एकदा क्लासच्या दारात एक बगी उभी राहिली. बगीत एक म्हातारे सरदार, त्यांच्या तितक्याच म्हाताऱ्या सरदारीणबाई आणि एक तरुण मुलगी होती. बुबा दरबारी अदबीने बगीजवळ गेले.
"नारद संगीत विद्यालयाचे चालक आपणच का ?" "होय मीच!" "हं. गाणं शिकविण्याचे दर काय आहेत आपले?" "कोणाला- आपल्या ताईसाहेबांना- गाणं शिकायचं आहे का?" ताईसाहेबांकडे चोरून पाहात बुवांनी विचारले. "तिला गाणं शिकवून काय सिनेमात नाचायला पाठवायला सांगता काय आम्हाला?" बुवा चरकले. गाणे शिकवून नाचायला कसे पाठविता येईल?- हे कोडे तर त्यांच्यापुढे होतेच; परंतु ह्या म्हाताऱ्याला शिकवावे लागणार की काय ही भीती त्यांच्यापुढे उभी राहिली. "तसं नाही, आजकाल सरदार हुरगुंजीकरांच्या सूनबाईसाहेबांना मी शिकवितो गाणं-" "सरदार हुरगुंजीकर सेकंड क्लास सरदार आहेत; आम्ही फर्स्ट क्लास आहो!" सोन्याच्या घड्याळाचा छडा चाळवीत सरदार म्हणाले. "ह्यांना गाणं शिकवायला काय घ्याल?" म्हणजे? ह्या म्हातारीला सिनेमात नाचायला पाठवणार की काय? त्यांच्या बोटाच्या दिशेने त्या थेरङ्याकडे पाहात बुवा मनात म्हणाले. नशीब! पागेतल्या घोड्यांना सुरात खिंकाळायला शिकवा म्हणून नाही सांगितले! "काय?" "हो, शिकवू की!" बुवांच्या तोंडून शब्द गळून पडले. "शिकवा. तिला दमा आहे. गाण्यानं दमा बरा होतो म्हणे. परवाच काठेवाडच्या एका राजवैद्यानं सांगितलं आम्हांला. पाहायचं एकेक इलाज करून! उद्या या वाड्यावर." बगी पुढे गेली. बाहेरच्या बोर्डावर 'येथे दमाही बरा केला जाईल' ही अक्षरे लिहिण्याचा विचार बुवांच्या मनाला चाटून गेला. हे वैद्यकीय गाणे शिकवायला बुवा दोनचार महिने जात होते. 'सा' लावला की म्हातारी पाऊण तास खोकायची. एकदा पंचमापर्यंत जेमतेम पोहोचली आणि सुराला एक ह्या हिशेबाने पाचही प्राण तिच्या डोळ्यात गोळा झाले. दुसऱ्या दिवसापासून स्त्रीहत्येच्या पातकाच्या भीतीने बुवांनी शिकवणी सोडली. त्या शिकवणीला जाताना बुवा 'संगीताच्या व्हिजिट' ला निघालो म्हणायचे.- पु. ल. देशपांडे
संगीत चिवडामणी
नसती उठाठेव
0 प्रतिक्रिया:
Post a Comment