भाईंचंच एक वाक्य आहे, 'पंढरीच्या पांडुरंगापेक्षा त्याला उराउरी भेटणारा वारकरीच मला जास्त भावतो.' भाईंच्या चाहत्यांबाबतही मला बऱ्याच वेळा हाच अनुभव येतो.
भाईंचे चाहते जगभर पसरले आहेत, त्यांच्या पुस्तकांची पारायणे होत असतात. त्यांच्या लेखनातील उतारेच्या उतारे तोंडपाठ असणारीही बरीच मंडळी आहेत. पण माझ्या पहाण्यातले काहीजण खरंच अवलिये आहेत. पुलप्रेम, म्हणजे किती मर्यादेपर्यंत जाऊ शकतं, हे त्यांच्याकडे पाहून कळतं. अशाच एका पुलप्रेमी वारकऱ्याची भेट करून द्यायचा आज विचार आहे.
निमित्त झाले आमच्या भिलार भेटीचे. अशिया खंडातील पहिले ' पुस्तकांचे गाव' म्हणून प्रसिद्ध असलेले, पाचगणी महाबळेश्वर सारख्या निसर्गरम्य परिसरात वसलेले हे छोटंसं गाव. अमाप कुतूहल मनात घेऊन या गावात आम्ही भटकत आहोत. कादंबरी, ऐतिहासिक, बालवाङ्मय, अशी एकेक घरे पहात पहात एका घरासमोर पावले थबकतात. ' विनोदी ' अशी पाटी या घरावर आहे. घरमालक श्री. संतोष सावंत. घराच्या एका खोलीत विनोदाला वाहिलेली खोलीभरून पुस्तके वाचकांसाठी सज्ज आहेत, आणि या विषयाचे सम्राट आपले पुल, असं सांगणारी एक गोष्ट इथे नजरेत भरत आहे. त्याविषयीच मला बोलायचं आहे.
घराबाहेरच्या भिंती, कट्टे विनोदी लेखकांच्या .अर्कचित्रांनी (कॅरीकेचर्स) सजलेल्या आहेत. (अत्र्यांच्या लेखणीचा काटेरी दंडुका झालाय, मधु मंगेश कर्णिक माशाचा आधार घेऊन उभे आहेत, इ. इ.) असं सगळं पहात पहात आपण पुढे जातो भिंतीकडे लक्ष जाताच नजर खिळून रहाते. भिंत भरून आकाराचं भाईंचं एक सुरेख अर्कचित्र आपल्याकडे पाहून मिश्किल हसत असतं. त्यांचे ते सुप्रसिद्ध, पुढे आलेले दोन दात पुस्तकाच्या बांधणीने शिवलेले दिसतात. चष्मा आणि पुस्तकासकट चमकणारे डोळे, पुस्तकावरची फूल, देश, पान, डे, ही गंमत, आणि हे सगळं टवटवीत. गुलाबी कमळाच्या आकारात. हे सगळं गमतीजमतीने निरखत असताना नजर जाते, ती चित्राच्या उजवीकडे असलेल्या साक्षात् भाईंच्या लफ्फेदार सहीवर.
आश्चर्याने डोळे विस्फारतात. पुलंची सही? इथे? या भिंतीवर? चित्रावर ? कशी ?
आता चौकशी करणं आलंच. मग आपण सामोरे जातो, ते या घरातल्या गृहलक्ष्मीच्या प्रसन्न स्वागताला.
हसऱ्या चेहऱ्याने, उत्साहाने सौ. शिल्पा सावंत सगळी माहिती सांगत असतात. भाईंच्या या अर्कचित्राचे, आणि इथल्या सगळ्याच चित्रांचे चित्रकार श्री. विजयराज बोधनकर. मूळ कागदावरचे चित्रही त्यांच्याच हातचे आहे.
४ मे २०१७ रोजी भिलार गावाचे उद्घाटन जेव्हा औपचारिक रित्या ' पुस्तकांचे गाव ' म्हणून झाले, त्यापूर्वी तीन दिवस एक बस करून बरेच चित्रकार इथे आले. त्यावेळी श्री. बोधनकर यांनी हा विनोद विभाग सजवला. भिंत भरून असलेले हे पुलंचे कॅरीकेचर, त्याखाली असलेल्या लांबलचक सुबक लाल लाल पायऱ्या, हा सगळा परिसर हा भिलारचा सेल्फी पॉईंट बनलाय. येणारा प्रत्येक जण भाईंसोबत इथे सेल्फी घेतोच. (आम्हीही अर्थातच याला अपवाद ठरलो नाही.)
आणखी काही महिन्यांनी शिल्पाताईंकडे रहाण्याचा योग आला. अविस्मरणीय असे अगत्य, आपुलकी, रुचकर अल्पोपहार, नेमक्या वेळी मिळालेला वाफाळता चहा, या सगळ्या पाहुणचाराबरोबर एक गोष्ट मनाला भिडली. आमच्यासाठी त्यांनी दिवसभर आणि रात्रभर पुस्तकांची खोली उघडी ठेवली होती. कुणाच्याही देखरेखीशिवाय. हा विश्वास एक रसिकच दुसऱ्या पुस्तकप्रेमीबद्दल दाखवू शकतो.
शिल्पाताईंकडून चित्रकार, साहित्यिक श्री. विजयराज बोधनकर यांच्याबद्दल माहिती मिळाली. त्यांचा संपर्कक्रमांक मिळाला. पुलंच्या चित्राबद्दल, आणि विशेषतः त्या सहीबद्दल खूप उत्सुकता मनात होती. त्यांना फोन लावल्यावर दिलखुलास अशी त्यांची एक मुलाखतच हाती आली.
भिलार आणि भाईंचे कॅरीकेचर हा विषय निघाल्यावर चित्रकार भरभरून बोलू लागले. प्रत्त्येक पुलप्रेमी आपल्या लाडक्या दैवताचा विषय निघाल्यावर असाच खुलून येतो.
चित्राला आणि सहीला तर इतिहास आहेच, पण त्याचे निर्माते कलाकार श्री. विजयराज बोधनकर यांचा इतिहासही रोचक आहे.
भरपूर समृद्धी असूनही यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी घर सोडलं. घरात सात पिढ्यांची चित्रकारीची परंपरा, परंतू साचलेपणामुळे वाढ नाही, म्हणून हा साचलेपणा मोडून कलेची जोपासना करण्यासाठी मुंबईला आले. त्यानंतर जवळजवळ ३९ वर्षे वडिलांचा एकही पैसा न घेता प्रवास चालू आहे. यात शिक्षण, पदवी, विवाह, घर, सगळे आले.
पुस्तक विचार देऊ शकतं, पुस्तकांमुळे आयुष्याला दिशा मिळू शकते हा त्यांचा अनुभव आहे. सोशल मिडियाच्या आहारी गेलेल्या आजच्या पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे, या तळमळीतून साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील सुमारे ९० व्यक्तींची अर्कचित्रे त्यांच्या कुंचल्यातून साकारत गेली. यांची प्रदर्शने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरघोस प्रतिसादात होऊ लागली. कुठलाही मोबदला न घेता.
या अर्कचित्रांचे नंतर एक पुस्तकही निघाले.
full Imperial size ची ही कॅरीकेचर्स आहेत. (यात बा.भ.बोरकर ढगांवर बसलेले आहेत, व्यंकटेश माडगूळकरांच्या चेहऱ्याला हरणाची शिंगं आहेत, दुर्गाबाई भागवतांच्या पेनाला आग लागलीय, तर गदिमांच्या लेखणीला पालवी फुटलीय.) ज्यांचं जे व्यक्तीचित्र, तेच अर्कचित्रात उतरलंय.
भाईंच्या या अर्कचित्राबद्दल बोलताना ते म्हणतात,
" पुलं कसे आहेत, तर कमळासारखे, गुलाबासारखे. त्यांनी दु:ख कधी जास्त उगाळलं नाही. सगळ्यांना प्रसन्न करीत राहिले, आणि त्यांचा वाचक भुंगा होऊन या कमळाभोवती गुंजारव करीत राहिला."
(चित्रात पण हा भुंगा दिसतोय बरं का.)
" आजही पुलं म्हटलं, की सगळं टेन्शन जातं. हा गेल्या तीन पिढ्यांचा अनुभव आहे. अस्सल साहित्य जुनं होत नाही. ते कालातीत आहे."
मुंबईत आल्यावर, वयाच्या अंदाजे १९ वर्षाच्या आसपास, कामधाम नसलेल्या अवस्थेत निरुद्देश भटकताना असंच तिकिट काढून शिवाजी मंदिरला जाऊन बसले. तिथे एक पांढऱ्या केसांचे गृहस्थ, आणि त्यांच्याच वयाच्या एक बाई अतिशय रसाळ पद्धतीने कविता वाचनाचा कार्यक्रम सादर करीत होत्या. न राहवून त्यांनी शेजाऱ्याला विचारले, की हे कोण ? शेजाऱ्याने रागावूनच पाहिले, आणि म्हटले,
" हे पु.ल.देशपांडे, आणि त्या त्यांच्या पत्नी सुनिताबाई."
हे भाईंचे झालेले पहिले दर्शन. यानंतर भाईंचे बोरकरांच्या कवितांचे सादरीकरण, एकपात्री प्रयोग,आणि असेच कार्यक्रम ते पहात गेलो. पुलंची पुस्तके एक एक करीत खरेदी करीत सुटलो, आणि ती वाचता वाचता आयुष्याची प्रचिती येत गेली." (हा त्यांचाच शब्द.)
यानंतरचा त्यांचा अनुभव ऐकण्यासारखा.
लग्नानंतर एकदा मलेरिया झाला. दुसरं काहीच करता येण्यासारखं नव्हतं, तेव्हा 'व्यक्ती आणि वल्ली', आणि 'बटाट्याची चाळ' ही दोनच पुस्तकं आलटून पालटून सतत वाचत राहिले. इतकं, की ते मेंदूत केमिकल लोचा म्हणतात, तसं झालं. नारायण, हरी तात्या, अंतू बर्वा, नामू परीट, ही माणसं प्रत्यक्षात दिसायला लागली. मग त्यांची अर्कचित्रे काढली. ती काढता काढता भाईंचीही बरीच चित्रे काढली. भिलारच्या भिंतीवरचं चित्रं त्यातलंच.
आता या चित्रावरच्या सहीचा किस्सा.
या चित्रांवर भाईंच्या सह्या घ्याव्यात, ही खूप इच्छा होती. तसा योग जुळूनही आला.
मुंबईच्या एशियाटिक लायब्ररीमधे चित्रकार बोधनकर यांचा सत्कार होता, तिथे पुलं येणार होते. त्यावेळी बाळासाहेबांनी साहित्यिकांना बैल म्हटल्याने वातावरण गरम होते. ठाकरे- पु.ल. वाद रंगला होता. त्या सगळ्या गोंधळात कार्यक्रमाला पुलं आलेच नाहीत. सह्यांचा विषय बारगळला.
काही काळानंतर एका म्युझियममधे भाईंचे भाषण होते. त्यावेळी त्यांना माईक लावून द्यायचा, आणि तासभर त्यांच्याजवळ उभे रहायचे, असे काम बोधनकरांना मिळाले. त्यावेळी ती सगळी व्यक्तीचित्रे त्यांनी पुलंना दाखवली. त्यांनी चित्रांचे खूप कौतुकही केले. सह्या मागितल्यावर भाई सह्या करू लागले. पार्किन्सन्समुळे त्यावेळी त्यांच्या हातामध्ये कंप होता. (आपल्याला तो कंप सहीमधेही दिसतो.)
दोन चित्रांवर सह्या मिळाल्या, त्यात हे भाग्यवान चित्र होतं. थरथरत्या हाताने भाई तिसऱ्या चित्रावर सही करू लागले, त्यावेळी मात्र या त्यांच्या भक्ताने त्यांना थांबवलं. त्यांचा त्रास यांना पहावला नाही.
धन्य ते पु.ल.! हात थरथरत असूनही चाहत्याचे मन राखण्यासाठी कष्ट घेतले, आणि धन्य त्यांचा भक्त ! त्यांच्या सहीचा अनमोल ठेवा स्वत:च्या कलाकृतीवर मिळत असतानाही, केवळ त्यांचा त्रास पहावत नाही, म्हणून त्यांना थांबवले.
तर असा हा सहीचा इतिहास.
हेच अर्कचित्र पीएल् यांच्या सही सही सहीसकट भिलारच्या सावंतांच्या घरी, त्या भिंतीवर सेल्फी पॉईंट म्हणून विराजमान झाले आहे.
मुद्दाम सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे.
पुलंची सही असलेले जे चित्र भिंतीवर काढले आहे, त्यावर कलाकाराने स्वत:ची सही केलेली नाही. त्यांचे नावही कुठे नाही.
न केलेल्या या सहीतून खूप काही त्यांनी सांगीतले आहे.
बोधनकरांनी काढलेल्या, भाईंची सही न लाभलेल्या बाकीच्या चित्रांचाही एक गमतीदार किस्सा त्यांनी सांगीतला.
पुलंचे बंधू श्री. रमाकांत देशपांडे, यांच्याकडे ती चित्रे दाखवायला हे घेऊन गेले. प्रथम इतर काही चित्रे दाखवली, तेव्हा 'चहा कर गं' , अशी सूचना स्वयंपाकघराकडे गेली. नंतर जशी पुलंची, आणि वल्लींची चित्रे येऊ लागली, तशी "आता कांदेपोहेच कर." अशी ती सूचना बदलली.
तर असे पुलवेडाचे हे किस्से.
मराठी साहित्याची जर पंढरी असेल, तर इथल्या पांडुरंगाचा मान निर्विवादपणे पद्मश्री पु.ल. देशपांडे यांचाच आहे.
या पांडुरंगाच्या आणखी काही अचाट अफाट वारकऱ्यांचे किस्से परत कधीतरी.
डॉ रमा खटावकर.
पुलंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे
Thursday, December 5, 2019
साहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी - (डॉ रमा खटावकर)
Labels:
PL Deshpande,
Pula,
Pula Deshpande,
pulaprem,
आठवणीतले पु.ल.,
चाहत्यांचे पु.ल.,
पु.ल.,
पु.लं.,
बटाट्य़ाची चाळ
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 प्रतिक्रिया:
Post a Comment