म्हणतच होतो. मी स्वतःहून कधीच प्रसिद्धीच्या, लोकप्रियतेच्या वाऱ्यालाही उभा राहिलो नाही. पण ... त्या कवितेतील भावफुलांचा गंध ! तो गंध कसा लपवून ठेवू... ! मी माझी ह्रदयस्थ कविता
कुणाच्याही दृष्टीस पडणार नाही याची काळजी घेतली तरीही तो 'गंध' , तो भावगंध सर्वदूर पसरलाच आहे ! मग आता मी काय करू... म्हणूनच ... "ये रे घना, ये रे घना".

"टाकुनिया घरदार, नाचणार नाचणार; नको नको म्हणताना मनमोर भर राना" ... कविता, काव्यउर्मी, काव्योन्मेष, या गोष्टी अशा आहेत की त्यांना कसलंच भान नाही, कसलीच बंधनं नाहीत. स्वयंभू, स्वच्छंदी अशा भावना आहेत या. "नभ मेघांनी आक्रमिले" या अवस्थेत मोर जसे धुंद, मुग्ध होऊन, पिसारा फुलवून नृत्य करणारच. अगदी तसंच एखादी प्रतिभेची श्रावणसर आल्यावर माझ्या मनातले भावमयुर त्यांचा काव्यपिसारा फुलारून नवनिर्मितीच्या रानावनात मुक्त संचार करणारच !

तेव्हा ते माझं काही एक ऐकत नाहीत. आणि मग त्यांच्या या भावमुग्ध अविष्काराने रसिकजनांचं लक्ष आपोआपच वेधून घेतलं जातं. दयाघना... मला भीती वाटते रे... माझ्या या मुक्तमयुरांना कोणी कैदेत तर नाही ठेवणार ना,
काहीतरी व्यावहारिक आमिष दाखवून त्यांचं स्वातंत्र्य हिरावून तर नाही घेणार ना ! म्हणूनच... तू...
"ये रे घना, ये रे घना".

"नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू; बोलावितो सोसाट्याचा वारा मला रसपाना" ... हा कसा पेच निर्माण झाला आहे ! कितीही नको नको म्हटलं तरी तो काव्यगंध रानवाटांनी पसरणारच आहे. शब्दमाधुर्यातून गुंजारव करणारे आर्त सूर एखाद्या वेणूच्या नादलहरींसारखे विहरत, लहरत कानोकानी पोहचणारच आहेत. आणि मग या साऱ्या शब्दलाघवाचा, भावोन्मेषाचा उगम शोधत शोधत तो प्रचंड लोकप्रियतेचा, प्रसिद्धीचा, लोकाभिमुखतेचा वारा ; अनिवार होऊन माझ्या दिशेने येणारच आहे.

त्या सोसाट्याचा वाऱ्यावादळात मी माझी ही काव्यवेल कशी सांभाळू ! त्या सोसाट्याचा वाऱ्याबरोबर जी प्रतिष्ठेची अहंकारमिश्रीत धुळ उडून येईल; ती या डोळ्यांवाटे माझ्या मनापर्यंत पोहचली तर ... काय करू ! माझी फुलं
कोमेजून जातील ना; चुरगळून जातील ना !म्हणूनच... "ये रे घना, ये रे घना; न्हाऊ घाल माझ्या मना"...

मनामध्ये अशी भावकोवळीक असलेला हा 'आर्ततेचा प्रभू' अवघ्या सेहेचाळीस वर्षात स्वतःच त्या दयाघनाला भेटायला निघून गेला. कदाचित स्वतःच्या 'अळुमाळू' भावसुमनांनी त्या प्रतिभेच्या दात्यालाच न्हाऊ घालण्यासाठी
गेला असावा हा 'प्रभू' ... आवाज चांदण्यांचे ... अजूनही ऐकू येतात मात्र इथेच ठेवून गेला... आपल्यासाठी.

रसग्रहण : रोहित कुलकर्णी

Tuesday, February 7, 2023

ऐसी सखी, सहचरी पुन्हा होणे नाही - मंगला गोडबोले

दिवंगत साहित्यिक सुनीताबाई देशपांडे यांच्याविषयीच्या आठवणींतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर एका लेखिकेने टाकलेला प्रकाश.

माझ्या पिढीच्या अनेक लेखकांप्रमाणे मीही माझं अगदी सुरुवातीचं एक पुस्तक पुलंना अर्पण केलेलं होतं. सन १९८५ ! नाव 'झुळूक' अर्पणपत्रिकेतले शब्द 'अर्थातच पु. लं. ना ज्यांनी आयुष्यातले निरामय आनंदाचे क्षण दिले!' पुस्तकाचे प्रकाशक दिलीप माजगावकर आणि मी पुस्तक द्यायला 'रूपाली'च्या फ्लॅटमध्ये गेलो होतो. मला काही सुधरत नव्हतं. पु. लं. ना पुस्तक द्यावं, वाकून नमस्कार करावा आणि उलट पावलो घरी यावं एवढीच कल्पना होती. पु. लं. च्या घरामध्ये पाच-सहा मंडळी बसली होती. हॉल आणि स्वयंपाकघर यांच्या जोडावर सुनीताबाई बसल्या होत्या. त्या एकटक माझ्याकडे बघत होत्या. पु. लं. ना आत्यंतिक भक्तिभावानं नमस्कार करून झाल्यावर मी सुनीताबाईंसमोर नमस्काराला वाकले. त्यांनी पटकन पाय मागं घेतले. म्हणाल्या, "भाईला नमस्कार केलात की तेवढा पुरे. लेखकानं उगाच याच्या त्याच्या समोर वाकू नये." 'उगाच नव्हे, तुमच्या विषयी पण वेगळा आदर वाटतो म्हणून...,' असं काहीतरी मला बोलता आलं असतं; पण धीर झाला नाही. धारदार नजर आणि त्याहून धारदार वाक्यं यांनी माझी बोलती बंद झाली होती.

१९९२ मध्ये 'अमृतसिद्धी पु.ल. समग्रदर्शन' या ग्रंथाच्या कामाला सुरुवात केली. पु. लं. च्या जीवनकार्याचा समग्र आढावा घेण्याचा तो महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता, त्याचा आराखडा ठरवण्यासाठी प्रा. स. ह. देशपांडे आणि मी पु. लं.कडे गेलो होतो. कसं कधी काम करायचं, कोणाकोणाची मदत घ्यायची अशी बोलणी सुरू असताना पु. लं. ना सारखी सुनीताबाईंची मदत लागत होती. 'आपला कोण ग तो... सुनीता?' 'मला आठवत नाही; पण सुनीता नक्की सांगल,' 'सुनीतानं ते कात्रण नक्की ठेवलं असेल,'
     
अशा असंख्य वाक्यांमधून पु. लं.चं त्यांच्यावरचं अवलंबित्व जाणवत होतं. कोणतंही काम त्यांच्यावर सोपवून पु. ल. किती सहजपणे अश्वस्त होतात हे वारंवार दिसत होतं. आम्ही निघताना सुनीताबाई सहज बोलून गेल्या, "बाकी सगळं तुम्ही लोक बारकाईनं करालच; पण एक लक्षात ठेवा, विशेषणं जपून वापरा. "
  
बेहिशेब विशेषणं वापरल्यानं व्यक्तिपर लेखनाचं काय होतं हे आजही कुठेकुठे दिसतं तेव्हा सुनीताबाईंचं ते वाक्य मला आठवतं. सुनीताबाईंची वाङ्मयीन जाणीव आणि साक्षेप किती लखलखीतपणे व्यक्त झाला होता त्यातून! सुनीताबाईंची प्रखर बुद्धिमत्ता, कर्तव्यकठोरता, उत्तम स्मरणशक्ती, सदैव जागा असणारा मूल्यविवेक, जे जे उत्तम उदात्त उन्नत याचं आकर्षण आणि खोटेपणाचा दंभाचा तिटकारा याचं प्रत्यंतर त्या काळात अनेकदा आलं. एवढी वर्ष एवढ्या लोकप्रियतेला तोंड देणं हे सोपं नसणार. सतत लोकांच्या नजरेत राहायचं, तरीही आपल्याला हवं ते कटाक्षानं करून घ्यायचं, कोण काय म्हणतं याच्या आहारी जायचं नाही, जनापवादांचा बाऊ करायचा नाही असं एक प्रकारे अवघड आयुष्य त्या जगल्या. त्यांची तर्ककठोरता अनेकांना तर्ककर्कशता वाटली; पण त्यांनी स्वेच्छेनं पत्करलेल्या रस्त्याला माघार नव्हती.

स्वभावातःच परफेक्शनिस्ट आदर्शवादी असल्यानं सुनीताबाई चटकन दुसऱ्याचं कौतुक करत नसत; तसंच स्वतःचंही कौतुक करत किंवा करवून घेत नसत त्या स्वतःला ललित लेखक मानत नसत. 'तेवढी प्रतिभा माझ्यात कुठली?' असं म्हणून त्यांच्या लेखनाची स्तुती उडवून लावत. घेतलेल्या आक्षेपांवर मात्र जरूर तेवढा विचार करत, चर्चा करत. संदर्भात कुठेही चूक झाली, तर वारंवार दिलगिरी व्यक्त करत. त्यांना आवडणाऱ्या माणसांवर विलक्षण माया करत. कुमार गंधवांचे पुत्र मुकुलजी यांच्या व्यसनाबद्दल काही उलटसुलट बोललं जात असताना त्या एकदम म्हणाल्या होत्या, "कुठेतरी दुखावला असणार हो तो... त्याला मी नुसती हाक मारली, तरी सुतासारखा सरळ होतो तो... लोकांना त्याला नीट वागवता येत नाही म्हणून...'

सुनीताबाईंची ती हाक नक्कीच आर्त असणार. त्यांच्या आवाजाचा पोत, हाका लांबविण्याची- हेल काढण्याची शैली आणि वाक्यं मध्येच सोडून देऊन साधलेला परिणाम माझ्या पूर्णपणे स्मरणात आहे. 'सुंदर मी होणार 'मधली त्यांची दीदीराजेची स्मरणारे जे अगदी थोडे वृद्ध लोक मला भेटले ते एकमुखानं म्हणाले, की सुनीताबाईंना दीदीराजे जशी समजली तशी कोणाला समजली नाही. नाटकात चाकाच्या खुर्चीवर बसून त्यांनी जशी कविता सादर केली तशी कोणालाही करता आली नाही. याविषयी त्या एकदा म्हणाल्या, "दीदीराजे करताना नुसतं शरीर अपंग दिसून चालत नाही. अभिनेत्रीचा चेहरापण अपंग दिसावा लागतो.' सुनीताबाईंना किती आणि काय दिसलं होतं, हे अशा वेळी दिसायचं! सुनीताबाई हे एक अदभूत रसायन होतं. पु.लं. आणि त्या ही एक विलक्षण सांगड होती. सगळी मतमतांतरं गृहीत धरूनही अशी व्यक्ती पुन्हा होणार नाही, असा गहिरा नातेसंबंध वारंवार दिसणार नाही. असंच वाटतं.

'तुझे आहे तुजपाशी' या नाटकात पु.लं.नी 'उषा'चं जे वर्णन केलं ते सुनीताबाईना बव्हंशी लागू होतं. हे वर्णन सतीशच्या तोंडी असे होते कधी गौरीसारखी अल्लड.... कधी पार्वतीसारखी निग्रही... कधी उमेसारखी प्रेमळ..... तर कधी साक्षात महिषासुरमर्दिनी... अशी अनेक रूपं धारण करणारी देवता होती; असे सांगताना तो पुढे म्हणतो, पण... जाऊ द्या. जखमेवरच्या खपल्या बेतानं काढाव्यात. . उगाच भळाभळा रक्त वाहायला लागायचं.' सुनीताबाईंना आठवताना मला हीच भीती वाटते. म्हणून इथेच थांबते.

मंगला गोडबोले
दैनिक सकाळ
९/११/२००९

Thursday, October 6, 2022

कविता 'जगणारी' विदुषी सुनीताबाई देशपांडे

सुनीताबाई देशपांडे म्हटलं, की आपल्या चटकन् आठवतं पु.लं.ची पत्नी. पु.लं.ची पत्नी ही त्यांची ओळख आहेच, किंबहुना तो त्यांचा बहुमान आहे हे नक्की. पण केवळ पु.लंमुळे त्यांना ओळख नाही. एक अतिशय समर्थ आणि व्यासंगी लेखिका आणि विदुषी म्हणून सुनीताबाईंना महाराष्ट्र ओळखतो. त्यांचं कवितेवरिल जिवापाड प्रेम, पु.लं.सोबत संसार करण्याचं विलक्षण कसब आणि त्यांनी केलेलं प्रामाणिक लेखन यातून त्यांच्या आयुष्यातील समृद्धीचा अंदाज लागू शकतो. पूर्वाश्रमीच्या सुनीता ठाकूर यांचा जन्म रत्नागिरीमधे ३ जुलै १९२६ रोजी झाला. त्या एक अत्यंत हुशार विद्यार्थिनी होत्या हे वेगळं सांगायला नको.
 
सुनीताबाईंचे वडिल, सदानंद ठाकूर हे फार मोठे वकील होते. काँग्रेसमधे असणार्या त्यांच्या मामांनी १९४२मध्ये भुमीगत रेडिओ पुन्हा सुरू करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. परंतु काही कारणांस्तव ते काम पूर्ण झाले नाही. सुनीताबाईंनी मोर्चाचे नेतृत्वही केले होते. आणि मुख्य म्हणजे त्या एकदा मिलिट्रीच्या गाड्यांच्या ताफ्यालाही सामोर्या गेल्या होत्या! वाटतं, की कदाचित याच सगळ्या अनुभवसंचितातून त्यांच्यामधे एक अढळ कणखरता निर्माण झाली असावी. नाहितर, अवघ्या अस्तित्वावर कवितेचा हळवा संवेदन धागा तोलून धरताना अशी कणखरता आणि खरंतर शिस्तही सांभाळणं किती अवघड आहे! शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या रत्नागिरीहून मुंबईला स्थायिक झाल्या. तिथे त्या ओरिएंटल हायस्कूलमधे शिकवत होत्या. आश्चर्य म्हणजे पु.ल.ही तेव्हा ओरिएंटल हायस्कूलमधे शिक्षक म्हणून काम करत होते. तेव्हा दोघांच्याही कवितेवरच्या नितांत प्रेमामुळे त्यांच्या मनाचा धागा जुळला, आणि दोघांच्याही जीवनाची कविता बहरुन आली! १२ जून १९४६ रोजी त्यांचा विवाह झाला. तोही नोंदणी पद्धतीने.

त्यांनी अनेक चित्रपट व नाटकांमधून उत्तम अभिनयही केला. 'नवरा बायको' या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. 'वंदे मातरम्' या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रसिद्ध झाली. 'राजमाता जिजाबाई' हा एकपात्री प्रयोगही त्यांनी केला. 'सुंदर मी होणार' मधली दीदीराजे ही महत्वाची भूमिकाही त्यांनी साकारली. पु.लं. बरोबर त्यांनी अनेक नाटकं साकारली. 'वार्यावरची वरात' 'बटाट्याची चाळ' अशा अनेक नाटकांमधे त्यांनी भुमिका केल्या. सहचरणीच्या आपल्या भूमिकेत त्यांनी पु.लं.च्या कामात वेळोवेळी हातभार लावला. अर्थात्, त्यांच्यासरख्या इतक्या हरहुन्नरी माणसासोबत संसार करणं हेही कर्तृत्वच म्हणावं लागेल!

सुनीताबाईंना अवघा महाराष्ट्र पु.लं.ची पत्नी म्हणून मुख्यत्वे ओळखत असला, तरी पु.लं.च्या इतक्या भव्य यशामधे सुनीताबाईंचा सिंहाचा वाटा आहे यात संशय नाही. ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ जयंत नारळीकर म्हटले होते, की "पुलं पुरुषोत्तम झाले, ह्यामागचं कारण, त्यांना वेळोवेळी "सुनीत" करणाऱ्या सुनीताताई." या शब्दांतून, या विदुषीचं आपला व्यासंग सांभाळून पतीला अखंड साथ देण्याचं सहजव्रत स्पष्टपणे जाणवतं. पण पु.लं.च्या मनात सुनीताबाईंबद्दल नक्कीच एक सप्रेम आदर होता. तेच एकदा म्हटले होते, की “सुनीता फार बुद्धिमान आहे, मॅक्ट्रिकला गणिताला तिला शंभर पैकी शंभर मार्क मिळाले होते. नंतर बेचाळीसच्या चळवळीत गेली, संगिनी रोखून गोरे शिपाई समोर असताना मोर्चातील सर्व पळाले, ती एकदम ताठ उभी होती! तिला वजा केले, तर बाकी उरेल; पण चार लोकांची असते तशी. वारा प्यालेल्या वासरासारखी माझी अवस्था झाली असती. बंगल्यात राहिलो असतो. ए सी गाडीतून फिरलो असतो. बंगल्यासमोर नाना क्षेत्रातील कलावंतासमवेत मैफिली भरल्या असत्या. एकूण भोगाशिवाय कशाला स्थान राहिले नसते.”
 
यातूनच पुलंच्या जीवनातील सुनीताबाईंचा अविभाज्य वाटा दिसून येतो. या दांपत्याचं जीवन सर्वांगाने समृद्ध होतंच, पण लौकिक अर्थाने समृद्ध असूनसुद्धा सुनीताबाई फार काटकसर करत. त्यांचा हा स्वभाव हे पुलंच्या मिश्किल विनोदांचं अनेकवेळा मूळ होत.
 
कविता हा सुनीताबाईंचा आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय. मुळातच रसिकतेने काठोकाठ भरलेल्या मनाला कविता दूरची कशी बरं वाटेल? ती नेहमीच त्यांच्या जवळ रराहिली. त्यांची होऊन राहिली. अगदी शेवटपर्यंत! लहान मुलांंनी मुग्धपणे आनंदासाठी बडबड गाणी म्हणावीत, श्लोक, स्तोत्र वगैरे अस्खलित म्हणून दाखवावं तशाच त्या कविता म्हणत. त्याच आनंदात, त्याच आस्थेने. अगदी गोविंदाग्रजांपासून कित्तीतरी कवींच्या कविता त्यांना संपूर्ण तोंडपाठ असायच्या. त्या वारंवार म्हणताना, मनात खोलवर होत जाणारं त्याचं चिंतन याचा केवळ अंदाजच आपण बांधू शकतो. कवितेच्या याच उत्कट प्रेमामुळे पुढे पु.ल. आणि सुनीताबाईंनी मिळून काव्यवाचनाचे जाहिर कार्यक्रम सुरू केले. बा.भ. बोरकर, बा.सी. मर्ढेकर, आरती प्रभू अशा काही निवडक कविंच्या कवितांचा मागोवा घेणार्या या कार्यक्रमाला रसिकांची अलोट गर्दी होत असे. ते कार्यक्रम केवळ कवितेच्या प्रामाणिक प्रेमातून केले असले, तरी त्यातून सुनीताबाईंना बरेच नावलौकिक मिळाले. सुनीताबाईंचं मराठी भाषेवर प्रभुत्व तर होतंच, शिवाय बंगाली आणि उर्दू भाषेचाही त्यांचा उत्तम अभ्यास होता.

सुनीता देशपांडेंशी निगडीत आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचा जी.एं. सोबतचा पत्रव्यवहार. जी.ए. कुलकर्णींच्या लेखनाचं मोठेपण सुनीताबाई आणि पु.ल. जाणून होते. ते या दोघांच्याही आवडीचे लेखक होते. पण सुनीताबाई आणि जी.ए. कुलकर्णी या दोघांमधलं मैत्र हे काही विलक्षणच होतं. त्यांचा पत्रव्यवहार हा फार मोलाचा होता. पुस्तकांबद्दल, इतर चांगल्या साहित्याबद्दल, आणि अशा आणखी बर्याच गोष्टींबद्दल त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्र म्हणजे वाचकाला समृद्ध करणारा संवाद आहे. तो पत्रव्यवहार २००३साली 'प्रिय जीए' या नावाने सुनीताबाईंनी प्रकाशितही केला आहे. 'समांतर जीवन' (१९९२), 'सोयरे सकळ' (१९९८), मनातलं आकाश, मण्यांची माळ (२००२) ही त्यांची प्रकाशित झालेली पुस्तकंही वाचकपसंतीस पात्र ठरली आहेत. सुनीता देशपांडेंचं पुस्तक म्हटल्यावर अनेकांना आठवतं ते 'आहे मनोहर तरी'. १९९० मधे प्रकाशित झालेलं सुनीताबाईंचं हे आत्मचरित्र त्याच्या नावानेही आपल्याला भुरळ घालतं! यामधे त्यांच्या सहजिवनाचा अनुभव अत्यंत प्रामाणिकपणे व्यक्त केलेला आहे. हे पुस्तक प्रकाशित होताच त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता, अजूनही लाभतो आहे.
 
सुनीताबाईंच्या आणि खरंतर या दांपत्याच्या अगणित वैशिष्ट्यांपैकी आणखी एक म्हणजे औदार्य! अनेकानेक सामाजिक साहित्यिक संस्थांना त्यांनी भरभरुन देणग्या दिल्या. विशेष म्हणजे त्या प्रत्येक संस्थेला ती देणगी त्यांची असल्याचे अनुच्चारीत ठेवायला सांगून दिलेल्या त्या देणग्या म्हणजे सामाजिक कर्तव्याचं निर्मोहीपणे जपलेलं भान म्हणावं लागेल. पु.लं.च्या निधनानंतर त्यांनी 'पु.ल.देशपांडे' फाऊंडेशनची स्थापना करुन अशाच अनेक देणग्या निर्वाच्यता ठेऊन दिल्या. देणग्या योग्य त्या संस्थेच्या आणि योग्य त्या हातांतच जायला हव्यात हा त्यांचा कटाक्ष सदैव असे.
 
'इतकं समृद्ध जगल्यावर, मृत्यूही तितकाच वैभवशाली यावा. त्याने उगाच रेंगाळू नये. माणसाला केविलवाणं करु नये' असं एकदा त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या शेवटच्या दिवसांत ग्लानीत असतानाही त्यांच्या ओठांवर कविता असायची! माणसाने इष्टदेवतेचा अखंड जप करावा तसं ग्लानी अवस्थेतही त्यांचं कविता म्हणणं चालूच असे. आयुष्यसाराचं तीर्थ ओंजळीत वहाणारी कविता, तिच तर त्यांची देवता होती. शेवटच्या क्षणापर्यंत या विदुषीने तिला जपलं होतं. ७ नोव्हेंबर २००९ रोजी त्यांच्या देहातून कविता बाहेर पडली!
कविता जगणार्या विदुषीने शब्दांचा निरोप घेतला.

~ पार्थ जोशी

Tuesday, June 28, 2022

संवेदनशील आणि कर्तबगार सुनीताबाई - गोविंद तळवलकर

सुनीताबाई देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व करारी आणि संवेदनशीलही. आथिर्क व्यवहार असोत, मुदिते तपासणे असो वा कुणासाठी मदतीचा हात पुढे करणे असो, त्यात त्यांचा काटेकोरपणा दिसून येई आणि संवेदनशीलताही..

प्रथम पु. ल. आणि आता सुनीताबाई. दोघांच्या निधनामुळे जवळपास ४० वर्षांचा संबंध संपुष्टात आला आणि त्याचबरोबर या काळातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. तसे पाहिले तर दोघांचीही व्यक्तित्व स्वतंत्र होती, पण दोघेही परस्परांवर किती अवलंबून होते, हे सतत जाणवत होते.

काही वेळा कृतक रागाने सुनीताबाई म्हणत, भाईमुळे आपल्याला आपले काही करता वा लिहिता-वाचता येत नाही; पण त्या पु.लं.शी इतक्या समरस झालेल्या होत्या की, त्यांच्या नंतरच्या काळात त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्त्या, त्यांच्या संबंधीचा आथिर्क व्यवहार इत्यादी कामात सुनीताबाई बराच काळ व्यग्र राहिल्या. नाहीतरी पु. ल. असतानाही लिखाण तयार झाल्यावर त्याच्या शुद्धलेखनाची तपासणी, प्रती तयार करणे आणि प्रकाशकाकडे हस्तलिखित देऊन मुदिते आली की, ती अनेकवार तपासणे ही जबाबदारी सुनीताबाईच आवडीने पार पाडीत असत.

मुदितांबाबत त्या नेहमीच कटाक्ष बाळगीत. यामुळेच कुसुमाग्रजांच्या 'विशाखा' या संग्रहाच्या आवृत्तीत चुका आढळल्यावर त्यांनी दुरुस्त्या करून तात्यासाहेबांकडे पाठवल्या. इतके करूनही नव्या आवृत्तीत चुका राहिल्याच.

वेळ मिळाल्यावर त्यांनी पु.लं.च्या नंतर काही लिखाण केले, पण त्यातलेही काही दोघांच्या सहजीवनासंबंधी बरेच होते. पु.ल. व सुनीताबाई यांच्या स्वभावातही अंतर होते. पु.लं.ना सहसा कोणाला दुखवायचे नसे. यामुळे काही वेळा गोंधळ होई आणि तो निस्तरण्याचे काम सुनीताबाईंवर पडे आणि वाईटपणाच्या त्या धनी होत. पु.ल. यांच्या लिखाणावर सर्व संस्कार करण्याप्रमाणेच नाटकांच्या व एकपात्री प्रयोगांची सर्व व्यवस्था सुनीताबाई सांभाळत होत्या. काटेकोरपणा आणि व्यवस्थितपणा हा त्यांच्यापाशी जन्मजातच होता. यामुळे भाषणाचा कार्यक्रम ठरवण्यास कोणी आल्यास त्याची पूर्वपरीक्षा होत असे. पण यामुळे कार्यक्रमात कसलाही व्यत्यय येत नसे. याच त्यांच्या वृत्तीमुळे पु. ल. देशपांडे फौंडेशनतफेर् देणग्या देण्यासाठी निवड करण्यात त्यांचा बराच वेळ जाई.

आता तो काळ संपला...

'पु.ल.' फौंडेशनच्या संबंधातील प्राप्तिकराच्या संबंधात सुनीताबाईंना काही प्रश्न होते. कोणत्या रीतीने कायदा मोडला जाता कामा नये, पण नोकरशहांमुळे नियमांचा भलताच अर्थ लावला जाऊ नये, असे त्यांना वाटू लागले. मग पालखीवालांचा सल्ला घेण्याचे ठरले. पु.ल. व सुनीताबाईंनी हा विषय माझ्याकडे काढला, तेव्हा पालखीवालांशी माझे स्नेहाचे संबंध असल्यामुळे मी भेट ठरवली. आम्ही तिघे गेलो. प्रश्न काय आहे, हे सुनीताबाईंनी स्पष्ट केले व शंका सांगितल्या. पालखीवाला जेव्हा कोणतीही गोष्ट कमालीच्या एकाग्रतेने ऐकत व विचार करत तेव्हा वातानुकूलित दालनातही त्यांच्या कपाळावर घाम जमत असे. तसे झाले आणि सात-आठ मिनिटांत त्यांनी सुनीताबाईंचा विचार पूर्णत: बरोबर ठरवला. ते त्यांना म्हणाले की, तुम्ही चांगल्या वकील झाल्या असता.
          
पु. ल. व सुनीताबाई काही ध्येयवादामुळे भाऊसाहेब हिरे यांच्या मालेगावमधील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक म्हणून काम करत होते आणि त्या आश्रमाचे व्यवस्थापन सुनीताबाई सांभाळत. एकदा महाराष्ट्रातील काही प्रमुख गांधीवादी तिथे राहायला आले असता, आयत्या वेळी त्यापैकी काहींनी गाईचे दूध व त्या दुधाचेच दही हवे, अशी मागणी केली. आयत्या वेळी हे जमणे शक्य नव्हते. तेव्हा सुनीताबाईंनी त्यांना नुसते गाईचे दूध नाही, असे सांगितले नाही, तर तुमचा जर इतका कडक नियम आहे तर गाईचे दूध मिळू शकते की नाही, याची आधी चौकशी करायची होती. तुमचे नियम इतरांना त्रासदायक होऊ शकतात, याचा विचार करायला हवा होता, असे खडसावले.

याच सुनीताबाई मल्लिकार्जुन मन्सूर, वसंतराव देशपांडे, कवी बोरकर, कुमार गंधर्व इत्यादींचा अतिशय आपुलकीने पाहुणचार करताना मी पाहिले आहे. मन्सूर यांचे सोवळेओवळे असे. तेही त्या कटाक्षाने सांभाळत. काव्यात रमणाऱ्या सुनीताबाई सुग्रण होत्या. त्याचा अनुभव मी अनेकदा घेतला आणि ते दोघेही आमच्या घरी येत तेव्हा सौ. शकुंतलाच्या पदार्थांचे कौतुक करून आस्वाद घेत. मित्रपरिवारातील कोणी आजारी पडल्यास नुसती चौकशी करून न थांबता शक्य ती मदत करण्यास सुनीताबाई चुकत नसत. भाषाशास्त्रज्ञ डॉ. कालेलकर यांच्या अखेरच्या आजारात सुनीताबाईच सर्व पाहत होत्या.

अरुण लिमये हे कॅन्सरने आजारी झाले तेव्हा प्रथम अमेरिकेतून औषध आणण्याची कल्पना सुनीताबाईंची व कुमुद मेहता यांची. त्या काळात परकी चलनावर बरीच नियंत्रणे होती आणि सरकारी परवाना लागत असे. त्या दोघी माझ्याकडे आल्या आणि आम्ही तिघांनी बरीच खटपट करून औषध आणण्यात यश मिळवले. नंतर लिमये यांना उपचारासाठी परदेशी पाठवण्याच्या कामी सुनीताबाई व कुमुद मेहता यांचा पुढाकार होता.

पु. ल. यांचे एकपात्री प्रयोग व पुस्तकांची विक्रमी विक्री हे पर्व सुरू होण्यापूवीर् पु.ल. दिल्लीत आकाशवाणी खात्यातफेर् नुकत्याच सुरू झालेल्या टीव्ही विभागात काम करत होते. त्या काळात राजधानीत मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा संकल्प सुटला; पण संकल्प व सिद्धी यात पैसा या परमेश्वराची इच्छा उभी असते. संकल्प करणाऱ्यांनी याचा विचार केला नव्हता. हे पाहून पु. ल. व सुनीताबाई यांनी एक कार्यक्रम केला आणि प्राथमिक खर्चाची सोय करून दिली.

काव्य, ललित साहित्य यांची उत्तम जाण असलेल्या सुनीताबाईंना खगोलशास्त्राचे आकर्षण होते. यासंबंधी त्यांनी काही वाचन केले होते. या आवडीमुळे त्यांनी नारळीकरांच्या संस्थेला मदत केली. कवितेच्या आवडीतूनच पु. ल. व सुनीताबाई यांनी काव्यवाचनाचे कार्यक्रम केले. प्रवासातही कवितांची उजळणी होत असे. यामुळे त्यांच्याबरोबरचा प्रवास आनंददायक होत असे.

चाळीसएक वर्षांच्या सहवासात आमचे अनेक सुखसंवाद झाले आणि काही वेळा वादही झाले; पण वाद मित्रत्वाचे व निकोप वृत्तीचे होते. तो काळ आता संपला.

गोविंद तळवलकर
अमेरिका
महाराष्ट्र टाईम्स
१०-११-२००९

Tuesday, June 14, 2022

पु॰ ल॰ — दोन अपरिचित आठवणी - प्रकाश चांदे

भविष्यावर प्रत्येकाचा आपल्याला आलेल्या अनुभवानुसार विश्वास असतो॰ आता इतक्या वर्षांनंतर मात्र या बाबतीत बहुतेक लोक टोकाची भूमिका घेतात असे वाटते॰ ते शास्त्र नसून Behavirol Science आहे असे वाटते॰ काही ठोकताळे बांधता येतात; पण गणित अथवा अन्य शास्त्रांप्रमाणे सूत्रांत बांधणारे शास्त्र नाही असे वाटते॰

या बाबतीत प्रसिद्ध लेखक बाळ सामंत यांनी त्यांच्या ‘ मैफल ‘ या पुस्तकात दिलेली आठवण उद्बोधक आहे॰ १९४८-४९ च्या सुमारास गिरगावात केनेडी ब्रिजजवळ चित्रकार दीनानाथ दलाल यांचा स्टुडिओ होता॰ दलाल हे नामवंत चित्रकार, पुस्तकांची वेष्टणे रेखाटण्यात वाकबगार आणि ‘ दीपावली ‘ या मासिकाचे संपादक॰ त्यामुळे त्यांच्याकडे जो वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांचा राबता असायचा त्यांत साहित्यिकही असायचे॰ त्यांच्याकडे जमणार्‍यांत केशवराव भोळे, अनंत काणेकर यांच्यासारख्या ज्येष्ठांपासून पंचविशीतील बाळ सामंत,पु॰ ल॰ देशपांडे यांच्यापर्यंत सर्वजण असायचे॰ एक दिवस एक चेहेर्‍यावरून भविष्य सांगणारा कानडी ज्योतिषी तेथे आला॰ त्याला कन्नड आणि मोडके तोडके इंग्लिश या भाषा येत होत्या॰ भविष्य म्हटल्यावर कितीही त्यावर विश्वास न ठेवणारा असला तरी तो स्वत:चे वा अन्य माणसाचे भविष्य जाणून घेण्यास उत्सुक असतोच॰ थोड्यावेळाने पी॰ एल॰ तेथे आले॰ ते समाजवादी॰ भविष्य वगैरे गोष्टींची चेष्टा करणारे॰ त्यांनी चेहर्‍यावर कुचेष्टेचे भाव आणून काही शेरेबाजी केली॰ ती कानडी माणसाला अर्थातच कळली नाही॰ शिवाय त्याला पी॰ एल॰ कोण होते हेही ठाऊक नव्हते॰ अर्थात त्यावेळेस पी॰ एल॰, लाडके व्यक्तीमत्व तर सोडाच नामवंतही झालेले नव्हते॰ पण हे अवमानकारक काहीतरी बोलले हे त्या ज्योतिषाने ओळखले॰ त्याने पी॰ एल॰च्या चेहर्‍याकडे बघितले आणि शांतपणे सांगितले की या माणसाचे लग्न झाल्यावर यांची पत्नी २१ दिवसाच्या आत निधन पावली आहे॰ पी॰ एल॰ हादरले ! कारण गोष्ट खरी होती॰ हे पुस्तक 1984 – 85 च्या सुमारास प्रकाशित झाले आहे॰

नंतर २००० साली मी हैदराबादला गेलो होतो, तेव्हा नेहरूंचे अभ्यासक डॉ॰ न॰ गो॰ राजूरकर यांच्याकडे गेलो होतो॰ त्यांना राज्यशास्त्राबरोबर ज्या अन्य विषयांत रूची होती त्यात ज्योतिष हा विषय होता॰ त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे॰ त्यांनी मला जर असे काही ज्योतिषाचे खरे अनुभव आले असतील तर सांगण्याची विनंती केली॰ मी हा प्रसंग सांगितला॰ तो त्यांना ठाऊक नव्हता॰ ते म्हणाले की मी या विषयावरच्या व्याख्यानात या गोष्टीचा उल्लेख करेन, पण त्यांना त्याचा पुरावा हवा होता॰ मी या पुस्तकाचे नाव सांगितले॰ ते पुस्तक त्यांना हैदराबादच्या ग्रंथालयात काही मिळाले नाही॰ इकडे मलाही हे पुस्तक मिळेना॰ २००४ च्या डिसेंबरमध्ये म्याजेस्टिक प्रकाशनाच्या अशोक कोठावळे यांच्या मुलीचे लग्न होते॰ त्या लग्नाला बाळ सामंत आले होते॰ त्यावेळेस ते ८२ वर्षांचे होते॰ त्यांना मी भेटलो; आणि या पुस्तकाबद्दल सांगून याची एक प्रत मला विकत हवी आहे, असे सांगितले॰ त्यावेळेस त्यांना स्मृतीभ्रंश झालेला होता॰ त्यांना आपण असे पुस्तक लिहिले आहे हेच आठवेना; त्यामुळे तो प्रसंग आठवणे तर शक्यच नव्हते॰ पण ते म्हणाले की घरी बघतो, आणि प्रत असली तर तुला पाठवतो॰ मी माझे कार्ड त्यांना दिले; आणि पुस्तक व्ही॰ पी॰ ने पाठवावयास सुचवले॰ ती प्रत काही मला आली नाही॰ मात्र, एक दोन महिन्यांनी मी पुण्याला डे॰ जिमखान्यावर सकाळी एका मित्राची वाट बघत होतो॰ तेथेच ‘ उत्कर्ष प्रकाशन ‘ चे ऑफिस आणि दुकान होते॰ त्यांनीच हे पुस्तक प्रकाशित केले आहे॰ त्यांना सहज विचारले तर नुकतीच नवीन आवृत्ती प्रकाशित झालेली होती, त्यामुळे ते पुस्तक मिळाले॰ ते मी विकत घेऊन ताबडतोब समोरं असलेल्या मुख्य पो॰ ऑ॰ मधून न॰ गो॰ रा॰ ना बुक पोस्ट केले॰

पण या पी॰एल॰ च्या प्रसंगाला आणखी एक उपकथानक आहे॰ विनोदी लेखक रमेश मंत्री यानी त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग ‘प्रारंभ‘ या नावाने लिहिला आहे॰ ( नंतर त्यांना अर्धांग वायुचा झटका आल्याने उरलेले दोन भाग त्यांना लिहिताच आले नाहीत ! काय दुर्दैव ना ? ) त्यात एक प्रसंग असा आहे॰ रमेश मंत्री उपवधू झाले आणि त्यांना लग्नासाठी मुली सांगून येऊ लागल्या॰ त्यांना एक अत्यंत सुंदर आणि पदवीधर ( १९५०च्या दशकात पदवीधर मुली अपवादानेच असायच्या॰ ) मुलगी सांगून आली॰ मात्र, मुलीच्या भावाने आणि वडिलांनी मंत्रींची पत्रिका मागितली॰ कारण तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न एका लेखकाशी झाले होते; आणि ती ३ आठवड्यांत निवर्तली होती॰ मंत्रींचे आई – वडील लहानपणीच गेल्यामुळे त्यांचे शिक्षण वेगवेगळ्या नातेवाईकांकडे झाले; त्यामुळे पत्रिका वगैरे कुठून असणार ? त्यामुळे मंत्रीनी पत्रिकेबाबत असमर्थता दर्शवताच ते कुटुंबीय back out झाले॰ ‘ प्रारंभ ‘ हे पुस्तक १९९३ साली प्रकाशित झाले; आणि मी त्याच वेळी वाचले होते॰ त्यावेळी तो लेखक कोण हे कुतूहल होते; पण मी त्याचा पाठपुरावा केला नव्हता॰ मात्र, ३-४ वर्षांनी हे पुस्तक मी परत वाचले; आणि मला चटकन सुचले की तो लेखक म्हणजे पी॰ एल॰ ! या बाबतीतले आपले गुरु म्हणजे रवींद्र पिंगे॰ मी त्यांना फोन केला॰ ते पण चक्रावले; पण म्हणाले की तो पी॰ एल॰ नाही॰ मी त्यांना ‘ प्रारंभ ‘ आणि ‘ मैफल ‘ मधली ती पृष्ठे परत वाचण्यास सुचवले; आणि काय आश्चर्य ? दोन तीन दिवसांनी मला पिंगे ‘ आयडियल ‘ मध्ये भेटले तेव्हा म्हणाले की तुझा तर्क अचूक आहे॰ तो पी॰ एल॰च आहे॰

यात रमेश मंत्रींचा मोठेपणा दिसला, तो मला आवडला॰ दुसरा कोणी असता तर ‘ यामुळे पु॰ लंचा साडू होण्याचा माझा योग हुकला ‘,असे लिहून मोकळा झाला असता॰ ( लेखक आनंद यादवना लहानपणी कोल्हापूर जवळच्या एका खेडेगावात एक मंत्री म्हणून मारकुटे मास्तर होते असे त्यांनी ‘ झोंबी ‘ या त्यांच्या आत्मकथनात लिहिले आहे॰ त्यावर रमेश मंत्रींनी ‘ हे मारकुटे मंत्री मास्तर म्हणजे माझे काका ‘ असे कबूल केले आहे ! )॰

मात्र, याच रमेश मंत्रींनी पी॰ एल॰ बाबतची आणखी एक आठवण सांगितली आहे; ती पी॰ एल॰ आणि सुनीताबाईंचा मोठेपणा सांगणारी आहे॰ मात्र ही आठवण बर्‍याच जणांना ठाऊक नाही॰ मंत्री आणि पी॰ एल॰ एकाच वर्षी एम॰ ए॰ चा अभ्यास करत होते॰ मंत्रींची परिस्थिती खूपच हलाखीची होती॰ कधी कधी त्यांना जेवणाही मिळत नसे॰ एक दिवस पी॰ एल॰ म्हणाले, ‘ रमेश, तू उद्या सकाळपासून माझ्याकडे दिवसभर अभ्यासाला आणि जेवायला ये॰ ‘ मंत्रींना दुहेरी आनंद झाला॰ कारण पी॰ एल॰ बुद्धिमान, तो फायदा; आणि दुपारचे जेवण सुटले ! त्याप्रमाणे ते सकाळी अभ्यासाला गेले॰ तो जोरात चालू झाला॰ सुनीताबाई घरात नव्हत्या॰ बाराचा सुमार आला तरी सुनिताबाईंचा पत्ता नाही॰ जेवणाकडे लक्ष ठेवत अभ्यास चालू ठेवला॰ अखेरीस दोन वाजायला आले, तरी सुनीताबाई आल्या नव्हत्या; तेव्हा मंत्रींच्या लक्षात आले की आज काही आपणास येथे जेवायला मिळणार नाही॰ ते चिडले; पण तो राग न दाखवता ते त्यांच्या खोलीवर निघून गेले॰ नंतर काही दिवस गेले; आणि हे पतीपत्नी मंत्रींना भेटले॰ तेव्हा पी॰ एल॰ म्हणाले की, अरे रमेश, त्या दिवशी तुला जेवायला बोलावले, पण तुला जेवायला न घालता उपाशीच परत पाठवले; म्हणून तू माझ्यावर रागावला असशील॰ पण अरे काय करणार ? सुनीता सकाळपासून रेशनच्या रांगेत उभी होती; पण त्या दिवशी चार वाजले तरी रेशनवर धान्य आलेच नव्हते॰ मग ती तशीच परतली॰ रेशनवर धान्य मिळाले नाही, म्हणून आम्हीही उपाशीच राहिलो; कारण काळ्या बाजारातून धान्य घ्यायचे नाही, अशी एक देशभक्त, सच्चा समाजवादी म्हणून आम्ही शपथ घेतली आहे ना ?

78 लाख रुपये वाटणार्‍या पी॰ एल॰पेक्षा हे पी॰ एल॰ मला मोठे वाटतात !

प्रकाश चांदे
मूळ स्रोत -> https://maitri2012.wordpress.com/2013/08/16/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a5%b0-%e0%a4%b2%e0%a5%b0-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80/

Thursday, June 9, 2022

एक आनंदाचा ठेवा - मिलिंद जोशी

प्रिय पु. ल.,

कित्येक वर्षापूर्वीचा पुण्यामधला एक उन्हाळा आठवतो... बजाज स्कूटर्स मध्ये ट्रेनिंग साठी तीन महिने होतो... कंपनीत संप झाल्यामुळे ट्रेनिंग खंडित... पुण्यात मी उपरा, नवीन आणि एकटा! एका रविवारी नगरपालिका वाचनालयात म. टा. मध्ये तुमचा 'जनता शिशु वर्गात आम्ही' हा लेख उभ्या उभ्या (मनात हसून हसून लोळत) वाचला, आणि डोक्यात किडा आला...त्या वयात किडे डोक्यातच थांबत नसत...फोन नंबर शोधण अगदीच सोप होत... फिरवण सुद्धा कठीण नव्हत... सुनिता बाईंनी उचलला, “तो घरी नाही, पण दोन दिवसांनी पुन्हा प्रयत्न करा, मी सांगते भाईला लेख तुम्हाला खूप आवडला” वगैरे...

दोन दिवसांनी मी पुन्हा खरच फोन केला (संप संपला नव्हता)... या वेळी तुम्ही स्वतःच उचललात, आणि 'हो, आहे ना घरी; आत्ता लगेच येऊ शकाल का, जरूर' एवढ्या भरघोस आमंत्रणावर पुढच्या अर्ध्या तासात मी पोचलो सुद्धा! सुरुवातीला थोडी औपचारिक ओळख वगैरे करून घेतल्यावर पाच मिनिटातच, तुम्ही मी गेली कित्येक वर्ष तुमचा शेजारी असल्यासारख्या सहजपणे गप्पा मारायला सुरुवात केलीत. मी मात्र माझ्या तब्बल वीसेक वर्ष वयाच्या परिपक्वतेचा आब राखून अस्सल टीकाकाराच्या थाटात, तुमची मुलाखत घ्यायला आल्यासारखा प्रश्न विचारत होतो. '"अडला हरी" (माझा अत्यंत आवडता लेख/कथा) शिवाय तुम्ही कथालेखन अस केलच नाही, नाही?' 'नाही, काय आहे, लेखक म्हणून मला तो प्रकार फार appeal झालाच नाही कधी. गंगाधर गाडगीळाना छान जमत ते'... "काय वाट्टेल ते होईल" मधल्या 'बहात्तर रोगांवर अक्सीर इलाज - लसणीच तिखट' ची आठवण निघाली... त्यावरून, जौर्जिअन लोकांच्या पाककृती, मेक्सिकन लोकांच तिखट खाण, हालापिन्या (jalapeno) नावाच्या महाजालीम मिरच्या, अमेरिकेतल्या चीनी जेवणाची गम्मत अश्या असंख्य गोष्टी जादूगाराच्या पोतडी मधून बाहेर येताना बघून माझे विस्फारलेले डोळे अजून आठवतात... तरीही माझ्यातला टीकाकार मागे हटत नव्हता... '"सोन्या बागलाणकर" सारख्या लेखनामध्ये वूडहाउसचा एकंदर प्रभाव जाणवतो, नाही? तुम्हाला वूस्टर किंवा एम्सवर्थ सारखे मानसपुत्र नाही करावेसे वाटले?' 'नाही, आपल्याकडे सुद्धा चिं. वि. नी केले, पण त्याला एक नेट लागतो... वूडहाउस प्रचंड ताकदीचा लेखक होता...' मग, वूडहाउस वर एक प्रदीर्घ टिप्पणी, त्याच्या कवितांचा उल्लेख, 'सुनिता, तू ऐकलयस’ (ह्यातला लेकी बोले सुने लागे भाग मला तेव्हाही कळला होता) अस म्हणून त्याची एक छोटी limerick म्हणून दाखवण...

सुनीताबाई फोन सांभाळत थोड्या थोड्या गप्पांमध्ये ही सामील होत होत्या...'कविता आवडतात का नाही?' मी नुकतच बापटांच 'मानसी' वाचल होत, त्यातल्या कवितांचा उल्लेख केल्यावर 'वा, छानच; पण ग्रेस वाचलंय का... "चंद्र माधवीचे प्रदेश"?' वरच्या माझ्या प्रामाणिक आणि बावळट 'प्रयत्न केला, पण ते चंद्राइतक्याच उंचीवरून डोक्यावरून गेले’ ह्या उत्तरावर तुमच हास्य... मग मात्र माझ्यातला अधाशी चाहता त्या स्वैर गप्पांमध्ये वाहून गेला होता, इथून पुढे मी बहुतांश श्रोत्याचच काम केल. काय नव्हत त्या गप्पांमध्ये... इतर अनेक लेखक-कवींचे उल्लेख, 'गुळाचा गणपती', सत्यजित रेंचे सिनेमे, टागोरांच्या कविता, रवींद्र संगीताच्या काही ओळी (त्या काळी मला बंगाली येत नसे, त्यामुळे नुसत्याच भक्तीभावांनी ऐकल्या होत्या)... अलिबाबाची गुहा समोर उघडलेली होती... आणि लुटून न्यायला मी एकटा, फक्त दोन डोळे आणि दोन कान घेऊन...आठवणीच्या पोतडीत भरभरून घेतलं. कसा कुणास ठाऊक पण विषय भारतीय समाजातल्या चाली-रिती, लग्न जुळवण, हुंडा वगैरे वर येउन पोचला… हुंडा मागण्याची आणि घेण्याची किळसवाणी पद्धत, त्याबद्दलचे अनेक विनोदी किस्से... माझी थट्टा 'इथे हो हो म्हणतोय, लग्नात भक्कम हुंडा वसूल करेल बघ!' (त्या विचाराचाही प्रश्नच नव्हता हो) गप्पा रंगतच जात होत्या... घड्याळाकडे माझ लक्ष नसण साहजिकच होत, पण तुम्ही - दोघांनीही - ते लक्षात न घेता केलेल्या आदरातिथ्याची कमाल वाटते... भेटायला आलेल्या एका जोडप्याला 'हा माझा तरुण मित्र मिलिंद' (कान धन्य!) अशी ओळखही करून दिल्याची आठवण हा आयुष्यभराचा ठेवा आहे.

लाज, संकोच वगैरे गोष्टींशी ज्या वयात तोंडओळख ही नसते, त्याच धिटाईनी आणि हावरटपणानी मी दोन-अडीच तास गप्पा मारत बसलो होतो... बाहेर काळोख दिसायला लागल्यावर तृप्ततेनी ओथंबून (खर तर नाही) मी जायला निघालो... वाकून नमस्कार केला... मनापासून... रस्त्यात, परतताना, या सगळ्या अद्भुत भेटीबद्दल स्वतःला चिमटे काढ काढून खात्री करून घेतली की आपण स्वप्नात नाही...तुमचे आभार मानणार पत्र लिहायचं असा निश्चय केला... प्रत्यक्षात आणायला थोडा उशीर झाला...

तुमची पुस्तकं, ध्वनी-फिती, चित्र-फिती असा हिमालयाएवढा सार्वजनिक खजिना तुम्ही मराठी समाजासाठी ठेवून गेलातच, पण माझ्यासाठी खास ह्या भेटीचे हे सुवर्णक्षण हा बापटांच्या भाषेत 'केवळ माझा सह्यकडा'! तुमच्या सार्वजनिक दर्शनानी मी अजूनही चार-चौघात सुद्धा पोट धरधरून हसतो... आणि नंतर कित्येकदा एकटा असताना ह्या अनमोल भेटीतल्या तुमच्या निरपेक्ष प्रेमाच्या आठवणींनी गहिवरतो... आजच्या दिवशी ती आठवण अटळच!

मिलिंद जोशी

Thursday, April 21, 2022

भाईकाका - (जयंत देशपांडे)

प्रत्येक पिढी ही भाग्यवान असते. आमच्या पहिल्या पिढीने महात्मा गांधी, बालगंधर्व, मास्टर दीनानाथ, ह्यांच्या सारखी अनेक थोर माणसं पाहिली. आमची पिढीही भाग्यवानच म्हटली पाहिजे, कारण आम्ही लता मंगेशकर, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, शिरवाडकर, पु. ल. देशपांडे ह्यांना पाहिलं व ऐकलंही. माझ्या हातून गेल्या जन्मी काहीतरी मोठं पुण्य झालं असणार म्हणूनच माझा जन्म देशपांडे कुटुंबात झाला. सर्व कुटुंबच मुळी रसिक. सर्वात मोठी वच्छीआत्या, भाईकाका, नंतर माझे वडील उमाकांत व नंतर रमाकांत. वच्छीआत्या व मीराआत्याचे लग्न माझ्या जन्माआधीच झालं होतं. वच्छीआत्या म्हणजे मायेचं पांघरूण होतं. सर्व भावंडांना आईबरोबरच तिने वाढवल्यामुळे तिच्याबद्दल सर्वांना आदरयुक्त प्रेम! धाकटी मीराआत्या ही समाजकारण, नाटक ह्यातच नेहमी गुंतलेली असायची. माझे वडील व रमाकाका यांच्यापैकी माझे वडील तबला वाजवायचे व नाटकात काम करायचे. रमाकांत हे उत्कृष्ट चित्रकार व चांगले अभिनेते-दिग्दर्शकही होते. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌मध्ये ते शिकवत.

भाईकाका (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पुलं) हे एक अजब रसायन होतं. काही लोक दैवी देणगी घेऊनच जन्माला येतात, त्यातलेच ते एक. हजरजबाबीपणा, तल्लख विनोदबुद्धी, मनमोकळा स्वभाव. वसंत बापट नेहमीच म्हणत, ‘भाईने अनेक क्षेत्रांत स्वैर संचार केला. संगीत, नाटक, लिखाण, समाजाबद्दल जाणीव, चित्रपटसृष्टी, पण कुठेही ‘गुळाचा गणपती’ होऊन बसले नाहीत. मात्र रसिकांच्या हृदयातली जागा त्यांनी कधीही सोडली नाही. त्यामुळेच ते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व झाले.’ भाईकाका घरात एक व बाहेर एक असे कधीच वागले नाहीत. घरातही त्यांची थट्टामस्करी, विनोद सतत चालूच असायचे. एखादं अगदी साधं उदाहरण द्यायचं तर 'भाईकाका आंघोळ झाली?' उत्तर कधीही सरळ नाही. 'वाटत नाही? वास येतोय?' शेवटी व्हीलचेअरवर असतानाही गप्पांना बसत आणि बाथरूमला जायला निघाले की, ‘प्रवास झेपला तर येतो परत गप्पांना’ असं म्हणत हसत हसत जात. घरातही ते तेवढेच रमलेले असायचे. आमच्या घरातली सर्व मुलांची नावं भाईकाकांनी ठेवली आहेत. माझं जयंत, माझा धाकटा भाऊ हेमंत, बहीण मंगल, तसंच रमाकांतकाकाच्या तिन्ही मुलांची नावं विभावरी, राजेंद्र, मिलिंद ही सर्व त्यांनीच ठेवलेली. एवढंच काय, मला मुलगी झाली हे ज्यावेळी त्यांना मी फोन करून सांगितलं, त्यावेळी ‘‘जयंत हिचं नाव चंदा ठेव हं!’’ असं बजावलं होतं. घरातल्या सर्व मुलांचं त्यांना कौतुक होतं.

सुरुवातीला भाईकाका ग्रँटरोडला मॉडेल हाऊस येथे चौबळांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहायचे. नंतर ते वरळीला ‘आशीर्वाद’मध्ये राहायला गेले. मधूनमधून पार्ल्याचे दत्ता पाखाडे मला व आजीला सकाळी कामावर जाताना त्यांच्या गाडीतून भाईकाकांकडे सोडत व संध्याकाळी परत घेऊन येत. तो पूर्ण दिवस भाईकाका-काकीच्या सहवासात, छान छान गोष्टी ऐकण्यात जाई. त्या काळात घरात मोटार असणं हे श्रीमंतीचं लक्षण मानलं जाई. माझे वडीलही तेव्हा ‘फ्रेंच मोटर कार’ कंपनीत होते. त्यामुळे माझ्या बालबुद्धीला मोटार हे एकमेव श्रीमंतीचं माप वाटे. एकदा अचानक माझ्या लक्षात आलं की, भाईकाकांकडे मोटार नाही. मला तो त्यांचा कमीपणा वाटून त्यांना मी तसं विचारलंही. त्यावर त्यांनी मला खाली आणलं आणि टॅक्सीला हात केला. मला तिच्यातून छानपैकी फिरवून आणल्यावर उतरताना मला सांगितलं, ‘तुला जितक्या काळ्या-पिवळ्या गाड्या दिसतायत ना, त्या सगळ्या माझ्याच आहेत.’ त्यांना थांबवून माझं नाव सांग. तुला पाहिजे तिथे त्या नेतील. ह्या सांगण्यावर मात्र त्यांनी काकीकडून व आजीकडून लाडिक दमही खाल्ला. ‘काय रे भाई, काहीतरी शिकवू नको त्याला.’ पण, पुढे भविष्यात मीही तोच धंदा स्वीकारला व स्वतःची कार हायरिंग कंपनी काढली.

भाईकाका मला म्हणत, ‘अरे जयंत, आपण दोघांनीच आपल्या घराण्यात धंदा केला, मी हसवण्याचा आणि तू फसवण्याचा.’ माझा फसवण्याचा का, तर मी टूरिस्ट टॅक्सीवाला म्हणून आणि शेवटी टॅक्सीवाला हा फसवणारा म्हणून प्रसिद्ध असतो ना!


भाईकाकांनी घरचा गणपती कधी चुकवला नाही. खरंतर त्यांचा व काकीचा देवावर विश्वास नव्हता. तरीही ते १९७४ सालापर्यंत दरवर्षी गणपतीला पार्ल्याला येत. आमच्यासाठी ती एक पर्वणी असायची. ते येणार म्हटल्यावर त्यांचे सर्व जुने मित्र त्यांना भेटायला येत. त्यांचे एक जुने मित्र श्री. साठे (भाईकाका त्यांना बन्या म्हणत) हे दरवर्षी चेंबूरहून येत. ते येईपर्यंत आरती होत नसे. किंबहुना ही सर्व मैफल जमली की काकी किंवा माझी आई सतत माझ्या वडिलांना पूजा आटोपून घ्यायची सूचना देत. परंतु भाईकाकांची मैफल रंगात आली की ते म्हणत, ‘सुनीता, थांब थोडा वेळ. गणपती कुठे जाणार नाही. तो आमच्या गप्पांत सामील झालाय.' असं म्हणत आरती व जेवण होईपर्यंत संध्याकाळी दर्शनाला येणारी मंडळी येऊ लागत. त्यांची वाहवा मिळवण्यासाठी आम्ही मुले जीव तोडून आरास करीत असू. मी लहानपणी ढोलकी व तबला वाजवीत असे व माझा भाऊ हेमंत झांज. त्याचा एक सुरेख पाठ असे. पुढे १९७४ साली माझी आई कॅन्सरने वारली आणि भाईकाकांनी गणपतीला येणं बंद केलं. ती आजारी असताना शेवटी शेवटी भाईकाका रोज येत आणि निरनिराळे विषय काढून असे रंगवत की तात्पुरता आम्हांला आमच्या दुःखाचा विसर पडत असे.

प्रिमियर पद्मिनी
१९७५ सालची गोष्ट... मी त्यावेळी ‘बॉम्बे सायकल ॲण्ड मोटर एजन्सी’मध्ये कामाला होतो. भाईकाकांनी त्यावेळी फियाट गाडी घ्यायचं ठरवलं. भाईकाका गाडी घेत आहेत ही गोष्ट कंपनीत मालक लालचंद शेटजींपर्यंत गेली व त्यांनीही फॅक्टरीत, ‘व्हीआयपी गाडी करून द्या’ असं फर्मान काढलं.

गाडीची डीलिव्हरी घ्यायला मी आणि भाईकाका जाणार होतो. मी गाडी घ्यायच्या आधी चेक करतो असं सांगितल्यावर, माझे वडील जे स्वतःही त्याच कंपनीत कामाला होते, मला रागावले. म्हणाले, ‘अरे सर्वजण व्हीआयपी गाडी तयार करत आहेत. तू गुपचूप जाऊन डिलिव्हरी घे.' ठरल्याप्रमाणे मी आणि भाईकाका शोरूमला गेलो. त्यांनी भाईकाकांसाठी छोटा समारंभ ठेवला होता, तो आटपून आम्ही दोघंही आजीला गाडी दाखवायला पार्ल्याला निघालो.

पेडर रोडवरून खाली उतरताना गाडी टणाटण उडत होती. मी हाजी अलीला पेट्रोल पंपावर चाकातली हवा चेक केली तर काय, प्रत्येक चाकात दुप्पट हवा होती (व्हीआयपी गाडी). जरा पुढे जातो तर लक्षात आलं की, दरवाजाला आतून एक हँडलच नाही. घरी येऊन कंपनीला फोन केला. सायनला एक इंजिनीयर हँडल घेऊन उभा राहिला होता व तोच पुण्यापर्यंत आमच्याबरोबर येणार होता.

गाडी चेंबूर सोडून नव्या मुंबईच्या कोकण- भवनच्या चढावर त्रास देऊ लागली. पुढे हळूहळू आम्ही खोपोली गाठली. चहा घेऊन ऐतिहासिक खंडाळा घाट चढायला सुरुवात केली. दोन-तीन वळणं घेऊन गाडी गरम होऊन बंद पडली, थंड झाल्याशिवाय पुढे जाता येत नव्हतं. थंड होईपर्यंत भाईकाकांनी एक अप्रतिम विनोदी लेख लिहिला. त्या तापलेल्या आणि बंद पडलेल्या गाडीची तुलना त्यांनी भडकलेल्या बायकोबरोबर केली होती. लेखाचं नावं होतं, ‘माझी पद्मिनी जेव्हा रुसते’! पुण्याला पोहोचताच त्यांनी लालचंद शेटजींना फोन करून रविवारच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मधला लेख वाचायला सांगितला. परंतु दुसऱ्या दिवशी कंपनीची माणसं येऊन गाडी घेऊन गेली व सर्व ठीकठाक करून लगेच आणून दिली. त्यामुळे भाईकाकांनी तो लेख प्रसिद्ध केला नाही. पुढे तीच ऐतिहासिक गाडी त्यांनी मला आठवण म्हणून दिली.

एनसीपीए
साधारण १९८० च्या सुमारास भाईकाकांनी एनसीपीएच्या (नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस्‌) मराठी सांस्कृतिक विभागाची, संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली. जोडीला दुर्गाबाई भागवत व अशोक रानडे यांसारखी प्रतिभावान माणसंही होती. त्या काळात ह्या सर्व मंडळींनी मराठी रसिकांना अनेक सुंदर कार्यक्रम दिले. महिन्यातून साधारण ४ ते ५ दिवस ते एनसीपीएमध्ये राहत. त्यांची राहण्याची सोय एनसीपीएने फार छान केली होती. त्याच आवारात ‘रंगोली’ नावाचं एक चांगलं रेस्टॉरंट होतं. तिथे त्यांची, तसंच भेटायला येणाऱ्या पाहुण्याची जेवणाखाणाची सोय होती. भाईकाका तसे उत्तम खवय्येही होते. कुठलाही पदार्थ चवीने खात व आवडल्यावर तोंडभरून स्तुती करत. पण ‘रंगोली’त पदार्थांच्या किंमती जास्त आहेत म्हणून ते त्यांच्या ॲटेंडंटला त्यांच्यासाठी डाळभात लावायला सांगत. मिळतंय म्हणून त्याचा फायदा घ्यायचा, असं काकी व भाईकाकांनी कधीच केलं नाही. पार्ल्याच्या आमच्या घरी मात्र दीपाच्या हातचं जेवायला हक्काने येत. दीपा मालवणी किंवा कारवारी जेवण चांगलं करायची (म्हणजे आत्ताही करते). चायनीजही चवदार करायची. भाईकाका मुद्दामहून वेळ काढून जेवायला येत आणि बरोबर मित्रांनाही घेऊन येत. गोंविदराव तळवलकर, मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे अशा अनेक दिग्गजांचे पाय आमच्या घराला लागले. साधुसंत येती घरा, असा तो काळ होता.

भाईकाकांचा हजरजबाबीपणा आणि विनोदबुद्धी ही घरातही तेवढीच तल्लख असायची. नवरा- बायकोच्या कामाच्या वाटण्या हा काकींचा अगदी कळकळीचा विषय होता. त्यांचं ठाम मत होतं की बायका सगळी पुरुषांची कामं करतात, पण पुरुष कधीही बायकांची कामं करत नाहीत. एकदा भाईकाका म्हणाले, ‘‘सुनीता, हे तुझं काही खरं नाही हां... बालगंधर्वांनी पुरुष असून जन्मभर बायकांची कामं केली!’’

काकींचा आवाज मोठ्ठा आणि खणखणीत होता. त्यावरून भाईकाका नेहमी त्यांना चिडवत. एकदा ते खोलीत शिरले, तेव्हा काकी फोनवर बोलत होत्या. जरा चिडून बोलत असल्याने मोठा वाटतं होता आवाज. फोन संपल्यावर भाईकाका म्हणाले, ‘‘फोनवर बोलत होतीस ती, पुण्यातच की पुण्याबाहेर?’’ त्या म्हणाल्या, ‘‘अरे पुण्यातलेच एक संपादक.’’ त्यावर भाईकाका म्हणाले, ‘‘अगं मग फोनची तरी गरज काय आहे? नुसती त्या दिशेला तोंड करून बोललीस तरी ऐकू येईल त्यांना.’’

भाईकाकांच्या हजरजबाबीपणाचं आणखी एक उदाहरण - दादरच्या किंग जॉर्ज शाळेत भाईकाकांची मुलाखत चालली होती. राजकारणी, साहित्यिक, अनेक मान्यवर उपस्थित होते. सुधीर गाडगीळ मुलाखत घेत होते. खच्चून गर्दी. सुधीरनी एक प्रश्न पटकन विचारला- भाई, तुम्ही अनेक क्षेत्रांत संचार केलात, नाव कमवलंत, पण राजकारणात गेला नाहीत, ते का?’’ एका क्षणात भाईंनी उत्तर दिलं, ‘‘माझ्यात एक दोष आहे म्हणून मी राजकारणात गेलो नाही!’’ साहजिकच दुसरा प्रश्न ताबडतोब आला, ‘‘दोष म्हणालात तो कोणता?’’ हसत हसत भाई म्हणाले, ‘‘मी जे सकाळी बोलतो ते मला संध्याकाळी आठवतं!’’ लोकांनी जोरात टाळ्या वाजवल्या. फक्त एकटे पंतप्रधान श्री. नरसिंह राव उभे राहिले आणि कोपरापासून नमस्कार केला.

भाईकाका आणि काकींचे ड्रायव्हिंगचे किस्से ऐकण्यासारखे आहेत. भाईकाकांनी आयुष्यात कधी ड्रायव्हिंग केलं नाही. कायम काकी ड्रायव्हर. भाईकाका भित्र्या मनाचे, तर काकी अगदी उलट! भाईकाकांना गाडीची काच खाली करायची असली की अनेकदा दारच उघडायचे. हँडल्सचा गोंधळ आणि काय! त्यामुळेच गाडी रस्त्यावर आली की भाईकाकांची सुरुवात होई... सुनीता कुत्रा येतोय. मग त्या म्हणत- तो मलापण दिसतोय.

एकदा कोल्हापुरात गावातल्या शाळेत कार्यक्रम होता. ह्यांची गाडी शाळेच्या पटांगणात शिरली, तेव्हा मुलं लगोरी, गोट्यांसारखे खेळ खेळत होती. ती आरडाओरडा करत पळू लागली. ‘धावा धावा. बाई गाडी चालवतिया!’ म्हणून इतरांना सावध करू लागली. इतक्यात एका मोठ्या आणि शहाण्या मुलानं ओरडून सर्वांना सांगितलं की, ‘आरं नगा घाबरू शिकिविनारा बाप्या बाजूला बसलेला हाय.’ शिकिवनाऱ्या बाप्याची कॉलर एकदम टाईट.

आमचं १९३२ साली बांधलेलं बैठं घर पाडून तिथे इमारत उभारायची असं ठरलं आणि १९८३ च्या मध्यावर कामाला सुरुवात झाली. प्रत्येक स्लॅब घालण्याच्या वेळी म्युनिसिपालिटीचे चीफ इंजिनियर जातीने हजर असत व इतर वेळीही येऊन काम तपासत. कामगार लोक हे पाहून आश्चर्यचकित झाले. तेव्हा कॉन्ट्रॅक्टरने त्यांना सांगितलं की, ही पुलंची वास्तू आहे आणि ते स्वतः इथे राहायला येणार आहेत. मराठी माणूस कितीही कमी शिकलेला असला तरी त्याला पुलं माहीत असतातच. इमारत पूर्ण झाली आणि कॉन्ट्रक्टर कांबळेंनी एक दिवस आम्हाला सांगितलं की, सर्व कामगारांना पुलंना भेटायची, निदान बघायची इच्छा आहे. वेळ, दिवस ठरला. सर्वजण वेळेच्या आधीच येऊन उभे होते. भाईकाका बरोबर ठरल्या वेळी आले. सर्वांना प्रेमाने भेटले. प्रत्येकाची नावा-गावासकट चौकशी केली. तीही प्रत्येकाच्या खांद्यावर हात ठेवून. आयुष्यभर पुरला असेल नाही तो स्पर्श त्यांना! कर्मधर्मसंयोगाने आमच्या बिल्डरचं नाव लक्ष्मीकांत ठाकूर होतं. भाईकाका त्याला मस्करीने नेहमी म्हणायचे ‘‘सुनीताच्या अनेक प्रश्नांचा धबधबा तुमच्यावर पडला नाही, कारण तिचं देखील माहेरचं नाव ठाकूर होतं.’’ आमचं काम पूर्ण केल्यानंतर ठाकूरांनाआजूबाजूच्या पाच-सहा इमारतींची कामं मिळाली. भाईकाका त्यांना नेहमी मस्करीने म्हणायचे, ‘‘आता आमच्या विभागाला ‘ठाकुर्ली’ नाव द्यायला काहीच हरकत नाही!’’

माझा मुलगा निखिल फिल्म इन्स्टिट्यूटला कॅमेराच्या शिक्षणासाठी जायला धडपडत होता. भाईकाकांची मनापासून इच्छा होती की, त्यानं फिल्मलाइनीत जाऊ नये. तसं त्यांनी त्याला फोनवरून समजावण्याचा प्रयत्नही केला. शेवटी त्यांनी आम्हाला पुण्याला बोलावलं व त्यांचे मित्र सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गबाले यांनाही बोलावून घेतलं. त्या दोघांनी मिळून निखिलचं बौद्धिक तर घेतलंच, पण भाईकाकांनी काही मजेशीर गोष्ट सांगितल्या सुरुवातीच्या काळात त्या दोघांना एक चित्रपट मिळाला होता. चित्रपटाचं नाव होतं ‘दत्तगुरू’. त्याचा फायनान्सर एक मारवाडी माणूस होता. भाईकाका पटकथा-लेखक होते व दिग्दर्शक राम गबाले. चित्रीकरणाच्या वेळी त्यांना अनेक अडचणी येत होत्या. दत्तमहाराज म्हटले की एक गाय व तीन कुत्रे सोबत असायलाच हवेत. पण शूटिंगच्या वेळेला ‘लाइटस’ सुरू झाल्यावर कुत्रे घाबरून दत्तमहाराजांबरोबर राहत नसत. ते पळून जात. प्रोड्यूसर-फायनान्सरने कुत्रे दत्तमहाराजांबरोबर असल्याशिवाय पुढील पैसे देणार नाही, असं निक्षून सांगितलं. भाईकाकांच्या सुपीक डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी शूटिंगच्या वेळेला तिन्ही कुत्र्यांना उपाशी ठेवलं व नंतर शूटिंगच्या वेळी दत्तमहाराजांच्या कमंडलूत मटणाचे तुकडे ठेवले. त्यामुळे पूर्ण चित्रपट, महाराज आणि कुत्रे वेगळे झाले नाहीत. सांगायचं तात्पर्य की, सीनेसृष्टीकडे बघणाऱ्या लोकांना जे दिसतं तसं कधीच नसतं. हेच त्या दोघांना निखिलला समजावून सांगायचं होतं.

गोवा ट्रिप
१९९४ साली भाईकाकांना पार्किन्सनची सुरुवात झाली होती. त्याच वेळी त्यांना गोवा कला अकादमीचा, ‘महादेवशास्त्री जोशी पुरस्कार’ जाहीर झाला होता. सीताकांत लाड अकादमीचे अध्यक्ष होते. त्यांनी खूपच गळ घातली. डॉक्टरांचं म्हणणं होतं की, भाईंची इच्छा असेल तर गोव्यातल्या त्यांच्या मित्रमंडळींना भेटून यायची ही शेवटचीच वेळ असेल. तोवर ते चांगले हिंडत-फिरत होते. पार्किन्सन कधी आपला विळखा घट्ट करेल याचा नेम नव्हता. काकीने विचारपूर्वक गोव्याची ट्रिप आखली. त्याच दरम्यान मी गोव्यात मंगेशीला घर बांधलं होतं. भाईकाकांनी मला फोन केला, आपण गोव्यात जाऊया, आपल्या गोव्याच्या घरातच राहू असं ठरलं. आमच्या बरोबर डॉ. ठाकूर, प्रफुल्ला डहाणूकर, विद्याधर निमकर, मालतीबाई आडारकर अशी भाईकाकांची खास मंडळी गोव्याला निघाली.

आमचा पहिला मुक्काम कोल्हापूरला होता. तिथे भाईकाकांना अनेकजण येऊन भेटत होते. कोल्हापूरच्याच एका नामांकित डॉक्टरांनी त्या रात्री मेजवानी दिली होती. कोल्हापुरातली काही मान्यवर मंडळीही बोलावली होती. डॉक्टरांच्या पत्नी हौशी गायिका होत्या. त्यांनी त्या छोटेखानी समारंभात भाईकाकांना एक विनंती केली की, मी लताबाईंची काही लोकप्रिय गाणी म्हणून त्यांची एक कॅसेट तयार केली आहे. भाई तुम्ही कृपा करून तिचे उद्‌घाटन करा. भाईकाका कधी कुणाला दुखवत नसत, पण त्या दिवशी मात्र त्यांनी ‘नाही’ असं ठामपणे सांगितलं.

दुसऱ्या दिवशी तिथून बाहेर पडताना मी सहज त्यांना विचारलं की, ‘‘भाईकाका मोजून २०-२५ माणसं होती. का ठामपणे नाही म्हणून सांगितलंत?’’ भाईकाका म्हणाले, ‘‘खुळा का रे तू? अरे लताचा जिथे सूर जातो तिथे हिची नजरही जाणार नाही रे!’’ गोव्यातही अनेक चाहते होते. माझा एक मित्र श्री. अनुप प्रियोळकर हा तर भाईकाका गोव्यात येणार ह्या कल्पनेनेच वेडा झाला होता. त्याने मला येऊन, ‘तुम्ही इथे असेपर्यंत जेवण माझ्या घरून येणार’ असंच सांगितलं. मीही ताबडतोब होकार दिला. पहिल्या दिवशी दुपारी माशाचं सुंदर जेवण घेऊन आला. त्यात त्याने ‘नाचणीचे सत्व’ आणलं होतं. पुडिंगसारखं असतं ते. गोव्याची स्पेशालिटी. खरंच सुरेख झालं होतं. भाईकाकांनी त्या पदार्थांची स्तुती केली. झालं. रात्रीच्याही जेवणात त्याने तेच नाचणीचे सत्व करून आणले. दुसऱ्या दिवशीही तेच. नंतर जाताना त्याने भाईकाकांना घरी येण्याची विनंती केली आणि भाईकाकांनी ती स्वीकारलीही. आम्ही घरी पोहोचल्यावर त्यानं नाचणीचं सत्व ठेवलं. ते पाहून भाईकाका माझ्याकडे पाहत म्हाणाले, ‘‘जयंता, तुझा मित्र माझी सत्वपरीक्षाच पाहतोय रे!’’

अमेरिका वारी
पर्किन्सनच्या विकाराने विळखा घट्ट केला होता. महाराष्ट्रातील असंख्य डॉक्टर मित्रांनी त्यांच्यासाठी अभ्यास सुरू केला होता. कोल्हापूरच्या डॉ. वझे ह्यांनी अमेरिकेत एक डॉक्टर अशा रोगावर ऑपरेशन करतो, अशी माहिती मिळवली. काकीचा त्यावर अभ्यास सुरू झाला. त्याच्याकडून काही व्हिडिओ पाठवले गेले की, पेशंट थरथरत आत जातोय व ऑपरेशन झाल्यावर ठणठणीत चालत बाहेर येतो. पुण्यात काही डॉक्टरांबरोबर बसून ते पाहिले गेले व ऑपरेशनला जाण्याची तयारी सुरू झाली. लांबचा पल्ला असल्यामुळे डॉ. लोकरे बरोबर जाणार होते. भाईकाका अमेरिकेला उपचारांसाठी जाणार ही बातमी सर्व पेपरांत आली. जाण्याच्या दिवशी पार्ल्याच्या घरी लवकर आले. विश्रांती घेतली व रात्री विमानतळावर जायला निघाले. मी आणि दीपाही सोडायला एअरपोर्टवर गेलो. त्यांचे अनेक चाहते विमानतळावर आले होते. त्यात माजी पोलिस महासंचालक भीष्मराज बामही होते. त्यांना व्हीआयपी लाऊंजमध्ये बसवण्यात आलं. पत्रकार मंडळीही तिथे हजर होती. त्यांनी प्रश्नांची सरबत्ती चालू केली. एकाने विचारलं, ‘‘भाई, बरे होऊन आल्यावर बटाट्याच्या चाळीचा प्रोग्रॅम करा!’’ तर दुसऱ्याने विचारलं, ‘‘आल्यानंतर काय करायचं ठरवलं आहे?’’ भाई पटकन म्हणाले, ‘‘बरा होऊन आल्यावर कुस्त्यांचा फड लावतो की नाही ते बघा!’’

७० वा वाढदिवस
भाईकाकांचा ७० वा वाढदिवस आम्ही सर्व कुटुंबियांनी पार्ल्याच्या गोमंतक हॉलमध्ये थाटात साजरा केला. त्यांची मोठी बहीण वच्छीताई पंडित, धाकटी बहीण मीरा दाभोळकर, माझे वडील उमाकांत, धाकटे काका रमाकांत व आम्ही सर्व पुतणे, भाचे कंपनी. पन्नासेक मंडळी जमली होती. प्रत्येकजण मधल्या काळात विशेष काय घडलं किंवा काय पाहिलं ते भाईकाकांना सांगण्यात दंग होता.

माझ्या मुलीला, म्हणजे नेहाला विनोद सांगण्याची खूप आवड आणि सर्वात गंमतीची गोष्ट म्हणजे ती भाईकाकांना म्हणजे तिच्या भाईआजोबांनाच जोक्स सांगायला बसायची. तेही मनापासून दाद देत. त्या दिवशी सर्व जमलेले असताना तिला काय लहर आली कोण जाणे, तिनेभाईकाकांना सांगितलं ‘‘भाईआजोबा, मी तुम्हाला एक कोडं घालते. त्याचं उत्तर द्या!’’ भाईकाका हसत म्हणाले, ‘‘घाल बघू!’’ तिने सुरुवात केली की, ‘‘शिवाजी महाराजांनी अनेक गड सर केले, पण त्यांना एक गड सर करता आला नाही, तो कोणता?’’ झालं... भाईकाकांनी उगाच डोकं खाजवल्यासारखं केलं आणि हरलो म्हणून सांगून टाकलं. नेहानेही विजयी मुद्रेने सांगितल, ‘‘कलिंगड!’’ खरंतर जोक संपला होता. परंतु भाईकाका क्षणाचाही वेळ वाया न घालवता नेहालाम्हणाले, ‘‘आता मी तुला कोडं घालतो त्याचं उत्तर तू दे! महाराजांच्या वेळी एक गड नव्हता, तो आत्ता आहे, तो कोणता?’’ नेहानेच काय, सर्वांनी डोकी खाजवली. तेव्हा भाईकाकांनी हसत-हसत सांगितलं, ‘‘भानगड!’’ नंतर नेहमीप्रमाणेच गाण्यांचा कार्यक्रम सुरू झाला. माझा आतेभाऊ प्रकाश पंडितला मामानं गायला सांगितलं. स्वतः पेटीवर बसले. त्याने, ‘‘मामा काय गाऊ?’’ म्हणून विचारले. भाईकाका मिश्किलपणे म्हणाले, ‘‘अरे, ते गाणं म्हण ना लंगोटावरचं!’’ प्रकाश पंडितही त्याचाच भाचा. त्याने लगेच ‘‘देहाची तिजोरी ...... भक्तिचाच ठेवा’’ हे गाण सुरू केलं.

संचेती हॉस्पिटल
एकदा घरीच उठायचा प्रयत्न करत असता भाईकाका पडले. संचेती हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. मी व दीपा दोघंही भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यावेळी ते बरे झाले होते. पण काकीच्या म्हणण्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये देखभाल चांगली होते, तेव्हा दोन दिवस जास्त राहिले तरी चालेल. पूर्ण बरा होऊनच तो घरी येईल. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे स्पेशल रूम असली तरीही इतर रोग्यांमुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात, तर त्यांना घरी नेलेले बरे. मधू गानूकाकाही तिथेच होते. आम्ही पोहोचताच घरी नेण्याचा निर्णय घेतला होता. गानूकाका ॲम्ब्युलन्स आणायला गेले. मी व दीपा काकांबरोबर गप्पा मारत होतो. भाईकाका हॉस्पिटलला कंटाळले होते. शांतपणे पडून होते. इतक्यात दोन-तीन तरुण डॉक्टर मुली तिथून जात होत्या. भाईकाकांना पाहताच त्या एकदम जवळजवळ किंचाळल्याच ‘अय्या पुलं!’ आणि त्या अवस्थेतही सही मागू लागल्या. जमेल तेवढ्या संयमाने भाईकाका त्यांना हसत म्हणाले, ‘‘आधी इथून सहीसलामत घरी जातो व मग तुम्हाला हव्या तेवढ्या सह्या देतो.’’

भाईकाकांनी बिछाना धरला होता. त्यांना कुठे हलता-फिरता येत नव्हतं. त्याच सुमारास काकीला
छातीत दुखायला लागलं. ब्लडप्रेशर स्थिर राहत नव्हतं. संपूर्ण चेकअप करायला त्यांना दोन दिवस डॉ. प्रयागांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं. आम्ही दोघंही त्यांना बघायला गेलो. तोपर्यंत सर्व गोष्ट स्थिरावल्या होत्या. आम्ही जाताच तिने डॉक्टरांना सांगितलं, ‘‘माझा पुतण्या व त्याची बायको आली आहे. तुमची हरकत नसेल, तर मी त्यांच्याबरोबर घरी जाते!’’ डॉक्टरांनीही ‘जा’ म्हणून सांगितलं.

काकीला घेऊन आम्ही दोघंही ‘मालती- माधव’मध्ये आलो. दारापर्यंत दारापर्यंत काकी पटापट वर
आली, पण घरात गेल्यावर ती हळूच भाईकाकांच्या खोलीजवळ आली व आत न जाता तिने
दरवाजाच्या मागून डोकावलं. भाईकाका समोरच्या खिडकीतून शून्यात बघत होते. तिने हळूच आत डोकावून भाईकाकांना विचारलं, ‘‘काय हो पुलं कसे आहात?’’ खिन्न स्वरात भाईकाकांनी उत्तर दिलं, ‘‘आहोत अजून!’’ आजही ह्या प्रसंगाची आठवण येते आणि मन व्याकूळ होतं.

९ जून २००० ची सकाळ.
काकीचा अचानक फोन आला. तिने मला व तिचा भाऊ डॉ. श्रद्धानंद ठाकूर यांना तातडीने पुण्याला बोलावलं. भाईकाकांना प्रयाग हॉस्पिटलमध्ये दाखल करून व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. त्यांना फारसं कळत नव्हतं. मधूनमधून फक्त डोळे उघडत होते. डॉक्टरांनी सर्व नातेवाईकांनाबोलावून घेतलं, ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि हॉस्पिटलसमोर प्रचंड गर्दी झाली. प्रत्येक पुलंप्रेमी आपल्यापरीने देवाकडे त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत होता. प्रत्येकाच्या डोळ्यांत आपल्या घरचंच कोणी आजारी असल्याची काळजी होती. ह्या सर्व मंडळींत सर्व थरातील माणसं होती. भाईकाकांचा उल्लेख ‘आपले पुलं’ किंवा ‘आपले भाई’ असा होत होता. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे ‘इतरांनी आपलं म्हणणं’ हा एक फार मोठा किताब. त्यांनी तो आपल्या कर्तृत्वानं मिळवला होता. खऱ्या अर्थाने ते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व होते, ते दिसत होतं. आम्ही सर्व दिनेशची वाट पाहत होतो. तो अमेरिकेहून निघाला होता. ते ३ दिवस मी व काकी हॉस्पिटलात त्यांच्या बाजूलाच होतो. चौथा दिवस काळदिन ठरला आणि एका महापुरुषाचा अंत मी अगदी जवळून बघितला. काकी चोवीस तास भाईकाकांजवळच बसून होती. तिच्या बाजूला मीही. मी तिला सांगितलं की, तू घरी जाऊन थोडा वेळ आराम कर. मी इथे आहे ना. तू काळजी करू नकोस. त्याही परिस्थितीत तिने दिलेल्या उत्तराने मी अवाकच झालो. ती म्हणाली, ‘‘भाईला जी औषध दिली गेली आहेत, त्यामुळे जर काही वैज्ञानिक चमत्कार झाला आणि त्यानं डोळे उघडले आणि मी समोर नाही हे त्याच्या लक्षात आलं तर तो आणिक कावराबावरा होईल.

त्या दोघांचं भावनिक नातं फार वेगळं होतं. त्यांच्या मृत्यूने अनेकांची झालेली वेडी अवस्था मी पाहिली. आमचा काका खऱ्या अर्थाने ‘पुरुषोत्तम’ होता, हे त्याच्या कर्तृत्वाने सिद्ध झालं होतं. खरंतर त्यांचा फक्त देहच पंचत्वात विलीन झाला. आजही ते प्रत्येक मराठी घरात पुस्तकांच्या, कॅसेटच्या रूपाने आहेत. त्यांचे अनेक विनोद, असंख्य कोट्या यांच्या शिदोरीवर आपलं प्रत्येकाचं उर्वरित आयुष्य निश्चितच आनंदात हसत जाईल. माझा मुलगा निखिल ह्याला भाईआजोबांचे ‘असा मी असामी’, ‘बटाट्याची चाळ’ इत्यादी साहित्य तोंडपाठ आहे. पावलोपावली तो मास्टर शंकर, अंतू बर्वा, चितळे मास्तर ह्यांच्या आठवणी काढून हसत असतो. मनोमन त्यांच्याशी बोलत असतो. माझी आजी तर नेहमी म्हणायची की, मन सैरभैर झालं की मी भाईचं कोणतंही पुस्तक उघडते व वाचायला सुरुवात करते. मन शांत होऊन कधी हसू लागतं कळतही नाही.....!

लेखक - जयंत देशपांडे
महाराष्ट्र टाईम्स, दिवाळी २०१८ मधून साभार
संग्रह - असा असामी पुलं देशपांडे जन्मशताब्दी गौरवग्रंथ

Wednesday, April 20, 2022

आहे मनोहर तरी गमते उदास -- (मुकुंद कुलकर्णी)


सुनिताबाई देशपांडे
3 जुलै 1926 - 7 नोव्हेंबर 2009

पुलं मध्ये एक खेळिया दडला होता . त्यांचा स्टेज परफॉर्मन्स अप्रतिम असे . त्यांना सुनिताबाईंची तेवढीच तोलामोलाची साथ लाभत असे . उभयतांनी सादर केलेला बा. भ. बोरकरांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम रसिकांना मंत्रमुग्ध करत असे . पुलंच्या पेटीवादनासोबत सुनिताबाईंच्या गप्पांचा कार्यक्रमही रंगतदार होत असे . स्वतः सुनिताबाई तरल कवीमनाच्या होत्या . पुलंच्या स्मरणार्थ झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पद्मा गोळे यांच्या दोन कविता सादर केल्या होत्या , त्या ऐकणे हा अवर्णनीय आनंदानुभव होता . कविता वाचन कसे असावे याचा तो आदर्श वस्तुपाठ होता . त्या स्वतः उत्तम परफॉर्मर होत्या . महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पुल यांच्या अर्धांगिनी सुनिताबाई या स्वतः उत्तम साहित्यिक होत्या . इ.स.1945 मध्ये त्यांची भाईंशी भेट झाली . दि.12 जून 1946 रोजी भाई व सुनिताबाई विवाहबंधनात बांधले गेले . पूर्वाश्रमीच्या सुनिता ठाकूर या मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या भाईंशी विवाहबद्ध झाल्या . पुल आणि सुनिताबाई यांनी ओरिएंटल हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काम केले होते . सुनिताबाईंनी पुलंबरोबर अनेक नाटकात काम केले होते . रत्नागिरी येथे सुनिताबाईंचे पुलं बरोबर लग्न झालं होतं . सुनिता ठाकूर ही देखणी , बुद्धीवान मनस्वी तरुणी रत्नागिरीच्या समृद्ध निसर्गाच्या साक्षीने पुलंची अर्धांगिनी झाली .

सुनिताबाईंनी लिखाणाला सुरूवात फार उशीरा केली . इ.स.1990 मध्ये त्यांचे ' आहे मनोहर तरी ' हे पारितोषिकपात्र पुस्तक प्रसिद्ध झाले . आहे मनोहर तरी हा आंबटगोड आठवणींचा गुलदस्ता आहे . ही मराठी साहित्यातील एक सर्वोत्तम कलाकृती आहे . आहे मनोहर तरी .... सर्वांनाच खूप आवडले . अनेक भाषांत त्याची भाषांतरे झाली . ' मनोहर छे पन ' गुजराथी अनुवाद सुरेश दलाल , ' है सबसे मधुर फिर भी ' हिंदी अनुवाद रेखा देशपांडे , ' अँड पाईन फॉर व्हॉट इज नॉट 'इंग्रजी अनुवाद गौरी देशपांडे तसेच उमा कुलकर्णी यांनी आहे मनोहरचा कन्नड अनुवाद केला आहे . भारतभरातल्या वाचकांपर्यंत हे पुस्तक पोहोचले आहे.

पु.ल. जसे रसिकांचे भाई तशा सुनिता देशपांडे सुनीताबाई . सुनिताबाईंनी वंदे मातरम आणि नवरा बायको या मराठी चित्रपटात तसेच सुंदर मी होणार राजेमास्तर या नाटकातून भूमिकाही साकारल्या आहेत . तसेच त्यांचा एकपात्री प्रयोग राजमाता जिजाऊ ही खूप गाजला होता . ' प्रिय जी ए ' या त्यांच्या जी ए कुलकर्णी यांच्या बरोबरच्या पत्रव्यवहाराचे पुस्तक हा तर मराठी साहित्यातील एक अमूल्य ठेवाच आहे . आहे मनोहर तरी , प्रिय जी ए , मण्यांची माळ , मनातलं अवकाश , सोयरे सकळ , समांतर जीवन या आपल्या साहित्यकृतींनी सुनिताबाईंनी मराठी वाङमय समृद्ध केले आहे . जी ए कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला ' प्रिय जी ए पुरस्कार ' सुनिताबाईंना इ.स. 2008 साली मिळाला होता .

सुनिताबाईंच्या प्रतिभेला जी हिरो प्रतिमा अभिप्रेत होती ती श्रीकृष्णासारखी सर्वगुणसंपन्न होती . राकट कणखर तरीही अति मृदू , तरल . फ्रेंच पायलट , लेखक सेंट एक्झुपेरी हा सुनिताबाई आणि जी ए यांना भावणारा समान दुवा होता .' दि लिटिल प्रिन्स ' या पुस्तकात तो लिहितो , " what is most impossible is invisible . " असं काहीसं झाल होतं . पुलंनी या विषयावर नाटक करावं अशी सुनिताबाईंची इच्छा होती , पण पुलनी ते फारसं मनावर घेतलं नाही . पिग्मॕलियनच ती फुलराणी हे रुपांतर पुलंनी केलं . बर्नार्ड शॉ आणि पुल हे एकाच जातकुळीचे , सहज सुंदर आणि निर्मळ . तसेच जी ए , सुनिताबाई , खानोलकर ग्रेस हे समविचारी . जी ए आणि सुनिताबाई यांच्या पत्रव्यवहारात हे पदोपदी जाणवतं . ' सन विंड अँड स्टार्स ' हे एक्झुपेरीच पुस्तक त्यांच्या पत्रसंवादात येतं . जी ए आणि सुनिताबाई यांच्या पत्रसंवादात जगभरातील साहित्याचे संदर्भ तर येतातच , पण एकमेकांविषयीचा आदर , आस्था ही व्यक्त होते ." विपरीत अनुभवांची वेदनाच बरोबर घेऊन चालणारा एक हळवा , मनस्वी कलावंत जी एं च्या रुपाने भेटला आणि सुनिताबाईंनी त्याच्यावर स्नेहाचा वर्षाव केला . " अरुणा ढेरेंची ही प्रस्तावना यथार्थच आहे .

कार्लाईल या सुप्रसिद्ध इंग्रजी लेखकाच्या आणि त्याच्या पत्नीवरच्या लेखावरून पुल आणि सुनिताबाई यांच्यात वाद होतात आणि सुनिताबाईंची लेखणी धारदार होते . तोच संघर्ष पुढे आहे मनोहर मध्ये सुनिताबाई आणि भाई यांच्या माध्यमातून अवतरला आहे . काही असलं तरी गाणारा , अभिनय करणारा , विनोदांनी लोकांना तणावमुक्त करणारा , स्नेह्यांचा प्रचंड गोतावळा बांधून असणारा , सर्व लोकांचा हिरो हाच त्यांचा हिरो होता . तसाच तो सर्वगुण संपन्न लिटिल प्रिन्सही होता . भाई आणि सुनीताबाईंच हे मैत्र खरोखरच अलौकिक होतं

अत्यंत समृद्ध , परिपक्व सहजीवन जगलेल्या या महाराष्ट्राच्या लाडक्या दंपतीचे आदरपूर्वक स्मरण . सुनिताबाईंना सादर प्रणाम !

मुकुंद कुलकर्णी ©

Wednesday, October 27, 2021

सुनीताबाईंच्या प्रेमाचं कठीण कोवळेपण - शुभदा पटवर्धन

सुनीताबाईंच्या ‘आहे मनोहर तरी’ या आत्मपर लेखनातून त्यांच्यातले स्वभावविशेष अधिक ठळकपणे वाचकांसमोर आले आणि तोपर्यंत एका ठरीव ठशाचं साहित्य वाचण्याची सवय झालेलं साहित्यविश्व ढवळून निघालं. मंगला गोडबोले यांनी लिहिलेलं ‘सुनीताबाई’ हे पुस्तक वाचायला घेताना ही पाश्र्वभूमी मनात तयार होते. ‘हा स्मृतिग्रंथ किंवा गौरवग्रंथ भाबडय़ा भावुक स्मरणरंजनाची पखरण करणारा आरतीसंग्रह नाही.’ ही या पुस्तकामागची भूमिका मंगलाबाईंनी मनोगतातच स्पष्ट केली आहे. त्यामुळे पुस्तकाकडे बघण्याच्या आपल्याही दृष्टिकोनाला दिशा मिळते.

‘त्यांच्या घरी जाते आहेस, पण घरात ये म्हणतीलच अशी अपेक्षा ठेवून जाऊ नकोस हं.’

‘ज्या वेळेला बोलावलं आहे, तेव्हाच पोच. पाच मिनिटंसुद्धा मागेपुढे नको.’

‘बोलतीलच याची खात्री नाही आणि बोलल्याच तर नेमकी उत्तरं दे. उगीच फट म्हणता ब्रह्महत्या व्हायची.’

‘एकदम कडक काम आहे. पुलंच्या अगदी विरुद्ध. त्यामुळे जरा जपूनच.’
काही वर्षांपूर्वी अगदी पहिल्यांदा सुनीताबाईंना भेटण्यासाठी जाणार होते, तेव्हा मिळालेल्या या सूचना.

खरं तर ज्या कामासाठी जाणार होते ते काम तसं काही फार महत्त्वाचं नव्हतं. त्यांच्याकडून फक्त एक लेख आणायचा होता. ‘सुनीताबाईंकडून लेख आणायचा आहे, कुणालाही पाठवून चालणार नाही,’ अशी सावध भूमिका घेत संपादकांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली आणि मीही नाही म्हटलं नाही. इतकंच. तरीही एक प्रकारचं दडपण मनात घेऊनच गेले. प्रत्यक्षात मात्र अगदी सर्वसाधारणपणे जसं आगतस्वागत होईल, तसंच झालं. खूप उबदार नाही पण अगदीच कोरडंठक्कही नाही. दोन्हीच्या मधलं. समंजस. त्या अशा वागतील, तशा वागतील असं जे चित्र निर्माण केलं गेलं होतं, तसं काहीही झालं नाही. ‘वाचते मी तुमचं लिखाण’, असं सांगून एक धक्काच दिला. एवढंच नाही तर हे तोंडदेखलं म्हणत नाही हे दर्शवण्यासाठी काही लेखांचाही उल्लेख केला. हे सगळं माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होतं. गेल्या पावलीच परतायचं असं मनाशी ठरवून गेलेली मी चक्क अध्र्या तासानंतर बाहेर पडले. पुढच्याही मोजक्या भेटींमध्ये कधी ‘असा विक्षिप्त’ अनुभव आला नाही आणि त्यामुळे असा ताणही कधी जाणवला नाही. पहिल्या भेटीची आठवण नंतर कधी तरी त्यांना सांगितल्यावर काहीही न बोलता त्या फक्त हसल्या होत्या. पण एखाद्या घटनेची, गोष्टीची, विधानाची कानगोष्ट व्हायला वेळ लागत नाही. सुनीताबाईंच्या बाबतीत असंच झालं. सामाजिक रूढ चौकटीत न बसणाऱ्या त्यांच्या स्वभावविशेषांची आवर्तनं पुन:पुन्हा आळवली गेली आणि कळत-नकळत त्यावर शिक्कामोर्तबही होऊन गेलं.

सुनीताबाईंच्या ‘आहे मनोहर तरी’ या आत्मपर लेखनातून त्यांच्यातले हे आणि इतर बरेच स्वभावविशेष अधिकच ठळकपणे वाचकांसमोर आले आणि तोपर्यंत एका ठरीव ठशाचं साहित्य वाचण्याची सवय झालेलं साहित्यविश्व ढवळून निघालं. मंगला गोडबोले यांनी लिहिलेलं ‘सुनीताबाई’ हे पुस्तक वाचायला घेताना ही पाश्र्वभूमी मनात होतीच. ‘हा स्मृतिग्रंथ किंवा गौरवग्रंथ भाबडय़ा भावुक स्मरणरंजनाची पखरण करणारा आरतीसंग्रह नाही.’ ही या पुस्तकामागची भूमिका मंगलाबाईंनी मनोगतातच स्पष्ट केली आहे, ते बरं झालं. पुस्तकाकडे बघण्याच्या आपल्याही दृष्टिकोनाला दिशा मिळते. कारण आजकाल एखादी नामवंत व्यक्ती गेल्यानंतर विविध ठिकाणी प्रसिद्ध होणाऱ्या श्रद्धांजलीपर लेखांचं संकलन करून पुस्तकं प्रकाशित होतात. अशा संकलनाची एक वेगळी गोडी असते. नाही असं नाही. पण तरीही त्यातला सरधोपटपणा त्रासदायक होतोच. सुनीताबाईंसारख्या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वाला या सरधोपट चौकटीत बसवण्याची कल्पनाही करवत नाही. पण वाचकांची नस अचूक ओळखलेल्या राजहंस प्रकाशनानं ‘असं जगणं’ (जन्मापासून ते मृत्युपर्यंतचा कालावधी), ‘असं लिहिणं’ (लेखनप्रवास) आणि ‘असं वागणं’ (स्वभाव वैशिष्टय़) या तीन धारणा आणि जोडीला अरुणा ढेरे यांचा दीर्घ लेख अशा चौकटीतून सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतलेला आहे.

विनायक प्रसादमधील एक खोलीच्या छोटय़ा बिऱ्हाडापासून ते लंडन-पॅरीसमधल्या बिऱ्हाडांपर्यंत अशा अनेक घरांबद्दल सुनीताबाईंच्या चांगल्या-वाईट अनेक आठवणी निगडित आहेत. कुठे मर्ढेकरांची पिठलं-भाकरीची फर्माईश पूर्ण केल्याचा आनंद, तर कुठे पुलंमधले कलागुण बहरायला लागले, म्हणून समाधान.

सुनीताबाई आठ भावंडांतल्या चौथ्या. लहानपणापासूनच वेगळेपणामुळे उठून दिसत. पण त्यांचं व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थानं झळाळून उठलं ते बेचाळीसच्या चळवळीतल्या सहभागानं. स्वत:मधल्या क्षमता त्यांना कळल्या. त्यामुळेच परजातीतल्या - निर्धन - बिजवराशी लग्न करण्याचा निर्णय त्या घेऊ शकल्या आणि हा निर्णय घरच्यांच्या गळी उतरवण्यातही यशस्वी झाल्या. लग्नानंतर त्यांचं सगळं आयुष्यच बदललं. आयुष्यभरात सात गावं आणि बावीस घरांमध्ये बिऱ्हाडं मांडावी लागली. अशा किती जागा बदलायला लागल्या तरी प्रत्येक नव्या ठिकाणी सुनीताबाई त्याच उभारीनं उभ्या राहात. कितीही अडीअडचणी आल्या तरी कर्तव्यदक्षतेत कधी कमी पडल्या नाहीत. कुठेही मनापासून रुजायची जणू त्यांनी मनाला ताकीदच दिली होती. पुलंच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं व्रत घेतलं असल्यामुळे येणाऱ्या अडीअडचणींची झळ त्यांनी पुलंना कधी बसू दिली नाही.

असं लिहिणं’ हे प्रकरण अर्थातच सुनीताबाईंच्या लेखिका या भूमिकेतील प्रवास मांडते, पण लेखिका म्हणून त्यांच्या आयुष्यातलं पर्व सुरू झालं तेच मुळी साठीनंतर. तोपर्यंत लेखिका होण्यासाठी पोषक अशी परिस्थिती असतानाही सुनीताबाईंनी कधी या वाटेचा विचारही केला नव्हता.

विनायक प्रसादमधील एक खोलीच्या छोटय़ा बिऱ्हाडापासून ते लंडन-पॅरीसमधल्या बिऱ्हाडांपर्यंत अशा अनेक घरांबद्दल सुनीताबाईंच्या चांगल्या-वाईट अनेक आठवणी निगडित आहेत. कुठे मर्ढेकरांची पिठलं-भाकरीची फर्माईश पूर्ण केल्याचा आनंद, तर कुठे पुलंमधले कलागुण बहरायला लागले, म्हणून समाधान. कुठे घरात जेवण बनवता येत नसे, तर कुठे खालून पाणी भरायला लागत असे. पुलंना आकाशवाणीत नोकरी लागल्यानंतर ते प्रॉक्टर रोडवरील ‘केनावे हाऊस’मध्ये राहायला लागले. या घराच्या घरमालकाला साहित्याबद्दल ना फारशी गोडी होती ना जाणकारी. पण पुलंबद्दल मात्र प्रचंड अभिमान. पुलं लिखाणात गर्क असताना हा घरमालक भक्तिभावानं त्यांच्यासमोर बसून राहात असे. या घरातील वास्तव्यादरम्यान पुलंच्या आकाशवाणीवरील कामगिरीची सरकारदरबारी तसंच रसिकमनात नोंद झाली होती. ‘तुज आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ही इतिहास घडवणारी नाटकं, तसंच ‘मोठे मासे छोटे मासे’ या एकांकिकेनं याच घरात जन्म घेतला होता. केनावे हाऊस सोडल्यानंतर ते ‘आशीर्वाद’मध्ये राहायला गेले. या बििल्डगमध्ये अकरा खोल्या आणि तीन बिऱ्हाडं राहात होती. त्यात सुनीताबाईंचे भाऊ डॉ. श्रद्धानंद ठाकूर आणि त्यांची पत्नी निर्मलाबाई, त्यांचे मेहुणे नारायण देसाई आणि त्यांच्या पत्नी नलिनीबाई, आणि पुलं व सुनीताबाई राहात असत. म्हणजे नलिनीबाईंची नणंद निर्मलाबाई आणि निर्मलाबाईंची नणंद सुनीताबाई असा नणंद-भावजयांचा गोतावळा तिथं एकत्र आला होता. यावर पुलंनी मल्लिनाथी केली नाही तरच नवल. पुलं या बििल्डगचा उल्लेख ‘नणंदादीप’ असा करत असत. मान्यवरांच्या घरावर महापालिका पाटय़ा लावते, पण इतक्या वेळा बिऱ्हाडं बदलली असल्यामुळे इतक्या घरांवर पाटय़ा लावणं महानगरपालिकेला परवडणार नाही, असंही गमतीत ते म्हणायचे. पॅरीसमध्ये माधव आचवल त्यांच्या शेजारी राहात आणि त्या काळात भारतीय जेवण मिळत नसल्यामुळे सुनीताबाईंकडे जेवायला येऊ लागले. दिल्लीतलं त्यांचं घर तर ‘महाराष्ट्र सांस्कृतिक केंद्र’च झालं होतं. आशीर्वादमधून पुलं आणि सुनीताबाई ‘मुक्तांगण’ या स्वत:च्या मालकी हक्काच्या घरात राहायला गेले. हे घर सुनीताबाईंच्या मनासारखं असलं तरी पुलंनी निवृत्त आयुष्य पुण्यात काढायचं ठरवलं आणि ते ‘रूपाली’त राहायला गेले. यानंतरचा शेवटचा टप्पा होता तो ‘मालतीमाधव’चा. कारण तोपर्यंत सगळ्यांचीच वयं झाली होती, तब्येतीच्या कुरबुरी सुरू झालेल्या होत्या, त्यामुळे ठाकूर कुटुंबीयांना एकत्र राहावंसं वाटायला लागलं होतं. मालतीमाधव पुलं आणि सुनीताबाईंच्या मृत्यूची साक्षीदार ठरली. ऐंशी र्वष सुंदर-संपन्न आयुष्य जगल्यानंतर मृत्यूही वैभवशालीच यावा असं सुनीताबाईंना वाटत असलं तरी ते दोघांच्याही बाबतीत खरं झालं नाही. पुलंची अवस्था तर शेवटी शेवटी इतकी केविलवाणी झाली होती की पूर्णपणे परावलंबन नशिबी आलेलं होतं. मृत्यूनंच त्यांची या अवस्थेतून सुटका केली. सुनीताबाईही जाण्याआधी दीडेक वर्ष अशाच क्लेशपर्वातून गेल्या.

‘असं लिहिणं’ हे प्रकरण अर्थातच सुनीताबाईंच्या लेखिका या भूमिकेतील प्रवास मांडते, पण लेखिका म्हणून त्यांच्या आयुष्यातलं पर्व सुरू झालं तेच मुळी साठीनंतर. तोपर्यंत लेखिका होण्यासाठी पोषक अशी परिस्थिती असतानाही सुनीताबाईंनी कधी या वाटेचा विचारही केला नव्हता. सुनीताबाईंचं वाचन दांडगं होतं. इंग्रजी, बंगाली, उर्दू भाषाही त्यांना अवगत होत्या आणि या भाषातील साहित्य त्यांनी वाचलं होतं. कविता हा त्यांचा एक हळवा कोपरा होता. त्यामुळे भाषिक आकलन आणि जाणिवाही चांगल्या विकसित झाल्या होत्या. पुलंनीही कधी त्यांच्यावर अशी बंधनं घातलेली नव्हती. जी. ए., श्री. पु. भागवत, माधव आचवल यांनी वारंवार त्यांना हे सुचवलं होतं, त्यालाही सुनीताबाईंनी कधी भीक घातली नाही. मोठय़ा प्रमाणावर पत्रलेखन करणाऱ्या सुनीताबाई साहित्यनिर्मितीचा विचारही करायला तयार नव्हत्या. स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्याची रसरशीत क्षमता असूनही ‘पुलंची बायको’ याच चौकटीत राहात होत्या. पुलंच्या सगळ्या व्यापातील पडद्याआडची भूमिका त्यांनी स्वीकारली होती आणि अतिशय कर्तव्यकठोरतेनं सांभाळली, हे मान्य केलं तरी त्यामुळे त्यांना लिखाणाकडे लक्ष देता आलं नसावं असं वाटत नाही. कारण त्यांची एकंदरीतच काम करण्याची अत्यंत काटेकोर आणि नेमस्त पद्धत पाहिली तर वेळ मिळत नाही हे कारण त्यांच्या बाबतीत तरी लागू होत नाही. त्यामुळे वयाच्या साठीपर्यंत सुनीताबाईंनी लेखन का केलं नाही, या अनेक वषर्ं अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर याही पुस्तकात सापडत नाही. अर्थात ‘देर आये दुरुस्त आये’ असं काहीसं झालं. साठीनंतर मात्र अचानक एकदम त्यांनी लेखणी हाती धरली आणि ‘आहे मनोहर तरी..’ सारखं पुस्तक लिहून जी झेप घेतली ती अतुलनीय होती. आता पुस्तक लिहायचं म्हणून लिहिलेलं हे पुस्तक नव्हतं, तर वेळोवेळी लिहून ठेवलेल्या या आठवणी एवढंच त्यांचं प्राथमिक स्वरूप होतं. या आठवणींचा काही भाग महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला आणि त्याला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला त्यावरून या आठवणी पुस्तकरूपात प्रसिद्ध कराव्यात असं निश्चित झालं. खरं तर आधीही एकदा या आठवणी सुनीताबाईंनी श्री. पु. भागवतांना वाचायला दिल्या होत्या, पण तेव्हा ‘काही काळ हे लिखाण बाजूला ठेवून द्यावं’ असा सल्ला त्यांनी दिला होता. कदाचित या लिखाणाचं स्वागत वाचक कसं करतील अशी सुनीताबाईंप्रमाणेच त्यांच्याही मनात शंका असेल. कारण मुळात हे आत्मचरित्र नाही. त्यामुळे आत्मचरित्राचा गुळगुळीत बाज त्यात नव्हता. उलट हे पुस्तक म्हणजे आपल्याच आयुष्याची अत्यंत निष्ठुरपणे फेरतपासणी करत घेतलेला आत्मशोध. सुनीताबाईंच्या कडक-करकरीत स्वभावाला साजेल अशा पद्धतीनं केलेला. यात त्यांनी स्वत:ला ‘गुण गाईन आवडी’ या पद्धतीनं सादर केलं नाही, तसं पुलंनाही केलं नाही. पती-पत्नी नात्यातले वेळोवेळी जाणवलेले पीळ उलगडून दाखवताना त्यांनी हातचं काही राखलं नाही. त्यामुळेच पुलंच्या प्रेमात असलेल्या वाचकाला हे रुचेल? पटेल? अशी शंका मनात होतीच. पण मायबाप वाचकांनीच या आठवणीवजा लेखाला कौल दिल्यानंतर या आठवणींचं पुस्तक प्रकाशित करणं आणि तेही मौजेनं प्रकाशित करणं हे अपरिहार्य होतं. या पुस्तकानं साहित्यविश्वात अनेक विक्रम घडवले. या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले. चर्चा-परिसंवाद झाले. उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. पत्रव्यवहार झाला. साहित्यविश्व आणि समाज दोन्ही ढवळून निघाला. त्यानं सुनीताबाई सुखावल्या. पण त्याहीपेक्षा ‘आपलं पुस्तक वाचून सर्वसामान्य महिलांना मन मोकळं करावंसं वाटलं. सामान्य माणसं निर्भय होत आहेत हेच लेखक म्हणून आपल्याला मोठं प्रशस्तिपत्रक वाटतं’, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘आहे मनोहर तरी..’च्या यशानंतर ‘सोयरे सकळ’. ‘मण्यांची माळ’. ‘प्रिय जी. ए.’, ‘मनातलं अवकाश’ ही पुस्तकेही प्रसिद्ध झाली. सुनीताबाईंनी कवितांवर मनापासून प्रेम केलं. या प्रेमानेच त्यांना आणि पुलंना एकत्र आणलं. एवढंच नाही तर ज्या व्यक्तीला कविता आवडते, त्या व्यक्तीशी त्यांची नाळ पटकन जुळायची. कवितेच्या प्रेमापायीच त्यांनी काव्यवाचनाचे कार्यक्रम केले आणि काव्यवाचन कसं असावं याचा एक आदर्शच निर्माण केला. कविता हे त्यांच्यासाठी जगण्याचं माध्यम होतं. जी.एं.बरोबरचं मत्र यामागंही कवितेची ओढ हे एक कारण होतंच.

एखाद्या व्यक्तीमध्ये किती परस्परविरोधी गुण एकवटलेले असावेत, ते एकाच तीव्रतेचे असावेत आणि त्याचा एकत्रित परिणाम होऊन एक अमिट ठसा कसा उमटावा, हे ‘असं जगणं’ या प्रकरणावरून लक्षात येतं. जीवन कसं जगायचं यासाठी सुनीताबाईंची विशिष्ट विचारांवर श्रद्धा होती. याच निष्ठांवरच्या अढळ श्रद्धेतून त्यांनी आंतरिक बळ मिळवलं. महत्त्वाचं म्हणजे जीवनविषयक त्यांच्या या निष्ठा ठाम होत्या. वयोपरत्वे त्या डळमळीत झाल्या नाहीत की परिस्थितीला शरण गेल्या नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या या निष्ठांची झळाळी कमी झाली नव्हती. हे जमवणं किती कठीण असतं, हे या वाटेवरून चालणाऱ्यांनाच कळू शकतं. आज अशा निष्ठावान व्यक्ती शोधायलाच लागतील. सुनीताबाईंचं वेगळेपण अधोरेखित होतं ते याच बाबतीत. म्हणूनच अरुणा ढेरे म्हणतात, ‘सुनीताबाईंच्या प्रेमाचं कठीण कोवळेपण इतरांना समजणं अवघडच. फार फार अवघड.’ पसा, प्रसिद्धी, पत, प्रतिष्ठा याचं आणि फक्त याचंच व्यसन असलेल्या आणि त्यासाठीच आयुष्य पणाला लावणाऱ्या समाजाला कमीत कमी गरजा, जीवननिष्ठांमधला कर्मठपणा, साधेपणाची ओढ, काटकसरी स्वभाव, काटेकोर वृत्ती, टोकाचा स्पष्टवक्तेपणा, सत्यप्रियता, स्वच्छता, नीटनेटकेपणा, साधनशुचिता, कर्मवाद, त्याग, आत्मसमर्पण, व्यक्तिस्वातंत्र्याची आस, श्रमप्रतिष्ठेचा ध्यास.. असे अनेक गुण अनाकलनीय वाटले तर नवल नाही. पण याच गुणांच्या बळावर सुनीताबाईंनी आíथक नियोजन ज्या पद्धतीनं केलं आणि वाचनालयं, प्रयोगशाळा, नाटय़मंदिरं, शिक्षणसंस्था, बालवाडय़ा, हॉस्पिटल्स, व्यसनमुक्ती, विज्ञानप्रसार, सांस्कृतिक कार्य आणि चळवळी, अंधश्रद्धा निर्मूलन, गिर्यारोहण.. अशा अनेक उपक्रमांना पु. ल. देशपांडे प्रतिष्ठाननं सढळ हातानं मदत केली. या मदतीतला सुसंस्कृतता, पारदर्शीपणा आणि निर्मोहीपणा याची अनेक उदाहरणं या प्रकरणात सापडतात आणि सुनीताबाईंना एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. ‘पु. ल. देशपांडे प्रतिष्ठान’ ही एक अत्यंत नमुनेदार ‘एन. जी. ओ.’ होती असं वर्णन केलं जातं ते उगीच नाही. आíथक मदत मागण्यामागचं कारण उचित आहे का नाही, याची सुनीताबाई कठोरपणे तपासणी करायच्या. आपला पसा योग्य ठिकाणीच खर्च होणार आहे, याची खात्री पटली की, कोणीच त्यांच्याकडून विन्मुख परत जायचा नाही आणि या मदतीचा त्यांनी कधी गवगवाही केला नाही. किंवा प्रसिद्धी मिळवण्याचं साधन म्हणूनही उपयोग केला नाही.

या पुस्तकात पानोपानी विखुरलेल्या सुनीताबाईंमधील गुणांबद्दल लिहावं तेवढं थोडंच आहे. त्यामुळे हे पुस्तक परत परत वाचावं, सुनीताबाईंच्या जीवननिष्ठा समजून घ्यायचा प्रयत्न करावा. आज ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, आयुष्याला वळण देण्याचा प्रयत्न करावा, पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करावा, लवून नमस्कार करावा असं मनापासून वाटावं, अशी उत्तुंग व्यक्तिमत्त्वं अभावानंच सापडतात. ‘सुनीताबाई’ या पुस्तकाच्या रूपात एक असं व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यांसमोर उभं करून मंगला गोडबोले यांनी आपल्यासमोर एक आव्हानच ठेवलं आहे. सुनीताबाईंचे विचार, धारणा, निष्ठा जेवढय़ा झिरपवता येतील तेवढय़ा झिरपवून आपल्या जीवनाचा आणि जगण्याचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न करावा, यासाठी.

शुभदा पटवर्धन
४ जुलै २०११
लोकसत्ता 

Monday, August 9, 2021

वल्ली पुलंना आठवताना! - समीर जावळे

पुलंच्या कथांचं गारुड आजही कायम

“एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंथ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये? याला काही उत्तर नाही” असं वाक्य पुलंच्या रावसाहेब या कथेत आहे. हेच वाक्य अगदी त्यांच्याबाबतीतही तंतोतंत खरं आहे. कारण पुलंशी महाराष्ट्राशी जी नाळ जोडली गेली त्याप्रमाणात इतर अनेक दिग्गज लेखकांशी, साहित्यिकांशी ती जोडली गेली नाही. त्या साहित्यिकांचं साहित्य आणि साहित्यनिर्मितीतलं योगदान हे प्रचंड होतं. मात्र महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व हे विशेषण लागलं ते पुलंच्याच नावाच्या आधी. होय पुलंवर महाराष्ट्राचं कालही प्रेम होतं आणि आजही आहे आणि उद्याही राहिल. याचं कारण त्यांची खुमासदार शैली. गोष्ट सांगण्याची त्यांची शैली आजही आपल्याला गुंगवून ठेवते. त्याच्या कथा वाचून, ऐकून, नाटकं पाहून, चित्रपट पाहून, विचार ऐकून कैक पिढ्या घडल्या आहेत. यापुढेही घडतील.

‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातलीच काही उदाहरणं घ्या. नारायण लग्नात स्वयंसेवकगिरी करणाऱ्या माणसांचं निरीक्षण करुन पुलंनी ही कथा लिहिली. यातल्या नारायणाची शब्दांमधून भेट घडवून आणली. या कथेत पुलंनी काढलेली आवाज हेदेखील या कथेचं खास वैशिष्ट्य आहे. जी गोष्ट नारायणची तशीच अंतू बर्व्याचीही. ‘देवाने माणसाची एक निराळीच घडण केली आहे त्यांच्यामध्ये रत्नागिरीच्या लाल चिऱ्याचे, खाजऱ्या आळवाचे आणि फट् म्हणता प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकटवून आहेत. अंतू बर्वा याच मातीत उगवला आणि पिकला.’ अंतूशेठ कसे होते हे सांगत असतानाच पुलं त्यांचं यथार्थ वर्णन करतात. ‘आमची ही चाळीस वर्षांपूर्वी गेली तेव्हापासून दारचा हापूस मोहरला नाही.’ हे वाक्य ऐकताच अंगावर काटा येतो. ‘पहाटेच्या इवल्याश्या प्रकाशात त्यांचं ते खपाटीला गेलेलं पोट उगाचच माझ्या डोळ्यांवर आघात करुन गेलं’ वाक्य आलं की डोळ्यात आपोआप पाणी येतं. त्यांच्या विनोदाला कुठेतरी कारुण्याची झालर आपल्या डोळ्यांच्या कडा नकळत ओल्या करुन जाते. हसता हसता डोळ्यातून पाणी काढण्याचं कौशल्य त्यांच्या ठायी होतं.

सखाराम गटणे, नामू परिट, नाथा कामत, हरितात्या ही पात्रंदेखील पु.ल. त्यांच्या बोलण्यातून अक्षरशः जिवंत करतात. त्यांच्या म्हैस या कथेत तर सगळ्या बसचं वर्णन आहे. मास्तर, ऑर्डरली, मधु मालुष्टे, ड्रायव्हर, कंडक्टर, बाबासाहेब मोरे, म्हशीचा मालक धर्मा मांडवकर ही सगळी पात्र पु.ल. फक्त शब्दांमधून उभी करतात. त्यांचं निरीक्षण कौशल्य आणि गोष्ट सांगण्याचं कसब इथे पणाला लागलंय.

पाळीव प्राणी ऐकताना, वाचतानाही त्यांचं निरीक्षण कौशल्य आणि ती कथा सांगण्याची विशिष्ट शैली आपल्याही नकळत आपल्यावर कथा सांगण्याचा एक संस्कार करुन जाते. ‘चार-पाच कावळे एकत्र बसले की म्हाताऱ्या वकिलांची एक मुरब्बी टोळीच बसली आहे असं मला वाटतं.’ ‘कबुतरांचं गळ्यात आवाज काढून बोलणं हे मुंबईच्या पारशी लोकांच्या बोलण्याशी मिळतंजुळतं असतं आणि काहीबाबतीत वागणं सुद्धा!’ कुसुकूला आवाज देणारे आजोबा हे सगळं आठवलं की हसू येतं. आजोबांचा विशिष्ट पद्धतीने काढलेला आवाज हादेखील दखल घेण्याजोगा.

‘बिगरी ते मॅट्रीक’मध्ये पु.ल. सांगतात, बिगर इयत्तेपासून ते मॅट्रीकपर्यंतचा माझ्या सगळ्या प्रवासाचं वर्णन हे खडतर असंच करता येईल. बालपण सुखात गेलं असं म्हणताना माझी जीभ चाचरते, दामले मास्तरांचं वर्णन करताना पु.ल. वर्गातल्या विद्यार्थ्यांबाबतही बोलत असतात. सगळा वर्ग त्यांच्या कथेतून आपल्या डोळ्यासमोर उभा करतात. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर पु.ल. कागदावर उमटवलेल्या ओळींमधून निर्माण झालेल्या पात्राशी आपली भेट घडवून आणतात. इतिहासात रमणारे हरितात्या, बाबा रे… तुझं जग वेगळं, माझं जग वेगळं म्हणणारा नाथा कामत, इस्त्रीला कपडे घेऊन गेला की हमखास घोळ घालणारा नामू परिट ही पात्रं आजही आपल्या आजूबाजूला फिरत आहेत का असं वाटतं याचं कारण आहे ते पुलंची आगळी वेगळी शैली. त्यांच्या कथा वाचताना ऐकताना त्यांच्या खास शैलीचं दर्शन होतं.

व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात जशी पुलंना भेटलेली माणसं त्यांनी आपल्या कल्पनेतून साकारली आणि त्यांचं वर्णन केलंय अगदी तसंच त्यांच्या आयुष्यात खरीखुरी आलेली जी माणसं होती त्यांचं वर्णन गणगोत या पुस्तकात आहे. रावसाहेब म्हणजेच बेळगावचे कृष्णराव हरीहर यांचं जे वर्णन पुलंनी केलं आहे त्याला तोड नाही.

मंगेश साखरदांडे, भाई, बटाट्याच्या चाळीचे मालक, पुरुषराज अळूरपांडे, कोट्यधीश पु.ल. अशा टोपण नावांनी पु.ल. ओळखले जातात. अघळपघळ, अपूर्वाई, असा मी असामी, आपुलकी, उरलंसुरलं, गोळाबेरीज, पूर्वरंग, अपूर्वाई, खिल्ली, हसवणूक, गाठोडं, एक शून्य आणि मी अशी कितीतरी पुस्तकं त्यांनी लिहिली.

अंमलदार, एक झुंज वाऱ्याशी, तुका म्हणे आता, ती फुलराणी, तीन पैशांचा तमाशा, सुंदर मी होणार, वटवट सावित्री ही नाटकंही लिहिली. पुढारी पाहिजे आणि वाऱ्यावरची वरात ही लोकनाट्यंही लिहिली. कुबेर, भाग्यरेषा, वंदे मातरम या चित्रपटांमधून अभिनय केला. मानाचे पान, मोठी माणसे, गोकुळचा राजा, नवरा बायको, पुढचं पाऊल, वर पाहिजे, दूधभात, संदेश, देवबाप्पा, गुळाचा गणपती या चित्रपटांसाठी कथा, पटकथा लेखनही केलं. यात विशेष उल्लेख करावा लागेल तो गुळाचा गणपती या चित्रपटाचा. कारण या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत, दिग्दर्शन आणि अभिनय हे सारंकाही पुलंच्या नावे आहे. सबकुछ पु.ल. असलेला हा सिनेमा आजही रसिकांच्या स्मरणात आहे. ती फुलराणी या नाटकाचा विशेष उल्लेख करावा लागेल. कारण हे नाटक भक्ती बर्वे साकारत होत्या. यातली मंजुळा ही भूमिका भक्ती बर्वेंनी अजरामर केली. जॉर्ज बर्नॉड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचं हे मराठी रुपांतर होतं. भक्ती बर्वेनंतर प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी, अमृता सुभाष यांनीही ही भूमिका साकारली. हेमांगी कवीनेही फुलराणी साकारली.

पुलंनी लिहिलेलं नाच रे मोरा आंब्याच्या वनात हे गीत आजच्या पिढीसाठीही बालगीत ठरलं. मोराचं इतकं सुंदर वर्णन या गीतामध्ये केलं आहे की ते गीत आजही सहज आपल्या ओठी येतं. उत्तम संगीत देखील ते देत. गाणं, नाटक, साहित्य, रेडिओ, दूरचित्रवाणी या सगळ्या क्षेत्रात ते लीलया वावरले. त्यांनी जिवंत केलेली बटाट्याची चाळही आजही आपल्या मनात एक घर करुन राहिली आहे.

असा मी असा मी हे त्यांचं नाटकही चांगलंच गाजलं. व्यक्ती आणि वल्ली या नाटकाचे प्रयोग करताना यामध्ये पुलंची भूमिका साकारली ती अतुल परचुरे या गुणी अभिनेत्याने. पुलंच्या समोर मला त्यांची भूमिका साकारण्याचं भाग्य लाभलं अशी प्रतिक्रिया अतुल परचुरे यांनी एका मुलाखतीत दिली होती. पुलंकडूनही त्यांच्या कामाचं कौतुक झालं. निखिल रत्नपारखी, आनंद इंगळे, संजय मोने यांनीही पुलंच्या भूमिका साकारल्या. मात्र विशेष कौतुक झालं ते अतुल परचुरे यांचंच.

पुलंच्या हजरजबाबीपणाचे अनेक किस्सेही प्रसिद्ध आहेत. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की मी एक खेळिया आहे. मला हे असंच जगायला आवडतं. पुलंच्या पत्नी सुनिताबाई देशपांडे यांनीही त्यांना कायमच साथ दिली. आहे मनोहर तरी हे त्यांचं पुस्तक प्रचंड गाजलं. तसंच मण्यांची माळ, मनातलं आकाश, सोयरे सकळ या पुस्तकांचंही लेखन सुनिता देशपांडे यांनी केलं. त्या सामाजिक कार्यकर्त्याही होत्या. पुलंच्या सुंदर मी होणार या नाटकात त्यांनी दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिकाही साकारली होती.

एक पोडियम आणि माईक, शेजारी टेबलवर भरुन ठेवलेलं तांब्या भांडं आणि त्या माईकवर आपली कथा सांगणारे पु.ल. हे चित्र अवघ्या महाराष्ट्राला परिचित झालं. कथाकथन हे महाराष्ट्राच्या मातीत रुजवलं ते पुलंनीच. स्टँड अप कॉमेडी हा प्रकार सध्याच्या काळात चांगलाच लोकप्रिय ठरतोय. मात्र त्याचे जनक हे पु.ल. आहेत असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. पानवाला, मी आणि माझा शत्रुपक्ष, म्हैस, पाळीव प्राणी, तुम्हाला कोण व्हायचं आहे मुंबईकर पुणेकर की नागपूरकर? या आणि अशा अनेक कथा त्यांनी नुसत्या सांगितल्या नाहीत तर त्यातल्या पात्रांशी आपली भेट घडवून आणली. शब्दांच्या या जादुगाराने निर्माण करुन ठेवल्या साहित्यकृतींंवर, नाट्यकृतींवर, संगीतावर आणि भाषणांवर महाराष्ट्राने अतोनात प्रेम केलंय करत राहिल. ते गेले त्याला आता वीस वर्षे झाली आहेत. मात्र आजही ते आपल्यातच आहेत असंच वाटतं ते त्यांच्या लिखाणामुळेच.

पु.ल. गेले ही बातमी आली तेव्हा आपल्या घरातलंच ज्येष्ठ माणूस गेलंय अशी भावना महाराष्ट्राच्या मनात होती. त्यांचं जाणं चटका लावून गेलं असलं तरीही त्यांनी जी निर्मिती करुन ठेवली आहे ती त्यांना अमर करुन गेली. शेवटी जाता जात त्यांच्याच रावसाहेब या कथेतलं शेवटलं वाक्या आठवतं.. देवाने आमची छोटीशी जीवनं समृद्ध करण्यासाठी दिलेल्या या देणग्या! न मागता दिल्या होत्या.. न सांगता परत नेल्या.

समीर जावळे 
sameer.jawale@indianexpress.com
लोकसत्ता 
१२ जून २०२०

a