Tuesday, September 14, 2021

पुलंच्या सिग्नेचर ट्यूनची गोष्ट

पु ल देशपांडे हे महाराष्ट्राला पडलेलं एक पहाटस्वप्नच. पुलंच्या विनोदाने आपल्याला हसवलं आहे. पु ल देशपांडे यांच्या विनोदी कथा, प्रवेश जसे आपल्याला लक्षात राहतात तसेच पु ल देशपांडे यांच्या निवडक पु ल या मालिकेची सिग्नेचर ट्यूनसुद्धा सर्वांना माहिती आहे मात्र या सिग्नेचर ट्यूनबद्दल कितीतरी गोष्टी आपल्याला माहिती नाहीत.
निवडक पु ल या मालिकेची निर्मिती फाउंटनतर्फे करण्यात आली. त्यावेळी या मालिकेसाठी एक सिग्नेचर ट्यून किंवा शीर्षक गीत असावं असा निर्णय झाला होता. आज आपण जी सिग्नेचर ट्यून ऐकतो त्यात हार्मोनियमचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. अनेकांना स्वतः पु ल देशपांडे यांनी ती हार्मोनियम वाजवली आहे असं वाटतं. पण प्रत्यक्षात मात्र ती संवादिनी पु ल देशपांडे यांनी वाजवलेली नाही. या ट्यूनचं रेकॉर्डिंग ज्यावेळी करण्यात आलं त्यावेळी स्वतः पु ल देशपांडे उपस्थित होते. सुप्रसिद्ध संगीत संयोजक आप्पा वढावकर यांनी पेटीचा तो टोन रेकॉर्डिंगच्या वेळी आपल्या किबोर्डच्या माध्यमातून वाजवला होता. या प्रत्यक्ष रेकॉर्डिंगनंतर पु ल देशपांडे यांनी आप्पांचे कौतुक करून त्यांना दादसुद्धा दिली होती. मात्र बऱ्याच जणांना आजही याबद्दल माहीती नाही.

वेस्टर्न आऊटडोअर्स येथे झालेल्या रेकॉर्डिंगच्या वेळी माधव पवार, दिपक बोरकर, आप्पा वढावकर, राजेश देव हे वादक उपस्थित होते तर त्याचबरोबर पुण्याच्या काही वादकांसोबत या वादकांनी एकत्र येऊन ही मूळ धून वाजवली होती. या ट्यूनला पूर्णपणे संगीत पु ल देशपांडे यांनी दिल्याचासुद्धा अनेकांचा समज आहे. इंटरनेटवरसुद्धा तसे दाखले आहेत. मात्र सुप्रसिद्ध संगीतकार आनंद मोडक यांनी या ट्यूनला संगीत दिले आहे.
ध्वनिफिती, सीडी आणि रंगमंचीय कार्यक्रमांना आपल्या संगीताच्या जादूने वेगळे परिमाण देणारे संगीतकार अशी त्यांची ओळख सांगितली जाते.

याच रेकॉर्डिंगशी निगडित आणखी एक गोष्ट आहे. रविंद्र साठे हे नाव आपण मराठीतील जेष्ठ गायक म्हणून ओळखतो. पण गायनाच्या आधी रविंद्र साठे एक उत्तम तंत्रज्ञ होते. ध्वनी व्यवस्थापन, संयोजनसुद्धा त्यांना उत्तम ज्ञात आहे. आनंद मोडक यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे. निवडक पु ल चे रेकॉर्डिंग करताना मूळ कार्यक्रम आणि संपूर्ण सीडीचे ध्वनी संयोजन आणि रेकॉर्डिंग रविंद्र साठे यांनी केले आहे. त्यासाठी माईक लावण्यापासून ते संपूर्ण व्यवस्था त्यांनी त्यावेळी सांभाळली होती. त्यामुळे त्यांच्याही या रेकॉर्डिंगच्या आठवणी आहेत. एकंदरच या सर्व गोष्टी आजपर्यंत अप्रकाशित राहिलेल्या आहेत. पु ल देशपांडे यांच्याशी निगडित कोणताही कार्यक्रम आला की आपण ही ट्यून त्या कार्यक्रमात हमखास ऐकतो पण त्यावेळीसुद्धा ही माहिती प्रकाशात येत नाही.या सिग्नेचर ट्यूनच्या निर्मितीमध्ये आनंद मोडक, रविंद्र साठे, आप्पा वढावकर आणि सर्व संबंधितांचे योगदान नक्कीच मोलाचे आहे.

-आदित्य बिवलकर

1 प्रतिक्रिया:

Anonymous said...

आप्पा वढावकर की आप्पा जळगांवकर?