Wednesday, November 9, 2022

शैलीमुळे कालातीत ठरणाऱ्या पुलंच्या रेडिओवरील श्रुतिका - रजनीश जोशी

पु. ल. देशपांडे यांनी रेडिओ माध्यमासाठी काम करताना केलेलं लेखन त्या त्या काळातलं आहे. त्यांनी त्यातून मांडलेले विषय तत्कालिक आहेत. पण त्यांची शैली मात्र कालातीत आहे. रेडिओच्या श्रोत्यांशी संवाद साधणारं लेखन कसं असलं पाहिजे, याचा वस्तूपाठ म्हणजे त्यांचं श्रुतिका लेखन आणि भाषणं. पु. ल. स्मृतिग्रंथासाठी लिहिलेल्या लेखातील काही भाग !

साल होतं १९५५. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावच्या माळरानाचं नंदनवन करण्याच्या एका प्रकल्पासाठी पु.ल.देशपांडे तिकडं गेले, पण तिथली दांभिकता आणि फोलपण लक्षात आल्याने ते काम सोडून परत मुंबईला आले. त्यांच्याकडं कुठलंच काम नव्हतं. अशा अत्यंत गरजेच्या वेळी त्यांना आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर सहनिर्माते म्हणून नोकरी मिळाली. पुलंच्या शैलीत या घटनेचं वर्णन करायचं तर ''तोपर्यंत 'दीनवाणी' असलेली 'नभोवाणी' एकदम 'गोजिरवाणी' तर झालीच पण खूप श्रवणीयही झाली.'' व्यंकटेश माडगूळकर यांच्यासमवेत ग्रामीण भागातील जनतेसाठी कार्यक्रम करण्याचे काम त्यांच्याकडे होते. पुलंनी या कालखंडात अधिकाधिक श्रुतिका लिहिल्या, प्रसंगपरत्वे विविध विषयांवर भाषणे दिली. पॉल न्युरेथ नावाचे एक अधिकारी 'रेडिओ फार्म फोरम' नावाचा एक कार्यक्रम करीत असत. शेतकऱ्यांना मार्गदर्शनाच्यादृष्टीने या कार्यक्रमाचं महत्त्व मोठं होतं. त्यांनी या मंडळींना मार्गदर्शन केलं होतं. रेडिओची खासियत म्हणजे निरक्षरांनाही त्याचा उपयोग होतो. ५५ च्या सुमारास आपल्याकडील खेड्यापाड्यातील लोकांचं, शेतकऱ्यांचं शिक्षण बेतास बात होतं, किंबहुना अनेकजण निरक्षरच असत. त्यांना शेतीबाबत आणि तत्सम मार्गदर्शनासाठी रेडिओ उपयुक्तच होता. तथापि, नुसती भाषणं किंवा तज्ज्ञांच्या मुलाखतीसारख्या कार्यक्रमामुळं खेड्यातल्या श्रोत्याला जोडून ठेवणं थोडं अवघडच होतं. त्यासाठी संवादात्मक कार्यक्रम केले, त्यातही एखादं पात्र खेडुताचं असेल तर लोकांना अधिक जवळचं वाटेल हे पुलंनी हेरलं होतं. 'नभोवाणी शेतकरी मंडळा'च्या माध्यमातून मग 'बया दार उघड' सारखा कार्यक्रम त्यांनी सुरू केला, तो लोकप्रिय झाला. शेतकऱ्यांसाठी, गावकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम होता. तुमच्यासाठी हे ज्ञानाचे भांडार उघडले आहे, तेव्हा तुम्हीही आपल्या मनाचे दार उघडा आणि शहाणे व्हा, असा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमामध्ये पुलंचा सहभाग असल्याने त्याची रंजकता अपार होती, शिवाय गीत-संगीताचाही उत्तम उपयोग त्यात करण्यात आला होता.

फक्त शेतकरी बांधवांपुरतेच त्यांचे लेखन मर्यादित नव्हते. रेडिओ हे पुलंचे आवडते माध्यम होते. त्याचा यथायोग्य अभ्यास त्यांनी केलेला होता. शब्दप्रधानता हे त्याचे वैशिष्ट्य आणि पुलंना तर शब्दांचं वेड अतोनात होतं. ते म्हणतात : ''माझं पहिलं वेड शब्दांचं आहे, रंगांचं नाही. रंगदेखील मला शब्दांतून अधिक चांगला दिसतो. किंबहुना, साऱ्या विश्वाची सुरूवात परमेश्वराच्या ओंकाररूपी हुंकारातून झाली या कल्पनेचं मला अधिक वेड आहे.'' रेडिओवरील श्रुतिका व तत्सम कार्यक्रमांचं आणि नाटकांचं दिग्दर्शन करताना त्यांनी सर्वाधिक महत्त्व शब्दांनाच दिलं आहे. एखाद्या पात्राला त्याच्या भूमिकेसाठी अशुद्ध उच्चार करायचे असतील तर ते तसेच आले पाहिजेत, अशावेळी पानीऐवजी पाणी किंवा आनिऐवजी आणि शब्द उच्चारला गेला तर ते अस्वस्थ होत. ''शब्द गळला की नाट्यशरीराला जखम झाल्याची वेदना मला होते, वाक्य चुकलं की नाटकाला ओरखडा गेल्याचं दुःख मला होतं,'' असं त्यांनी संहितेतील शब्दांच्या उच्चारणाविषयी लिहून ठेवलं आहे.

पुलंनी एकेठिकाणी म्हटलंय की ते लेखक झाले नसते तर गायक झाले असते. संगीत त्यांच्या खूप आवडीचा प्रांत. आकाशवाणी असो किंवा त्यांनी लिहिलेल्या कोणत्याही लेखनाचा प्रकार असो, त्यात कोणत्या ना कोणत्या रूपात संगीत अपरिहार्यपणे येतेच. आरंभीच्या काळात त्यांनी 'सत्यकथा', 'अभिरूची' अशा नियतकालिकांत कथा लिहिल्या, त्यातही संगीताचा उल्लेख आढळतो. रेडिओसाठीच्या श्रुतिकांमध्येही तो आहेच. 'नभोवाणी शेतकरी मंडळा'च्या कार्यक्रमात त्यांनी संगीताचा वापर केला, पण त्याशिवायदेखील त्यांनी अनेक संगीतिका सादर केल्या. जनाबाई किंवा अमृतवृक्ष वगैरेंचा उल्लेख त्यादृष्टीने करता येईल. कौटुंबिक श्रुतिका लिहून सादर करणं पुलंच्या आवडीचीच गोष्ट होती. 

रेडिओवर नोकरी लागल्यानंतर वर्षभरातच नभोवाणी सप्ताहासाठी त्यांनी लेखन केलं. १९५६ साली पुलंना पदोन्नती मिळाली. ते मुंबई आकाशवाणी केंद्रावर नभोनाट्य विभाग प्रमुख रुजू झाले. आकाशवाणीसाठी लेखन करताना मनोरंजन आणि प्रबोधन अशा दोन्ही गोष्टींकडं लक्ष देणं आवश्यक आहे. पुलंनी केलेल्या तशा लेखनाचं एक महत्त्वाचं उदाहरण 'सर्वोदय' या श्रुतिकेच्या रूपानं देता येईल. विनोबा भावे यांनी भूदान चळवळीमधून भूमिहिनांना जमीन देण्यासाठी देशभरात यात्रा काढली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत होता. शेकडो एकर जमीन भूदान यज्ञ म्हणून विनोबाजींना दिली जात होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतरची ही खूप मोठी चळवळ होती. त्याविषयीचा एक संदेश मिळवण्यासाठी पु.ल.देशपांडे आणि आकाशवाणीतील त्यांचे सहकारी कवी मंगेश पाडगावकर यांनी विनोबाजींबरोबर कर्नाटकात यात्रा केली. त्यांच्याकडून संदेश मिळवला. पण 'सर्वोदय' नावाची जी श्रुतिका म्हणण्यापेक्षा नभोनाट्यच पुलंनी लिहिलं. ते त्यांच्या प्रतिभेचं दर्शन घडवणारं आणि विनोबाजींच्या कार्याचा यथोचित गौरव करणारं आहे. त्यातून रंजनही होतं आणि प्रबोधनही. महात्मा गांधीजींचा आवडता शिष्य अशी विनोबाजींची ओळख होती. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिला सत्याग्रही. गांधीजी त्यांना 'आश्रमातला माझा भीम' असं म्हणत. पवनारच्या आश्रमातून त्यांची पदयात्रा सुरू झाली. पुलं लिहितात : भारतीयांना शहाण्या, सुज्ञ, व्यवहारी, चतूर शहाण्यांमागून जाणं आवडत नाही. त्यांना असल्या वेड्यांचच वेड आहे. राजभोग त्यागून विषप्याला घेणारी वेडी मीरा, वेडे रामकृष्ण, दुकानाची दारं बंद करून विठ्ठलाच्या दाराशी बसलेला वेडा तुकाराम – ह्या वेड्यांनीच आम्हाला शहाणं केलं आहे. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आम्ही भाषा ओळखतो ती त्यांची, कारण त्यांना एकच भाषा येते, 'अंतःकरणाची.'

विनोबाजींचा हा भूदान यज्ञ किती खडतर होता, त्याचं प्रत्यंतर त्यांनी स्वतः घेतलं होतंच. पण तेलंगणातील जमीनदारांची प्रचंड दहशत होती. हिंसक अत्याचारांनी तिथली जनता भयभीत झाली होती. दिवसासुद्धा दारं मिटून बसत होती. त्यांची व्यथा ऐकून विनोबाजींनी भूमीचा प्रसाद मागितला. त्याचं वर्णन पुलंनी केलं आहे, श्रोत्यांच्या काळजाला हात घालणाऱ्या त्या शब्दांनी त्यांच्या मनात थरार निर्माण केला नसला तरच नवल. पुलं लिहितात : भारतीय इतिहासातील हा एक अत्यंत करुणोदात्त प्रसंग. दाता आणि घेता दोघेही कंगाल. जमीन देणारा परमेश्वर कुणाच्या मनात उभा राहणार? अनेक भूमिहिन आणि भूमिवान तिथं हजर होते. त्यातच रामचंद्र रेड्डी नावाचे गृहस्थ होते. पक्ष्याचं दुःख पाहून वाल्मिकीच्या शोकाचा श्लोक झाला. त्या श्लोकातून पुढं रामायण झालं. भूमिहिनांची प्रार्थना आमि विनोबांचा ''या गरीबांना जमीन देणारा आहे कुणी दाता?'' हा प्रश्न रामचंद्र रेड्डींचं काळीज कापत गेला आणि ते एकदम ओरडले, ''माझी शंभर एकर जमीन मी या भूमिहीन हरिजनांना दान देतो.'' भूदानगंगा अशा या पावन स्वरूपात तेलंगणातल्या पोचमपल्ली नावाच्या खेड्यात १८ एप्रिल १९५१ रोजी प्रकटली. पोचमपल्ली ही भूदानाची गंगोत्री. सर्वोदयगाथेचं मंगलाचरण.

आणि मग अंध कार्यकर्त्यानं मध्यरात्री येऊन आपली जमीन दान देणं, एका बाईनं आपली सगळी जमीन दान देऊन रोजीरोटीसाठी दुसरीकडं कामाला जाण्याचा निश्चय करणं अशी अनेक उदाहरणं देत हे नाट्य पुढं जातं. भूदानयज्ञामुळं शेतीचे लहानलहान तुकडे पडतील वगैरे अनेक शंका घेतल्या गेल्या, त्यांचंही निरसन त्यांनी केलं आहे. तीस हजार मैल फिरून यशस्वी केलेल्या भूदान यात्रेमुळे सगळ्या जगाला प्रेमाचा, शांतीचा संदेश पोचल्याचं ते लिहितात. ही श्रुतिका किंवा नभोनाट्य वाचणं हादेखील एक समृद्ध करणारा अनुभव आहे.

पुलंची आकाशवाणीवरची कारकीर्द खूपच बहरली. पुण्यातून मुंबईत त्यांना बढती मिळाली. त्यांच्या कामाचा आवाका आणि दर्जा पाहता सरकारने त्यांना दूरदर्शनच्या निर्मिती प्रक्रियेसाठी दिल्लीत निमंत्रित केलं. त्यासाठी त्यांचा परदेशात अभ्यास दौराही झाली. नंतरच्या काळात आकाशवाणीवर अनेक मान्यवरांनी श्रुतिका लिहिल्या, नभोनाट्ये लिहिली. पण पुलंनी त्याला भाषेची जी उंची दिली ती अभूतपूर्वच होती. नभोनाट्य किंवा श्रुतिका कशा लिहावी याचंही विवेचन पुलंनी केलं आहे. रेडिओसाठी कसं लिहावं? या प्रश्नाचं उत्तर ते एका शब्दात देतात : 'बोलल्यासारखं.' रंगभूमी, चित्रपट किंवा रेडिओवर सादर होणाऱ्या नाटकातून रसिकांना आनंद झाला पाहिजे, हे मूळ सूत्र आहे. चित्रपट अगर नाटकात डोळे आणि कान एकमेकांच्या मदतीला धावून जातात. शब्द कानात शिरला नाही तर दृश्य खुलासा करीत असतं. चुकीच्या प्रकाशयोजनेमुळं पात्रं दिसलं नाही तर दृश्य खुलासा करत असतं. रेडिओत हे अगदी अशक्य! रेडिओ घरात चालू असतो, त्याचवेळी आत स्टोव्ह पेटत असतो. कदाचित नोकरांशी भांडण सुरू असतं. मुलांना कविता पाठ करायची लहर येते. शेजारचे गृहस्थ ऐनवेळी दारावर 'ठो' 'ठो' करून वर्तमानपत्र मागायला येत असतात. रस्त्यातून बँड लावून लग्नाची वरात जात असते. अशा एकूण विसंवादी परिस्थितीत रेडिओ ऐकायचा असतो. त्यामुळं रेडिओ-श्रुतिकेच्या लेखनाला काही विशिष्ट त्रुटींमधून मार्ग काढायचा असतो. शिवाय श्रुतिका लेखनावर तंत्राच्या काही मर्यादा असतात. त्यात कालमर्यादा पहिली. केवळ ध्वनी एवढंच रेडिओ श्रुतिकेचं साधन. रंग, रूप, रस, गंध यापैकी कोणतीही इतर साधनं वापरता न आल्यानं श्रुतिका कितीही परिणामकारक संवादांनी अगर साऊंड इफेक्ट्सनी नटवलेली असली, तरी तीस ते पंचेचाळीस मिनिटांहून अधिक वेळ ती टिकाव धरू शकत नाही. केवळ श्राव्य अशा या नाटकात श्रोत्याच्या कल्पनाशक्तीला फार ताण द्यावा लागतो. नाटक किंवा सिनेमा पाहायला गेलेला रसिक उठून नाट्यगृहात गेलेला असतो इथं नाटक आपल्या घरी आलेलं असतं. आणि घरातल्या सर्व परिस्थितीचा त्या नाटकाला, म्हणजे पर्यायानं नाटककाराला विचार करावा लागतो.

रेडिओचं तंत्र पुलंनी झटकन आत्मसात केलेलं होतं. चटकदार संवाद आणि शब्दांचा खेळ यात पुलं रमत होते, पण त्याचबरोबर पुरक अंगांचाही विचार त्यांनी केलेला होता. त्यांच्या एका नभोनाट्यात गरूड झेपावतो अशा आशयाचं वर्णन होतं. रेडिओवर गरूडाची झेप कशी दाखवणार. त्यांनी वर्तमानपत्रांच्या पानांची फडफड करून पाहिली, पण त्यातून अपेक्षित परिणाम साधत नव्हता. थोडक्यात, शब्दांबरोबर अन्य इफेक्ट्सची गरज तंत्राला असते. श्रुतिकेतील पात्रयोजना श्रोत्यांना कळायला हवी. त्यासाठी संबंधित पात्राच्या नावाचा उल्लेख करावा लागतो. सुरूवातीला अशा उल्लेखानं संबंधित पात्राची भूमिका करणाऱ्या कलावंताचा आवाज 'एस्टॅब्लिश' झाला की मग ते कमी केले तरी चालतात. 'टार्गेट ऑडियन्स' हा आजच्या काळाचा सर्वच क्षेत्रांना लागू होणारा मूलमंत्र असला तरी श्रुतिकेबाबत तो अधिक नेमका आहे. श्रुतिका ही घरातल्या सर्वांसाठी असते. त्यात आई-बाबा, काका-काकू, आजी-आजोबा, मुलगा-मुलगी, शेजारी अशा सगळ्यांचा अंतर्भाव असतो. त्यांना गृहित धरून ती लिहावी लागते. पुलंनी त्याचा बारकाईने विचार केला आहे. 'भगिनी मंडळात भाऊगर्दी'सारखी त्यांची श्रुतिका विविध वैशिष्ट्यांनी नटलेली आहे. लेडिज क्लब किंवा भगिनी वर्गात एक भाषण, एक नाट्यछटा आणि संवाद असा त्रिवेणी संगम, शिवाय जोडीला गाणं असा मसाला त्यांनी भरला आहे. ज्या काळात पुलंनी हे लेखन केलं, त्या काळात महानगरांमध्ये लेडिज क्लब, सखी मंडळ वगैरेंची नुकतीच सुरूवात झालेली होती. श्रीमंतांच्या बायका वेळ घालवण्यासाठी अशा क्लबांमध्ये सामील होत. त्यातही अनेकजणींना मिरवण्याची हौस असते. आपल्या नवऱ्याच्या नोकरीतील किंवा समाजातील पदाचा-प्रतिष्ठेचा फायदा त्या उठवत. हे सगळं हेरून त्यांनी आपलं लेखन विविधांगी केलं आहे. त्यांचं स्वतःच संगीतप्रेम मात्र अनेक ठिकाणी अगदी सहज श्रोत्यांच्या भेटीला येतं. कधी ते विडंबनाच्या आधारानं तर कधी थेट गायनाच्या स्वरूपात. 'भगिनी मंडळात भाऊगर्दी'मध्ये त्यांनी एका वक्त्याला चक्क 'नवऱ्याचं संगोपन' या विषयावर भाषण द्यायला लावलं आहे. शिशूसंगोपन, गोसंगोपन वगैरे आपल्याला ठाऊक आहे, पण नवऱ्याचं संगोपन या विषयातूनच ते विनोदनिर्मिती साधतात. पतीसंगोपनाचा पहिला धडा देताना श्रुतिकेतील पात्राच्या तोंडून ते म्हणतात, 'पतीचं संगोपन करायचं आहे, हा विचार सोडून द्या...' आणि मग नवराबायकोच्या साध्या संवादातून त्यांनी जी धमाल आणली आहे ती पुलंच्या शैलीचं अफलातून दर्शन घडवणारी आहे. त्यानंतरचा वक्ता चक्क 'लोकरीचे विणकाम आणि स्त्रिया' या विषयावर बोलतो. लोकर, सुया, रिकामा वेळ आणि नवऱ्याचं पाकीट रिकामं करण्याची शक्ती या विणकामाला आवश्यक गोष्टी आहेत, अशा वाक्यातून पुरूष श्रोत्यांकडून ते हशा वसूल करतात. सुज्ञ महिला श्रोतेही त्यात सामील होतात. पत्नी माहेरी जाणं हा वर्षानुवर्षे संसार केलेल्या नवरोजींसाठी कपिलाषष्ठीचा योग समजला जातो. अशावेळी नवऱ्याची जी धांदल उडते, ते नमूद करणारी नाट्यछटा भरपेट हसवते. बायकोची माहेरची ओढ, तिला स्टेशनवर वेळेपूर्वी सोडण्याची मनःपूर्वक दाखवलेली तयारी अशा अनेक गोष्टींचा उहापोह करणाऱ्या या नाट्यछटेनं ही श्रुतिका श्रोत्यांना रेडिओशी खिळवून ठेवू शकते. श्रुतिका लिहिताना पुलंनी योग्य भाषेचा काटेकोर वापर केला आहे. त्यांच्यामते काही शब्द वाचताना फारसे त्रासदायक नसतात, पण उच्चारल्यानंतर ते प्रक्षोभक होतात. त्याचं भान सतत ठेवलं पाहिजे. कौटुंबिक श्रुतिका लिहिताना त्याचा विचार अगत्यानं करायला हवा. लहान मुलांचं अनाठायी कुतुहल जागृत होऊ न देण्याची खबरदारी श्रुतिका लेखकाला घ्यावी लागते. त्यामुळं विषयाची निवड आणि मांडणी करताना निरनिराळ्या वयोमर्यादा व बुद्धिमर्यादेचे गट एकत्र असणार आहेत, याची जाणीव लेखकाला असावी, असं ते आवर्जून सांगतात.

'सुखी संसार' या श्रुतिकेत पुलंनी 'दोन किंवा तीन मुले' असतील तरच संसारात गोडी राहते, हे अगदी रंजक पद्धतीनं सांगितलं आहे. नारूमामा आणि रामराव या दोन मित्रांच्या भेटीतून ही श्रुतिका खुलत जाते. नारूमामाला नऊ मुलं आहेत तर रामरावांना तीन. त्यांची गावं वेगवेगळी असली तरी हे दोघे बालमित्र असतात. कारण त्या दोघांचं आजोळ एकाच गावात. एकेदिवशी एका गावच्या आठवडा बाजारात भल्या मोठ्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी नारूमामा बैल विकायला जातात तर तिथं रामराव बैल खरेदीला आलेले असतात. त्यांची भेट होते आणि रामरावाच्या आग्रहामुळं, परतीच्या वाटखर्चाला पैसे दिल्यामुळं नारूमामा त्याच्या गावी जातात. तीन मुलांचं त्याचं सुखी कुटुंब पाहून नारूमामाला आपली चूक कळते. खाणारी तोंड वाढली की उत्पन्न वाढवावं लागतं, ते नसलं तर उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसती कचकच सुरू. रामराव आपल्या मुलांना बगीचा करून देतात, मुलीला गुलाबाची तर मुलांना भाजीपाल्याची देखभाल करायला लावतात. ही मुलं आणि त्यांची आई सुखानं नांदत असतात. त्याचवेळी नारूमामांना आपल्या नऊ मुलांची कटकट आठवते. शेवटी 'मुले थोडी तर संसारात गोडी' हा संदेश ते देतात. कुटुंबनियोजनाचं महत्त्व सांगणाऱ्या या श्रुतिकेत कुठंही सरकारी प्रचाराचा थाट नाही. पण संदेश मात्र नेमका दिला आहे. रेडिओ सरकारी माध्यम असलं तरी त्यात रुक्षता कशाला, विनोदाची पखरण करत हवा तो संदेश लोकांपर्यंत प्रभावीपणे देता येतो, हे पुलंनी या श्रुतिकेतून दाखवून दिलं आहे. अशा श्रुतिकेत वासनांच्या आहारी जाऊन चालत नाही, असं सांगताना योग्य त्या शब्दांचा वापर त्यांनी केला आहे. जोडीला संत रामदासांचं 'लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी निघोन गेली, बापडी भिकेस लागली काही खाया मिळेना...' या वचनाचा उल्लेख केला आहे.
 
पुलंनी लिहिलेल्या श्रुतिकांमध्ये पात्रसंख्या जाणीवपूर्वक कमी ठेवली आहे. जास्त पात्रं असतील तर कोण कोणता संवाद म्हणतंय, आणि कुणाच्या प्रश्नाला कोण उत्तर देतंय हेच श्रोत्यांना कळत नाही. म्हणून पुलंनी दोन किंवा तीन पात्रेच घेतली आहेत. गरजेनुसार लहान मुले किंवा एखाद दुसरं पात्र वाढवलं आहे. तथापि, ती विषयाची गरज म्हणून. पात्रं बोलताना त्यांचे संवाद दोन किंवा तीन-चार शब्दांचे ठेवूनही चालत नाही. त्यामुळं गुंता अधिकच वाढतो. प्रत्येक पात्राची विशिष्ट लकब किंवा शैली ठेवली तर ते आणखी सोपं होतं. काही जणांना 'काय हो' किंवा 'बरं का' अशी सुरूवात करून बोलायची सवय असते. ती एखाद्या श्रुतिकेत वापरता येते. त्याचप्रमाणं एखाद्याच पात्राला भरपूर संवाद आणि दुसऱ्याला एखाद-दुसऱ्या शब्दाचा हुंकार असं लेखन उपयोगाचं नाही, असंही ते सुचवतात. फक्त दोनच पात्रांच्या म्हणजे नवरा-बायकोच्या संवादाच्या 'एकेकाची हौस'सारख्या श्रुतिका श्रोत्यांना खिळवून ठेवतात.

'एकेकाची हौस'ची सुरूवातही गंमतीशीर केली आहे. बायको नवऱ्याला जेव्हा 'अहो ऐकलं का' असं म्हणते तेव्हा काहीतरी गडबड होणार हे त्यानं गृहित धरलेलंच असतं. पण तसं उघडपणे म्हणण्याची सोय नसते. चुकून तसा काही उदगार त्यानं काढलाच तर विसंवादाला म्हणजे भांडणाला सुरूवात.

वर्तमानपत्र वाचण्यात रमलेल्या नवऱ्याला बायको म्हणते, 'अहो ऐकलं का' आणि तो अभावितपणे उद्गारतो, 'अरे बाप रे.' आणि मग उभयतांच्या विसंवादी संवादाची फटाक्याची माळ उडू लागते तेव्हा श्रोत्यांना हसून हसून पुरेवाट होते. अरे बापरे म्हणायचं कारण काय, असं ती विचारते, त्यावर आपली चूक कळून ती सावरण्यासाठी तो म्हणतो, वर्तमानपत्रात बातमी आलीय, नागपूरचं तापमान ११७ डिग्री झालंय म्हणून. मग ती चतूर बायको वर्तमानपत्र पाहते. बातमी नसतेच. मुद्दा असतो तो तिच्या माहेरची माणसं राहण्यासाठी येणार असतात. शेवटी नवऱ्याला आपली वळकटी वऱ्हांड्यात पसरावी लागते आणि बायकोच्या माहेरच्या माणसांना जागा करून द्यावी लागते. मुंबईसारख्या शहरामध्ये एखाद्या दुसऱ्या खोलीत राहणाऱ्या लोकांना पाहुणे हे संकट वाटते. त्यातही ते राहायला येणार आहेत, म्हटल्यावर तर अडचणीत भरच. त्याचं खुमासदार वर्णन पुलंनी आपल्या कमावलेल्या शैलीत केलं आहे.

पुलंच्या कौटुंबिक श्रुतिका रंगण्याचं कारण त्यांचं निरीक्षण. ज्येष्ठ नाटककार वसंत सबनीस यांनी पुलंच्या या गुणाचं वर्णन करताना एके ठिकाणी म्हटलंय : पुलंची निरीक्षणशक्ती फार सूक्ष्म आहे. माणसांचे आणि माणसांच्या स्वभावातील तपशील त्यांना चटकन जाणवतात. सहज बघितले तरी अनेक बारकावे त्यांच्या लक्षात येतात. एखादी व्यक्ती समोरून गेली तरी ती व्यक्ती कोण असेल, तिचा व्यवसाय काय असेल, तिची परिस्थिती काय असेल, ती घरात कशी बोलत असेल याचे अंदाज ते सहज बांधतात. अशा व्यक्ती पाहून ते संवाद बोलत असत. हा त्यांचा खूप जुना छंद आहे.

श्रुतिकांमधील व्यक्तिरेखा नमुनेदार वठण्यासाठी पुलंच्या या गुणाचा उपयोग निश्चितच झाला आहे. पुलंचं मराठीवर असलेलं प्रभुत्व. त्यांनी केलेली माणसांची निरीक्षणं यातून त्यांच्या श्रुतिका आणि नाटकेही उत्तम उतरली आहेत. पुलंनी गडकऱ्यांची भाषा संत, पंत आणि शाहिरी अशी तीन्ही वळणे लीलेने घेते असं म्हटलं आहे. पुलंनीदेखील भाषेला हवे तसे वाकवले आहे. सुभाषितवजा वाक्यं लिहिताना त्यांनी म्हणी आणि वाक्प्रचारांचा केलेला वापर, नव्याने 'कॉईन' केलेले शब्द, म्हणी पाहिल्या की थक्क व्हायला होतं. सातारी, कोल्हापूरी, वऱ्हाडी वळणाचं त्यांचं लेखन विविध पात्रांच्या मुखातून ऐकायला मिळतं. पुलंच्या श्रुतिकाही श्रोत्यांना रोचक वाटतात, त्याचं कारण त्यांचं बोलल्यासारखं लिहिणं. वास्तविक, पुलंच्या सगळ्याच लेखनाबाबत तसं म्हणता येईल. त्यांचं लेखन बोलल्यासारखंच आहे. प्रथमपुरूषी एकवचनी उल्लेख असल्यानं त्यांचा लेख वाचताना ते समोर बसून आपल्याशी बोलत आहेत, असंच वाटतं. 'अत्र्यांच्या लेखनात मला बोलक्या शब्दांची क्वॉलिटी सापडली. अत्रे उत्तम वक्ते होते, त्यामुळं त्यांना शब्दांच्या प्रवाहाचा साक्षात्कार झाला होता,' असं त्यांनी म्हटलं आहे. 'शब्द गाते-बोलते हवेत,' अशी त्यांची धारणा होती. बोलल्यासारखं लिहिल्यावर लिहिलेलं पुन्हा कसं बोलावं? हाही प्रश्नच आहे. ते म्हणतात : रेडिओ हा मुख्यतः बोलविता धनी आहे, वाचविता नाही. 'बोलेल तो करील काय?' या प्रश्नाला रेडिओनं चांगलं उत्तर दिलं आहे. जो चांगला बोलेल, तो उत्तम रेडिओ लेखक होईल. हा 'रेडिओ लेखक' शब्द जरा धेडगुजरी झाला. थोडासा वदतो व्याघातही त्यात आला. रेडिओ जर बोलविता आहे, तर तो लिहविता आणि वाचविता कसा? एवढ्यासाठी की इतर काही बंधनापूर्वी तो वेळेचं बंधन मानतो. तुम्ही नाटक लिहा, भाषण लिहा, कविता वाचा, बातम्या सांगा – काय वाटेल ते करा, समोरचा मिनिटाचा पंजर विसरून काहीही करता येत नाही. इथं शब्द सेकंदाच्या तालात मोजून लिहावे लागतात. पण ऐकणाऱ्याला बोलणारा मोजूनमापून बोलतो आहे हे न कळता मोजूनमापून बोलावं. म्हणजे सहजतेची गंमत हवी, आणि चालायचं आहे तारेवर.

पुलंनी 'रेडिओसाठी लिहावं कसं' यावर रेडिओवर दिलेल्या भाषणातून वरील मुद्दा घेतला आहे. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या कसोट्या त्यांच्याच श्रुतिका आणि नभोनाट्यलेखनाला लागू पडतात. पुलंचं लेखन उच्चारासह असतं. त्यांची भाषा लवचिक आहे. आपल्या नेहमीच्या बोलीभाषेतील संवादामुळं त्यांचं लेखन आपलंसं वाटतं.

'मी हात दाखवतो,' 'मी अभ्यास घेतो', 'मी कपडे शिवतो' अशा काही श्रुतिकांमधून पुलंनी मध्यमवर्गीय घराघरातील संवादांनी सर्वांना हसवलं आहे. 'मी हात दाखवतो'मध्ये ''तुम्ही नाही का म्हणाला, माझं इंग्लिश कच्चं आहे – सारखं इंग्लिश बोललं की सुधारेल म्हणून! इंग्लिश लोक सारखं इंग्लिश बोलतात म्हणून त्यांचं इंग्लिश सुधारतं. तुम्हीच नाही का सांगितलंत?'' किंवा वडिलोपार्जित इस्टेटीतील काही तरी येणार तुमच्यापर्यंत असं हस्तरेषातज्ज्ञ नाबर म्हणतात तेव्हा, '' वडलांना दमा होता आमच्या. तेवढा ठेवलाय आमच्यासाठी. त्याखेरीज काही ठेवलं नाही'', असं म्हणून ते हशा मिळवतात. भविष्याबाबत काही शंका विचारल्या तर त्याचं उत्तर देता यायचं नाही हे ओळखून हस्तरेषातज्ज्ञ नाबर सुनावतात, ''या भविष्याच्या बाबतीत भलत्या शंका विचारलेल्या रूचत नाहीत. मी स्पष्टच सांगतो. रागावू नका. मी कडक मंगळाचा माणूस, नको म्हटलं तरी तोंडातून शब्द जायचा तो जरा तिखटच!'' या श्रुतिकेतील अण्णा आणि त्याच्या कुटुंबाचं भविष्य सांगता सांगता नाबर अण्णांच्या पत्नीला शांताला त्यांचा गळा गोड असल्याचं सांगतात आणि सराव केल्यास उत्तम गायिका होण्याची चिन्हे असल्याचं भविष्य वर्तवतात.

नाबर – तुम्ही सकाळी उठून तंबोऱ्यावर स्वच्छ मेहनत करा.
अण्णा - मी?
नाबर – तुम्ही नाही हो! ह्या. नाही गळा तयार झाला तर दुसऱ्याचा सोडा, माझा हातदेखील मी हातात धरणार नाही - हां!

नाबर यांच्या अशा प्रोत्साहनानं मग शांताबाई गाणं शिकायला लागतात. 'मी अभ्यास घेतो'मध्ये त्यांच्या आवाज नसताना गाण्याच्या अट्टहासाची खिल्ली ते उडवतात. त्या गायला लागतात, तेव्हा अण्णा त्यांना म्हणतात, 'हळू.' कारण ते मुलांचा अभ्यास घेत असतात. एकाचवेळी शांताच्या गाण्याचा अभ्यास आणि दुसरीकडं मुलांचा अभ्यास यातून जी गंमत होते, ती पुलंनी सुरेख फुलवली आहे. शांताला अस्ताईचा सराव करायला सांगता सांगता, आईपेक्षा मुलगा शंकरच 'लट उलझी सुलझा' ही ओळ छान म्हणतो. तेव्हा छबीही तसं म्हणू लागते. अण्णा खेकसून म्हणतात, छबे गणित सोडवायचं ना तुला? तेव्हा शंकरनं गाणं म्हटलं की, असा हवाला ती देते. अण्णा म्हणतात, 'तो मुर्ख आहे.' छबी चटकन म्हणते, 'मग आई म्हणते ते? ती काय मुर्ख आहे?' तिच्या या बिनतोड युक्तिवादावर अण्णा निरूत्तर होतात. शेवटी छबी म्हणते की तिला आईसारखं गाणं म्हणायचं आहे. अभ्यास सोडून गाणं म्हणायला विरोध करण्यासाठी अण्णा म्हणतात, '' छबे, चावटपणा नाही -'' गाणं शिकवणारे नाबर गुरूजी त्यामुळं नाराज होतात. सुमार दर्जाचं असलं गाणं अण्णांना आवडत नसतं. पुलंनी असल्या शिकण्याची रेवडी मस्त उडवली आहे. 'गाणं ही सोपी गोष्ट नाही,' हेच त्यांनी ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. हौशी गायकांना मारलेला हा टोमणा मजेशीर आहे.
रेडिओ ऐकणारा जो वर्ग आहे, त्याची नस पुलंनी ओळखली होती, त्यामुळं त्यांच्या श्रुतिका त्यांच्या अन्य लेखनासारख्याच खुमासदार आहेत. रेडिओवर त्यांनी दिलेली विविध विषयांवरील भाषणेदेखील त्यांच्या खुसखुशीत लेखणीचा प्रत्यय देणारी आहेत. अफाट वाचन, सुक्ष्म निरीक्षण शक्ती, मानवी स्वभावातील उण्या-अधिक गोष्टी, विनोदी शैली यामुळं त्यांची भाषणं, श्रुतिका कलाक्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच भूरळ घालणाऱ्या आहेत. कारण नृत्य, नाट्य, गायन, वाद्यवादन, चित्रकार, इतकंच नव्हे तर सर्व प्रकारच्या कौशल्य असलेल्या शिंपी, धोबी, सुतार अशा माणसांबद्दल पुलंनी जाणीवपूर्वक किंवा जाता-जाता केलेली शेरेबाजी खूप शिकवणारी आहे. प्रत्येक पात्रासारखी होणारी त्यांची लवचिक भाषा श्रोत्यांना त्या पात्राबरोबर वाहवत नेते आणि हितगूज साधल्यासारखी त्यांची भाषणशैली पुलं आपल्या पुढ्यात बसूनच जणू आपल्याशी बोलत आहेत, असा प्रत्यय देणारी आहे. रेडिओ माध्यमाचं मर्म नेमकं ओळखलेल्या पुलंनी त्या माध्यमासाठी केलेलं लेखन विषयदृष्ट्या कालबाह्य वाटत असलं तरी शैली म्हणून ते लेखन चिरकाल अभ्यास करण्यासारखं आहे, यात शंका नाही.

रजनीश जोशी,
सोलापूर

0 प्रतिक्रिया: