Monday, June 29, 2020

काही अंश मिळावा

मी ऑफिसमध्ये होते त्या वर्षी बारा जूनला. अचानक घरून फोन आला. आईचा होता. अतिशय हळव्या आवाजात आई म्हणाली "तुला एक वाईट बातमी द्यायची आहे. पु ल देशपांडे गेले"

मला दोन मिनिट कळलेच नाही. मी काहीतरी बोलून फोन ठेवला आणि वॉशरूम मध्ये जाऊन अक्षरशः घरचं माणूस जावे कुणी तशी रडले. बाहेर आले तर माझी टीम माझ्याकडे आश्चर्याने बघत होती. त्यात एक दोघी मुली मराठीही होत्या. बाकीच्यांना फारसे कळले नाही आणि मी कुणाला समजावून सांगण्याच्या मनस्थितीतही नव्हते. काही सांगायला गेले नाही कारण सांगितले असते तर पहिला प्रश्न मला हा विचारला असता की कोण होते ते तुझे? इतके रडू येण्यासारखे?

आजही या प्रश्नाचे उत्तर नाही माझ्याकडे. मला याचे उत्तर मिळले नाही तर फरकही पडणार नाही खरेतर. ज्या घरात पुरणपोळी होती नाही ते घर मराठी नव्हे या त्यांच्याच वाक्याप्रमाणे ज्या घरात पु ल माहित नाहीत ते घर मराठी नव्हे.

त्यांच्यावर बरच काही लिहिले गेले आहे. त्यांचे बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, त्यांचे दातृत्व, त्यांची तत्त्वनिष्ठा असे सगळेच. त्यांचे किस्से, कोट्या, निर्विष विनोद यावर बऱ्याच जणांनी बोलून लिहून झाले आहे. तरीही नवीन काही ऐकले त्यांच्याबद्दल की कान टवकारतात, चेहऱ्यावर छानसे हसू येते. आपल्याही नकळत त्या विनोदाला दाद जाते. हे असे सुचते तरी कसे याचा विस्मय वाटतोच.

त्यांच्या लिखाणाचे भाषांतर करणे निव्वळ अशक्य आहे. भाषेपेक्षाही तो निरागस, निर्विष हेतू दुसऱ्या भाषेत तसाच्या तसा मांडणे प्रचंड अवघड आहे. आयुष्याकडे रसिकतेने बघताना त्यात असलेल्या उणिवांची टपली मारल्यासारखी चेष्टा करत राहणे हे फार अवघड आहे. कुठलीही पातळी न सोडता हे करणे तर फारच कठीण आहे.

आज चाळी, वाडे कालबाह्य झाले. आपले पाहता पाहता दुसऱ्याचेही आयुष्य थोडेसे सुकर करणारी माणसे तर झपाट्याने आटली. बटाट्याची चाळ वाचताना आजच्या पिढीला त्यातले संदर्भ लागणे कदाचित सोपे असणार नाही पण माणसाची प्रवृत्ती बदलत नाही हे लक्षात आले की तो काळ ती माणसे समजून घेता यावीत. असा मी असा मी मधल्या धोंडो भिकाजी जोशांना प्रश्न पडतो की मुलाला ताप असला की ओल्या पंचाने देवाला प्रदक्षिणा घालणारे वडील आणि आपल्या मुलांना व्हिटॅमिनयुक्त आहार मिळतोय का नाही यावर लक्ष ठेवणारे आपण यातले कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ? बापाचे मुलांवरचे प्रेम असणारच ना कितीही पिढीत बदलली किंवा जमाना बदलला तरी. तो संदर्भ कसा चुकेल? तसेच काहीसे आहे हे.

मी पहिल्यांदा लंडनला गेले होते तेव्हा मी पुलंच्या अपूर्वाईतले लंडन शोधत होते.किती ठिकाणी जाताना बघताना त्यांनी त्या त्या ठिकाणावर लिहिलेले आठवत होते. इंग्लंडमध्ये कावळा दिसल्यावर तो क्रो क्रो करेल का हेच वाक्य मला पहिले आठवले. बेक्ड बीन्स ऑन पोटॅटो खाताना ब्रिटिशाला अंडे, बटाटा आणि मांस यापलीकडे खाता येत नाही तेच डोक्यात आले. पॅरिसच्या बाबतीतही तेच झाले. आयफेलवरती गेल्यावर वरून दिसणारे पॅरिस बघताना लख लख दिव्यांनी उजळलेले शहर आठवले.

काय नाते असेल या माणसाशी आपले? नारायण ऐकताना हळूच शेवटी डोळे पुसतो आपण. म्हैस ऐकताना सचित्र ऐकतो. त्यांनी निव्वळ आवाज आणि शब्दातून उभी केलेली म्हशीची कथा इतकी तगडी आहे की मास्तर कसे असतील, "रक्त !!!" असे म्हणताना ते काय चेहरा करून कसे म्हणाले असतील हे अचूक डोळ्यापुढे उभे राहते. त्या चेहऱ्याची जागा कोण कसा घेऊ शकेल? अचूक शैली, बोलीभाषा, हे सगळे ऐकणारा आणि ते तसेच्या तसे शब्दात उतरवणारा हा माणूस काय विलक्षण प्रतिभावंत असू शकतो याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. जबरदस्त निरीक्षण हा एक गुण झाला पण ते निरीक्षण तसेच्या तसे अचूक वाचणाऱ्याच्या डोळ्यापुढे उभे करणे याला सरस्वतीचा वरदहस्तच हवा.

मला त्यांच्या लिखाणातले सगळ्यात जास्त काय आवडते हे सांगणे अशक्य आहे. शब्द आणि शाब्दिक कोट्या हा एक भाग झाला. जगाच्या चांगुलपणावर असणारा विश्वास भावतो की वाईट अनुभव येऊनही त्या अनुभवातले शहाणपण मांडण्याची अलिप्तता भावते हा आणखी मोठा प्रश्न. त्यांचे सुसंस्कारित मन तर ठायी ठायी दिसते. सामाजिक बांधिलकी दिसते आणि त्याचबरोबर त्या समाजातल्या अनेक दोषांवर हसत हसत केलेली टिप्पणीही दिसते. सदैव जागरूक असलेला लेखक दिसतो. सहज शब्दकळा दिसते. नाना क्षेत्रांमधली मुशाफिरी दिसते. नव्याचा स्वीकार करतानाही जुन्याशी नाळ जोडून ठेवलेली दिसते. आणि हे सगळे एकाच माणसात दिसते. आपण वाचावे, बघावे आणि ऐकावे डोळ्यातले पाणी पुसावे.

आयुष्य जर रिवाइंड करता आले तर मी त्यांना भेटेन नक्की. त्यांची पुस्तके वाचून पिंड घडला. त्यांची थोरवी कळण्याइतकी अक्कलही नव्हती तेव्हा आणि फारच मोठ्या प्रमाणात आपल्याच दुनियेतले मश्गुल असणेही होते. कमला नेहरू पार्कावरून ये जा करताना त्यांचे घर मागच्याच गल्लीत आहे हे माहित असूनही पावले तेव्हा वळली नाहीत. आता वळतात अधूनमधून. त्यांच्या घराकडे बाहेरूनच नजर टाकून समाधान होत नाही पण तेव्हढ्यावरच समाधान मानणेही आले. त्यांनी वर्णन केलेला तो जोशी हॉस्पिटलच्या आवारातील आंबा एकदा मी प्रत्यक्ष जाऊन बघून आले. पण त्याचे त्यांनी केले वर्णन मनात ठेवूनच. एका अर्थी आमची तुमची नजर घडवली या माणसाने. जगाकडे निरागस नजरेने बघणेही चांगले असते यावरचा विश्वास फुलपाखराच्या सोनेरी वर्खासारखा जपला. हसत हसत दुःखाला टोलवायची कला शिकवली.

मला नोकरी लागल्यावर मी विकत घेतलेले पहिले पुस्तक हसवणूक होते. माझे खाद्यजीवन, बिगरी ते मॅट्रिक वगैरे वाचून मी एकटीच खो खो हसले होते. त्यांची पुस्तके मी कुणालाही वाचायला देत नाही. कारण ती गेली की परत येत नाहीत. तुम्ही म्हणाल जाऊ दे की चार लोकांना अजून ते कळले तर बिघडले कुठे? मुद्दा बरोबर आहे पण न देण्याचा हेतू मात्र स्वार्थी आहे. त्या पुस्तकांनी अनेक भल्याबुऱ्या प्रसंगात माझी सोबत केलेली आहे. ती माझी जिवाभावाची पुस्तके आहेत. अनेक प्रसंग, घटना त्या पुस्तकांनी सुसह्य केलेल्या आहेत. मला त्यांचा कुठला लेख, कुठले पुस्तक कधी वाचायची हुक्की येईल हे मलाही सांगता येत नाही आणि अशा वेळी ते पुस्तक हाती लागले नाही की वाचणाऱ्याची काय चिडचिड होऊ शकते हे वेगळे सांगणे नलगे.

आज त्यांना न भेटण्याचे दुःख खरेतर उणावले आहे थोडेसे. त्यांना प्रत्यक्ष भेटले नाहीतरी ते भेटतात. त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या शब्दातून. एखाद्या दिवशी अपयशी वाटून डोळे भरून येत असताना प्रत्येक चिंधीने मला काही दिले यासारख्या अप्रतिम लेखातून ते प्रत्येक अनुभव भरभरून जगायला सांगतात. इतिहासाच्या अदृश्य मनगट्या घालणारे हरितात्या भेटतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना अंगावर आपसूक काटा फुलतो. श्रोते हो सुजन हो रसिक हो वाचताना त्यांच्या व्यासंगी बुद्धिमत्तेने थक्क व्हायला होते. आपल्या आसपास भलेबुरे जे काही सुरु असताना मनात जागा असणारा हा माणूस कुठल्याही कसल्याही परिस्थितीत आपल्या ओठावरचे हसू मावळू देत नाही.

मग आपल्या मनाला आपण सांगतो. इतके सगळे दिलेत देशपांडे गुरुजी तुम्ही. पण एक अंश तुमचा असाही मिळावा ज्यामुळे कृतज्ञतेने तुमच्या देण्याचा स्वीकार करताना आपणच आपल्याला म्हणावे

अरे असे जगता आले पाहिजे. सुखाची स्मृती ठेवून, दुःखाला समोर बघत सस्मित चेहऱ्याने आसपासच्या किमान चार माणसांच्या आयुष्यातले किमान चार क्षण तरी उजळता आले पाहिजेत. त्या तेजाचा एक कण तेव्हढ्यासाठी हवा.

समाजातल्या दुःखाने नुसतेच आतडे पिळवटून ओरडण्यापेक्षा आतड्याची माया जागी ठेवून मुक्याने जितकी जमेल तितकी सहज मदत करता आली पाहिजे. तो एक अंश हवा.

गुरुजी तुमच्या आयुष्यातला एक अंश मिळावा. असे स्वतःच्या तत्त्वांवर ठाम राहून जगता येते हे कळण्यासाठी.

एक अंश मिळावा बस . . . बाकी आयुष्य चालूच आहे.

तुम्हाला देवत्व दिलेले तुम्हाला आवडणार नाही आणि तुमच्या तत्त्वांच्या ते विरुद्धही असेल. पण आज तुमच्या निष्पाप, निरागस विनोदाची खरंच गरज आहे हो. एकीकडे असेही वाटते की तुम्ही आज नाही ते एका दृष्टीने बरच आहे म्हणा. तुम्हाला आज जे काही आसपास चालू आहे ते बघवलेच नसते. तरीही जेव्हा एखाद्या दिवशी केशर मडगावकर (उच्चारी अडगावकर), मधू मलुष्टे, कुमार गिरीश असा एखादा नमुना आसपास दिसतो तेव्हा मी खूप हसते. कारण तुम्ही मिस्कील चेहऱ्याने शेजारी उभे राहून हसत हसत ‘काय मी सांगतो ते पटतंय की नाही’ असे विचारत असता.

तुमच्याच भाषेत सांगायचे तर आमची चिमुकली संसारगाड्याखाली दबलेली आयुष्ये हसती रहावी, त्यांना नीट आकार यावा, ती उजळावीत म्हणून देवाने तुम्हाला देणगी म्हणून आमच्यासाठी पाठवले आणि आजच्या दिवशी आम्हाला न विचारताच परत नेले.

©प्राजक्ता काणेगावकर

3 प्रतिक्रिया:

Cheeky and Bunny said...

अप्रतिम!

Trupti S said...

तुम्ही अतिशय उत्तम रित्या पु.ल.साहित्यातील सर्वच गोष्टीचे वर्णन केलेले आहे.

Mohan kardekar said...

छान छान सुंदर