१२ जून २००० या दिवशी पुलंचं देहावसान झालं. त्या दिवशी पु. ल. देशपांडे नामक व्यक्तीचा मृत्यू झाला नव्हता, तर अवघ्या महाराष्ट्राचा साहित्य आणि संगीतातल्या अमूल्य आठवणींचा ठेवा स्वर्गातल्या देवांचं मनोरंजन करायला निघून गेला होता. त्यांनीच म्हटलंय, 'स्वर्गात गेल्यावर ब्रह्मदेव मला विचारेल, 'वत्सा पुरुषोत्तमा, विनोदाचं भांडवल देऊन मी तुला पृथ्वीवर पाठवलं ते तू कुणाकुणाला दिलंस?' तेव्हा मी उत्तर देईन, 'मी कुणाला काय दिलं याचा हिशेब ठेवत नाही; पण तमाम मराठी माणसांनी मला आपलं अनमोल हास्य दिलं; हे मी कधीही विसरणार नाही !'
अजूनही मराठी रसिकांचा दिवस 'इंद्रायणीकाठी देवाची आळंदी' या भजनानं किंवा 'कबिराचे विणतो शेले' अशा गाण्यांनी होतो, तर 'दूर कुठे राऊळात दरवळतो पुरिया...', 'सख्यांनो करू देत शृंगार' ही गाणी ऐकण्यानं एखादी संध्याकाळ फुलून येते. कधी जीवनातल्या अवघड वळणावरून जाताना 'माझे जीवनगाणे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मी जाणे' अशी त्यांनी संगीत दिलेली गाणी जगण्याचा धीर आणि जीवनातला आनंद देऊन जातात. 'शब्दावाचून कळले सारे'सारखी अत्यंत तरल चालीची गाणी प्रेमातल्या पूर्णत्वाचा आश्वासक आनंद देऊन जातात. पुलंच्याच शब्दांत 'कशासाठी जगायचं, तर संगीत ऐकण्यासाठी जगायचं' हा जीवनाचा हेतू देऊन जातात.
विनोदी लेखक, नाटककार, कथाकार, पटकथाकार, अभिनेते म्हणून पु. ल. महानच होते. उभ्या महाराष्ट्राला त्यांनी हसवलं. त्या पुलंचा मला अतिशय भावणारा गुण म्हणजे त्यांच्यातला सूरग्राही संगीतज्ञ... गायक, वादक आणि संगीतकार !
त्यांना लहानपणापासूनच सुरांची विलक्षण ओढ होती. लहानपणच्या अगदी पुसट आठवणींबद्दल बोलतात, तेव्हा ते प्रसंगांपेक्षा सूरांचींच आठवण अधिक असल्याचं सांगतात. त्यांची आई खूप चांगली पेटी वाजवत असे आणि आजोबा कीर्तनकार होते. त्यांच्या घरात गाणं-बजावणं कायम होतंच. आवाजाच्या आणि सूर-लयीच्या ओढीबद्दल ते म्हणतात, 'ज्या काळात लहान मुलांचं लक्ष प्रसादाच्या खिरापतीकडे असतं, त्या काळात माझं लक्ष कीर्तनकाराच्या कथेमधे आणि अभंग, श्लोक, आर्या यांच्यामधे असायचं.' वयाच्या अगदी आठव्या दहाव्या वर्षापासून त्यांनी बालगंधर्व, बाई सुंदराबाई, सवाई गंधर्व, मास्टर कृष्णराव, हिराबाई बडोदेकर, फैयाझ खाँ, मल्लिकार्जुन मन्सूर यांचं गाणं ऐकलं. या सगळ्यांच्या गाण्याचे सूर त्यांच्या मनात आणि हृदयात घट्ट वसले होते. त्यांच्याच वयाचे असणारे पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याशी त्यांची मैत्री आजन्म राहिली. त्यांच्या मैत्रीतली एकतानता 'इंद्रायणीकाठी', 'ही कुणी छेडिली तार...' अशा अनेक गाण्यांतून दिसते.
पुलंना सगळ्या प्रकारची गाणी आवडायची. नाट्यगीतं तर ते अगदी समरस होऊन गायचे. बालगंधर्वांवर पुलंचं निरतिशय प्रेम. त्याबद्दलचे अनेक किस्से आहेत. लहानपणी ते पेटी शिकायला दत्तोपंत राजोपाध्ये मास्तरांच्या क्लासला जात असत. त्यांच्या क्लासचं स्नेहसंमेलन होतं. त्याला अध्यक्ष म्हणून प्रत्यक्ष बालगंधर्व आले होते. त्यांच्यासमोर अकरा वर्षांच्या पुरुषोत्तमानं पेटीवर त्यांचीच नाट्यगीतं वाजवायला सुरुवात केली; तसे बालगंधर्व खुर्चीवरून उठून पुलंच्या समोर येऊन बसले आणि भरभरून आशीर्वाद दिले. बालगंधर्वांची गायकी पुलंनी आयुष्यभर आपल्या हृदयात साठवली.
लेखक व्हायच्या आधी पुलंना गायकच व्हायचं होतं. ते संपूर्ण महाराष्ट्रभर गाण्याचे कार्यक्रम करीत असत. पुढं वसंतरावांची आणि पुलंची ओळख झाली. पु. ल. वसंतरावांसमोर गायले. वसंतरावांनीही पुलंच्या गाण्याचं कौतुक केलं; पण वसंतरावांनी आपली गायकी पेश केली, तेव्हा आपण काहीच नाही असं वाटून पुलंनी गाणं म्हणणं सोडून दिलं. आयुष्यभर पेटी वाजवली अन् गाण्यांना संगीत दिलं. वसंतरावांच्या गाण्याबद्दल पु. ल. म्हणतात, 'वसंताची गायकी परंपरेच्या पालखीतून संथपणे मिरवणारी नाही. ती दऱ्याखोऱ्यांतून बेफाम दौडत जाणाऱ्या घोडेस्वारासारखी आहे.'
पेटी वाजवण्याबरोबरच अभिनय, नाट्यलेखन, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण आणि फार काय; पण त्यांनी तमाशाही लिहिला आहे. हे सगळं एकच माणूस करतो, हे आजच्या 'स्पेशलायझेशन'च्या पिढीला खूप आश्चर्यकारक वाटण्यासारखं आहे. याबद्दल ते म्हणतात, 'एक विदूषक, एक गायक आणि एक लेखक माझ्यामध्ये लहानपणापासून दडलेला आहे. यांच्यापैकी कोण केव्हा उसळी मारून वर येईल काही सांगता येत नाही.' त्यांनी रेडिओ आणि 'दूरदर्शन'मध्ये नोकरी केली. त्यानिमित्तानं देशाभरातल्या अक्षरशः शेकडो संगीत कलाकारांशी त्यांची चांगलीच गट्टी जमली. संगीतप्रेमी मंडळींशीही स्नेह जुळला. तिथंच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं विपुल संगीत ऐकलं. पुलंना कोणतंही गाणं वर्ज्य नव्हतं. याबद्दल त्यांनी एका ठिकाणी खूप सुंदर लिहिलं आहे. ते म्हणतात, 'मी सूर-तालाचा लोभी आहे. त्या लोभात सारंगीही आहे आणि एकतारीही आहे. मृदंगही आहे आणि ढोलकीही आहे. कपाळभर आडवं गंध लावलेला धृपद धमार आहे आणि डोळ्यात सुरमा घातलेली गझलही आहे...'
किती रसिकतेनं लिहिलं आहे हे! पुलंनी संगीत दिलेली गाणी आजही आपल्या मनात ताजी आहेत. त्यात ज्योत्स्नाबाई भोळेंनी गायलेलं पहाटेचं चित्रमय वर्णन करणारं 'झाली पहाट झाली पहाट' हे गाणं, मागच्या अनेक पिढ्यांनी ज्या गाण्यावर ठेका धरला ते आशा भोसलेंच्या आवाजातलं 'नाच रे मोरा नाच' आहे, तर माणिक वर्षांनी गायलेलं खट्याळ चालीतलं 'हसले मनी चांदणे'ही आहे. या गाण्यांच्या आठवणीही अत्यंत रमणीय आहेत. एकदा गदिमा आणि पु. ल. रस्त्यानं जात होते. तेव्हा गदिमांनी पुलंना आपल्याला ते रागविग काही कळत नसल्याचं म्हटलं आणि 'केदार राग कसा असतो,' असं विचारलं. त्यावर पुलंनी उत्तर दिलं, 'समोर प्राजक्ताचं डवरलेलं झाड दिसतंय ना तोच केदार!' क्या बात है! गदिमाही काय समजायचं ते समजून चुकले आणि एक गीत त्यातून तयार झालं, 'ही कुणी छेडिली तार, प्राजक्ताच्या मधुगंधासम कुठुनी ये केदार...' या गाण्याला पुलंनी केदार रागातच चाल दिली !
एक विशेष गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे पुलंनी 'बिल्हण' या मूळ संस्कृत नाटकाचं मंगेश पाडगावकरांना मराठीत रूपांतर करायला सांगितलं. मंगेश पाडगावकरांनी ही सांगीतिका - लिहिली. त्याला पुलंनी संगीत दिलं. ही सांगीतिका आकाशवाणीवर दोनदा प्रसारित झाली. एकदा किशोरी आमोणकर आणि पं. भीमसेन जोशी यांनी गायली, नंतर पं. जितेंद्र अभिषेकी आणि किशोरी आमोणकर यांनी गायली. त्यात शोभा गुर्टू, रामदास कामत आणि पं. हरिप्रसाद चौरसिया असे अनेक मातब्बर कलाकार होते. या सगळ्यांची मोट पु. ल.च बांधू शकतात. याच्या रेकॉर्डिंग आता फारशा उपलब्ध नाहीत. त्यातलं एकच अप्रतिम गाणं 'सात समुद्रापलीकडून विहंगाला......' ऐकायला मिळतं. पुलंच्या अशा अगणित आठवणी आहेत. हा आपल्याला मिळालेला अमूल्य ठेवा कितीही वाटला तरी न संपणारा आहे. पुलंच्याच शब्दात सांगायचं म्हटलं, तर 'आपलं संगीतच मुळात चिरतरुण आहे'. म्हणूनच पुलंची आठवण आल्यावर मागच्या संपूर्ण शतकाचा संगीतपट व डोळ्यासमोर उभा राहतो, डोळ्यांच्या कडा ओलावतात आणि टागोरांच्या कवितेतल्या ८. त्यांच्याच ओळी, त्यांच्याच आवाजात मनात निनादत राहतात...
हसेन खळखळ, गायीन कलकल
धरुनी ताल मग टाळी देईन,
माझ्यापाशी कथा किती तरी,
गाणी किती तरी,
प्राणांची अन शक्ती किती तरी..
सुखे किती, अनंत ऊर्मी,
मम जीवाची कोण उभारी...
अमृता देशपांडे
संपर्क क्रमांक - ९६८९९४७०१४
(लेखिका संगीत अभ्यासक आहेत.)
महाराष्ट्र टाईम्स
१२ जून २०२४
(लेखिका संगीत अभ्यासक आहेत.)
महाराष्ट्र टाईम्स
१२ जून २०२४
0 प्रतिक्रिया:
Post a Comment