Monday, February 28, 2022

आकाशवाणीच्या कार्यक्रमाची धमाल रूपरेषा - वटवट (पु.ल. देशपांडे)

रेडिओवरील कार्यक्रमाची रूपरेषा आपण नेहमी ऐकतो. पण पुलंनी 'वटवट' मध्ये लिहलेली आकाशवाणीच्या कार्यक्रमाची धमाल रूपरेषा वाचा :-

"सकाळचे सात आवजून नऊ सेकंद होतं आहेत. आता ऐका आमच्या आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि हवामानाचा अंदाज.

रात्री साडेनऊ वाजता ' अधिक मुले शिकवा ' या सप्ताहाच्या उदघाटनानिमित्त समाजकल्याण, दळणवळण, कुटुंबनियोजन, पाटबंधारे आणि जंगल खात्याचे मंत्री माननीय बाबासाहेब डांगोरे यांचे भाषण.

महिलांसाठी खास कार्यक्रम - 'बायका-बायका', सादरकर्त्या सुद्धा बाळसेकर, दुपारी बारा वाजता.

दुपारी बारा वाजता महिलांसाठी खास कार्यक्रम झाल्यावर सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी विद्यार्थ्यांसाठी 'धावत -पळत संस्कृत' हा संस्कृत भाषेच्या अभ्यासाचा कार्यक्रम सादरकर्ते एस.एस.घोकंवार.

रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी भाव - ग म भ न -सुगम संगीताच्या ध्वनिमुद्रिकांवर आधारित निवेदनाचा विशेष कार्यक्रम . सादरकर्त्या किंकिणी किणीकर.

संध्याकाळी सहा वाजता ग्रामीण बंधू-भगिनींसाठी भोवाणी शेतकरी मंडळ. आमच्या शेतकरी बंधूंच्या कार्यक्रमात ऐका -- The International Institute of Scientific Research in Nuclear Studies या विषयावर डॉ. अविनाश हमरीकर यांचे भाषण आणि गुंडुबुवा घोटींग यांचे कीर्तन. कीर्तनाचा विषय आहे भगवंताचे नामसमरण.

संध्याकाळी सात वाजता 'कामगार अड्डा'. यात विशेष कार्यक्रम ऐका - 'उपनिषदांचे तत्वज्ञान ' संवादात भाग घेणारे कलावंत दुढ्ढाचार्य भस्मे आणि सिद्धेश्वरशास्त्री तुंदील.

रात्री साडेदहा वाजता मुलांसाठी विशेष कार्यक्रम 'धम्मक लाडू' आजच्या लहान मुलांच्या कार्यक्रमात ऐका - 'कुटुंबनियोजन आणि बालकांचे कर्तव्य' माफ करा हं - 'कुटुंब नियोजन आणि पालकांचे कर्तव्य' सादरकर्ते मधुभाऊजी आणि गोदाताई.

आता ऐका हवामानाचा अंदाज - आज हवा कोरडी राहील . मधूनमधून पावसाच्या सारी पडतील. विदर्भ -मराठवाडा, नॉर्वे, स्वीडन आणि उत्तर कोरियात मधूनमधून वीजा चमकतील व आकाश निरभ्र राहील. रशियात मुसळधार वृष्टी होईल व अमेरिका कोरडी राहील . दक्षिण कोकण आणि इटली येथे वादळ होण्याचा संभव नाही.

यानंतर ऐका भक्तिसंगीताचा कार्यक्रम 'पुंडलीक वरदा हारि विठ्ठल'. आजच्या कार्यक्रमात ऐका कवि एकनाथ यांचे भक्तीगीत - "वारियाने कुंडल हाले" कमला मालंडकर यांच्या आवाजात, मृदूंगाची साथ ऐका बापू देशमुख यांच्या हातात आणि पेटीची साथ काका पेटीवाले यांच्या बोटात.

नाटक - वटवट
लेखक - पु.ल. देशपांडे

Friday, February 25, 2022

चीनचे आक्रमण व पु.ल.देशपांडे यांचे राष्ट्रप्रेम

१९६२च्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार व "महाराष्ट्र टाइम्स"चे माजी सहसंपादक, लष्करी विषयाचे अभ्यासक कै.श्री दि. वि.गोखले यांच्या "माओचे लष्करी आव्हान" या पुस्तकासाठी कै. पु.ल.देशपांडे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही अंश

●राजकारण हा माझा विषय नव्हे. परंतु राष्ट्रप्रेम प्रेम माझा हक्क आहे. माझ्या राष्ट्रावर आक्रमण करणारा आणि त्या आक्रमकांना सहाय्य करणारा तो माझा शत्रू एवढेच मला कळते. मग तो चिनी असो वा पाकिस्तानी !प्राण पणाला लावून त्याला ठेचले पाहिजे, एवढाच डावपेच मला ठाऊक आहे. त्यासाठी ज्यात माझे सामर्थ्य आहे असे मला वाटते, त्या लेखणीला,लाठीला नांगराला आणि झाडूलाही शस्त्र मानणे हा माझा धर्म आहे. माझाच काय, परंतु या देशाला माझा देश म्हणणाराला एवढेच राजकारण कळते आणि एवढेच पुष्कळ आहे. चिनी हल्ला येताच प्रथम कोण खवळून उठले हे ध्यानात घेतले, तर सोने कुठले आणि पितळ कुठले ते लगेच उमगेल. हे आक्रमण आहे की नाही असा वाद घालत बसले कम्युनिस्ट !मुस्लिम लिगनेही काही जोरदार युद्धप्रचार केल्याचे ऐकिवात नाही. असे असूनही ज्यांचे हात भाजून काढले पाहिजेत,अशा आसुरी मतप्रणालीच्या देशाशी हातमिळवणी करून त्यांच्या कृपेचे भाजन होण्यासाठी आमच्या देशातील नेते कसे धडपडत होते, याचा इतिहास (दि.वि.)गोखल्यांनी पुढे दिलाच आहे. राष्ट्रप्रेमी शूरांचा अपमान,त्यांना अनुल्लेखाने मारणे, स्वमताशी विरोध असणाऱ्या अनुभवी पुढाऱ्यांची हेटाळणी करणे यातच आमच्या नेत्यांची बुद्धी खर्च होत होती.

●आमच्या राष्ट्रीय जीवनातला हा अत्यंत संतापाचा क्षण आहे. यापुढे भारताला संतप्त भारत म्हणून काही वर्षे काढावी लागतील. आम्ही 'मऊ मेणाहूनी' असलो तरी 'कठीण वज्रासि' भेदू ऐसेही आहोत हे सिद्ध केले पाहिजे.ज्या राष्ट्राचे सैन्यबल अद्ययावत असते,राष्ट्रभक्ती ही एकमेव कसोटी असते, साऱ्या राष्ट्राला पंथ, धर्म, जाती निरपेक्ष एकच कायदा लागू असतो, राष्ट्रविघातक अशा लहानातल्या लहान गुन्ह्यालादेखील जेव्हा जबर शासन असते त्या वेळीच त्या राष्ट्राने म्हटलेल्या शांतीपाठाला अर्थ येतो. समुद्राच्या पोटातल्या वडवानलामुळे सागराच्या शांततेला शोभा आहे. एरवी डबकेही शांत असते. पण जिथे वादळाची शक्यताच नाही,जे कधी उचंबळूनच येत नाही,त्याच्या शांततेला अर्थ काय? त्यात नुसतीच डरांव डरांव करणारी बेडके असतात बेडकांच्या डरांवमुळे कोणी डरत नाही.

● देशादेशांतली मैत्री हा एक राजकारणी डाव असतो. पर्ल हार्बर ची कथा सर्वश्रुत आहे. ही मैत्री म्हणजे परिस्थितीने घडवून आणलेली विचित्र शय्यासोबत असते. "हिंदी-चिनी भाई भाई" ने आम्ही खरोखरच हुरळलो. मातब्बरांचा मोरू झाला तिथे बाजारबुणग्यांचे काय!गेल्या महायुद्धात इंग्लंड-अमेरिकेच्या गळ्यात गळा घालून रशिया देखील दृष्ट्या देखील दोस्त म्हणून उभा होता. त्या दोस्तीचा मृत्यूलेख त्याच रशियाने बर्लिनच्या भिंतीवर कोरलेला आहे. तो ज्यांना अजूनही शंका असेल त्यांनी जाऊन वाचून यावा. आईपासून लेकरे, नवऱ्यापासून बायका, वृद्ध आजोबा आजींपासून नातवंडे यांची त्या भिंतीने केलेली ताटातूट पाहून यावे व नंतरच कम्युनिस्टांतल्या डाव्या-उजव्या विषयीच्या कथा सांगाव्या. त्यातून शय्यासोबत हि राजकारणात समर्थ राष्ट्रांचीच होऊ शकते.लांडगे शेळ्यांना पोटाशी घेतात,ते पुढेमागे स्वतःची भूक भागवण्याची सोय म्हणून!

पु ल देशपांडे लिखित प्रस्तावनांचा संग्रह "चार शब्द"
(पृष्ठ ४०-४१-४२)
मौज प्रकाशन वरून साभार
© संकलन : दिलीप क्षीरसागर

Saturday, February 19, 2022

जयतु शिवाजी

कुठल्या दूरच्या शतकातल्या कोण्या एका अज्ञात दिवशी
ते ठावूकही नाही मला आज महाराष्ट्रातल्या कुठल्या
डोंगरातल्या अरण्याच्या अंधारात बसलेल्या
हे शिवराज ,
उजळीत तुझे भाळ विजेच्या तेजाने अवतरला होता
एक विचार ,
खंडखंड, छिन्नविच्छिन्न भारत मी एकत्र बांधीन
एका धर्मपाशात ….

परक्या इतिहासकारांनी तुम्हाला केलं होत दस्यू,
केला होता उपहास, तुमच्या पुण्य प्रयान्ताना
म्हणत होते पुन्हा पुन्हा एका लुटारूंचा
निष्फळ प्रयास, थांबव तुझं बरळण असत्यरूपा,
तुझ्या खोटेपणावर विधात्याच्या कधीही खोट्या
न ठरणाऱ्या लिखिताने आज मिळवलाय जय ।।

जे आहे अमर त्याला कधी गाडू शकेल का

तुझी ही कुत्सित भाषा ?
जी तपस्या सत्य आहे तिला रोखू शकणारा
त्रिलोकात कुणी नाही हे जाणतो मी निश्चितपणे ,
हे राज तपस्वी वीरा तुझा हा उदार विचार
भरून राहिला आहे विधात्याच्या भांडारात.
त्यातला एक कण तरी काळ हरवून टाकू शकेल का ?
तुझ ते प्राणार्पण स्वदेश लक्ष्मीच्या गाभाऱ्यातल,
तुझ ते सत्यसाधन कोणाला ठाऊक होत की
चिरयुग युगांतरात होऊन राहिलं आहे ते भारताच धन ?

हे राजबैरागी, अख्यात, अज्ञात राहिलात दीर्घकाळ
डोंगरदऱ्याच्या तळाशी, पण पावसाळ्यातले निर्झर
जसे खडक भेदून उठतात परिपूर्ण होऊन, तसेच
आज बाहेर आलात विश्वलोकाला झाला विस्मय ,
ज्याची पताका झाकीत होती आकाश इतकी वर्ष
ती इतकी लहान होऊन कुठ झाकली गेली होती ?

मी एक कवी, पूर्व भारतातला असाच विचार करीत ,
हे अपूर्व दृश्य पाहतो आहे की ह्या वंगदेशाच्या
अंगणात हि तुझी जयभेरी कुठून कशी निनादू लागली ?

सत्य कधीही मरत नाही - मरत नाही, शत-शतकांच्या
विस्मरणाच्या तळाशी असल तरी मरत नाही,
अपमानाने अस्थिर होत नाही, आघाताने ढळत नाही,
वाटत होत ज्यांना कि जे निःशेष झालंय काळाबरोबर,
स्वतःच्या कर्माच्या पैलथडीवर तेच सत्य आज
अवतरलंय पुन्हा तुझा पूज्य अतिथीचा वेष घेऊन
भारताच्या दारी आजही तोच मंत्र तीच उदार दृष्टी
पाहते आहे एकटक भविष्याच्या मुखाकडे, तिथलं
कुठलं दृश्य पाहते आहे ते कुणी सांगाव ?

हे अशरीरी तपासा तुझी फक्त तपोमुर्ती करून धारण
आज ते सत्य तुझी तीच प्राचीन शक्ती घेऊन
आलं आहे करायला तुझंच काज.
आज तुझी नाही ध्वजा, नाही सैन्य, रण,
अश्वदल, अस्त्र खरतरं आज नाही गाजत,
आकाशाला उन्मत करणार ते हर हर हर ,
फक्त तुझ नाव आज उतरलं आहे खाली
पितृ लोकातून
हे स्वामी ,
त्यांनी केलं आव्हान आणि
क्षणार्धात ह्रीदयास्थानी
तुमच्या,
बसला बंगल्यांचा प्राण ।।
तुला ओळ्खल रे आज तुला ओळखल
तू महाराज.

आठ कोटी वंग-नंदन राजस्व तुझे घेऊन हाती
उभे आहेत आज, ऐकल नाही तेव्हा, आज आला
तुझा आदेश, झुकलं माझ मस्तक कंठा-कंठात
ह्रिदयाहृदयात साठवून ठेवीत होईल एक
सारा भारत देश.

तुझा ध्यानमंत्र, तुझा संदेश, बैराग्याची छाटी,
गरिबांच बळ तीच करून आपली ध्वजा
एक धर्मराज्य होईल ह्या भारतात,
हे महावचन करीन सत्य ,

मराठीर शाये आजि
हे बंगाली
एंक कण्ठे बॉलो
जयतु शिवाजी ।।

मराठयांच्या संगे हे बंगाल्यानो आज
एकसाथ मिळून हा महोत्सव करा .
आज एका सभांगणी
पूर्व,पश्चिम, दक्षिण, उत्तर
अवघा भारत होऊन एक
त्या पवित्र नामाने
आपलाच आपण गौरव करा .

कवी : रवीन्द्रनाथ टागोर
अनुवादक : पु.ल देशपांडे

Thursday, February 17, 2022

चौताल : काही (बे)ताल चित्रे

चौताल : ह्याच तालातले हे आणखी एक बेताल चित्र
पार्श्वभूमी : देऊळ


पंत म्हणतात " तेव्हा गेला होता कुठे राधासुता तुझा धर्म"
"गडबोल्यांच्या सुनेचं कळ्ळं का ?"
" खरंय का हो ते ? "
"अहो खरं म्हणजे ---आमच्याच आळीत दोन घरं पुढं टाकून राहतात गडबोले "
" चांगलं नाक ठेचलंन सासूचं "
" गावाला नावं ठेवत होती मेली "
" गेल्या रामनौमीच्या वेळी आठौतय ना ? ह्या इथंच नव्हती का जुंपली आमची ? "
" हो काहीतरी ऐकलं होतं मी ! काय झालं होतं होतं ? "
" अहो , मी सुंठवडा घेतलान् निघाले "
" सीताकान्तस्मरण "
"जयजयराम तेव्हा "
" पार्वतीपदे हरहर "
" महादेव तशी मला "
" गोपालकृष्ण महाराज की "
"जय म्हणते कशी "
" बोला श्रीपाद श्रीवल्लभनरसिंहसरस्वती श्री गुरुदेव "
"दत्त काही कारण नव्हतं बरं का "
"श्री योगिराज बाळामहाराज कुर्डूवाडकरमहाराज '
"जय ह्या पुराणिकबुवाचे मेल्याचे "
"जयजय रघुवीर"
"समर्थ पूर्वीचे जोशीबुवा बरे होते . गुरूदेव दत्त वर आटपायचे."
" बोला रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीता "
"राम काही कारण नसताना ही गडबोलीण आली बरं का तरातरा ---मेघश्याम आणि मला शीताराम सीताराम म्हणते कशी रघुपतिराघव का हो मुलगा वेगळा जातोय म्हणे तुमचा पतीत पावन सूनबाईनी वर्षभरातच गाजवला की शीताराम पराक्रम ? आणि आता आहो माझी जानकीजीवन सून निदान करूणासिंधू आपल्या नवर्याबरोबर तरी सुंदर माधव मेघश्याम गेली . हिची सून कळलं ना पतीतपावन शीताराम एका नाटकात नाचणार्याबरोबर रघुपती राघव पळाली . हारि विठ्ठल. जय जय राम मी गेल्या रामनवमीला विठेवरी उभा बजावलं होतं हं गडबोलीण बाईंना. पुंडलिकाचे भेटी पुराणाला अश्याच इथे बसल्या होत्या. आषाढी कार्तिकी भक्तजन येती पेप्रातून सुनेचा फोटो दाखवत होती दिंड्या पताका वैष्णव नाचती अहो पायांत चाळ बांधलेला पोट उघडं तोंडाला रंग , अंगभर दागिने खोटे हो पंढरीचा महिमा वर्णावा किती तेव्हांच म्हटलं मी ही जाणार पळून तश्शी गेली रखुमाई वल्लभा राईच्या पर्वता आता गडबोलीण बाईंना म्हणावं तूही नाच चाळ बांधून !"

- काही (बे)ताल चित्रे
अघळपघळ
पु.ल. देशपांडे

Tuesday, February 15, 2022

स्वप्नात आले पुलं - (श्रेयस देशमुख)

स्वप्नात आले पुलं
म्हटले हृदय करा खुलं !!

जरा ऐक सखाराम गटणे
त्याची वाचा साहित्य निष्ठेचे उटणे
जरा वाच माझा बबडु
हसुन हसुन लागशील उडु
कसा राजबिंडा आमचा नंदा
सार्या मुलींचाच जणु गोविंदा
रावसाहेबांचे भकार
पण स्नेह दडलेला अपार...
आमची पानवाल्यांची गादी
त्याची बैठक नाही साधी
आमचे पाळीव प्राणी पक्षी
विसरुन जाशिल वामकुक्षी
लय लग्नाची खुमखुमी
वाच असामी असामी

दिनेश ॠग्वेदी असो विनोबा पुरंदरे असोत
एक बैठकीत वाचुन टाक अख्खा गणगोत

जन्माच्या वाटेत आले विघ्न जर आड
तुला रिझवण्यासाठी आहे बटाट्याची चाळ

किती सुंदर सुर गीत गदिमांचे संगती
खळखळुन हसण्यासाठी गुळाचा गणपती

तुला दिले किती किती आहे
अजुन हवे तरी
माझ्या अर्धांगिनी ची साक्ष
"आहे मनोहर तरी"

शेवटी एवढ्याच साठी
माझा सारा हट्टहास होता....
तु हसतच रहावा
इथुनिया जाता‌‌....


- श्रेयस देशमुख
https://shreyash1.wordpress.com

Friday, February 11, 2022

पुलंच्या अक्षरसहवासात.. - (डॉ. सोमनाथ कोमरपंत)

अनेकांचे आहेत तसे पु. ल. देशपांडे माझे आवडते लेखक आहेत. अनेकांनी त्यांच्याविषयी इतके लिहिले आणि इतके चांगले लिहिले आहे की आपण वेगळे काय लिहावे याविषयी पंचाईत होते. शिवाय आवडत्या माणसाविषयी आणि आवडत्या लेखकाविषयी विशेषणविरहित लिहिता येत नाही. मजेची गोष्ट अशी की विशेषणे लावीत बसलो तर बाकी लिहिण्यासारखे विशेष्य अन् विशेष काही राहत नाही. माणूस म्हणून प्रिय आणि प्रिय माणसांपैकी अत्यंत प्रिय लेखक म्हणून पु. ल. देशपांडे यांचीच मी गणना करीन. ज्या विनोदी लेखनामुळे त्यांना महाराष्ट्रात, देश-विदेशांत अमाप लोकप्रियता मिळाली, ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’ ही प्रेमाची उपाधी ज्यांना प्राप्त झाली त्यांचे विनोदी लेखन मला अत्यंत आवडते. पण तेवढ्यापुरते त्यांच्याविषयीचे प्रेम मी सीमित करू इच्छित नाही. ज्यांची जन्मशताब्दी वाजत-गाजत आली आणि रसिकजनांनी, पु.लं.वर उदंड प्रेम करणार्‍या अगणित चाहत्यांनी ती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली.

आता तर तिचा सरता क्षण आहे. अशा प्रसंगी या आनंदसरोवरातील राजहंसाविषयी एकमुखाने काय म्हणावं? ‘‘पुल, तुम्ही आमचं जीवन अर्थपूर्ण केलंत. रसपूर्ण केलंत. जीवनाचा अर्थ लावीत बसण्यापेक्षा जीवन जगायला शिकवलंत. एक शतक तुम्ही गाजवलंत. येणार्‍या शतकांत तुम्हीच आम्हाला हवे आहात. तुमच्यासारख्या ‘पुरुषोत्तमा‘ने आपल्या अक्षरसमृद्धीने ‘विपुल’ करून ठेवलं आहे; ते आम्हाला पुरेसं आहे. तुमच्यासारखा उत्तम पुरुष शतकातून एकदाच जन्मतो अशी आमची नितांत श्रद्धा आहे.’’

पु.लं.नी आपल्या अक्षरलेखनाने कोणती किमया केली आहे? त्यांचा नामोच्चार कोणत्याही नावाने करा. त्यांना पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणा. ज्या लेखनामुळे ते प्रतिष्ठाप्राप्त लेखक झाले ते पु. ल. देशपांडे हे नाव उच्चारा. किंवा नसतं पु.ल. अथवा पी.एल. (कधीकधी काही मित्रांनी म्हटल्याप्रमाणे पी. एल. देशपांडे म्हणून बघा.) असे उच्चारा; काही फरक पडणार नाही. आत्मीयतेचा धागा तोच आणि साहित्यक्षेत्रातील तेच खणखणीत नाणे!

पु.लं.नी केवळ विनोदी लेखन केले नाही. त्यांचे गंभीर लेखन हे तेवढ्याच तोलामोलाचे आहे. ते सतत माणसांमध्ये वावरले. माणसांवर लिहिले. त्यांच्या या व्यक्तिरेखा गाजलेल्या आहेत. त्या गंभीर प्रकृतीच्या आहेत तशाच नर्मविनोदी आहेत. विनोदात आकंठ बुडून राहता येईल अशाही आहेत. पण मनुष्यत्वाचा सोलीव गाभा रेखाटायला पु.ल. विसरत नाहीत. कारण त्यांनी अशी माणसे पाहिलेली आहेत. अनुभवलेली आहेत. अनुभवाला अनुभूतीचे पाणी कसे चढवावे हे पु.लं.च्या कलात्मक लेखणीला आकळलेले आहे. म्हणून ही व्यक्तिचित्रे रोचक होतात. वाचनीय बनतात. अंतर्मुख करतात. यात सामान्य माणसे आहेत. असामान्यही आहेत. राजकारण, समाजकारण, संगीत, नाट्य, चित्रकला, शिल्पकला अशा नानाविध क्षेत्रांतील नामवंत मंडळींचा त्यात समावेश आहे.
पु.लं.च्या विनोदाविषयी जाता जाता थोडेसे सांगायला हवे. जीवनातील सुसंगतीवर त्यांचे अतीव प्रेम आहे. विसंगतींवर उपहास, उपरोध या आयुधांनिशी न दुखविता प्रहार करणे हे त्यांच्या लेखनाचे उद्दिष्ट आहे. पु.ल. इचलकरंजी येथील सुवर्णमहोत्सवी अ. भा. मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले. ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’च्या ‘पु. ल. विशेषांका’साठी डॉ. आनंद यादव यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी पु.लं.ना प्रश्‍न विचारला, ‘पु.ल., तुम्हाला विनोद कसा काय सुचतो?’ पु.लं.नी ताबडतोब उत्तर दिले, ‘‘मी गंभीरपणेच लिहितो. तुम्हा लोकांना तो विनोद वाटतो.’’

म्हणजे पु.लं.च्या लिहिण्याच्या शैलीतून तो आपल्यापर्यंत पोचतो.

पु.लं.च्या बहुविध लेखनाला जीवनाच्या अनेक पैलूंचा सर्वांगस्पर्श झाला आहे. त्याचे वाचन करताना आपण पुलकित होतो. नव्या दर्शनाने समृद्ध होतो. त्यांच्या जबरदस्त निरीक्षणशक्तीवर आधारलेल्या लेखनामुळे अंतर्मुख होतो. एखादा सामान्य विषय, एखादा अनुभव, अनुभवाचा एखादा तुकडा त्यांना पुरतो. त्यावर त्यांची आल्हाददायी अक्षरनिर्मिती उभी राहते. सर्वांना जवळचे आणि परिचित म्हणजे घर. घराविषयी पु.ल. लिहितात तेव्हा वेगळेच रसायन निर्माण होते.

‘‘गुहेतला नुसता निवारा आणि आसरा सोडून आदिमानव घरात आला तेव्हाच मनुष्यप्राण्यानं प्राणिसृष्टीशी असलेलं आपलं नातं सोडून आहार, निद्रा, भय, मैथुन यापलीकडलं काहीतरी साधायला सुरुवात केली. मनुष्य म्हणवून घेण्यापेक्षा गृहस्थ म्हणवून घेण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. भिंतीचा शोध लागला आणि कळपात राहणारा माणूस कुलुपात राहू लागला. भिंत आल्यावर दरवाजे आले, उंबरठा आला, खिडक्या आल्या, झरोके आले, ओसरी आली, पडवी-ओढे-खांब-पाखी आली. अंगण आलं, परसू आलं, परसात आड आला, आळवाची खाचसुद्धा आली. तेवढ्यात कुणा चतुर माणसाला घरावर घर बसवता येतं असा शोध लागला आणि माडी आली. गच्ची आली. जिना आला. चार भिंतींच्या आडोशापासून सुरुवात झालेल्या घराला अंतर्बाह्य फाटे फुटत गेले ते घरमालक आणि भाडेकरूंपर्यंत जाऊन पोहोचले.’’

लेखनातील ही सजगता, शब्दकळेच्या मांडणीचे भान आणि तन्मयता यालाच म्हणतात पु.ल.स्पर्श. हा पु.ल.स्पर्श त्यांच्या विनोदी आणि वैचारिक, चिंतनशील प्रवृत्तीच्या लेखनात सर्वत्र आढळतो. पु.लं.नी लिहिलेल्या ‘खोगीरभरती’, ‘नस्ती उठाठेव’, ‘बटाट्याची चाळ’, ‘गोळाबेरीज’, ‘असा मी असामी’, ‘हसवणूक’ या विनोदी पुस्तकांचा मनसोक्त आस्वाद घ्यावा. मनातील जाळी-जळमटे नाहीशी होतात. निखळ आनंदाच्या अंगणात तुमचे मन निरागस हास्यरसात बागडायला लागेल. त्यात मानवी मनाच्या अनेक पापुद्य्रांचे दर्शन घडेल. शब्दनिष्ठ विनोदाच्या नाना परी आढळतात. शब्दप्रभू पु. ल. देशपांडे यांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाची खरीखुरी श्रीमंती येथे अनुभवायला मिळेल. हे हसविणे मानवी व्यंगांवर आधारलेले नसून त्याच्या विसंगतींवर भाष्य करण्याच्या निमित्ताने निर्माण झालेले आहे. मानवी स्वभाववैशिष्ट्यांचा हा लघुत्तम साधारण विभाजक आहे. मानवी करुणा हा पु.ल.निर्मित विनोदाचा मूलस्रोत आहे. मध्यमवर्गीयांचे कष्टप्रद जीवन हा त्यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू आहे.

‘खिल्ली’ या पुस्तकातील विनोद वेगळ्या प्रकारचा आहे. आपल्या देशात उद्भवलेल्या आणीबाणीच्या प्रसंगी आणि त्यानंतर घडलेल्या राजकीय घटना-प्रसंगांवर पु.लं.नी विनोदी पद्धतीने केलेले हे भाष्य आहे. या घटनांमुळे ज्या प्रतिक्रिया जनमानसात उमटल्या त्यांतील साक्षिभाव पु.लं.नी जागविला आहे. या विडंबनात्मक लेखनातून तात्कालिकाच्या सीमा उल्लंघून कलात्मक रूप देण्याचे त्यांचे भाषाकौशल्य वाखाणण्यासारखे आहे.

‘गणगोत’, ‘गुण गाईन आवडी’ आणि ‘मैत्र’ या पुस्तकांतील व्यक्तिचित्रे म्हणजे पु.लं.च्या समृद्ध जीवनपटावरील संस्मरणीय व्यक्ती आहेत. या व्यक्तिविशेषांमधून पु.लं.ची श्रद्धास्थाने कळतात, सौहार्दसंबंध उमगतात. त्यांच्या कलासक्त मनाचा आणि अभिरूचिसंपन्नतेचा प्रत्यय येतो. पु.लं.चे गणगोत कितीतरी समृद्ध आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांतील ही माणसे आहेत. त्यांच्याविषयीचा जिव्हाळा व्यक्त करावा तो पु.लं.सारख्या संवेदनशील आणि प्रतिभावंत लेखकानेच. यात प्रथमतः येतात त्यांच्या जीवनाची जडणघडण करणारे त्यांच्या मातुल घराण्यातील आजोबा वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी. त्यांचा विसर न व्हावा. नाट्यक्षेत्रातील दिग्गज चिंतामणराव कोल्हटकर आहेत. संगीतक्षेत्रातील केशवराव भोळे, हिराबाई बडोदेकर, रामूभय्या दाते, बालगंधर्व यांसारखी बुजुर्ग मंडळी आहे. त्यांचे व्यक्तिदर्शन घडविताना पु.लं.नी आपली संगीतक्षेत्रातील जाणकारी आणि बहुश्रुतता प्रकट केली आहे. आप्तजनांपैकी त्यांचे सासरे आप्पा आणि आजी (बाय) आहेत. त्यांचा लाडका छोटा दिनेश आहे. बेळगावचे नाट्यप्रेमी आणि संगीतप्रेमी अवलिया रावसाहेब आहेत. इतिहाससंशोधक बळवंत मोरेश्‍वर, पुरंदरे (बाबासाहेब पुरंदरे) आणि भूदानयज्ञासाठी वाहून घेतलेले कृतिशील प्रज्ञावंत विनोबा भावे यांच्याविषयी पु.लं.नी आत्मीयतेने लिहिले आहे. चोभे आणि फणसळकर मास्तर ही मुलुखावेगळी माणसे या ‘गणगोत’मध्ये समाविष्ट आहेत. ग्रंथजगतातील ‘इंटरनॅशनल’ दीक्षित आणि रा. ज. देशमुख यांचा त्यांंनी करून दिलेला परिचय तेवढाच हृद्य आहे. ही सारी व्यक्तिचित्रे वाचल्यानंतर आपल्या मनाचा क्षितिजविस्तार झाल्यावाचून राहत नाही. पु.लं.च्या प्रतिभेचे अनेक विभ्रम दर्शविणारा हा कॅलिडोस्कोप आहे. या व्यक्तिचित्रांतील शैलीविषयी लिहिणे हा स्वतंत्र विवेचनाचा विषय आहे. गुणीजनांचे गुण यथार्थपणे सांगणे हा पु.लं.च्या प्रतिभेचा स्थायी भाव आहे. त्यामुळे ‘गुण गाईन आवडी’ हे त्यांचे पुस्तक अवीट गोडीचे झाले आहे. केशवराव दाते, भास्करबुवा बखले, ‘हे देवाघरचे देणे’मधील राम गणेश गडकरी; ‘एक गाण्यात राहणारा माणूस’मधील मल्लिकार्जुन मन्सूर, वसंतराव देशपांडे, वसंत पवार आणि ‘मंगल दिन आज’मधील कुमारगंधर्व, स्वरूपसुंदर बाबू माने, ‘मुली, औक्षवंत हो’मधील लता मंगेशकर ही दिग्गज माणसे म्हणजे नाटक- चित्रपट- संगीतकलारूपी नभांगणातील नक्षत्रमालिका. अपार्थिव चांदण्यात विहार करायला लावणारे ते गंधर्वच जणू. त्यांचा समृद्ध आणि देखणा प्रवास रसिकजनांसाठी साकार करायला पु.लं.सारखा रसिकाग्रणी, कलावंत आणि शब्दप्रभूच हवा. जीवनाचे हे क्षेत्रफळ परिपूर्ण करण्यासाठी शिल्पकार अण्णासाहेब फडके, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात आणि राष्ट्रकारणात मौलिक योगदान दिलेले सेनापती बापट आणि डॉ. राममनोहर लोहिया यांच्यासारखे धुरंधर नेते, काव्यक्षेत्रातील आनंदयात्री बाकीबाब बोरकर, ज्ञानक्षेत्रातील श्रेष्ठ विदुषी डॉ. इरावती कर्वे यांची उपस्थिती येथे आहे. परमोच्च बिंदू साधला आहे तो विसाव्या शतकातील बाबा आमटे यांच्यासारख्या कर्मयोगी संताच्या चित्रणाने.

कुसुमाग्रजांनी निर्माण केलेल्या ‘विशाखा’ नक्षत्रावर ज्यांच्या तरुणाईचे पोषण झाले त्या पु. ल. देशपांडे यांनी या समाजमनस्क व्यक्तींवर समतानतेने लिहिले, त्यामुळे मणिकांचनयोग जुळून आला आहे. तेच अनुस्यूत सूत्र ‘मैत्र’मध्ये व ‘आपुलकी’मध्ये आढळते. एककेंद्री भावविश्‍वात रमणे हे पु.लं.चे ‘नंदनवन’ नाही. विद्येची, कलेची आणि जीवनसंगरातील खडतर साधना करणारी पहाडाएवढी माणसे त्यांना जवळची वाटतात. या पुस्तकांच्या रूपाने पु.लं.नी पूर्वकाळ आपल्या मनात जागवला आहे. आपल्या काळातील मंतरलेले क्षण दृग्गोचर केले आहेत आणि भविष्यकाळाची दिशा दाखविली आहे. ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे निराळेपणाची साक्ष देणारे व्यक्तिचित्रांचे पुस्तक आहे. याला कालाची मिती आहे. अवलिया माणसांची ही एकत्रित गुंफलेली मालिका आहे आणि तिच्यात विनोदाची मुक्त हस्ते केलेली पखरण आहे.
सामान्यांमधील असामान्यत्व अधोरेखित करण्यात पु.लं.ना येथे अपरिमित यश प्राप्त झालेले आहे. ही कल्पित पात्रे वास्तवाची पुनः पुन्हा आठवण करून देणारी आहेत. यातच सारी ‘ग्यानबाची मेख’ आहे. यातली कुठली व्यक्तिरेखा चिरस्मरणीय असा प्रश्‍न केला तर आपण संभ्रमात पडू. पण उत्तर शोधता येईल. सारीच पात्रे सरसरमणीय आहेत. समाजाचे तळघर शोधले तर एखादा नारायण भेटेल, एखादा सखाराम गटणे भेटेल, चितळे मास्तर भेटेल, अंतू बर्वा भेटेल, परोपकारी गंभू भेटेल. चढाओढीने म्हणेल पुलंनी मला साहित्यात अमर करून ठेवलंय. कुणाचेच म्हणणे आपल्याला नाकारता येणार नाही.

‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ आणि ‘जावे त्यांच्या देशा’ ही पु.लं.ची प्रवासवर्णने चाकोरीतील प्रवासवर्णने नाहीत. त्यांच्या विनोदी लेखनात ती सहजतेने मिळून जावीत अशी ती आहेत. पु.लं.बरोबर आपणही मनाने ही आनंदयात्रा सुफळ संपूर्ण करू शकतो. फक्त त्यासाठी आपल्यालाही ‘सौंदर्यशोध’ करावा लागेल. ‘आनंदबोध’ स्वीकारावा लागेल. पु.लं.बरोबर प्रवास करून आल्याचे पुण्य पदरात निश्‍चित पडेल. ‘जावे त्यांच्या देशा’मध्ये मात्र पु.लं.च्या चिंतनशीलतेची नवी रूपकळा अनुभवायला मिळते.

विशेषतः ‘एक बेपत्ता देश’ या लेखामध्ये. अमेरिकेच्या विरूपदर्शनाने त्यांचे मन संत्रस्त होते. ते उद्गारतात : ‘‘न्यूयॉर्कच्या रस्त्यातून जाताना अंगावर अक्षरशः लक्तरे घालून हिंडणार्‍या सोळा-सतरा वर्षांच्या सोन्यासारख्या मुली पाहून मी तर सुन्न होत असे. स्वातंत्र्याच्या शोधात या आपल्या घरांना आणि आईबापांना सोडून पळून आलेल्या मुली! एकदा या अभाभी मुलींचा टेलिव्हिजनवर पोलिसांनी सादर केलेला कार्यक्रम पाहिला. घरट्यातून पडलेल्या पाखराच्या पिलांसारख्या त्या पोरी! कोणा गांजा-अफूसारख्या मादक पदार्थांत सुखाचा आणि स्वातंत्र्याचा शोध घेत होत्या!’’ याहून भयानक प्रकाराकडे पु.लं.नी आपले लक्ष वेधलेले आहे. असले सुख अन् असली समृद्धी आपल्या देशाला नको म्हणून त्यांनी आपल्याला सावध केलेले आहे. विनोदी साहित्यिकाप्रमाणेच विचारवंत पु.लं.चे लेखन आपल्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आहे. पण लक्षात कोण घेतो?

‘वंगचित्रे’ हे पठडीतील प्रवासवर्णन नाही. पु.लं.नी पन्नासाव्या वर्षी बंगालमध्ये राहून बंगाली भाषा आत्मसात करावी, रवींद्रनाथांच्या भूमीत अनिरुद्ध संचार करावा आणि रवींद्रमानस समजून घ्यावे हा ‘थ्रिलिंग’ अनुभव आहे. आत्मजीवनातील तो तेजस्वी अध्याय पु.लं.नी निर्मम वृत्तीने येथे लिहिला आहे.

याव्यतिरिक्त साहित्याच्या दालनात महत्त्वाच्या ठिकाणी पु.ल. आहेतच. त्यांनी स्वतंत्र नाटकाबरोबर रूपांतरित नाटकांच्या उत्तम संहिता मराठी रंगभूमीला पुरवून तिला श्रीमंत केले आहे. अनुवादित कादंबर्‍या आहेत. बालनाट्ये आहेत. एकांकिकांचे संग्रह आहेत. लोकनाट्य आहे. पटकथा आहेत. अनेक लेखकांच्या पुस्तकांना लिहिलेल्या प्रोत्साहनपर प्रस्तावना आहेत. आणीबाणीत युयुत्सू वृत्तीने अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी दिलेली झुंज त्यांच्या गाठीशी आहे. विखुरलेली आणि वाङ्‌मयीन संस्कृतीला समृद्ध करणारी असंख्य पत्रे आहेत. भाषणांचे संग्रह आहेत. अनेक लेख आहेत. गंगेचे दान गंगेलाच अर्पण करणारे पु.ल. आहेत.
असे समृद्ध जीवन जगलेला हा व्युत्पन्न, रसज्ञ आणि बहुश्रुत माणूस आहे. अनेक देश फिरून आलेला हा माणूस आहे. त्याच्या विचारांची मांड पक्की भारतीय आहे.
तस्मै पुरुषोत्तमाय नमः|

डॉ. सोमनाथ कोमरपंत
नवप्रभा
४ नोव्हेंबर २०१९