Friday, June 12, 2009

मन हाच माणूस

मनाचिये गुंफी ह्या डॉ. प्रकाश साठये यांच्या पुस्तकाला पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेली प्रस्तावना.

(नोंद - हा लेख "मनाचिये गुंफी" ह्या पुस्तकाचे लेखक मान्यवर डॉ. प्रकाश साठये यांच्या पुर्वपरवानगीने इथे प्रकाशित करत आहे. सदर लेखाची परवानगी घेण्याचे मोलाचे कार्य आणि संपुर्ण लेख मराठीत टंकुन देण्याचे अत्यंत मेहनतीचे काम आमचे एक जालमित्र आणि पु.ल.प्रेमी श्री. नितीन येमुल ह्यांनी केले आहे. मराठीत टंकण्यासाठी श्री नितीन येमुल यांना त्यांच्या पत्नी सौ.लता येमुल आणि त्यांचे सुपुत्र अमर येमुल यांची बहुमोल साथ लाभली. ह्या लेखासाठी डॉ. प्रकाश साठये आणि श्री. नितीन येमुल यांच्या परिवाराचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत तरिही आम्ही त्यांचे मनापासुन आभारी आहोत. सर्व श्रेय ह्या दोन मान्यवरांचेच.)

‘मन हाच माणूस’
-- पु. ल. देशपांडे

माणूस ह्या प्राण्याची व्याख्या करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. अजूनही ते चालू आहेत. योगवासिष्ठाने ह्या विषयावर एक निर्णय देऊन टाकला आहे की ‘मन एव मनुष्य:।’ मन हाच माणूस. ही व्याख्या माणसाच्या बाह्य वर्णनाशी जुळणारी नसली तरी आपण जेव्हा अमक्या अमक्या माणसाला ओळखतो असं म्हणतो त्यावेळी त्याच्या केवळ शारीरिक घडणीशी परिचित आहोत एवढंच सांगत नाही. त्याच्या मनाच्या घडणीशी आपल्या त्या ओळखण्याचा संबंध असतो. आपला निरनिराळ्या माणसांशी परिचय असतो म्हणजे निरनिराळ्या मनांशी परिचय असतो आणि निसर्गानं स्वत:च्या निर्मितीची हुबेहूब नक्कल, प्रत न काढल्यामुळे प्रत्येक सर्वसाधारण मनाप्रमाणे असूनही त्यात एक निराळेपण असतं. हे आपलं विशिष्ट मन घेऊनच मनुष्य जन्माला येतो आणि त्यातूनच त्याचं चारचौघांतला एक असूनही एक प्रकारचं निराळेपण दिसून येतं. ह्या निसर्गदत्त किंवा प्राकृतिक निराळेपणामुळे आपण व्यक्ति तितक्या प्रकृती असं म्हणत असतो. मनाची ठेवण उपजत असल्यामुळे एखाद्या प्रसंगी एखाद्याचं वागणं विचित्र वाटलं की ’स्वभावो दुरतिक्रम:’ असे हताश उदगार काढून त्या विचित्रपणाचा संबंध मनाच्या घडणीशी जुळवतो. म्ह्टलं तर आपल्या ताब्यात राहील आणि म्ह्टलं तर बेफाम उधळेल अशा ह्या मन नावाच्या शक्तीशी आपली आयुष्यभर झुंज चालू असते. त्यात पुन्हा माणूस हा काही एकटा जगत नाही. त्याला समाजातला एक घटक म्हणूनही जगावं लागतं; त्यामुळे व्यक्ती म्हणून आपल्या स्वत:च्या विचारांतून स्वत:चा विकास घडवण्याच्या प्रयत्नात असताना सामाजिक परिस्थितीतून होणाऱ्या मनावरच्या संस्कारांचाही त्याच्यावर परिणाम घडत असतो. आपल्या मनाची मालकी सर्वस्वी आपल्या हाती नाही. त्याच्यावर सत्ता गाजवणाऱ्या इतर अनेक अदृश्य सामाजिक शक्ती आहेत हे त्याला उमजतं. म्हणूनच मनाची सुदृढता कमी होऊन ते रोगग्रस्त व्हायला लागलेलं दिसल्यावर त्याच्यावर जन्मजात स्वभावाचे आणि परिस्थितिजन्य संस्कारांचे आघात ह्या दोन्हींची दखल घेऊन मनोरुग्णावर इलाज करावा लागतो.

मनाचा तोल कुठल्या पायरीपायरीनं ढासळत जातो याचं अतिशय मार्मिक वर्णन गीतेतल्या, ध्यायतो पुंस: संगस्तेषूपजायते, ह्या आणि त्यानंतरच्या श्लोकांत आढळते. साऱ्या मनोविकृतीचं मूळ विषयवासनेत तिथे दाखवलं आहे. आणि त्यानंतरच्या काम-क्रोध-संमोह-स्म्रतिविभ्रम, बुध्दिनाश आणि विनाश ह्या अवस्था आजच्या मनोविकारतज्ज्ञांनीही स्वीकारलेल्या आहेत. मनोरुग्णतेचा इतका तर्कशुध्द विचार इतक्या प्राचीन काळी होऊनही त्यानंतर त्या विषयावर संशोधन किंवा शास्त्रीय स्वरुपातलं लेखन आणि ग्रंथनिर्मिती दुर्देवाने देशात झालेली नाही. उलट इतर व्याधीसारखी मनोरुग्णता हीदेखील एक इहलोकी घडणाऱ्या संस्कारातून घडणारी व्याधी आहे असं न मानता हा कुठल्या तरी देवदेवतांचा कोप आहे, आकाशस्थ ग्रहांनी दिलेली पीडा आहे, भूतपिशाच्च बाधा आहे अशा समजुतीनी ह्या व्याधींचा बुध्दिनिष्ठ, वैज्ञानिक प्रयोगनिष्ठ असा पाठपुरावा केला गेलाच नाही. युरोपदेखील अशा प्रकारच्या जादूटोण्याच्या उपचारात फसला नव्हता असं नाही. परंतु युरोपात वैचारिक आणि सांस्कृतिक समाजप्रबोधनाची क्रांती घडविली गेली. अंधश्रद्धेवर पोसलेल्या गेलेल्या आणि माजलेल्या धर्मपीठाना आणि त्यांनी प्रसृत केलेल्या विवेकशुन्य रुढींना धडका देण्याचं कार्य ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रातल्या विद्वानांनी सुरू केलं. त्यातच शरीरचिकित्सेच्या जोडीला मनाची चिकित्सा सुरू झाली. मनाच्या व्यापाराची शास्त्रशुध्द तपासणी व्हायला लागली. मनोरुग्णावस्था येणं म्हणजे मेंदूच्या दळणवळणात अडथळा निर्माण होणं. हा अडथळा कुठे निर्माण होतो? का होतो? तो अडथळा काढून टाकण्याचे भौतिक उपाय काय ह्यासारख्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची धडपड सुरू झाली. अनेक प्रतिभावंत आणि प्रज्ञावंत संशोधकांनी धर्मांध सत्ताधीशांची गैरमर्जी ओढवून घेतली. काहीजण देशोधडीला लागले पण प्रयत्नात खंड पडला नाही. ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात निसर्गाची नाना प्रकारची कोडी बुध्दीनं आणि प्रयोगशाळेत अहोरात्र चालवलेल्या परीश्रमामुळे हळूहळू सुटायला लागली. निसर्गाला नुसतीच एक प्रचंड शक्ती मानून किंवा ह्या निर्मितीचा हवाला देव या कल्पनेवर टाकून त्याची आंधळेपणाने आणि भेदरलेल्या मनाने पूजाअर्चा करीत न बसता त्या निसर्गाचे वागण्याचे नियम शोधून काढले. त्या शक्तीचं बलस्थानही ओळखलं आणि मर्मस्थानही शोधून काढलं. आकाशातल्या विजेचं भयभीत मनानं नुस्तं स्त्रोत्र न गाता तिला वठणीवर आणून माणसाच्या ऐहीक सुखासाठी, समृध्दीसाठी कशी राबवता येईल याचा विचार सुरू केला. आणि वीज ही माणसाघरी राबू लागली. अग्निदेवतेची प्रार्थना करायची गरज उरली नाही. बटन दाबलं की ते कुठल्या धर्माच्या किंवा जातीच्या माणसानं दाबलं ह्याचा विचार न करता दिवा पेटायला लागला. पंखा फिरायला लागला. विजेकडून पाणी तापवूनही मिळायला लागले. थंडगार करूनही मिळायला लागले. ह्या भौतिक शोधांसारखाच माणसाच्या मनाचा शोध सुरू झाला. मेंदूची रचना तपासायचे नवे प्रयत्न सुरू झाले. मनोविज्ञानाच्या क्षेत्रात ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ सिगमंड फ्रॉईड याने प्रचंड क्रांती घडवून आणली. आणि वैद्यक शास्रात मनोवैद्यकाला महत्वाचं स्थान प्राप्त झालं. माणसाच्या मनोव्यापाराच्या तळाशी एखाद्या पाणबुडयाप्रमाणे बुडी मारुन मनोरुग्णतेचं मूळ तिथे सापडतं की काय याचा शोध सुरू झाला. पुष्कळ वेळा ह्या बिघाडांचं मूळ लैंगिक वासनांच्या पूर्ती-अपूर्तीशी निगडीत असल्याचं दिसून आलं. तोटीतून वाहणारं पाणी कुठेतरी एखादा चोथा अडकून तुंबावं आणि त्या पाण्याची घाण सुटावी त्याप्रमाणे मेंदूतही पूर्वायुष्यातील अप्रिय घटनांचा चोथा अडकून तो भाग अकार्यक्षम होतो. त्यातून स्मृतीभंश होतो आणि माणूस भ्रमिष्ट होतो. त्याचा विवेकाचा लगाम सुटतो असं दिसून यायला लागलं. माणसाना पडणाऱ्या स्वप्नांचं वर्गीकरण करून त्यावरून मनोरुग्णावस्थेची चिकित्सा सुरू झाली. हजारो रूग्णांची तपासणी झाली. त्यातून मिळालेल्या माहितीतून व्याधींच्या कारणांची छाननी करण्यात आली. त्यावर इतर व्याधींना द्यावयाच्या औषधाप्रमाणे औषधोपचार सुरू झाले. मनोरुग्ण विज्ञानाची एक शाखा वैद्यकाला जोडली गेली.

इंग्रजी अमलानंतर भारतात युरोपीय पद्धतीच्या वैद्यकीय चिकित्साशास्त्रांच्या अभ्यासाला सुरूवात झाली. आयुर्वेद-युनानी वगैरे चिकित्साशास्त्राची जागा ऍलोपथीने घेतली. वैद्यक इंग्रजीतून शिकवलं जाऊ लागलं. त्यामुळे ज्ञानाच्या त्या शाखेतल्या साऱ्या ग्रंथांची निर्मिती इंग्रजीतून झाली. भारतीय भाषांतून हे ज्ञान आलंच नाही. वास्तविक मंत्रतंत्र, जादूटोणे, अंगारे-धुपारे वगैरे अडाणी उपचार हे आपल्या देशात शारीरिक आणि मानसिक व्याधींनी पछाडलेल्या माणसांवर फार मोठया प्रमाणावर होतात. अशा वेळी प्रयोगशाळेत रीतसर परीक्षा करून सिद्ध झालेलं हे आधुनिक वैद्यक विज्ञान भारतीय भाषांतून लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं. पण डॉक्टरी व्यवसाय करणाऱ्यांना धंदा करण्यात अधिक रस होता. हे नवं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवावं, अंधश्रद्धेतून केल्या गेलेल्या आसुरी उपचारांच्या भयानक परीणामांची जाणीव करून द्यावी असं अगदी तुरळक अपवाद सोडले तर आमच्या भिषग्वर्यांना वाटलं नाही. आधुनिक वैद्यक-विज्ञानावरची मराठीतली ग्रंथनिर्मिती एका कपाटात मावण्याइतपतच आहे.

आणि इंग्रजीत दरसाल हजारो ग्रंथाची भर पडते आहे. ही पुस्तकं काही मुद्रणालयात जन्माला येत नाहीत. त्यासाठी ज्ञानाची ओढ असलेल्या संशोधकवृत्तीच्या आणि ते ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याची तळमळ असलेल्या विज्ञान क्षेत्रातल्या उपासकांची गरज असते. निसर्गाची ही कोडी सोडवून सत्य उजेडात आणण्याची बुध्दीनिष्ठ धडपड करणाऱ्या सत्यसंशोधकांची फळी उभी रहावी लागते. आपापल्या प्रयोगशाळांत रात्रंदिवस तप करणारे ऋषी असावे लागतात. असले तपस्वीच अशा प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती करीत असतात. दुर्दैवाने आधुनिक ज्ञानविज्ञान आपल्या लोकांना कळेल अशा भाषेत सांगायाची ओढ असलेली माणसं आपल्या देशात अपवाद म्हणूनच आहेत. त्याबरोबर वैद्यकातलं नवं संशोधन काय आहे याविषयी काहीतरी जाणून घेण्याची इच्छा असलेला वाचकही इथे नाही. असल्या ह्या निराशाजनक आणि जिथे वाचकवर्गच कमालीचा मर्यादित आहे अशा परिस्थितीत मराठीतून हे शास्त्रीय ज्ञान देण्याचा खटाटोप कोण करील? पण प्रत्येक ठिकाणी अपवाद असतात. डॉ. प्रकाश साठये हा असाच एक अपवाद आहे. मनोवैद्यकाच्या क्षेत्रात तो गेली सतरा-अठरा वर्षे आहे. अनुभव आणि अभ्यास अशा दुहेरी आधारांमुळे त्याला हा ग्रंथ लिहिण्याचा अधिकार आहे. पण ह्या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहावी असं त्याला का वाटले ते मात्र मला कळत नाही. मी मनोवैद्यकाचा अभ्यासक नाही. किंवा मनोरुग्ण्ही नाही. (अशी निदान माझी समजूत आहे.) मला प्रयोगशाळेत उंदीर वापरतात तसं प्रकाशनं वापरलं असाव. म्हणजे मला मराठीतून हे पुस्तक सुबोध वाटलं तर सर्वसाधारण वाचकाला ते समजेल असा त्याचा कयास असावा. ते काहीही असो, सुरुवातीपासून अखेरपर्यंत मी हे पुस्तक उत्सुकतेनं वाचलं. मात्र प्रकाश वैद्यकाचा विद्यार्थी होता त्या काळापासून त्याचा आणि माझा स्नेह आहे. व्यवसायात असूनही त्यानं आपली अध्ययनवृत्ती ताजी ठेवली आहे. समोर येणाऱ्या रोग्याकडे केवळ अर्थोत्पादनाचे साधन म्हणून न पाहता आपल्या वैद्यकविद्येला मिळालेलं नवं आव्हान म्हणून तो पाहण्याची त्याची दृष्टी आहे. त्याच्याकडून मी त्या मनोविकारांनी पछाडलेल्या रुग्णांच्या व्यथांचा इतिहास ऐकलेला आहे त्यावरुन मी हे सांगतो. रुग्णांच्या नावांची गुप्तता ठेवून त्यानं सांगितलेल्या कथांतून प्रत्येक मनोरुग्ण हे नवं आव्हान कसं आहे याची कल्पना येते. रोगाची कारणं किती विविध असतात, त्याची वाढ निरनिराळ्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक स्तरावर जगणाऱ्या रुग्णांत किती निरनिराळ्या कारणांनी होते ते ऐकल्यावर आश्चर्य वाटतं. वैज्ञानिक दृष्टिकोणाच्या जोडीला तज्ज्ञांच्या अनुभवातून निर्माण झालेल्या ह्या विषयावरच्या ग्रंथांचं वाचन वैद्यकासारख्या व्यवसाय आणि सेवा अशा दुहेरी स्वरुपाच्या कार्यांना किती आवश्यक आहे याची जाणीव होते.

आज दुर्दैवानं वैद्यकीय व्यवसाय ही इतर वस्तूंच्या दुकानदारीसारखी दुकानदारी झाली आहे. रुग्ण हे डॉंक्टरांच्या उत्पन्नाचे साधन एवढंच मानलं जातं असं वाटायला लागलं आहे. काहींनी तर धनाढ्य देशीविदेशी औषध निर्मात्यांचे दलाल होण्यात आणि बेसुमार द्रव्य कमावण्यात स्वत:च्या वैद्यकीय व्यवसायाची इष्ट फलश्रुती आहे असं मानलं आहे. अशा ह्या बाजारात आपल्या विषयाचे सतत अध्ययन करुन, आपल्या चिकित्सालयात येणाऱ्या रुग्णांच्या परिस्थितीची टिपणं ठेवून, त्यांची छाननी करुन मनोवैद्यकावर, जिथे खपाची खात्री नाही असा देशी भाषेत ग्रंथ लिहिण्यात वेळ घालवावा हीच मुळात कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. पण ह्या ग्रंथाचं स्वागत केवळ कौतुकापोटी करावं इतका हा सामान्य खटाटोप नाही. ह्या ‘ मनाच्या गंफेत ’ ज्ञानमय प्रदीप हाती धरुन फेरफटका मारलेला आहे. अनेक अज्ञात गोष्टी अंधारातून उजेडात आणल्या आहेत. आणि ह्या मन नावाच्या अजब गुहेतली गुह्यं अतिशय साध्या भाषेत, तज्ज्ञतेचा बडेजाव न मिरवता उलगडून दाखवली आहेत. विषय कळलेला असला की भाषा आपोआप साधी होते. रोगाची कारणं, लक्षणं, त्यावरची उपाययोजना, मनोविकारांवरच्या संशोधनांची माहिती, ह्या विकाराविषयीचे गैरसमज, सामाजिक दडपणामुळे ही व्याधी लपवण्याकडे आणि योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला न घेण्याकडे असलेली प्रवृत्ती, ह्या असल्या लपवाछ्पवीतून उदभवणारी भयानक परिस्थिती, अशा निरनिराळ्या अंगांनी प्रकाशनं ह्या शास्त्राचा परिचय करून दिला आहे.

डॉं. प्रकाशनं ह्या ग्रंथात मनोरुग्णाचा एक व्याधिग्रस्त व्यक्ती म्हणून विचार केला आहे. तसा तो सामाजिक परिस्थितीचे संस्कार घेणारा एक समष्टीतला घटक असल्यामुळे जनमनोवैद्यकाचाही ऊहापोह केला आहे. ह्या दृष्टीनं प्रस्तुत ग्रंथातलं "सामाजिक प्रश्न आणि जनमनोवैद्यक" हे प्रकरण मला फार महत्त्वाचं वाटतं. मानसिक संतुलन बिघडायला अनेक कारणं असतात. त्यात आपल्या कुटुंबपध्दतीत आढळून येणारा सासुरवास आणि त्यातून उदभवणारी स्त्रियांच्यातली मनोरुग्णता हाही प्रकार आहे. ‘व्यसनाधीनता’ हाही मनोविकारांच्या वाढीला भरपूर प्रमाणात हातभार लावणारा प्रकार आहे. स्वर्ग-नरकाच्या कल्पना, पापाविषयींचा धार्मिक धाक हे सामाजिक घटक व्यक्तीच्या मानसिक दौर्बल्याला कारणीभूत होतात. म्हणून मनोविकारावरील उपचारयोजनेत समाजाची बुद्धिनिष्ठ चिकित्सेच्या दिशेनं वाटचाल होणं हेही अत्यंत आवश्यक आहे.

मनोव्यापाराविषयींचं योग्य शिक्षण मिळालं तर कितीतरी माणसं मनोरुग्णतेच्या अवस्थेला पोहोचण्याआधी बचावली जातील अशी हे पुस्तक वाचताना खात्री पटते. मनोव्यापारातील सर्व प्रश्नांचे उलगडे झाले आहेत असा मनोवैज्ञानिकांचा दावा नाही. मंतरलेल्या पाण्यानं किंवा अंगाऱ्या धुपाऱ्यांनी साऱ्या आधीव्याधी नष्ट करता येतात अशा प्रकारच्या किंवा गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून मधुमेहापासून ते हृदयविकारापर्यंत सर्व रोगांवर विजय मिळवता येतो अशा प्रकारचा तर्कशून्य दावा विज्ञान करत नाही. विज्ञान आपल्या मर्यादा, आपल्या त्रुटी मान्य करतं. आपले सिध्दांत पुन्हा पुन्हा तपासून पाहतं आणि सत्याचा शोध चालू ठेवतं. मनाच्या गुंफेत अजूनही कितीतरी अज्ञात प्रदेश आहेत. मेंदूच्या रचनेचा आणि कार्यपद्धतीचा शोध घेण्याचं कार्य युरोपात आणि अमेरिकेत वर्षानुवर्षं चालू आहे. आजही दर महिन्याला ‘मेंदू’ या विषयावरच्या नव्या संशोधनाचे निबंध प्रसिद्ध होत असतात. अंतर्मनाची फ्रॉईडनं कार्यपद्धती शोधून काढल्यावर आणि स्वप्नांचे अन्वयार्थ लावण्याच्या रीतीवर कितीतरी साधकबाधक चर्चा झाली. मार्क्सनं साऱ्या सामाजिक अनर्थाचं मूळ हे अर्थव्यवस्थेचं संतुलन बिघडण्यात आहे हा सिद्धांत मांडून प्रचंड विचारचक्र परिवर्तन ज्याप्रमाणे घडवून आणलं त्याचप्रमाणे फ्रॉईडने लैंगिक भूक हीच मनोव्यापारावर नियंत्रण ठेवणारी शक्ती असल्याचा सिद्धांत मांडून मनोरुग्णांसाठी नवीन उपचारपद्धती शोधून काढली. सारं जग हादरून टाकणाऱ्या ह्या दोन्ही सिद्धांतांचा स्वीकार वैज्ञानिकांनी आंधळेपणानं करून ते स्वस्थ राहिले नाहीत. त्यातल्या त्रुटी शोधण्याचंही कार्य त्यांनी चालू ठेवलं आहे. ज्ञानाच्या उपासनेला खंड मानवत नसतो. मेंदूच्या कार्याचं रहस्य शोधण्यासाठी चाललेले पाश्चात्त्य देशांतल्या वैद्यक शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नात येणाऱ्या अनुभवांचं लेखन केलेले ग्रंथ वाचताना आपण थक्क होऊन जातो. पण हे सारं ज्ञान इंग्रजीत आहे. आपल्या देशात इंग्रजी वाचणारांची संख्या शेकडा दोन तरी आहे की नाही याची मला शंका आहे. अशा परिस्थितीत माणसांचे जगणे रोगहीन करण्यासाठी लिहिलेले ग्रंथ त्यांना कळेल अशा भाषेत जनसमुदायापर्यंत नेऊन पोहोचविणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाचं खूप चांगलं स्वागत झालं पाहिजे.

रोगाचं कारण सापडलं की रोग नव्वद टक्के बरा झाला असं समजावं. त्यासाठी मनोविकार हा सुद्धा देहविकारासारखाच विकार आहे आणि कित्येक देहविकारांचं मूळसुद्धा मनोविकारात आहे हे सूत्र लोकांच्या मनात ठसवायला हवं. साऱ्या दु:खांचं कारण ‘मन अनावर’ असल्याचं संतांनी सांगितलं आहे. पण मनाच्या त्या अनावरपणाचं विश्लेषण विज्ञाननिष्ठ वैद्यक शास्त्रज्ञांनी करून अनेक मनोरुग्णांना वेडाच्या दरीतून वर काढून जीवदान दिलं आहे. अशा ह्या शास्त्राची उत्तम ओळख करून देणार हा ग्रंथ डॉं. प्रकाश साठये यांनी मराठी वाचकांपुढे ठेवला आहे. तो वाचायला आपण स्वत: मनोरुग्ण किंवा एखाद्या मनोरुग्णाचा आप्त असायची जरुरी नाही. आपल्या स्वत:च्या मनोव्यापाराची माहिती होण्यासाठी आणि ते संतुलन न बिघडण्यासाठी घ्यायच्या खबरदारीसाठी देखील हा ग्रंथ वाचायला हवा.

ह्या विषयाला आवश्यक अशी तंत्रिक परिभाषा मराठीत रूढ झालेली नाही; त्यामुळे कानावर पडणाऱ्या इंग्रजीतील ह्या विषयाशी संबंधित असणाऱ्या शब्दांना मराठीतले प्रतिशब्द सांगणारा छोटासा पारिभाषिक शब्दकोशही ह्या संग्रहात दिलेला आहे. त्याचाही सर्वसामान्य वाचकाला लाभ होईल.

शरीर ढासळलं तरी जोपर्यंत मन ढासळलेलं नाही तोपर्यंत मनुष्य आपलं व्यक्तिमत्त्व टिकवून असतो. शहाण्यातला शहाणा, प्रकांड पंडित, कलाचतुर, उमद्या स्वभावाचा, उत्तम रसिकवृतीचा, कशाही योग्यतेचा माणूस असला तरी मनाचं संतुलन बिघडलं की तो चैतन्यहीन पालापाचोळा होऊन गेलेला असतो. म्हणूनच मन सुदृढ ठेवण्यावर संतांनीही भर दिला आहे. ‘मन करा रे निश्चल’ असा उपदेश शतकानुशतके चालू आहे. एकदा मनावरचा ताबा उडाला की माणूस आणि आवेग आवरता न येणारा पशू ह्यात फरक उरत नाही. म्हणून पुन्हा म्हणावसं वाटतं मन एव मनुष्य:। त्या मनाचे व्यापार, त्या मनाची कार्यपध्दती समजावी ह्या हेतूने हे पुस्तक लिहीले आहे. माणसाला आपण आत्महत्या का करतो आहोत हे देखील कळू नये अशा अवस्थेपर्यंत नेणाऱ्या मानसिक व्याधींच्या निरनिराळ्या प्रकारांसंबंधी माहितीपूर्ण असं हे पुस्तक मराठीतून लिहिल्याबद्दल मी प्रकाशचं अभिनंदन करतो.

पु. ल. देशपांडे
पुणे, २३-३-८६

3 प्रतिक्रिया:

Priyaranjan Anand Marathe said...

Looks divine. Kudos to Pu la and his open mind.

annu said...

mast aahe....Pu l chi kami aamhala aayushbhar watnar aahe.......

Unknown said...

hee prastavana vachunach pustak vachavese watte.