Tuesday, May 29, 2007

रंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)

"रंग माझा वेगळा" ह्या सुरेश भटांच्या गाजलेल्या कवितासंग्रहाला पुलंचे प्रास्ताविक लाभले होते.
http://www.sureshbhat.in/node/19
--विश्वस्त

सुरेश भटांची कविता एके दिवशी मला अचानक भेटली. आणि नवकवितेच्या या जमान्यात नुसत्या निरनिराळया रंगांचेच नव्हे, तर निराळ्या अंतरंगाचे दर्शन घडले. त्या कवितेचा बाज आणि साज हा सर्वस्वी निराळा नव्हता. पण प्रसादगुणाशी फरकत घेतलेल्या आधुनिक कवितेच्या युगात या हृदयीचे त्या हृदयी घातल्यासारखी ही कविता एकदम मनात शिरली. मुंबईच्या जीवघेण्या उकाड्यात राहणाऱ्या माणसाच्या अंगावरून दैवयोगाने किंवा निर्सगाच्या एखाद्या चमत्कारामुळे दक्षिण वायूची शीतल झुळुक जावी, तशी ही कविता अंगावरून गेली. या कवितेतले फुललेपण मोहक होते. कळ उमटवून जाण्याची तिची ताकद ही मोठी होती. आणि त्या कवितेत सुगंधासारखे गाणे दडलेले होते. हे गाणे अंगभूत होते. कुणीतरी गायल्यामुळे त्या कवितेचे गाणे झाले नव्हते. कवितेला गाण्याची सक्ती नसावी. तशी तिला कसलीच सक्ती नसावी. किंबहुना, आजकाल कानावर जी गीते पडतात ती तर बळजबरीने सुरांच्या चरकातून पिळून काढल्यासारखी वाटतात. त्या गीतांना गात गात हिंडण्याची अंतरी ओढ नसते. ते शब्द सुरांसाठी तहानलेले नसतात. त्यांत सूर कोंदलेले नसतात. कोंबलेले असतात. गीतात सुरांतून उमटण्याचा अपरिहार्यपणा असावा लागतो. त्याउलट काही कविता अत्यंत समंजसपणाने गाण्यापासून आपण होऊन दूर राहिलेल्या असतात.त्यांचे व्यक्तिमत्त्वच असे असते की, सुरांचा त्यांना नुसता भार व्हावा. चांगली नवकविता अशी जाणूनबुजून गाण्यापासून दूर राहिली. तिच्या स्वभावातच गाणे नव्हते. तरीही ती कविता असते. गाणे आणि कविता यांचे अतूट नाते नाही. जसे प्रासनुप्रास किंवा यमक यांचे नाही तसेच. पण म्हणून गाणे होऊन प्रकटणार्‍या कवितेचे दिवस संपले असे मानू नये किंवा गाणे होऊन प्रगटल्यामुळे तिचा दर्जा दुय्यम झाला अशाही गैरसमजात राहू नये.

एक काळ असा होता, की कविता कानावाटेच मनात शिरायची, कवी कविता गाऊन दाखवीत. मुद्रणकला आली आणि कवितेचा छापील ठसा डोळ्यापुढे येऊ लागला. ती आता मूकपणाने डोळ्यावाटे मनात शिरू लागली. मनातल्यामनात कविता वाचायची पद्धत तशी अलीकडली. ठशातून कागदावर उमटणार्‍या अक्षरांमुळे तोडांतून उमटणा-या नादातून होणारा संस्कार नाहीसा झाला. एका परिमाणाची वजाबाकी झाली. हे उणेपण घालवण्याचा र. कृ. जोशी यांच्यासारख्या कवीने त्या अक्षरांना चित्ररूप देऊन प्रयत्न केला. गीतांनी सुरांतून उमटावे तसे त्यांच्या कवितांना त्यांनी चित्राक्षरातून उमटवण्याचा प्रयत्न केला. जोशी चित्रकार असल्यामुळे त्यांनी मोठ्या सहजतेने चित्ररूपातून कविता प्रगटवली. भटांची कविता गाता येते. ते काही गायनकलापारंगत गायक नाहीत. पण अंतःकरणात मात्र सुरांचा झरा आहे. एका अर्थी ते भारतीय संगीतकलेचा पध्दतशीर अभ्यास केलेले गायक नाहीत हे चांगले आहे. अजाणतेपणे काही सूर त्यांच्या मनात वसतीला उतरतात. फुलाला चित्रकलेचा डिप्लोमा असावा लागत नाही. ज्या मातीतून ते रूजून फुलते तिथेच ते रंग दडलेले असतात. भटांच्या मनोभूमीत निसर्गतःच सूर दडलेले आहेत. ज्यांची कविता अशीच गात गात फुटते असे माझ्या आवडीचे बा.भ.बोरकर हे कवी आहेत. हा पिंडाचा धर्म आहे. पु.शि.रेग्यांना भेटणारे शब्द जसे फुलपाखरांसारखे त्यांच्या अवतीभवती हिंडत असल्यासारखे वाटतात, तसे सुरेश भटांच्या भोवती सूर हिंडत असावेत. मनात फुलत जाण्या-या कवितेने या सुरांच्या गळ्यात गळा घालून केव्हा गायला सुरवात केली, हे सुरेश भटांनाही कळत नसावे. म्हणूनच त्यांच्या गीतांना चाली देणार्‍या संगीत दिग्दर्शकंच्या गुणवत्तेविषयी मला आदर असूनही सुरेश भट त्या गीताबरोबर जन्माला आलेल्या चालीत जेव्हा आपली कविता गाऊ लागतात त्यावेळी ते गीत आणि गाणे एक होऊन जाते. कुणीही कुणावर मात करण्यासाठी येत नाही. वरपांगी अत्यंत अस्ताव्यस्त दिसणारा हा कवी, त्यातही ती कविता आणि त्याचे ते गाणे हे तिन्ही घटक त्या कवितेच्या संपूर्ण आस्वादाला आवश्यक असावेत असे वाटायला लागते. हे एक विलक्षण अद्वैत आहे.

सुरेश भटांना गझलेचे फार मोठे आकर्षण आहे. कारण 'गझल' हे केवळ वृत्त नसून ती एक वृती आहे. एव्हढेच नव्हे; तर तिच्यात एक सूक्ष्म आणि सुंदर निवृतीही आहे. स्वार्थाच्या बाजारात धडपडण्याला आपण चुकीने प्रवृती मानीत आलो आहोत.क्षणभर निवृत्त मनाने जगाकडे पाहता आल्याशिवाय खरी या प्रवृत्तीची गोडी कळत नाही. जीवनात नुसतेच चार उंदीर उड्या मारीत धावत सुटणे म्हणजे प्रवृत्त जीवन जगणे नव्हे. निव्वळ जगण्यासाठी म्हणून करावी लागणारी धावपळ कुणाला सुटली आहे? पण काही क्षण त्या धावपळीचा अन्वयार्थ लावण्यासाठी काढावे लागतात. असा एखादा क्षण कवितेला जन्म देऊन जातो. त्यातूनच मग आजूबाजूच्या दगडधोंड्यांच्या पलीकडे दिसायला लागते. न कळत ते पहात राहण्याचा, शोधत राहण्याचा छंद जडतो. आणि मग आपले नाते निराळ्याच ठिकाणी जडते. बिलंदरपणाने जगणार्‍या माणसांत असा माणूस कलंदर ठरतो. ही कलंदरी सहजसाध्य नसते किंवा तिचे सोंगही आणून भागत नाही. ती अनुभूती जेव्हा कवितेतून उमटते, त्यावेळी तिचा अस्सलपणा आणि नकलपणा बरोबर ओळखता येतो.

सुरेश भट जेव्हा ' मागता न आले म्हणुनी राहीलो भिकारी' म्हणतात, त्यावेळी त्या न मागण्याच्या वृत्तीमुळे लाभलेली श्रीमंती त्यांना गवसली आहे हे उमजते. लाचारांचा आचारधर्म पाळला नाही म्हणून त्यांना दु:ख नाही, तर अपार आनंद आहे. आणि सुरेश भटांशी ज्यांचा परिचय आहे त्यांना त्यांच्या फाटक्या खिशाचा हेवा वाटावा अशी वस्तुस्थिती आहे. कवीचे काव्य आणि त्याचे खाजगी जीवन यांची सांगड घालायचा कुणी आग्रह धरू नये. माणूस चोवीस तास एकच भाववृत्ती घेऊन जगत नसतो. काव्यातल्या कलंदरीचा, सौंदर्याचा, चांगल्या आनंदाचा ध्यास प्रत्यक्ष जीवनात घेऊन जगणारा कवी भेटला की अधिक आनंद वाटतो एवढेच. निखळ साहित्य समीक्षेत 'सुरेश भटांची कविता' एवढाच चर्चेचा विषय असावा. माझ्या सुदैवाने मला सुरेश भटांचा स्नेह लाभला. त्यामुळे त्यांची कविता ऐकताना आणि वाचताना सुरेश भट नावचा एक मस्त माणूस मला निराळा काढता येत नाही, ही एक वैयक्तिक मर्यादा मानवी.

सुरेश भटांचा हा कलंदरपणा लोभसवाणा आहे. कारण कवितेइतकेच त्यांचे कविता ऐकणार्‍यांवर म्हणजे जीवनातल्या व्यवहारी धडपडीपलीकडे काही पाहू इच्छिणार्‍यांवर, ते जाणून घेण्याची तळमळ असणार्‍यांवर प्रेम आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी काव्य गायनाच्या कार्यक्रमातून ते ज्या तबियतीने विदग्ध समाजापुढे आपली कविता गातात, तितक्याच मस्तपणाने उमरावतीतल्या रिक्षेवाल्यांच्या अड्ड्यांवरही गातात. रसिकांच्या मळ्यांना पडणारी कुंपणेही त्यांच्या मनाला पटत नाहीत. तशी ही उर्दू शायरीची खास परंपरा आहे. गावात मुशायरा असला की, उर्दू शायरीच्या सर्व थरांतल्या शौकिनांची तिकडे झुंबड उडते. हा हा म्हणता गावातला तहसीलदार आणि टांगेवाला मैफिलीतले मानिंद होऊन बसतात.

सुरेश भटांच्या कवितेत पंडित-अपंडित दोघांना हलवण्याचे सामर्थ्य आहे. गझलेमध्ये नाट्याचा मोठा अंश असतो, तसे या गीतप्रकाराचे नाटकातल्या स्वगताशी फार जवळचे नाते आहे.एखादी अकल्पित कलाटणी श्रोत्यांना मजेदार धक्का देऊन जाते. गीतातल्या ओळींच्या डहाळ्यांना अनपेक्षित रीतीने मिळणारे झोके धुंदी आणत असतात. शब्दचमत्कृती असते. कल्पनांचे बेभान उड्डाण असते. सुरेश भटांच्या गझलांमधून उर्दू शायरीशी नाते जुळवणार्‍या अशा गोष्टी आढळतात. पण उर्दू शायरीत जी कित्येकदा शब्दांची आतषबाजी कवितेला गुदमरवून टाकते ते प्रकार त्यांच्या कवितेत होत नाही. उगीचच उर्दू-फारसी शब्दांची पेरणी करून आपल्या कवितेला गझलेच्या बाह्यांगाशी जुळवले नाही. आकर्षण वाढवायला त्यांनी उगाचच उर्दू भाषेचा सुरमा घालून आपली गझल नटवली नाही. अशा प्रकारे उर्दू शेरोशायरीची नक्कल करणारी गीते आणि शेर मराठीत लिहिले गेले आहेत. असल्या फारसी-उर्दू पोशाखाची सुरेश भटांना गरज वाटली नाही. कारण ज्या अनुभूतीतीने त्यांची कविता उमलते त्या अनुभूतीशी इमान ठेवणे त्यांनी महत्त्वाचे मानले. मानले म्हणण्यापेक्षा ती वृत्तीच त्यांच्या मनातून गझल उमटवीत आली. मराठीत माधव ज्युलियनांच्या नंतर लुप्त होत गेलेल्या या काव्यप्रकाराचा जीर्णोध्दार करावा, हा हेतू कधीही नव्हता. एक तर कुठलाही काव्यप्रकार रूढ करावा असा संकल्प सोडून कविता रचणार्‍या कवीविषयी मला चिंताच वाटत असते. मग तो वृत्तात लिहिणारा असो की मुक्तछंदात! कवितेने जन्माला येताना आपला छंद,वृत्त, जाती जे काही असेल ते घेऊन प्रगट व्हावे. इथे प्रश्न असतो तो मनात उत्कटत्वाने काय सलते आहे याचा! आत खळबळ कसली उडाली आहे हे महत्त्वाचे. सहजतेने उमटलेल्या शार्दुलविक्रीडिताला हट्टाने रचलेल्या मुक्तछंदापेक्षा जुनेपणाचा शेरा मारून खाली ढकलण्याचे कारण नाही. वाल्मिकीचा शोक मंदाक्रांतेतून न प्रकटता अनुष्टुभातून का प्रकटला याला कारण नाही. आणि कालिदासाच्या यक्षाचा विरह अनुष्टुभातून न प्रकटता मंदाक्रांतेतून आला म्हणून काही बिघडले नाही! कवीच्या अंतःकरणातून उमटलेल्या वेदनेची प्रत आपल्याला जाणवली कशी हे महत्त्वाचे! दुबळ्या हाती तलवार आली म्हणून त्याला शूर म्हणू नये, तसे समर्थहाती लेखणी आली म्हणून सामर्थ्य उणे मानू नये.

आपल्याला जे जाणवले ते अधिकाधिक लोकांना जाणवावे, ही भटांची ओढ मला मोलाची वाटते. त्यांची कविता दुर्बोधतेकडे झुकत नाही. ती कविता ज्या असंख्य हृदयात ओतावी त्या हृदयांची संख्या ते कुठल्याही अटींनी मर्यादित करीत नाहीत. ' साधीसुधी ही माणसे माझ्या कवित्वाची धनी' असे ते केवळ उपचार म्हणून म्हणत नाहीत. त्या साध्यासुधा माणसाशी साधायच्या संवादाचे मोल मोठे वाटते. एकच तुकारम किंवा एकच गालिब अनपढांपासून ते पंडितांपर्यंत सर्व थरांतल्या आणि सर्व दर्जांच्या बुध्दिमत्तेच्या आस्वादकांना नाना प्रकारांनी भेटत असतो.तो प्रकार कुठला असेना, पण त्यातले काहीतरी जाणवल्याशिवाय त्या कवितेशी संवादच सुरु होत नाही. कवितेतली दुर्बोधता सापेक्ष मानली तरी सुबोधता हा दुर्गुण मानायला नको. वनस्पतिशास्त्रज्ञाला चारचौघांपेक्षा फूल अधिक कळत असेल, पण त्याचे रंग आणि गंध प्रथम सामान्य माणसासारखे त्याला आकर्षित करत नाहीत असे थोडेच आहे?

सुरेश भटांची कविता आजच्या नवकवितेच्या एका निराळ्या वातावरणातही आपले अंगभूत सौंदर्य घेऊन प्रगटली आहे. नाना प्रकारच्या भाववृत्तींचा इथे फुलोरा आहे. 'निराशेचा गाव आंदण आम्हासी' म्हणणा-या संतांची निराशाही त्यांच्या कवितेतून दिसते. अशा एका क्षणी तेही

'भोवताली हिंडती ही माणसे प्रेतांपरी।
काय ह्या गावातसुध्दा एकदा होती घरे?'

असा उदास करणारा प्रश्न विचारीत येतात. असा प्रश्न काय त्यांना एकट्यालाच पडतो? जगताना आपल्या संवेदना बोथट होऊ न देता जगणा-या सगळ्यांनाच आज पडणारा हा प्रश्न आहे. मुंबईसारख्या विराटपुरीत राहणा-या माणसाला भोवतालचे दैन्यदु:ख पाहण्याचे टाळत टाळत जगावे लागते. एखाद्या क्षणी स्वत:चे डोळे असून न पाहता आणि कान असून न ऐकता कंठावे लागणारे जिणे आठवले की, त्या हिंडणा-या प्रेतातले आपणही एक आहोत याची जाणीव होते. त्या प्रश्नाला लाभलेले काव्यरूप त्यालाही अधिक उत्कटतेने अस्वस्थ करून जाते. असले नाना प्रकारच्या भावनांचे तरंग उठवणे हेच कलेचे कार्य असते. ते तरंग आहार-निद्रा-भय-मैथुनाच्या पलीकडच्या जीवनाचे स्मरण देऊन जातात. चांगले साहित्य माणसाला अंतर्मुख करते. ज्या गलबल्यात आपल्याला जावे लागते त्यातून दूर पळून जाणा-या माणसाची सुटका नाही. त्यात पुरुषार्थही नाही. सुरेश भटांची वृत्ती पळून जाणा-यांतली नाही. जगताजगता क्षणभर त्रयस्थ होणा-याची आहे. जीवनाच्या नाटकात भूमिका करताकरता क्षणभर प्रेक्षक होणा-याची आहे. खेळताखेळता तो आपलाच खेळ पाहणा-याची आहे. कलावंताचे 'स्व'-तंत्रपण ते हेच! ही वृत्ती, ' गुंतुनी गुंत्यात सार्‍या, पाय माझा मोकळा' ह्या ओळीत भटांनी व्यक्त केली आहे. जीवनाच्या ह्या खेळाचा कुणी अर्थ काढू नये. तसा त्याला स्वत:चा असा अर्थ नाही. पण खेळाचा आनंद आहे. जिंकण्या-हारण्याचे सुखदु:ख आहे. कधी नाजूक बंधने आहेत. त्या बंधनात गुंतणे आहे. त्यातून सुटणे आहे. तुटणे आहे. हे सारे माणसाने निर्माण केले आहे. पण हा सारा खेळ आहे याची जाणीव ठेऊन जगणे ह्या लेकुरंच्या गोष्टी नव्हेत! सुरेश भटांची कविता वाचताना आनंद वाटतो तो या खेळात आपल्याला पडणारे प्रश्न त्यांच्या कवितेतून नेमके शब्दरूप लेवून प्रकटताना, अर्थात नित्य व्यवहारातल्या प्रश्नांपलीकडले प्रश्नही सगळ्यांनाच पडतात असे नाही. सुरेश भटांनी विचारलेला ' हे खरे ही ते खरे?' हा प्रश्न सनातन आहे. जीवनाच्या या विराट स्वरूपाकडे क्षणभर थबकून पाहण्याची बुध्दी होणा-यांना हा प्रश्न नेहमीच पडतो. सुरेश भटांसारख्या प्रतिभावंत कवीला हा प्रश्न पडलेला पाहून अशा लोकांना त्या कवीशी अधिक जवळीक साधल्याचा आनंद होतो. जीवनात गवसलेल्या आत्मसंतोषापेक्षा न गवसल्याच्या रुखरुखीतूनच काव्य जन्माला येते.
ही अलौकिक रुखरुखच काव्यनिर्मितीमागली मुख्य प्रेरणा असते. कुणी ती शब्दांच्या चिमटीत पकडू पाहतो, कुणी रंगरेषांतून धरू लागतो. हे वेड गतानुगतिकतेतून जाणा-याला कळत नाही. आणि कळत नाही म्हणून रुचत नाही मग :

'हालती पालीपरी ह्या जिभा
सारखी माझ्यावरी थुंकी उडे!'

हा अनुभव कलावंताला भोगावा लागतो. गडकर्‍यांनी जिला दीड वितीची दुनिया म्हटले आहे, तिच्यातच सगळ्यांना जगायचे आहे. पण त्या दुनियेतही कुणाच्या तरी डोळ्यातले चांदणे वेचण्याचे क्षण लाभलेले असतात. त्याच दुनियेत ' अमृतमय मी, अमृतमय तू, तनमन अमृत बनते ग' असा अनुभव लाभतो. सुरेश भटांच्या 'दिवंगताच्या गीता'तली ही ओळ मला फार महत्त्वाची वाटली. तसा तो आला नसता, नव्हे तो येत असतो याची जाणीव सुरेश भटांच्या काव्यातून उमटली नसती, तर त्यांच्या करुण गाण्याची रडगाणी झाली असती. त्यांची कविता ही एक कारुण्य जोपासण्याचा किंवा अश्रूंची आरास मांडण्याचा षौक झाला असता.

ही जाणीव आहे म्हणूनच सुरेश भट हे केवळ वैयक्तिक सुखदु:खाच्या अनुभूतींना फुंकर घालीत बसणारे कवी नाहीत. आजच्या समाजातले रगडणारे आणि रगडले जाणारे ह्या द्वंद्वाची त्यांना जाणीव आहे. 'तसू तसू दु:खे घेऊन जोजवीत बसणा-यांची आत्मवंचना ज्याची त्याला गाडणार आहे', यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांचे गीत हे त्यांची वैयक्तिक दु:खे गात फुटावे असे त्यांना वाटत नाही. त्या गीतात 'दु:ख संतांचे भिनावे' अशी त्यांना ओढ आहे. असल्या व्यापक दु:खाची जाणीवच कवीला ख-या अर्थाने 'कवी' ही पदवी प्राप्त करून देत असते. समान दु:खांच्या अनुभूतीतून माणूस माणसाच्या अधिक जवळ येतो. त्यांनी
तुकारामाला उद्देशून-

'तुझे दु:ख तुझे नाही
तुझे दु:ख अमचे आहे!'

असे म्हटले आहे. सुरेश भटांची कविता वाचताना त्यातल्या दु:खाच्या अनुभूती आस्वादकालाही आपल्या वाटतात. संवाद सुरू होतो. इथेच भटांचे यश आहे. मराठी कवितेच्या प्रांतात भटांना असली आपुलकी आजही लाभली आहे. यापुढे हा आप्तवर्ग खूप वाढेल अशी प्रसादचिन्हे आहेत.
'हाय तरीही बाजारी माझी तोकडी पुण्याई नाही अजून तेवढी माझ्या शब्दांना कल्हई'
असे जेव्हा सुरेश भट म्हणतात तेव्हा त्यातला उपरोध लक्षात घ्यायला हवा. ही भटांची तक्रार मानू नये! पितळ उघडे पडण्याची भीती असणार्‍यांना कल्हईची गरज पडावी! इथला सुवर्णकण बावनकशी आहे!

'माझीया मस्तीत मी जाई पुढे
मात्र बाजारु कवाडे लावती !'

बाजारू कवाडे लावली तरी आज अनेक अंत:करणांची कवाडे सुरेश भटांच्या कवितांसाठी उघडली गेली आहेत. आणखीही उघडली जाणारच आहेत. दीड वीत छातीच्या माणसांनादेखील आपल्या छातीची रुंदी आणखी खूप वाढावी अशी ओढ नसते असे आपण का मानावे? तसा एखादा क्षण येऊन त्या चातकाने चोच वासली तर त्या चोचीत धार टाकण्याचे काम कवीलाच करावे लागेल, ह्याची जाणीवही भटांना आहे. म्हणूनच ते वैयक्तिक अहंकाराने नव्हे, तर जो 'अमृताचा वसा' त्यांनी हाती धरला आहे त्यामागच्या कर्तव्याच्या जबाबदारीने म्हणतात की, ' आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे!' त्या उद्याची वाट न पाहता त्यांची गीते आजच लोक गाऊ लागले आहेत. काहीतरी मनात शिरल्याखेरीज कोण कशाला गाईल? आणि अशी कानातून किंवा डोळ्यांतून मनात शिरलेली गीते कधी व्यर्थ का असतात?

दुनियेतील बाजारू कवाडे नाहीशी करण्याचे सामर्थ्य आणि दु:खाचे देखणेपण पाहण्याची ताकद असल्या गाण्यातूनच मिळत असते!
- पु.ल.देशपांडे.

1 प्रतिक्रिया:

shashankk said...

Mitra,
Pratham anant dhanyavad.
Hya lekhatale kavya va Sureshjinchi kavita donhi.......
Vha va, Kya bat hai, Bahot badhiya - yach sadarat yetil.
Blogbaddal khoooooooooooop dhanyavad, shatasha, sahsrasha, lakshada runi aahot.
shashank