Tuesday, October 20, 2009

जे रम्य ते बघुनिया.. - निशिकांत ठकार

(श्री ना. ध. महानोर लिखीत ‘आनंदयोगी पु.ल.’ ह्या पुस्तकातील श्री निशिकांत ठकार ह्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही भाग.) 

..शहरात राहणार्‍या मध्यमवर्गीय माणसाचे वावर हरवलेले आहे. शेताकडे वावरण्याच्या त्याच्या वाटा बंद झालेल्या आहेत. त्यांच्या शोध तो साहित्यातून-कवितेतून घेऊ पाहतो. रानातल्या कवितांचा अस्सलपणा पु.लं.ना पळसखेडला जायची प्रेरणा देतो. खरं तर जीवनाच्या आणि विशेषत: कलेच्या, सर्वच क्षेत्रांतल्या आणि पारदर्शी, सुंदर आणि रमणीय अनुभवांचा शोध घेत पु.लं. नी आपलं व्यक्तिमत्व समृद्ध, सुजाण आणि सुस्कृंत केलं. एका चांगल्या अर्थानं हा एक वेडा माणूस होता. जे रम्य आहे ते बघून त्याला वेड लागायचे. जे रम्य नाही ते बघून त्याच्यावर वेडं व्हायची पाळी यायची तेव्हा तो विनोद करायचा. रम्य म्हणजे नुसते मनोहर नाही. ते तर आहेच, पण त्या सौंदर्यबोधात माणुसकीचा आणि सर्जनाचा साक्षात्कारही त्याला हवा असायचा. त्यामुळेच हा रसिकोत्तम कलावंत कलाप्रेमी होता तसाच माणुसप्रेमीही होता. जिथे काही रचनात्मक चालले असेल तिथे त्याचा ओढा असायचा. रचनात्मकतेत सर्जनात्मकतेचा प्रत्यय आला तर तो त्याच्यावर जीव ओवाळून टाकायचा. हा भावबोध अर्थपुर्ण करण्याचे काम सुनीताबाई करायच्या. ही भाईंची इच्छा म्हणून मम म्हणायच्या. महानोरांनी असे प्रसंग अनुभवले. 

’जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे’ ये पु.लं. च्या आयुष्याचे ब्रीद महानोरांनी नेमके हेरले. पु.लं. बरोबर घालवलेल्या क्षणांत हाच आनंद भरून राहिलेला त्यांनी अनुभवला त्याला निर्मळ हास्यविनोदाचा सुंगध लाभलेला होता. पु.लंच्या रम्यतेच्या कल्पनेत सौंदर्यबोध आहे तशीच एक नैतीकताही आहे. त्यामुळेच ते संस्कृतीच्या विविधतेचे महत्व मानतात. देव न मानणारे पु.ल. नास्तिक वाटत नाहीत कारण त्यांनी शिवत्व स्विकारलेले आहे. त्यांना सर्वोत्तमाचे वेड आहे. देव नाही पण बालगंधर्व चार्ली चॅपलीन, रविंद्रनाथ यांसारखी दैवते ते मानतात आणि महानोरांसारख्या विवीध क्षेत्रांतल्या विवीध प्रतिभांचे स्वागत व कौतुक करतात. ते मुळातच बहुवचनी आहेत. त्याशीवाय संस्कृतीची वाढ होत नाही. जे आहे त्यापेक्षा जग चांगले व्हावे, सर्जनशील व्हावे, मानविय व्हावे ही त्यांची नैतीकता आहे. हरवत चाललेल्या मध्यमवर्गीय मूल्य-जाणिवांच्या स्मरण-रमणीतेत हरवणारा कलावंत लेखक म्हणून पु.लं. ना ओळखणारे काही समिक्षक आहेत. हेच त्यांच्या लोकप्रियतेचं महत्वाचं कारण आहे, असेही त्यांना वाटते. पण पु.ल. वर्गीय जाणीवांनी मर्यादीत नाहीत. आधुनिकतेच्या नव्याच्या विरोधात नाहीत. जे जात आहे त्याची हळहळ अवश्य आहे, पण जे येत आहे ते तेवढ्या गुणवत्तेचे नाही याचा त्रास आहे. तरीही पु.लं. हे स्वागतशीलच राहिलेले आहेत. ते मूळतत्ववादी किंवा पुनरुत्थानवादी झालेले नाहीत. दारिद्र्याच्या आणि आणीबाणीच्या विरोधात ते ठामपणे उभे राहतात. शेताच्या, जमिनीच्या, कृषिसंस्कृतीच्या आकर्षणातून ते देशी शहाणपण व बळ मिळवू पाहत होते असे वाटते. 

जोडोनिया धन उत्तम वेव्हारे। 
उदास विचारे वेच करी॥ 
हा तुकारामांचा उपदेश त्यांनी आपल्या प्रतिष्ठानाचे बोधवाक्य म्हणून निवडला होता. (त्यांनी की सुनीताबाईंनी?) अतिशय मार्मिक वचन आणि त्याप्रमाणे आचरण. जोडोनिया धन याबरोबरच ’जन’ हा पाठभेदही नव्याने जोडता येईल. खूप माणसं जोडली. पु.लं. वर लोकांच प्रेम होतं. पु.ल. गेल्यावर ते प्रकर्षाने प्रत्ययाला आलं. महानोरांना सुनिताबाई म्हणाल्याही, "इतकं असेल. असं वाटलं नव्हतं." पु.लं.नी जगण्यातलं खूप काही वेचलं आणि अनंतहस्ते वाटून टाकलं. वाटून टाकायचं हे आधी माहित असणं म्हणजेच उदास (निरपेक्ष) विचाराने वेचणं. त्याने निराशा येत नाही, आनंद वाटतो. वाटला जातो. ’आहे मनोहर तरी...’ मध्येही ’उदास’ गमणे आहे. आत्मशोधातून येणारं ’उदास’ गाणं. म्हणून तर महानोरांना सुनीताबाई व भाई कधीच वेगळे दिसले नसावेत? पु.ल. गेले. त्यांच्या आठवणी राहिल्या. अनेकांच्या अनेक आठवणी, त्यामुळे पु.ल. गेले हे विधान खोटेच वाटायला लागते. 

कर्‍हाड संमेलनातून पुण्याला परत येताना महानोरांनी पु.ल. सुनीताबाईंना लोकगीतं ऎकवली. त्यातलं एक ऎकलं आणि सुनीताबाईंनी गाडी थांबवली. गेला मह्या जीव मले भिंतीशी खुळवा सोन्याचं पिंपळपान माझ्या माहेरी पाठवा पु.लं. च्या आठवणी म्हणजे पिंपळपानं आहेत. काही पुस्तकांत ठेवलेली, जाळी पडणारी. काही सोन्याची, काही आरस्पानी. वाचकांच्या माहेरी अशी आठवणींची पिंपळपानं आलेली आहेत. झाड शोधायला गेलं तर जंगल हरवतं. जंगल शोधायला जावं तर झाड हरवतं. आठवणींचही असंच होत असावं. आठवणींत बहुवचनी माणूस पुरा सापडत नाही आणि पुऱ्या माणसाला शोधायला आठवणी पुऱ्या पडत नाहीत; पण पिंपळपान संपूर्ण भावबंधाचं प्रतीक होऊन येतं. त्याचा आकार हृदयासारखा असतो म्हणून? का भावबंधांची जाळी पारदर्शी होत जातात म्हणून? पिंपळपान सोन्याचं असलं तरी अटळ उदासी घेऊन येतात. सोन्याचं पिंपळपानं निरोप घेऊन येतं. माहेरच्या माणसांच्या काळजात कालवाकालव होते. 
-निशिकांत ठकार

3 प्रतिक्रिया:

Unknown said...

अगदी खर...
पु. ल, हे एक अजब रसायन होता हे खरच.

Prashant said...

छान!

ईथे काहितरी सुटल्यासारखं वाटतंय... कृपया दुरुस्त करा:


झाड शोधायला गेलं तर जंगल शोधायला जावं तर झाड हरवतं

दिपक said...

दुरुस्ती केली आहे. निदर्शनास आणुन दिल्याबद्दल धन्यवाद. :-)