Tuesday, May 29, 2007

रंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)

"रंग माझा वेगळा" ह्या सुरेश भटांच्या गाजलेल्या कवितासंग्रहाला पुलंचे प्रास्ताविक लाभले होते.
http://www.sureshbhat.in/node/19
--विश्वस्त


----------------------------------------------------

सुरेश भटांची कविता एके दिवशी मला अचानक भेटली. आणि नवकवितेच्या या जमान्यात नुसत्या निरनिराळया रंगांचेच नव्हे, तर निराळ्या अंतरंगाचे दर्शन घडले. त्या कवितेचा बाज आणि साज हा सर्वस्वी निराळा नव्हता. पण प्रसादगुणाशी फरकत घेतलेल्या आधुनिक कवितेच्या युगात या हृदयीचे त्या हृदयी घातल्यासारखी ही कविता एकदम मनात शिरली. मुंबईच्या जीवघेण्या उकाड्यात राहणाऱ्या माणसाच्या अंगावरून दैवयोगाने किंवा निर्सगाच्या एखाद्या चमत्कारामुळे दक्षिण वायूची शीतल झुळुक जावी, तशी ही कविता अंगावरून गेली. या कवितेतले फुललेपण मोहक होते. कळ उमटवून जाण्याची तिची ताकद ही मोठी होती. आणि त्या कवितेत सुगंधासारखे गाणे दडलेले होते. हे गाणे अंगभूत होते. कुणीतरी गायल्यामुळे त्या कवितेचे गाणे झाले नव्हते. कवितेला गाण्याची सक्ती नसावी. तशी तिला कसलीच सक्ती नसावी. किंबहुना, आजकाल कानावर जी गीते पडतात ती तर बळजबरीने सुरांच्या चरकातून पिळून काढल्यासारखी वाटतात. त्या गीतांना गात गात हिंडण्याची अंतरी ओढ नसते. ते शब्द सुरांसाठी तहानलेले नसतात. त्यांत सूर कोंदलेले नसतात. कोंबलेले असतात. गीतात सुरांतून उमटण्याचा अपरिहार्यपणा असावा लागतो. त्याउलट काही कविता अत्यंत समंजसपणाने गाण्यापासून आपण होऊन दूर राहिलेल्या असतात.त्यांचे व्यक्तिमत्त्वच असे असते की, सुरांचा त्यांना नुसता भार व्हावा. चांगली नवकविता अशी जाणूनबुजून गाण्यापासून दूर राहिली. तिच्या स्वभावातच गाणे नव्हते. तरीही ती कविता असते. गाणे आणि कविता यांचे अतूट नाते नाही. जसे प्रासनुप्रास किंवा यमक यांचे नाही तसेच. पण म्हणून गाणे होऊन प्रकटणार्‍या कवितेचे दिवस संपले असे मानू नये किंवा गाणे होऊन प्रगटल्यामुळे तिचा दर्जा दुय्यम झाला अशाही गैरसमजात राहू नये.

एक काळ असा होता, की कविता कानावाटेच मनात शिरायची, कवी कविता गाऊन दाखवीत. मुद्रणकला आली आणि कवितेचा छापील ठसा डोळ्यापुढे येऊ लागला. ती आता मूकपणाने डोळ्यावाटे मनात शिरू लागली. मनातल्यामनात कविता वाचायची पद्धत तशी अलीकडली. ठशातून कागदावर उमटणार्‍या अक्षरांमुळे तोडांतून उमटणा-या नादातून होणारा संस्कार नाहीसा झाला. एका परिमाणाची वजाबाकी झाली. हे उणेपण घालवण्याचा र. कृ. जोशी यांच्यासारख्या कवीने त्या अक्षरांना चित्ररूप देऊन प्रयत्न केला. गीतांनी सुरांतून उमटावे तसे त्यांच्या कवितांना त्यांनी चित्राक्षरातून उमटवण्याचा प्रयत्न केला. जोशी चित्रकार असल्यामुळे त्यांनी मोठ्या सहजतेने चित्ररूपातून कविता प्रगटवली. भटांची कविता गाता येते. ते काही गायनकलापारंगत गायक नाहीत. पण अंतःकरणात मात्र सुरांचा झरा आहे. एका अर्थी ते भारतीय संगीतकलेचा पध्दतशीर अभ्यास केलेले गायक नाहीत हे चांगले आहे. अजाणतेपणे काही सूर त्यांच्या मनात वसतीला उतरतात. फुलाला चित्रकलेचा डिप्लोमा असावा लागत नाही. ज्या मातीतून ते रूजून फुलते तिथेच ते रंग दडलेले असतात. भटांच्या मनोभूमीत निसर्गतःच सूर दडलेले आहेत. ज्यांची कविता अशीच गात गात फुटते असे माझ्या आवडीचे बा.भ.बोरकर हे कवी आहेत. हा पिंडाचा धर्म आहे. पु.शि.रेग्यांना भेटणारे शब्द जसे फुलपाखरांसारखे त्यांच्या अवतीभवती हिंडत असल्यासारखे वाटतात, तसे सुरेश भटांच्या भोवती सूर हिंडत असावेत. मनात फुलत जाण्या-या कवितेने या सुरांच्या गळ्यात गळा घालून केव्हा गायला सुरवात केली, हे सुरेश भटांनाही कळत नसावे. म्हणूनच त्यांच्या गीतांना चाली देणार्‍या संगीत दिग्दर्शकंच्या गुणवत्तेविषयी मला आदर असूनही सुरेश भट त्या गीताबरोबर जन्माला आलेल्या चालीत जेव्हा आपली कविता गाऊ लागतात त्यावेळी ते गीत आणि गाणे एक होऊन जाते. कुणीही कुणावर मात करण्यासाठी येत नाही. वरपांगी अत्यंत अस्ताव्यस्त दिसणारा हा कवी, त्यातही ती कविता आणि त्याचे ते गाणे हे तिन्ही घटक त्या कवितेच्या संपूर्ण आस्वादाला आवश्यक असावेत असे वाटायला लागते. हे एक विलक्षण अद्वैत आहे.

सुरेश भटांना गझलेचे फार मोठे आकर्षण आहे. कारण 'गझल' हे केवळ वृत्त नसून ती एक वृती आहे. एव्हढेच नव्हे; तर तिच्यात एक सूक्ष्म आणि सुंदर निवृतीही आहे. स्वार्थाच्या बाजारात धडपडण्याला आपण चुकीने प्रवृती मानीत आलो आहोत.क्षणभर निवृत्त मनाने जगाकडे पाहता आल्याशिवाय खरी या प्रवृत्तीची गोडी कळत नाही. जीवनात नुसतेच चार उंदीर उड्या मारीत धावत सुटणे म्हणजे प्रवृत्त जीवन जगणे नव्हे. निव्वळ जगण्यासाठी म्हणून करावी लागणारी धावपळ कुणाला सुटली आहे? पण काही क्षण त्या धावपळीचा अन्वयार्थ लावण्यासाठी काढावे लागतात. असा एखादा क्षण कवितेला जन्म देऊन जातो. त्यातूनच मग आजूबाजूच्या दगडधोंड्यांच्या पलीकडे दिसायला लागते. न कळत ते पहात राहण्याचा, शोधत राहण्याचा छंद जडतो. आणि मग आपले नाते निराळ्याच ठिकाणी जडते. बिलंदरपणाने जगणार्‍या माणसांत असा माणूस कलंदर ठरतो. ही कलंदरी सहजसाध्य नसते किंवा तिचे सोंगही आणून भागत नाही. ती अनुभूती जेव्हा कवितेतून उमटते, त्यावेळी तिचा अस्सलपणा आणि नकलपणा बरोबर ओळखता येतो.

सुरेश भट जेव्हा ' मागता न आले म्हणुनी राहीलो भिकारी' म्हणतात, त्यावेळी त्या न मागण्याच्या वृत्तीमुळे लाभलेली श्रीमंती त्यांना गवसली आहे हे उमजते. लाचारांचा आचारधर्म पाळला नाही म्हणून त्यांना दु:ख नाही, तर अपार आनंद आहे. आणि सुरेश भटांशी ज्यांचा परिचय आहे त्यांना त्यांच्या फाटक्या खिशाचा हेवा वाटावा अशी वस्तुस्थिती आहे. कवीचे काव्य आणि त्याचे खाजगी जीवन यांची सांगड घालायचा कुणी आग्रह धरू नये. माणूस चोवीस तास एकच भाववृत्ती घेऊन जगत नसतो. काव्यातल्या कलंदरीचा, सौंदर्याचा, चांगल्या आनंदाचा ध्यास प्रत्यक्ष जीवनात घेऊन जगणारा कवी भेटला की अधिक आनंद वाटतो एवढेच. निखळ साहित्य समीक्षेत 'सुरेश भटांची कविता' एवढाच चर्चेचा विषय असावा. माझ्या सुदैवाने मला सुरेश भटांचा स्नेह लाभला. त्यामुळे त्यांची कविता ऐकताना आणि वाचताना सुरेश भट नावचा एक मस्त माणूस मला निराळा काढता येत नाही, ही एक वैयक्तिक मर्यादा मानवी.

सुरेश भटांचा हा कलंदरपणा लोभसवाणा आहे. कारण कवितेइतकेच त्यांचे कविता ऐकणार्‍यांवर म्हणजे जीवनातल्या व्यवहारी धडपडीपलीकडे काही पाहू इच्छिणार्‍यांवर, ते जाणून घेण्याची तळमळ असणार्‍यांवर प्रेम आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी काव्य गायनाच्या कार्यक्रमातून ते ज्या तबियतीने विदग्ध समाजापुढे आपली कविता गातात, तितक्याच मस्तपणाने उमरावतीतल्या रिक्षेवाल्यांच्या अड्ड्यांवरही गातात. रसिकांच्या मळ्यांना पडणारी कुंपणेही त्यांच्या मनाला पटत नाहीत. तशी ही उर्दू शायरीची खास परंपरा आहे. गावात मुशायरा असला की, उर्दू शायरीच्या सर्व थरांतल्या शौकिनांची तिकडे झुंबड उडते. हा हा म्हणता गावातला तहसीलदार आणि टांगेवाला मैफिलीतले मानिंद होऊन बसतात.

सुरेश भटांच्या कवितेत पंडित-अपंडित दोघांना हलवण्याचे सामर्थ्य आहे. गझलेमध्ये नाट्याचा मोठा अंश असतो, तसे या गीतप्रकाराचे नाटकातल्या स्वगताशी फार जवळचे नाते आहे.एखादी अकल्पित कलाटणी श्रोत्यांना मजेदार धक्का देऊन जाते. गीतातल्या ओळींच्या डहाळ्यांना अनपेक्षित रीतीने मिळणारे झोके धुंदी आणत असतात. शब्दचमत्कृती असते. कल्पनांचे बेभान उड्डाण असते. सुरेश भटांच्या गझलांमधून उर्दू शायरीशी नाते जुळवणार्‍या अशा गोष्टी आढळतात. पण उर्दू शायरीत जी कित्येकदा शब्दांची आतषबाजी कवितेला गुदमरवून टाकते ते प्रकार त्यांच्या कवितेत होत नाही. उगीचच उर्दू-फारसी शब्दांची पेरणी करून आपल्या कवितेला गझलेच्या बाह्यांगाशी जुळवले नाही. आकर्षण वाढवायला त्यांनी उगाचच उर्दू भाषेचा सुरमा घालून आपली गझल नटवली नाही. अशा प्रकारे उर्दू शेरोशायरीची नक्कल करणारी गीते आणि शेर मराठीत लिहिले गेले आहेत. असल्या फारसी-उर्दू पोशाखाची सुरेश भटांना गरज वाटली नाही. कारण ज्या अनुभूतीतीने त्यांची कविता उमलते त्या अनुभूतीशी इमान ठेवणे त्यांनी महत्त्वाचे मानले. मानले म्हणण्यापेक्षा ती वृत्तीच त्यांच्या मनातून गझल उमटवीत आली. मराठीत माधव ज्युलियनांच्या नंतर लुप्त होत गेलेल्या या काव्यप्रकाराचा जीर्णोध्दार करावा, हा हेतू कधीही नव्हता. एक तर कुठलाही काव्यप्रकार रूढ करावा असा संकल्प सोडून कविता रचणार्‍या कवीविषयी मला चिंताच वाटत असते. मग तो वृत्तात लिहिणारा असो की मुक्तछंदात! कवितेने जन्माला येताना आपला छंद,वृत्त, जाती जे काही असेल ते घेऊन प्रगट व्हावे. इथे प्रश्न असतो तो मनात उत्कटत्वाने काय सलते आहे याचा! आत खळबळ कसली उडाली आहे हे महत्त्वाचे. सहजतेने उमटलेल्या शार्दुलविक्रीडिताला हट्टाने रचलेल्या मुक्तछंदापेक्षा जुनेपणाचा शेरा मारून खाली ढकलण्याचे कारण नाही. वाल्मिकीचा शोक मंदाक्रांतेतून न प्रकटता अनुष्टुभातून का प्रकटला याला कारण नाही. आणि कालिदासाच्या यक्षाचा विरह अनुष्टुभातून न प्रकटता मंदाक्रांतेतून आला म्हणून काही बिघडले नाही! कवीच्या अंतःकरणातून उमटलेल्या वेदनेची प्रत आपल्याला जाणवली कशी हे महत्त्वाचे! दुबळ्या हाती तलवार आली म्हणून त्याला शूर म्हणू नये, तसे समर्थहाती लेखणी आली म्हणून सामर्थ्य उणे मानू नये.

आपल्याला जे जाणवले ते अधिकाधिक लोकांना जाणवावे, ही भटांची ओढ मला मोलाची वाटते. त्यांची कविता दुर्बोधतेकडे झुकत नाही. ती कविता ज्या असंख्य हृदयात ओतावी त्या हृदयांची संख्या ते कुठल्याही अटींनी मर्यादित करीत नाहीत. ' साधीसुधी ही माणसे माझ्या कवित्वाची धनी' असे ते केवळ उपचार म्हणून म्हणत नाहीत. त्या साध्यासुधा माणसाशी साधायच्या संवादाचे मोल मोठे वाटते. एकच तुकारम किंवा एकच गालिब अनपढांपासून ते पंडितांपर्यंत सर्व थरांतल्या आणि सर्व दर्जांच्या बुध्दिमत्तेच्या आस्वादकांना नाना प्रकारांनी भेटत असतो.तो प्रकार कुठला असेना, पण त्यातले काहीतरी जाणवल्याशिवाय त्या कवितेशी संवादच सुरु होत नाही. कवितेतली दुर्बोधता सापेक्ष मानली तरी सुबोधता हा दुर्गुण मानायला नको. वनस्पतिशास्त्रज्ञाला चारचौघांपेक्षा फूल अधिक कळत असेल, पण त्याचे रंग आणि गंध प्रथम सामान्य माणसासारखे त्याला आकर्षित करत नाहीत असे थोडेच आहे?

सुरेश भटांची कविता आजच्या नवकवितेच्या एका निराळ्या वातावरणातही आपले अंगभूत सौंदर्य घेऊन प्रगटली आहे. नाना प्रकारच्या भाववृत्तींचा इथे फुलोरा आहे. 'निराशेचा गाव आंदण आम्हासी' म्हणणा-या संतांची निराशाही त्यांच्या कवितेतून दिसते. अशा एका क्षणी तेही

'भोवताली हिंडती ही माणसे प्रेतांपरी।
काय ह्या गावातसुध्दा एकदा होती घरे?'

असा उदास करणारा प्रश्न विचारीत येतात. असा प्रश्न काय त्यांना एकट्यालाच पडतो? जगताना आपल्या संवेदना बोथट होऊ न देता जगणा-या सगळ्यांनाच आज पडणारा हा प्रश्न आहे. मुंबईसारख्या विराटपुरीत राहणा-या माणसाला भोवतालचे दैन्यदु:ख पाहण्याचे टाळत टाळत जगावे लागते. एखाद्या क्षणी स्वत:चे डोळे असून न पाहता आणि कान असून न ऐकता कंठावे लागणारे जिणे आठवले की, त्या हिंडणा-या प्रेतातले आपणही एक आहोत याची जाणीव होते. त्या प्रश्नाला लाभलेले काव्यरूप त्यालाही अधिक उत्कटतेने अस्वस्थ करून जाते. असले नाना प्रकारच्या भावनांचे तरंग उठवणे हेच कलेचे कार्य असते. ते तरंग आहार-निद्रा-भय-मैथुनाच्या पलीकडच्या जीवनाचे स्मरण देऊन जातात. चांगले साहित्य माणसाला अंतर्मुख करते. ज्या गलबल्यात आपल्याला जावे लागते त्यातून दूर पळून जाणा-या माणसाची सुटका नाही. त्यात पुरुषार्थही नाही. सुरेश भटांची वृत्ती पळून जाणा-यांतली नाही. जगताजगता क्षणभर त्रयस्थ होणा-याची आहे. जीवनाच्या नाटकात भूमिका करताकरता क्षणभर प्रेक्षक होणा-याची आहे. खेळताखेळता तो आपलाच खेळ पाहणा-याची आहे. कलावंताचे 'स्व'-तंत्रपण ते हेच! ही वृत्ती, ' गुंतुनी गुंत्यात सार्‍या, पाय माझा मोकळा' ह्या ओळीत भटांनी व्यक्त केली आहे. जीवनाच्या ह्या खेळाचा कुणी अर्थ काढू नये. तसा त्याला स्वत:चा असा अर्थ नाही. पण खेळाचा आनंद आहे. जिंकण्या-हारण्याचे सुखदु:ख आहे. कधी नाजूक बंधने आहेत. त्या बंधनात गुंतणे आहे. त्यातून सुटणे आहे. तुटणे आहे. हे सारे माणसाने निर्माण केले आहे. पण हा सारा खेळ आहे याची जाणीव ठेऊन जगणे ह्या लेकुरंच्या गोष्टी नव्हेत! सुरेश भटांची कविता वाचताना आनंद वाटतो तो या खेळात आपल्याला पडणारे प्रश्न त्यांच्या कवितेतून नेमके शब्दरूप लेवून प्रकटताना, अर्थात नित्य व्यवहारातल्या प्रश्नांपलीकडले प्रश्नही सगळ्यांनाच पडतात असे नाही. सुरेश भटांनी विचारलेला ' हे खरे ही ते खरे?' हा प्रश्न सनातन आहे. जीवनाच्या या विराट स्वरूपाकडे क्षणभर थबकून पाहण्याची बुध्दी होणा-यांना हा प्रश्न नेहमीच पडतो. सुरेश भटांसारख्या प्रतिभावंत कवीला हा प्रश्न पडलेला पाहून अशा लोकांना त्या कवीशी अधिक जवळीक साधल्याचा आनंद होतो. जीवनात गवसलेल्या आत्मसंतोषापेक्षा न गवसल्याच्या रुखरुखीतूनच काव्य जन्माला येते.
ही अलौकिक रुखरुखच काव्यनिर्मितीमागली मुख्य प्रेरणा असते. कुणी ती शब्दांच्या चिमटीत पकडू पाहतो, कुणी रंगरेषांतून धरू लागतो. हे वेड गतानुगतिकतेतून जाणा-याला कळत नाही. आणि कळत नाही म्हणून रुचत नाही मग :

'हालती पालीपरी ह्या जिभा
सारखी माझ्यावरी थुंकी उडे!'

हा अनुभव कलावंताला भोगावा लागतो. गडकर्‍यांनी जिला दीड वितीची दुनिया म्हटले आहे, तिच्यातच सगळ्यांना जगायचे आहे. पण त्या दुनियेतही कुणाच्या तरी डोळ्यातले चांदणे वेचण्याचे क्षण लाभलेले असतात. त्याच दुनियेत ' अमृतमय मी, अमृतमय तू, तनमन अमृत बनते ग' असा अनुभव लाभतो. सुरेश भटांच्या 'दिवंगताच्या गीता'तली ही ओळ मला फार महत्त्वाची वाटली. तसा तो आला नसता, नव्हे तो येत असतो याची जाणीव सुरेश भटांच्या काव्यातून उमटली नसती, तर त्यांच्या करुण गाण्याची रडगाणी झाली असती. त्यांची कविता ही एक कारुण्य जोपासण्याचा किंवा अश्रूंची आरास मांडण्याचा षौक झाला असता.

ही जाणीव आहे म्हणूनच सुरेश भट हे केवळ वैयक्तिक सुखदु:खाच्या अनुभूतींना फुंकर घालीत बसणारे कवी नाहीत. आजच्या समाजातले रगडणारे आणि रगडले जाणारे ह्या द्वंद्वाची त्यांना जाणीव आहे. 'तसू तसू दु:खे घेऊन जोजवीत बसणा-यांची आत्मवंचना ज्याची त्याला गाडणार आहे', यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांचे गीत हे त्यांची वैयक्तिक दु:खे गात फुटावे असे त्यांना वाटत नाही. त्या गीतात 'दु:ख संतांचे भिनावे' अशी त्यांना ओढ आहे. असल्या व्यापक दु:खाची जाणीवच कवीला ख-या अर्थाने 'कवी' ही पदवी प्राप्त करून देत असते. समान दु:खांच्या अनुभूतीतून माणूस माणसाच्या अधिक जवळ येतो. त्यांनी
तुकारामाला उद्देशून-

'तुझे दु:ख तुझे नाही
तुझे दु:ख अमचे आहे!'

असे म्हटले आहे. सुरेश भटांची कविता वाचताना त्यातल्या दु:खाच्या अनुभूती आस्वादकालाही आपल्या वाटतात. संवाद सुरू होतो. इथेच भटांचे यश आहे. मराठी कवितेच्या प्रांतात भटांना असली आपुलकी आजही लाभली आहे. यापुढे हा आप्तवर्ग खूप वाढेल अशी प्रसादचिन्हे आहेत.
'हाय तरीही बाजारी माझी तोकडी पुण्याई नाही अजून तेवढी माझ्या शब्दांना कल्हई'
असे जेव्हा सुरेश भट म्हणतात तेव्हा त्यातला उपरोध लक्षात घ्यायला हवा. ही भटांची तक्रार मानू नये! पितळ उघडे पडण्याची भीती असणार्‍यांना कल्हईची गरज पडावी! इथला सुवर्णकण बावनकशी आहे!

'माझीया मस्तीत मी जाई पुढे
मात्र बाजारु कवाडे लावती !'

बाजारू कवाडे लावली तरी आज अनेक अंत:करणांची कवाडे सुरेश भटांच्या कवितांसाठी उघडली गेली आहेत. आणखीही उघडली जाणारच आहेत. दीड वीत छातीच्या माणसांनादेखील आपल्या छातीची रुंदी आणखी खूप वाढावी अशी ओढ नसते असे आपण का मानावे? तसा एखादा क्षण येऊन त्या चातकाने चोच वासली तर त्या चोचीत धार टाकण्याचे काम कवीलाच करावे लागेल, ह्याची जाणीवही भटांना आहे. म्हणूनच ते वैयक्तिक अहंकाराने नव्हे, तर जो 'अमृताचा वसा' त्यांनी हाती धरला आहे त्यामागच्या कर्तव्याच्या जबाबदारीने म्हणतात की, ' आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे!' त्या उद्याची वाट न पाहता त्यांची गीते आजच लोक गाऊ लागले आहेत. काहीतरी मनात शिरल्याखेरीज कोण कशाला गाईल? आणि अशी कानातून किंवा डोळ्यांतून मनात शिरलेली गीते कधी व्यर्थ का असतात?

दुनियेतील बाजारू कवाडे नाहीशी करण्याचे सामर्थ्य आणि दु:खाचे देखणेपण पाहण्याची ताकद असल्या गाण्यातूनच मिळत असते!
- पु.ल.देशपांडे.

Saturday, May 19, 2007

पुलोपदेशडॉ. श्रीरंग आडारकर यांचे चिरंजीव अशोक आडारकर यांना त्यांच्या विवाहानिमित्त पु. ल. देशपांडे यांनी पाठविलेले पत्र...

पु. ल. देशपांडे,
१, रुपाली, ७७७, शिवाजी नगर, पुणे - ४.

८ जून १९८० प्रिय अशोक आजचा दिवस तुझ्या आणी कोमलच्या आयुष्यात सर्वात महत्वाचा. सुमारे चौतीस वर्षांपूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्वाचा दिवस माझ्या आणी तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता. या चौतीस वर्षांच्या अनुभवाच्या आधारावर 'लग्न' या विषयावर तुला चार उपदेशपर गोष्टी सांगाव्या, असं मला वाटतं. वास्तविक लग्न या विषयावर कुणीही कुणालाही उपदेशपर चार शब्द सांगू नये, असा माझा सगळ्यांनाच उपदेश असतो. तरीही यशस्वी संसारासंबंधी चार युक्तीच्या गोष्टी तुला सांगाव्या, असं मला वाटलं. या संबंधात ऑस्कर वाइल्डचे एक वाक्य ध्यानात ठेव. "A Perfect marriage is based on perfect mutual misunderstanding".लग्न हे नवराबायकोच्या एकमेकाविषयी असणा-या संपूर्ण गैरसमजाच्या आधारावरच यशस्वी होत असते. आता माझेच उदाहरण देतो. मी अत्यंत अव्यवस्थित आहे, असा सुनीताचा लग्न झाल्या क्षणापासून आजतागायत गैरसमज आहे. लग्नाच्या रजिस्टरबुकात सही करायला मी खुर्चीवर बसलो, तो नेमका तिथे ठेवलेल्या रजिस्ट्रारच्या ह्यॅटवर. ही गोष्ट खरी आहे. पण मी त्याचा त्या ह्यॅटीवर बसण्यापूर्वीची तिची अवस्था आणि मी बसल्यानंतरची अवस्था यात मला तरी काहीच फरक दिसला नाही. एकदा कुणाच्या तरी चष्म्यावर बसलो होतो, तेव्हा मात्र बसण्यापूर्वीच्या माझ्या लेंग्याच्या आणि काचा घूसू नयेत तिथे घुसल्यावर झालेल्या माझ्या अवस्थेच्या आठवणीने आजही नेमका याच ठिकाणी घाम फुटतो. पण ते जाऊ दे. सांगायची गोष्ट मी अव्यवस्थित असल्याचा सुनीताचा गैरसमज मी अजूनही टिकवून ठेवला आहे. यामुळे मी प्रवासातून परतताना माझा पायजमा, टॉवेल आणि साबणाची वडी या प्रवासात विसरून येण्याच्याच लायकीच्या वस्तू न विसरता विसरून येतो. मग सुनीताला वस्तू हरवल्याचा दु:खापेक्षा 'मी अव्यवस्थित आहे', या तिच्या मताला पुष्टी मिळाल्याचा भयंकर आनंद होतो. आता कोमल ही डॉक्टर असल्यामुळे 'तू प्रकृतीची काळजी घेत नाहीस', असा जर तिचा गैरसमज झाला, तर तो टिकवून ठेव. तुला जरी तू भक्कम आहेस असं वाटत असलं, तरी स्री-दृष्टी हा एक खास प्रकार आहे. या नजरेने पुरुषमाणसाला पाहता येत नाही. तेव्हा तू स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेत नाहीस, रात्रदिंवस हापिसच्या कामाचीच चितां करतोस असा जर कोमलचा समज झाला, तर अधूनमधून खोकला वगैरे काढून तो समज टिकवून ठेव. तिने दिलेली गोळी वगैरे खाऊन टाक. डॉक्टरीण बायकोने केलेल्या गोळीच्या सांबाऱ्यापेक्षा ही गोळी अधिक चवदार असते, असे एका डॉक्टरणीशी लग्न केलेल्या फिजिओथेरापिस्टचे मत आहे. (पुढील सहा महिने मी जसलोकपुढून जाणार नाही!) आता खोकला काढताना या ठिकाणी दुसरी कोणी तरुणी नाही, याची खात्री करून घे. ('तरुणी' हे वय हल्ली ५७-५८ वर्षांपर्यंत नेण्यात आले आहे. कारमायकेल रोडवरून एक चक्कर मारून आल्यावर तुला हे कळेल.)
गाफीलपणाने खोकला काढलास तर 'हा खोकला कुणासाठी काढला होता ते खरं सांगा-?' या प्रश्नाचे उत्तर द्यायची हिंमत बाळगावी लागेल. तेव्हा गैरसमज वाढवत ठेवताना योग्य ती दक्षता घ्यावी.


सुखी संसारात नवऱ्याला स्वत:चे मत नसणे, यासारखे सुख नाही. विशेषत: प्रापचिंक बाबतीत. खोमेनी, सादत, मोशे दायान, अरबी तेलाचा प्रश्न यावर मतभेद चालतील. पण भरलेले पापलेट आणि तळलेले पापलेट यातले अधिक चांगले कुठले? या विषयावर सौ.पक्षाचे मत ऐकून तेच ‚ग्र्याह्य मानावे. बेसावधपणाने कारवारी पद्धतीच्या स्वैपाकावर बोलून जाशील. मुख्य म्हणजे 'राव' या आडनावाचा/ची प्रत्येक व्यक्ती ही असामान्य मानावी. कुठल्या क्षणाची कुठला/ कुठली राव ही वधूपक्षाभ्या नात्यातली निघेल, हे सांगणे अशक्य आहे. मी रवीनद्रनाथाविंषयी नेहमी चांगलेच बोलतो याचे खरे कारण यांचे आडनाव 'ठाकूर' आहे हे तुला म्हणून सांगतो. राव या आडनावाप्रमाणे 'बोरकर' या आडनावाविषयीही सावध असावे. जरा अधिक सावध. बोलताना बारीक सारीक गोष्टींना जपावं लागतं. संसार म्हणजे खायची गोष्ट नाही. (बायकोच्या हातचे जेवण सोडून. ते खावेच लागते.) उदाहरणरार्थ, 'मीसुद्धा मनात आणले असते, तर डॉक्टर झालो असतो,' हे वाक्य चुकूनही उच्चारू नये. उलट, 'बापरे! डॉक्टर होणं आपल्याला जमलं नसतं. याला तुझ्यासारखी निराळीच बुद्धिमत्ता लागते,' हे वाक्य दर महिन्याला पगाराच्या दिवशी वधूपक्षाला ऐकवीत जावे. म्हणजे त्या आनंदात शॉपिंगचा बेत रद्द होण्याची शक्यता आहे. तुला एकूण Medical Professionविषयी जपूनच बोलावं लागेल. वधूपक्षातले तीन विरुद्ध तू एक या सामन्यात तुझ्या कराटेच उपयोग नाही. शिवाय कराटेमुळे विटा फोडता आल्या, तरी मते फोडता येत नाहीत. यामुळे MedicalProfessionसंबंधी उगीचच मतभेद व्यक्त करणे टाळावे. तुझ्या Technologyबद्दल घरात एक अक्षर न काढणे बरे. फारच कोणी वखुपक्षीयांनी सख्या काय चाललंय वगैरे विचारलं, तर सात-आठ टेक्नीकल शब्द घालून एक वाक्य फेक. (यापूर्वी विचारणारा तुझ्या विषयातला नाही, याची खात्री करून घे!) म्हणजे तू तुझ्या विषयातल्या जगातल्या पाच शास्रज्ञांपैकी एक आहेस, हा समज (गैरसमज म्हणत नाही!) पक्का होईल. आणिDiamond Shamrockमधला तूच काय तो डायमंड आणि इतर सगळे Shamकिंवा निर्बुद्धrockहा समज वाढीला लागून घरात इज्जत वाढेल.

कोमलच्या गृहप्रवेशानंतर तुमच्या घरातली स्री-मतदारांची संख्या एका आकड्याने वाढत आहे, हे विसरू नये. भरतचा मुक्काम कुठल्या तरी अज्ञात कारणाने अमेरिकेत लांबत चालल्यामुळे तू आणि आमचे परममित्र बाबूराव (अख्यक्ष शेणवी सहकारी पेढी) विरुद्ध मालती, पुन्नी, कोमल असे गव्हर्मेंट आहे. तेव्हा काही दिवस तरी 'पंजा'चे राज्य आहे हे विसरू नये. आणि घरात सतत होणा-या 'शॉपिंगला' उगीचच विरोध न करता बाजारातून जे जे काही म्हणून घरात विकत आणले जाईल,याचे ''अरे वा!'', ''छान!'', ' O Wonderful!'' अशा शब्दांनी स्वागत करावे. बाहेर जाताना 'ही साडी नेसू का?' हा पत्नीचा प्रश्न पतीने उत्तर द्यावे म्हणून विचारलेला नसतो. व्याकरणदृष्ट्या हा प्रश्न असला, तरी कौटुबिंक व्याकरणात ते एक 'मी ही साडी नेसणार आहे' असं Firm Statementअसते. या प्रश्नाला खूप निरखून पाहिल्याचा (साडीकडे) अभिनय करून- वा! हूंss! - हो हो -, छान - फार तर Fantastic Idea, असे प्रसंग पाहून आवाज काढावे. अगर 'ही नेसतेस?' - अच्छा वगैरे डायलॉग म्हणावा. कृपा करून 'कुठलीही नेस. कोण बघतंय' यासारखी वाक्यं ओठाशी आली, तरी गिळून टाकावी. या बाबतीत आपल्या राष्ट्रपतींचा आदर्श मानावा. प्रधानमंत्रीजींकडून सूचना आली की लगेच agreedम्हणून सही. राष्ट्रपतींचे हे धोरण सर्वसामान्य पतींनीही स्वीकारावे. उलट पार्टीला वगैरे जाताना 'यातला कुठला बुशशर्ट घालू? तुझा Choiceनेहमीच फसक्लास असतो - वगैरे वाक्यं टाकावी. माझ्या Choiceपेक्षा तुझा Choiceचांगला असतो, या वाक्यातली अंदरकी बात मात्र वधूपक्षाच्या लक्षात येणार नाही, याची खात्री बाळगावी. नाहीतर 'कळतात ही बोलणी ...' हे वेदाइतकं जुनं वाक्य ऐकावं लागेल. मग यानंतरच्या प्रत्येक प्रश्नाला 'मला नाही माहीत' हे उत्तर. शेवटी प्रचंड महत्वाची गोष्ट. सौ.च्या वाढदिवसाची तारीख विसरू नये. एक वेळ ऑफिसात जाताना पॅण्ट घालायला विसरलास तरी चालेल. पण बायकोची जन्मतारीख विसरणाच्या गुन्ह्याला क्षमा नाही. इमानी नवरे हा वाढदिवस निरनिराळ्या रीतीने साजरा करतात. presentsसुद्धा देतात. पण इतर कुठल्याही Presentपेक्षा या दिवशी नवऱ्याने ऑफिसला absentराहण्यासारखे दुसरे Presentनाही. कांदेनवमीला जसे आपल्याला कांदा आवडला नाही, तरी धार्मिक भावनेने कांदा खातात, तसे बायकोच्या वाढदिवसाला आपल्याला एरवी, ज्यांना निर्मनुष्य बेटावर भेटले तरी टाळावे असे वाटते - तसल्या, बायकोच्या तमाम नातेवाईकांना, काहींना दुपारी आणि काहींना रात्री जेवायला बोलावण्याचा बायकोला आग्रह करावा, असे एका तज्ञ पतीचं मत आहे. म्हणजे आपण सुटी घेऊन घरी राहिलो म्हणून बायको खुश. बरं तिच्याच नातलगांना गिळायला बोलावल्यामुळे ती दिवसभर स्वैपाकघरात. घरात तिचेच नातलग आणि यांची प्रजा. घरातली काचेची भांडी या बालकांच्या सहज हाती लागतील, अशा जागी ठेवावी. भावाच्या किंवा बहिणिच्या मुलांनीच ती फोडल्यामुळे सौ.चा 'आवाज' बंद. आपणही हा मोका साधून - अहो - मुलंच ती - करणारच मस्ती. वगैरे बोलावं. आणि मेहुणे-मेव्हण्या वगैरेंच्या मुलांना सहज फोडता येतील किंवा सांडता येतील अशा वस्तू यांना दिसतील अशा ठिकाणी ठेवाव्यात. फक्त जिथे आपला टेपरेकॉर्डर, डिक्स वगैरे असतात, या खोलीतल्या विजेच्या बटणांना शॉक येतो असे सांगून ती खोली बंद ठेवावी. मी केलेल्या उपदेशातला बाकीचा सर्व उपदेश विसरलास तरी चालेल, पण बायकोचा वाढदिवस विसरू नकोस. वाढदिवस कितवा, याला महत्वाचा नाही. त्रिलोकरशेट या माझ्या परममित्राला आपल्या बायकोच्या वाढदिवसाचा विसर पडला, ती हकीकत यांनी मला सागिंतली, तशी तुला सांगतो. ऐक. ''सालं काय सांगू तुला, अरे वाईफचा बर्थ डे. टोटली फरगॉट, जी भडकली. सालं विचारू नको. एकदम नो टॉक. बरं, साली बायको अशी टॉकीच्याबद्दल सायलेंट फिल्म होऊन बसली की, आपण तोंड बंद ठेवतो. - जी भडकली - जी भडकली - मी ब्रेकफासला काय आहे विचारल्यावर टीपॉयवरची दाताची कवळीच तिनी काढून खिडकीतून भायेर फेकून दिली. साली टू-थर्टिफाइव रुपीज टिकवून तळपदे डेंटिसकडून आणलेली कवळी भाई जीवनजी लेनवर, साले बत्तीसच्या बत्तीस दात पसरले. आणि साला जोक सांगतो तुला. कवळी फेकली ती माझी समजून तिची स्वत:चीच. माझे दात पाण्यानी भरलेल्या बाऊलमधून तिच्याकडे बघून साले काच फुटेपर्यंत हसत होते. मी सालं पटकन माझी कवळी तोंडात घातली - तिचं विदाऊट टूथ तोंड पाह्यल्यावर एकदम साली आमच्या डोळ्यातली ट्यूब पेटली - साला वाईफचा फिफ्टिएट्थ बर्थ डे. कारण बरोबर फिफ्टीसेकंड बर्थडेला मी तिला तळपदे डॉक्टरकडून कवळी बसवली होती. बर्थडेच्या दिवशी कवळी फेकून बसली - मला सालं समजेना, हॅपी बर्थ डे म्हणू का नको म्हणू? तसाच साला चफ्पल घालून निघालो आणि तिला खुश करावं म्हणून तिच्या आवडीचे लाडू घेऊन आलो. तो साला फणसवाडीतला दयाराम मिठायवाला पण अवंग साला. याला धादा वॉर्न करून सागिंतलं - नरम बुंदी. तर या इडियटनी पिशवीत भरून दिले एक डझन कडक बुंदी. साला वाईफच्या तोंडात नाय दात - ती कडक बुंदी काय खाणार कफ्पाळ. साला तिला वाटलं, मी पर्पजली कडक बुंदी आणली. साला तुला सांगतो. तोंडात दात नसताना या वाइफ लोक जेव्हा भडकून बोलतात ना, तो साला साऊंडपण हॉरिबल आणि साईट तर मल्टिफ्लाईड बाय हंड्रेड हॉरिबल. आता मी काय ट्रिक केलीय म्हाईत आहे? साईबाबाच्या फोटोखाली भिंतीवर खिळ्यांनी वाईफची बर्थ डेट कोरून ठेवली आहे. साल्या दाताच्या कवळ्या म्हाग किती झाल्यायेत म्हाइत नाय तुला? - करणार काय? मीच इडियट साला. वाईफचा बर्थ डे विसरलो. ''

असो, नवीन लग्न झालेल्या वराचा फार वेळ घेऊ नये. असा वेळ घेणारा माणूस पुढल्या जन्मी गुरखा नाही तर दूधवाला भय्या होतो म्हणतात. पण माझा हा उपदेश पाळणा-यास उत्तम संसारसुख प्राप्त होऊन, ताजे मासे, धनधान्य, संतती, संपत्ती, साखर, मुलांना शाळेत प्रवेश, वह्या, बसमध्ये आणि लोकलमध्ये खिडकीजवळची जागा, टेलिफोनवर हवा तोच नंबर मिळणे वगैरे सर्व गोष्टींचा भरपूर लाभ होवोन संसारात सदैव आनंदी, आनंद नांदेल. तथास्तु.

तुझा
पी. एल. काका

Saturday, May 12, 2007

अधिक खाण्याविषयी थोडंसं - पु.ल.

आजवर अधिक खाण्याविषयी लोकांकडून पुष्कळसं बोलून घेतल्यावर, अधिक खाण्याविषयी मला थोडंसं बोलायला हरकत नाही. 'नकटं व्हाव, पण धाकटं होऊ नये' म्हणतात. त्याच चालीवर 'मठ्ठ व्हावं, पण लठ्ठ होऊ नये'. अशी एखादी म्हण मायबोलीच्या चरणी अर्पण करायला हरकत नाही. जो तो आमचं अन्न काढतो. बहुतेकांची समजूत लठ्ठ्पणाचा अधिक खाण्याविषयी संबंध आहे अशी का व्हावी मला कळत नाही. कमी खाणारा हा विनोदाचा विषय होत नाही. आता हडकुळ्या माणसाला 'पाप्याचं पितर' वगैरे म्हणतात, नाही असं नाही; पण नाटकां सिनेमांत पापी माणसं मात्र चांगली धटिंगण दाखवतात. पापी माणसांचे पितर हडकुळे असतील हा शोध कोणी लावला देव जाणे. मात्र रावण कंस हिरण्यकश्यप वगैरे ख्यातनाम पापी माणसांचे पितर हडकुळे असतील याच्यावर माझा नाही विश्र्वास बसत. सदैव थट्टेचा विषय आहे तो लठ्ठपणा. खंर म्हणजे त्याच्या निषेधार्थ लठ्ठ माणसांची एक भारतीय पातळीवरून संघटना काढली पाहिजे. बाकी लठ्ठ लोकांची कुठल्याही पातळीवरून संघटना काढण्या- ऎवजी जाडीवरूनच काढावी लागेल. हीही एक अडचण आहे. शिवाय भारतीय संघटना म्हणजे आंतरभारतीसारखं 'लठ्ठंभारती' वगैरे नाव यायचं, म्हणजे पुन्हा विनोदच. 

अधिक खाण्याविषयी मुख्य राग म्हणजे त्यातून माणसाचा लठ्ठपणा वाढीला लागतो. ही एक चूक आहे. मी शेकडो बारीक माणसं सपाटून खाताना पाहीली आहेत; पण त्यांच्याविरुद्ध अधिक खाण्याचा सकृद्दर्शनी पुरावा नसतो. कितीही खा, ही माणसं अगं धरतच नाही आणि आमच्यासारखी काही माणसं एवढंसं खाल्ल तरी त्याची पावती अंगावर मोकळेपणी वागवतात.

अधिक खाण्याविषयी जाऊ दे. पण एकूण खाण्याविषयी बोलण्या वरच एकूण शिष्ट मंडळींचा राग असतो. गवय्ये जसे मैफिलीविषयी कुणाचीही पर्वा न करता बोलत असतात, किंबहूना तबलजी तर अमक्या-तमक्या गवय्याला आपण कसा खाल्ला हेही सांगतात, तसे काय खवय्येही बोलू शकणार नाहीत. पण त्यांना मात्र बोलण्याची चोरी, हे खूप आहे! 

अधिक खाण्यामुळं प्रकृती बिघडते, असा एक डॉक्टर, वैद्द वगैरे मंडळीनी आज अनेक वर्ष अपप्रचार चालवला आहे. त्यामागला त्यांचा धूर्त हेतू पुष्कळांच्या लक्षात आलेला दिसत नाही. लोकांनी पोळ्या अधिक खाऊन डॉक्टर, वैद्द वगैरे लोकांना काय फायदा होणार? पोळ्यांऎवजी त्यांच्या औषधाच्या अधिक गोळ्या खाव्या हा त्यांचा सरळ हेतू आहे. त्यात त्यांची चूक काहीच नाही. प्रत्येक जण आपापला माल खपवण्याची धडपड करणारच. पण औषधाच्या गोळ्यांना आपण किती बळी पडावं हे आपण लक्षात घेतलं पाहीजे. 

माणसांच थोडंसं मोटारीसारखं आहे. प्रत्येक गाडीला जसं कमी-जास्त पेट्रोल लागतं, तसचं माणसांचं आहे. माझ्या एका स्नेहाचे आजोबा होते. सकाळी उठल्याबरोबर न्याहरीलाच मुळी त्यांना दोन वाट्या श्रीखंड आणि तीनचार लाडू लागत. एवढा ऎवज सकाळी एकदा पोटात गेला, की त्याच्यावर चांगलं शेरभर धारोष्ण दूध घेत. आणि म्हणत, "चला, आता जेवायला मोकळा झालो." बारा-साडेबारा झाले की भुकेनं व्याकूळ व्हायचे. भोजनाचा तपशील न्याहरीच्या तपशिलाच्या अंदाजानं कुणालाही जेवणाला आधार म्हणून चारच्या सुमाराला चार पदार्थ तोंडात टाकून रात्रीचं जेवण सुर्यास्तापूर्वी घेत आणि शतपावली वगैरे करून चार इकडल्यातिकडल्या गोष्टी झाल्या, की कुठं उकडलेल्या शेंगाबिंगा खाऊन झोपत. झोपण्यापूर्वी लोटीभर दूध घेण्याचं व्रत त्यांनी आजन्म पाळलं वयाच्या ब्यायण्णावाव्या वर्षी ते निजधामाला गेले. आयूष्यात नित्याच्या आहाराप्रमाणे त्यांनी अनेक आघात पचवले. शेवटी शेवटी गेल्या महायुद्धाचा मात्र त्यांच्या मनावर जबरदस्त परिणाम झाला. म्हणजे युद्धात होणा-या हानीबिनीचा नव्हे. रेशनिंगचा माणसांचं खाणं मोजूनमापून मिळणार, ही कल्पनाच त्यांना सहन झाली नाही. तर सांगायचं तात्पर्य, अधिक खाणं यातला 'अधिक' हा शब्दच अधिक आहे. त्या अधिकाला काही अर्थच नाही. मोटरला पेट्रोल अधिक लागतं म्हणण्यापैकी आहे हे. कशापेक्षा अधिक हा प्रश्न महत्वाचा. मोटरला स्कूटरपेक्षा पेट्रोल अधिक लागतं. लागणारच त्यांच्या घडणीतच फरक आहे. जे मोटरचं तेच माणसांचं. 

काही गोष्टी तर अधिक खाल्ल्याच जात नाहीत. उदाहरणार्थ, उकडलेल्या शेंगा. प्रथम ज्या वेळी आपल्यासमोर ती रास आणून एखादी सुगृहिणी-ह्यादेखील माउल्या आता फारशा राहिल्या नाहीत. जाऊ द्या-तर एखादी सुगृहिणी ज्या वेळी उकडलेल्या शेंगाची रास टाकते त्या वेळी " अहो, एवढ्या कोण खाणार आहे?" असाच आवाज उठतो. आणि काही वेळानं "थोड्या उरकल्यात कां ग?" अशी पृच्छा होते. हे कां? खूप खाण्यानं आरोग्य बिघडतं असा एक लोकभ्रम आहे. माझ्या मित्राच्या न्याहरीला श्रीखंड खाण्या-या आजोबांसारखे मी अनेक जिवंत पुरावे सादर करू शकलो असतो: पण पूर्वीच्या खूप खाऊन ऎंशी वर्ष जगणा-या म्हाता-यांसारखे हल्लीचे ऎंशी वर्षाचे म्हातारे राहिले नाहीत. हल्लीच्या म्हाता-यांत काहीच दम नाही. तरूण असल्यासारखे आपली फिगर बिघडेल म्हणून मोजकं खातात. खरं तर खाण्यानं फिगर किंवा आरोग्य काही बिघडत नाही. ज्याला खूप खाता येत नाही त्याला आरोग्य म्हणजे काय ते कळलंच नाही.तळलेले, भाजलेले, पोळलेले, उकडलेले, शिजवलेले, कच्चे असलेही पदार्थ खाऊन जो टूणटुणीत राहतो तो निरोगी माणूस, बशीत असलेला पदार्थ हा खाण्यासाठी असतो, अशी माझ्या एका खवय्या मित्राची व्याख्या आहे. बशीतून येणारी एकच गोष्ट उचलण्याच्या लायकीची नसते असं त्याचं मत आहे. प्याशनेबल हाटेलात बशीतून येणारं बिल त्याला तेवढा तो हात लावत नाही.

गाण्याप्रमाणं खाण्याचंसुद्धा शास्त्र आहे. रागांना वर्ज्यबिर्ज्य स्वर असतात, तसे खाण्यालासुद्धा असतात. उदाहरणार्थ, श्रीखंड घ्या. बाकी, जोपर्यंत मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही तोपर्यंत 'घ्या' म्हणायला माझं काय जातं म्हणा! तर श्रीखंड पावाला लावून खा," म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे. पाव आणि अंड्याचं आमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे. पुरी आणि आमलेट हे एकत्र सुखांन नांदणार नाहीत. जिलबी आणि मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो तसा जिलबी आणि...छे! जिलबीला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही. खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात. तसंच पदार्थाची कुठली गोत्रं जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात. राग्याप्रमाणंच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत. सकाळी यमन बेचव वाटतो. सकाळी थालीपीठही बेचव वाटतं. मारवा राग जसा संधिकालातला, तसंच थालीपीठदेखील साधारणतः भीमपलास आणि पूरिया धनाश्री या रागांच्या वेळांच्या मधे बसतं सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा. आणि संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा. बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत, तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं. सकाळी तीन भजी खाल्ली तरी अधिक. पण बाहेर पाऊस पडतो आहे, हवेत गारवा आहे, रमी किंवा ब्रिजमध्ये आपण जिंकतो आहो, अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत. अधिकचं हे असं आहे. लोक भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी आणि भलतं खातात. हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणि चहाबरोबर भलतंच खातात. हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणि चहावर धुम्रपान केलं पाहिजे. खाण्यापिण्याचंही काही शास्त्र आहे. ह्या भारतात एके काळी हे शास्त्रवेते होते. उपासांच खाणंदेखील शोधून काढणारी ती विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. उपास लागणा-या माणसाइतकीच उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत. लग्नाला पंक्ती, गावजेवणं, समाराधना वगैरेचा तो जमाना होता. 'हरहर महादेव'ही आरोळी रणक्षेत्राप्रमाणं वरणक्षेत्रादेखील उठत असे. माणसं बसल्या बैठकीला शंभर जिलब्या तोंडी लावणं म्हणून उठवत, त्यानंतर आग्रह सुरू होई. सा-या सणांतून खाणे काढून टाका नि काय उरते पाहा. सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे;नव्हे, टिकली आहे. होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षीणच व्हायचा. दिवाळीतून फराळ वगळा, नुसती ओवाळणीची वसुली उरते. संक्रातीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि तिळगूळ आहे तोवर 'गोड गोड बोला' म्हणतील लोक. कोजागिरी पौर्णिमेतनं आटीव केशरी दुध वगळा, उरेल फक्त जागरण आणि कुठल्या तरी सस्त्यात मिळालेल्या उमेदवार गवयाचं गाणं. गणेशचतुर्थीला मोदक नसले तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या? रामनवमीच्या सुंठवडा, कृष्णाष्टमीच्या दहीलाह्या, दत्तापुढले पेढे, मारुतरायापुढलं साधं खोबरं अन, खडीसाखर... सा-या देवांची मदार या खाण्यावर आहे. हेच गाळलं की हल्लीच्या लग्नासारखं व्हायचं. पाहुण्यांचे हात ओले करण्याऎवजी आहेराच्या रूपानं स्वतःचे हात धुवून घेण्याचा कार्यक्रम. पंगती उठवण्याऎवजी कर्कशकर्ण्यातून रेकॉर्डस ऎकवून येणा-याचं डोकं उठवायचं. 

पण हा काळ जाऊन पुन्हा एकदा अधिक खाण्याविषयीचा अनादर दूर होईल याची मला खात्री आहे. समृद्ध राष्ट्र याची माझी व्याख्याच मुळी भरपूर खाऊन भरपूर पचवणारं राष्ट्र ही आहे. माणसं एकदा खाण्यात गुंतली की काही नाही तरी निदान वावदूक बडबडतरी कमी होईल. बोलेल तो खाईल काय? आणि केव्हा? 

"उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" म्हटलंय ते काय उगीच? जठराग्नीला भरपूर आहूती पडल्या पाहिजेत. सध्या जरा ही अन्न-परिस्थितीची लहानशी अडचण आहे म्हणून. नाही तर 'अधिक धान्य पिकवा'सारखी 'अधिक पंक्ती उठवा' ची चळवळ सुरू करायला हरकत नाही. तोपर्यंत खायला मिळतं तेच अधिक म्हणण्या खेरीज गत्यंतर नाही. आजकालचे शेतकरी देखील पूर्वीसारखं लोक भक्कम खात नाहीत म्हणून अधिक धान्य पिकवत नसावेत. तज्ज्ञांनी या मुद्याचा अवश्य विचार करावा ही विनंती.

Thursday, May 3, 2007

पुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले "पु. ल.' - वैभव वझे

"पुलंच्या घरी गेल्यावर त्यांनीच दार उघडलं आणि चक्क मला ओळखलं. त्यामुळे मी पैज जिंकलो...' 

विलेपार्ले येथे राहणारे रत्नाकर खरे ही गोष्ट सांगू लागले आणि त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून "पु. ल." पुन्हा भेटले! 

'पु. लं.'च्या आयुष्यातील महत्त्वाचे दिवस पार्ल्यात गेले. या दिवसांत पुलंच्या बरोबर वावरलेल्या काही जवळच्या कुटुंबांपैकी एक खरे कुटुंबीय. त्यापैकी रत्नाकर खरे यांना "पु. लं.' विषयी विचारले असता त्यांनी सांगितले,  

"पु. ल. आम्हाला बऱ्याच वर्षांनंतर ओळखतील का, याविषयी पैज लागली. पुलंनी जर ओळखले नाही, तर मी सर्वांना आइस्क्रीम द्यायचे असे ठरले होते. पुलंनी माझ्या वडिलांसमवेत (माधव खरे) आम्हाला पाहिले होते. पुण्याला पुलंच्या घरी गेलो. सुदैवाने त्यांनीच दार उघडले आणि एकदम आम्हाला जवळ घेऊन, आमची नावानिशी चौकशी केली. आम्हाला त्याचे फारच अप्रुप वाटले. आम्हाला सर्वांना पुलंनी आत घेतले व माझ्याकडे गाणे म्हणण्याची फर्माईशही केली!'' पुलंचे संगीतप्रेम तर जगजाहीर आहे. त्याबद्दल रत्नाकर खरे म्हणाले, " "त्या वेळी आमच्याकडे ग्रामोफोन होता. पुलंना नवी रेकॉर्ड दिसली की ते आमच्याकडे ती घेऊन येत. मग ग्रामोफोनवर ती ऐकण्याच कार्यक्रम असे. बेगम अख्तर यांची एक तबकडी आमच्याकडे बसून पुलंनी इतक्‍या वेळेला ऐकली, की तेच गमतीने म्हणायचे, "आता मला भीती वाटायला लागलीय, की या तबकडीच्या पाठीमागचेही आपल्याला ऐकू येईल की काय!' ;

पुलंच्या "असा मी असामी'मध्ये सरोज खरे ही व्यक्तिरेखा आहे. हे नाव ज्यांच्यावरून घेतले त्या सरोज रानडे या योगायोगाने पार्ल्यातच भेटल्या. त्यांच्याशी बोलताना खरेच असे जाणवले, की पुलंनी वर्णन केलेल्या सरोज खरे यांच्याशी सरोजताईंचे खूप साम्य आहे. सरोज रानड्यांच्या मते सरोज हे नाव भाईंनी माझ्या नावावरून घेतले व खरे हे आडनाव माधव खरे यांच्यावरून घेतले. सरोजताई व त्यांचे पती शरद रानडे हे ऑस्ट्रेलियात स्थायिक आहेत. पुलंविषयीच्या आठवणी घेऊन सांताक्रूझच्या स्वाती महाजन विवाहानंतर स्वाती लिमये होऊन हैदराबादला गेल्या. स्वातीताई पुलंविषयी सांगू लागल्या, "

"१९८७ मध्ये मी दहावीसाठी त्यागराज क्‍लासेसमध्ये पार्ल्याला जात होते. क्‍लास संपल्यावर आम्ही मुली टंगळमंगळ करत असू. हा क्‍लास नेमका पुलंच्या बगल्यामागेच होता. एकदा माझ्या मैत्रिणीचे लांबसडक केस पुलंच्या बंगल्याच्या कुंपणात अडकले. ती म्हणाली, आता त्या आजोबांच्या शिव्या खाव्या लागणार. पुलंनी बाहेर येऊन पाहिले आणि ते तिला म्हणाले, मुली निसर्गाची देणगी अशी निष्काळजीपणे नाही वापरायची. अशी देणगी फार थोड्या जणींना मिळते. त्यामुळे ती निगुतीने सांभाळायची असते.'' पु.ल. या दोन अक्षरांमध्ये सामावलेल्या एका मोठ्या व्यक्तिमत्त्वाविषयीच्या या काही मनात रेंगाळणाऱ्या आठवणी. अशा आठवणींच्या माध्यमातून पु.ल. आज पुन्हा भेटले; काहीसे अप्रकाशित... पण तरीही खास "पुलकित'च! 

वैभव वझे - 
सकाळ वृत्तसेवा मुंबई