Tuesday, March 22, 2022

वंग-चित्रे

मंडईत ज्या ज्या भाज्या सस्त्या लावल्या असतील त्या आणाव्यात. अमुक एक भाजीचे तमुक भाजीशी गोत्र जमते की नाही याचा विचार करू नये. उदा. सुरण, कार्ली, फरसबी, रताळी, लाल भोपळा, कच्ची केळी, बटाटे, पालक, अळू, वालपापडी, वांगी, पडवळ वगैरे. बाजारातून आणल्यावर त्या धुण्याच्या किंवा त्यांच्या साली, शिरा वगैरे काढण्याच्या लफड्यात पडू नये. त्या भाज्या मनाला येतील त्या आकाराच्या चिराव्यात. शेवग्याच्या शेंगा पातेल्यात अखंड बसणार नाहीत हे ध्यानात घेऊन (बरं का भगिनींनो) जराशा तोकड्या कराव्यात.

अळू, सुरण वगैरे गळ्याशी खाजतात. परंतू खाणार्‍याच्या गळ्याची आपण कधी चिंता करू नये. हे सारे चिरून पाण्यात उकळत ठेवावे. मग त्यात मीठ, मिरची, गूळ, धने बांधून आणलेल्या पुडीचा दोरा, जमल्यास कागद, चार नवर्‍या रंगतील इतकी हळद आणि पातेल्याच्या (आणि खाणार्‍याच्या) गळ्याशी येईल इतके सरसूचे तेल घालावे. आणि सगळ्याचा शिजून लगदा होईपर्यंत हे सारे शिजवावे. हे शिजायला टाकले असताना हवे तर सिनेमाचा मार्निंग शो पाहून यावे. गावातून चक्कर मारून यावे किंवा उरलेले सरसूचे तेल अंगाला लावून उन्हात बसावे. 

प्रत्येक भाजीला शिजायला निरनिराळा वेळ लागत असल्यामुळे हुं का चूं न करता सार्‍या भाज्या राजकीय कटासारख्या गुप्तपणे शिजत राहतात. आणि कालांतराने कम्युनिस्ट राजवटीसारखे प्रत्येक भाजीचे स्वतंत्र अस्तित्व नष्ट होऊन बटाटे, सुरण यांचेच काय पण ढवळताना स्वयंपाक्याच्या कडोसरीची अधेली आत पडली तरी तिचेही पार पिठले होऊन जाते. सरसू वगैरे बेरकी भाज्या तरीही स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न करतात. तुरीसारखी कणखर डाळ मुगासारखी अपमान गिळून उगी राहात नाही. टणकच राहते. ते फारसे मनावर घेऊ नये. हा पदार्थ देखील खानावळीचे मेंबर भरपूर खातात. त्याअर्थी तो रुचकर असावा.

- वंग- चित्रे
पु. ल. देशपांडे

0 प्रतिक्रिया: