Wednesday, January 18, 2023

आनंदयात्री - वंदना गुप्ते

प्रत्येक नाटकानं मला काही ना काही दिलं आहे. अभिनेत्री म्हणून, माणूस म्हणून आणि नाट्यप्रवाहातील एक प्रवासी म्हणून मला ते आयुष्यभर पुरतंय आणि तरीही ओंजळ अजून भरलेली नाही. मागच्या लेखात मी ‘प्रेमाच्या गावा जावे’ विषयी लिहिलं होतं, त्याची आणखी एक आठवण सांगण्यासारखी आहे. त्या नाटकाचा दौरा कोकणात नेहमीप्रमाणं मे महिन्याच्या सुट्टीत होता. ‘देवरुख’ गावी प्रयोग, ‘ओपन एअर’ला शाळेचं भक्कम स्टेज होतं. पहिला अंक संपण्यापूर्वी दोन मिनिटं आधी माझ्यासमोर, स्टेजवर मागच्या आंब्याच्या झाडाची वर आलेली फांदी होती, त्यावरून एक आंबा पडला. मी, अरविंद देशपांडे आणि निवेदिता जोशी (सराफ) आम्ही तिघंच स्टेजवर होतो. माझी लगेच एक्झिट होती. माझ्या मनात आलं, ‘हा आंबा मी इथेच ठेवला, तर पडदा पडल्या पडल्या निवेदिता तो उचलणार.’ म्हणून, मी आंबा उचलला आणि एक्झिट घेतली. कोकणच ते. तिथला एक प्रेक्षक ओरडला, ‘आरं नटीनं आंबो चोरलोऽऽ.’ तो प्रवेश संपला आणि पहिला अंकाचा पडदा पडला.

अरविंद देशपांडे आत आले आणि त्यांनी अशी काही कानउघाडणी केली माझी. ‘नाटकाच्या कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन तू असं कसं करू शकलीस? आणि हे कसं चुकीचं आहे? किती अव्यावसायिक वागलीस तू आज? आपण प्रत्येक प्रयोग प्रेक्षकांसाठी करीत असतो. तुझी भूमिका लेक्चररची आणि तू भूमिकेचा आब सोडून हे असं कसं केलंस? हे कसं चुकीचं आहे...’ वगैरे खूप बोलले, रागावले. त्यांचं म्हणणं आणि शिकवण आजतागायत विसरलेले नाही. रंगभूमीवरचे तीन तास तुम्ही बाकी कुणाचे नसता, तर ते घर, ते कुटुंब, त्यांचं राहणीमान, ती नाती, ते बोल हे सगळं बिनचूक झालंच पाहिजे. त्या तीन तासांत नाटकाबाहेरचा विचार तुमच्या डोक्यात येता कामा नये, हे मला तेव्हा मनोमन पटलं. ते करण्याचा १०० टक्के प्रयत्न मी करीत आले आणि करीत राहीन.

‘शो मस्ट गो ऑन’ हे शेक्सपिअरनं म्हणून ठेवलंय, ते १०० टक्के निभवावंच लागतं. नाटक करताना अनेक अडचणी आल्या, दुःखद घटना घडल्या, अनेक आनंदाच्या क्षणांना मुकले. आज ५० वर्षं नाटक करते; पण अरविंद देशपांड्यांची शिकवण कधीच विसरले नाही. एकाच नाटकाचे ५००/१००० प्रयोग झाले, तरी तीच इंटेन्सिटी, तीच उत्स्फूर्तता, तेच भाव तेवढ्याच ताकदीनं जगावे लागतात. आपण तेच असतो; पण प्रत्येक वेळी प्रेक्षक वेगळे असतात. पटलं नाही, तरी स्वीकारलंय. ते तितक्याच ताकदीनं केलं, तर लोकही तुमच्याबरोबर तोच आनंद घेतील, समरसून आस्वाद घेतील. हे लक्षात ठेवून प्रयोग करत राहणं, हीच व्यावसायिकता असते, तरच तुम्ही टिकाल. यश मिळणं सोपं असतं; पण सातत्यानं टिकवणं फार कठीण असतं, हे पदोपदी जाणवत राहतं. प्रत्येक प्रयोग म्हणजे बारावीचा पेपर. या घटनेचा शेवटही सांगितला पाहिजे.

अरविंद देशपांडेंचा राग, शिकवण ऐकता ऐकता मी तो अर्धवट पिकलेला आंबा सुरीनं कापत होते. कापता कापता एक फोड त्यांच्या हातात दिली. त्यांनीही तिचा आस्वाद घेतला आणि मग लक्षात आल्यावर मेकअप रूममधला तणाव नाहीसा झाला.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १९९३मध्ये वर्षभरात त्यांनी लिहिलेली तीन-चार नाटकं रंगभूमीवर आणून, त्यांचा सत्कार करायचा, असं समितीतर्फे ठरवण्यात आलं. ही नाटकं वेगवेगळे निर्माते सादर करणार होते. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘बटाट्याची चाळ’ वगैरे नाटकांचे प्रयोग अधूनमधून रंगभूमीवर होत असत; त्यामुळं ती सोडून इतर काही नाटकं सादर करायचं ठरलं. त्यात ‘सुंदर मी होणार’, ‘अंमलदार’ आणि ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकांच्या तालमी सुरू झाल्या. त्या वेळी रंगभूमीवर माझी ‘चारचौघी’, ‘संध्याछाया’ वगैरे नाटकं तुफान चालू होती; तरीदेखील पुलंचं नाटक त्यांच्या ७५व्या वर्षी, त्यांच्या उपस्थितीत करायला मिळणार, तर ती संधी सोडायची नाही, असं मी ठरवलं. या निमित्तानं अशा असामान्य कलावंताला मानाचा मुजरा करायला मिळणार होता. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातली दीदीराजेची भूमिका मी स्वीकारली.

हे नाटक ३०-३५ वर्षांपूर्वी पहिल्यांदा सादर झालं होतं. त्यात स्वतः पु. ल. आणि सुनीताबाई काम करीत होते. ते नाटक म्हणजे जणू एक काव्यच होतं. या नाटकातले संवाद, व्यक्तिचित्र, नाट्य आणि नाटकाची गुंफण सगळंच इतकं सुंदर होतं, की प्रेक्षकांचे कान तृप्त होत असत. सबंध नाटकभर पायानं पांगळी झालेली दीदीराजे व्हीलचेअरवर बसून खिडकीतून जग बघायची आणि त्यातून न दिसणाऱ्या जगाचं काव्यातून वर्णन करायची. अतिशय हळवी, मृदू, कवी मनाची, भावंडांवर प्रेम करणारी, त्यांचं मन समजून घेणारी अशी ही दीदीराजेची तरल भूमिका आणि मी अशी कणखर आवाजाची वंदना गुप्ते. माझ्या आवाजात या भूमिकेशी साधर्म्य साधणारे कुठलेच सूरही नव्हते आणि गुणही नव्हते. म्हणूनच ते आव्हान मी स्वीकारलं आणि तालमी सुरू केल्या.
                 
विजय केंकरे याच्या ‘स्फूर्ती’ संस्थेतर्फे ‘सुंदर मी होणार’ नाटक सादर झालं. लोकांना अतिशय आवडलं. विजयच्या दिग्दर्शनाखाली आधी एक-दोन नाटकं केली होती; पण यात डॉ. श्रीराम लागूंबरोबर काम करायची संधी मिळाली. निरीक्षणातून खूप काही शिकता आलं. पुढं काम करताना मला ते उपयोगी पडलं. या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीला एक चुणचुणीत मुलगी मिळाली, ती म्हणजे कविता लाड. बेबीराजेची भूमिका तिनं लीलया निभावली. अतिशय मन लावून मिळेल ते काम तेवढ्याच तन्मयतेनं करीत आली ती. डॉ. श्रीराम लागू, रवी पटवर्धन, गिरीश ओक, ज्ञानेश पेंढारकर, प्रशांत दामले असा नटसंच होता. प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य आणि प्रकाशयोजना, विजयचं दिग्दर्शन आणि पु. ल. देशपांड्यांचे संवाद सगळंच खूप छान जुळून आलं होतं; त्यामुळं प्रयोग फार सुरेख व्हायचा. ११० प्रयोगांनंतर सुधीर भटच्या ‘सुय़ोग’नं या नाटकाचे पुढं भरपूर प्रयोग केले.

मला आजही आठवतंय, पुण्याच्या ‘बालगंधर्व’च्या प्रयोगाला पु. ल. आणि सुनीताबाई समोर बसून नाटकाचा आनंद घेत होते. नाटक संपल्यावर व्हीआयपी रूममध्ये भाई आले आणि मला मांडीवर घेऊन खूप कौतुक केलं त्यांनी माझ्या कामाचं. मला म्हणाले, ‘या नाटकात वडिलांना आपल्या मुलीविषयी वाटणाऱ्या आकर्षणाबद्दल स्पष्टपणे लिहायला मी कचरलो; पण तू ते स्वरातून आणि अभिनयातून बरोब्बर दाखवलंस, शाब्बाश वंदना!’ बस्स एवढे शब्द ऐकले आणि आजवरच्या नाट्यप्रवासाच्या तपश्चर्येचं फळ मिळालं.

भाईंना माणिकबाईंचं गाणं खूप आवडायचं. त्यांनी संगीत दिलेल्या प्रत्येक सिनेमात आईचं गाणं असायचंच. आमच्या दादरच्या आणि पुण्याच्या घरी किती तरी नवीन, तरुण कलाकारांच्या मैफली जमवून आणल्या भाईंनी. ते म्हणायचे, ‘माणिक तुझ्या घरामध्ये कला आहे. इथं ज्या ज्या नव्या कलाकारांनी आपली कला सादर केली, ते खूप नावारूपाला आले.’

खरंच, आई-वडिलांमुळं किती मोठ्या मोठ्या लोकांचा सहवास मिळाला आम्हाला! नेपियन्सी रोडवरचं घर खूपच मोठं होतं; त्यामुळं तिथं सगळे दिग्गज कलाकार राहायलाही येत किंवा मैफलीसाठी जमत. पु. ल., वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, सी. आर. व्यास, राम मराठे, मल्लिकार्जुन मन्सूर, मालविका कानन अशी किती नावं घेऊ? अल्लारखाँ तर शेजारच्याच सोसायटीत राहत; त्यामुळं त्यांचं आणि छोट्या झाकीरचंही येणं-जाणं होत असे. सुधीर फडकेही येत असत दादरच्या घरी छोट्या श्रीधरला घेऊन. अशा सुरेल घरामध्ये वास्तव्य करून, आमचं कुटुंबही कलासक्त होऊन गेलं, हे केवढं भाग्य आमचं!


असेच एकदा पु. ल. मुंबई आकाशवाणीवर कामासाठी आले होते, तिथं माणिकबाईंची भेट झाली. तिनं आग्रह केला म्हणून आमच्या घरीच मुक्कामाला आले. रात्री जेवणानंतर आमच्या पप्पांबरोबर खूप गप्पा रंगल्या सिनेमाच्या, प्रभात फिल्म कंपनीच्या. फक्त साहित्य, संगीतच नाही, तर सिनेमाविषयी अफाट ज्ञान आणि प्रेम होतं त्यांना. सकाळी उठून ‘दूरदर्शन’वर जाता जाता मला कॉलेजला सोडायला आले, तेव्हा गाडीत आमच्या खूप गप्पा रंगल्या. दुसऱ्या दिवशी घरी आईला फोन केला आणि म्हणाले, ‘माणिक मी माझ्या विनोदी लेखांमधून, नाटकातून बायकांवर खूप विनोद करतो; पण बायकांना विनोदबुद्धी असते, हे वंदनाबरोबर गप्पा मारताना जाणवलं. चतुर आहे तुझी मुलगी, हे खास सांगण्यासाठी फोन केला तुला.’

खरंच किती मोठा माणूस, आनंदमूर्ती जणू! त्यांच्या लिखाणातून, बोलण्यातून, उमटलेल्या प्रत्येक शब्दातून त्यांची सांस्कृतिक वतनदारी भारतातच नाही, तर सातासमुद्रापारही पोचली. आजच्या तंत्रज्ञानाच्या जीवनातही तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड टिकवून ठेवण्याची क्षमता त्यांच्या लिखाणात आहे. आजही त्यांनी लिहिलेल्या कुठल्याही पुस्तकातलं, कुठलंही पान वाचून काढलं, तरी सगळी दुःख, कष्ट विसरून एकदम ताजेतवाने आणि आनंदी होऊन जातो आपण. असं विनोदाचं पांघरुण अंगावर लेवून झोपलं, की स्वप्नही छान पडतात माणसाला. हे असं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व, देवांचं मनोरंजन करायला पृथ्वी सोडून गेलं आणि आपण सगळेच सुन्न झालो, जगण्यातला आनंदच नाहीसा झाला जणू.

त्यांच्या जाण्याचं दुःख विसरायला लावणारं शब्दभंडार त्यांनीच तर निर्माण करून ठेवलंय आपल्यासाठी. एकाच माणसाला साहित्यिक, सांस्कृतिक, सांगीतिक, सामाजिक, वैचारिक विषयांवर गुदगुल्या करत निखळ सत्य मांडता येतं कसं? त्यासाठी लागणारे नेमके शब्द सुचतातच कसे? श्रीमंत-गरीब, सुशिक्षित-अशिक्षित, शहाणी-अडाणी या सगळ्यांना जोडणारं लिखाण कसं करू शकतात? वेगवेगळ्या स्वभावाच्या काल्पनिक ‘व्यक्ती आणि वल्ली’ त्यांनी निर्माण केल्या आणि नुसत्याच लिहिल्या नाहीत, तर अमरही केल्या. इतका बहुआयामी कलंदर माणूस माझ्या मते चार्ली चॅप्लिननंतर पु. ल. देशपांडेच!

वंदना गुप्ते
महाराष्ट्र टाईम्स
१५ जानेवारी २०२३


1 प्रतिक्रिया:

Anonymous said...

खूप सुंदर