शिंपी आणि सुट -- अपूर्वाई
आजवर कुठल्याही शींप्याने माझे कपडे बिघडवल्याचे माझ्या स्मरणात नाही. कारण कपडे बिघडतात म्हणजे नक्की काय होते हे मला कपडे घालायला लागल्याला इतकी वर्षे लोटुनदेखील अजूनही उमगले नाही. परंतु इंग्लंडमध्ये कपड्यांच्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे हे असंख्य लोकांनी बजावल्यामुळे जाणकार मित्रांच्या सल्ल्याने चिनी चांभाराच्या नजीकचाच, फक्त विलायतेला जाणाऱ्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी शोधावा लागला. ह्या सदगृहस्थाची माझ्या बाबतीतली भावना काही निराळीच दिसली. प्रथम मी विलायतेला जाणाऱ्या मंडळीपैकी आहे ह्या घटनेवर त्याचा विश्वासच बसेना. दुसरी गोष्ट विलायतेला त्याने शिवलेले सुट हिंडत असल्याच्या जोरावर तो कापड फाडल्यासारखे इंग्रजी फाडत होता. मी त्याच्याशी हिंदी बोलत असूनही त्याने इंग्रजी आवरले नाही. अर्थात माझे हिंदी त्याच्या इंग्रजीइतकेच बिन अस्तराचे होते हा भाग निराळा ! तीसरी गोष्ट म्हणजे त्याने प्रथम मापाला हात घालण्याऎवजी लंडनला आपले सूट अनेकांनी काय काय अभिप्राय व्यक्त केले आणि पिकॅडिली. सर्कसवाले शिंपीदेखील आपण शिवलेला सूट घातलेल्या हिंदी तरुणांना वाटेत अडवून शिंप्याचे नाव कसे विचारतात इत्यादी गोष्टी काही कारण नसताना सांगितल्या. (अनुभंवाती हे खोटे ठरले.) मी त्याचा सूट घालून पिकॅडीच्या शिंप्याचा दुकानांपुढून अनेक वेळा गेलो! मला फक्त त्याने शिवलेला काळा जोधपुरी कोट घालून जाताना एका गोऱ्या कामगाराने काळा पाद्री समजून हॅट काढून नमस्कार केला! मापे घेताना तर ह्या विलायती सुटाच्या तज्ज्ञाने माझे खांदे कसे वाकडे आहेत, (असतील, पण हे सांगण्याची गरज काय होती?) माझे पोट व छाती एकाच मापाची कशी आहे, माझ्या मानेला ‘शेप’ कसा नाही व चालताना माझ्या त्या शेप नसलेल्या मानेला पोक कसे येते, वगैरे फालतू परिक्षणे केली. अनेक वेळा मला ‘ट्रायल’ला बोलावले. इंग्रजीत गुन्हेगाराच्या चौकशीला ‘ट्रायल’ हाच शब्द का वापरतात हे मला इतक्या वर्षानंतर ह्या शिंपीदादाच्या दुकानात कळले. प्रत्येक ‘ट्रायल’ म्हणजे ट्रायलच होती. दर वेळी तो माझ्या अंगावर काही ठिगळे चढवी आणि ‘नो नो, युवर ट्मी ! ओ ---- युवर लेफ्ट शोल्डर शॉर्टर दॅन राइट...’ असे पुटपुटून माझ्या अंगावर आपल्या हातातल्या खडुने रेघोट्य़ा ओढी !
शेवटी एकदाचा सूट झाला. तो मी अंगावर चढवून अपराध्यासारखा त्याच्यापुढे उभा राहिलो आणि.... ‘तुमचे सगळे डिफेक्टस मी खुबीने झाकले आहेत; आता खूशाल हा सूट घालून लंडनमध्ये फिरा तुम्हाला मरण नाही’--- असा निकाल देऊन जवळजवळ अर्धसहस्त्र रुपयांनी माझा जुना खिसा रिकामा केल्यावर त्याच्या आत्याची शांती झाली आणि एकदाचा मी ‘सुट’लो.
--(अपूर्वाई)
0 प्रतिक्रिया:
Post a Comment