Wednesday, July 11, 2007

पु. ल. नावाचे गारुड - सतीश आळेकर

पु. ल. गेल्यावर आमचा कलकत्त्याचा समीक्षक मित्र शमिक बॅनर्जी पुण्यात आला होता त्याने ही आठवण सांगितली. पु. ल. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचे पाच वर्षे मानद उपाध्यक्ष होते. एका बैठकीनंतरच्या भोजनोत्तर मैफलीत एक प्रसिद्ध नाटककार खूप सात्विक संतापले होते. त्यांना न विचारता त्यांच्या नाटकांचे कोणी अन्य भाषेत प्रयोग केले होते. त्यामुळे कॉपीराईटचा भंग होतो असा प्रकार होता. त्यांची अनेकांनी समजूत घातली पण त्यांचा राग धुमसत होताच. 

वाद वाढल्यावर पु. ल. तेथे असलेली हार्मोनियम काढून म्हणाले, मी आता तुम्हाला माझा प्रयोग करुन दाखवतो. त्याचा मात्र कॉपीराईट कोणाकडे नाही. कोणीही हा प्रयोग गावोगाव कोणत्याही भाषेत करावा, असे म्हणून पु. लं.नी हार्मोनियम वाजवणे सुरु केले. जरा रंग भरल्यावर ते आलाप आणि ताना घेऊ लागले. त्याला अर्थातच अभिनयाची जोड होती. पण एकही शब्द नव्हता. नंतर सर्वांच्या लक्षात येऊ लागले की आलापी आणि तानांमधून एक तरुण आपल्या प्रेयसीकडे प्रेमयाचना करतो आहे, तानांमधून ती तरुणी लाजते आहे. मग ताना मारीत त्यांचे प्रेम चालते. मग दोघांचे ताना आणि आलापीमधून लग्न होते. ताना मारीत बाळंतपण होते. मग भांडण... पुन्हा ताना... पुन्हा प्रेम जमते. ताना मारीत संसार फुलतो असा मामला. 

पु. लं.नी एकही शब्द न उच्चारता केवळ ताना आणि आलापीमधून अर्धा तास जिवंत केला. समोरचे सगळे गडाबडा लोळायचे तेवढे राहिले होते. शमिक म्हणाला, 'कोणतीही तयारी, पूर्वसूचना नसताना हा माणूस इतका चोख परफॉर्मन्स देत असेल तर त्यांचे परफॉर्मन्स विषयीचे चिंतन किती परिपक्व असेल? ह्या माणसाभोवती महाराष्ट्राचे सांस्कृतिक जग केंद्रित का होते, ह्याचे जणू उत्तरच पु. लं.नी आम्हाला त्या अर्ध्या तासात दिले. 

' - श्री. सतीश आळेकर 
(पु. ल. नावाचे गारुड)