Wednesday, July 20, 2011

‘कैवल्या’चा आनंद घेणारा!

श्री राम पुजारी यांच्या सत्तरीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ‘पुलं’नी आपल्या या स्नेह्य़ाचं रसिलं व्यक्तिमत्त्व शब्दांमधून उभं केलं होतं.‘पुलं’चं ते भाषण.
मित्रहो,
रामनं आपलं अंत:करण मोकळं करून भाषण केल्यानंतर, मी बोलणं मला चुकीचं वाटायला लागलेलं आहे. एखाद्या चांगल्या गाण्याचा परिणाम आपल्या मनावर व्हावा, तसा त्याच्या भाषणाचा परिणाम झालाय, गाणं संपल्यावर बोलणारे लोक किती कद्रू असतात ते माहीत असल्यामुळे, तो अपराध आपण करू नये असं मला वाटतं. पण आजचा प्रसंगच असा आहे की दोन शब्द आपल्या वतीनं मी बोललो नाही तर मलाच रुखरुख वाटत राहील. मी बोलू नये, अशी निसर्गानं व्यवस्था केलेली आहे पण दरवेळी निसर्गाचं मानलंच पाहिजे असं नाही.

रामचा उल्लेख करताना पुष्कळ लोक म्हणाले की, हा सगळ्यांना अरे-तुरे करतो. रामच्या डोळ्यांनी जो मनुष्य पाहू शकतो त्यालाच तो अरे-तुरेचा अधिकार असतो. आपण ‘विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो’ असं म्हणतो, ‘विठ्ठलरावांना भेटून आलो’ असं नाही म्हणत. विठ्ठल, राम, कृष्ण यांच्याबद्दल आपण एकेरीच बोलतो मग त्यांच्यापेक्षा आम्हीच असे काय मोठे लागून गेलो की आमच्याबद्दल अहो-जाहो करून बोलावं- आपलेपणा आणि परकेपणा साध्या शब्दात व्यक्त होतो. बघा- आईला आपण ‘अगं’ म्हणतो, बापाला ‘अहो’ म्हणतो, कारण दूर असतो तो आईपेक्षा. तर अहो-जाहो हे दूरचं लक्षण आहे. शिष्टाचार वगैरे दूरच्या ठिकाणी. आता रामनं बोलताना सांगितलं की, त्याच्या घरी मी गेलो की गप्पा मारताना मी ऐसपैस पाय पसरून आरामात बसतो. आता ही आपुलकी मुद्दाम ठरवून दाखवण्यासाठी केली जात नाही. ती निर्माण झालीय याची जाणीव व्हावी लागते. आयुष्यात ही जाणीव व्हायची स्थळं कमी असतात, ही त्यातली दु:खद गोष्ट आहे.

रामनं गाणं खूप ऐकलं. कसं ऐकलं? तर ते सुरांचं प्रेम घेऊन ऐकलं. गाण्याला तो मोजपट्टी घेऊन गेला नाही. तो गाण्याचा सुपरवायझर झाला नाही. ऐकणारा झाला. ‘ऑडिट’ हा शब्द, ऐकणं आणि हिशेब तपासणं, या दोन्ही अर्थानी वापरला जातो. इथं हा दुसरा ऑडिटर झाला नाही तर ऐकणारा ऑडिटर झाला. त्यानं गाण्यावर प्रेम केलं, तितकंच त्या गाण्यामुळेच गवयावर प्रेम केलं आणि ‘हे प्रेम मी करतोय’ असा भावही कधी खाल्ला नाही, त्याची त्याला आवश्यकता वाटली नाही, कारण त्याच्या हिशेबी क्रिकेटियर आहेत, चित्रकार आहेत, कवी आहेत, गायक आहेत, इतर कलावंत आहेत, नट आहेत. हे सगळे आहेत ते त्याला आपले वाटतात - ते त्याला आपले वाटतात हे त्यांना प्रत्येकाला माहीत असल्यामुळे त्यांना तो आपला वाटतो. उद्या जर राम मला म्हणाला, ‘आपण आलात, बरं वाटलं.’ त्यावर मी त्याला विचारेन, ‘ मी असा काय गुन्हा केला म्हणून तू असं बोलतोहेस?’ एक तर मराठीची सवयच प्रेमातून अरे-तुरेवर येणारी आहे. आपल्या भाषेला तसा फारसा शिष्टाचार मान्य नाही. फार शांतपणे कोणी मराठी बोलायला लागलं की तो ढोंगी आहे असं वाटायला लागतं. ही मंत्री मंडळी बोलतात बघा, ‘आपण आलात, बरं वाटलं. सहज आला होता काय?’ वगैरे.

राम मैफिलीत असताना गायक जितक्या तन्मयतेनं, आनंदानं गातो तितक्या तन्मयतेनं आणि आनंदानं दुसऱ्या कोणाही पुढे - समीक्षकांची क्षमा मागून सांगतो - ते असूनही गायक रंगतोच असं नाही, कारण तिथं हिशेब तपासनीस बसलेले असतात. माझे एक गवई मित्र होते. म्हणजे ते गात होते म्हणून त्यांना गवई म्हणायचं. ते बैठकीत काय करावं याच्या नोटस् काढून देत असत. ‘तान नंबर एक’, ‘तान नंबर दोन’ एवढंच नव्हे तर ‘या तानेस वाहवा मिळाल्यास ती पुन्हा घ्यावी’- हे मी कपोलकल्पित सांगत नाही - विनोदी लेखकालाही जिरवणारे पुष्कळ असतात, त्यापैकी हे! तर असं काही न करता, आपण गेल्यानंतर आनंद देणारा हा खरा आनंदयात्रीच आहे. त्याला तो आनंद ठिकठिकाणी मिळालेला आहे. तो आनंद मिळत असताना त्याच्या मनात एक विचार सतत आहे की, कोणाच्या तरी कृपेनं हा आनंद आपल्याला मिळालेला आहे. ‘कृपेनं मिळालेलं आहे’ ही भावना आहे ना तिचं विच्छेदन करता येत नाही. शवच्छेदन करता येत नाही. ती एक असते. जसं आता कोणीतरी सांगितलं, फार योग्य सांगितलं. मला वाटतं रेग्यांनी सांगितलं. रेग्यांनी गंभीरपणानं सांगितलं. रेग्यांचा गंभीरपणा सगळ्यात मिश्कील असतो - त्यांनी सांगितलं, ‘संगीतामुळे त्याच्या वागण्याला परतत्त्वस्पर्श झाला. फार सुंदर उल्लेख केला. संगीताचा परतत्त्वस्पर्श ज्यांना झाला तो या साध्यासुध्या गोष्टींच्या बाहेर जातो. तुम्हाला सांगतो, भारतीय संगीत ही अशी गोष्ट आहे की जिथे ‘कैवल्य’ म्हणजे काय याचा साक्षात्कार होत असतो. त्याला रूप नाही, रंग नाही. निराकार, निर्गुण हे जसं देवाचं वर्णन. तसं भारतीय संगीताचं वर्णन करता येईल. पुढे शब्द आले की घोटाळे सुरू होतात, ते निराळे. पण ज्यावेळी आलापी चालू असते. स्वरांचं आळवणं चालू असतं. त्यावेळी तो ‘कैवल्य’ स्वरूपाचाच आनंद असतो. तसला आनंद रामला साहित्यानं दिला, खेळानं दिला.

अरुण टिकेकरांसारख्याला त्यानं क्रिकेटियर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याची महत्त्वाकांक्षा केवढी असेल बघा! मी शाळेत क्रिकेट खेळायला गेलो. पहिल्याच दिवशी मला क्रिकेटच्या शिक्षकांनी सांगितलं, ‘तू फुटबॉल खेळ’- म्हणजे ‘क्रिकेट खेळू नकोस’ हे त्यांनी निराळ्या रीतीनं सांगितलं, कारण आमच्या शाळेत फुटबॉल नव्हता. माझ्याकडे कोण होतकरू कवी येतात, त्यांच्या कविता वाचल्यावर अंगावर काटा येतो. मी त्यांना सांगतो, ‘तुम्ही नाटक ट्राय करा’, म्हणजे एक वर्ष तरी त्याचं त्यामध्ये जातं. कुणीतरी भाषणात आत्ता म्हटलं की, ‘मी सुदाम्याच्या पोहय़ांची पुरचुंडी घेऊन आलोय्’ माझ्याकडे होतकरू कवी वहय़ांची पुरचुंडी घेऊन आलेले असतात. तर अशा ठिकाणी रामसारखा एखादा मित्र असावा. रामची बैठक याचा अर्थ साहित्य, संगीत, कला यांची बैठक. याच्याशिवाय आम्ही कधी काही बोललोच नाही. याचं एक कारण आहे. असं मला वाटतं. माझ्या आणि त्याच्या स्वभावात एक साम्य आहे - आम्ही कधी शर्यतीत नव्हतो. आयुष्यभर कधी पहिलं यावं म्हणून धावलोच नाही- पहिला आलो नाही ही गोष्ट निराळी.

मला बालकवींची कविता आठवते. ‘स्वार्थाच्या बाजारात, कितीक पामरे रडतात। त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो।’ मला हे मिळायला पाहिजे म्हणून त्याच्या मागे लागलो तर ते कधी मिळतच नाही. आमचे खाँसाहेब लोक फार चांगलं बोलायचे. आपण त्यांना जर सांगितलं ‘खाँसाहेब कालचा बागेश्री काय छान झाला’ की ते म्हणायचे, ‘हो गया’. मी केलं नाही, ते झालं. ही भूमिका केवळ गाण्याबद्दल नव्हे तर आयुष्याबद्दल यावी. ही भूमिका कशी येते ती आत्ता राम बोलला त्याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल. ‘मला माहीत नव्हतं. - मी झालो. असं असं माझ्या जीवनात आलं.’ त्याचं पृथक्करण करण्याचा त्यानं प्रयत्न केला. जे काही आहे ते त्याच्या मनामध्ये आहे, ते सांगण्याचा रामने प्रयत्न केला आणि त्यामध्ये आपल्याकडे कर्तृत्व एका कणाचंही घेतलं नाही. एवढंसंसुद्धा कर्तृत्व न घेता, हे मला मिळालं या आनंदात तो बोलला. असा आनंद त्यानं स्वत: घेतला. तुमच्याकडून घेतला, तुम्हाला परत देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तो आनंदानं स्वीकारला, याचं लक्षण - ही सभा. ही सभा जी इथं भरलेली आहे, त्यावरून दिसून येतं. सर्व थरांतले, सर्व पक्षांचे लोक इथं आहेत. सध्या माणसांबद्दल बोलताना पक्षाचा आणि पक्षाबाहेरचा असं दोन्ही बोलावं लागतं. म्हणजे एके ठिकाणी माणूस दिसतो. दुसऱ्या ठिकाणी तो दिसत नाही - कुठला हे मी सांगत नाही - तर अशी सर्व थरांतली माणसं आली आहेत. त्याच्या बरोबरीचे शाळकरी मित्र जे आलेले आहेत, ते आपापल्या क्षेत्रात कितीतरी उच्च स्थानावर गेले आहेत. ते उच्च स्थान विसरून शाळेमध्ये त्या वयाचे असताना जसे बागडले तसेच ते आत्ता आलेले आहेत. मला खात्री आहे की ते शाळेतला आपला ताजेपणा घेऊन आपल्या गावी परत जातील.

असा ताजेपणा त्याच्या भेटीत ज्यानं आयुष्यभर मला दिला असा हा राम आहे. मी इथं आलो म्हणजे रामवर मोठे उपकार केले आहेत असं नाही. मला भीती वाटत होती की, कुठं गेल्यावरती आजारी पडू नये. पण आता तीही भीती मला वाटत नाही, कारण याच्यामागे जी रामची पुण्याई ती आमच्याही कामी येते. कधी कधी असं मला वाटायला लागलंय, साहित्य, संगीत, चित्र, नृत्य, गायन याच्यावर निस्सीम प्रेम करणारा मनुष्य असतो ना त्याच्या वाटेला जायला देवालासुद्धा जरा भीती वाटत असली पाहिजे. यांची मैत्री चालू दे, असं त्यालाही वाटत असेल. अशी याची मैत्री चालू दे, असं वर्षांनुर्वष देवाला वाटत राहो आणि ती आम्हाला पाहायला मिळो, अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपण आता रामला ‘हॅपी बर्थ डे टू यू’ म्हणू या!

रविवार, १७ जुलै २०११
लोकसत्ता

Tuesday, July 5, 2011

मम सुखाची ठेव! - सुरेश ठाकूर

महाराष्ट्राचे हे लाडके व्यक्तिमत्त्व ३५ वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आचरे गावात आपल्या ‘मैत्र जिवाचे’ अशा ७० कलावंतांना घेऊन माहेरपणाला गेले होते. त्यात होते- दस्तुरखुद्द पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, कुमार गंधर्व, वसुंधरा कोमकली, मालिनी राजूरकर, गोविंदराव पटवर्धन, नारायण पंडित, अशोक रानडे, एम. आर. आचरेकर, चिंचाळकर गुरुजी आदी मंडळी. पुलंचे ते माहेरपण म्हणजे आगळेवेगळे गंधर्व संमेलनच होते.
त्याची ही आठवण!

त्या १९७६ सालच्या आचरे गावच्या रामनवमीच्या दिवसाचे सारे वातावरणच ‘पुलमय’ होऊन गेले होते. पुलं आणि त्यांच्या परिवाराचा आचरे येथील सुखद सहवास आम्हा आचरेवासीयांच्या दृष्टीने ‘मर्मबंधातील ठेव’ ठरली होती, की जी आम्ही अजूनपर्यंत जपून ठेवली आहे. आज ३५ वर्षे झाली तरी त्या आठवणी मोगऱ्याच्या कळ्यांप्रमाणे टवटवीत आहेत.
त्याचे असे झाले, एके दिवशी आचरे गावचे सुपुत्र, पु.ल. देशपांडे यांचे स्नेही आणि सुप्रसिद्ध तबलापटू वसंतराव आचरेकर यांचे रामेश्वर देवस्थानचे तत्कालीन ट्रस्टी बाळासाहेब गुरव यांना एक पत्र आले. ‘या वर्षी रामेश्वर मंदिराचा त्रिशतसांवत्सारिक महोत्सव येत आहे. त्यानिमित्त पु.ल. देशपांडे, सुनीता वहिनी, कुमार गंधर्व आणि त्यांचा ७० जणांचा गोतावळा आचरे येथे मागारपणाला येत आहे. आपण रामनवमी उत्सवात गायन, वादनकला, साहित्य यांचे छोटेखानी संमेलनच भरवू.’

त्या पत्रातील प्रत्येक अक्षराने बाळासाहेब गुरवांसोबत अख्खे आचरे गाव आनंदून गेले. माझ्या वडीलबंधूंनी- दादा ठाकूर यांनी- ही बातमी घरी सांगितल्यावर आम्हीही मंतरून गेलो. चिपळूणहून निघणारे एक ‘सागर’ नियतकालिक सोडले तर अन्य गावागावांत पोहोचणारे त्या वेळी स्थानिक वृत्तपत्र नव्हते, पण पु.ल. देशपांडे आचरे गावी येणार आणि चक्क आठ दिवस मुक्कामाला राहणार, ही सुवार्ता ‘रानारानात गेली बाई शीळ’ करीत गावागावांत, घराघरांत पोहोचली. पुलं सुनीताबाईंसोबत धामापूर मुक्कामी येऊन जायचेच, पण आचरे गावी आठ दिवस पुलं परिवाराचा मुक्काम हा सर्वासाठीच ‘महाप्रसाद’ होता.

आणि.. ज्या सोनियाच्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहात होतो, तो दिवस उजाडला. रामनवमी उत्सव चालू असतानाच कोल्हापूरमार्गे व्हाया कणकवली, रामगड, श्रावण करीत धुळीचे रस्ते अक्षरश: तुडवत तुडवत तीनचार जीपगाडय़ा, दोन मॅटेडोर आदी वाहनांनी पु.ल. देशपांडे आणि त्यांचा गोतावळा आचरे येथे डेरेदाखल झाला. एक एक नक्षत्र पायउतार होत होते. आपल्या गावी त्या काळी नसलेल्या कोणत्याही भौतिक सुविधांनी ओशाळून न जाता स्वत: वसंतराव आचरेकर खांद्यावरील हातरुमाल सावरत सर्वाना उतरून घेत होते- ‘‘येवा, आचरा आपला आसा.’’
त्यात होते पु.ल. देशपांडे, सुनीता देशपांडे, कुमार गंधर्व, वसुंधरा कोमकली, मालिनी राजूरकर, गोविंदराव पटवर्धन, नारायण पंडित, अतुल व्यास, रत्नाकर व्यास, मुंबई विद्यापीठाचे त्या वेळचे संगीत विभागाचे प्रमुख अशोक रानडे, थोर साहित्यिक अरविंद मंगळूकर, शरच्चंद्र चिरमुले, बंडुभैय्या चौगुले, राम पुजारी, इंदूरचे नटवर्य बाबा डिके, इंदोरचे पत्रकार राहुल देव, बारपुते, थोर चित्रकार एम.आर. आचरेकर, चिंचाळकर गुरुजी, भार्गवराम पांगे आदी ६०-७० मंडळी आचरे गावी अवतीर्ण होत होती आणि आचरे गावचे नभांगण ताऱ्यांनी भरभरून जात होते.

पाडव्यापासून सुरू होणारे रामनवमी उत्सवाचे दिवस.. दुपारची वेळ.. रामेश्वर सभामंडपात महिरपी कनातीही गाऊ लागल्या होत्या. वाळ्याचे पडदे वातावरण सुगंधित करीत होते. सभामंडपातील हंडी झुंबरात दुपारचे सूर्यकिरण लोलकासारखे भासत होते. दरबारात रामेश्वर संस्थानचे त्या वेळचे वयोवृद्ध ख्याल गायक साळुंकेबुवांचा ‘पुरिया धनश्री’ ऐन बहरात आला होता. त्याच धूपदीप वातावरणात ‘पुरिया धनश्री’च्या पाश्र्वसंगीतावर आचरे गावचे ज्येष्ठ नागरिक अण्णा फोंडकेकाका, पु.ल. देशपांडेंच्या हाती मानाचा नारळ देऊन त्यांचे हात आपल्या हाती घेऊन पुलंना रामेश्वराच्या सभामंडपात आणत होते. पुलंच्या मागून महाराष्ट्राचा साहित्य, संगीत, चित्र-शिल्पकलेचा अक्षरश: ‘शाही सरंजाम’ पायी चालत येत होता. त्या माजघरातील शाही स्वागताने ‘भाईंचे’ डोळे पाणावून गेल्याचे आम्ही अगदी जवळून पाहिले.
त्या वेळी रामेश्वर मंदिराच्या परिसरात कोणत्याही अत्याधुनिक सोडाच, पण अत्यावश्यक सुविधाही उपलब्ध नव्हत्या. ‘पु.ल. देशपांडे आपल्या घरी राहतील का?’ ‘सुनीताबाई अ‍ॅडजेस्ट करून घेतील का?’ या विचारांनी देवस्थानचे विश्वस्थ बाळासाहेब तथा अण्णा गुरव थोडे धास्तावलेच होते. त्या मंडळींसाठी स्वतंत्र व्यवस्था म्हणजे त्यांचा शेजारचा अक्षरश: मांगर. तो त्यांनी माडाच्या झापांनी शाकारून सजवला होता. जमीन शेणाने सारवून रांगोळ्या काढल्या होत्या. गाद्या, उशा, खुच्र्या वसंतराव आचरेकरांनी कोल्हापूरहून आणल्या होत्या. आठ दिवसांसाठी सर्व तऱ्हेच्या भाज्या आणि सोबत यल्लप्पा आचारीदेखील कोल्हापूरहून आणला होता. पुलंच्या मागारपणाची जशी जमेल तशी तयारी केली होती.
वास्तूला शोभा त्याच्या स्थापत्यरचनेपेक्षा त्यात कोणाचे वास्तव्य, यावरच खरी अवलंबून! पुलं, सुनीताबाई, कुमार गंधर्व, एम.आर. आचरेकर आदी रत्नजडित ६०-७० जवाहीर त्या मांगरवजा कुटीत राहायला आले आणि त्या पर्णकुटीचा क्षणार्धात कसा ‘राजमहाल’ झाला, तो आम्ही याची डोळा पाहिला. अख्खे गुरव कुटुंबच त्यांच्या तैनातीला होते. सुनीताबाई, वसुंधरा कोमकली गुरवाच्या घरच्या सुनाच झाल्या होत्या. पुलंची दंगामस्ती बघायला आम्ही आमचाही तळ आमच्या घराकडून गुरवांच्या घरी हलवला होता. एकदा काही पत्रकारांनी सुनीताबाईंना गुरवांच्या घरी तांदूळ निवडताना पाहून प्रश्न केला, ‘‘तुम्ही तांदूळ निवडता?’’ त्या वेळी सुनीताबाई म्हणाल्या, ‘‘हो आम्ही जेवतोसुद्धा!’’ आणि कुमारांपासून गोविंदराव पटवर्धनांपर्यंत सर्व हास्यकल्लोळात बुडाले!

त्या पर्णकुटीत पुलं आपल्या विविध प्रवासवर्णनातील किस्से सांगत. तो तर वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकेल. अगदी लहान मूल आजोळी जसे दंगामस्ती करते तसे पुलं आपले वय विसरून वागायचे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘‘अरे वसंता, काल मी पु.ल. देशपांडे होतो रे! आज मी पुलं आचरेकर झालो.’’ दुपारी, संध्याकाळी रामेश्वर मंडपात कुमारांच्या मैफिली रंगायच्या! प्रारंभी मालिनी राजूरकर, वसुंधरा कोमकली, नारायण पंडित यांचे गायन व्हायचे. नंतर सतारवादन, संतूरवादन, त्यानंतर कुमारजी अवतीर्ण व्हायचे!

भार्गवराम तथा दादा पांगे ध्वनी संयोजनाची जबाबदारी घ्यायचे. तबल्यावर वसंतराव आचरेकर, हार्मोनिअमवर गोविंदराव पटवर्धन, तानपुऱ्यावर वसुंधरा कोमकली आणि निवेदनाची जबाबदारी स्वत: पुलं देशपांडे यांनी घेतलेली आणि रंगत म्हणजे त्या कार्यक्रमाची जिवंत चित्रे पांढऱ्या शुभ्र ड्रॉईंग पेपरवर स्वत: एम.आर. आचरेकर चितारीत असत. कुमारांची ‘तान’ ते लीलया पेन्सिलने त्या ड्राईंग पेपरवर सहज उतरवत. सुरुवातीला त्या रेषा अगदी शेवयासारख्या वाटत, पण क्षणार्धात ‘गायनाच्या बैठकीचा आकार’ घेत. ही जादू एम.आर. आचरेकर या प्रचंड व्यक्तिमत्त्वाच्या महान कलाकाराच्या अगदी जवळ बसून बघण्याचे भाग्य आम्हाला लाभले.

कुमारांच्या ख्याल गायनानंतर पुलंचे निवेदन होई. त्यानंतर कुमारजींची निर्गुण भजने सुरू व्हायची. इंदूर, देवासच्या कलाकारांसोबत आचरेवासीय कलावंतांनाही ती भजने डोलवत ठेवायची! एके दिवशी तर बहारच आली. दुपारी मालिनी राजूरकरांपासून कुमार गंधर्वापर्यंत सर्वानी वसंत, भीमपलासी, तोडी, गुजुरीतोडी, मुलतानीतोडी आदी रागदारी गायकीने चैत्रातील त्या दुपारला मोगऱ्याचा गंध दिला. खऱ्या अर्थाने वसंतोत्सव रंगला!
..आणि त्याच सायंकाळी पुलंचा एक आगळा पैलू आम्ही पाहिला! हार्मोनिअमची स्वर्गीय जुगलबंदी! अगदी आमच्या माजघरात बसून ऐकतो आहे, अशी! स्वर्गीय जुगलबंदीसाठी पुलंसोबत तेवढय़ाच तोलामोलाचे संवादिनीचे बादशहा होते गोविंदराव पटवर्धन! तबल्यावर वसंतराव आचरेकर आणि जुगलबंदीसाठी उभयतांनी नाटय़संगीत निवडले होत- ‘सकुल तारक सुता’. जुगलबंदी जवळजवळ पाऊण तास चालली होती. उभयतांची बोटे सुरांवरून लीलया फिरत होती आणि स्वरांचे ‘महाल’ सभामंडपात आकारात होते. त्याकाळी आम्हा कोणाजवळच ‘टेपरेकॉर्डर’सारखे साधे उपकरणही उपलब्ध नव्हते. तो स्वर्गीय ठेवा अजूनपर्यंत फक्त आम्ही कानात आणि मनात जपून ठेवला आहे.. अगदी अत्तराच्या फायासारखा! चिरंतन! आणि चिरंजीव!

आचरे गावचे सुपुत्र गंगाधर आचरेकर यांच्या ‘भारतीय संगीत’ या संगीतावर लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, त्यावेळी अध्यक्षपदावरून झालेले पुलंचे अभ्यासपूर्ण भाषण, आचरी यल्लप्पाचा झालेला सत्कार! यल्लप्पाचा गौरव करताना गहिवरून आलेला पुलंचा कंठ आणि भरून आलेले यल्लप्पाचे डोळे आमच्या नजरेसमोर अजूनही आहेत. त्या कार्यक्रमाची गंमत काही औरच होती. चर्चा, परिसंवाद, मैफल, पुस्तक प्रकाशन सोहळा, ग्रंथपाल काका दळवी यांचा पुलं देशपांडे यांनी केलेला गौरव, गुरवांच्या मांगरात चालणारी पुलं व परिवाराची दंगा-मस्ती हे सारे आम्हाला अगदी जवळून पाहता आले. पुलंचे ते मागारपण म्हणजे आमच्या दृष्टीने आगळेवेगळे गंधर्व संमेलनच होते.

असा हा आगळावेगळा, आमच्या गावात येऊन आचरेकर झालेला ‘गंधर्व’ १२ जून २००० रोजी सर्वाना सोडून गेला. त्यानंतर या अशा वलयांकित व्यक्तींना अगदी जवळून पाहिल्याचे, अनुभवल्याचे आम्ही सर्वाना सांगत राहिलो. त्या प्रसंगाची दुर्मीळ छायाचित्रे दाखवून आमची ही श्रीमंती इतरांना वाटत राहिलो. त्या पुलकित दिवसांच्या आणि त्यांच्या गोतावळ्याच्या आगळ्या मागारपणाच्या आठवणीचा स्वर्गीय ठेवा आम्ही गावक ऱ्यांनी जपून ठेवला आहे, ‘मम सुखाची ठेव’ म्हणून!

सुरेश शामराव ठाकूर
लोकसत्ता,
रविवार १२ जून २०११