Friday, February 25, 2022

चीनचे आक्रमण व पु.ल.देशपांडे यांचे राष्ट्रप्रेम

१९६२च्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार व "महाराष्ट्र टाइम्स"चे माजी सहसंपादक, लष्करी विषयाचे अभ्यासक कै.श्री दि. वि.गोखले यांच्या "माओचे लष्करी आव्हान" या पुस्तकासाठी कै. पु.ल.देशपांडे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही अंश

●राजकारण हा माझा विषय नव्हे. परंतु राष्ट्रप्रेम प्रेम माझा हक्क आहे. माझ्या राष्ट्रावर आक्रमण करणारा आणि त्या आक्रमकांना सहाय्य करणारा तो माझा शत्रू एवढेच मला कळते. मग तो चिनी असो वा पाकिस्तानी !प्राण पणाला लावून त्याला ठेचले पाहिजे, एवढाच डावपेच मला ठाऊक आहे. त्यासाठी ज्यात माझे सामर्थ्य आहे असे मला वाटते, त्या लेखणीला,लाठीला नांगराला आणि झाडूलाही शस्त्र मानणे हा माझा धर्म आहे. माझाच काय, परंतु या देशाला माझा देश म्हणणाराला एवढेच राजकारण कळते आणि एवढेच पुष्कळ आहे. चिनी हल्ला येताच प्रथम कोण खवळून उठले हे ध्यानात घेतले, तर सोने कुठले आणि पितळ कुठले ते लगेच उमगेल. हे आक्रमण आहे की नाही असा वाद घालत बसले कम्युनिस्ट !मुस्लिम लिगनेही काही जोरदार युद्धप्रचार केल्याचे ऐकिवात नाही. असे असूनही ज्यांचे हात भाजून काढले पाहिजेत,अशा आसुरी मतप्रणालीच्या देशाशी हातमिळवणी करून त्यांच्या कृपेचे भाजन होण्यासाठी आमच्या देशातील नेते कसे धडपडत होते, याचा इतिहास (दि.वि.)गोखल्यांनी पुढे दिलाच आहे. राष्ट्रप्रेमी शूरांचा अपमान,त्यांना अनुल्लेखाने मारणे, स्वमताशी विरोध असणाऱ्या अनुभवी पुढाऱ्यांची हेटाळणी करणे यातच आमच्या नेत्यांची बुद्धी खर्च होत होती.

●आमच्या राष्ट्रीय जीवनातला हा अत्यंत संतापाचा क्षण आहे. यापुढे भारताला संतप्त भारत म्हणून काही वर्षे काढावी लागतील. आम्ही 'मऊ मेणाहूनी' असलो तरी 'कठीण वज्रासि' भेदू ऐसेही आहोत हे सिद्ध केले पाहिजे.ज्या राष्ट्राचे सैन्यबल अद्ययावत असते,राष्ट्रभक्ती ही एकमेव कसोटी असते, साऱ्या राष्ट्राला पंथ, धर्म, जाती निरपेक्ष एकच कायदा लागू असतो, राष्ट्रविघातक अशा लहानातल्या लहान गुन्ह्यालादेखील जेव्हा जबर शासन असते त्या वेळीच त्या राष्ट्राने म्हटलेल्या शांतीपाठाला अर्थ येतो. समुद्राच्या पोटातल्या वडवानलामुळे सागराच्या शांततेला शोभा आहे. एरवी डबकेही शांत असते. पण जिथे वादळाची शक्यताच नाही,जे कधी उचंबळूनच येत नाही,त्याच्या शांततेला अर्थ काय? त्यात नुसतीच डरांव डरांव करणारी बेडके असतात बेडकांच्या डरांवमुळे कोणी डरत नाही.

● देशादेशांतली मैत्री हा एक राजकारणी डाव असतो. पर्ल हार्बर ची कथा सर्वश्रुत आहे. ही मैत्री म्हणजे परिस्थितीने घडवून आणलेली विचित्र शय्यासोबत असते. "हिंदी-चिनी भाई भाई" ने आम्ही खरोखरच हुरळलो. मातब्बरांचा मोरू झाला तिथे बाजारबुणग्यांचे काय!गेल्या महायुद्धात इंग्लंड-अमेरिकेच्या गळ्यात गळा घालून रशिया देखील दृष्ट्या देखील दोस्त म्हणून उभा होता. त्या दोस्तीचा मृत्यूलेख त्याच रशियाने बर्लिनच्या भिंतीवर कोरलेला आहे. तो ज्यांना अजूनही शंका असेल त्यांनी जाऊन वाचून यावा. आईपासून लेकरे, नवऱ्यापासून बायका, वृद्ध आजोबा आजींपासून नातवंडे यांची त्या भिंतीने केलेली ताटातूट पाहून यावे व नंतरच कम्युनिस्टांतल्या डाव्या-उजव्या विषयीच्या कथा सांगाव्या. त्यातून शय्यासोबत हि राजकारणात समर्थ राष्ट्रांचीच होऊ शकते.लांडगे शेळ्यांना पोटाशी घेतात,ते पुढेमागे स्वतःची भूक भागवण्याची सोय म्हणून!

पु ल देशपांडे लिखित प्रस्तावनांचा संग्रह "चार शब्द"
(पृष्ठ ४०-४१-४२)
मौज प्रकाशन वरून साभार
© संकलन : दिलीप क्षीरसागर

0 प्रतिक्रिया: