Wednesday, July 21, 2021

‘पु. ल.’ नामक गुरू-किल्ली -- सतीश पाकणीकर

एखाद्याच्या व्यवसायाच्या अथवा कारकीर्दीच्या सुरुवातीला त्या व्यक्तीला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. कधी अनुभव कमी पडतो, तर कधी आर्थिक विवंचना निर्माण होतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींपुढील अडचणीही अर्थातच वेगवेगळ्या असतात. कालांतराने मग कुठे ती व्यक्ती जरा जरा स्थिरस्थावर होऊ शकते. आपला जम बसवू शकते. काही व्यक्ती याला अपवादही असू शकतात. त्यांची वाट सहज-सुलभ असते. विनासायास त्या व्यक्ती उच्चासनावर विराजमानही होतात. पण...पण अपवाद हे नेहमीच अभावाने पाहायला मिळतात. माझ्यासारख्या काही व्यक्ती या दोन्हीचा सुवर्णमध्य असतात. म्हटलं तर अडचणी असतात, पण त्याचबरोबर नशिबाची उत्तम साथही मिळत जाते. मी असं म्हणताना आज माझ्या डोळ्यांसमोर दोन प्रसंग अगदी काल घडल्यासारखे उभे राहतात.

माझं पदार्थविज्ञान विषयातील पदव्युत्तर शिक्षण १९८५मध्ये पूर्ण झालं. त्याच्या आधीपासूनच प्रकाशचित्रण हा मी माझा पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून निवडला होता. बरोबरच भारतीय अभिजात संगीतातील कलाकारांच्या ‘भावमुद्रा’ माझ्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा छंदही लागला होता. स्टेजवरील उपलब्ध प्रकाशात फोटो टिपण्यासाठी ‘फास्ट फिल्म’चा वापर होई. त्यांची किंमत अर्थातच दुप्पट. त्यांच्या प्रोसेसिंगचा खर्चही त्याच व्यस्त प्रमाणात; पण व्यावसायिक कामांमधून मिळालेले बरेचसे पैसे मी माझ्या छंदावर खर्च करीत असे. त्यामुळे ‘कडकी’ ही नित्याचीच बाब होती; पण असे असतानाही मी माझ्या प्रकाशचित्रांच्या प्रदर्शनाचा घाट घातला. माझं पहिलंवहिलं फोटो प्रदर्शन.

१९८६च्या जून महिन्यातली बारा तारीख. स्थळ ‘बालगंधर्व रंगमंदिराचे कलादालन.’ प्रदर्शनाचे नाव ‘ स्वरचित्रांच्या काठावरती...’ अर्थातच भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांच्या मी टिपलेल्या भावमुद्रांचे सादरीकरण. उद्घाटनाचा कार्यक्रमही प्रदर्शनाच्या विषयाला साजेसा. माझा मित्र विजय कोपरकर याचं गाणं, साथीला दुसरा मित्र रामदास पळसुले आणि त्यावेळेस नुकतेच पुण्याला परिचित झालेले सतारवादक शाहीद परवेझ यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन. गद्य भाषणाला पूर्णपणे चाट. अशा प्रकारे प्रदर्शनाचे उद्घाटन होण्याची ‘बालगंधर्व’मधील ही पहिलीच वेळ. कलादालनाच्या भिंतींवर अभिजात संगीतातील मोगुबाई कुर्डीकर, भीमसेनजी, कुमारजी, अभिषेकीबुवा, किशोरीताई, रविशंकर, विलायत खान, अमजदअली खान, झाकीर हुसैन अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भावमुद्रा अन् विजयच्या सुरेल स्वरांचा दरवळ. मैफल एकदम जमून गेली.

प्रदर्शनाचा शेवटचा दिवस. १६ जून. साडेचार वाजलेले. मी चहा पिण्यासाठी खालच्या कँटीनमध्ये गेलो. पुढ्यात चहा आला. एक–दोन घोट घेतोय, तोवर माझा मित्र प्रमोद पळत पळत आला व म्हणाला, ‘लवकर चल. वर कलादालनात पु. ल. देशपांडे व त्यांचे एक मित्र आलेत. ते तुझी चौकशी करताहेत.’

आनंदात मी हातातला कप तसाच ठेवला. धावलो. प्रदर्शनातील मधल्या पॅनेलपाशी दोघेही तन्मय होऊन फोटो पाहत होते. मी हळूच जाऊन शेजारी उभा राहिलो. ते आल्याने स्वाभाविकच त्यांच्या आजूबाजूला गर्दी झाली होती. थोड्या वेळाने ‘पुलं’चे माझ्याकडे लक्ष गेले. ते म्हणाले, ‘अरे तुलाच शोधतोय, कुठे होतास? हे माझे मित्र नंदा नारळकर.’ मी दोघांनाही नमस्कार केला. माझा विश्वास बसत नव्हता; पण समोर साक्षात अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व त्यांच्या एका जिवलग मित्रासोबत. आणि ते दोघेही माझ्या कामाचं ते तोंड भरून कौतुक करीत होते. मग पुढील जवळजवळ एक तास सर्व प्रकाशचित्रे बारकाईने पाहताना... त्यांची उपस्थिती असलेल्या मैफलींबद्दलच्या आठवणी जागवण्यात गेला. प्रदर्शन पाहून झाल्यावर ‘पुलं’नी अभिप्राय लिहिला – ‘या अप्रतिम छायाचित्रातून स्वर ऐकू येतात.’ करिअरच्या सुरुवातीलाच मिळालेला हा अभिप्राय माझ्यासाठी जगातील सर्वांत मोठे ‘अवॉर्ड’ होते.

... पण दरम्यान ‘पुलं’नी मला विचारले, की यात अण्णांचा म्हणजे पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांचा फोटो कुठे दिसला नाही. मी त्यांना सांगितले, की ‘मी त्यांचे फोटो काढण्यासाठी पुणे, औरंगाबाद येथील तीन-चार वेगवेगळ्या मैफलींत, अगदी मिरजेच्या दर्ग्यात त्यांचे गाणे होणार आहे असे कळल्यावरून तेथेही जाऊन आलो; पण त्या प्रत्येक मैफलीत त्यांची तब्येत बरी नसल्याने ते येऊ शकले नाहीत. व मी निराश मनाने परत आलोय.’ माझ्या या सांगण्यावर ‘पुलं’नी तेथेच मला एका खास मैफलीचे आमंत्रण दिले. ती मैफल पुढच्याच महिन्यात होणार होती. पुण्यातील प्रभात रोडवरील श्री. एम. ए. बाक्रे यांच्या घरी.

मैफलीच्या दिवशी मी सकाळपासूनच तयार होतो. ठरल्यावेळी मी बाक्रे यांच्या घरी पोहोचलो. निमंत्रित रसिक एक एक करून येत होते. माझी फारशी कोणाशीच ओळख नव्हती. स्वतः यजमान श्री. बाक्रे यांनी मला नाव विचारल्यावर मी त्यांना सांगितले, की मला पु. ल. देशपांडे यांनी आमंत्रण दिलंय. यावर बाक्रे मला थेट आत एका खोलीत घेऊन गेले. तेथे ‘पुलं’ व पं. मल्लिकार्जुन गप्पा मारीत बसले होते. मला पाहताच ‘पुलं’ म्हणाले, ‘ये रे, मी तुझी ओळख करून देतो.’ मग ते मल्लिकार्जुन यांच्याकडे बघत म्हणाले, ‘अण्णा, हा सतीश पाकणीकर. फोटोग्राफर आहे. याची आवड म्हणजे हा शास्त्रीय संगीतातील कलाकारांचे फोटो काढतो. नुकतंच त्यानं एक छान प्रदर्शन भरवलं होतं. त्यात तुमचा फोटो असावा म्हणून तो काढण्यासाठी तुमच्या काही मैफलींना हा आला होता; पण तुमच्या तब्येतीमुळे त्या मैफलींना तुम्ही आला नाहीत. म्हणून मी आज त्याला खास तुमचे फोटो काढण्यासाठी बोलावलंय.’ त्यावर मल्लिकार्जुन एकदम खळाळून हसले. जसे ते अशोक दा. रानडे यांनी टीव्हीवर घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीत हसले होते तस्सेच. मग ते मला त्यांच्या कानडी ढंगात म्हणाले, ‘भाईंनी सांगितलंय. म्हणजे ऐकायलाच पाहिजे. तू माझ्या समोर बस. हवे तेवढे फोटो काढ.’

समोर ऋषितुल्य पं. मल्लिकार्जुन गानसागरात हरवून गेलेत. माझ्या शेजारी ‘पुलं’ आणि सुनीताबाई त्यांना मनापासून दाद देत आहेत आणि पं. मल्लिकार्जुन यांच्यापासून हातभर अंतरावरून मी ५० एमएमच्या लेन्समधून त्यांचे चक्क ‘क्लोज-अप’ टिपतोय. ‘गाण्यात राहणारा माणूस’ असं ज्याचं वर्णन लिहिलंय ती व्यक्ती समोर अन् ज्यांनी ते लिहिलंय ते शेजारी अशी माझी अवस्था. माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता; पण अर्थातच ही होती ‘पु. ल.’ नामक एका महान गुरू-किल्लीची जादू.

दुसरा प्रसंग तर साक्षात ‘पुलं’च्या घरीच घडलेला. दिनांक होता आठ नोव्हेंबर. ‘पुलं’चा जन्मदिवस. नक्की साल आठवत नाही; पण १९८८-८९ असावे. आठ नोव्हेंबर या दिवशी ‘पुलं’च्या घराचे दरवाजे सर्वांना खुले असायचे. अगदी सकाळपासून त्यांचे सर्वसामान्य चाहते तर यायचेच; पण त्या दिवशी अनेक महनीय व्यक्तींची उपस्थिती ‘१, रूपाली, ७७७ शिवाजीनगर’ या वास्तूत असायची. मी साधारण पावणेबाराच्या सुमारास त्यांच्या घरी पोहोचलो. चाहत्यांचा सकाळचा बहर ओसरला होता. आत गेल्यावर उजवीकडे असलेल्या सोफ्यावर पु. ल. बसले होते. त्यांना भेट म्हणून आलेले असंख्य पुष्पगुच्छ आणि त्या फुलांचा पसरलेला मंद सुगंध. फुलांचे गुच्छ सोडवून त्या फुलांची परत एकदा सुंदर रचना करून ठेवण्याची सुनीताबाईंची लगबग सुरू होती. समोरच्या सोफ्यावर एक वयस्कर गृहस्थ बसलेले. त्यांची व ‘पुलं’ची काही विषयावर चर्चा सुरू होती. मी फुलं देऊन ‘पुलं’ना नमस्कार केला. त्यांनी खुणेनेच मला बसायला सांगितले. सुनीताबाईंनी माझ्या हातावर पेढा ठेवला.

चर्चेचा विषय आधुनिक चित्रकला आहे हे मला एका क्षणातच कळले. त्या गृहस्थांची बोलण्याची व आपला मुद्दा ठामपणे मांडण्याची एक वेगळीच शैली होती. त्या बोलण्यावरून त्यांचा त्या विषयातील अधिकारही स्पष्ट जाणवत होता. अर्थातच ‘पुलं’शी चर्चा करायची तर अधिकार असणारच ना? मी मस्त आनंद घेत होतो. थोड्याच वेळाने ते गृहस्थ उठले. स्वच्छ पांढरा सदरा, तसाच स्वच्छ पायजमा, या पेहरावास शोभतील असे मागे गाठ मारलेले चंदेरी केस व टोकदार होत गेलेली लांबसडक शुभ्र पांढरी दाढी. एखाद्या चित्रातून अवतरलेला ऋषीच जणू. ते ‘पुलं’ना म्हणाले, ‘चला भाई, भेटू या परत.’ सुनीताबाईंचाही त्यांनी निरोप घेतला. पु. ल. त्यांना दरवाज्यापर्यंत सोडायला उठले. ते गृहस्थ दरवाज्यापर्यंत पोहोचले. ते पायात वहाणा घालताहेत तोवर पु. ल. त्यांना म्हणाले, ‘एक मिनिट अण्णा. हा पुण्यातला एक तरुण फोटोग्राफर आहे. सतीश पाकणीकर. शास्त्रीय संगीतातल्या कलाकारांचे यानी खूप छान फोटो काढलेत. त्याचं प्रदर्शनही भरवलं होतं यानी. आम्ही आमच्या ‘एनसीपीए’च्या संगीत विभागासाठी ते सर्व फोटो घेतलेत याच्याकडून.’ मी पुढे होऊन त्यांना नमस्कार केला. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होतं. पु. ल. पुढे माझ्याकडे बघून म्हणाले, ‘हे, चित्रकार एस. एम. पंडित.’ मी अवाक! माझ्या चेहऱ्यावर आदरयुक्त आनंदही आणि आश्चर्यही. एवढ्या मोठ्या चित्रकाराशी तितक्याच महान व्यक्तीच्या घरी झालेली ती भेट. पुन्हा एकदा पु. ल. नावाची गुरू-किल्ली. नेहमी बरोबर असणारा माझा कॅमेरा मी त्याच दिवशी का नेला नाही, याची खंत आजही मनाला अस्वस्थ करते.

एखाद्याचा छोटासाही गुण हेरून त्याला सतत प्रोत्साहित करत राहणे, हे त्या ‘पु. ल. नामक गुरू-किल्ली’चे महान वैशिष्ट्य. दोन वेगवेगळ्या कला प्रांतातील ऋषितुल्य अशा दोन ‘अण्णां’शी त्यांनी परिचय करून देण्याचे भाग्य मला एकाच जन्मात लाभणे यालाच मी नशिबाची उत्तम साथ असे म्हणतो.

आदरणीय भाई,
माझ्यासारख्या अनेक होतकरू व्यक्तींना तुमच्या परिघात स्थान मिळाले. तुमचा सहवास मिळाला. तुमच्या चिरंतन शब्दसामर्थ्याबरोबरच अशा अनेक आठवणी आजही आमची आयुष्यं फुलवून टाकत आहेत. त्यांचा जागर करणे हीच तुम्हाला तुमच्या या जन्मशताब्दी वर्षात खरी आदरांजली ठरेल!

- सतीश पाकणीकर
संपर्क : ९८२३० ३०३२०
(लेखन दिनांक : आठ नोव्हेंबर २०१८)

मूळ स्रोत - Bytes of India

1 प्रतिक्रिया:

Mohan kardekar said...

मोठे भाग्यवान आहात. माझा नमस्कार.