Thursday, August 1, 2019

| परी या सम हा |

परमेश्वर एखादया व्यक्तीला काय काय आणि किती देऊ शकतो ? उत्तम लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, गायक, नाटककार. विश्वास बसू नये, येवढे गुणसंपन्न व्यक्तिमत्व म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ़ रसिकांचे लाडके पु.ल. आणि माझे "पुलदैवत". 
माझा आणि पु.ल. यांचा परिचय झाला व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाच्या माध्यमातून , जे मला बक्षिस म्हणून मिळाले होते. जसं जसं मी ते वाचत गेलो, तसा तसा त्यांच्या जबरदस्त अवलोकनशक्तीचा अचंबा वाटू लागला. नारायण, अंतू बर्वा, चितळे मास्तर, हरितात्या, नंदा प्रधान, नाथा कामत, बबडू व इतर हे माझे नातेवाईक असावेत असं वाटू लागलं. हा चमत्कार या जादूगाराच्या लेखणीचा होता. मग मात्र पु. ल. यांना प्रत्यक्ष पहाण्याचे दैवी योग आले.

१९६४ साल असेल. आम्हा एन.सी.सी.च्या मुलांची त्यांच्याबरोबर भेट होण्याचा योग आला. पार्ला कॉलेजचे प्रिन्सिपॉल माननीय श्री. सी.बी. जोशी यांच्या ख़ास आमंत्रणावरून पु. ल. देशपांडे, आम्हाला कविवर्य ग.दि. माडगूळकर यांचे “जिंकू किंवा मरू” हे समरगीत शिकवण्यासाठी आले होते. त्या काळी मराठीच्या नांवाने कंठ दाटून न बोलतासुद्धा किंवा तोड-फोड़ आंदोलने न करतासुद्धा, मराठीवर मनापासून प्रेम करणारे लाखो लोक मुंबईत होते. रोझ डे, पिझ्झा डे, रिस्ट बँण्ड डे, फॅशन डे यांची लागण कॉलेजांना झाली नव्हती. स्वतःच्या मुलांना कॉन्व्हेंण्ट मिडियम शाळेमध्ये घालून, भर सभेत मराठी संस्कृती, मराठी भाषा/परंपरा याविषयी मुठी आवळून व शिरा ताणून बोलणारी नेते मंडळी अजून जन्माला आलेली नव्हती. मुंबईत मराठी बोलतांना कोणालाही लाज वाटत नसे (हल्लीच्या ‘शोभाडे’ परिभाषेत डाउनमार्केट). उलट अभिमानाने लोक मराठी बोलत. भाजीवाले वसईचे असत. त्यांच्या व्यवसायाशी ईमान राखत. दूधवाले स्वत:ला गवळी म्हणवत. हिंदी भाषा ही हिंदी चित्रपटांपुरतीच मर्यादित होती.

तर सांगत काय होतो, तेव्हां पु.ल. देशपांडे यांनी आम्हाला ‘माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू’ हे समरगीत आमचे दिव्य आवाज सहन करीत आम्हाला शिकवलेच पण त्यानंतर ‘वंदे मातरम्’ हे बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय यांचे स्फूर्तिदायक गीतही आमच्याकडून म्हणवून घेतलं.

त्यानंतर बटाट्याची चाळ, वाऱ्यावरची वरात, हंसवण्याचा माझा धंदा यामधून रंगभूमीवरचे पु. ल. भेटतच राहिले. आणि नस्ती उठाठेव, खोगीरभरती, असा मी असा मी, बटाट्याची चाळ, हंसवणूक, पूर्वरंग, अपूर्वाई, जावे त्याच्या देशा, तुझं आहे तुजपाशी, पु. ल. एक साठवण, गणगोत या पुस्तकांतून आमच्याशी संवाद साधत राहिले.

पु.ल. यांच्या साहित्याचं एक वैशिष्टय आहे. त्यांची वाक्यं आपल्याला मुद्दाम लक्षांत ठेवावी लागत नाहीत. ती वाचता वाचता आपल्या शरीरांत भिनून जातात. आपली होऊन जातात. मग ते चितळे मास्तरांचे “अरे पुरुषोत्तम, या मास्तराच्या बायकोच्या गळ्यात नाही पण डोळ्यांत मात्र मोती पडले हो !” हे वाक्य असो किंवा “कशाला हवी ती वीज ? हे दळीद्रच बघायला ना ? या पोपडे उडालेल्या भिंती, ही गळणारी कौलं बघायला वीज हो कशाला ?” हे अंतू बर्व्याचं वाक्य असो. ते थेट अंत:करणाला भिडतं. “मुळांत मला तो मुद्दलातला घोडाच दिसत नव्हता, तर त्यावर चढ़लेलं हे व्याज कुठून दिसणार ?”......“सांगा बघू हा फोटो कुणाचा...तीन चान्स” अहो म्हणाले. वास्तविक त्या फोटोतली व्यक्ती चांगल्या तीन हनुवट्याचा भार घेउन, माझ्या समोर बसली होती. “ही देविकाराणी किंवा दुर्गा खोटे कां हो ?” माझ्या या वाक्यावर ‘अहो’ तुडूंब खूष झाले. “परवा तो गजानन तुला काय समजला ग ?” “ईश्श वहिदा रेहमान.” जमेल तेवढं लाजत सौ म्हणाल्या. माझ्या आधी त्या घरांत गजानन नांवाचा चतुर पुरुष येउन गेला होता हे मी ताडले. ” असे शब्दनिष्ठ विनोद किंवा प्रसंगनिष्ठ विनोद ही जरी पु.ल. यांच्या विनोदाची खासियत असली, तरीही त्यांच्या कथेचा शेवट बऱ्याच वेळा कारुण्याकड़े झुकतो. मग तो नारायण या व्यक्तिचित्राचा शेवट असो किंवा हरितात्या असो किंवा बटाट्याची चाळीचं स्वगत असो. वाचकाच्या डोळ्यांत हंसता हंसता पाणी आणण्याची ताकद त्यांच्या शब्दांत आहे.

पण पु. ल. यांचं पुस्तक घरातच वाचावं. अहो बसमध्ये वाचत असतांना अचानक "आणि हा आमचा संडास"... “अरे वा !!इथे पण ऑटोमेटिक होतं की कुंथावं लागतं ?(मी आणि माझा शत्रुपक्ष)” असं वाक्य आलं आणि हंसू अनावर झालं तर इतर लोकं, हा येडा एकटाच कां हंसतो आहे ? असा चेहरा करून बघतील.

पु. ल. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा पार्ल्याला टिळक मंदिराच्या प्रांगणात त्यांची सत्कार सभा झाली. आचार्य अत्रे, दाजी भाटवडेकर, श्रीकांत मोघे, रामुभय्या दाते अशी बड़ी बड़ी मंडळी (आत्ताच्या भाषेत सेलिब्रेटी) व्यासपीठावर होती. आचार्य अत्रे यांनी आपल्या भाषणात सांगीतलं “आम्ही फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. होऊन बाहेर पडलो आणि पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म झाला.” या अत्यंत बादरायण संबंध असलेल्या वाक्याला, केवळ अत्रे बोलले म्हणून श्रोते हंसले. त्यानंतर पु. ल. बोलायला उभे राहिले तेव्हां अत्रे यांच्या त्या वाक्याचा संदर्भ घेत पु. ल. म्हणाले “आचार्य अत्रे बी.ए. झाल्यावर माझा जन्म झाला, असे म्हणण्याऐवजी, राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर नऊ महिन्यांनी माझा जन्म झाला असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल.” आणि टाळ्याच्या कडकडाटाने तो परिसर दणाणुन गेला.


साहित्य अकॅडमीचं पारितोषिक पु. ल. यांना मिळालं,त्या पारितोषिक वितरणसोहाळ्याप्रसंगी दिल्ली येथे इंग्लिशमधून भाषण करतानाही त्यांनी नर्म विनोदाची पखरण केली. उदाहरणच द्यायचं तर : “I had written about Barbers in one of my articles and there was a full throated protest from Barber community. They sent me a Legal Notice, which said that “I have hurt their professional Pride”. However there was a printing error. Instead of Professional Pride, it said Professional Bride. And now even my wife is watching me with suspicion” या वाक्यावर ते सभागृह हास्यस्फोटात बुडून गेलं.


ज्ञानपीठ पारितोषिकावरून आठवलं. कविवर्य कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहिर झालं होतं. पार्ले टिळक शाळेच्या मैदानावर त्यांचा सत्कार समारंभ होता. व्यासपीठावर स्वत: कुसुमाग्रज, ना. ग. गोरे, शंकर वैद्य, डॉ. सरोजिनी वैद्य, पु.ल. देशपांडे असे मान्यवर होते. शंकर वैद्य सरांनी कुसुमाग्रजांच्या काव्य प्रतिभेचे रसग्रहण करतांना “काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, दिवसाच्या वेशीवर उभे प्रकाशाचे दूत” या कवितेतील हळवा प्रणय अशा ओघवत्या भाषेत उलगडला की श्रोते काव्यानंदांत धुंद झाले. वैद्य सरांनंतर पु. ल. बोलायला उभे राहिले. पु. ल. म्हणाले कुसुमाग्रजांच्या कवितांनी आमचं तरुणपण रोमँण्टिक केलं. पण आत्ता शंकर वैद्य ती कविता अनुभवताना इतके रंगले होते, की पाठीमागून सरोजिनी बाई “अहो पुरे...अहो पुरे” म्हणताहेत, याचं सुद्धा त्यांना भान नव्हतं. पु. ल. यांच्या या अवखळ टिप्पणीवर कुसुमाग्रजांनी जोरांत हंसून ना. ग. गोरे यांना टाळी दिली आणि समस्त श्रोत्यांनी जोरदार हास्याने सलामी दिली. पु. ल. मात्र ‘आपण त्यांतले नव्हेच’ असा मिष्किल चेहरा करून बघत होते.

हजरजबाबीपणात पु.ल. यांचा कोणी हात धरू शकणार नाही. एकदा एका मुलाखतीत त्यांना विचारलं गेलं, ओरिएंट हायस्कूल मध्ये तुम्ही शिक्षक म्हणून असतांना ‘सत्तेचे गुलाम’ या मामा वरेरकर यांच्या नाटकांत तुम्ही व सुनिता ठाकुर यांनी एकत्र काम केलं होतं. त्याचं पुढे काय झालं ? एक क्षणही न दवड़ता पु. ल. म्हणाले ‘ काय होणार. तिच्याकडे सत्ता गेली. मी गुलाम झालो’ आणि मुलाखतकर्त्यालाही हंसू आवरेना.

एकदा एका समारंभात पु. ल. दामूअण्णा मालवणकर व आणखी एक त्यांचे स्नेही बसले होते. तेवढ्यात भारती मालवणकर तिथे आल्या व दामूअण्णांशी बोलून गेल्या. स्नेह्यांनी पु. ल. यांना विचारले “या कोण ?” त्यावर पु.ल. यांनी त्या दामूअण्णांच्या कन्या” असे उत्तर दिले. ‘वाटत नाहीत’ अशी त्या स्नेह्यांची प्रतिक्रया आल्याबरोबर पु.ल. म्हणाले “त्यांचा ‘डोळा’ चुकवून जन्माला आली आहे.”

एकदा सुधीर गाडगीळ माणिक वर्मा यांची मुलाखत घेत होते. माणिक ताई आणि त्यांचे पती यांची भेट कशी झाली. कोण कुणाला काय बोलले ? प्रेमाची प्रथम कबूली कोणी दिली ? असे प्रश्न गाडगीळ खोदून खोदून विचारत होते. व माणिकताई संकोचाने उत्तर द्यायचे टाळत होत्या. तेवढ्यात समोर बसलेले पु.ल. मोठयाने म्हणाले “ अरे सुधीर, त्यांच्या वर्मावर बोट ठेवू नको रे ” आणि सभागृहांत एकच हास्य कल्लोळ झाला.

"आम्ही जातो आमुच्या गांवा" या चित्रपटांत नायिकेला पहायला एक फॅमिली येते. तो मुलगा नायिकेला पसंत नसतो. त्याला पिटाळून लावण्यासाठी तीन चोर त्यांच्या जेवणांत जमालगोटा मिसळतात व मग त्या फॅमिलीची टॉयलेटच्या दिशेने पळापळ होते, असा तो विनोदी सीन होता. या चित्रपटाबद्दल पु.ल. देशपांडे यांना त्यांची प्रतिक्रिया एका समिक्षकाने विचारली. यावर चेहरा गंभीर ठेवून पु.ल. म्हणाले " चित्रपटाला 'मोशन पिक्चर' असं कां म्हणतात ते मला आज कळलं".

पण रसिकांना सतत हंसत ठेवणाऱ्या या देवदूताचं आगळवेगळं रूप लोकांनी पाहिलं ते “१९७६च्या आणिबाणी पर्वांत”. त्यावेळी पु.ल.च्या शब्दांना खड्गाची धार चढली होती. अवघा महाराष्ट्र त्यांनी आपल्या लेखणी आणि वाणीने ढवळून काढला. सत्तधाऱ्यांना कांपरे भरले. त्यांनी सारासार विचारबुद्धी बाजूला ठेवून पु.ल. यांच्यावर गर्हनीय टीकास्त्र सोडलं. पण हा पु.ल. यांच्या अन्यायाविरुद्ध दंड थोपटण्याच्या पवित्र्याचा विजय होता. ज्यांनी पु.ल.विरुद्ध ते उदगार काढले, त्यांनी त्या पर्वानंतर स्वत:च्या मूर्खपणाबद्दल खेद व्यक्त केला. अर्थांत पु.ल. ना कशाचीच गरज नव्हती. सरकारच्या मेहरबानीवर ते जगत नव्हते. उलट त्यांनी आपल्या साहित्यातून, नाटकातून जो पैसा कमावला त्याचा विनियोग समाजातील दुर्बळ घटकांना बळ देण्यासाठी केला. कित्येक लाख रुपयांचा दानधर्म त्यांनी सेवाभावी संस्थांना मदत म्हणून केला. पण हे करतांना कॅमेरा, मिडिया, प्रसिद्धि या सर्व प्रलोभनापासून ते दूर राहिले. “इदंम् न मम” हे त्यांच्या जीवनाचं सूत्र होतं. आणि या सर्व प्रवासांत त्यांना सांवलीसारखी साथ केली ती त्यांच्या सहचारिणी सुनिताबाई यांनी. पु.ल. यांच्या साहित्यिक व कलेच्या जीवनाला त्यांनी शिस्त लावली. आर्थिक मदत कोणत्या संस्थेला करायची ते त्या ठरवत. आणि त्यांचे निर्णय योग्य असत. पु.ल. यांच्यासाठी त्यांनी प्रसंगी वाईटपणाही घेतला. पण त्या खंबीर राहिल्या म्हणून पु.ल. त्यांची रंगभूमी व साहित्याची सेवा प्रभावीपणे करू शकले, हे सत्य आहे.

पु,ल. देशपांडे या व्यक्तिमत्वाशी आपण प्रत्यक्ष भेट घेऊन बोलावं , असं माझ्यातल्या ‘सखाराम गटणेला’ खूप वेळा वाटे. पण ते शक्य झालं नाही. वास्तविक पु.ल. यांची सख्खी बहिण (भास्करभाई पंडित यांची आई) ही माझ्या सासऱ्यांच्या सख्ख्या धाकट्या बहिणीची सासू. भाऊबीजेच्या निमित्ताने पु.ल. देशपांडे आपल्या बहिणीकड़े मालाड येथे जात. व माझे सासरेपण त्यावेळी तिथे असत. दोघांचा चांगला स्नेह होता. भास्करभाईना सांगून मला पु.ल. यांना भेटता आलं असतं. पण माझ्या भिडस्त स्वभावामुळे ते प्रत्यक्षांत येऊ शकले नाही. जयाकाकांना (सुप्रसिद्ध साहित्यिक/नाटककार श्री.जयवंत दळवी) मी सांगितले असते, तरी त्यांनी मला निश्चित पु.ल. यांना भेटवलं असतं. पण असो ! गतम् न शोच्यम् | हेच तात्पर्य.

पु. ल. यांच्या विनोदातील बारकावे समजायला मराठी भाषा मात्र व्यवस्थित यायला हवी. “मराठी लँग्वेज स्पिकायला ज़रा प्रॉब्लेम होतो” या वर्गातल्या मंडळीना पी.एल.देशपांडे यांच्या लिटरेचरमध्ये कसला एवढा ह्यूमर कंटेंट आहे ?असाच प्रश्न पडेल. .

पु. ल. नांवाचा हा महासागर माझ्या या चार ओळीच्या छोटया ओंजळीत मावणं अवघड आहे. तस्मात ‘आणखी पु. ल.’ नंतर सावकाशीने.

@ © अनिल रेगे.
१२ जून २०१९.
मोबाईल : 9969610585

0 प्रतिक्रिया: