Friday, April 23, 2021

कशासाठी? पोटासाठी... खंड्याळ्याच्या घाटासाठी

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीत पु. ल. देशपांडे यांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. २६ जून १९६८ रोजी या रंगमंदिराचं उद्घाटन झालं. यंदा हे रंगमंदिर सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. उद्घाटनावेळी पुणे महापालिकेनं ‘नमन नटवरा’ ही स्मरणिका प्रकाशित केली होती. त्या स्मरणिकेत ‘पुलं’नी आपल्या जादुई लेखणीनं लिहिलेला लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.
...............
‘कशासाठी? पोटासाठी... खंड्याळ्याच्या घाटासाठी’ हे काही नुसतंच एक बालगीत नाही. पुण्या-मुंबईच्या प्रवासात आगगाडीच्या ठेक्यावर ज्या कुणाला ते प्रथम सुचलं, त्यानं या वरपांगी केवळ बाळगोपाळांसाठी रचलेल्या ओळीमागं जगण्याचं एक फार मोठं सूत्र दडवलं आहे.

पावसाळ्याचे दिवस होते. पुण्या-मुंबईचा आगगाडीनं प्रवास करत होतो. अचानक मला खडकामागं दडलेला झरा दिसावा तसं त्या गाण्यामागलं सूत्र सापडलं. पुणं-मुंबई प्रवासातच कशाला? साऱ्या जीवनातच ‘कशासाठी?’ याचं पहिलं उत्तर ‘पोटासाठी’ हेच आहे; पण एवढंच नाही. ‘पोटासाठी’ या उत्तराला शंभरातले फक्त पास होण्यापुरते मार्क आहेत. त्यापुढलं ‘खडाळ्याच्या घाटासाठी’ हे फार महत्त्वाचं आहे.

आमची गाडी ‘कशासाठी पोटासाठी’ करत चालली होती. डब्यातली मंडळी इकडल्या-तिकडल्या गप्पांत रंगली होती. बोगद्यातून गाडी बाहेर आली आणि गप्पा थांबल्या. सगळ्यांचे डोळे खिडक्यांबाहेर लागले. श्रावणाचे दिवस होत आणि बाहेर हिरव्याचा सोहळा साजरा होत होता. आतापर्यंत जी मंडळी दैनंदिन कटकटीच्या गोष्टी बोलत होती, ज्यांच्या चेहऱ्यावर मुख्यत: वैतागच दिसत होता, त्यांचेदेखील चेहरे बदलले. जो तो एक-दुसऱ्याला सह्याद्रीवर चढलेली ती झऱ्यांची आणि धबधब्यांची लेणी दाखवायला लागला. रिव्हर्सिंग स्टेशनजवळचा तो अलौकिक चित्रपट, ती नागफणी, त्या दऱ्या, एखादी टणाटण उड्या मारत जाणारी माकडांची टोळी, तीन दिवसांचं चरित्र होऊन फुललेला तेरडा, ते हिरवं तळकोकण... साऱ्या डब्याचा नूरच बदलला. कोणीतरी सांगत होतं, पुण्या-मुंबईसारख्या आगगाडीचा प्रवास जगात कुठं नसेल. काय सुंदर आहे!

‘कशासाठी? पोटासाठी!’चा उत्तरार्ध खंडाळ्याच्या घाटानं पुरा केला. डब्यातली मंडळी काही प्रथमच त्या गाडीनं मुंबईला निघालेले नव्हती. गिरणी-कारखान्यांतून किंवा कचेऱ्यांमधून सोय पाहणारांना ‘पोटासाठी’च आमची आगगाडी ओढून नेत होती आणि नेता नेता सांगत होती, की नुसतं पोटासाठी नव्हे, तर खंडाळ्याच्या घाटासाठीसुद्धा. इथल्या गर्द वृक्षराजीसाठी... रानफुलांसाठी... झऱ्यांसाठी... धबधब्यांसाठी. पाळण्यातल्या पोराच्या अंगावरून हलकेच दुलई ओढावी तसं हिवाळ्यात डोंगरमाथ्यावरून धुकं ओढलं जातं हे पाहण्यासाठी!

एखादी मुन्सिपालटी जेव्हा नाटकाचं थेटर बांधते त्या वेळी कशासाठीचं उत्तर फक्त ‘पोटासाठी’ एवढंच ज्यांना मान्य आहे, त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. रोज दाराशी कचऱ्याची पेटी साफ करणारा माणूस रात्रीच्या गाण्याच्या बैठकीत बाजाची पेटी वाजवताना दिसला, तर जसा धक्का बसेल तसा धक्का बसतो. कारण ते हात फक्त झाडू धरण्यासाठीच निर्माण झाले आहेत, ती बोटं आपल्या पोरांची बेफिकिरीनं रस्त्यात केलेली विष्ठा गोळा करण्यासाठी उपयोगात आणायच्या योग्यतेची आहेत, हे ह्या असल्या प्रवृत्तीच्या लोकांनी स्वत:च ठरवलेलं असतं.

‘म्युनिसिपालिटी’ ही संस्था बिचारी जन्मकाळीच काही अनिष्ट ग्रह घेऊन उपजली. संपूर्ण स्वराज्याची हक्कानं मागणी करणाऱ्या भारतीयांच्या पदरात इंग्रजांनी स्थानिक स्वराज्य टाकलं. पंक्तीला मानानं बसण्याचा हक्क असलेल्यांची उष्टी पत्रावळ टाकून बोळवण केली अशी लोकांची भावना झाली. ‘आम्हाला तुमचे हे स्थानिक स्वराज्य नको,’ ही राष्ट्रीय प्रवृत्तीच्या माणसांची पाहिली प्रतिक्रिया होती. हे नको असलेलं पोर घरात कुणीतरी आणून टाकलं होतं. त्यामुळं म्युन्सिपालटीत जाणारे मेंबर एक तर अराष्ट्रीय इंग्रजधार्जिणे किंवा कोणी तरी गल्लीगणेश हाच ग्रह मनात रुजला. लोकशाहीचा श्रीगणेशा गिरवण्याची पाटी आपल्या हाती लागली आहे असे न मानता, केवळ रस्त्यातला केर काढण्याचा आणि मयताचे पास लिहिण्याचा अधिकार देऊन इंग्रजानं आपल्याला फसवलं, असं भारतीयांना वाटलं. त्यातून महाराष्ट्रात तर माधवराव जोशांच्या ‘म्युनिसिपालिटी’ नाटकानं म्युनिसिपालिटीची प्रतिमाच अशी खुळ्यांचा दरबार असल्यासारखी रंगवली, की पुन्हा तो खरवडून स्वच्छ सुंदर करणं जवळजवळ अशक्य करून टाकलं. दुर्दैवानं आसपास घडतही तसंच होतं. माधवरावांच्या विनोदी प्रतिमेला पंचपक्वान्नांचं खाद्य पुरवण्याची जणू अहमहमिका लागली होती. ‘म्युन्शिपालटीची मेंबरं’ ही जशी काही जीवनातल्या नाटकात विनोदी पात्रं म्हणूनच अवतरली आहेत, ही कल्पना रूढ झाली.

बरं, लोकांच्या पुढं तरी म्युनिसिपालिटी म्हटल्यावर चित्रं काय उभी राहत होती... कचऱ्यांचे ढिगारे आणि सटीसामाशी ते हलवायला येणाऱ्या गाड्या.... रस्त्यात ओशाळवाणं होऊन वेडंवाकडं उभं राहिलेल्या दिव्याचं ते करुण मिणमिणणं... म्युन्सिपाल्टीच्या शाळांचे ते कोंडवाडे.. ते भयाण मोफत दवाखाने... आणि अखेरचा तो अटळ पास... ही असलीच विद्रूप चित्रं! सार्वजनिक निवडणुकांचा तो पहिलावहिला अनुभव. मतासाठी चालणाऱ्या उमेदवारांच्या त्या दिव्य लीला लोक प्रथमच पाहत होते. कारभारातला ‘आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी’ हा गलथानपणा अनुभवायला मिळत होता. असल्या या विसंवादी वातावरणात वाढणारं हे पोर पुढं काही पराक्रम करून दाखवू शकेल ही मुळी कुणाची अपेक्षाच नव्हती. विड्यांची थोटकं टाकायच्या डबड्याला ‘मुन्शिपालटी’ म्हटलेलं आजही आढळतं. असल्या ह्या अवलक्षणी बाळाकडून जीवनात कसल्याही पराक्रमाची अपेक्षा करायचीच कशी?

स्वातंत्र्यानंतर मात्र परिस्थितीत बदल घडायला लागले. मुख्य फरक पडला म्हणजे ‘म्युनिसिपालिटीची’ नगरपालिका झाली. हा केवळ नावापुरताच फरक आहे असे मी मानत नाही. हिंदी भाषेत ‘नागर-निगम’ म्हणतात. मला त्यापेक्षा ‘नगरपालिका’ हा शब्द अधिक योग्य वाटतो. इंग्रजांच्या राज्यात ज्या ज्या काही सुधारणा घडायच्या त्या साहेबाच्या मेहेरबानीनंच घडायच्या. या सुधारणांना नोकराला दिलेल्या ‘पोस्ता’चं स्वरूप असे. स्वातंत्र्यानंतर भारतीय जनमानसात घडलेला महत्त्वाचा बदल म्हणजे चांगल्या रीतीनं जगण्याच्या हक्काची जाणीव. आता सार्वजनिक बाग ही महाराणीच्या वाढदिवसाची गरिबांना भेट म्हणून नव्हे, तर एक सार्वजनिक गरज म्हणून फुलवलीच पाहिजे - असल्या सुंदर बगिच्यांतून फिरणं आणि जीवनाचा आनंद उपभोगणं हा आमचा हक्क आहे - ही भावना उत्पन्न झाली. ‘गोरगरीब’ हा शब्द केवळ आर्थिक संदर्भात राहिला. गुरासारखा गरीब या मानसिक संदर्भात नव्हे. लोकशाहीनं गोरगरिबांतल्या गरीब माणसाला श्रीमंताइतकाच शासनाला प्रश्न विचारण्याचा आणि शासनाच्या कारभारात भाग घेण्याचाही हक्क दिला. माणसं मनानं ‘स्वतंत्र’ होणं हा राजकीय स्वातंत्र्याचा उद्देश हळूहळू उमगायला लागला. ‘म्युन्सिपालिटीचा कारभार ना? हा असाच चालायचा,’ ही उपेक्षेची किंवा असहायपणाची जाणीव जाऊन म्युन्सिपालिटीचा कारभार कसा चालला पाहिजे, याचा आता विचार होऊ लागला. आचाराची पहिली पायरी विचार ही आहे.

आता म्युन्सिपालिटीकडे पालकत्वाची भूमिका आली. कराच्या रूपात वसूल केलेल्या रकमेच्या विनियोगातून केवळ सार्वजनिक आरोग्यच नव्हे, तर मानसिक आरोग्यही सुधारलं पाहिजे या कर्तव्याची जाणीव हे पालकत्व करण्यासाठी निवडलेल्या नगरपित्यांना झाली. (ज्यांना अजूनही झाली नसेल त्यांनी ती करून द्यायला हवी.) गेल्या दहा-पंधरा वर्षांत आपल्या पुणे शहरातच केवढा विलक्षण फरक पडला! - रोज पडतो आहे. ‘आम्हाला अधिक सुंदर वातावरणात जगण्याचा हक्क आहे,’ असा जणू काय एक मूक आक्रोश चालावा, अशा रीतीनं पुण्याच्या पुराण्या नगररचनेत बदल घडून येताहेत.

आज एखादा पुणेरी रिप व्हॅन विंकल जागा झाला, तर पुण्यातले रुंदावलेले रस्ते, तळ्यातल्या गणपतीपुढचा बगीचा, संभाजी उद्यान, शाहू उद्यान, पेशवे उद्यान, रुंद केलेला लकडी पूल, कोपऱ्या-कोपऱ्यांवर उभे केलेले देखणे पुतळे हे सारं पाहून तो बावचळून जाईल. हे सारे बदल घडून आले याचं कारण प्रथम वैचारिक बदल झाला. म्युन्सिपालिटीकडे आता पालकत्वाची भूमिका आली. एके काळचा ‘मेंबर’ हा आता नगरपिता झाला.

हा फरक काही एका रात्रीत झाला नाही. रोम काही एका दिवसात बांधलं नव्हतं. अनेक प्रकारच्या विरोधांतूनच हा बदल होत गेला. समाजात विद्युत्प्रवाहाप्रमाणं करणात्मक आणि अकरणात्मक प्रवाह असतात. निसर्गात कुठलाच बदल संघर्षाशिवाय घडत नाही. आपण जगत असतो म्हणजे क्षणाक्षणाला मरत असतो हे जसं आहे, त्याचप्रमाणं साऱ्या मानवी समाजाचं आहे. ‘जुनें जाउं द्या मरणालागुनि’ म्हणावंच लागतं. लहानग्या, चिमुकल्या बोळांशी काही सुखद आठवणी गुंफलेल्या असतीलही; पण ते बोळ आजूबाजूची घरं पाडून रुंद करावे लागतात. अशा वेळी विरोध सुरू होतो. त्यातून चिरोट्यासारखे समाजाचेदेखील पापुद्रे असतात. काही वरचे, काही खालचे. काहींना साखरेचं साहचर्य अधिक, काही त्या गोडव्यापासून वंचित...! बालपणातले संस्कार निराळे असतात. आर्थिक परिस्थिती भिन्न असते. पूर्वग्रह असतात. स्वार्थ असतो. बुद्धिमत्तेत दर्जे असतात. या नानाविध कारणांनी सार्वजनिक जीवनात ‘सर्वेषाम् अविरोधेन’ चालणं दुरापास्तच असतं. त्यामुळं ज्यांना भविष्याचं दर्शन आधी घडतं, त्यांना सदैव विरोधच होतो. ज्या पुण्यात शाळेत शिकायला जाणाऱ्या मुलींच्या अंगावर चिखलफेक होत असे, त्याच पुण्यात फटफटीच्या मागल्या सीटवर आपल्या वृद्ध वडिलांना बसवून डॉक्टरांच्या दवाखान्याकडे नेणारी सुकन्या आढळते. हा बदल घडवायला फुले-आगरकर-कर्वे यांसारख्या देवमाणसांना काय भयंकर भोग भोगावे लागले आहेत! पुण्यात साधी बस सुरू झाली त्या वेळी ‘पुण्यात कशाला हवी होती बस? इथं सायकलीवर टांग टाकली की तासाभरात नगरप्रदक्षिणा करता येते!’ - म्हणणारे लोक होते. आज बसेस अपुऱ्या पडतात.

एकदा ही पालकत्वाची भावना रुजल्याबरोबर पाल्याच्या सर्वांगीण विकासाची जोपासना नगरपित्यांवर आली.

पूर्वीही म्युनिसिपल शाळा होत्या. परंतु तिथं उत्तम दर्जाचं शिक्षण द्यायचं आहे ही भावना नव्हती. गरिबांच्या पोरांना चार अक्षरं लिहिता आली आणि जुजबी आकडेमोड करता आली की संपलं, ही भावना होती. त्यामुळं इतरत्र पोटापाण्याची सोय होऊ न शकणारे व्हर्नाक्युलर फायनल तिथं शिक्षक म्हणून जात. त्यांचे पगार अपुरे. त्या काळातल्या स्वस्ताईलाही अपुरे असत. जोड-उद्योग म्हणून त्यांतले काही बिचारे लग्नातल्या पंक्तीत वाढप्याचं काम करत. शाळेतले विद्यार्थी दरिद्री, शिक्षक दरिद्री आणि इमारतीही दरिद्री! यापुढं खासगी शाळांपेक्षाही नगरपालिकेच्या शाळा अधिक सुंदर हव्यात हा आग्रह सुरू झाला. ‘मंडई’ हे केवळ भाजीपाला विकत घेण्याचं स्थान न राहता सहज मौज म्हणून फिरून यावं अशी सुंदर जागा झाली. उपयुक्ततेच्या आणि स्वच्छतेच्या जोडीला सौंदर्य हा विचार आला. नागरिकांचा मानसिक विकास हा आता नगरपालिकेच्या कक्षेत आला. थोडक्यात म्हणजे कल्याणकारी राज्याच्या कल्पनेत प्रजेच्या सर्वांगीण विकासाची जी जबाबदारी असते, ती आता नगरपालिका आणि पुण्यासारख्या झपाट्यानं वाढणाऱ्या शहरात महानगरपालिकेकडे आली. गल्लीबोळांनी बुजबुजणाऱ्या गावाचं महानगर झालं. साहजिकच इथल्या नागरिकाचाही महानागरिक झाला. त्याला नगरविकासाची नवी आणि भव्य स्वप्नं पडायला लागली.

एके काळी जिथं फक्त गुन्हेगार वसाहत नावाची निराळी वसाहत असे, तिथं लोकांचं आर्थिक जीवन समृद्ध व्हावं म्हणून औद्योगिक वसाहती झाल्या. कारखान्यांचा कळकट-धुरकटपणा जाऊन कारखान्यांच्या आवारात सुंदर हिरवळी आल्या, बागा आल्या. आणि आधुनिक पद्धतीनं बांधलेल्या घरांच्या वसाहती आल्या. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहं ही कॉलेज चालवणाऱ्यांची जबाबदारी होती. आता महानगरपालिकेनं विद्यार्थ्यांची वसतिगृहं बांधली. मुक्तद्वार वाचनालय आलं. जुन्या बुद्रुक पेठांच्या जागी जिथं मोकळी हवा खेळते अशा नव्या पेठा आल्या. ओसाड पडीक जमिनीचं भाग्य उदयाला आलं. तिथं बागा आल्या. जी पर्वती गावाबाहेर होती तिचाच आस करून पुणे शहर तिच्याभोवती आता चक्राकार वाढू लागलं आहे. अनेक गरजा वाढल्या. क्रीडांगणाची भूक वाढली. भव्य स्टेडियम उभं राहिलं. गलिच्छ वस्त्यांच्या निर्मूलनाचे प्रश्न आले. सुदृढ शरीरावर खरजेचे फोड उठावे तशा या झोपड्या डोळ्यात खुपू लागल्या; पण त्याबरोबरच पालकत्वाच्या भावनेमुळं त्यांची अधिक चांगल्या ठिकाणी सोय करण्याची जबाबदारी आली.

आपल्या महानगराच्या सर्वांगीण विकासात कशाकशाची उणीव आहे, त्याचा खूप जोरानं विचार सुरू झाला. नागरिकांनी वर्तमानपत्रांतून ते विचार व्यक्त करायला सुरुवात केली. परदेशपर्यटन करून आलेल्या लोकांनी तिथल्या महानगरपालिकांनी केलेल्या चांगल्या कार्याची माहिती लोकांना दिली. प्रत्यक्ष पर्यटन केलेल्या लोकांनीच नव्हे, तर माहितीपटांतून, मासिकांतून, ग्रंथांतून, वास्तुशिल्पाच्या नव्या ज्ञानातून, उपयुक्तेतच्या जोडीला सौंदर्यही हवं हा विचार दृढ झाला. अनेक मार्गांनी हा विचार आणि असंतोष प्रकट होऊ लागला. आता आपला असंतोष प्रकट केला तर तो वांझोटा ठरणार नाही, याची खात्री वाटायला लागली होती.

जीवनातल्या सर्वच अंगांनी आता ‘कशासाठी? पोटासाठी’च्या बरोबर जीवनातल्या खंडाळ्याच्या घाटातल्या सौंदर्याचा शोध अधिक जोमानं सुरू होतो आहे. आपण ह्या जगात नुसतेच पोटार्थी म्हणून आलो नाही, तर आनंदयात्री आहोत याची भावना समाजात अधिक रुजवायला पाहिजे, हा विचार समाजाच्या सर्व थरांतून रूढ होतो आहे. ते सौंदर्यमय वातावरण निर्माण होण्यासाठी आवश्यक असणारा आर्थिक विकास कसा घडेल याचीही दक्षता घेतली जाते आहे. सौंदर्याचा शोधदेखील खंडाळ्याच्या घाटातल्या चढणीसारखाच आहे. अनंत अडचणी आहेत. परंतु मला आर्थिक अडचणींपेक्षा मनाची आणि विचारांची दारं बंद करून बसणाऱ्यांच्या विरोधाची अडचण भयंकर वाटते. निव्वळ उपयुक्ततावादी मंडळीपुढं हात टेकावेसे वाटतात. या लोकांच्या मनाची घडणच मला समजू शकत नाही. बोहल्यावरच्या वधूवरांच्या मस्तकांवर मंगलाक्षतांचा वर्षाव होत असताना ह्या असल्या येरूंच्या मनात देशातल्या लोकसंख्येचा प्रश्न आता अधिक बिकट होणार ही भीती नक्की उभी राहत असणार. नव्या जीवनाच्या उंबरठ्यावर पडणाऱ्या सोनपावलांचं सौदर्य त्यांना दिसणार नाही.

‘मुन्शिपालट्यांचा आणि थेटरांचा संबंध काय?’ हा प्रश्न असल्या अगम्य डोक्यांतूनच उभा राहतो. सुदैवानं पुण्याच्या महानगरपालिकेच्या पालकत्वाची भावना असलेल्या नगरपित्यांनी असल्या विरोधाला उत्तम नाट्यगृह उभारूनच उत्तर दिलं आहे.

माझ्या माहितीप्रमाणं पुणे महानगरपालिकेनं हे रंगमंदिर उभारून साऱ्या भारतात एक नवा अग्रमान मिळवला आहे. पुणे महानगरपालिकेच्या बागा होत्या. आज फुललेल्या, कोमेजलेल्या, अर्धस्फुट अशा अनेक मानवी मनाच्या कळ्या, फुलं आणि निर्माल्य झालेल्या मनाचं दर्शन जिथं घडतं अशी ही बागच ‘बालगंधर्व नाट्यमंदिर’ हे नाव घेऊन उभी राहत आहे. संभाजी उद्यानशेजारी हे रसिकांची आणि कलावंतांची मनं फुलवणारं उद्यान उभं राहत आहे आणि केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आरोग्य सुधारण्याची नवी जबाबदारी आता पुणे महानगरपालिकेनं स्वीकारली आहे.

बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी यशवंतराव चव्हाण, पु. ल. देशपांडे आणि अन्य मान्यवर. (फोटो राजहंस परिवाराच्या संग्रहातून साभार)श्रीपाद कृष्णांनी मराठी मनाचं वर्णन ‘आकांक्षांपुढतिं जिथें गगन ठेंगणे’ असं केलं आहे. एव्हान नदीच्या काठी स्ट्रॅटफर्डला शेक्सपिअरचं भव्य स्मारक उभं आहे. आज मुळामुठेच्या तीरी पुण्याला, इंग्रजांना शेक्सपिअर जितक्या प्यारा तितकाच मराठी माणसांना प्यारा असणाऱ्या त्यांच्या लाडक्या बालगंधर्वांचं स्मारक उभं राहतं आहे. वास्तूची भव्यता ती उभारणाऱ्यांच्या मनाची भव्यता दाखवते. आज हे नाट्यमंदिर पाहताना कलावंतांचं मन पुण्याच्या नागरिकांविषयी कृतज्ञतेनं भरून येईल. पुण्याच्या रसिक नागरिकांना अभिमानानं म्हणावंसं वाटेल, की ज्या थोर कलावंतानं आयुष्याची साठ-सत्तर वर्षं आमच्या जीवनात अपार आनंद दिला, ज्याची गोजिरी पार्थिव मूर्ती नष्ट झाली, तरी ज्याचे अपार्थिव स्वर अमर आहेत, त्याचं स्मृतिमंदिर आम्ही प्रथम उभं केलं, आणि ज्यांच्या मनाची दारं मोकळी आहेत आणि ज्यांना भविष्याचं दर्शन घडू शकतं असे लोक म्हणतील की, ‘वा! पुण्याची ही महानगरपालिका नव्या काळाची पाउलं ओळखणारी आहे. पालकाच्या पोटी असणारं प्रेम जाणणारी आहे.’

मनुष्यप्राण्याला भाकरी तर हवीच हवी. ती त्याच्यातल्या प्राण्याची भूक आहे. त्याची दुसरी भूक आहे ती शरीरापलीकडे नांदणाऱ्या आनंदाची. ती भागली तरच त्या प्राण्यातलं मनुष्यत्व प्राणीपणावर मात करून जाऊ शकतं. ही भूक संभाजी उद्यानातलं एखादं गुलाबाचं फूल भागवतं, नेहरू स्टेडियमवर रंगलेला खेळ पाहताना ती भागते. उद्या या बालगंधर्व रंगमंदिरात बालगंधर्वांच्याच सुरांतून स्फूर्ती घेऊन गाणारी पुढल्या पिढीतली एकलव्यासारखी बालगंधर्वांच्या गायकीची उपासना करणारी कलावती तरुणी गाईल. त्या वेळी समोरचा रसिकही ही दुसरी भूक भागल्यामुळं तृप्त होईल. बालगंधर्व रंगमंदिराला काय किंवा संभाजी उद्यानातली बहरलेली फुले पाहून मिळालेला काय, जो दुवा मिळेल, त्या प्राप्तीतला अर्धा वाटा महानगरपालिकेचा असेल.

नगरपिते येतात-जातात. जाणाऱ्या नगरपित्यांनी जाता जाता मागं पाहावं आणि आपण ज्यांचे पालक म्हणून त्या स्थानावर बसलो त्या पाल्यांसाठी आनंदाचा असला कुठला ठेवा ठेवून चाललो आहो त्याचा स्वत:च्याच मनाशी हिशेब करावा. मतदारांना गुंगवणारे अहवाल देता येतात. स्वत:च्या मनाला फसवणारा हिशेब नाही करता येत. नव्यानं नगरपिते होऊ पाहणारांनी ही पालकत्वाची भूमिका नीट मनात बाळगावी. दुर्दैवानं आजही काही अपवाद सोडले तर सार्वजनिक जीवनात सर्व प्रकारची निर्मलता अभावानंच दिसते, आणि म्हणूनच असल्या अनेक अमंगल शक्तींवर मात करून जीवनातल्या सौंदर्याच्या उपासनेची ही असली भव्य आणि सुंदर स्थानं महानगरपालिकेकडून उभी केली जातात त्या वेळी उदंड वाटतं.

या प्रसंगी बालगंधर्वांच्या स्मृतीला वंदन करताना पुढल्या पिढ्यांसाठी मराठी रंगभूमीवरच्या अनभिषिक्त सम्राटाचं भव्य स्मारक उभारणाऱ्या पुण्याच्या महानगरपालिकेला, पर्यायानं पुण्याच्या साऱ्या नागरिकांना अंत:करणपूर्वक धन्यवाद देतो. वेरूळ-अजिंठ्यानंतर केवळ निर्मळ आनंदासाठी उभारण्याच्या भव्य वास्तुशिल्पाची परंपरा परकीयांच्या राजवटीत भंगली होती. ह्या सुंदर आणि भव्य वास्तूच्या रूपानं त्या परंपरेचा जीर्णोद्धार होवो आणि ‘उत्कट भव्य तें घ्यावें’ म्हणणाऱ्या समर्थांच्या वंशातले आम्ही आहोत, हे असल्या वास्तूंकडे अंगुलिनिर्देश करून म्हणण्याचं भाग्य आम्हांला लाभो, ही माझी इच्छा व्यक्त करतो.

(स्मरणिकेतील हा लेख मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘पुरचुंडी’ या पुस्तकात पुनर्मुद्रित करण्यात आला आहे. ‘पुलं’च्या साहित्याचे स्वामित्व हक्क असणाऱ्या ‘आयुका’ची परवानगी घेऊन हा लेख येथे प्रसिद्ध केला आहे.)

मूळ स्रोत - https://www.bytesofindia.com/P/UZWBBI

1 प्रतिक्रिया:

अमोघ कुलकर्णी said...

खूप छान. पण आज पु.ल.हयात असते तर जरा वेगळ बोलले असते