Tuesday, November 8, 2022

निर्मळ, निखळ आनंदाचा दिवस - किशोरी तेलकर

नाटकांचं रूपांतरही असं अस्सल मराठीत केलंत, की कळूच नये हे रूपांतर आहे! नाटक असो वा सिनेमा, आपला शेर संपला, की तुम्ही तिथं न रेंगाळता पुढं निघालात. तुम्हीच आम्हाला दर्जेदार कवितांचा आस्वाद घ्यायला शिकवलंत.

प्रिय पु. ल.

वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आज तुम्ही १०३ वर्षांचे झालात... हो, झालातच! तुमच्याबाबत भूतकाळवाचक कुठलंही क्रियापद वापरायला मन धजत नाही. याचं कारण शरीरानं तुम्ही २२ वर्षांपूर्वी हे जग सोडून गेला असलात, तरी आजही तुम्ही तुमच्या अक्षर वाङ्मयाच्या रूपानं, तुमच्या सिनेमांच्या रूपानं, तुमच्या गाण्यांच्या रूपानं, तुमच्या एकपात्री व्हिडिओंच्या माध्यमातून आमच्यात आहातच. बहुतांश मराठी घरांत तुमचं एखादं तरी पुस्तक असतंच. आजही प्रवासाला जाताना ‘बोअर झालं तर वाचायला असावं’ म्हणून तुमचंच एखादं पुस्तक सहज बॅगेत टाकलं जातं. पुस्तक प्रदर्शनांतील पुस्तक विक्रीत तुम्ही आजही टॉपवर आहात. तुमच्या नावाचा सिनेमा निघाला, की तो पहिल्या दिवसापासून हाउसफुल्ल! तुमच्या नावे फेसबुकवर एखादा ग्रुप स्थापन झाला, की तो काही दिवसांत लाखभर सदस्यसंख्या सहज गाठतो. एकेकदा वाटतं, सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात तुम्ही असता, तर तुम्ही तेही जग केव्हाच पादाक्रांत केलं असतं; पण एक मन म्हणतं, नकोच ते! आजच्या या उथळ, थिल्लर आणि क्षणिक ‘मनोरंजना’च्या जमान्यातल्या कथित विनोदांपेक्षा तुमचा साधा-सोपा, निर्मळ, निर्विष विनोद किती तरी उच्च पातळीवरचा होता. महाराष्ट्रातल्या किती तरी पिढ्यांचं पोषण या दर्जेदार विनोदावर झालं आहे. अभ्यासातून, चिंतनातून, सूक्ष्म निरीक्षणातून तुम्ही मांडत असलेली विसंगती आम्हाला हसवता हसवता खूप काही शिकवून जात होती. तुमच्यामुळं आम्हाला परदेशी भाषांतलं दर्जेदार साहित्य मराठीत अनुभवता आलं. नाटकांचं रूपांतरही असं अस्सल मराठीत केलंत, की कळूच नये हे रूपांतर आहे! नाटक असो वा सिनेमा, आपला शेर संपला, की तुम्ही तिथं न रेंगाळता पुढं निघालात. तुम्हीच आम्हाला दर्जेदार कवितांचा आस्वाद घ्यायला शिकवलंत.

सुनीताबाईंच्या जोडीनं महाराष्ट्रभर कवितावाचनाचे प्रयोग करून तुम्ही रसिकांना अपरंपार आनंद दिलात. गांधीजींपासून रवींद्रनाथांपर्यंत अनेकांचं महत्त्वाचं समकालीन साहित्य भाषांतरित केलंत. रेडिओवर काम केलंत. ‘दूरदर्शन’चे पहिले निर्माते झालात. तुमच्याच डोळ्यांनी आम्ही लंडन, पॅरिसची ‘अपूर्वाई’ अनुभवली. तुमचंच बोट धरून सिलोन ते जपान असा ‘पूर्वरंग’ही बघितला. वयाच्या पन्नाशीत बंगाली शिकलात आणि ‘माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो,’ हे स्वत:च्या वागणुकीतून सिद्ध केलंत. तुम्ही या मातीवर, मराठी भाषेवर, इथल्या माणसांवर मनापासून प्रेम केलंत; जगण्याचं प्रयोजन शिकवलंत! समाजाचं देणं समाजाला कसं (न बोलता) परत करावं हे शिकवलंत. गुणग्राहकता कशी असते, हे स्वतःच्या वागणुकीतून दाखवून दिलं. आपणही असं अर्थपूर्ण जगलं पाहिजे, असं तुमच्या आयुष्याकडं बघून वाटावं, एवढं रसरशीत, स्वच्छ जगलात! विनोदाच्या माध्यमातून मराठी जनांच्या मनाची मशागत करीत तुम्ही विनोदाची ही दिंडी अभिमानानं आयुष्यभर खांद्यावर मिरविली. ही दिंडी एवढी चैतन्यशील आणि देखणी होती, की मराठी माणूस वारकऱ्यांच्या भक्तिभावाने तुमच्या मागून विनोदाचं, आनंदाचं गाणं गात गात चालत निघाला. म्हणूनच तुमची आनंदयात्रा आजही सुरूच आहे. तुमच्या साहित्यावर, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या रक्तात आता हा आनंदयात्री आहे!

- चकोर
महाराष्ट्र टाईम्स 

0 प्रतिक्रिया: