Monday, October 8, 2007

जपानी खाणावळ

त्या रात्री जपानी खाणावळ म्हणजे काय ते मी प्रथम पाहिले. जपानी भाषेत तसल्या खाणावळींना रियोकान म्हणतात. एका टुमदार लाकडी घरात आम्ही शिरलो. दारातच पाचसहा बायका आमच्या स्वागताला उभ्या होत्या. त्यांनी कमरेत वाकूनवाकून आमचे जपानी स्वागत केले. त्यांच्यापैकी एकीने चटकन पुढे होऊन माझ्या बुटांचे बंद सोडवले आणी सपाता दिल्या. मग दुसरीने त्या लाकडी घरातल्या भुलभुलैयासारख्या ओसऱ्यांमधून एका चौकटीपुढे उभे केले. तिसरीने चौकट सरकवली. आत जपानी दिवाणखाणा होता. सुंदर ततामी पसरलेल्या. मध्यावरच एक काळाभोर लाकडी चौरंग मांडला होता. बसायला भोवताली पातळ उशा होत्या. कोपऱ्यात तोकोनोमा. तिथे सुंदर पुष्परचना. आम्ही चटयांवर मांड्या घालून बसलो. त्या खाणावळीणबाईंनी माझा कोट काढला. इतक्यात बांबूच्या, होडीच्या आकाराच्या छोट्या छोट्या ट्रेजमधून सुगंधीत पाण्याने भिजलेले टुवाल घेऊन एक बाई आली. तिने माझे तोंड पुसण्यापूर्वी मीच चटकन तोंड पुसून टाकले. आणि दिवसभर चालून अंग आंबले होते म्हणून बसल्या बसल्या जरासे हातपाय ताणले. लगेच त्या जपानी दासीने माझे खांदे चेपायला सुरूवात केली. आमचे कुटुंब जरासे चपापले. मीही नाही म्हटले तरी गोरामोराच झालो. (माझ्या अंगभूत वर्णाला जितके गोरेमोरे होता येईल तितकाच!) काय बोलावे ते कळेना.

एकीलाही जपानीखेरीज दुसरी भाषा येत असेल तर शपथ! त्या खाणावळीत उत्तम चिनी जेवण मिळत होते, याची खात्री करूनच तिथे गेलो होतो. पण हे आतिथ्य कसे आवरावे ते कळेना. त्या बाया मधूनच पाय चेपायच्या. सिगरेट काढीपर्यंत काडी पेटवून धरायच्या. द्वारकाधीशाच्या अंतःपुरात सुदामदेवाचे त्या बायांनी कसे हाल केले असतील ह्याची कल्पना आली. तरी सुदामदेव तिथे एकटाच गेला होता. मी ह्या स्त्रिराज्यात सहकुटुंब सापडलो होतो. हळूहळू खाद्यपदार्थ आले. साकेचे पेले भरले. जेवणातल्या तीनचार कोर्सेसनंतर एका परिचारीकेने हळूच समोरची ती चौकटीचौकटीची भिंत सरकवली आणि पुढले दृश्य पाहून माझा घास हातातच राहिला. पुन्हा एकदा सौंदर्याचा अनपेक्षित धक्का देण्याचा जपानी स्वभावाचा प्रत्यय आला. समोर एक चिमुकले दगडी उद्यान होते. त्यातून एक चिमणा झरा खळखळत होता. पलीकडून पुलासारखी गॅलरी गेली होती. बहालावर ओळीने जपानी आकाशकंदिलासारखे दिवे टांगले होते. त्यांच्या मंद प्रकाशात तो झरा चमकत होता. आणि सतारीचा झाला वाजावा तसा स्वर चालला होता. पलिकडून कुठूनतरी सामिसेनवर गीत वाजत होते. (सुदैवाने कोणी गात मात्र नव्हते.) चौरंगावर चिनी सुरस सुरसुधा रांधियली होती. त्या दृश्याला स्वरांची आणि जपानीणबाई बाई लडिवाळपणा करीत होत्या. 

क्योटोतल्या त्या जपानी खाणावळीतली रात्र बोरकरांच्या जपानी रमलाच्या रात्रीची याद `जंबिया मधाचा मारि काळजात!' रियोकान सोडताना त्या दासीने पुन्हा बूटाचे बंद बांधले. आणि सगळ्याजणींचा ताफा रांगेत उभा राहून दहा दहा वेळा वाकून म्हणाला "सायोना~~रा------सायोना~~रा---!" छे! जपानी बायकांचा सायोनारा छातीचे ठोके थांबवतो!

पुर्वरंग
पु.ल. देशपांडे 

हा लेख संपूर्ण वाचण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.

4 प्रतिक्रिया:

Gabbar said...

refreshing!!!

shobha said...

atishay sundar!!!

Santosh Pawale said...

interesting

Mohini Dandge said...

सुरेख अतिथ्य !
'अतिथि देवो: भव:' असे म्हणतात ना !