पु. ल. देशपांडे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचं हे जन्मशताब्दी वर्ष अवघ्या महाराष्ट्रात विविध पद्धतींनी मनवलं जात आहे. पुलंवर ‘भाई’ हा दोन भागांमध्ये चित्रपटदेखील निघाला. पुल ऊर्फ भाई उत्तम गायक, वक्ते, कथाकथनकार, लेखक-कवी होते, नाटककार- विनोदकार, नट, कथाकार, पटकथाकार होते, दिग्दर्शक- संगीत दिग्दर्शक, वादक होते. एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी... अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचा लीलया वावर होता. या त्यांच्या सर्वत्र वावराचा मराठी मनांना परिचय आहे.
हा असा व्हर्सटाईल, अष्टपैलू हिरा ज्या कोंदणात बांधला गेला होता, ते चहुबाजूंनी या हिर्याला बांधून असलेलं कोंदणही तेवढंच विलक्षण ताकदीचं होतं. ते भरभक्कम कोंदण म्हणजे सुनीताबाई देशपांडे! सुनीताबाई पुलंच्या आयुष्यात आल्या नसत्या, तर पुल महाराष्ट्राचं इतकं लाडकं व्यक्तिमत्त्व झाले असते का? पुलंसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्याचं बॅकस्टेज भक्कमपणे सांभाळणार्या पुलंच्या सहचारिणी विदुषीच्या- सुनीताबाईंच्या- व्यक्तित्वाचा धांडोळा घेणं, त्याल उजाळा देणं गरजेचं आहे.
माणसं जन्माला येतात, जगरहाटीनुसार सारेच सोपस्कार पार पडतात. शैशव, बालपण, मग तारुण्य. चांदोबात वाचलेल्या गोष्टींसारखी विवाहयोग्य वयात आल्यानंतर ही माणसं मग विवाह करतात. ती तिचं कर्तव्य पार पाडते, तो त्याची जबाबदारी पार पाडतो. या जोडप्यांचा संसार सुखनैव सुरू असतो. सर्वसामान्य जोडप्यांचे संसार असे सुरळीतपणे सुरू असतात. पिढ्यानुपिढ्या हे चक्र अव्याहत सुरू असतं.
पण, काही ठिकाणची कथा निराळी असते. त्यातले ती आणि तो त्यांच्यातल्या समान पातळीवरील आवडीनिवडीवरून, अभिरुचीवरून, वैचारिकतेतून आवडीच्या माणसांकडे चुंबकासारखी खेचली जातात. एक समान धागा त्यांना खुणावत असतो. ती दोघंही आपापल्या परीने तोडीची असतात. समान बुद्धिमत्तेची किंवा काही ठिकाणी तर तिची बुद्धिमत्ता त्याच्याहून जास्त प्रखर असते, अशी व्यक्तिमत्त्वे एकत्र आली की खरी कसोटी असते आणि बहुतांश वेळा असं पाहायला मिळतं की, कालांतराने ती स्वतःला थोडंसं बाजूला सारत त्याचा मार्ग सुकर करून देते. ‘आनंदी गोपाळ’सारखे काही अपवाद वगळता ही परिस्थिती तशी सवयीची.
पुल ऊर्फ भाई आणि सुनीताबाईंच्या सहजीवनाबद्दल बोलायचं झालं तर कसं होतं या दोघंचं सहजीवन? अगदीच भिंग लावून बघायचं म्हटलं, तर तिथे त्यांच्या सहजीवनातदेखील व्यावहारिक पातळीवर एकमेकांसोबत वावरताना ज्या कुरबुरी असतात त्या असू शकतात. (आहे मनोहर तरी... याचं बोलकं उदाहरण आहे.) सुनीताबाई एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या धनी होत्या. त्या शिस्तप्रिय होत्या, त्या तत्त्वनिष्ठ होत्या. त्यांना स्वतःची मतं होती, ती पटवून देण्याची तीक्ष्ण बुद्धिमत्ता होती. वेळप्रसंगी कडक भूमिका घेण्याची धार त्यांच्या रक्तात होती. एक टोकाचं संवेदनशील मन लाभल्याने अवतीभोवतीच्या माणसांना वाचायची, त्यांना परखायची कसोटी त्यांना अवगत होती. त्यामुळे त्यांच्या तारुण्यापासूनच त्या अत्यंत प्रगल्भ होत्या. एक संतुलित बाज त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला होता. कोकणातल्या निसर्गात त्यांचं बालपण व्यतीत झालं होतं. एक मनस्वीपण लेवूनच त्या मोठ्या झाल्या. ठाकुरांसारख्या एका सुसंस्कृत घराण्यातल्या असल्याने, वकील वडिलांची मुलगी असल्याने आयुष्यातल्या घटना-प्रसंगांकडे मुळातच डोळसपणे पाहण्याची हातोटी त्यांना ज्ञात होती आणि त्यांचं पुलंवर अपार प्रेम होतं आणि म्हणूनच सुनीताबाई-पुलंचा अर्धशतकी संसार अत्यंत व्यवस्थितपणे पार पडला.
भाई आणि सुनीताबाईंचं कवितांवर विलक्षण प्रेम. या एका धाग्याने त्यांना जवळ आणलं. बा. भ. बोरकर, आरती प्रभू, केशवसुत अशा अनेक कवितांच्या अभिवाचनाचे अनेक जाहीर कार्यक्रम या दोघांनी केले. पुल स्वतः कवी होते, पण सुनीताबाईं स्वतः कवयित्री नसल्या तरीही त्यांनी इतरांच्या, मराठीसोबतच इंग्रजी, हिंदी, बंगाली कवितांवर भरभरून प्रेम केलं. असं कवितांनी या दोघांना एकत्र आणल्यावर सुनीताबाईंशी लग्न करण्याचा प्रस्ताव पुलंकडून समोर आला, तेव्हा त्या विवाहसंस्थेच्या बाबतीत बर्याचशा उसादीन होत्या. दोन जिवांमध्ये प्रेम असणं पुरेसं नाही का? त्याला विवाहबंधनाची गरज काय? हा तर एक सामाजिक सोपस्कार आहे, अशी सुनीताबाईंची त्या काळातली अतिशय परखड आणि तितकीच पारदर्शी मतं होती. सुनीताबाई नास्तिक होत्या. पण. त्यांचा चांगल्या कर्मावर विश्वास होता. तसंच चांगल्या माणसांवर नितांत श्रद्धा होती. त्या अर्थाने त्या आधुनिक महाराष्ट्रातलं विज्ञानाची कास धरणारं चर्चित असं व्यक्तिमत्त्व होतं.
तल्लख बुद्धिमत्तेच्या सुनीताबाई कणखर होत्या. 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्या काळात भूमिगत राहून बॉम्ब बनविण्याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं होतं. त्यांना स्वतःची अशी मतं होती. बुद्धिनिष्ठ सुनीताबाईंनी तत्त्वांना कधीच मुरड घातली नाही. स्पष्ट भूमिका घेतानादेखील कुठली भीडमुर्वत ठेवली नाही. एकीकडे स्वभावात हे असे पैलू असताना दुसरीकडे त्या विलक्षण प्रेमळ होत्या. टोकाच्या संवेदनशील होत्या. प्रेम करायचं तर ते झोकून देऊनच. तिथे मग फायद्या-तोट्याचा काही विचार नाही.
कलासक्त माणसं व्यावहारिक जगापासून दूर असतात. त्यांचं आपलं स्वतःचं असं एक जग असतं. त्यात ही अशी माणसं जास्त रमतात. काहीशा फकिरी वृत्तीच्या या माणसांचा ताळेबंद रखरखीत दैनंदिन व्यवहारांशी जुळत नाही. त्यांच्या अशा असण्यातून त्यांचं वेगळेपण अधोरेखित होत असतं. पण, अशा माणसांच्या सहवासातल्या, त्यांच्या भोवतीच्या माणसांना अशा माणसांना या वैचित्र्या आणि वैशिष्ट्यांसह सांभाळून घेत व्यावहारिक मापदंडदेखील पाळावे लागतात. त्याचा दुहेरी भार येतो. त्यात दमछाक होती. जी सुनीताबाईंचीही झाली. याच कारणाने सुनीताबाईंना पुलंसाठी वेळप्रसंगी कठोर व्हावं लागायचं. गरजेपासून व्यसनापर्यंत सगळे लाड सुनीताबाई बिनदिक्कत पुरवायच्या. भाईला सिगारेट लागायची. कुठे जाताना विसरभोळ्या स्वभावामुळे भाई स्वतःहून ती सोबत घेणार नाहीत. मग उगाच इतरांना त्रास नको म्हणून सुनीताबाई पुलंसाठी स्वतःच्या पर्समध्ये सिगारेट बाळगत, पुलंना लागली तेव्हा काढून द्यायला.
पुलं तसे भिडस्त असल्याने कुणाचं मन न दुखवण्याकडे त्यांचा कल. लोकसंग्रहाचं वेड. अव्यवहारी. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात फसवणुकीचेही प्रसंग आले. मग नाटक-चित्रपटांसदर्भातले व्यवहार, सारे पत्रव्यवहार, कोर्टकचेर्या, प्रयोग लावणे, पुलंच्या पुस्तकाची प्रूफं तपासणे, प्रकाशकांशी संपर्क ठेवणे, रॉयल्टी हे सारं सुनीताबाईंनी स्वतःकडे घेतलं. सोबत पुलंसोबत चित्रपटात अभिनयसुद्धा केला. हे सांभाळत असतानाच घरी येणार्या पै-पाहुण्यांशीही त्या तितक्याच आत्मीयतेने वागत. अतिशय सुगरण असलेल्या सुनीताबाई, प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात ठेवत त्यांना ते ते पदार्थ स्वतः बनवून अगदी आवर्जून खायला घालत. पुलंचं घर सदैव भरलेलं. कधी स्नेह्यांच्या तर कधी चाहत्यांच्या भेटी, कधी गाण्याच्या मैफिली, कधीकधी काही पाहुण्यांचा मुक्काम महिना महिना. पोस्टमन, फोनची बेल, दाराची बेल यासाठी सुनीताबाईंना अगणित वेळा उठावं लागायचं. एकदा सुनीताबाईंची भावजय त्यांना म्हणाली, ‘‘आज मीच हे सगळं करते आणि बघते बरं, खरंच कितीदा हे असं तुम्हाला उठावं लागतं ते?’’ आणि त्यांच्या भावजयीला त्या दिवशी या कामांसाठी तब्बल 27 वेळा उठावं लागलं!
उगाच भाईला लेखनातून किंवा त्याच्या चिंतनात व्यत्यय नको म्हणून सुनीताबाई हे सगळं आनंदाने स्वतःवर ओढवून घेत करायच्या. या आणि अशा कितीतरी बाबींवर सुनीताबाईंची केवढी ऊर्जा खर्च होत असावी. त्यामुळेच की काय, पण सुनीताबाई एकान्तप्रिय बनल्या. त्यांनी स्वतःशीच मैत्री केली. अत्यंत देखण्या, एका स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची धनी असलेल्या या स्त्रीने पुलंभोवती स्वतःचा असा भक्कम परकोट उभा केला. दिवस-रात्र डोळ्यांमध्ये तेल घालून एक दक्ष पहारेकरी बनल्या. ठरवून मूल होऊ न देता, पुलंमधल्या मुलाला त्या जोजवत राहिल्या आणि पुलंना चोहोबाजूंनी फुलू दिलं. पुलंचीदेखील सुनीताबाईंना कशासाठीच ना नव्हती. पण, त्यांचा व्यापच असा की, सुनीता देशपांडे नावाच्या या गुणी स्त्रीने स्वतःचा असा वेगळा विचारच कधी केला नाही किंवा त्यांना तशी उसंतही मिळाली नसावी.
मुळातच प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाच्या सुनीताबाईंनी पुलंची सहचारिणी म्हणून पुलंचं मोठेपण त्यांनी कधीच मिरवलं नाही. पुलंसोबत त्या कधी व्यासपीठांवर जाऊन बसल्या नाहीत. पुरस्कारांच्या वेळी असो, की संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या वेळी असो, सुनीताबाई नेहमी आपल्या प्रेक्षागारात समोर बसलेल्या. इतक्या नीरक्षीरबुद्धीने वागण्याचा विवेक त्यांच्यात ठायीठायी भरलेला होता. सगळं सर्वस्वानिशी बहाल करूनदेखील नामानिराळं राहात, फळाची अपेक्षा न बाळगता एक उपजत शहाणपण घेऊन त्या जगल्या. स्वतःला सतत बाजूला ठेवण्याच्या वृत्तीमुळे प्रचंड वाचन केलं. त्याला चिंतनाची जोडदेखील होती. पण, प्रतिभा असूनही त्यांनी म्हणावं तेवढं लेखन केलं नाही, त्या तसं करत्या तर जगासमोर दुर्गाबाई भागवत, शांताबाई शेळके यांच्या रांगेतल्या वेगळ्या सुनीताबाई दिसल्या असत्या.
सुनीताबाई त्या काळात टेक्नोसॅव्ही होत्या. घरातली यंत्रतंत्र त्या दुरुस्त करायच्या. पुलंना ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला बसवून स्वतः ड्रायव्हिंग करायच्या. असे लांब पल्ल्याचे कितीतरी प्रवास त्यांनी मिळून केले आहेत. पुलंवर विलक्षण प्रेम करणार्या सुनीताबाई, त्यांच्या बारीकसारीक गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून असायच्या. पुलंच्या एकपात्री प्रयोगांमध्ये थोडासाही पॉज घेतला, की त्यांना एक घोट पाणी प्यायला मिळावं म्हणून ही बाई विंगेत पाण्याने भरलेलं लोटी-भांडं घेऊन घंटोंशी उभी असायची.
पुलं-सुनीताबाई नि:स्पृह होते. गरजेपुरतं बाळगायचं आणि बाकी वाटून टाकायचं, अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळे पुलंची आवक वाढली तसं या उभयतांनी आवश्यक रक्कम बाळगून बाकी पैसा अनेक गरजू संस्थांना सतत देणगी स्वरूपात देऊ केला. ट्रस्ट उभारला. (पुल गेल्यानंतरसुद्धा शेवटच्या काळात घरातल्या अनेक वस्तू अगदी नि:स्पृह मनाने जिव्हाळ्याच्या व्यक्तींना भेट स्वरूपात देऊन टाकल्या आणि सगळीच व्यवस्थित विल्हेवाट लागली. कशातच मन ठेवलं नाही.)
जीएंचा ‘पिंगळावेळ’ हा कथासंग्रह पुलंना अत्यंत आवडला. तो वाचून ते खूप प्रभावित झाले. त्यांनी जीएंना पत्र पाठवलं. जीएंचंदेखील पुलंना उलटटपाली पत्र आलं. पण, तेव्हा पुल शांतिनिकेतनला बंगाली शिकायला गेले होते. त्यामुळे जीएंच्या या पत्राचं उत्तर सुनीताबाईंनी पाठवलं आणि तेव्हापासून जीए आणि सुनीताबाईंमधल्या पत्रमैत्रीला सुरुवात झाली. ती नंतर अनेक वर्षे अव्याहत आणि अखंड चालली. जीए-सुनीताबाईंचं मैत्र म्हणजे स्त्री-पुरुषातील एका प्रौढ आणि प्रगल्भ मैत्रीचा अनोखा, अनमोल नमुना आहे. सुनीताबाईंचं वाचन अफाट असल्याने त्यांच्यातील पत्रव्यवहारातून जीए आणि सुनीताबाईंमध्ये विविध विषयांवर, इंग्रजी लेखकांवर, सामाजिक प्रश्नांवर, साहित्यावर अशा अगणित चर्चा व्हायच्या. काही दीर्घ तर काही अतिदीर्घ अशी ती सारी पत्रं जीएंनी जपून ठेवली होती. (जीएंनाही पत्रलेखनाचा छंद होता. कवी ग्रेसांपासून त्यांनी अनेकांना पत्रं लिहिली. पुढे त्यातल्या निवडक पत्रांचा ‘जीएंची पत्रवेळा’ असे चार खंड प्रकाशित झाले. त्यातला पहिला खंड सुनीताबाईंच्या पत्रांचा आहे.) या पत्रमैत्रीतून जीएंना सुनीताबाईंमधली विलक्षण प्रतिभा आणि विचारांमधली बहुश्रुतता जाणवली. त्यामुळे जीएंनी त्यांना लेखनासाठी प्रोत्साहितदेखील केलं. शेवटी या बाई आपलं ऐकत नाही असं वाटून त्यांनी मग श्री. पु. भागवतांना, सुनीताबाईंकडे विलक्षण प्रतिभा आहे त्यांना लिहितं करा, ही कळकळ व्यक्त केली. जीएंसारख्या विलक्षण एकारलेपण पांघरलेल्या माणसाने सुनीताबाईंच्या लेखनाची दखल घेत अशी आग्रही भूमिका घ्यावी, यातूनच सुनीताबाईंच्या प्रतिभेची जाणीव व्हावी.
एकदा सुनीताबाई-पुलंना अमेरिकेतल्या सऍटेलमधल्या त्यांच्या एका स्नेह्याने फिलिस रोझ यांचं ‘पॅरलल लाईव्हज’ हे पुस्तक भेट म्हणून पाठवलं. वैवाहिक जीवनावर आधारित ते पुस्तक वाचल्यानंतर या पुस्तकाची आपण मराठी वाचकांना ओळख करून द्यावी, असं सुनीताबाईंना मनापासून वाटलं. पण, मुळात पुस्तक खूप मोठं असल्याने त्यांनी त्यातल्या निवडक अशा जेन वेल्श आणि थॉमस कार्लाईल, जॉन रस्किन आणि एफी ग्रे, हॅरियट टेलर आणि जॉन स्टुअर्ट मिल इत्यादी अशा सहा जोडप्यांच्या वैवाहिक जीवनावरच्या मजकुराचं भाषांतर केलं. त्या सहा लेखांकांचं मिळून ‘समांतर जीवन’ हे सुनीताबाईंचं पुस्तक प्रसिद्ध आहे.
नंतर विविध वृत्तपत्रांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये त्यांनी अगदी साठीनंतर लेखन केलं. त्या लेखांचे संग्रह आणि इतर लेख असे सुनीताबाईंचे सोयरे सकळ, मण्यांची माळ, मनातलं अवकाश, प्रिय जीए ही पुस्तकंही अत्यंत वाचनीय आहेत. आहे मनोहर तरी... या त्यांच्या आत्मकथनाने तर प्रसिद्धीचा कळस गाठला. त्याची विविध भाषांमध्ये भाषांतरं झाली. अनेक आवृत्त्या निघाल्या. या आत्मकथेने त्यांना रसिकांनी जितकं डोक्यावर घेतलं तितकंच पुलप्रेमींच्या टीकेची झोडही त्यांना सहन करावी लागली. परंतु, या आत्मकथनाने दोघांच्याही एकत्रित आयुष्यावर कुठली बाधा आली नाही. एकदा तर आहे मनोहर तरी... ची रॉयल्टी आली, त्यावर सुनीताबाई भाईंना म्हणाल्या, भाई, माझी रॉयल्टी आली, तुझ्यासाठी, तुझ्या आवडीचं काय आणू?
जी. ए. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला प्रिय जी. ए. पुरस्कार सुनीताबाईंना मिळाला.
प्रत्येक जण आधी स्वतःला काहीतरी देणं लागतो. त्यात वेगळेपण लाभलेल्या व्यक्तींची ही भूक जरा अधिक मोठी असते. मी ला असमाधानी ठेवलं की ती सल कुठेतरी ठसठसत असते. कालांतराने कधीतरी वेगळ्या रूपाने ती बाहेरही निघते. चतुरस्र व्यक्तित्वाच्या सुनीता देशपांडेंनी त्यांच्यातल्या मी वर आणि सोबतच त्यांच्या लेखनाला मुकलेल्या त्यांच्या रसिकांवरदेखील एका अर्थाने अन्याय केला. आपल्या जोडीदारावर नितान्त प्रेम असल्याशिवाय स्वतःत खूप काही असताना अशी सर्वस्वाची आहुती देणं तितकंसं सोपं नाही. म्हणूनच पुलंच्या अख्ख्या आयुष्याचंच पेटंट घेतलेल्या या बाईची, आहे मनोहर तरी... मध्ये एक व्यक्ती म्हणून ही घुसमट निघाली असेल, तरी त्यांचं पुलंप्रतीचं समर्पण, प्रेम, जिव्हाळा पाहू जाता, तितक्याच मोठ्या मनाने आणि आत्मीयतेने समजून घेता यायला हवी. कारण, ही व्यक्तिमत्त्वं आपल्यासाठी प्रेरकही ठरतात...
भाग्यश्री पेठकर
९ ऑगष्ट २०१९
तरुण भारत

1 प्रतिक्रिया:
अगदी खरं आहे. भाईंच्या पाठी आणि पुढे सुनीताबाई आयुष्यभर पहाडासारख्या उभ्या राहिल्या. आणि पुलंच्या कलासक्त आयुष्याला त्यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.
Post a Comment