Monday, November 21, 2022

पु.ल. आज तुम्ही हवे होता - निकेत पावगी

आठ नोव्हेंबर आणि बारा जून हे दोन दिवस पुलप्रेमींसाठी महत्त्वाचे आणि मनात विविध प्रकारचे कल्लोळ उठवणारे दिवस.

"कशाला आला होता हो बेळगांवात?" अशा स्वरूपाचा विदीर्ण टाहो काही जणं फोडत होती, असतील, रहातील - मनातल्या मनात.

पुलोत्सव वगैरे आयोजित करणारी मंडळी आता साठीच्या आसपास असतील आणि उत्सव साजरे करण्याची सध्याची किंमत बघता, असे उत्सव साजरे न करणेच त्यांना योग्य वाटत असेल.
आज तुम्ही हवे होता - असं वाटत रहाण्याचे दिवस गेले. उलट, तुम्ही गेलात तेच बरं झालं -: असं राहून राहून वाटत रहाण्याचे प्रसंग वारंवार येत रहातात.

थोर थोर विचारवंत, साहित्यिक लोकांची विविध पध्दतीने अवहेलना बघून तुम्ही स्वस्थही राहू शकला नसता आणि काही करण्याचा विचारही सुचला नसता. तुम्हालाही कोणत्याही एखाद्या वर्गाचे प्रतिनिधित्व देऊन कुणीतरी ठोकून काढलं असतं आणि तुमच्या कार्याची चिरफाड संकुचित चष्मे लाऊन झाली असती. तुमच्या लेखनातील एखादा लचका तोडून एखादे आंदोलन वगैरे झाले असते आणि त्यावर विचित्र पद्धतीने वाद - प्रतिवाद, प्रतिक्रिया उमटल्या असत्या. त्याला एखादा रंग कुणीतरी दिला असता. त्याउपर आपल्याच काही जाहीर चाहत्यांनी सपशेल कुस बदलून ते रंग गडद करण्यासाठी हातभार लावला असता. तुमचे मोजके पुतळे काही ठिकाणी अजूनही सुरक्षित आहेत, हे आमचे भाग्य. पण काही भरवसा वाटत नाही.

कदाचित एखादा Stand up comedy show करण्यासाठी तुम्हाला आग्रह झाला असता. घरोघरी पैदास झालेल्या साहित्यिकांचे तुमच्या स्वभावानुसार कौतुक करता करता तुमची लेखणी थिजून गेली असती.

कालातीत रहाणे फार कठीण असते. जवळपास अशक्यच. कालानुरूप परिस्थिती, संदर्भ बदलत असतात. पण काही भुमिका, दृष्टीकोन आणि शैली अजरामर असतात. समस्त जगातील मराठी बांधवांच्या ज्या सर्वसमावेशक गटाचे तुम्ही लाडके व्यक्तिमत्त्व होता, तो गट आता शिल्लक राहिला नाही. त्यापैकी कित्येकांनी इहलोक सोडला आणि त्यापेक्षा जास्त मंडळींनी मायभूमी सोडली. तुम्हाला जे सांगायचे आहे, दाखवायचे आहे आणि वाटायचे आहे ते समजणारी आणि ते समजून आनंदाने चकित होणारी मंडळी आता क्षीण झाली आहेत.

तुमच्या नांवाचें समुह अजूनही नवीन आणि तुमच्यासाठी अनोळखी अशा माध्यमातून सक्रिय आहेत. तुमची लेखी वाक्य शेकडो मंडळी कपड्यांवर मिरवत असतात. पण आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनावर तुम्ही जे कोरलंत ते मिरवावे असं वाटत नाही आणि जे मिरवतात त्यांच्या मनापर्यंत ते रूजलं आहे का, समजत नाही.
अजातशत्रूत्वाला एक प्रकारची चतुराई लागते- तुम्ही लिहून गेलात. तुमच्यात ती चतुराई नसूनही तुम्ही कितीतरी दशकं अजातशत्रू राहिलात. ते तुमच्या मोकळ्या मनस्वीपणामुळे आणि मुख्य म्हणजे स्वतः कडे सहज कमीपणा घेणाऱ्या तुमच्या निरागसपणा मुळे. ती निरागसता हल्ली इयत्ता पहिलीत सुध्दा शिल्लक राहिली नाही. नवरसांमधील कणांपासून विविध प्रकारच्या जणांपर्यंत ज्यात तुम्हाला उदात्त, उत्कट, मंगल असे जाणवले त्या सगळ्यांना दाद देत तुम्ही निर्मिती करत राहिलात. वाईटातूनही चांगलं दाखवण्याच्या शैलीतून. त्या चांगल्याची आणि मांगल्याची जी जाणीव निर्माण झाली ती नुसती आनंददायी नाही तर सकारात्मक स्फूर्तीदायी आहे. आज चांगल्यातूनही नेमकं वाईट तेवढे शोधून पसरविणारी लोक वाढत चालली आहेत.

तंत्रज्ञान फारच प्रगत झाले आहे. आजच्या तंत्रयुगात तुमच्यासकट, तुम्ही पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या समस्त प्रतिभावंतांनी काय कमाल केली असती असा विचार मनात येतो. पण त्या अभिजाततेसाठी पोषक असे समाजाचे कोंदणसुध्दा त्या प्रतिभावंतांना आवश्यक असते. रात्रभर चालणाऱ्या मैफलींमधून होणारी रसनिर्मिती कधीच नाहीशी झाली. त्यानुरुप होणारी प्रतिभा दुर्मिळ झाली तर दोष कुणाचा?

तरीही तुम्ही असता तर नक्कीच काहीतरी चिंतनाला आवाहन करणारी निर्मिती झाली असती. अद्वैताचे प्रतिरुप असणाऱ्या तुमच्या जोडीदाराला थोडे जास्त कठोर होऊन त्यासाठी तुम्हाला उद्युक्त करावे लागले असते, ते त्यांनी सजगपणे आणि अधिकाराने केले असते.

टिळक - गांधी पुण्यतिथी/ जयंती च्या दिवशी व्यक्तीगत पातळीवर आपापल्या परीने आदरांजली वाहणारी आमच्या आजी आजोबांची सहृदय पिढी कधीच नाहीशी झाली. कुणी लंघन करायचे, कुणी मौन व्रत त्या दिवशी धारण करायचे. काळ बदलत गेला. ती पिढी गेली, ते आवाज गेले, धुसर होत अदृश्य झाले.
तुम्ही गेलात हे एक प्रकारे बरं झालं असा व्यावहारिक विचार मनात गडद होत जातो आणि तरीही तुम्ही असायला हवे होतात हेही प्रकर्षाने जाणवत रहातं.
निखळ आनंदाची देवाणघेवाण सुरू झाली आणि निरपेक्ष दाद दिली घेतली जाऊ लागली कि मात्र सभोवताली कुठल्यातरी स्वरूपात तुम्ही असल्याचा साक्षात्कार होतो.
आठ नोव्हेंबर आणि बारा जून रोजी आयुष्यातील अशा सगळ्या साक्षात्कारांची उजळणी मनात सुरू असते....
मौनव्रत आणि उपास मागे गेले....
ही उजळणी मागे पडणे शक्य नाही.

निकेत पावगी
०८/११/२२

1 प्रतिक्रिया: