Monday, August 23, 2021

सांत्वन अंगाशी आले - पु.ल.

एका भल्या घरच्या बाईनं एकदा माझा सणसणीत अपमान केला होता. त्या बाईचे वडील वारल्याचं कळलं, म्हणून जनरितीप्रमाणे मी सांत्वनाला गेलो. आता वारलेल्या गृहस्थाचं वय ऐंशीच्या घरात होतं, पण माणसासारखं माणूस गेलेलं. दुःख होणं साहजिक आहे म्हणून गेलो. म्हातारबुवा तसे सालस होते. माझ्याकडून पुस्तकं वाचायला मागून नेत. नीट परत आणून देत. मरण्यापूर्वीच आठ-दहा दिवस आधी दोन पुस्तकं नेली होती. ती परत कशी मागायची हा विचार मनात आल्याबद्दलसुद्धा माझा मलाच थोडा रागही आला होता.

हे सांगायचं कारण एवढंच की, मी अत्यंत मोठ्या सद्भावनेनं सांत्वनाला गेलो होतो. अशा प्रसंगी चार माणसं बोलतात, ती वाक्यं बोललो, "वय झालं, तरी इतक्या लवकर जातील असं वाटलं नव्हतं. नाही म्हटलं तरी वडील माणसांचा आधार असतो. ह्या वयात वाचनसुद्धा अप टु डेट होतं." इत्यादी इत्यादी. त्या बाई त्यांना दिवाणखान्यात कुणीतरी मांडून ठेवावं, तशा बसल्या होत्या. अशा वेळी माणसं थोडी अश्रुप्रपात करतात, पण इथं उमेदवार वकिलानं आरोपीच्या बचावाचं भाषण केल्यासारखा मी बोलत होतो आणि बाई निर्ढावलेल्या न्यायाधीशासारख्या गंभीर. मी बुजलोच. शेवटी 'नाही म्हटलं तरी वडील माणसाचा आधार' हे वाक्य माझ्या तोंडून पोवाड्यातल्या 'जीजी रं जीजी'सारखं पुन्हापुन्हा यायला लागलं आणि मी आवरलं. लगेच बाई कडाडल्या, "तुम्हाला काय? कोण जगलं काय नि कोण मेलं काय, तुम्हांला त्यातसुद्धा विनोदच दिसायचा. तुमच्यापुढे कशाला बोला, तेवढंच धरून विनोदी गोष्ट लिहाल आमच्यावर." 

मी खरोखरच सर्द झालो. आता ऐंशी वर्षांचे का होईनात; पण कुणाचेतरी तीर्थरूप वारल्याचे ऐकून मी तिथे विनोदी लेखाचं साहित्य जमवायला धावलो असं वाटावं, ह्यासारखं अपमानास्पद दुसरं काय असणार. विनोदी साहित्याविषयीचा माझा दृष्टीकोन काय आहे हे माझं मलाही उमगलेलं नाही, पण आमच्या जातीच्या लेखकांच्या बाबतीतला इतरांचा दृष्टीकोन मात्र भलताच... चिनी आक्रमणाच्या काळात मी एक निबंधवजा लेख लिहिला होता. त्या लेखानंतर मला काही वाचकांची पत्रं आली. बहुतेकांचा एकच सूर. तुमच्या मनात इतका जाज्वल्य देशाभिमान असेल अशी कल्पनाही आम्हांला नव्हती. एकानं तर मला चक्क लिहिलं होतं, 'तुमच्यासारख्या विनोदी लेखकाचंही देशावर प्रेम आहे हे पाहून माझ्यासारख्या निस्सीम राष्ट्रभक्ताला अत्यंत आनंद झाला. यापुढेतरी विनोदी लेखन सोडून काहीतरी भरीव लिहा.'

पुस्तक - कसा मी असा मी 
पु.ल. देशपांडे

0 प्रतिक्रिया: