"आले, आले बरं का!" गर्दीत कोणीतरी म्हणाले.
"कुठे आहेत, कुठे आहेत?" बरेच आवाज.
"ते काय, अँबेसिडर मधून उतरताहेत."
गुरुशर्टावर बिल्ले लावलेली काही स्वयंसेवक मंडळी पुढे सरसावत, "तुम्ही जरा बाजूला सरका हो, त्यांना यायला सुध्दा रस्ता नाहीये! नाहीतर असं करा ना, तुम्ही सगळे आत का नाही जाऊन बसत? ते तिथंच येणार आहेत."
कोणीही फारसं मनावर घेतलं नाही. ते स्वाभाविकच होतं.
सगळ्या गर्दीच्या टाचा उंच झाल्या! मिळेल तिथून पुढे घुसून, मान ताणून लोकांची त्यांना बघण्याची धडपड सुरु होती.
मलाही उत्सुकता होतीच पण हे सगळे लोक इतके पराकोटीचे उत्सुक होते की मी जरा भांबावलोच.
मी "बाबा, मलाही थोडं उंच करा ना!"
बाबांनी मला दोन्ही हातांना धरुन थोडं उचललं आणि ते मला दिसले! मंडळी, ते माझं पुलंचं साक्षात पहिलं दर्शन!!
१९८० चा सुमार असेल, मी आठवीत असावा. अहमदनगरच्या 'महावीर कलादालना'च्या उद् घाटन सोहळ्यासाठी पुलं आलेले होते.
नुकतीच त्यांची साठी झाली होती. 'पुलं एक साठवण' हे प्रकाशनपूर्व नोंदणी वगैरे करुन घरपोच आलेलं मला आठवत होतं.
(पोस्टातून घरपोच आलेल्या पार्सलातून कोरे पुस्तक बाहेर काढून, त्याच्या पानांचा छान वास घेत घेत आपण आधी न वाचताच ते घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून प्रथम आजोबांना द्यावे लागले होते हे ही लक्षात होते:)
तशी 'व्यक्ती आणि वल्ली', 'पूर्वरंग', 'अपूर्वाई' ह्या पुस्तकांची मोहिनी मनावर आरुढ होतच होती पण हे विख्यात साहित्यिक आहेत वगैरे कल्पनांना डोक्यात अजून स्थान नव्हते.
असो. तर उभ्या महाराष्ट्राच्या मनावर गारुड करणार्या ह्या वल्लीचं पहिलं दर्शन कसं होतं?
अहो, ते पांढरेशुभ्र केस, जणू त्यांच्या कर्तृत्वाची हिमालयाच्या उंचीची साक्ष देणारे (असं अर्थात मला नंतर वाटू लागलं, पण ते केस त्यावेळीही मला भावले होते) हे पांढरे केस फार थोड्या लोकांना खर्या अर्थाने शोभून दिसतात बरं का, त्यातले एक भाईकाका होते; अंगात साधा खादीचा झब्बा, फार इस्त्री बिस्त्री असली भानगड नव्हती, त्यावर फिकट हिरवं-पिवळसर जाकीट तेही खादीचंच आणि पांढरा पायजमा असा वेष; चेहर्यावर आताच फर्मास कोटी करुन आल्यासारखे मिश्किल भाव, त्यांचा तो खास भाईकाका ष्टाईल चष्मा आणि त्यामागचे ते, लहान मुलाची अपार उत्सुकता आणि जिज्ञासा यांनी भरलेले, डोळे! ते अजूनही माझ्या मनात घर करून आहेत. तुम्हाला सांगतो ह्या मोठ्या माणसांच्या डोळ्यात अशी काही एक वेगळीच चमक असते की बस! ते डोळे तुम्हाला पहात नसून तुमच्या आत कुठेतरी बघताहेत असे तुम्हाला जाणवते! मी अनिमिष नेत्रांनी त्यांना बघत होतो. ते चालत आत सभागृहात गेले आणि सगळी गर्दी हिप्नॉटाईज झाल्यासारखी मागोमाग गेली!
आत छोट्या स्टेजवर सगळी मंडळी स्थानापन्न झाली. हारतुरे प्रास्ताविक झालं. बोलणार्या मंडळींपेक्षा माझं (आणि बहुदा सर्वांचंच;) सारं लक्ष पुलं कडेच होतं! ते मधूनच असे काही मिश्किल भाव चेहर्यावर दाखवायचे की मला मोठी गंमत वाटत होती (त्यावेळी कदाचित ते वक्त्याच्या बोलण्यातल्या अशा काही जागा हेरुन ठेवत असावेत की त्याचा वापर ते त्यांच्या भाषणात करुन लोकांना हसवतील असे आपले मला वाटले.) झालं पुलं बोलायला उभे राहिले. तोपर्यंत कानोकानी खबर पसरुन गर्दी इतकी वाढली की लोकांना जागा पुरेना, सभागृहाचे दरवाजे बंद करु का म्हणून विचारणा झाली. आणि इथे भाईकाका खरंच का मोठे ते मला समजलं! अहो माणूसवेडाच आसामी तो, ते संयोजकांना म्हणाले "अहो असं करुयात का, आपणच सगळे बाहेर हिरवळीवर जाऊयात का? लोकांना हिरवळीवर बसायला चालत असेल तर मी तिथे व्हरांड्यात उभा राहून बोलेन. माझी काहीच हरकत नाही!" क्या बात है!! (अहो हिरवळीवरच काय काट्याकुट्यात बसून ऐका म्हणले असते तरी सर्व लोक बसले असते!Smile लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात हिरवळीवर धाव घेतली! मिळेल तिथे जागा पकडून लोक बसले. आतली टेबलं खुर्च्या व्हरांड्यात आल्या. पुलं बोलायला लागले.
त्यावेळी ते काय बोलले ते मला फारसं आठवत नाहीये कारण माझ्या मनात त्या वेळी वेगळ्याच विचारांनी थैमान घातलं होतं. मला पुलंचं रेखाचित्र काढायचं होतं त्यामुळे मी सोयिस्कर जागा शोधत होतो की जिथून मला ते नीट दिसू शकतील! शेवटी महत्प्रयासाने व्हरांड्याशेजारच्या जिन्यात जागा मिळाली. हातातल्या कागदावर माझं चितारणं सुरु होतं. पुलं बोलत असल्यामुळे सहाजिकच हालत होते त्यामुळे त्यांचे विशिष्ठ कोनातले भाव चित्रात पकडताना माझी तारांबळ होत होती. शेवटी एकदाचं ते पूर्ण झालं! पुलंचं भाषण संपताच त्याच्या भोवती स्वाक्षर्यांसाठी गराडा पडला. एकेकाला ते हसून स्वाक्षरी देत होते. मी भीत भीतच सामोरा गेलो. मला जवळ बोलावून, पाठीवरुन हात फिरवून, डोळे मोठे करुन माझ्या हातातल्या चित्राकडे बघून म्हणाले "वा, छान काढलं आहेस रे! मला ठाऊक नव्हतं मी एवढा चांगला दिसत असेन!:)". आणि त्यांनी चित्रावर स्वाक्षरी केली!
महाराजा, त्यावेळी काय वर्णावी माझ्या मनाची अवस्था! 'अवघेचि झाले देह ब्रम्ह' म्हणजे काय असते त्याचा प्रत्यय आला! मी तरंगतच घरी आलो. एरवी ज्या गोष्टी करायला मी साफ नकार देत असे त्या सहजा सहजी ऐकताना पाहून माझे आई-बाबा गोंधळून गेले! ही काय जादू झाली?
आल्या गेलेल्याला पुलंची ती स्वाक्षरी पुढचे कितीतरी दिवस मी दाखवीत असे. तो माझा आनंदाचा ठेवा मी नीट जपून ठेवलाय!
अशीच अनेक वर्षे गेली. पुलं नंतर भेटतच गेले, पुस्तकातून , कथाकथनातून, संवादिनीतून, चित्रपटातून, नाटकातून, लेखांमधून आयुष्य समृध्द करत गेले. नंतरही पुण्यात वसंतव्याख्यान मालेच्या निमित्ताने म्हणा कुठल्याशा भाषणाच्या निमित्तने म्हणा बर्याचदा त्यांना प्रत्यक्ष पहाण्याचा योग आला. पण पहिली भेट ती पहिली भेट त्याचा ठसा अमिट असतो हेच खरे!
असाच काही कामाने हैद्राबादला गेलो होतो. पुलं पुण्यात 'प्रयाग' मधे अतिदक्षता विभागात आहेत हे माहीत होतेच. हैद्राबादला जाताना मनात शंकेची पाल चुकचुकली होती.
१२ जून २०००. माझं काम संपवून मी हॉटेलवर आलो. दूरदर्शवर संध्याकाळच्या बातम्या लावल्या पुलं गेले एवढंच कळलं. पुढच्या बातम्या ऐकू आल्या नाहीत. कितीतरी वेळ सुन्न बसून होतो.
छातीत खूप खूप जड वाटत होतं. दु:खावेग अति झाल्यावर डोळ्यांतून पाण्याच्या धारा सुरु झाल्या. मनाच्या आत खोल कुठेतरी काहीतरी ओरबाडल्यासारखी घायाळ अवस्था झाली होती.
माझ्या पाठीवरुन प्रेमाने फिरलेला तो हात परमेश्वराने त्याच्या हातात धरला होता आणि मी पोरका झालो होतो!
लेखक - चतुरंग
मूळ स्त्रोत - www.misalpav.com/node/1268
(लेखकाच्या पुर्वपरवानगीने हा लेख इथे टाकण्यात आला आहे)
पुलंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे
Tuesday, June 21, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 प्रतिक्रिया:
Good one!
मस्त आहे लेख
पु ल ना भेटायला मिळाला त्यांच्या कडून कौतुक झालं
म्हणजे नक्कीच सर्व काही मिळालं
छान आहे लेख..पण
लेखक - चतुरंग
असं का लिहिलंय?
Post a Comment