Monday, November 7, 2022

न संपणारा संवाद - मुग्धा भिडे

८ नोव्हेंबर आपल्या लाडक्या "पुलंचा" वाढदिवस आणि मनात आलं त्यांच्याशी पत्ररूपाने संवाद साधावा. म्हणून केला हा 'अट्टाहास'!

खरे तर 'फेसबुक'वर मोठं लिखाण सहसा वाचलं जात नाही. तरी लिहायला घेतलं पण माझ्या शब्दांना आवर घालता आला नाही. पुलंविषयी किती लिहिलं तरी कमीच आहे. लिहिणं जड मनाने थांबवलं. असो…आपल्या भावनांना शब्दांचं कवच घातलं आणि पत्र पूर्ण केलं.


आदरणीय भाई,
स. न. वि .वि.

भाई, आज तुमचा वाढदिवस. अर्थातच तुमचा 'वाढदिवस' हा आमच्यासाठी 'दसरा' 'दिवाळी' चा 'सण' जणू. अगदी आपल्या जवळच्या जिवलग माणसांवर आपण जशी प्रेमाची उधळण करायला सदा तत्पर असतो तसंच तुमच्या बाबतीत आम्हा चाहत्यांचं होतं. ज्याला आम्ही आमच्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणतो..

अहो! हल्ली गल्लो गल्ली काय राजकारणात काय स्वतःला 'भाई' म्हणवणारे व 'भाईगिरी' करणारे खोऱ्याने असतात पण आम्ही 'भाई' म्हणून तुम्हालाच जाणतो. आमच्या द्र्ष्टीने दुसरा कुणी 'भाई' होऊ शकत नाही. ज्यांनी माणसांच्या हृदयावर 'राज' करून मनावर 'भाईगिरी' केली आणि तेच आमच्या शेवटच्या श्वासापर्यत करत राहणार . आमच्या 'भाई' ना दुसरा कुठलाही पर्याय नाही

तुम्हाला सांगायचे तर तशी तुमची आमची 'गाठ भेट' होत असते. कधी नाथा कामत, नारायण होऊन तर कधी सखाराम गटणे, मास्तर होऊन तर नामू परीट, पानवाला होऊन...पण ही 'भेट' घडवून तुम्हीच आणता हे मात्र नक्की!

अहो, अशावेळी तुमची आमची 'गळाभेट' झाल्याचा परमोच्च आनंद आम्हाला होत असतो. तो आम्हाला होणारा आनंद गगनात न मावता खूप सारं मानसिक समाधान देऊन जातो. आमच्या चेहऱ्यावर स्मित आणण्यात तुमचा महत्वाचा मोलाचा वाटा आहे. हे तुम्हाला मान्यच करावे लागेल. तुम्ही हे कधीच नाकारू शकणार नाही.

तुम्ही आम्हाला केवळ संस्कार दिले नाहीत तर त्याच बरोबर अवलोकन करून पराकोटीचा विचार करायला सुद्धा शिकवलं आहे.कानसेन होऊन चांगल्या संगीतावर प्रेम करायला शिकवलं आहे. आणि ते श्रवण केल्याने दुखं कसं हलकं होतं हे देखील आमच्या मनावर बिंबवल आहे. ह्याचा मला बरेचं वेळा अनुभव आला आहे.उदाहरण म्हणून द्यायचे झाल्यास 'देसाई मास्तरांच्या मजेशीर शैलीतील सदा आठवणीत राहणारी मेहफिल' हेच मी देईन. तुम्ही आमच्यासाठी काय आहात म्हणून काय सांगू!

तुम्ही म्हणजे आमच्या जीवनातील चैतन्य आहात. आमच्या जगण्यातील 'संजीवनी' आहात. तुम्ही आम्हाला बहाल ज्ञानाचा माधुर्य टिकवणारा मधुर झरा बहाल केला आहे. ज्या मध्ये वेळचे बंधन न पाळता आम्ही 'नखशिखांत' भिजायला तयार असतो. तुम्ही केललं 'प्रवास वर्णन' म्हणजे आमच्या साठी एक वेगळा मजेशीर अनुभव असतो. आम्ही आमच्या रोजच्या जीवनात आजूबाजूला इतकी वेगवेगळ्या स्वभावाची विचारांची चित्र विचित्र माणसं पाहत असतो. काही लक्षात राहतात तर काहींना आम्ही पार विसरूनही जातो. पण तुमच्या 'व्यक्तींना' तुम्ही तुमच्या लिखणातून आमच्या मनात कायमचं अढळ स्थान दिलं आहे, की ज्यांना आम्ही कधी विसरू शकत नाही. मग तो अंतू बर्वा, चितळे मास्तर असो किंवा नारायण, सखाराम, गटणे असो. या सारख्या अनेक तुमच्या 'व्यक्तिरेखा' आमच्या मनात चिरकाल स्मरणात राहणार आहेत.

तुम्ही लेखक, कवी संगीतकार, पेटीवादक (पेटीला 'संवादिनी' म्हणतात हे सांगणारा तुमचा किस्सा मला नेहमी आठवतो) कथाकथनकार, वक्ता, नाटककार, कलाकार, अजून तुम्ही काय नव्हता हेच मला माहिती नाही. कुणीही 'सर्वगुणसंपन्न' नसतं असं म्हणतात. पण ह्याला तुम्ही एकमेव अपवाद आहात. तुमच्या अंगी इतके सारे गुण खचाखच भरले आहेत की गुणांनी देखील लाजावं. हे तुमचं नुसतं कौतुक नाही तर वास्तव आहे आणि उभ्या महाराष्ट्राने ते मान्य केलं आहे.तसं पाहिलं तर आम्ही तुम्हाला कधीही विसरू नये असं साहित्य नाटक, चित्रपट, संगीत असं कलेचे विशाल भांडार तुम्ही आम्हाला तुमच्यातील दानशूर वृत्तीने 'दान' म्हणून दिलं आहे. तुमचा हा अनमोल खजिन्यातील ठेवा आमच्याकडून पिढ्यानपिढ्या जपला जाईल ह्याची मला खात्री आहे. तुम्हीसुद्धा ते कौतुकाने पाहत असालच ना? की तुमचा अखंड 'वावर' सतत आमच्या हृदयात रात्रंदिवस चालू असतो ते!

भाई, पत्र पूर्ण करण्याची इच्छा होत नाही. शेवटी एवढेच सांगेन की तुम्ही आम्हाला साहित्याची देणगी जी दिली आहे त्याची 'गोळा बेरीज' कुणाला देखील मांडता येणार नाही. मग तो नावाजलेला 'गणितीतज्ञ' असला तरी...

असो कळावे, आपला हा न संपणारा संवाद अखंड चालूच राहील.

तुमची एक चाहती,
मुग्धा भिडे, पुणे

0 प्रतिक्रिया: