- शांता ज. शेळके
पु.ल. देशपांडे यांच्या लेखनातील वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचे आणि त्यांतून प्रकट होणा-या त्यांच्या साहित्यगुणांचे वर्णन अनेकांनी अनेक प्रकारे केले आहे. त्या वर्णनांनाही पुरुन उरेल इतकी चतुरसता, समृद्धता त्यांच्या विविध आणि विपुल वाङ्मयीन आविष्कारांत आहे. तथापि, हे सारे गुणविशेष ध्यानात घेऊनही पु.लं.चे सर्वांत मोठे वैशिष्ट्य मला जाणवते, ते म्हणजे त्यांच्या लेखनातून सतत व्यक्त होणारी मध्यमवर्गीय संस्कृती. गेल्या अनेक पिढ्या मराठी माणसाने आपली म्हणून जी संस्कृती, जीवनसरणी अनुभवली आहे, जपली आणि जोपासली आहे; तिचा इतका सर्वांगीण, संपूर्ण आणि खोलवर वेध घेणारा पुलंसारखा अन्य कोणताही लेखक गेल्या अर्धशतकात मराठी साहित्यामध्ये होऊन गेलेला दाखवता येणार नाही. एक लेखक आणि एक माणूस या नात्याने पुलंनी जी अपरंपार लोकप्रियता संपादन केली, त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या साहित्यातून सतत प्रकट होत राहिलेली ही मराठी मध्यमवगीर्य संस्कृती. बहुसंख्य मराठी माणूस ही या संस्कृतीचीच निमिर्ती आहे. म्हणून तिचा सातत्याने आविष्कार करणारे पु.ल. मराठी वाचकांना इतके भावले, आवडले. नुसते आवडले इतकेच नव्हे; हा लेखक त्यांना अगदी आपला, आपल्या घरातला, आपल्याच रक्तामासाचा असा वाटला. पुलंशी त्यांचे अभिन्न, उत्कट असे नाते जडले. ही आपुलकी, ही जवळीक गेल्या अर्धशतकात अन्य कोणत्याही लेखकाच्या वाट्याला आलेली नाही.
पुलंच्या साहित्यात वारंवार येणा-या या मध्यमवर्गीय संस्कृतीमुळे ते वाचकांच्या सर्व थरांत जाऊन पोहोचले, त्यांना अतिशय लोकप्रियता लाभली ही गोष्ट खरीच आहे; पण त्यामुळेच त्यांच्या साहित्यावर वेळोवेळी काही आक्षेपही घेतले गेले. एका मुलाखतीत पुलंनी या आक्षेपाला आपल्या परीने उत्तर दिले आहे. ते म्हणतात, 'मी मध्यमवगीर्यांवरच सगळं साहित्य लिहिलं, असा आक्षेप मध्ये कुणीतरी माझ्यावर घेतला. पण मी मध्यमवर्गीयांवर लिहिलं याचं कारण मीच मुळात मध्यमवर्गीय आहे, हे आहे. उद्या कुणी म्हणालं, तुम्ही सगळं मराठीतच लिहिलं आहे. तर त्याला काय उत्तर देणार? मला मराठीत लिहिता येतं म्हणून मी मराठीत लिहिलंय एवढंच!' पुलंनी आपल्या आक्षेपकांना दिलेले हे उत्तर अर्थपूर्ण आहे. पुलंच्या लेखनावर घेतला जाणारा आणखी एक आक्षेप म्हणजे, ते भूतकाळात अधिक रमतात. इंग्रजीत ज्याला nostalgia म्हणतात ती स्मरणरंजनाची वृत्ती हा त्यांच्या वाङ्मयीन आणि व्यक्तिगत स्वभावाचा एक ठळक विशेष आहे. या दोन्ही आक्षेपांचा थोड्या बारकाईने विचार केला पाहिजे; आणि त्यासाठी पु.लं.चे बालपण ज्या काळात गेले तो काळ, ती परिस्थिती प्रथम ध्यानात घेतली पाहिजे.
त्या स्वातंत्र्यपूर्व काळात कुटुंब हा मराठी समाजाचा केंदबिंदू होता. बहुतेक मराठी माणसे कुटुंबाच्या आश्रयाने राहत. एकूण जीवनालाच कुटुंबसंस्थेची भरभक्कम बैठक होती. पु.लं.चे संस्कारक्षम वय, त्यांचे बालपण या काळात गेले. कुटुंबजीवनाचे, त्याप्रमाणेच मध्यमवर्गीय संस्कृतीचे खोल ठसे त्यांच्या मनावर उमटले. त्यांनी सिद्ध केलेली नैतिक आणि सांस्कृतिक मूल्यपरंपरा ही पु.लं.ची आधारभूत प्रेरणा होती. ती त्यांच्या साहित्यातच नव्हे, तर व्यक्तिगत जीवनातही वारंवार प्रकट होत राहिली. त्या काळातील वाङ्मयीन दैवते, तेव्हाचे राजकीय पुढारी, स्वातंत्र्याकांक्षेने भारलेले तेव्हाचे वातावरण; कोणत्याही संवेदनाक्षम उमलत्या मनाला आतून हेलावून टाकील, उत्तेजित आणि प्रस्फुरित करील असे ते सारे होते. पु.ल. जेव्हा मागच्या या काळाकडे वळून बघत, तेव्हा ते भारावून जात. हे मंत्रभारलेपण त्यांना कधी सोडून गेले नाही. त्यांच्या साहित्यावर वारंवार आढळून येणारी स्मरणरंजनाची वृत्ती ही पु.लं.ना त्या काळाने दिलेली देणगी आहे.
हे सारे खरे असले, तरी पु.ल. भूतकाळाचे केवळ भाबडे, भाविक भक्त नव्हेत. मध्यमवर्गीय संस्कृतीचा गुणगौरव करणा-या पु.लं.ना तिच्यातले दोषही दिसत होते. खुपत होते. मध्यमवगीर्यांची संकुचित मनोवृत्ती, जातीय अभिमानामुळे त्यांच्या ठायी निर्माण होणारे क्षुद अहंकार, आर्थिक कनिष्ठ जीवन वाट्याला आल्यामुळे श्रीमंतांविषयीचा खोलवर रुजलेला असूयायुक्त हेवा, पूर्वजांची थोरवी सांगून आपले दैन्य झाकण्याची धडपड या दोषांची पु.लं.ना चांगली जाण होती. तिने त्यांच्या विनोदी लेखनाला विषयांचा भरपूर पुरवठा केला. मध्यमवर्गीयांचे गुणदोषमुक्त प्रत्ययवादी चित्रण प्रथम चिं. वि. जोशी यांच्या चिमणरावाने केले. तेच चित्रण पुढे पु.लं.च्या विविध प्रकारच्या लेखांनी, व्यक्तिचित्रांनी अधिक मामिर्कपणे, अधिक जाणकारीने केलेले आढळेल. बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीने या मध्यमवर्गाच्या स्थैर्याला गदगदा हलवले, त्याची स्थिती अनुकंपनीय करून सोडली. या सर्व बदलांबरोबर मिळतेजुळते घेणे त्याला फार अवघड गेले. या वावटळीत सापडलेल्या आणि त्यामुळे हतबल झालेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचे जे चित्र पु.लं.नी 'असा मी असामी' या पुस्तकात रंगवले आहे, त्याला तोड नाही. ते चित्रण विनोदी आहे तसेच कारुण्यपूर्णही आहे. विशेषत: स्वातंत्र्योत्तर काळात सर्वसामान्यांच्या वाट्याला जी ससेहोलपट आली, तिचे अतिशयोक्तीपूर्ण तरीही वास्तव वर्णन वाचताना जुना काळ अनुभवलेल्या कोणत्याही वाचकाला त्यात अंतरीची खूण पटल्याशिवाय राहणार नाही. हसता-हसता त्याचे मन गलबलून आल्याविना राहाणार नाही.
नंतर देश स्वतंत्र झाला, पण त्याबरोबर सामान्य माणसासमोर काही वेगळ्या समस्या उभ्या राहिल्या. पूर्वीच्या अनेक सुंदर मूल्यांची पडझड होताना त्याने पाहिली. पैसा या गोष्टीला कधी नव्हे इतके महत्त्व प्राप्त झाले आणि त्यामुळे जीवनाच्या अनेक क्षेत्रांना बाजारूपणाची कळा आली. कला, साहित्य, राजकारण सारे पैशाच्या संदर्भात मोजले आणि विकले जाऊ लागले. सिद्धीपेक्षा प्रसिद्धीला अधिक मोल आले.
साहित्य, संगीत, नाट्य या पु.लं.च्या आवडत्या कलाक्षेत्रांतही अनेक प्रकारच्या भंपकपणाचा सुळसुळाट झाला होता. नवकाव्य, नवकथा, नवसंगीत, नवनाट्य यांच्या नावावर अनेकदा खोटे, कृत्रिम, तकलुपी असे बरेच काही निर्माण होत होते आणि भाबडे रसिक त्यावर लुब्ध झाले होते. या बदलांत जे अस्सल, कसदार, समर्थ होते, ते त्या-त्या कलाक्षेत्राला वेगळे, सुंदर परिमाण देऊन गेले. पु.लं.मधल्या मर्मज्ञ रसिकाला त्याची ओळख पटण्यास वेळ लागला नाही. पण नवतेचा केवळ आव आणणा-या अनेक ढोंगासोंगांचा फुगा फोडण्याचे कार्यही त्यांच्या भेदक विडंबनांनी तितक्याच उत्कटतेने केले. 'सहानुभाव संप्रदाय', 'शांभवी : एक घेणे', 'आठवणी, साहित्यिक आणि प्रामाणिक', 'एक सौंदर्यवाचक विधान', 'प्रा. अश्व. विश्व. शब्दे' यांसारखे पु.लं.चे अनेक लेख वाचकांना या संदर्भात आठवल्याखेरीज राहणार नाहीत. साहित्याच्या क्षेत्रात माजलेल्या प्रयोगशीलतेच्या नावावर भलभलत्या गोष्टी रूढ करू पाहणा-या कृतक साहित्यसेवकांचा सारा पोकळपणा अशा प्रकारच्या लेखांमधून पु.लं.नी उघडकीला आणला. 'सुरंगा सासवडकर'सारख्या लेखातून त्यांनी सांगीतिक नवसमीक्षेची बेहद्द थट्टा केली आहे, तर 'असा मी असामी'तला नानू सरंजामे किंवा 'बटाट्याच्या चाळी'तला नवलेखक यांच्याद्वारा नवसाहित्यातील कृत्रिम प्रवृत्तींचे अतिशयोक्तीपूर्ण पण प्रभावी चित्र त्यांनी रंगवले आहे.
पु.लं.च्या या प्रकारच्या लेखनामुळे ते केवळ जुन्याचे अभिमानी, भूतकालीन स्मरणरंजनात रमणारे आहेत; असा ग्रह होतो; पण ते काही विशिष्ट अर्थानेच खरे आहे. गेल्या पन्नास वर्षांत साहित्यात, नाट्यात, संगीतादी कलांत जे नवीन सत्य, चैतन्य आणि सार्मथ्य निर्माण झाले, त्यांचे कौतुक पु.लं.नी अत्यंत स्वागतशील वृत्तीने केले आहे. नाट्यक्षेत्रातले नवे प्रयोग त्यांनी कुतूहलाने न्याहाळले. दलित आणि ग्रामीण यांसारख्या वाङ्मयातील नवप्रवाहांची ताकद त्यांनी ओळखली. मर्ढेकर, विंदा करंदीकर, आरती प्रभू, नारायण सुर्वे यांच्या कवितांनी मराठी काव्याचे साचलेपण कसे मुक्त केले आहे, त्यात नवे खळाळ कसे आणले आहेत हे पु.लं.च्या रसिकतेला नेमके उमगले. रंगभूमीवरील प्रयोगशील नाटककाराच्या पाठीवरून शाबासकीचा हात फिरवूनच ते थांबले नाहीत, तर स्वत:ही 'राजा इडिपस', 'माय फेअर लेडी' किंवा 'थ्री पेनी ऑपेरा' अशा समर्थ नाट्यकृतींना त्यांनी मराठी रंगभूमीवर मराठी भाषा-पेहरावासह आवर्जून आणले!
पु.लं.चे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आवर्जून सांगायला हवे. आज साठी-सत्तरीच्या घरात असलेल्या आणि साहित्यक्षेत्रात प्रस्थापित झालेल्या अनेक थोर कलावंतांनी जुन्याकडे निक्षून पाठ फिरवली आहे की काय, अशी शंका येते. आजचे साहित्य कालच्या साहित्यातूनच विकास पावले आहे या गोष्टींचा त्यांना सोईस्करपणे विसर पडलेला दिसतो. काही साहित्यिक तर आधुनिकतेच्या हव्यासाने इतके पछाडलेले आहेत की; जुन्या कलावंतांचे, जुन्या कलाकृतींचे उल्लेखही ते कटाक्षाने टाळतात. असे केले नाही, तर आपण पारंपरिक ठरू अशी भीती त्यांना वाटत असावी असे दिसते. पु.लं.ना हे असे काही करण्याची कधीही आवश्यकता भासलेली नाही. कृतज्ञता हा पु.लं.च्या स्वभावाचा एक अत्यंत सुंदर असा विशेष आहे. नव्याचा पुरस्कार व स्वीकार करताना जुन्याचा नामनिदेर्शही करू नये इतका सावध धूर्तपणा त्यांनी कधी बाळगलेला नाही. यामुळेच मराठी साहित्यातील जुन्या आणि नव्या अशा सा-याच सुंदर आविष्कारांचे एक सलग व संपूर्ण चित्र त्यांचे लेखन वाचताना आपल्या प्रत्ययास येते.
श्री. ना. पेंडसे यांच्या नव्या कादंबरीची थोरवी जाणून घेताना हरिभाऊंचे अस्तित्व नाकारण्याची गरज त्यांना वाटत नाही. मर्ढेकरांच्या आणि आरती प्रभूंच्या कवितेतील निरूपम नावीन्य सहजपणे ओळखणारे पु.ल. रविकिरण मंडळातील यशवंत, गिरीश किंवा माधव ज्यूलियन यांच्या स्मरणात राहिलेल्या कवितापंक्ती तितक्याच प्रेमादराने दाखवतात.

पु. ल. देशपांडे हे असे अनेक वाचनांतून, स्मरणांतून, दर्शनांतून, इतकेच नव्हे; तर अगदी साध्या-साध्या लहानशा गोष्टींमधूनही मराठी मनाला सतत भावत राहिले, प्रिय होऊन बसले. अभिनय, विनोद, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, संगीत, नाट्य, वक्तृत्व अशा अनेक पैलूंमधून त्यांनी मराठी माणसाशी संवाद साधला. त्याबरोबर आपल्या असाधारण दातृत्वाने अनेकांच्या जीवनात त्यांनी सुख, सौंदर्य, प्रकाश आणला. मी जेव्हा पु.लं.चा विचार करते, तेव्हा एक फार जुनी आठवण मनात जागी होते. अनेक वर्षांपूर्वी एक इंग्रजी कादंबरी मी वाचली होती. तिचे नाव मला आठवत नाही. त्या कादंबरीत एका छोट्या मुलीचे चित्र रंगवलेले आहे. ही छोटी सकाळी अंथरुणात उठून बसते. खिडकीतून बाहेर दिसणारा सूर्यप्रकाश, उन्हात हसणारी बाग बघते. तिचे हृदय एकदम आनंदाने भरून येते आणि आपले दोन्ही हात पसरून ती आपल्या बाळबोलीतून एकदम आवेगाने उद्गारते, I love all the world!
पु.ल. हा मला त्या छोट्या मुलीचाच एक प्रौढ पण हृदयात सतत लोभस बालभाव बाळगणारा सुंदर आविष्कार वाटतो.
६ नोव्हेंबर २०११
महाराष्ट्र टाईम्स
पु.ल. हा मला त्या छोट्या मुलीचाच एक प्रौढ पण हृदयात सतत लोभस बालभाव बाळगणारा सुंदर आविष्कार वाटतो.
६ नोव्हेंबर २०११
महाराष्ट्र टाईम्स