Tuesday, February 28, 2017

मराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा

पुस्तक वाचणारा माणूस हा जीवनात आनंदाच्या, ज्ञानाच्या किंवा गेला बाजार इतरांना कसलाही उपद्रव नसलेल्या विरंगुळ्याच्या शोधात असतो. पाचपन्नास पानं वाचल्याशिवाय दिवस न घालवण्याची सवय मला अगदी लहानपणापासूनंच जडली ती आजही सुटली नाही. काहीतरी वाचल्याशिवाय दिवस गेला तर, अंघोळ न करता गेलेल्या दिवसासारखं मला वाटतं आणि अंघोळ करताना जसं आपण आपलं आरोग्य चांगलं राहावं हा विचार मनात बाळगून अंघोळ करतो असं नाही, अंघोळ या गोष्टीचाचं आनंद असतो तसंच वाचनाचं आहे. कुठलं पुस्तक कुठल्या प्रकारचा आनंद देऊन जाईल ते सांगता येत नाही. समर्थांचं 'दिसामाजी काहीतरी ते लिहावे' यापेक्षा 'प्रसंगी अखंडित वाचीत जावे', हे मात्र मला शंभर टक्के पटलं.

आपलं सांगणं खूप लोकांना कळावं, ही ओढ माणसाला असते. लेखकाला ती अधिक असते. ज्याला काही सांगायचं असतं असा लेखक जेव्हा लिहितो, तेव्हा वाचकाला आपण प्रिय व्हावं म्हणून न लिहिता ते त्याला कळावं म्हणून लिहितो. तिथं तो मग आपण लोकप्रियही व्हावं म्हणून तडजोड करत नाही. त्याचं म्हणणं कित्येकदा त्याचा समकालीन समाज स्विकारत नाही. पण समाजाला वर्तमानाची जाण असलीच लेखकमंडळी आणून देत असतात. *साहित्याचा इतिहास वैभवशाली केला आहे, तो प्रत्येक काळातल्या वर्तमानाची जाणीव असलेल्या साहित्यिकांनी.* पुष्कळदा अशा लेखकांच्या बाबतीत ते काळाच्या फार पुढे होते, असं म्हटलं जातं. वास्तविक ते त्या-त्या वेळच्या वर्तमानाबरोबर असतात. हरिभाऊ यमूचे हाल सांगत होते. ते त्यांच्या काळातल वर्तमान होतं, जोतिबा फुले ज्या वेळी शेतकर्‍यांच्या दारिद्र्याचं वर्णन करीत होते, ती त्यांच्या काळातली वर्तमान परिस्थिती होती. दुर्दैवानं पुष्कळशा प्रमाणात आजही ती बदलावी तितकी बदललेली नाही. आजचं वर्तमान हे भूतकाळाच्या कुठल्या चुकांची परिणती आहे, हे ध्यानात आल्यावर भूतकाळाचे नुसते गोडवे गात बसण्याला अर्थ राहत नाही.

आपल्या मराठीत भाषाप्रभुत्वाच्या बाबतीत आणि सभ्यता व संस्कृती यांच्या बाबतीत अजूनही काहीतरी भलत्याच कल्पना धरुन राहणारे लोक आहेत. ज्याच्या मराठीत संस्कृत भाषेतल्या तत्सम शब्दांचा खच्चून भरणा असतो, तो भाषाप्रभू अशी आपलीही समजूत आहे. जास्तीत जास्त लोकांना कळेल अशा भाषेत आपलं म्हणणं सांगणारा... तो आपल्याला भाषाप्रभू वाटतच नाही. साध्या वर्‍हाडी बोलीत लाखो लोकांना आपलं म्हणणं ऐकवीत एका जागी खिळवून ठेवणारे *गाडगे महाराज* हे आम्हांला भाषाप्रभू वाटलेच नाहीत.

आपल्याला सदैव भूतकाळाला जखडून ठेवणार्‍या आपल्या वर्णव्यवस्थेचं प्रतिबिंब भाषाप्रभुत्वाविषयीच्या आपल्या गैरसमजात लख्खपणाने उमटलेलं आहे. भाषा ही गोष्ट समाजापासून अशी अलिप्तपणानं वागून कधीही समृद्ध होत नाही. सभ्यता, शिष्टपणा, उच्चपणा हा आम्ही मराठी लोकांनीच मुळी संस्कृत भाषेचं सोवळं नेसवून ठेवला होता. पुढे साहेबाचं राज्य आल्यावर ह्या मोठेपणाच्या कल्पना आम्ही इंग्रजी भाषेच्या बॅगेत आणून भरल्या. त्यामुळे या महाराष्ट्रात एक तर संस्कृतप्रचुर भाषेला मान; नाहीतर फर्ड्या इंग्रजीला !

मराठी भाषेचे शिवाजी, चिपळूणकरसुद्धा मराठी म्हणून जी भाषा लिहित होते ते त्यांच्या वेळच्या मावळ्यांच्या डोक्यावरुन जाणारीच. आणि आम्ही त्या मराठी भाषेत संस्कृतचे पांडित्य दिसून येतं म्हणून खूश ! आजदेखील विंदा करंदीकरांचं सुंदर खमंग मराठीतलं बालगीत म्हणणार्‍या मुलापेक्षा 'जॅक अॅण्ड जिल' म्हणणार्‍या मुलाचं कौतुक अधिक. आणि लहान मुलावर 'दिव्या दिव्या दीपत्कार'पेक्षा 'शुभं करोति कल्याण' हे संस्कृत अनुष्टुभ म्हटलं तरंच संस्कार ! मुळात लोकांच्या वापरातील मराठी शब्दांची हकालपट्टी करुन तिथे कुणाच्याही कानावर न पडलेल्या संस्कृतशब्दांची नेमणूक करण्यामागे ज्ञान मर्यादित लोकांच्या हाती ठेवण्याची भावना असते असं मला वाटतं.

(अपूर्ण)
पु.ल.
(महाराष्ट्र साहित्य पत्रिका, जुलै-सप्टेंबर १९८२)

संग्रहक - संजय आढाव‎
०५/०१/२०१७

Monday, February 20, 2017

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व - शेफाली वैद्य



आठ नोव्हेंबर, पुलंचा जन्मदिवस. पु. ल. गेले तेव्हा मी नुकतंच लग्न होऊन मी दिल्लीला राहायला गेले होते. घरी टीव्ही तेव्हाही नव्हता आणि इंटरनेटचा वापरही तेव्हा कमी होता. मराठी पेपर मी घ्यायची पण ते तीन दिवसानंतर यायचे. त्यामुळे पु. ल. इस्पितळात आहेत, अत्यवस्थ आहेत हे माहिती होतं. हे कधी तरी घडणार आहे हेही माहिती होतं. पण तरीही मन ही वस्तुस्थिती स्विकारायला तयार नव्हतंच. पु.ल. गेले ही बातमी माझ्या वडिलांनी मला फोन करून कळवली तीही नवरा घरी असल्याची खात्री करून घेऊन. माझं पु.ल. प्रेम त्यांना चांगलंच ठाऊक होतं. बातमी ऐकली आणि मुसमुसून रडायलाच लागले. घरातलंच कुणीतरी अत्यंत जवळचं माणूस गेल्यासारखं निराधार वाटत होतं मला. माझ्या नवऱ्याला कळेना की मी एव्हढी का रडतेय. तो अमराठी असल्यामुळे त्याने पुलंविषयी फक्त ऐकलं होतं. त्या दिवशी मी केलेला सगळा स्वयंपाक तसाच्या तसा बाजूला ठेवून दिला. घश्याखाली घासच उतरेना. त्या दिवशी मी दोन तास खपून मी पापलेटचं कालवण बनवलं होतं. त्या दिवसानंतर जवळ जवळ दोन वर्षे मी पापलेटला हातही लावला नाही. मासळी बाजारात पापलेट दिसलं तरी मला पु. ल. आठवायचे.

पु. ल. गेल्यानंतर फक्त माझ्याच घरी नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक घरात हेच वातावरण होतं. पु. ल. नुसते लेखक नव्हतेच कधी. ते मध्यमवर्गीय महाराष्ट्राच्या भावविश्वाचा एक अविभाज्य भाग होते. मी आठ वर्षांची होते तेव्हा माझ्या हातात पु. ल. देशपांडेंचं पहिलं पुस्तक पडलं - पु. ल. एक साठवण. माझ्या काकांनी ते माझ्या आजोबांना भेट म्हणून दिलं होतं. तेव्हा मी नुकतीच 'जादूची अंगठी आणि सुलभ पंचतंत्र' वगैरे पुस्तकांची यत्ता ओलांडून फास्टर फेणे आणि वि. वि. बोकीलांचा वसंता वाचायला लागले होते. ह्या दोन्ही लेखकांच्या पुस्तकांमधून विनोद बऱ्यापैकी असायचा. पण पु. ल. एक साठवण ह्या पुस्तकाने मला एकटीनेच खदाखदा हसायला शिकवलं. पुलंच्या विनोदातले न्युआन्सस कळायचं वय नव्हतं ते, पण त्यांचा शब्दप्रधान विनोद बऱ्यापैकी कळायचा. त्यातल्या न-नाट्य मधल्या इंग्रजीच्या 'इंटू मराठी' अनुवादाला खूप हसले होते मी. अंगुस्तान विद्यापीठ, सदू आणि दादू हे त्या पुस्तकातले मला खूप आवडलेले काही लेख. चाळ मधली संगीतिका आवडली होती पण शेवटचं स्वगत मुळीच आवडलं नव्हतं. ते कळायचं वयच नव्हतं ते. पुलंचा नॉस्टॅल्जिया कळायला पुढे फार वर्षे जावी लागली. साठवणची तेव्हा मी अक्षरशः पारायणे केली. आजही ते सर्वांगाने खिळखिळं झालेलं पुस्तक माझ्या संग्रही आहे.

त्यानंतर मी पुलंची पुस्तके मिळवून मिळवून वाचायला लागले. तेव्हा गोव्यात मराठी पुस्तके तितक्या सहजपणे विकत मिळत नसत. त्यामुळे जवळच्या गावातल्या सरकारी वाचनालयाची वर्गणीदार झाले. माझ्या गावापासून पाच किलोमीटर वर ती लायब्ररी होती. कधी बसने, तर कधी चालत मी तिथे जायची आणि पु लंची पुस्तके शोधायला तिथली कपाटे पालथी घालायची. त्या लायब्ररीत तेव्हा कुमुदिनी रांगणेकर, योगिनी जोगळेकर, बाबा कदम वगैरे 'लोकप्रिय' कादंबरीकारांचीच जास्त भरती होती, तरीही मला तिथे पुलंची तीन-चार पुस्तके मिळाली, असा मी असामी, बटाट्याची चाळ आणि व्यक्ती आणि वल्ली मी तिथूनच मिळवून वाचली. पुढे माध्यमिक शाळेत गेल्यानंतर विविध स्पर्धांमधून भाग घ्यायला लागले. तिथे क्वचित रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळायची. ती रक्कम साठवून साठवून मी पुलंची पुस्तके विकत घायला लागले. आज पुलंची जवळ जवळ सगळीच पुस्तके माझ्या संग्रही आहेत. कधी कधी मी कल्पनाचित्रेही रंगवायची, की मी पुण्याला पुलंच्या घरी जाऊन धडकलेय आणि त्यांना गटणेच्या आविर्भावात विचारतेय, 'आपल्या प्रतिभासाधनेत व्यत्यय तर आणत नाही ना मी'?

जसजशी पु. ल वाचत गेले तसतसा मला त्यांचा मोठेपणा कळत गेला. हा माणूस नुसता लेखक नव्हता, तर थोर नट होता, संगीतकार होता, अभ्यासू, डोळस, रसिक होता, गुणग्राहक होता, व्यासंगी होता आणि समाजाला भरभरून दोन्ही हातांनी देणारा उदारहृदयी दाताही होता! फक्त विनोदी लेखक हे त्यांना लावले जाणारे लेबल किती क्षुद्र आणि तोकडे आहे हे मला जाणवायला लागले. तरुण लेखकांची पुलंनी भरभरून केलेली स्तुती, त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना, 'एक शून्य मी' सारख्या पुस्तकातलं त्यांना जाणवलेलं समाजाचं वाहवत जाणं आणि त्यातून त्यांना आलेली सुन्न विफलता, सगळंच मला आतून, खोलवर भिडत गेलं, कळत नकळत माझ्या व्यक्तिमत्वावर पुलंचा एक सखोल प्रभाव पडत गेला.

गोवा हिंदू असोसिएशनच्या स्नेहमंदिर ह्या वृद्धाश्रमाच्या पायाभरणीला पु. ल गोव्याला येणार होते. मी माझ्या वडिलांचं डोकं खाऊन खाऊन त्यांना गोवा हिंदूच्या रामकृष्ण नायकना भेटून त्या समारंभाला हजर राहायचं आमंत्रण मिळवलं. त्या कार्यक्रम पु. ल आणि कुसुमाग्रज असे दोन्हीही मराठी साहित्यसृष्टीतले दिग्गज येणार होते. मी जेव्हा कार्यक्रमस्थळी पोचले तेव्हा माझे पायच लटपटत होते. अकरावीला वगैरे असेन मी तेव्हा. हिंमत करून पुलंची स्वाक्षरी घ्यायला गेले. गटणेच झाला होता माझा. 'आपण आणि साने गुरुजी माझे आदर्श लेखक आहात' असं म्हणायचं होतं, पण तोंडातून शब्दच फुटेना. पुलंनीच मला कोकणीतून विचारलं, 'काय शिकतेस, कुठं राहतेस' वगैरे. तेव्हढ्यात तिथला फोटोग्राफर आला. त्याला पु. ल आणि कुसुमाग्रजांचा फोटो हवा होता. मी संकोचून बाजूला होणार तेव्हढ्यात पु. ल कोकणीत म्हणाले, 'तू उबी राव गो फोटोक' आणि मी ही फोटो साठी उभी राहिले. दुर्दैवाने पु. ल आणि कुसुमाग्रज ह्या दोन फार मोठ्या माणसांसोबत काढलेला तो फोटो मला कधी बघायलाच मिळाला नाही कारण त्या फोटोसाठी कुणाला विचारावं हे मला माहितीच नव्हतं. पण ह्या दोघांचीही अनमोल स्वाक्षरी मात्र माझ्या संग्रही आहे. पुढे काही वर्षांनंतर एका लेखाच्या संदर्भात मी स्नेहमंदिर मध्ये गेले होते तेव्हा मी तिथल्या व्यवस्थापकांना त्या जुन्या फोटोंबद्दल विचारलं पण त्यांनाही काही माहिती नव्हतं.

काही वर्षांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी मी पुण्याला आले. तेव्हाही पु. लंना भेटायचं हा ध्यास मनात होताच. कुठून कुठून विचारून विचारून मी त्यांचा फोन नंबर मिळवला आणि सगळी हिंमत एकवटून त्यांना फोन केला. त्यांनीच उचलला फोन. मला बोलायला शब्द फुटेनात. तरी कसंबसं म्हटलं. 'मी शेफाली वैद्य, गोव्याची आहे. तुम्हाला भेटायचंय', त्यांनी लगेच परत कोकणीतून बोलायला सुरवात केली, खूप मायेने त्यांनी 'काय शिकतेस, कुठे राहतेस, पुणं आवडतंय का, फिश खावंसं वाटतं का' वगैरे सगळी चौकशी केली. मग म्हणाले 'आजकाल माझी तब्येत बरी नसते. कुणाला भेटावंसं वाटत नाही. त्रास होतो. रागावू नकोस. काही महिन्यांनी फोन कर. बरा असलो तर जरूर भेटेन'. पण तो योग काही आलाच नाही, कारण त्यांची प्रकृती पुढे खालावतच गेली. त्यांना कंपवाताने गाठलं होतं. मलाही फोन करण्याचा धीर झाला नाही परत.                                
त्यानंतर तर मी पुणंही सोडलं. मी मुंबईला राहात होते तेव्हा त्यांना महाराष्ट्रभूषण जाहीर झालं होतं. तो कार्यक्रम प्रभादेवीला रवींद्रमध्ये साजरा झाला. तेव्हा पुलंची तब्येत खूपच खालावली होती. वार्धक्याने, कंपवाताने त्यांचा देह अगदीच आटून गेला होता. त्यांचं भाषणही ते स्वतः करू शकले नव्हते. कार्यक्रम संपला, बरेचसे प्रेक्षक निघून गेले, पण माझ्यासारखे पुलकित झालेले लोक मात्र रंगमंचावरून ज्या दाराने पु. ल बाहेर पडणार होते तिथे जाऊन उभे राहिले. पु. ल व्हीलचेअर मध्ये होते. भक्ती बर्वे ती चेअर स्वतः ढकलत रॅम्पवरून खाली घेऊन आल्या. दाढी वाढवलेले, कृश पु. ल आपल्याच विचारात गढून गेले होते. त्यांना बघायला जमलेल्या गर्दीची त्यांना जाणीवही नव्हती. त्यांना दुसऱ्याच रंगमंचावरची एंट्री खुणावत होती बहुतेक. त्यांची व्हीलचेअर अगदी माझ्या समोरून गेली. मी माझ्याही नकळत डोळे पुसले. 'डोळे भरून पाहून घे त्यांना पोरी. पूढे कधी हा योग्य येईल असं वाटत नाही', माझे भरलेले डोळे पाहून शेजारी उभ्या राहिलेल्या एक साठीच्या काकू म्हणाल्या. त्यांचेही डोळे वाहातच होते, किंबहुना त्या वेळी तिथं उभ्या असलेल्या शंभर-दीडशे माणसांपैकी प्रत्येकालाच भरून आलेलं होतं. ज्या पु. लंनी आम्हा सगळ्यानांच भरभरून आनंद दिलेला त्या पु. लंना अश्या अगतिक अवस्थेत पाहणं खरोखर तापदायक होतं.

पु. लंनी आम्हाला सगळ्यानांच खूप दिलं. मुक्तहस्ते दिलं. आजही माझ्या मॅजिकबरोबर बोलताना चुकून तोंडातून इंग्रजी आलं की 'यू आर किनई अ व्हेरी व्हेरी नॉटी डॉग, बरं का रे मॅकमिलन, लिव्ह माय पदर, लिव्ह माय पदर' हे शब्द हमखास आठवतात आणि फिस्सकन हसू येतं. देशाच्या राजकारणातल्या नित्य नवीन कोलांट्या उड्या बघितल्या की 'खिल्ली' ची आठवण होते. इंग्रजी शब्दांना मराठी क्रियापदांची फोडणी देऊन 'अमेरिकन एक्सेंट' मध्ये बोलणारे लोक बघितले की 'मराठीच म्हणजे मला तितकंसं, म्हणजे आय एम नॉट बरं का' म्हणणारी वाऱ्यावरची वरातमधली मिसेस गाssद्रे डोळ्यांसमोर येते आणि जाम हसू येतं.

पु. लं च्या नाथा कामतला उर्दू कवींनी त्यांच्या ओळी त्याच्या 'प्रेमभंगाच्या तसवीरीला महिरपीसारख्या' पुरवल्या होत्या, पुलंचे शब्द आमच्यासारख्यां सामान्य लोकांना पिसांसारख्या गुदगुल्या करून हसायला लावतात, एखाद्या चीड आणणाऱ्या प्रसंगाची धार म्हणता म्हणता बोथट करून जातात!

- शेफाली वैद्य
मुंबई
तरुण भारत
08-Nov-2016
मुळ स्त्रोत--> http://www.mumbaitarunbharat.in/Encyc/2016/11/8/P-L-Deshpande-birth-anniversary